तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ‘पुस्तकी पंडित’ नव्हते, तर ‘कृतिशील विचारक’ होते, हे या पुस्तकामधून लक्षात येईल…
ग्रंथनामा - झलक
सुनीलकुमार लवटे
  • ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी : सर्वंकष आकलन’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 24 February 2023
  • ग्रंथनामा झलक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी : सर्वंकष आकलन tarkteerth Laxmanshastri Joshi - Sarvanksh Aaakalan सुनीलकुमार लवटे Suneelkumar Lawate

‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी : सर्वंकष आकलन’ हे डॉ. सुनीलकुमार लवटे लिखित व संपादित पुस्तक नुकतेच अक्षर दालन, कोल्हापूर यांनी प्रकाशित केले आहे. यात लवटे यांच्यासह डॉ. सदानंद मोरे, डॉ. राजा दीक्षित, डॉ. जर्नादन वाघमारे, किशोर बेडकिहाळ, डॉ. अशोक चौसाळकर यांच्या लेखांचा समावेश आहे. शेवटी तर्कतीर्थांचा जीवनपट व ग्रंथसूचीही दिली आहे. या संग्राह्य ग्रंथाला लवटे यांनी लिहिलेल्या संपादकियाचा हा संपादित अंश…

.................................................................................................................................................................

‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी : सर्वंकष आकलन’ खरे तर अनेकविध प्रयत्नांची फलनिष्पत्ती होय. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (१९०१ ते १९९४) जीवनकाळ म्हणून विसाव्या शतकाकडे पाहावे लागते. तर्कतीर्थांचे शिक्षण स्थूल रूपाने १९२३ला पूर्ण झाले. या वर्षी त्यांनी कलकत्त्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून ‘तर्कतीर्थ’ ही पदवी प्राप्त केली आणि ते काशी, कलकत्ता येथील उच्चशिक्षण पूर्ण करून पुन्हा प्राज्ञ पाठशाळा, वाई येथे परतले. जाताना ते येथील न्याय, वेदान्ताचं ज्ञान घेऊन गेले होते; येताना न्याय, वेदान्ताशिवाय तर्क, अलंकारशास्त्र, व्याकरण यांचं ज्ञान ग्रहण करून शिक्षक झाले व प्राज्ञ पाठशाळेत विषय शिकवू लागले.

१९२३ ते १९२९ हा पाच-सहा वर्षांचा काळ नारायणशास्त्री मराठे उर्फ स्वामी केवलानंद सरस्वतींबरोबर आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मसभा, पंडित परिषदा, धर्मपरिषदांमधील वादविवाद, खंडन-मंडनाचा होता. वेद, उपनिषद, ब्राह्मण ग्रंथ, पुराण, अरण्यकं मुखोद्गत होते, पण तो काळ भारतातील राष्ट्रीय चळवळीचा जसा होता, तसाच तो धर्म आणि समाजसुधारणांचाही होता.

तर्कतीर्थ या काळात संस्कृत साहित्य वाचून थांबले नाहीत, तर त्यांनी बकल, गिबन, मिल, स्पेन्सर, लोट्झे, सिग्व्हार्ट वाचायला प्रारंभ केल्याने, ते पश्चिमी संस्कृती आणि जगाशी परिचित होत, त्यांना प्रबोधन काळातील पुनरुज्जीवन चळवळ लक्षात आली होती. त्यातून धर्म नि समाजसुधारणांविषयी त्यांचे आकलन विस्तारले.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

तर्कतीर्थांच्या हेही लक्षात आले की, कितीही समजावून, सप्रमाण मीमांसा करून पटवून दिले, तरी पारंपरिक धर्मपंडित आपले शब्दप्रामाण्य सोडण्यास तयार होत नाहीत. या शब्दप्रामाण्यात नि कर्मकांडात त्यांचे हितसंबंध गुंतल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ‘शुद्धिसर्वस्वम्’ (१९२८), ‘अस्पृश्यत्वमीमांसा’ (१९३०), ‘भारतेतिहासतत्त्वम्’ (१९३३) सारखे प्रबंध लिहून आपला पक्ष समाजापुढे ठेवला, तरी धर्मरक्षक म्हणवून घेणारा पुरोहित, पंडित वर्ग झोपेतून (सोंग घेतले असल्याने) जागा होत नाही, हे लक्षात येऊन तर्कतीर्थांनी दगडावर डोके आपटून घेऊन कपाळमोक्ष करून घेण्यापेक्षा, स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होऊन देश धर्माच्या नसला तरी राजकीय गुलामीतून मुक्त करण्याच्या आशेने आपला मोर्चा राष्ट्रीय चळवळीकडे वळवला.

एका संस्कृत पंडिताचे रूपांतर स्वातंत्र्यसैनिक, अस्पृश्यता निर्मूलक, आंतरजातीय-धर्मीय विवाह समर्थक, रॉयवादी, हरिजन मंदिर प्रवेश समर्थक, काँग्रेसी, प्रबोधक, ज्ञानसाधक, नियतकालिक संपादक, प्राच्यविद्या संशोधक, भाषांतरकार, कोश निर्माता अशा कालौघातील भूमिकांत होणे ही सहज घडलेली गोष्ट नाही. माणूस स्वतः संवेदी, गुणग्राहक, विधिनिषेध विवेकी होणं यात संस्कारांपेक्षा स्वयंविकासाच्या प्रेरणा अधिक प्रभावी ठरतात, हे लक्षात येतं. तुम्ही ठरवावं लागतं की, आपल्या जीवन प्रेरणा काय? श्रद्धा स्थाने काय? जीवनमूल्ये कोणती? जीवन ध्येय काय? तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी एक व्यक्ती नि विचार म्हणून अभ्यासताना मला ते सतत प्रवाही दिसत आले आहेत.

एकाच आयुष्यात ते सनातनी-पुरोगामी, क्रांतिकारी-काँग्रेसी (हिंसक-अहिंसक), गांधीवादी-गांधीवाद विरोधी, भौतिकवादी- अधिभौतिकवादी दिसतात. खरे पण आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर. हा विकास प्रवास उन्नतकडून अन्नततमकडे जाणारा आहे. मतांतरी, वेषांतरे झाली खरी पण दिशांतरे नाही. म्हणजे असे की, प्रवास पूर्वेपासून सुरू होतो, पण पश्चिमेला येऊन थांबला, थबकला असे घडले नाही. उलटपक्षी आज जे उमगले ते जीवनाचे अंतिम सत्य नव्हे, ही तर्कतीर्थांच्या सर्व लेखन, भाषण, मुलाखती, पत्रे, प्रबंध इत्यादीतून होत राहिलेली जाणीव त्यांच्यातील साधक, संशोधक, सर्जक, अन्वेषक, आविष्कारकाचा मला स्थायीभाव वाटत आला आहे.

म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ‘अमुक विचारवादी’ असे विधान लोक अज्ञानापोटी, एकांगी अभ्यासाने करत असावे असे वाटते. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ असा हा वैचारिक विकास होय. त्या अर्थांनी ते मला ‘अज्ञेयवादी’ वाटत आले आहेत. अधिक उन्नत ज्ञान, अवस्था, तत्त्व, स्थिती, स्थान इत्यादीचा शोध त्यांचे लक्ष्य वाटत आले आहे. ‘थांबला तो संपला, कायदा पाळा गतीचा’ म्हणणारा हा प्राज्ञपुरुष प्रतिभेच्या बळावर नित्य नवज्ञान, नवविद्या, नवप्रज्ञेच्या शोधात दिसतो. आपल्या पूर्वमतांची मांडणी नवतर्काने करताना तो स्वतःचा समीक्षक होतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या ग्रंथाचे चार भाग आहेत - १) तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी : व्यक्ती, विचार व कार्य, २) तर्कतीर्थांची धर्ममीमांसा, ३) तर्कतीर्थांचे मराठी विश्वकोश कार्य आणि ४) तर्कतीर्थांचे वैचारिक प्रवाह आणि फलश्रुती.

वरील विभांगातील विविध लेख व भाषणांमधून तर्कतीर्थांचे सर्वंकष आकलन करून घेऊन ते जिज्ञासू वाचकांसमोर नि अभ्यासकांपुढे मांडण्याचा हा प्रयत्न आहे. पहिल्या भागात माझ्या काही लेखांसह डॉ. सदानंद मोरे नि डॉ. जनार्दन वाघमारे यांचे लेख आहेत. या विविध लेखांमधून तर्कतीर्थांचे जीवन, कार्य, विचार जसे समजतात, तसेच त्यांचे योगदानही लक्षात येते. व्यक्ती म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे अनेक पैलू या लेखांतून उमजतात.

अध्यवसायी विद्यार्थी, उच्च शिक्षणाकांक्षी संशोधक, वेद साहित्याचे अध्ययन, अध्यापन करणारा संस्कृत पंडित, धर्मसुधारणांचा आग्रह धरणारा सुधारक, स्वातंत्र्यसैनिक, अस्पृश्यता निर्मूलक, रॉयवादी, काँग्रेसी, कोशकार, भाषांतरकार, संपादक, वक्ता अशी या व्यक्तिमत्त्वाची बहुविध रूपे आपणासमोर येतात. खंडन-मंडनात पारंगत, कोळी, आदिवासी, शेतकरी, पोलीस पाटील संघटक, क्रांतिकारी, राजकारणी, ज्ञानसाधक, संपादक, कार्यकर्ते असलेले तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुस्तकी पंडित नव्हते, तर कृतिशील विचारक होते, हे या लेखांमधून आपणास लक्षात येईल.

देशाचे स्वातंत्र्य आणि महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतरची तर्कतीर्थांची वाटचाल ही ज्ञानसाधक व प्रबोधकाची राहिली आहे. ‘मीमांसाकोश’ (सात खंड), ‘धर्मकोश’ (एकोणीस खंड) यांची निर्मिती तर्कतीर्थांनी आपले गुरू स्वामी केवलानंद सरस्वती यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाने केली. ‘मराठी विश्वकोश’ (पंधरा खंड) त्यांनी स्वप्रज्ञेने व सहयोगींच्या सहकार्यातून निर्मिले. शिवाय महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबईच्या माध्यमातून शेकडो ग्रंथ निर्माण करण्याची यंत्रणा निर्माण केली. त्यांचे हे कार्य मराठी, संस्कृत भाषांना ज्ञान भाषा बनवणारे आहे, तसेच ते महाराष्ट्रास ‘ज्ञानसमाज’ बनवणारेही.

या ग्रंथाचा दुसरा भाग तर्कतीर्थकृत ‘धर्ममीमांसा’ विषयास समर्पित आहे. यातील आरंभिक लेख डॉ. अशोक चौसाळकर यांनी लिहिला असून उर्वरित माझे आहेत. या चारही लेखांमधून तर्कतीर्थकृत ‘धर्ममीमांसा’वर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. तर्कतीर्थांची अशी धारणाच आहे की, ज्ञानविज्ञानादी क्षेत्रातील समीक्षा, मीमांसा, चिकित्सा इत्यादीस प्रारंभ झाला, तोच मुळी धर्मचिकित्सेने. धर्मचिकित्सा ही मानवी जिज्ञासेचे मूळ आहे. सनातनी धर्मपंडित वेदादि साहित्यास ईश्वर निर्मित मानून त्यात परिवर्तन अमान्य करतात. शिवाय त्याची चिकित्सा ते धर्म, वेद इ. अपौरुषेय‍ मानून प्राचीन वाङ्मय नि देव, धर्मादी कल्पना चिकित्सामुक्त राखू इच्छितात. कारण या सुरक्षा कवचामागे लपून वा त्याची ढाल करून ते कर्मकांड, पूजाविधी, देव-दैव, वर्णाश्रम, स्पृश्यास्पृश्यता, जोश, पंचांग, मुहूर्तादि धर्मविधी सुरक्षित राखून पौरोहित्यापोटीचे आपले उदरभरण नि अज्ञानी, धर्मभोळ्या नि अंधश्रद्धा समाजावर आपली उच्चता लादून आपले वर्चस्व अनभिषिक्त राखू पाहातात.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

उलटपक्षी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची स्पष्ट मान्यता आहे, की वेद, धर्म इ. मानवनिर्मित आहे. जे मानवनिर्मित आहे, ते चिकित्साप्रदत्त आहे. या जगात कोणताही विचार वा धारणा वा संकल्पना अपरिवर्तनशील नाही. अगदी वैज्ञानिक सिद्धांतही यास अपवाद नाहीत. वैज्ञानिक सत्य त्या क्षणाचे सत्य होय. विश्व नि ज्ञानाच्या कक्षा अज्ञेय, अज्ञात, अनंत असल्याने नव्या शोध नि सिद्धांताने पूर्वशोध नि सिद्धांत आपोआप कालबाह्य होत अमान्य केले जातात. हिंदू धर्मही याला अपवाद नाही. हिंदू धर्मात कालौघात जे त्याज्य ठरते ते नाकारून, मानवी हित अंतिम मानूनच धर्मतत्त्वांचा, रूढी-परंपरांचा विचार झाला पाहिजे नि त्यात परिवर्तन घडून आले पाहिजे. त्यातच मानवाचे हित, कल्याण नि विकास सामावलेला आहे.

त्या अर्थाने तर्कतीर्थ धर्मासंबंधी जडवादी, भौतिकवादी, मार्क्सवादी, रॉयवादी विचारांचे अनुसरण करत अंतिमतः नवमानवतावादी होताना दिसतात. ‘सर्वधर्मसमीक्षा’, ‘हिंदू धर्माची समीक्षा’, ‘शुद्धिसर्वस्वम्’, ‘भारतीयधर्मेतिहास तत्तवम्’, ‘अस्पृश्यत्त्वमीमांसा’, ‘वैदिक संस्कृतीचा विकास’सारखे प्रबंध नि ग्रंथ याचीच साक्ष देतात. शिवाय ‘जडवाद’, ‘आनंदमीमांसा’ हे ग्रंथही हेच सांगतात.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा मूळ पिंड हा ज्ञानसाधकाचा राहिला आहे. नित्य वाचन, चिंतन, मनन त्यांची जीवनवृत्ती आहे. काही नवं वाचलं, नवा विचार उमगला की, त्यांच्यात प्रक्षोभ (प्रतिक्रिया, प्रतिसाद या अर्थाने!) निर्माण होतो व ते त्याचे अवगाहन (नि अनुसरण) करू लागतात. त्यांचे विचार, जीवन व कार्य हे चिरप्रवाहशील राहिले आहेत. एकाच एक पायाभूत विचारावर ते उभे आहेत, असे त्यांच्या अभ्यासांतीही लक्षात येत नाही. उलटपक्षी अशी पाय ठेवण्याची (स्थिर) जमीन त्यांना मिळालीच नाही. वेषांतर, मतांतर, स्थित्यंतर, स्थलांतर हा त्यांचा स्थायीभाव म्हणून सांगता येतो. त्यांच्या ज्ञानसाधक व्यक्तिमत्त्वाचा परिचय प्रामुख्याने त्यांच्या कोशनिर्मिती कार्य व योगदानातून स्पष्ट होतो.

या ग्रंथाच्या तिसऱ्या भागात तर्कतीर्थांच्या कोशकार्यावर विचार करण्यात आला आहे. यातील तीन लेखांपैकी एक लेख डॉ. राजा दीक्षित यांचा असून उर्वरित दोन माझे आहेत. तर्कतीर्थांनी आपल्या जीवनात अनेक कोशांची निर्मिती केली. कोश हे कोणत्याही ज्ञानशाखेचे पायाभूत संज्ञा, संकल्पना, अर्थ, व्युत्पत्ती, विकासाचे साधन असते. कोणताही ज्ञानसाधक, अभ्यासक, संशोधक, समीक्षक आपल्या विचारधारणेचा इमला उभा करत असतो, ते विविध कोशांमधून त्याच्या हाती आलेल्या संज्ञा, व्याख्या, सिद्धांतांतून. त्याचा मूळ स्रोत असतो ते कोशवाङ्मय. कोश वाङ्मय निर्मिती ही ज्ञानाची मूळ साधना होय.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

तर्कतीर्थांनी स्वतः तर कोश वाङ्मय निर्मिती केलीच, पण इतरांनाही कोश वाङ्मय निर्मितीस प्रेरणा देत प्रोत्साहन दिले. अनेक कोशांना त्यांनी प्रस्तावनाही लिहिल्या. मोल्सवर्थ कृत इंग्रजी-मराठी शब्दकोशाच्या १९७५च्या आवृत्तीस लिहिलेली तर्कतीर्थांची प्रस्तावना या संदर्भात लक्षात घेण्यासारखी आहे. ‘मराठी विश्वकोश’, ‘धर्मकोश’, ‘पदनाम कोश’ हे मराठी, संस्कृत भाषेचा ज्ञानव्यवहार समृद्ध करणारे पायाभूत कोश होत. ज्ञानव्यवहाराच्या रचनासंबंधाची निर्मिती हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे कोश वाङ्मय इतिहासातील महत्त्वाचे योगदान असून हे ‘आर्षकार्य’ म्हणूनच (ऋषीकार्य) त्याची नोंद घ्यावी लागेल. कोश वाङ्मयाचे महत्त्व अधोरेखित करण्याचे कार्य करून तर्कतीर्थांनी मराठीस ज्ञानभाषा अनेकांगी कार्य करत बनवली.

प्रस्तुत ग्रंथाचा चौथा नि अंतिम भाग हा वैचारिक प्रवाह व फलश्रुतीचा राहिला आहे. यात किशोर बेडकिहाळ आणि डॉ. जनार्दन वाघमारे यांचे दोन लेख असून तर्कतीर्थांची वर्तमानातील प्रस्तुतता शोधणारे माझे एक पत्र आहे. किशोर बेडकिहाळ यांनी तर्कतीर्थांच्या पुरोगामी प्रबोधक पैलूचे विवेचन आपल्या लेखात केले आहे, तर डॉ. जनार्दन वाघमारे यांनी रॉयवाद नि तर्कतीर्थ अनुबंध आपल्या लेखातून रेखांकित केला आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

प्रस्तुत ग्रंथातील अधिकांश लेख/भाषणे, पत्रे इत्यादी माझे लेखन असून अन्य पाच अभ्यासक व वक्ते यांच्या भाषणांच्या लिखित संहिता लेखरूपात या ग्रंथात विविध भागांत समाविष्ट करण्यात आल्या असून त्यांचे नामनिर्देश अनुक्रमणिकेत व लेखांखाली योग्य त्या ठिकाणी करण्यात आले आहेत.

या पुस्तकातील हे विविध लेख मराठी विश्वकोशाचा रचना कल्प आणि विकास, मराठी विश्वकोशातील तर्कतीर्थांच्या नोंदी, तर्कतीर्थांचे जीवन, कार्य, विचार, वाचन, हिंदू धर्मविषयक धारणा, त्यांच्या समग्र वाङ्मयाचे सिंहावलोकन करत समग्र तर्कतीर्थ आपणा पुढे उभे करण्याचा प्रयत्न या लेखकाने केला आहे.

या ग्रंथात नामवंत अभ्यासकांनी तर्कतीर्थांनी केलेली महाराष्ट्राची जडणघडण, त्यांचं पुरोगामी प्रबोधक रूप, तर्कतीर्थ आणि रॉयवाद, मराठी विश्वकोश कार्य, व्यक्ती आणि विचार यांचा आढावा घेतला आहे.

हा ग्रंथ आकारला, साकारला तोच मुळी व्याख्यानमालेतील विविध भाषणांच्या लिखित संहितेतून आणि वेळोवेळी, विविध प्रसंगांच्या निमित्ताने लिहिलेल्या अनेकविध लेखांतून. तर्कतीर्थांचे सर्वंकष आकलन ही काळाची गरज वाटल्याने केलेली ही ग्रंथनिर्मिती होय.

‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी : सर्वंकष आकलन’ – लेखक\संपादक – डॉ. सुनीलकुमार लवटे

अक्षर दालन, कोल्हापूर | पाने – ३२६ | मूल्य – ५०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......