अजूनकाही
ज्येष्ठ पत्रकार-संपादक प्रशांत दीक्षित यांचे ‘नरेंद्र मोदी : नवी भाजपा, बदलता भारत’ हे नवे पुस्तक नुकतेच राजहंस प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केले आहे. सलग वीस वर्षे सत्तेत असलेला लोकप्रिय नेता, टोकाची प्रशंसा आणि तीव्र टीका यांची सतत सलामी मिळत असलेला राजकारणी, एकीकडे ‘ग्रेट डिव्हायडर’ अशी ओळख, तर दुसरीकडे भाजप आणि प्रशासनाची कार्यसंस्कृती बदलणारा प्रशासक, अशा विविध प्रकारे ओळखल्या जात असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे राजकीय चरित्र आहे. त्याला दीक्षित यांनी लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश…
.................................................................................................................................................................
नरसिंह राव यांनी १९९१मध्ये घडवून आणलेल्या आर्थिक स्थित्यंतराचे चित्रण करणारे ‘रावपर्व’ हे माझे पुस्तक दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाले. ते वाचून काही जाणकारांचे अभिनंदन करणारे फोन आले. ‘रावपर्व’चे वैशिष्ट्य म्हणजे, ते वर्तमानकाळाविषयी आहे. वर्तमानकाळातील राजकारण किंवा घडामोडी यावर पुस्तकरूपाने मराठीत फारसे कोणी लिहीत नाही. इतिहासात रमण्यापेक्षा वर्तमान इतिहासावर लिहिले गेले पाहिजे, असे मत बहुतेकांनी व्यक्त केले. हा मुद्दा मनावर ठसला होता.
चालू घडामोडींवर काय लिहिता येईल, याचा विचार करत असतानाच ‘रावपर्व’ प्रकाशित करणारे श्री. दिलीप माजगावकर यांनी अचानक नरेंद्र मोदींचे चरित्र करणार का, अशी विचारणा केली. विषय मला आवडल्याचे लक्षात येताच, दिलीपरावांनी त्यांच्या शिरस्त्याप्रमाणे त्याचा उत्साहाने पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. त्यांच्या उत्साही व योग्य दिशा दाखवणाऱ्या पाठपुराव्याचे फलित, म्हणजे हे मोदींचे हे राजकीय चरित्र.
नरेंद्र मोदी हा विषय अनेकांसाठी संवेदनशील आहे. मोदींबाबत देशात पूर्णपणे ध्रुवीकरण झाले आहे. मोदींमध्ये काही गुण आहेत, हे त्यांचे विरोधक कधीही मान्य करत नाहीत आणि मोदींच्या काही मर्यादा आहेत, असे त्यांचे समर्थक मानत नाहीत. या दोन टोकाच्या दृष्टीकोनांतून वाट काढत लिहायचे होते. गुणांबरोबर दोषांचीही चर्चा व्हावी, मात्र गुणांचे वर्णन करताना भक्तिभाव येऊ नये आणि मर्यादा सांगताना द्वेषभाव असू नये, याची काळजी घेण्याचा प्रयत्न मी केला आहे. व्यक्तीमधील दोष हे भिंतीसारखे असतात, तर गुण खिडकी-दरवाजासारखे असतात, असे महात्मा गांधी म्हणाल्याचे मी वाचले होते. दोषांच्या भिंतीवर प्रहार करून विरोधाची धार वाढवण्यापेक्षा, गुणांच्या खिडकी-दरवाजातून व्यक्तीच्या अंतरंगात शिरता येते, असे गांधीजी सांगत. नरसिंह रावांवर लिहिताना मी गांधीजींचा भिंत-खिडकीचा दृष्टीकोन ठेवला होता व मोदींबाबतही तोच दृष्टीकोन ठेवला आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
माझ्यासारख्या पत्रकारासाठी नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे विलक्षण कुतूहल निर्माण करणारे घटित आहे. या घटिताचा विविध अंगांनी अभ्यास झाला पाहिजे, असे मला वाटते. या पुस्तकात मुख्यतः राजकीय घडामोडींचा वेध घेतला आहे. लोकशाही व्यवस्थेत निवडणुकांच्या मार्गाने हिंदुत्वाची सांस्कृतिक विचारधारा मुख्य प्रवाहात कशी आणली गेली, याचे कथन या पुस्तकात आहे. नरेंद्र मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे एकमेकांपासून वेगळे नाहीत आणि मोदींच्या राजकीय विजयातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वाटा इथे नमूद केला आहे.
नरेंद्र मोदी हे परंपरानिष्ठ हिंदू आहेत, त्याचबरोबर अतिशय कार्यक्षम असे प्रशासक आहेत. राजकीय व प्रशासकीय व्यवस्थेची उत्तम चौकट देशात उभी होती व ती उभी करण्यात काँग्रेसचे योगदान मोठे आहे. मात्र ही चौकट जडत्वामुळे अकार्यक्षम झाली होती व मंदगतीने काम करत होती. या चौकटीला कार्यक्षम करून गरिबांना थेट लाभ देणारी, म्हणजेच काम करणारी लोकशाही व्यवस्था मोदींनी आठ वर्षांत आणली.
कोविडचे लसीकरण आणि कोविड काळातील धान्यवाटप, ही याची दोन उदाहरणे. सरकारी चौकट कार्यक्षम करण्याचा राजकीय फायदा त्यांना कसा मिळाला, याचे विवेचन या पुस्तकात आहे. विचारधारेवरील अविचल निष्ठा आणि त्याला कार्यक्षम, धोरणी आणि वेळेनुसार चलाख डावपेचांची जोड, हे मोदींचे वैशिष्ट्य आहे. बलवान राष्ट्रनिर्मिती, हे त्यांचे ध्येय आहे आणि संघाची विचारधारा जास्तीत जास्त लोकांमध्ये रुजवण्याची महत्त्वाकांक्षा आहे. विरोधाची पर्वा न करता, ‘हिंदू राष्ट्रवाद’ देशातच नव्हे, तर जगाच्या व्यासपीठावर मांडण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे. बलवान ‘हिंदू राष्ट्रवादा’ची संस्कृती नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत सत्तास्थानी आणली आहे. ती कशी आणली गेली, याचे कथन इथे आहे. यातून निर्माण झालेला संस्कृतिसंघर्ष टिपण्याचा प्रयत्नही या पुस्तकात करण्यात आला आहे.
नरेंद्र मोदी यांचा प्रवास आणखी एका अर्थाने मला वैशिष्ट्यपूर्ण वाटतो. घराणेशाहीचे वा अन्य कसलेही पाठबळ नसताना, केवळ संघटनेवरील निष्ठा, मेहनत आणि नियोजनपूर्वक काम करण्याचे अंगी बाणवलेले कौशल्य, या गुणांच्या बळावर संघ स्वयंसेवकापासून पंतप्रधानपदापर्यंत त्यांनी मजल मारली. गुजरातमधील दंगल त्वरित रोखण्यातील अपयशाचा अपवाद केला, तर कार्यालयीन सहाय्यक ते पंतप्रधान हा मोदींचा प्रवास थक्क करणारा आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
सतत २० वर्षे चांगल्या बहुमताने सत्ता राखण्याचे यश त्यांना केवळ हिंदुत्वावर मिळालेले नाही, तर हिंदुत्वाच्या पायावर कॉर्पोरेट पद्धतीने पक्ष आणि सरकार चालवून ते हस्तगत केले गेले आहे. आर्थिकदृष्ट्या अतिसामान्य घरातील एक मुलगा अफाट मेहनत करून, स्वतःमधील गुणांच्या बळावर देशातील सर्वोच्च स्थानावर पोहोचला आहे. भारतातील असंख्य तरुणांसाठी ‘मोदित्व’ ही ‘सक्सेस स्टोरी’ आहे. भारतीय लोकशाही व्यवस्थेतील संधी व क्षमता मोदींच्या राजकीय प्रवासातून लक्षात येतात. काय घ्यावे, काय टाकावे व काम कसे करावे, याच्या ‘टिप्स’ मोदींच्या राजकीय प्रवासातून समाजाच्या कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या महत्त्वाकांक्षी तरुणांना मिळू शकतात.
मोदींच्या कर्तृत्वाची ही बाजू पाहत असताना काही धोकेही लक्षात आणून देणे आवश्यक होते. तसे ते आणून दिले आहेत. परंपरासापेक्ष तरीही धर्मनिरपेक्ष, असा राष्ट्रवाद भारतासाठी आवश्यक आहे, हे मान्य केले तरी मोदी व संघ यांचा राष्ट्रवाद हा सौम्य राष्ट्रवादाकडून उग्र राष्ट्रवादाकडे जाऊ शकतो.
प्रा स. ह. देशपांडे यांनी काही वर्षांपूर्वी सांगितल्याप्रमाणे केवळ अस्मिता व एकात्म भावना म्हणजे राष्ट्रवाद, ही ढोबळ व्याख्या असली, तरी आपण केवळ वेगळे नाही, तर श्रेष्ठ आहोत (चोझन पीपल), म्हणून वर्चस्वाचा अधिकार (साम्राज्यवाद) आपल्याला आहे, समर्थ राष्ट्रासाठी अतिरिक्त केंद्रीकरण व त्यातून हुकूमशाही (Totalitarianism) आणि शेवटी अन्य समाज खच्चीच केले पाहिजेत, असे वाटू लागणे (फायनल सोल्यूशन), अशी राष्ट्रवादाची मोठी रंगपट्टी आहे. (हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व, पृष्ठ २०६).
स. ह. देशपांडे यांनी लक्षात आणून दिलेली ही रंगपट्टी ध्यानात ठेवून नरेंद्र मोदी व संघाने घडवून आणलेल्या राजकीय स्थित्यंतराकडे डोळसपणे पाहिले पाहिजे. असा दृष्टीकोन ठेवला, तर नरेंद्र मोदींवरील सर्वच टीका त्याज्य नाही, उलट सावध करणारी आहे, हे लक्षात येईल. मात्र ही टीका करताना मोदींमधील गुणांकडे दुर्लक्ष होणार नाही व त्यांच्याबद्दल तसेच भारतातील राजकीय, न्यायालयीन, आर्थिक, प्रशासकीय संस्था आणि माध्यमे यांच्याबद्दल सरसकट अविश्वासाचे वातावरण निर्माण होणार नाही, याची काळजी मोदींच्या टीकाकारांनी घेतली पाहिजे. तशी ते घेताना दिसत नाहीत.
नरेंद्र मोदींवर साडेतीनशेहून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. यांतील काही मोजक्या पुस्तकांचा आधार घेत, हे चरित्रलेखन केले आहे. राजदीप सरदेसाई यांना कडवे मोदी विरोधक असे मानण्यात येते. मात्र २०१४ व २०१९च्या निवडणुकांवर त्यांनी लिहिलेली पुस्तके वस्तुनिष्ठ आहेत. या दोन्ही पुस्तकांचा उपयोग मोदींची प्रचाराची कार्यशैली समजून घेताना झाला. मोदींच्या जडणघडणीच्या काळावर लिहिताना निलंजन मुखोपाध्याय यांचे पुस्तक, तसेच मोदींच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळावर ज्येष्ठ पत्रकार एम. व्ही. कामत यांच्या पुस्तकाची चांगली मदत झाली.
कामत तसेच मधू किश्वर यांच्या लेखनातून दंगलीबद्दल वेगळी माहिती मिळाली. मोदींच्या झंझावती प्रचाराचे नियोजन समजून घेण्यासाठी ‘वॉर रूम’ हे श्री. उल्लेख यांचे पुस्तक उपयोगी पडले. मोदींचे टीकाकार जेफ्रॉट यांच्या पुस्तकाचा उपयोग दोषदिग्दर्शनासाठी प्रमुख उपयोगी पडला. परराष्ट्रधोरणावर एस. जयशंकर यांचे लिखाण, तर संरक्षण क्षेत्रातील कामावर लिहिताना ज्येष्ठ पत्रकार नितीन गोखले यांच्या लेखनाचा उपयोग झाला. मोदींच्या राजवटीने उसळलेल्या संस्कृती संघर्षाबाबत संजया बारू यांच्या पुस्तकाने नवी दृष्टी दिली. संतोष कुमार यांच्या दोन पुस्तकांतून भाजपाचे निवडणूक नियोजन, कामाची पद्धत, तसेच संघाचे योगदान समजून घेता आले.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
संघ व भाजपाला समजून घेण्यासाठी संतोष कुमार यांची दोन्ही पुस्तके मुख्यतः मोदी विरोधकांनी वाचावीत अशी आहेत. स. ह. देशपांडे व द. न. गोखले यांच्या पुस्तकातून हिंदुत्वाबद्दल अधिक जाणून घेता आले. जोनाथन हेडिट यांच्या लेखनातून उजव्या राजकारणाची लाट का येते व मोदींसारखा नेता लोकप्रिय का होत जातो, हे समजून घेता आले. या सर्व लेखकांचा मी ऋणी आहे.
याशिवाय अन्य पुस्तके, यू ट्यूबवरील मुलाखती, अनेक वृत्तपत्रे व साप्ताहिकांतील बातम्या यांचा उपयोग झाला. मोदींची भाषणे व मुलाखती हाही महत्त्वाचा ऐवज होता. या सर्व संदर्भांची यादी पुस्तकाच्या शेवटी दिली आहे. जिज्ञासू वाचकांनी मूळ पुस्तकेही वाचावीत, अशी विनंती आहे. या पुस्तकांतील संदर्भ घेतले असले, तरी विश्लेषण हे माझे स्वत:चे आहे. भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही मोजक्या व्यक्तींशी झालेल्या चर्चाही उपयुक्त होत्या.
नरेंद्र मोदी हे घटित अजून घडत असल्याने माहितीमध्ये सतत भर पडत होती व नवे दृष्टीकोन सुचत होते. यामुळे लेखनात बरीच दिरंगाई होत होती. अशा वेळी श्री. दिलीप माजगावकर यांनी केलेला पाठपुरावा (कधी घेतलेली झाडाझडती) चरित्रलेखन पूर्ण करण्यासाठी उपयोगी पडला.
नरेंद्र मोदींबाबत माझे पूर्वग्रह नाहीत, असा दावा मी करणार नाही. पूर्वग्रहविरहित असा कोणीही नसतो. स्वत:चे पूर्वग्रह ओळखून, ते बाजूला ठेवून, घडामोडींचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करावा लागतो. काही वाचकांना हे चरित्र मोदींच्या बाजूने झुकलेले वाटेल. लेखकाने विश्वसनीयतेच्या मर्यादेत आपली लेखणी चालवण्याची काळजी घेतली, तर त्याचे लेखन हळूहळू विश्वसनीयतेच्या मोलाने लोकांकडून स्वीकारले जाते, असा सल्ला न. र. फाटक (नामवंत चरित्रकार व इतिहासकार) देत असत. त्या कसोटीला उतरण्याचा मी प्रयत्न केला आहे. ती धडपड कितपत यशस्वी झाली आहे, हे वाचकांनी ठरवावे.
‘नरेंद्र मोदी : नवी भाजपा, बदलता भारत’ – प्रशांत दीक्षित
राजहंस प्रकाशन, पुणे | पाने – ४४६ | मूल्य – ६०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment