‘मोहोर उजेड वाटांवर’ : ही कविता भाबडी आशावादी नाही आणि विकृत दुःखवादीदेखील नाही. आंतरमुखी आणि बहिर्मुखीही नाही…
ग्रंथनामा - झलक
भारत सासणे
  • ‘मोहोर उजेड वाटांवर’ या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ
  • Wed , 22 February 2023
  • ग्रंथनामा झलक मोहोर उजेड वाटांवर Mohor Ujed Vatanvar भारत सासणे Bharat Sasane चंद्रकांत पालवे Chandrakant Palave

कवी चंद्रकांत विश्वनाथ पालवे यांचा ‘मोहोर उजेड वाटांवर’ हा कवितासंग्रह नुकताच गणराज प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. या संग्रहाला प्रसिद्ध कथा-कादंबरीकार आणि ९५व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी लिहिलेली ही प्रस्तावना…

.................................................................................................................................................................

श्री. चंद्रकांत पालवे यांचा ‘मोहोर उजेडवाटांवर’ या शीर्षकांतर्गत नवा कवितासंग्रह प्रकाशित होतो आहे, याचा मला अतिशय आनंद आहे.

अहमदनगरच्या सांस्कृतिक विश्वातील चंद्रकांत पालवे यांचे कवी म्हणून नाव स्थिर आहे. ते स्वतः अनेक वर्षांपासून कविता लिहीत आहेत आणि अनेक कवींना मार्गदर्शन देत आहेत. परंतु अलीकडल्या काळात स्वतःचा कवितासंग्रह प्रकाशित करण्याची त्यांनी घाई केलेली नाही. मागील वीस वर्षांतील वेळोवेळी लिहिलेल्या निवडक कवितांचा हा संग्रह. चंद्रकांत पालवे दीर्घकाळ थांबले, कारण कवी सुरेश भट यांनी म्हटल्याप्रमाणे ‘थांबणे अघोरी कला’. कवी चंद्रकांत यांना थांबण्याची अद्भुत कला प्राप्त झालेली आहे. ते थांबले, त्यांनी घाई केली नाही आणि वेळोवेळी लिहिलेल्या चांगल्या कवितांचा हा संग्रह त्यांनी आपल्याला भेट म्हणून दिलेला आहे.

इंग्रजीत एक शब्द आहे ‘पेशन्स्’. मराठीत ‘धीर धरण्याची कला’ असं आपण म्हणू शकू. या संदर्भातला एक संवाद आठवतो आहे. उर्दू काव्य परंपरेत कवितेला प्रेयसीच्या रूपाने पाहिलं गेलेलं आहे. कवीने या कवितादेवीकडे किंवा या अमूर्त प्रेयसीकडे एक गाऱ्हाणं मांडलेलं आहे. हे गाऱ्हाणं मांडण्याचं कारण असं की, कवितादेवी आपल्यावर प्रसन्न होत नाही, अशी त्याची तक्रार. त्याऐवजी कवितादेवी नवथर पोरांच्या सोबत प्रणय करत फिरते, असं त्याचं निरीक्षण.

ही तक्रार मांडताना हा कवी म्हणतो आहे की, मी तुझी उपासना करतो आहे, पण तू माझ्यावर कृपा करत नाहीएस. कवितादेवीने दिलेलं उत्तर महत्त्वाचं आहे. ती म्हणते, कवीने धीर धरला पाहिजे. कारण अनुनय आणि उपासना यामध्ये अंतर आहे, फरक आहे. अनुनयामुळे कवितारूपी सुंदरी प्रसन्न होईल, पण ती कृपा करणार नाही. उपासनेचे फळ म्हणजे कृपा आहे. कवीचं अजूनही समाधान झालेलं नाही. तो पुढे विचारतो की, मग तू मला भेटणार तरी केव्हा? कवितादेवीने उत्तर दिलं आहे की, ‘भेटेन शतवर्षांनी!’

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मुस्लीम परंपरेमध्ये मृत्यूनंतर थडगं बांधलं जातं. त्यावर संगमरवरी दगडावर काही अक्षरं कोरली जातात. ही अक्षरं बहुधा काव्यात्म असतात. अर्थपूर्ण असतात. कमी अक्षरांमध्ये सगळं आकाश प्रतिबिंबित करणारी असतात. वरकरणी कठोर वाटणारं, पण मर्मग्राही असं कवितादेवीचं उत्तर आहे. ती असं म्हणते की, अरे, शंभर वर्षांनंतर तिथे तुझ्या त्या थडग्यांवर जे लिहिलं जाईल, तिथे मीच तर असणार आहे ना? त्या अल्पाक्षरात पसरून राहिलेली कविताच तर असेल. कवितादेवीचं म्हणणं असं की, अल्पाक्षरात मोठा आशय कायमस्वरूपी कवीच्या नावाने लिहिला जाईल.

खरं तर हे कृपावचनच आहे. वाट पाहणं, थांबणं, धीर धरणं आणि उपासना दृढपणे चालवत ठेवणं, हे दुर्मीळ गुण असून सर्व कवींना ते उपलब्ध नसतात. थिल्लरपणाने चार कविता लिहिल्यामुळे अनेक कवी कवितादेवीच्या कृपेपासून वंचित राहतात. कृपेसाठी उपासना आणि साधना अविरतपणे करत रहावी लागते. उर्दू काव्यपरंपरेमध्ये ‘सब्र’ हा गुण नोंदवलेला आहेच.

चंद्रकांत पालवे यांनी हेच केलेलं आहे आणि म्हणून काही अंशी उशिराने, त्यांचा कवितासंग्रह आपल्या भेटीला येतो आहे.

‘माझ्या काव्यात्म वेदनांचा अस्त’ या शीर्षकांतर्गत असलेली कवी चंद्रकांत यांची कविता बोलकी आहे. ही कविता त्यांनी कवितेला अर्थात कवितादेवीला उद्देशून लिहिलेली आहे. कवितेच्या स्फुरण्याचा, अस्तित्वदर्शनाचा क्षण कवीसाठी दुर्लभ. या क्षणासाठी कवी दीर्घकाळ वाट पाहतो, थांबतो, वेदना सहन करतो, झुरतो. आणि मग कधीतरी अवचित क्षणी कविता कवीच्या भोवती वावरते. तिच्या वावरण्याचा अनुभव चंद्रकांत यांनी या कवितेत व्यक्त केला आहे.

कवीच्या दृष्टीने हा अनुभव अनमोलच. कवीच्या मते तिच्या, म्हणजे कवितेच्या असण्याला कोणतंही कारण लागत नाही. ती सहजच, विनाकारणच कवीच्या शेजारी येऊन बसते आणि ती शेजारी येऊन बसली की मग मात्र, ती कवीला काहीही करू देत नाही. कवीची क्षीण अशी विनवणी की, तिने निदान टेबलापर्यंत तरी यावं, डायरी उघडण्याची आणि पेन शोधण्याची मुभा तिने त्याला द्यावी. पण कविता निर्मम. ती कवीला सवड देत नाही. उसंत देत नाही. पण ती कवीकडे पाहते. नुसती पाहते. कठोरपणे पाहते आणि सूचकपणे पाहते. तिच्या पाहण्यामुळे कवीला कविताही सुचत नाहीए. कविता लिहून झाल्यानंतर कवीचा मृत्यू होणे अपरिहार्य. आणि म्हणून कवी म्हणतो की, तू मला जगू देत नाहीस आणि जगताना कविता लिहू देत नाहीस. कवी चंद्रकांतची तक्रार अशी की, जगताना आणि जगू देताना, मात्र तू मला लिहू देत नाहीस. कारण मी कविता लिहिली की, मग मला जगता येणार नाही.

कवी असं म्हणतो की, त्याच्या श्वासांच्या संयत गतीवर कविता साक्षात आरूढ आहे. येथे प्रस्तुत प्रस्तावनाकारास काही आठवण होते आहे. मी स्वतः अमृता प्रीतम यांची एक छोटेखानी मुलाखत घेतली होती. कविता कशी लिहिली जाते इत्यादी स्वरूपाचे प्रश्न ऐकून त्यांनी दिलेलं उत्तर असं की, कविता लिहून झाल्यानंतर मी इतकी रिक्त होते की, जणू मी मरूनच गेलेली असते. संवेदनक्षम आणि प्रख्यात कवींचे हे असे अनुभव असतात. कवी चंद्रकांत यांनीदेखील हा अनुभव या कवितेतून व्यक्त केला आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

अनुनय करण्यासाठी ‘कविते, तू माझा प्राण आहेस!’ असं म्हणावं तर कविता निघून जाण्याची धमकी देते. म्हणजे प्राणच निघून गेला, तर उरेल केवळ कलेवर. ‘तू माझं सर्वस्व आहेस’ असं म्हणावं, तर कविता दृश्य स्वरूपात दिसतच नाही. मात्र, तिची दिवसरात्र गस्त सुरू असते असं कवी नोंदवतो. आता, अंतिमतः, प्रश्न निर्माण होतो की, मग अखेरीस ही कविता आहे तरी कोठे? ही आदि - अनंत तर आहेच, पण असलीच तर तिच्याच ‘प्रफुल्लित प्रातःसमयी’ ती आहे. म्हणजे, तिच्याच अस्तित्त्वाच्या प्रारंभी ती असणार आहे. एका उर्दू शायराला असा भास होतो की, कोणीतरी दूरातून त्याला हाक मारते आहे. त्याच्या नावाचा उच्चार करते आहे. कवी म्हणतो की, मला बोलावणारी, मला साद घालणारी माझी कविताच असली पाहिजे. नाहीतर इतक्या खोलातून आणि आस्थेने कोण साद घालेल? (इतनी गहराई से आखिर, कौन पुकारेगा?)

उपरोक्त कवितेतून कवीच्या निर्मितीच्या अगम्य अशा कोड्यावर कवी चंद्रकांत पालवे यांनी काही प्रकाश टाकलेला आहे. ‘नवरंग’मधल्या कवीला, ‘तू छुपी है कहाँ?’ असा प्रश्न पडलेला आहे. कविता कठोर असली तरी ती निर्दयी नाही. मी तुझ्यातच आणि तुझ्या श्वासातच आणि तुझ्या अस्तित्वातच लपलेली आहे, असं ती कबुली देते. ही कबुली क्वचितच दिलेली असते. अत्त्युच्च क्षणी, निर्वाणीच्या प्रसंगी ही कबुली दिलेली असते. एरव्ही कविता सुंदरीच्या रूपाने कवीला खेळवत राहते. एका हिंदी कवीच्या कवितेत असा प्रसंग आलेला आहे की, कविता कवीला कविता लिहिताना पाहते. मग म्हणते की, तू कविता लिही आणि मी तुझ्या प्रसुतीवेदना पाहत राहीन. ‘तुम लिखो कविता और मैं तुम्हें लिखते हुए देखूँ।’

उपरोक्त उर्दू कवीची तक्रार, त्याला कवितादेवीने दिलेलं उत्तर, या हिंदी कवीच्या कवितेतला प्रसंग आणि कवी चंद्रकांत पालवे यांनी मांडलेलं निर्मितीचं कोडं हे प्रसंग समांतर जातात आणि निर्मितीच्या अगम्य अशा रहस्याचा निर्देश करतात. कवितेची सुरुवात कशी होते, याचं सूचनदेखील कवी चंद्रकांत यांनी केलेलं आहे-

‘पहाटे पहाटे अर्धनिद्रेत,

सारे धुके जमून येते महामायेचा रथ बनून,

आपण कसे त्यात निवांत बसतो

पुढल्या नव्या प्रवासाची ही असते

सुरुवात...’

अर्धनिद्रा अबोध मनातल्या नेणिवेचं सूचन आहे. कवितेने कवीला स्पर्श केला की, मग गूढ असं धुकं जमून येतं आणि महामायेच्या रथातून मग पुढच्या प्रवासाची सुरुवात झालेली असते. काही थोड्याच कवींनी कवितेची सुरुवात कशी होते, याचं सूचन केलं आहे. चंद्रकांत पालवे यांनी इथे कविता निर्मितीच्या अगम्य अशा प्रक्रियेचा निर्देश केला आहे. ‘कवितेचं मंत्रवत् गौडबंगाल मला आजही उमजलं नाही’, असं पालवे त्यांच्या कवितेतून नम्रपणे नमूद करतात.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

‘कवीचे घर, कविता आणि कवी’ ही पालवे यांची आणखी एक कविता. कवीचं म्हणणं असं की, अरूंद गल्लीबोळातल्या गजबजलेल्या घराकडे येण्याची वाट कवितेला नेमकी कशी सापडते? पण तरीही, ती येतच राहते, अचूकपणे तिला रस्ता शोधावा लागत नाही. बरं, आलीच तर तिला बसायलाही जागा नाही. कारण सर्वत्र अडगळ सामानांची दाटीवाटी आणि लहानसं घर. पण तरीही, ती येते, थांबते आणि क्षणार्धात समस्त विेशातल्या आनंद - दुःखाचे निरूपण होऊन जातं. वेदनेचा इतका जयजयकार कवी प्रथमच अनुभवतो, कारण हा दुर्मीळ असा क्षण निर्मितीच्या कोड्यावर प्रकाश टाकताना कविताशक्तीशी कवीचं असलेलं नातं, चंद्रकांत अशा नेमक्या आणि सुंदर शब्दात उलगडून दाखवतात. या कवितेतला काही अंश पाहूया-

‘तू नक्की कोठे आहेस? की कोठे लपून बसलीस?

खरं तर

तुझ्या येण्याजाण्याचे कोणतेही मार्ग

कुणालाही माहीत नसतांना

तू सरळ कवीच्या घरी कशी येतेस?.....

ह्या समस्त विश्वातल्या आनंद - दुःखाचे तेथे

निरुपण क्षणार्धात होते. वेदनेचा एवढा जयजयकार

कवी प्रथम अनुभवतो.

कविता कवीला असह्य वेदनेत जगण्यासाठीच

अभय देते.

- खरंच कवीचे घर, कविता आणि कवी

कसे आनंदोत्सवात बेबंद जगतात, नाही?

या उजेडवाटा आहेत. आणि या वाटांवर मोहोर विखुरलेला आहे. करुणागायनाने संध्येचे आकाश प्रार्थनेतून बोलावत राहते. कवी त्यामुळे सत्त्वशील होतो आहे. कविता कवीला नव्या क्षितिजाकडे घेऊन जाते आहे. या नव्या क्षितिजावर नवा तारा उगवतो आहे आणि आनंदलहरीदेखील तेथे अस्तित्वात आहेत.

सकारात्मक, आनंदाकडे घेऊन जाणाऱ्या अशा या कविता. या कवितांमध्ये दुःख असेल, तर ते हुरहुर निर्माण करणारं आहे. यात सकारात्मकता आहे. नव्या क्षितिजाचा शोध आहे आणि करुणेची प्रार्थना आहे. अशा कविता रसिकांना आनंद देतात. कवी चंद्रकांत यांच्या अशा या कविता.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

कवी चंद्रकांत पालवे यांच्या नव्या संग्रहातल्या कवितांची जातकुळी शोधण्याची खरं तर गरज नाही. पण सध्याची कविता कोठे उभी आहे आणि पालवे यांची कविता कोठे उभी आहे, याचा काही तपास लावता येतो. वृत्तातल्या कवितेच्या सोसांचे दिवस कधीच मागे पडले. आता वृत्तबद्ध कविता शोधूनही सापडत नाहीत. त्यानंतर मुक्तछंदात्मक कविता आल्या आणि येत राहिल्या. तुलनेने हा प्रकार हाताळायला सोपा वाटल्यामुळे असंख्य कवींनी मुक्तछंदातून अभिव्यक्ती केलेली आहे. यातल्या थोड्याच कविता उरल्या आणि बाकीच्या बहुधा वाहून गेल्या, नामशेष झाल्या.

कथा आणि कादंबरी इत्यादी साहित्यप्रकाराच्या अभिव्यक्तीमध्ये सतत परिवर्तन जसं होत गेलं, तसं कवितेच्या प्रांतात सहसा झालेलं नाही. याचं कारण बहुधा कवितेची अंगभूत असलेली प्रकृती. ती अल्पाक्षरात व्यक्त होते आणि आकाशभर आशयाला प्रतिबिंबित करते. त्यातून कविता निर्मितीचं कोडं अनेक समीक्षकांना अद्याप सुटलेलं नाही.

कविता आणि कवी यांचं परस्पर नातं काय आहे, याबाबत अनेकांनी शोध मात्र घेतलेला आहे. ‘मदन आणि रती’ यांचं उदाहरण प्रसिद्ध आहे. मदन जळाल्यामुळे ‘अनंग’ झाला. मात्र रतीच्या रूपाबाबत स्पष्ट वाक्यता नाही. त्याचं कारण असं की, रती स्वतःच स्वतःच्या अस्तित्वाबद्दल सांगते. ‘झऱ्याच्या नादामध्ये मी आहे, तुझ्या श्वासामध्ये मी आहे, तुझ्या आनंदात आणि दुःखात मीच प्रकटते’ असं काही तिने सांगितलेलं आहे. या सांगण्याचे काही पुसट पडसाद ‘रतिविलापा’त उमटलेले आहेत. सर्वच कवींना या अबोध नात्याची जाणीव असतेच असं नाही. कवी चंद्रकांत यांना मात्र या नात्याचा शोध घ्यायचा आहे. सार्वत्रिक अंधाराला धक्का देण्यासाठी दिव्याचंच एखादं रोप उगवायला हवं असं ते म्हणतात, तेव्हा त्यांना उजेड आणि अंधार, यांचं द्वंद्व आकर्षित करतं.

नक्षत्राचं दान मिळावं, फुला-फळांचा प्रदेश सर्वत्र असावा, म्हणून आपण इथे जन्माला आलो आहोत, असं कवी म्हणतो. पण इथे मात्र युद्ध आणि हिंसा सतत पाहायला मिळते आहे. इतकंच नाही तर ‘कवितेचे मारेकरी’ सर्वत्र लपून बसलेले आहेत, असंही त्याला जाणवतं. पण कवीला एकत्वाची आस असल्यामुळे कवितेने नवा आकार घ्यावा आणि साक्षात्कार घडवावा, अशी मागणी तो कवितेकडेच करतो आहे. कवी पालवे निर्मितीक्षम मनाचे आहेत. हिंसेच्या आणि अंधाराच्या जगाकडे पाहत असताना उजेडाच्या वाटांवरून कवितेला सुरक्षितपणे नव्या क्षितिजाकडे घेऊन जाण्याची त्यांची आस आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

कवी चंद्रकांत पालवे यांची ही अशी कविता. ती सूचक आहे. मौनातून बोलते. आशावादी आहे. कालौघात नदी पार करण्याची इच्छा कवीला आहे आणि सुखदुःखाच्याही पलीकडे त्याला जायचं आहे. ही कविता भाबडी आशावादी नाही आणि विकृत दुःखवादीदेखील नाही. आंतरमुखी आणि बहिर्मुखीही नाही. त्यांची कविता अस्तित्वमूलक अशी आहे. कवितेबद्दल कवी पालवे म्हणतात-

‘कविताच नसती माझ्या समवेत तर कोठून

पाहिला असता पूर्ण चंद्र?

उपेक्षितांचे अश्रू कसे पुसले असते?

कवितेनेच तर दिलं हे आयुष्य

कवितेनं बहाल केलं या जगण्यासाठी

मुक्त,

सहज,...

कवितेनं आयुष्यभर सोबत केली

म्हणून तिचे आभार मानायचे नाही

कवितेच्या प्रांगणात जे जगलो

त्याचा हिशेब मांडायचा नाही

कविता माझ्या प्राणतत्त्वाचा आहे मूळ पुरावा’

श्री. चंद्रकांत पालवे यांची सामर्थ्यशाली अशी कविता आपल्या भेटीला आलेली आहे, याचा मला आनंद असून ही कविता नवा आशावाद पेरते आहे, सकारात्मकतेच्या दिशेने जाते आहे आणि निर्मितीच्या रहस्यावरदेखील प्रकाश टाकते आहे. मला हे विशेष वाटतं आहे. त्यांच्या नव्या कवितासंग्रहाबद्दल अभिनंदन आणि ‘नव्या क्षितिजापर्यंत जायच्या त्यांच्या प्रवासाबद्दल’ हार्दिक शुभेच्छा. नवा उगवता तारा तिथे त्यांना दिसो, अशी शुभेच्छा!

‘मोहोर उजेड वाटांवर’ – चंद्रकांत पालवे | गणराज प्रकाशन, अहमदनगर | मूल्य – १८० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Vishnu Date

Fri , 24 February 2023

छान! कवितेचा मोहोर खरोखरच वाखाणण्याजोगा आहे, ऊजेडलेला आहे!

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......