‘बोलिले जे’पर्यंत मी योगायोगाने पोचलो, पण इथे पोचणे माझ्यासाठी आवश्यक होते...
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
सुकल्प कारंजेकर
  • ‘बोलिले जे’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Tue , 21 February 2023
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो बोलिले जे Bolile je महेश एलकुंचवार Mahesh Elkunchwar अतुल देऊळगावकर Atul Deulgaonkar

‘बोलिले जे...संवाद एलकुंचवारांशी’ हे ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांचे पुस्तक अलीकडेच मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन समारंभ १७ ऑक्टोबर २०२२ रोजी ऑनलाईन पद्धतीने झाला. त्यात महेश एलकुंचवार, अतुल देऊळगावकर, वृंदा भार्गवे, विवेक कुडू, कृष्णात खोत, सुकल्प कारंजेकर आणि सहभाग होता. त्यातील सुकल्प कारंजेकर यांनी केलेलं हे भाषण...

.................................................................................................................................................................

‘बोलिले जे’ वाचून झाले आणि डग्लस अ‍ॅडम्स या माझ्या आवडत्या लेखकाच्या एका वाक्याची आठवण आली. ते वाक्य म्हणजे- ‘I may not have gone where I intended to go, but I think I have ended up where I needed to be’.

हे पुस्तक माझ्यासाठी एलकुंचवार सरांच्या लिखाणाचा आणि त्यांच्या विचारांचा परिचय करून देणारे महत्त्वाचे माध्यम ठरले. याआधीचा एलकुंचवार सरांचा परिचय हा नंदा खरेकाकांनी सहज बोललेल्या एका वाक्यातून घडला होता. नंदाकाका गप्पा मारताना एकदा म्हणाले होते की, नागपूरमध्ये सध्या मराठी वाङ्मयाच्या क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती राहतात- सर्वश्रेष्ठ कवी ग्रेस, सर्वश्रेष्ठ समीक्षक द. भि. कुलकर्णी आणि सर्वश्रेष्ठ नाटककार महेश एलकुंचवार. अर्थातच या यादीमध्ये त्यांचे स्वतःचेही नाव नक्कीच होते. तर नंदाकाकांचे हे वाक्य माझ्या चांगले लक्षात राहिले होते आणि त्यातला एलकुंचवार सरांचा उल्लेखही. एलकुंचवार सरांच्या लिखाणाबद्दल अनेक महत्त्वाचे संदर्भ ‘बोलिले जे’मधून मिळाले.

‘बोलिले जे’ वाचताना अनेक विचार दाटून आले. काही ठिकाणी आधीच मनात चाललेल्या अस्वस्थतेला या पुस्तकाने वाचा फोडली, तर काही ठिकाणी वेगवेगळ्या विषयांमधले नवे समांतर दुवे हाती लागले. नकळतपणे मनातील काही बाबतीतला गुंता सुटत असल्याची अनुभूती आली. हे पुस्तक वाचणे गरजेचे होते आणि ते योग्य वेळी हातात पडले, हे प्रकर्षाने जाणवले.

या पुस्तकात एलकुंचवार सरांची पुस्तके, नाटके, त्यातील प्रतिमा आणि प्रतीके, संगीत, संतसाहित्य, विज्ञान तत्त्वज्ञान, पर्यावरण, मूल्यव्यवस्था, वास्तवाचे ज्ञान आणि भान, जगण्याचा अर्थ, माणसाचे स्थान या व इतर अनेक विषयांवर मुक्तचिंतन येते. महत्त्वाच्या जागी अतुल सरांनी संयुक्त पार्श्वभूमी आणि विविधअंगी संदर्भ दिले आहेत. त्यामुळे पुस्तक माहिती समृद्ध आणि प्रवाही झाले आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

पुस्तकातील काही प्रतिमा आणि विषयांचा मनावर विशेष प्रभाव जाणवला. विज्ञान माझा आवडता विषय. त्यामुळे ‘बोलिले जे’ वाचताना विज्ञानाच्या वाटेने माझ्या मनात आलेल्या समांतर प्रतिमा आणि उदाहरणे मांडणार आहे. विचार मांडण्याआधी माझी भूमिका स्पष्ट करतो. माझा ‘बोलिले जे’मध्ये काय आहे, याचा आढावा घेण्याचा हेतू नाही. मी एलकुंचवार सरांच्या कार्याचा किंवा त्यांच्या विचारांचा परिचय करून देण्याचाही प्रयत्न करत नाही आहे. ‘बोलिले जे’ वाचताना माझ्या मनात जे काही विचार आणि समांतर प्रतिमा आल्या, फक्त त्याच शब्दांत मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे.

पहिली प्रतिमा हिराबाईंचा तारषड्ज आणि सिस्टीन चॅपलमधील मायकेल अँजेलोच्या चित्राची. पार्श्वभूमीसाठी पुस्तकातील उतारा देत आहे. एलकुंचवार सर म्हणतात - एका लेखात हिराबाईच्या गाण्याबद्दल मी असं लिहिलंय की, आधी त्या बराच वेळ निषादापाशी, त्याच्या अवतीभवती खेळत असतात. आपल्याला तर असं होतं की, आता कधी त्या तारषड्ज लावतात!

आता सोसवत नाही, इतका त्यांचा अप्रतिम खेळ चाले. इतका ठाम षड्ज त्यांचा असायचा, जो सहसा ऐकायला मिळत नाही कधी. पण त्यावर येण्याआधी त्या बिल्ड अप करत असत. आता तुटेल; इतकी आपली उत्कंठा वाढवत असतात. मला असंच, कमाल उत्कंठेचं दुसरीकडे कसं भान आलं ते सांगतो. सिस्टीन चॅपलमध्ये ते मायकेल अँजेलोचं प्रसिद्ध चित्र आहे, ‘द क्रिएशन ऑफ अ‍ॅडम’. तिथं मानव असा हात वर करून आहे आणि वरून परमेश्वराचा हात असा खाली येतोय आणि दोघांच्या बोटांमध्ये फक्त एक सूतभर अंतर आहे. आता पाहणाऱ्याला असं वाटत राहतं की, केव्हा यांची बोटं एकमेकांना टेकतील. दोघांच्या बोटांमध्ये गोठवलेल्या अवकाशात जी उत्कंठा आहे, त्या क्षणात जी उत्कंठा आहे, ती मायकेल अँजेलोच दाखवू जाणे. ते चित्र श्वास रोखून पाहत असताना मला आठवत होता हिराबाईंचा षड्ज. आणि त्या उत्कंठेचा अनुभव मायकेल अँजेलो देतो आणि हिराबाई देतात. त्यामुळे हिराबाईंचा तारषड्ज आणि मायकेल अँजेलोचं दृश्य एकत्र आठवतं.

हा भाग वाचताना मला बिलयानुर रामचंद्रन या अमेरिकेत स्थाईक झालेल्या भारतीय वंशाच्या न्यूरोसायंटिस्टने मेंदूच्या कार्यावर लिहिलेल्या एका पुस्तकाची आठवण आली. या पुस्तकाचे नाव आहे- ‘द इमर्जिंग माईंड’. यात एक ‘पर्पल नंबर्स अँड शार्प चिज’ नावाचा लेख आहे. त्यात रामचंद्रन यांनी ‘सिनेस्थेशिया’ नावाच्या संकल्पनेचा उल्लेख केला आहे. या मागची गोष्ट अशी की, एकोणविसाव्या शतकात फ्रान्सिस गॅल्टन नावाच्या शास्त्रज्ञाला काही लोकांमध्ये एक विलक्षण गुणधर्म असल्याचे लक्षात आले. इथे सांगायला हवे की, फ्रान्सिस गॅल्टन म्हणजे चार्ल्स डार्विनचा चुलतभाऊ होता. तर काही लोकांच्या बाबतीत गॅल्टनला एक मजेदार गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे काही लोक जेव्हा विशिष्ट स्वर ऐकतात, तेव्हा त्यांना तो विशिष्ट रंग पाहिल्याचा अनुभव येतो. उदाहरणार्थ, जेव्हा ते शार्प सी हा स्वर ऐकतात, तेव्हा त्यांना लाल रंग दिसतो, एफ शार्प ऐकताना निळा रंग दिसतो. एखादा स्वर हिरवा दिसतो, तर एखादा जांभळा. अशा लोकांना संगीत रंगीबेरंगी दिसते. असे फक्त स्वर आणि रंगांच्या बाबतीतच घडते असे नाही. तर काही लोकांना संख्यांचे आकडे विशिष्ट रंगाचे दिसतात. उदाहरणार्थ, पाचचा आकडा लाल असल्याचे भासते, सहा हिरव्या रंगाचा तर सात निळसर रंगाचा.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

असे रंगीत संख्या दिसणाऱ्याचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे भौतिकशास्त्रातील नोबेल पदक जिंकलेला रिचर्ड फिनमन हा शास्त्रज्ञ. फिनमनचे ‘शुअरली यु आर जॉकिंग मिस्टर फिनमन’ हे पुस्तक आवर्जून वाचण्यासारखे आहे. तर फिनमनला गणितीय सूत्रांमधील आकडे रंगीबेरंगी दिसायचे. त्यामुळेच कदाचित त्याला गणिताची उपजत आवड निर्माण झाली असावी.

तर या विलक्षण गुणधर्माला गॅल्टनने ‘सिनेस्थेशिया’ असे नाव दिले. असे घडण्याचे कारण म्हणजे काही लोकांच्या मेंदूमध्ये असलेली ‘क्रॉस वायरिंग’. ज्यांना आकडे रंगीत दिसतात, अशा लोकांच्या मेंदूचा जेव्हा एफ. एम. आर. (FMR) घेतला गेला, तेव्हा असे लक्षात आले की, जेव्हा अशा लोकांना संख्या दाखवल्या गेल्या, तेव्हा त्यांच्या मेंदूतले आकडे प्रोसेस करणारा आणि रंग प्रोसेस करणारा, असे दोन्ही भाग एकाच वेळी उजळून निघाले. असे सामान्य लोकांच्या बाबतीत घडत नाही. त्यांना आकडे दाखवले, तर फक्त आकडे प्रोसेस करणारा भाग उजळतो, रंग प्रोसेस करणारा भाग शांत राहतो.

अशाच प्रकारची क्रॉस वायरिंग रंगीत स्वर पाहणाऱ्या लोकांच्या बाबतीतही घडते. सिनेस्थेशियाच्या गुणधर्माचा सृजनाशी जवळचा संबंध आहे, कारण सृजनामधील प्रतीकांसाठी दोन वेगळ्या गोष्टी एकत्र आणल्या जातात. एखाद्याचा किंवा एखादीचा आवाज ‘गोड’ आहे, असे आपण म्हणतो, तेव्हा दोन वेगळ्या इंद्रियांच्या अनुभूतींना एकत्र आणतो. हिराबाईंचा तारषड्ज आणि मायकेल अँजेलोचे ‘द क्रिएशन ऑफ अ‍ॅडम’ एकत्र आले तसे.

‘बोलिले जे’मध्ये सुरुवातीला अतुल सर आणि एलकुंचवार सर यांच्यामध्ये पर्यावरणाच्या ऱ्हासाबद्दल चर्चा होते. पुस्तकाच्या सुरुवातीला अतुल सरांनी १९६२ साली प्रसिद्ध झालेल्या राशेल कार्सन यांच्या ‘सायलेंट स्प्रिंग’ या पुस्तकापासून ते सध्याच्या काळात घडणान्या जागतिक तापमानवाढीच्या संदर्भातील घडामोडींपर्यंतची पार्श्वभूमी मोजक्या शब्दांत उत्तमरित्या मांडली आहे. ‘युगान्त’मध्ये पर्यावरणाच्या ऱ्हासाची आणि त्यामुळे बिघडलेल्या परिस्थितीचे चित्रण येते. त्यात आलेल्या वर्णनानुसार सलग आठ वर्षे पाऊस पडलेला नाही. नद्या, नाले आटून गेलेले. हिरवळ कुठेही शिल्लक नाही. आसमंतात धूळ भरलेली. गावामध्ये चोरी करण्यापुरते काहीही शिल्लक नाही. पर्यावरणाच्या ऱ्हासाच्या प्रश्नाकडे ते कसे वळले याबद्दल एलकुंचवार सर त्यांचे अनुभव सांगतात. त्यांच्या जन्मगावाभोवती एकेकाळी घनदाट अरण्य होते. वाघ असलेले. पण काही दशकांत घडलेल्या बेबंद वृक्षतोडीमुळे ते जंगल नाहीसे झाले. ९०च्या दशकात जेव्हा ते एका लग्नासाठी परत त्या भागात गेले, तेव्हा त्यांना जंगलांच्या जागी ओसाड भूमी दिसली.

हे बदल त्यांना शहरातही घडताना दिसत होते. नागपूर शहरात आधी शहरातील तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हायचा कारण ते पाणी स्वच्छ होतं. नंतरच्या काळात पाणी इतकं प्रदूषित झालं की, त्याचा वापर बंद झाला. शहरासाठी दुरून पाण्याचा पुरवठा सुरू झाला. हे बदल एलकुंचवार सरांना जाणवत होते आणि अस्वस्थ करत होते. त्याचं प्रतिबिंब त्यांच्या लिखाणात उतरलं.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

पर्यावरणाच्या ऱ्हासाबरोबर घडतो तो मानवी मूल्यांचा ऱ्हास. निसर्गाबद्दलचा आदर कमी होतो, तेव्हा सामाजिक जाणीवही कमी होते, कुटुंबव्यवस्था कमकुवत होते. सामाजिक न्यायाचा, मानवी मूल्यांचा विचार क्षीण होतो. वैयक्तिक स्वार्थ साधणे, अमाप पैसा कमावणे या शृंखला सगळ्या मानवी व्यवहारांना जखडून टाकतात. याचे प्रतिबिंब ‘वाडा त्रयी’मध्ये दिसते.

पर्यावरणाचा ऱ्हास आणि त्याबरोबर ढासळणारी नीतिमत्ता हा भाग वाचताना मला प्रसाद कुमठेकर यांच्या २०२१ साली ‘पुढारी’च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेल्या ‘युगान्ताच्या टोकावरून’ या रिपोर्ताजची आठवण आली. फर्निचरच्या लाकडासाठी प्रसिद्ध असलेल्या किनवटला जंगलतोडीची कशी परिस्थिती आहे, हे पाहण्यासाठी प्रसाद २०२१ साली त्या भागात काही दिवस राहून आले. तिथे त्यांना वृक्षतोड झालेले ‘निरस भुडे डोंगर’ दिसले, ‘कटलेल्या सागवान खालची बरड जमीन’ दिसली. क्रिकेटवर सट्टा लावणारी, जुगार खेळणारी, व्यसनाधीन झालेली तरुण मुले दिसली. याहून भयावह अनुभव किनवटला बाबा आणि प्रकाश आमटे यांच्या प्रेरणेतून गेलेल्या डॉ. अरुण गद्रे यांना आला होता, जो त्यांनी ‘किनवटचे दिवस’ पुस्तकातून मांडला आहे.

पर्यावरण उद्ध्वस्त झाले की, मानवी समाज आणि संस्कृती कसे उद्ध्वस्त होतात, याबद्दल विचार करताना जेअर्ड डायमंडच्या ‘कोलॅप्स’ची आठवण आली. जेअर्ड डायमंड यांचे ‘गन्स, जर्म्स अँड स्टील’ हे पुस्तक व्यापक मानवी इतिहासाचा आणि मानवी संस्कृतींच्या उदयाचा आणि विकासाचा आढावा घेते. याउलट ‘कोलॅप्स’ हे पुस्तक काही मानवी संस्कृती का नष्ट झाल्या, त्यामागील कारणे शोधते. ‘कोलॅप्स’मध्ये हजार वर्षापूर्वीच्या मध्य अमेरिकेतील संस्कृतींच्या इतिहासापासून ते १९९०च्या दशकातील रवांडामध्ये झालेल्या नरसंहारापर्यंतचा इतिहास येतो.

जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या काळात नष्ट झालेल्या संस्कृतींच्या अधःपतनामागील समान दुवा म्हणजे पर्यावरणाच्या ऱ्हासाचा. एक वाट संस्कृतींचा इतिहास अभ्यासणाऱ्या शास्त्रज्ञाची आणि एक वाट अनुभवांतून शिकलेल्या संवेदनशील कलावंताची. दोन्ही वाटा एकाच निष्कर्षापाशी पोचतात, त्याला ‘कोलॅप्स’ म्हणा किंवा ‘युगान्त’.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

पुस्तकामधील संवादामध्ये एक विषय येतो, जो मला विशेष वाटला. हा विषय आहे दैनंदिन जगण्यातील वास्तवाच्या पलीकडे जाणान्या अनुभूतीचा. बिंदूनादकलातीततेचा. हा भाग वाचत असताना मला विज्ञानाच्या वाटेने काही प्रतिमा दिसल्या. आधी याबाबत एलकुंचवार सरांनी व्यक्त केलेले विचार पाहू. एलकुंचवार सर म्हणतात – हा प्रदेश असा आहे की तो सत् नाही असत नाही, बरा नाही वाईट नाही, त्याला रूप नाही, रंग नाही.

‘नित्यं शुद्ध निराभासं निराकारं निरांजनं!’ निरंजन आहे. तिथे काहीच नाही. म्हणजे ते शून्य आहे असं नाही. भगवान बुद्धानं त्याला महाशून्य म्हटलं आहे खरं. पण काहीच नाही हे तर आहेच. काहीच नाही म्हणजे सगळं आहे असं काहीतरी ते आहे. त्या तत्त्वानं हे सगळं सांगितलं आहे पहा स्वतःबद्दल. ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात हजाराव्या ओवीच्या नंतर कुठेतरी आहे. संगीताची आणि इतर कलांचीही धडपड अखेर तिथे जाण्याची असते. संगीतसुद्धा तिथे लीन होतं. सगळंच तिथे लीन होतं. कारण प्रगाढ मौनाचाच तो प्रदेश आहे. तर ते काय आहे?

‘बिंदूनादकलातीतं तस्मै श्रीगुरवे नमः’ असं काय आहे. याचे एक सोपे उदाहरण म्हणजे दृश्य प्रकाशाचे. आहे? तो संपूर्ण श्लोक असा आहे

‘चैतन्य शास्वत शांतं व्योमातीतं निरंजनम | बिंदू - नाद - कलातीतं तस्मै श्रीगुरवे नमः ॥’

जे चैतन्य आहे, जे शांत आहे, जे ‘व्योमातीत’ आहे. कल्पना कर, आकाशाच्या पलीकडे काय? आपण आकाशाकडे बघतो पण त्याच्या पलीकडे काय आहे माहीत नाही. आहे ते निरंजन आहे, त्याला काजळी नाही असं चित्रकला, अक्षर, नाद पलीकडे आहे....

जी माणसं तिथपर्यंत पोहचू शकतात व ज्यांची साधना तेवढी जर असेल, तर ती मौनात विसर्जित होतात. कारण ती जागा म्हणजे मौन आहे. ‘Enormous ocean of silence’ असं कृष्णमूर्ती त्याचं वर्णन करतात. विज्ञानी, कलावंत, भक्त तिथे विसर्जित होतात व त्यांच्या कलेलाही विसर्जित करतात.

हा भाग मला विशेष वाटला. या भागाचा वेगवेगळे लोक वेगवेगळा अर्थ काढतील. श्रद्धाळू लोकांना कदाचित हा भाग देवाची आठवण करून देईल, तत्त्वज्ञांना आणि आध्यात्मिक लोकांना कदाचित यात वेगळ्या वास्तवाची जाणीव दिसेल. कलावंतांना यात त्यांच्या कलेचा आणि साधनेचा सर्वोच्च क्षण दिसेल ज्या क्षणी स्वतःचा आणि आजूबाजूच्या साधारण वास्तवाचा (mundane existence) विसर पडेल. मी जेव्हा हा भाग वाचला, तेव्हा माझ्या मनात विज्ञानाच्या वाटेने जाणारे काही विचार आले. खरे तर ते विचार या संकल्पनेला लागू पडतात की नाही, ते मला नक्की माहीत नाही. पण जे काही मनात आले ते मांडण्याचा प्रयत्न करणार आहे-

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

आपण सर्व आपल्या इंद्रियांच्या संवेदनांच्या मर्यादेच्या चौकटीत बसणाऱ्या वास्तवात जगतो. पण विश्वाचे वास्तव माणसाच्या अनुभूतीतून कळणाऱ्या वास्तवापेक्षा कितीतरी पटींनी जास्त समृद्ध आहे. याचे एक सोपे उदाहरण म्हणजे दृश्य प्रकाशाचे. माणसाच्या डोळ्यांना अंदाजे ३८० नॅनोमीटर्स ते ७५० नॅनोमीटर्सच्या तरंगलांबीचा (wavelength) प्रकाश दिसतो, पण ही मानवी डोळ्यांची मर्यादा आहे. या तरंगलांबीच्या अलीकडे आणि पलीकडे प्रारण किंवा प्रकाश असतो. फक्त तो आपल्या अनुभूतीचा भाग होत नाही. उदाहरणार्थ, काही प्राणी, पक्षी, कीटक, मासे इत्यादी अतिनील (ultra violet) किंवा अवरक्त (infrared) प्रारण (radiation) पाहू शकतात. त्यामुळे जिथे आपल्याला अंधार आहे असे वाटते, तिथले दृश्य काही प्राणी, पक्षी पाहू शकतात. अंधाऱ्या अवकाशाच्या पोकळीमध्ये काहीच नसावे, असे आपल्याला वाटते, पण त्यामध्येही प्रकाश भरलेला असतो.

१९६५ सालच्या अमेरिकेतील आनों पँझीयास आणि रॉबर्ट विल्सन या शास्त्रज्ञांना अनावधानाने अवकाशातील प्रारणाचा शोध लागला. ते रेडिओ अँटेना वापरून एक प्रयोग करत असताना रेडिओ अँटेनावर खरखर जाणवत होती. ही खरखर कशी नाहीशी करावी, असा ते विचार करत होते. आधी त्यांना वाटले की, रेडिओ अँटेनावर कबुतरांनी घाण केली असावी म्हणून अशी खरखर येत असावी. पण संपूर्ण रेडिओ अँटेना स्वच्छ केल्यावरही काही फरक पडत नव्हता. शिवाय अँटेना कुठल्याही दिशेला फिरवला तरी या खरखरीत काही फरक पडत नव्हता. शेवटी ही खरखर अवकाशात असलेल्या कुठल्या तरी प्रारणामुळे आहे, हे त्यांच्या लक्षात आले. हे प्रारण अवकाशात सगळीकडे होते. साहजिकपणे त्यांच्या मनात हा प्रश्न आला की, हा अवकाशात सर्वदूर एकसारखा पसरलेला प्रकाश कुठून आला.

दुसरीकडे काही शास्त्रज्ञ महास्फोटाच्या सिद्धान्ताचे (Big Bang theory) पुरावे शोधत होते. महास्फोटाचा सिद्धान्त खरा असेल, तर आपले विश्व सुरुवातीच्या काळात खूप उष्ण आणि घनदाट परिस्थितीत असले पाहिजे. अशा परिस्थितीचा काही पुरावा मिळतो का, हे ते शोधत होते. हा पुरावा होता पँझीयास आणि विल्सनला योगायोगाने मिळालेले प्रारण. या प्रारणामुळे महास्फोट झाल्याचा महत्त्वाचा पुरावा मिळाला आणि हा शोध लावण्यासाठी पँझीयास आणि विल्सनला भौतिकशास्त्राचे नोबेल पदक देण्यात आले.

हे प्रारण मायक्रोवेव्ह प्रकारचे आहे. हे आपल्या डोळ्यांना दिसत नाही, पण ते सतत आपल्या आजूबाजूला असते. हे किती विलक्षण आहे पहा. विश्वाच्या आद्य स्थितीतून निघालेल्या प्रकाशाने आसमंत भरले आहे आणि तो प्रकाश आजही आपल्यावर पडतो आहे. आपल्यातल्या बहुतांश लोकांनी नकळत या प्रकाशाचे दर्शन घेतले आहे. जेव्हा आपण टीव्ही लावतो आणि टीव्हीवर कुठलेही चॅनेल नसते, तेव्हा टीव्हीवर आपल्याला खरखर दिसते. या खरखरीचा एक भाग अवकाशातील मायक्रोवेव्ह प्रारणामुळे घडतो. तेव्हा पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला टीव्हीवर खरखर दिसेल, तेव्हा त्याकडे आदराने पहा. विश्वाचे आद्य रूप त्या खरखरीत दडले आहे.

ज्याला आपण काहीच नसलेली अवकाशाची पोकळी म्हणतो त्यात खूप काही घडत असते. अशा पोकळीमध्ये पदार्थ आणि प्रतिप्रदार्थाच्या मूलकणांच्या जोड्या अकस्मात निर्माण होऊन नष्ट होत असतात (virtual particles). अशा पोकळीमध्ये विद्युतचुंबकीय क्षेत्र, हिग्स क्षेत्र अशी वेगवेगळी क्षेत्रे किंवा फिल्ड्स असतात. अवकाशाच्या पोकळीमध्ये ऊर्जाही लपली असते. या ऊर्जेला ‘झिरो पॉइंट एनर्जी’ असे म्हणतात.

याच पोकळीतील ऊर्जेमुळे आपल्या विश्वाचा सतत विस्तार घडतो आहे. इतकेच नाही तर अवकाशाच्या पोकळीला आकारही असतो. या पोकळीच्या आकाराच्या आधारेच गुरुत्वाकर्षणाची क्रिया घडते. म्हणजे जी आपल्याला निर्गुण, निराकार, रिकामी, अंधारी अवकाशाची पोकळी वाटते, ती खरे तर सगुण साकार असते, प्रकाशाने आणि ऊर्जेने ओतप्रोत भरलेली असते. अशा अवकाशाच्या पोकळीमध्ये सतत पुंजवादाचे तरंग उमटत असतात. तिथेही सतत कृती आणि सृजन घडतच असते. हेच विज्ञानातील ‘व्योमातीतं निरंजनम’चे रूप असावे का?

विश्वात सर्वत्र अगदी अवकाशाच्या पोकळीतही हायझेनबर्गचा अनिश्चिततेचा नियम (Heisenberg's Uncertainty Principle) लागू पडतो. या नियमानुसार पुंजवादाच्या क्षेत्राचे वाहक कण असलेल्या मूलकणांची गती कधीही शून्य होऊ शकत नाही. म्हणजे अवकाशाच्या पोकळीमधील पुंजवादाचे तरंग (quantum fluctuations) कधीही थांबत नाहीत आणि अवकाशाच्या पोकळीचे तापमानही निरपेक्ष शुन्याइतके (absolute zero) कधीही कमी करता येत नाही. निरपेक्ष शून्याच्या जवळ जाता येते. पण शून्याला स्पर्श करता येत नाही. हिराबाईंच्या तारषड्जाप्रमाणे किंवा मायकेल अँजेलोच्या चित्राप्रमाणे!

आता मौनासंदर्भातील समांतर प्रतिमा पाहू. आपले विश्व सुरुवातीच्या काळात उष्ण आणि घनदाट अवस्थेत असताना त्या तेजस्वी डोहामध्ये (plasma state) सतत तरंग उमटत होते. याला शास्त्रज्ञ Baryon-coustic Oscillations असे म्हणतात. -coustic म्हणण्याचे कारण असे की, या तरंगांचे रूप ध्वनितरंगांसारखे होते. तर आद्य विश्वामध्ये असे तरंग आसमंतात घुमत होते. एका विशिष्ट क्षणी विश्वाचे स्थित्यंतर घडले आणि हे तरंग जागच्याजागी गोठले.

या तरंगांमुळे अवकाशात काही ठिकाणी पदार्थाची घनता जास्त झाली, काही ठिकाणी कमी. जिथे पदार्थाची घनता जास्त झाली, तिथे तारकाविश्वे तारे घडले आणि जिथे पदार्थाची घनता कमी झाली, तिथे अवकाशाची पोकळी घडली. पुढे या ताऱ्यांच्या गर्भात निर्माण झालेल्या मूलद्रव्यांपासून पृथ्वीवर जीवनाला आधार मिळाला. हे किती विलक्षण आहे पहा. आद्य विश्वाच्या तेजस्वी डोहामध्ये ध्वनितरंग उमटले. आणि हे ध्वनितरंग जेव्हा गोठले, मौन झाले, तेव्हा त्यांच्यातून तारे, ग्रह, तुमची माझी निर्मिती घडली. इथे मला विज्ञानाच्या वाटेतून ‘Enormous ocean of silence’ दिसला. शांततेच्या महासागरावर गोठलेल्या ध्वनीच्या लाटा दिसल्या. याच लाटांमध्ये विश्वाच्या आणि जीवसृष्टीच्या निर्मितीचे सार लपले आहे.

मनात अजूनही अनेक प्रतिमा आहेत, पण इथे थांबतो. ‘बोलिले जे’ने विचारांना छान चालना दिली. मुलाखती हा प्रकार मी फारसा वाचलेला नाही. पण अतुल सर ज्या पद्धतीने विशेष व्यक्तींबरोबर संवाद करतात ती पद्धत मला खूप आवडली. ‘ऐकता दाट’, ‘बोलिले जे’ ही पुस्तके खूप आवडली. यांतून विशेष व्यक्तींच्या कार्याचा, त्यांच्या विचारांचा खूप छान परिचय मला घडला. नंदा काकांच्या वाक्यामुळे एलकुंचवार सर ही मोठी व्यक्ती आहे, याची कल्पना आली होती. पण ‘बोलिले जे’ नंतर त्यांच्या विचारांची ओळख झाली. त्यानंतर मी एलकुंचवार सरांचे साहित्य वाचायला घेतले आणि सध्या त्यांचे लिखाण मी झपाटल्यासारखे वाचतो आहे. सुरुवातीला मी डग्लस अ‍ॅडम्सच्या एका वाक्याचा उल्लेख केला होता. त्यात बदल करून म्हणतो की, ‘बोलिले जे’पर्यंत मी योगायोगाने पोचलो. पण इथे पोचणे माझ्यासाठी आवश्यक होते. धन्यवाद!

‘प्रतिष्ठान’च्या जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर-ऑक्टोबर २०२२च्या अंकातून साभार

..................................................................................................................................................................

‘बोलिले जे... संवाद एलकुंचवारांशी’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5244/Bolile-Je-Sanwad-Elkunchwaranshi

..................................................................................................................................................................

सुकल्प कारंजेकर 

sukalp.karanjekar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......