काल्पनिक झोर्बा मला भेटवायला खरा झोर्बाच कारणीभूत ठरला. त्या खऱ्याखुऱ्या झोर्बाचं नाव - अशोक जैन...
संकीर्ण - श्रद्धांजली
अंजली अंबेकर
  • अशोक जैन
  • Mon , 20 February 2023
  • संकीर्ण श्रद्धांजली अशोक जैन Ashok Jain महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times कानोकानी Kanokani राजधानीतून Rajdhanitun झोर्बा द ग्रीक Zorba the Greek

‘महाराष्ट्र टाईम्स’चे माजी कार्यकारी संपादक, अनुवादक, स्तंभलेखक, विनोदी साहित्यिक अशोक जैन यांच्या निधनाला १८ फेब्रुवारी २०२३ रोजी नऊ वर्षं झाली. त्यानिमित्तानं त्यांच्या तरुण मैत्रिणीने लिहिलेला हा लेख...

.................................................................................................................................................................

‘You have everything except madness…’ अशी मॅडनेसची वेडावत नेणारी धून आळवत झोर्बा नावाचा ग्रीक एका उनाड दिवशी माझ्या आयुष्यात आला. या अजब व्यक्तिरेखेला निकास कझानझाकीस या ग्रीक लेखकाने अशाच एका मॅडनेसमध्ये जन्माला घातले असावे, असा कयास आहे. मुळातच अवलिया असणारा हा झोर्बा निकासच्या कादंबरीतून पहिल्यांदा जगात आला. पुन्हा तो त्याच नावाच्या चित्रपटातून आणि ब्रॉडवे म्युझिकलमधूनही समोर येत राहिला. वेगवेगळ्या फॉर्ममधून तो मधूनच त्याची संतूरी वाजवत आपल्याला नादावत राहतो, तर कधी ‘सिरतकी’ नाच (झोर्बा डान्स) करत खुळावतो... आणि सगळ्या जगण्याला वेढून असणारी जगण्याची तान घेऊन आपल्याला कायम त्याच्यासोबत वाहवत नेतोच . 

तसाही हा झोर्बा म्हणजे जगण्यातून मुक्त होऊन जगणं शिकवणारा वेडा पीरच. त्याच्या जगण्याची तान जगणं तल्लीन होऊन नाही जगता आलं, तर त्यातून विरक्त होणंही कठीणच असं जाणणारी आहे. आपल्या अंताचं भान असणारा झोर्बा जगण्यातील प्रत्येक क्षणाचा उत्सव करून जगायला हवं, असं मानणाराही आहे. त्याची तीच जगण्याची तान आपण उद्या असू किंवा नसू, जगणं, जगण्याविषयीची आसक्ती आपल्यातून निरंतर वाहत राहायला पाहिजे, असं सतत सांगत राहते. झोर्बा निकासने निर्माण केलेली काल्पनिक व्यक्तिरेखा असली तरी, त्यातलं मर्म जाणणाऱ्या आणि तसं जगू पाहणाऱ्या कितीतरी व्यक्तींमधून ते ‘झोर्बापण’ झिरपताना जाणवतं.

झोर्बा नावाची ही काल्पनिक व्यक्तिरेखा आणि प्रत्यक्ष झोर्बापण व्यक्तित्वात वेढून असणारी एक व्यक्ती मला भेटली. नेमकं सांगायचं तर हा काल्पनिक झोर्बा मला भेटवायला खरा झोर्बाच कारणीभूत ठरला. मला भेटलेल्या या खऱ्याखुऱ्या झोर्बाचं नाव - अशोक जैन.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

जैन सर व्यवसायाने पत्रकार व लेखक होते. विषय राजकीय, सामाजिक, साहित्य किंवा चित्रपट-संगीत असो, त्यांची लेखणी कायम बहरणारी होती. सरांनी ‘महाराष्ट्र टाईम्स’ या वृत्तपत्रांत अनेक वर्षं कार्यकारी संपादकपद भूषवलं. ‘कलंदर’ या नावानं ‘कानोकानी’ हे सदर चालवलं. अनेक महत्वाच्या पुस्तकांचा मराठीत अनुवाद केला. अनुवाद हा गंभीरपणे करण्याचा आणि वाचण्याचा साहित्यप्रकार आहे, ही धारणा त्यांनीच मराठी साहित्यात रुजवली. मूळ लेखकासोबतच अनुवादकालाही त्यांनी प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. निव्वळ स्मरणावर आधारित दिल्लीतील अकरा वर्षांच्या वास्तव्यावर ‘राजधानीतून’ नावाचं पुस्तक लिहिलं. चेहऱ्या-मुखवट्याच्या आत दडलेल्या दिल्लीचं फार आगळंवेगळं चित्रण त्यांनी अत्यंत चित्रदर्शी भाषेत या पुस्तकात केलंय. ‘राजधानीतून’मध्ये दिल्ली शहर ही स्वतंत्र व्यक्तिरेखा म्हणून समोर येतं आणि राजकारणात, समाजकारणात आणि कलाप्रांतातही ही व्यक्तिरेखा अलगद मिसळून जाते.

सरांच्या नावावर अनेक पुस्तकं आहेत. त्यांची याहून काकणभर अधिकच ओळख सांगायची तर ते, समरसून आयुष्य जगू पाहणारे होते. त्यांच्यात भवतालबाबतचं कधीही न शमणारं कुतूहल होतं. सहवासात येणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात ते जगण्याबाबतचा सुगंध आणि संगीत पसरवत असत. ते स्वतःही चैतन्याचा झरा होते. त्यांचे ‘व्हाईब्ज’ जगण्यातील किती तरी गोष्टींना आनंदाचं परिमाण देत. त्यांचा ‘ह्यूमरस’ हजरजबाबीपणा मैफल रंगतदार करत असे. त्यांची ही सगळी लक्षणं झोर्बाचीच तर होती. तो हेच तर सातत्यानं करायचा. म्हणून सर झोर्बा होते, त्याचा डीएनए अंगी बाळगणारे होते आणि त्यांनीच झोर्बाला अलवारपणे माझ्या अंगणात आणलं. तेव्हापासून झोर्बा माझ्या आयुष्यात आपले हात-पाय पसरतोच आहे आणि हा झोर्बानाद माझ्यातूनही सतत वाहतोच आहे.

जैन सरांचा आणि माझा प्रत्यक्ष परिचय २००१ साली झाला. मी त्या वेळी वयाच्या पंचविशीत होते. त्याच काळात मी माझ्या वडिलांना अकाली गमावलं होतं. त्यांच्या आकस्मिक जाण्याने मन सैरभैर झालं होतं. व्हायोलिनच्या सूरात त्यांचं जाणं पुढे कित्येक दिवस मनात पार्श्वसंगीतासारखं सतत वाजत असायचं. आयुष्य अगदी मोडून पडल्यासारखं झालं होतं. वडिलांनीच लावलेली लहानपणापासूनची संगीताची आणि वाचनाची आवड नाही म्हणायला सोबत होती. तेच मला घट्ट सोबतीला होते. माझं पोस्टिंगही त्या काळात परभणीसारख्या आडगावी होतं. वाचन व संगीताची असणारी आवड ‘पॅशन’मध्ये रूपांतरित होण्यात परभणीसारख्या शहराचं योगदान मोठं होतं. या अत्यंत छोट्या भासणाऱ्या शहरात ऑफिसच्या रुटीनशिवाय गुरफटवणारे इतर कुठलीही व्यवधानं नसायची. त्यामुळे वाचन, संगीत, चित्रपटांवर फोकस करणं मला सहज शक्य झालं.

सरांनी अनुवादित केलेल्या पुपुल जयकरच्या ‘इंदिरा’ या पुस्तकाची तर मी वडील गेल्यानंतर पारायणं केली होती. त्यांचं इतर लिखाणही मिळवून वाचलं होतं. सरांना प्रत्यक्ष दाट परिचय होण्यापूर्वी परभणी आणि अहमदनगरच्या साहित्य संमेलनात ओझरतं भेटले होते. कदाचित ‘इंदिरा’ या पुस्तकावर त्यांची सहीही घेतली होती आणि ‘फॅन’ भावनेतून दोन-चार वाक्यांची देवाणघेवाण झाली होती. पण लक्षात होता, तो त्यांचा कुठलीही ‘एअर’ न घेता निर्मळपणाने समोरच्याशी संवाद साधण्याचा स्वभाव.

सरांच्या आणि माझ्या वयात किमान तीस-बत्तीस वर्षांचं अंतर होतं आणि लौकिकार्थानं तर सर कित्येक मैल पुढे होते, आमच्यातलं ते अंतर पार करणं तर मला कधीही शक्य नव्हतं. असं असूनही सरांचं वेगळेपण आणि नेहमी ग्रॉउंडेड असणं, त्या वयातही मनावर गोंदवलं गेलं. पुढे दृढ परिचयाच्या दहा-बारा वर्षांतही त्यांच्यातला कमालीचा साधेपणा आणि न शमणारं कुतूहल मोहवून टाकायचं. त्यांच्या साधेपणालाही उत्कटतेची उत्तुंग किनार होती. ती त्यांना इतर समकालीनांपेक्षा वेगळं करायची.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मी साधारणतः २००१पासून त्यांना पत्रं लिहायला लागले. सुरुवातीला ‘कलंदर’ या नावानं काढलेल्या ई-मेल आयडीवर इ-मेल्स लिहिल्या आणि पुन्हा पत्रांकडे वळले. त्याशिवाय आतून व्यक्त झाल्यासारखं वाटायचं नाही. तसंच पत्राद्वारे संवाद साधणं दोघांनाही आवडायचं. आमचा दीर्घ पत्रसंवाद अनेक वर्षं नियमित होता. त्यातून कितीतरी नवीन विषयांची मांडणी व्हायची, वाचनाची कक्षा रुंदावणारा संवाद साधता यायचा. कधी तरी त्यातून शास्त्रीय संगीताचे सूर पाझरायचे, तर कधी विस्तीर्ण वाळवंटातून ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ माझ्याकडे पाय ओढत यायचा.

फारच क्वचित वैयक्तिक जगण्याचे संदर्भ डोकवायचे. सरांच्या आणि माझ्या वयातलं व स्थानातील अंतर आमच्यापुरतं गळून पडायचं. एका समान पातळीवर येऊन संवाद साधणं शक्य व्हायचं. सर लेखक म्हणून मोठे होतेच, पण माणूस म्हणून फार उंच होते. त्यांच्या जवळपास पोचणारी माणसं पुन्हा कधी भेटली नाहीत. माणूसपणाच्या उंचीचे तर तसेही जागतिकीकरणाच्या सोसाट्यात वांधेच झालेत. तेव्हा सरांची उंची अधिकच मोठी वाटते. सरांशी होणारा पत्रसंवाद माझ्या तुटण्या-सुटण्या आणि भंगण्याच्या काळात फार महत्वाचा ठरला. हे असं व्यक्त होणं माझी तेव्हा फार आंतरिक गरज होती.

सरांनी पत्रांतून खूप नवी पुस्तकं सुचवली, वाचायला लावली. त्यात मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा सगळ्या भाषेतील होती. त्यांच्याशी संवाद सुरू होईपर्यंतचं माझं इंग्रजीचं वाचन फार तूटपुंजं होतं, फार तर नॉन-फिक्शन आणि मासिकं यापुढे ते गेलं नव्हतंच. सरांनी निकासच्या झोर्बाप्रमाणेच स्टीफन झवाईंग, आर्थर कोसलर, दस्तएवस्की यांच्या अभिजात साहित्याचा परिचय करून दिला. माझ्या संग्रहात मोलाची भर पडत गेली. नंतर तुर्कीश लेखक ओरहान पामुकही आम्हाला आवडायला लागला. पामुकचं ‘इस्तंबूल’ त्याच्या इतर साहित्यापेक्षा अधिक आवडलं होतं.

शास्त्रीय संगीत हा तर आम्हा दोघांचाही वीक पॉइंट. त्यांनी त्यातल्या कित्येक अनवट गायकांचा परिचय करून दिला, त्यांना ऐकायला लावलं. चित्रपटांचा तर सर ‘एनसायक्लोपीडिया’च होते. संगीत आणि चित्रपट या दोन्ही त्यांच्या बाजू फारशा लिखाणातून उजेडात आल्या नाहीत. मला लिहिलेल्या पत्रांत त्यांची लालित्यपूर्ण भाषा फार सुंदर असायची. त्यांचा व्यासंग आणि विलोभनीय रसिकता त्यातून जाणवायची.

असंच एकदा ‘झोर्बा द ग्रीक’ या निकोस कझानझाकीस या ग्रीक लेखकाच्या कादंबरीविषयी सांगितलं. मग चित्रपटाविषयीही ते भरभरून बालले. सरांना ‘ललित’ मासिकाच्या कुठल्याशा स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळालं होतं. ते पुस्तकं विकत घेण्याचं. तेव्हा त्यांनी मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून ‘झोर्बा द ग्रीक’ ही कादंबरी विकत घेतली होती. ती वाचून ते फारच भारावून गेले होते आणि त्याच आवेगात त्यांनी मायकेल ककोयनास यांनी दिग्दर्शित केलेला ‘झोर्बा द ग्रीक’ हा चित्रपटही बघितला.

ते सगळं त्यांच्या पत्रातून वाचून, त्यांच्याकडून ऐकून मीही झोर्बामय झाले होते. माझा धाकटा भाऊ तेव्हा जर्मनीत होता. त्याला सांगून ‘झोर्बा’ कादंबरी मागवली. त्याने कादंबरीसोबत ‘झोर्बा’ चित्रपटाचा म्युझिक ट्रॅकही पाठवला. कादंबरी वाचताना तो ट्रॅक ऐकणं फार मनमोहक अनुभव होता. एक वेगळाच वसंताचा बहर झोर्बा बनून आयुष्यात आला. पुढे हा चित्रपट कधीतरी पुण्याच्या क्रॉसवर्डमध्ये डीव्हीडीच्या रूपात मिळाला आणि झोर्बा मिळाल्याचं मी सरांना फोन करून उत्साहात सांगितलंही.

मी तो चित्रपट आजवर कितीदा बघितला याची मोजदाद करणं कठीण आहे. प्रत्येक वेळी तो अनुभवताना वेगळा आनंद ऋतू आयुष्यात येतो आणि प्रत्येक वेळी मी सरांना ‘मिस’ करते.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

सुरुवातीच्या पत्रसंवादानंतर त्यांनी मला भेटायला बोलावलं. मी शासकीय कामानिमित्त अनेकदा मुंबईला येत-जात असे. पण त्यांना भेटणं नेहमी टाळत असे. जगभरातल्या सगळ्या न्यूनगंडाचं माझ्या मनात भलं मोठं जाळं निर्माण झालेलं होतं. त्यातून माझं मला बाहेर पडणं शक्य होत नव्हतं. सर त्या काळात ‘मटा’चं काम प्रकृती अस्वास्थ्यामुळे करत नव्हते. स्ट्रोकच्या धक्क्याने इथे-तिथे-सर्वत्र वावरणाऱ्या आणि भटकंतीतले विविध अनुभव घेऊन आपल्या शब्दांत मांडणाऱ्या लेखकाला एकाच ठिकाणी कायमचं जायबंदी केलं होतं. नियतीची ही क्रूर थट्टा होती. पण सरांच्या मनाची उभारी हा स्ट्रोकही मोडू शकला नाही. ‘बिफोर’ आणि ‘आफ्टर’ असा जगण्याचा सारीपाटही सर कधी मांडत बसले नाहीत. ते आपल्याच धुंदीत जगत होते, विविध अनुभवांचे परागकण ओंजळीत तितक्याच सामर्थ्यानं गोळा करण्याचा प्रयत्न करत होते. अर्थात हे सोपं नव्हतंच, पण ते झोर्बा होते... मागे फार वळून पाहणारे आणि हतबल न होणारे...

मला मात्र माझ्याच जाळ्यातून बाहेर पडायला इतका उशीर झाला की, सरांची शारिरीक अवस्था घराबाहेर पडू न शकण्याइतकी वाईट झाल्यावर मी त्यांना भेटले, भेटू शकले. त्यांच्या सोबतच्या भटकंतीबाबत फक्त सरांकडून किंवा त्यांच्या मित्रमंडळींकडून कळालं, मला मात्र तो अनुभव घेता आला नाही. मुंबईतील माझ्या भटकंतीचे मात्र ते फोन गाईड असायचे. पुस्तकं, सीडीज कुठे मिळतील किंवा चांगलं खाणं कुठे मिळेल, याची त्यांना इत्यंभूत माहिती असायची.

अशा एका मुंबईच्या संध्याकाळी मी फोन करून त्यांच्या वर्सोव्याच्या घरी गेले. किती तरी जुने ऋणानुबंध असल्यासारखे आम्ही पहिल्याच भेटीत बडबडलो. सुनीतीकाकूही घरी होत्या. दोघांची एकमेकांना जाणती, गहिरी साथ होती. कर्तव्यापल्याड जाऊन काकूंनी सरांचं अतिशय प्रेमानं, तरलता जपत सगळं केलं.

आमच्या या पहिल्या आश्वासक भेटीनंतर मुंबईत मला हक्काचं घर मिळालं. सरांनी आमच्या या भेटीचा पत्र लिहून आनंद व्यक्त केला. मी पत्र लिहिण्यासोबत धाडसानं अनेकदा त्यांना फोनही करत असे. खूप गप्पा व्हायच्या. सरांचा ‘सेन्स ऑफ ह्युमर’ शेवटपर्यंत ‘ताजगीभरा’ होता. त्याला जोड आमच्या ‘मराठवाडी ह्युमर’ची. एकदा सरांनी फोर्ट परिसरातील ‘तृष्णा’ या रेस्टॉरन्टमध्ये ग्रील्ड फिश खाण्याबाबतची शिफारस केली. मी माझ्या एका मैत्रीणीसोबत तिथं गेले. मेन्यू कार्डवरच्या किमती बघून अवाक् व्हायला झालं. तोपर्यंत सराईतासारखं हॉटेलिंगचं अवाढव्य बिल भरायची मराठवाडी मनाला सवय नव्हती. शिवाय कार्ड स्वाईप करणं इतकं राजरोस आयुष्यात आलेलं नव्हतं. ‘बरिस्ता’मधील पासष्ट रुपयांची कॉफी पितानाही अपराधी वाटायचं. अर्थात पुढे ही माझी मानसिकता झपाट्यानं बदलली. एकूणंच ‘तृष्णा’मधील ग्रील्ड फिश खाणं बजेटच्या बाहेरचं होतं. मग आम्ही नूडल्स असं काही तत्सम खाऊन बाहेर पडलो.

सरांना फोन केला, तेव्हा नेहमीप्रमाणे ‘आता लगेच अंधेरीला या’ असा आग्रह केला. मग मी त्यांची खेचायची ठरवली. सांगितलं, ‘आता तृष्णाची फिश खाऊन सगळे पैसे संपलेत, आम्ही चालतच तुमच्याकडे यायला निघालोय’. दोन तासांनी त्यांच्या घरी पोचल्यावरही तेच सांगितलं. ते ऐकून सरही मिश्कीलपणे हसले. मुंबईसारख्या शहरांत सतत कुथत बसणाऱ्या लोकांच्या पार्श्वभूमीवर असा अचानक ‘घरी या’ म्हणण्याचा मॅडनेस त्यांच्यात होता.

माझा मात्र आताशा माणसं टाळण्याच्या बाबतीतला कल वाढत चाललाय. अशा मनाला टोचण्या लागल्यावर या झोर्बाची आठवण येते आणि स्वत:ची शरम वाटते. माणसांबाबत ते कायम आसुसलेले असत. ‘कानोकानी’च्या लोकप्रियतेनंतर त्यांना अनेक पत्रं यायची, आणि कितीतरी फोनही येत. पण कधीही सरांनी फोन टाळले किंवा समोरचा माणूस कोण आहे, हे बघून संवादात फरक केलेला मी बघितलं नाही. ते मोठमोठ्या लोकांसोबतच सामान्य वाचकांशीही तेवढ्याच आस्थेनं बोलायचे. अशा बोलण्यातून त्यांना अनेक संदर्भ कळायचे, आणि त्याचा फार सुंदर वापर त्यांनी त्यांच्या लिखाणातून केलाय.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘कानोकानी’त आपलं नाव यावं, यासाठी लोक फार उत्सुक असत आणि त्यात स्वतःवर झालेली टीकाही त्यांना चालत असे. त्या निमित्तानं अशोक जैनांनी आपल्यावर लिहिलं, याचंच अनेकांना कौतुक वाटे. सरांनी कारकिर्दीच्या बहराच्या काळात अनेकांना मदत केली, लिहिण्यासाठी प्रवृत्त केलं. त्यापैकी फार कमी लोक शेवटपर्यंत त्यांच्या संपर्कात होते. पण या अनुभवाचं किल्मिष त्यांनी मनावर साठू दिलं नाही. ते वाईट अनुभवाला गोंजारत माणसांपासून दूर गेले नाहीत किंवा कारणंही दिली नाहीत. त्यांनी स्वत:ला प्रवाहित ठेवलं, मनाचं निरोगी असणं प्राणपणानं जपलं. सरांचं हे आठवताना मागोमाग झोर्बाचा ‘सिरतकी’ (sirtaki) डान्स आठवतो. दोघांमध्येही ‘सारा जहाँ’ कवेत घेण्याची असोशी एकाच जातकुळीची असल्याचं जाणवतं. हे सगळं उत्तुंग अनुभवणं स्वत:तल्या खुजेपणाचा परिचय देत आणि त्या खुजेपणातून बाहेर यायलाही खुणावत असतं.

मालिनी राजूरकर, पं.मल्लिकार्जून मन्सूर आणि कुमार गंधर्व हे शास्त्रीय गायक सरांचे विशेष आवडीचे. मालिनीताईंची एक मैफल सर आजारी असताना पेणला आयोजित केली होती. अर्थात त्यांच्या मित्रांपैकी कुणीतरी घ्यायला-पोचवायला होतं. पण त्याहून सरांची इच्छाशक्ती आणि मालिनीताईंचं गाणं ऐकण्याबाबतची ओढ फार महत्त्वाची वाटली. ते आजारी असतानाही मालिनीताईंची मैफल ऐकायला गेले. ११ एप्रिल हा सरांचा वाढदिवस असायचा. एकदा वाढदिवशी पुण्याला रोहन प्रकाशनातर्फे त्यांचं पुस्तक प्रकाशित होणार होतं. मी ऑफिसमधून सुटी घेऊन पुण्याला गेले आणि ते जिथं थांबले होते, त्या श्रेयस हॉटेलमध्ये त्यांना भेटायला गेले. त्यांच्यासाठी भेट म्हणून मालिनीताईंची (राजूरकर) नवीन सीडी घेतली होती. किती तरी लोक, चाहते, मित्रमंडळ त्यांना भेटायला आलं होतं. एवढ्या लोकांमध्येही वेळ काढून सर मला भेटले, नेहमीसारख्या गप्पा मारल्या, सीडी बघून खूष झाले. मुंबईत परतल्यावर ती ऐकून दाद देणारं भरभरून पत्रं आठवणीनं लिहिलं. त्यांच्यातली ही आस्था आणि समोरच्याबद्दल वाटणारी आत्मीयता हृदयस्पर्शी होती.

झोर्बाचाच अजून एक वेगळा संदर्भ आठवतोय. ‘महा अनुभव’ मासिकाच्या एका दिवाळी अंकात प्रख्यात लेखक विजय तेंडुलकरांची मुलाखत होती. त्यात त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात झोर्बाचा उल्लेख केला होता आणि तो चित्रपट अशोक जैन यांचं ‘मटा’तील परीक्षण वाचून बघितल्याचं नमूद केलं होतं. परंतु जैनांनी ‘चांगला चित्रपट नाही’, असं लिहिलं होतं. परीक्षणात जैनांनी चित्रपटाची कथा मात्र दिली होती, असं तेंडुलकरांनी सांगितलं होतं. ती कथाच इंटरेस्टिंग वाटल्याने चित्रपट बघितला असं तेंडुलकरांनी या मुलाखतीत सांगितलं होतं. मी सरांना तेंडुलकरांच्या या मुलाखतीबाबत सांगितलं आणि तेंडुलकरांनी कसा संदर्भ दिलाय, हेही वाचून दाखवलं. त्यांना तो संदर्भ खटकला म्हणून माझ्याकडून त्यांनी ताबडतोब दिवाळी अंकाची प्रत मागवून घेतली. कारण त्यांच्या मते तेंडुलकरांनी चुकीचा अन्वयार्थ लावून झोर्बाचा प्रसंग सांगितलेला आहे. प्रत्यक्षात तसं झालेलं नव्हतं.

या संदर्भांत स्पष्टीकरण देणारं पत्र त्यांनी ‘अनुभव’ला पत्र पाठवलं की नाही, हे मला आठवत नाही. परंतु संदर्भाच्या पडताळणीसाठी महत्प्रयासानं त्यांनी १९६८मध्ये प्रकाशित झालेल्या परीक्षणाची प्रत ‘मटा’च्या संदर्भ ग्रंथालयांतून मिळवली आणि ती मला झेरॉक्सून पाठवली. सोबत विस्तृत पत्रही लिहिलं. प्रत्यक्ष परीक्षणात झोर्बाचं परीक्षण त्यांनी ‘उत्तम चित्रपट’ असंच लिहिलं होतं. तेंडुलकरांनी ते तपासून घ्यायला हवं होतं, असा फक्त त्याचा आशय होता. सरांनी हे सत्य समोर आणण्यासाठी आटापिटा केला. मला त्याचा संदर्भ कळावा म्हणून कष्ट घेतले. ही त्यांची अजून कौतुकास्पद बाजू. झोर्बासारखाच समरसतेनं भिडणाऱ्या स्वभावाचा अजून एक प्रत्यय.

मग प्रत्येक मुंबई भेटीत सरांची भेट घेणं अनिवार्य झालं. त्याशिवाय मुंबईहून परतणं अपराध्यासारखं वाटायचं. प्रत्येक भेटीत या झोर्बाच्या समरसतेचे नवीनंच पैलू कळाले. तौफिक कुरैशी या प्रसिद्ध पर्कशनिस्ट यांचा ‘री-धून’ (Rhy-dhun) नावाचा आल्बम प्रकाशित झाला होता आणि  सरांनी तो लगेच मागवून ऐकलाही होता. मला त्यांनी तो मुंबईतील एका भेटीत भेट दिला. त्यावर त्यांनी पत्रात इतकं अप्रतिम लिहिलं होतं की, तो लेख म्हणून प्रसिद्ध केला असता तर त्याची संगीतावरील उत्तम ललित लेखांत गणना झाली असती. ‘री-धून’सोबतचा त्यांचा प्रवास मलाही समृद्ध करून गेला. आजही री-धून माझ्या सगळ्या ऑडिओ फॉरमॅटमध्ये संग्रही आहे. मला तो संदर्भ थेट झोर्बाच्या संतूरीपर्यंत अलगद नेऊन पोचवतो.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मी लग्न करावं असं त्यांना नेहमीच वाटत होतं. त्यासाठी ते आग्रही होते. मी नेहमी उडवाउडवीची उत्तरं देऊन ते टाळत असे. सतीश (माझा नवरा) आणि मी लग्न करायचं ठरवलं, तेव्हा ही बातमी सरांना सर्वांत आधी सांगितली. तेही बातमी ऐकून खूप खूष झाले. सतीशचे बाबा म्हणजे माझे सासरे सुधीर नांदगावकर जैन सरांचे जुने मित्र. कुर्ल्यात नांदगावकर आणि जैन शेजारी राहत. शिवाय सतीशही ‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये काही वर्षं नोकरी करत होता. सरांची आणि सतीशची तिकडे अधूनमधून भेट होत असे. लग्न ठरल्यावर सरांना भेटायला गेल्यावर ते मिश्कीलपणे म्हणाले, ‘मला सतीश तुझ्यापेक्षाही जास्त जवळचा आहे, कारण मी त्याला लहानपणापासून बघितलाय’. मी ही हट्टानं ‘लहान असताना माझे वडील तुमच्या शेजारी नव्हते, हा माझा दोष आहे का’, असं म्हणून सतीशपेक्षा मीच तुम्हाला जवळची असायला हवी, असा आग्रह धरला. सर नेहमीच्या सराईतपणे शिताफीनं विषय बदलून दुसऱ्या विषयांवर बोलायला लागले. अशी गोड लबाडी करणं त्यांची खासीयतच होती. त्या वेळी ते अगदी लहान मुलासारखे निरागस भासत.

एकदा सरांशी मी कुठल्या तरी विषयांवर शंभर रुपयांची पैज लावली आणि त्यात जिंकले. माझं जिंकणं सिद्ध केल्यावर त्यांनी मला शंभर रुपयांचा चेक पाठवला आणि तो वटवण्यासाठी बॅंकेत टाकण्याचा आग्रह केला. सोबत पैज हरणं कशी त्यांची खासीयत आहे, असं सांगणारं खुमासदार पत्रही लिहिलं. माझ्याकडे तो चेक अजूनही आहे.

ही खरं तर फार किरकोळ बाब होती, पण हार स्वीकारण्याची त्यांची डिग्नीफाईड पद्धत होती. त्यांच्यातला झोर्बा जीवघेण्या आजाराशी हरण्या-जिंकण्यापलीकडचा खेळ खेळत होता. मी त्यांना गांजलेलं किंवा वेदनेनं त्रासून गेलेलं कधीही बघितलं नाही. वेदना तर प्रचंड होत असायच्या. जिंकण्याची उमेद आणि सपशेल हरण्याची तयारी, या दोन्ही गोष्टींसाठी आंतरिक सामर्थ्यानं ते तयार होते.

३१ डिसेंबर २००८ रोजी सुनीतीकाकूंचा मला ‘सर सीरियस आहेत आणि त्यांना रहेजा हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये ठेवलंय. सरांनी तुझी दोनदा आठवण काढली आहे, तर तू येऊन भेटून जा’ असं सांगितलं. आमचा औरंगाबादच्या मित्र-मैत्रिणींचा ‘अमरप्रीत’ हॉटेलमध्ये ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करण्याचा प्लॅन ठरला होता. माझी लग्नाची तारीख दीड महिन्यानंतरची, १४ फेब्रुवारी २००९ अशी ठरली होती. आमचा कदाचित औरंगाबादचा तो शेवटचा ‘थर्टी फर्स्ट’ असणार होता. पण काकूंचा फोन आल्यानंतर मला बेचैन व्हायला झालं. मी मिळेल त्या गाडीनं मुंबईला यायचं ठरवलं. संध्याकाळी जमलेल्या मित्र-मैत्रिणींना अमरप्रीतमध्ये भेटले आणि मुंबईच्या गाडीत बसले. सकाळी मुंबईत पोचल्यावर तडक हॉस्पिटलला गेले. काकूंनी हॉस्पिटलची परवानगी घेऊन ठेवली होती. सरांना तशा अवस्थेत बघणं फार त्रासदायक होतं. थोडीफार शुद्ध होती. मला त्यांनी ओळखलं आणि ‘लग्नाची तयारी झाली का, सतीश कसा आहे’ वगैरे विचारलं. या अवस्थेतही त्यांनी माझ्याबाबतीत इतकं ‘कन्सर्नड’ असावं, ही बाबच हजार हत्तींच बळ देणारी होती. नातेसंबंधाच्या अनेक उतारात मला हा प्रसंग तारून नेतो.

या झोर्बाने त्या एका क्षणांत युगांची आश्वासकता माझ्यात पेरली आहे, हे जाणवणं मला फार समृद्ध करून गेलं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

माझं लग्न झाल्यावर मी ठाण्यात स्थायिक झाले आणि आमचा संपर्क नियमित होत राहिला. माझा मुलगा अहान झाल्यावर बाहेर पडून मी ज्या पहिल्या घरी त्याला घेऊन गेले, ते घर सरांचंच होतं. सहा महिन्यांतून एकदा तरी आमची भेट व्हायचीच. अहान तीन वर्षांचा होता, तेव्हा त्याने सरांना मोबाईल दाखवला आणि तेही कौतुकानं त्याच्याकडून शिकून घेत. आम्ही अहानला ‘झोर्बा’च म्हणायचो. सरही त्याच्याबाबत विचारताना आवर्जून ‘झोर्बा कसा आहे?’, असंच विचारायचे.

आमच्या परिचयानंतरच्या प्रत्येक पावसाळ्यात पहिला पाऊस झाला की, मी पहिला फोन जैन सरांनाच करत असे. तेही पावसाचे अनेकविध विभ्रम बघून खूप आनंदी होत. घरातील खिडकीतून जरी पावसाचे तुषार अंगावर पडले, तरी सरांना अगदी लहान मुलासारखा निरागस आनंद व्हायचा. मग आवडती सीडी लावून ते संगीताचा मनसोक्त आनंद घ्यायचे.

सरांचा मित्र परिवार मोठा होता. त्यात शरद पवारजींसारख्या नेत्यांपासून ते शास्त्रज्ञांपर्यंत अनेकांचा समावेश असायचा. श्रीकांत लागू (लागू बंधू या पेढीचे मालक आणि उत्तम लेखक) ज्यांना जवळचा मित्रपरिवार ‘दाजी’ असं संबोधायचा. त्यांची आणि जैन सरांची मैत्री तर कुणालाही हेवा वाटावी अशीच होती. रोज लागू सर जैन सरांशी फोनवरून बोलायचे आणि स्वतः कितीही आजारी असतील तरी त्याची पर्वा न करता जैन सरांना प्रत्येक सोमवारी दादरहून अंधेरीला भेटायला जायचे. सरांनी पत्रकारितेच्या निमित्तानं किंवा वैयक्तिक असाही देश-विदेशात प्रवासही खूप केला. त्याचा कुठे अभिमान नाही की, गर्व नाही. ते फक्त त्यातले अनुभव ओंजळीत घेऊन असायचे. मग निमित्ता निमित्तानं त्यांची ती ओंजळ रिती करायचे.

२०१४च्या फेब्रुवारीमध्ये बाबांनी (सासरे) मला फोन करून सांगितलं की, ‘अशोक खूप सीरियस आहे आणि त्याला अंधेरीच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तू त्याला आज भेटून ये’. मी त्या वेळी बांन्द्र्याच्या ‘अधिदान व लेखा कार्यालयां’त पोस्टिंगला होते. मी काकूंना फोन केला आणि ऑफिसमधून तिकडेच गेले. योगायोगानं सतीशही काही कामानिमित्तानं अंधेरीलाच आलेला होता. तोही काम संपवून हॉस्पिटल मध्येच येणार होता. हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा सरांची शुद्ध गेलेलीच होती. काकू मी आले आहे, असं त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. पण सर सगळ्याच्या पलीकडे गेले होते. त्यांना असं शांत असलेलं बघून अस्वस्थ वाटलं. दहा-बारा वर्षांत असं पहिल्यांदाच होत होतं.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

दीड-दोन तासाने मी हॉस्पिटलमधून निघाले, तर गेट मध्येच सतीश भेटला. आम्ही पुन्हा सरांकडे गेलो. तोपर्यंत डॉक्टरांनी सर आजची रात्र काढणार नाहीत, असं निर्वाणीचं सांगितलं. आम्ही दोघंही थांबलो, आणि पंधरा मिनिटांतच सर गेले. पुढचे सगळे सोपस्कार होते... अगदी कमी काळात सरांचे मित्र, चाहते आणि हितचिंतक मोठ्या संख्येनं आले. सुनीतीकाकू आणि सरांच्या मुली बिल्वा आणि क्षिप्रा यांचा तर कडेलोटच झाला होता. नेहमीसारखे सर हॉस्पिटलमधून मृत्यूला हरवून विजयी योद्ध्यासारखे परत येतील, असं वाटलं होतं, पण या वेळी मृत्यू जिंकला. कदाचित या झोर्बाची तिकडेही गरज असेल. नियती वगैरे फार मी मानत नाही, पण मानण्याची इच्छा या निमित्तानं होते.

जैन सरांच्या जाण्यानं माझं-त्यांच्या नात्याचं लौकिकार्थानं पर्व संपलं. जगण्याच्या धबडग्यात रोज त्यांची आठवण येतेच असं नाही, जगण्याचा वेग त्या सोनेरी पावलांनी येणाऱ्या आठवणींसाठी तितकीशी उसंतही देत नाही. मध्येच मोबाईलच्या ‘फेवरिट प्लेलिस्ट’मधून ट्रेनमधून ऑफिसला जाता-येता मन्सूरांचा बिभास ऐकायला येतो, आणि तो थेट सरांपर्यंत घेऊन जातो. डाेळ्यांत नकळत अश्रू जमा होतात.

पहिल्या पावसाची सर येते आणि हातात मोबाईल असतो, तरी मी ब्लँक होते. काँटॅक्टसमधला ‘अशाेक जैन’ या नावानं अजूनही सेव्ह असणारा नंबर पुढ्यात येतो. पावसाची सर नेहमीसारखा निरागस आनंद देते, पण तो उत्कटतेनं वाटून घेणारा माणूस आता उरलेला नसतो. काही आसुसून कळवावं, असं माणूस आयुष्यात असणं म्हणजे काय असतं, हे सर गेल्यावर उमजतं आहे. आयुष्य सगळ्यांनी भरलेलं आहे, असं वाटत असताना सगळं रितं रितं होतं आणि असण्या-नसण्याच्या सगळ्या जाणीव हिंदोळ्यावर मन कसनुसं होतं. ट्रेनच्या खिडकीच्या काचेवर जमलेले पाण्याचे थेंब त्यापल्याडचं दिसणं झाकोळतात. पुन्हा ‘प्ले लिस्ट’वरचा मल्हार कानात येण्याचा प्रयत्न करतो, पण मन त्यात गुंतत नाही .

आताशा सगळ्या उद्विग्नतेच्या क्षणांत सर आणि झाेर्बा ‘तो’ प्रसिद्ध ‘झाेर्बा डान्स’ करत समोर येतात आणि मनाला जगण्याविषयी पुन्हा पुन्हा वाटणाऱ्या आसक्तीच्या मार्गानं घेऊन जातात.

सर, तुमच्यातला झोर्बा या शुष्क होत जाणाऱ्या माळरानातील हिरवी फांदी असतो माझ्यासाठी. तुम्हीही शेवटी झाेर्बा म्हणतो तसंच तर केलंत. ‘You have your brush, you have your colours, you paint your paradise, then in you go.’

तुम्ही जगण्याचं ज्ञानच नाही, तर भानदेखील दिलंत.

..................................................................................................................................................................          

लेखिका अंजली अंबेकर चित्रपट समीक्षक, साहित्य अभ्यासक आहेत.

anjaliambekar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......