अजूनकाही
‘भारतीय साहित्याचे निर्माते’ या साहित्य अकादमीच्या पुस्तकमालिकेत आजवर अनेक लेखक, विचारवंत यांची छोटेखानी चरित्रं प्रकाशित झाली आहेत. याच मालिकेत ‘बाबासाहेब आंबेडकर’ हे के. राघवेंद्र राव यांचं इंग्रजीत चरित्र प्रकाशित झालं. नुकताच त्याचा मराठी अनुवाद जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील इंग्रजी विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. मुक्ता महाजन यांनी केला आहे.
आंबेडकरांचे विचार, आयुष्य याबाबत परिचयात्मक लिखाण करून त्यांची संक्षिप्त ओळख करून देणे, हा लेखकाचा हेतू आहे. आपल्या राष्ट्रीय जीवनातल्या विविध क्षेत्रांतल्या आंबेडकरांच्या योगदानाचे विश्लेषण आणि मूल्यमापन करण्याचा हेतू आहे, असे लेखक प्रास्ताविकात सांगतो. तो या ९० पानी छोटेखानी पुस्तकातून साध्य झाला आहे, असे म्हणता येते.
यात पुस्तकात ‘जीवन आणि काळ’, ‘सामाजिक सिद्धान्त’, ‘राजकीय आणि कायदेविषयक सिद्धान्त’, ‘आर्थिक विचार’, ‘धर्म आणि संस्कृती’, ‘एक अपूर्ण क्रांती’ आणि ‘आंबेडकरांची गद्य शैली’, अशी सात प्रकरणं आहेत. त्यांतून आंबेडकरांचं आयुष्य, शिक्षण, त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध केलेला संघर्ष, आजही समाजाला मार्गदर्शक ठरणारे आर्थिक, सामाजिक, ऐतिहासिक, कायदेविषयक, सांस्कृतिक अशा अनेकविध विषयांवरचं त्यांचं सखोल लेखन, यांबाबत माहिती मिळते.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला आंबेडकरांचा जन्म झाला, तेव्हा भारतातल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि पर्यायाने सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये घुसळण होत होती. त्यात आमूलाग्र बदल होत होते. आंबेडकर समजावून घ्यायचे असतील, तर त्यांच्या जन्मकाळाची आणि वाढीच्या वयाची, पार्श्वभूमी जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण, त्यानंतरचे परदेशात घेतलेले उच्च शिक्षण, त्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष, त्यांना बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड आणि कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेले सक्रीय प्रोत्साहन, याचा सविस्तर तपशील येतो.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
बॅरिस्टर होऊन परत आल्यावरदेखील अस्पृश्य म्हणून त्यांना मिळणारी मानहानीकारक वागणूक आणि त्या काळात एस.एम. जोशी, बी.जी. मोडक, टी.ए. खेर यांच्यासारख्या काही लोकांनी आंबेडकरांवर खटले सोपवून त्यांना केलेले सहकार्य, या सगळ्या घटनाक्रमांतून आंबेडकर मिळेल तेथून मदत घेत अस्पृश्यांना गर्तेतून बाहेर काढण्यासाठी झटणारा लोकनेता म्हणून घडत गेलेले दिसतात.
अस्पृश्यांचा नेता म्हणून प्रस्थापित झाल्यावर अस्पृश्यांसाठी आंबेडकरांनी केलेली स्वतंत्र मतदारसंघांची मागणी, आणि त्यानंतर गांधीजींशी मोठा संघर्ष केल्यावर ‘पुणे करारा’ने अस्पृश्यांसाठी मान्य केलेली राखीव मतदारसंघांची कल्पना याबाबत, तसेच हिंदू धर्म सोडण्याचा त्यांचा विचार कसा क्रमश: बळावत गेला, आणि बौद्ध धर्म स्वीकाराची संपूर्ण वैचारिक घुसळण आणि त्यासाठी समाजात त्यांनी निर्माण केलेली पार्श्वभूमी यांचे विवेचन पहिल्या ‘जीवन आणि काळ’ या प्रकरणात केले आहे.
‘सामाजिक सिद्धांत’ या प्रकरणात आंबेडकरांच्या समाजशास्त्रीय सिद्धान्तांचे विश्लेषण केले आहे. आंबेडकरांच्या मते समाज म्हणजे अशी व्यवस्था, जिच्यात सुसंबद्ध पद्धतीने अनेक घटक, समानता आणि सामूहिकता संतुलित असलेल्या एकात्मतेच्या तत्त्वावर एकत्रित असतात. त्यांच्या मते ही, पारंपारिकतेकडून आधुनिकतेकडे उत्क्रांत होत जाणारी व्यवस्था होती. जातींचा उदय, उदयाची कारणमीमांसा आणि तिचे संरचनात्मक, कार्यात्मक स्वरूप याबाबत आंबेडकरांनी विस्तृत विवेचन केले आहे.
जातिव्यवस्थेच्या समर्थकांनी पुढे केलेल्या मुद्द्यांचा आंबेडकरांनी केलेला प्रतिवाद, गांधीजींशी हिंदू धर्माबाबत त्यांचा गंभीरपणे झालेला वाद अथवा सखोल चर्चा ‘द अनटचेबल्स’ आणि ‘हू वेअर द शूद्राज’ या त्यांच्या दोन महत्त्वपूर्ण समाजशास्त्रीय लेखनाची प्रक्रिया याबाबत माहिती देऊन, पुढे आंबेडकरांचा समाजशास्त्रीय अभ्यास, भारतीय समाज का आणि कसा श्रेणीरचनेचा, अन्याय्य, विस्कळीत आणि शोषणव्यवस्था म्हणून उत्क्रांत झाला, याचे विवेचन केले आहे. याच प्रकरणात लेखकाने आंबेडकरांच्या सामाजिक सिद्धांतातील अंतर्विरोधांचेही विश्लेषण केले आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
‘राजकीय आणि कायदेविषयक सिद्धांत’ या प्रकरणात आंबेडकरांच्या राजकीय आणि कायदेविषयक सिद्धांतांमध्ये अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ आणि ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स’सारख्या नामांकित, उदारमतवादी पाश्चात्य संस्थांनी आंबेडकरांच्यात रुजवलेल्या वैचारिक आणि सैद्धांतिक उदारमतवादाचा कसा प्रभाव आहे, याची चर्चा केली आहे. त्यांनी आत्मसात केलेला उदारमतवाद आणि त्यांनी जाणलेले आणि अनुभवलेले भारतीय सामाजिक आणि राजकीय वास्तव यांत विरोधाभास होता, हेही लेखक इथे नमूद करतो.
यानंतर आंबेडकर हे केवळ एक सिद्धान्तकार नव्हते, तर ते व्यावहारिक मुत्सद्दी आणि कुशल घटनाकारसुद्धा होते, असे नमूद करून त्यांच्या राजकीय विचारांचा संक्षिप्त लेखाजोखा घेतला आहे.
आंबेडकर मूलत: अर्थशास्त्रज्ञ असले तरी त्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानावर त्यांचे कायदेविषयक सिद्धान्त आणि व्यवहार, राजकीय सिद्धान्त व व्यवहार आणि सामाजिक, सांस्कृतिक तत्त्वज्ञान व विचारांनी कशी मात केली आहे, हे ‘आर्थिक विचार’ या प्रकरणात मांडले आहे.
‘धर्म आणि संस्कृती’ या प्रकरणात धर्म आणि संस्कृती याबाबतच्या आंबेडकरांच्या विचारांचा वेध घेऊन ऐतिहासिकदृष्ट्या आकाराला आलेल्या आणि प्रत्यक्षात असलेल्या धर्म आणि संस्कृतीच्या विशिष्ट स्वरूपाबाबत आंबेडकरांच्या विचारांचे तपशीलवार विवेचन केले आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
आंबेडकर आयुष्यभर एका क्रांतीचा पाठपुरावा करत होते. त्यांना अभिप्रेत असलेली क्रांतीची वैशिष्ट्ये जाणून घेतानाच, त्यांचे समकालीन असलेले गांधीजी, नेहरू आणि भारतीय साम्यवादी यांच्यासुद्धा संपूर्ण क्रांतीच्या कल्पना होत्या. या सगळ्याच क्रांती कल्पनांची माहिती ‘एक अपूर्ण क्रांती’ या प्रकरणात दिली आहे.
लेखक म्हणून आंबेडकरांच्या लेखनकार्याचा आपल्या व्याप्तीत समावेश न करणारी साहित्याची कोणतीही व्याख्या अयोग्य, संकुचित आणि ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय मर्यादित असेल, अशा शब्दांत लेखकाने ‘आंबेडकरांची गद्य शैली’ या प्रकरणात त्यांच्या लेखनशैलीचे कौतुक केले आहे.
आंबेडकर का मोठे होते, हे समजावून घेण्यासाठी हे छोटेसे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल. मूळ पुस्तकाशी इमान राखून भाषांतर केले असल्याने ते सरस उतरले आहे.
‘बाबासाहेब आंबेडकर’ – के. राघवेंद्र राव, मराठी अनुवाद - प्रा. डॉ. मुक्ता महाजन
साहित्य अकादमी, दिल्ली
पाने – ९० | मूल्य – ५० रुपये.
.................................................................................................................................................................
नितीन साळुंखे
salunkheneetin@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment