अजूनकाही
कौशिकी चक्रवर्तीचं एका मैफलीत ‘याद पिया की आए’ ऐकून एक बुजुर्ग गायक-गुरू उदगारले – “(बडे) गुलाम अलींपेक्षाही चांगलं गाइली!” खाजगीतल्या या विधानाची खाजगीत खूप चर्चा झाली. कौशिकी बेफाट गाते, पण ‘कुठे बडे गुलाम अली खानसाहेब आणि कुठे ही (कालची) कौशिकी?’ असाच सर्व चर्चेचा साधारण सूर होता. बाय द वे, कौशिकी चक्रवर्ती हे नाव आपण ऐकलंच असेल. यू ट्यूबवर तिच्या गायनाचे काही व्हिडिओज पाहिले असतील आणि बडे गुलाम अली खानसाहेब? विशीतल्या लता मंगेशकरला ‘कंबख्त, कुठे बेसूर म्हणून होत नाही’ अशी दाद देणारे…‘मुघले आझम’ चित्रपटासाठी प्रचंड मोबदला घेऊन दोन गाणी गाणारे… त्या काळात सर्वांना वेड लावणारे रगेल गायक. तुम्ही त्यांचेही ऑडिओ-व्हिडिओ ऐकले असणारच. (आणि ऐकले नसले तर हा लेख वाचायचा सोडा आणि ऐका!)
आजकालची मुलं जबरदस्त ‘तयार’ असतात, या गोष्टीचा सर्व बुजुर्ग निर्वाळा देतील. ‘तयारी’च्या बाबतीत शास्त्रीय संगीत काळाबरोबर पुढे जातंय. पौगंडावस्थेत, विशीत अनेक गायक-वादक युवक-युवती परिपूर्ण म्हणता येईल इतके ‘तयार’ असतात. आणि त्यांची ही संख्या काही लहान नाही. बरं मग? कुठे तरी आन-ताण पडे? कुठे बरं? अहो असं काय करताय? गळ्याची तयारी म्हणजे गाणं नव्हे! बरोबर आहे! गाणं पुढे जातंय का? संगीत अधिक कलात्मक बनत जाणार का? अनेकांना या प्रश्नांची मोठी चिंता वाटते. आपण बोलीभाषेत कला-कौशल्य असा जोडशब्द वापरतो आणि दोहोंत फरक कल्पितात. विश्लेषणाच्या सोयीसाठी तरी कला वेगळी आणि कौशल्य वेगळं असं मानलं जातं. कौशल्य (Craft) हे साधन तर कला (Art) हे साध्य! केवळ कुशल असेल तो कारागीर ठरतो, कलाकार नाही! भारतीय शास्त्रीय संगीतात कारागिरांची फौज उभी आहे. हे सर्व कौशल्य कलेत परिवर्तित होईल का आणि मग ही संगीतकला रसिकांच्या आस्वादाला येईल का, असे बरेच प्रश्न आहेत.
गेल्या पंधरा-वीस वर्षांत संगीतात कौशल्यवृद्धी चांगली झाली आहे. आणि एकूण कलही कौशल्यवृद्धीकडेच आहे. मधल्या वयाचे आणि बुजुर्ग असे जे कलाकार आहेत, त्यांनी रचलेल्या नव्या रचना अधिक तर कौशल्याचा पाठपुरावा करतात असं दिसतं. पूर्वी ‘आडा चौताल’ या ‘आड’वळणाच्या तालात काही रचना उपलब्ध होत्या आणि त्यांची गणना दुर्मीळ ठेवणीतल्या अशा प्रकारात होत असे. आता दर दोन-तीन मैफलींमागे एक तरी बंदिश ‘आडा-चौताला’त असते. वाद्यसंगीतात तर रूढ-प्रचलित सम (की पूर्ण) मात्रा संख्यांचे तालचे आता दुर्मीळ वाटू लागले आहेत. नऊ किंवा अकरा मात्रांच्या बंदिशी तर सर्रास ऐकू येतात, पण साडेदहा, साडेनऊ मात्रा-सतारीत आणि क्वचित गाण्यातसुद्धा ऐकू येऊ लागल्या आहेत. तरुण सतारवादकांची संख्या लक्षणीय आहे. आणि त्यांचं वाद्यावरील प्रभुत्व वाखाणण्यासारखं आहे. सगळेच जण विजेच्या गतीनं हात चालवतात, उत्तम मींड काम करतात. तालाबरोबर अवघड दोन हात लीलया करतात. तबलावादनात तर सगळेच उस्तादी मार्गावर आहेत. एकूण तबलावादनातच लय-तालाचं बिकट काम करण्याकडे सर्वांचा ओढा आहे.
मध्यंतरी श्रीरंग प्रतिष्ठान नावाच्या एका संस्थेनं एक परिसंवाद आयोजित केला होता. हे प्रतिष्ठान गेली पंचवीसेक वर्षं नित्यनियमानं, प्रामुख्यानं नवोदित गुणवान मेहनती कलाकारांच्या मैफली आयोजित करत आलं आहे. या प्रतिष्ठानचं वैशिष्ट्य हे की, त्यांच्या प्रत्येक मैफलीत निदान एक तबला एकलवादन सादर होतं. अशा या प्रतिष्ठाननं ‘आजचा तबला गणिताकडे अधिक झुकला आहे का?’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता.
सांगण्याचा मुद्दा हा की, साधं-सरळ काही वाजवण्यापेक्षा अवघड, पेचदार, दुर्गम असं काही वाजवण्याचं आव्हान आज तरुणांना स्वीकारावंसं वाटतं. या कौशल्याकडच्या झुकावाचा अन्वय कसा लावायचा? पहिला निष्कर्ष असा निघतो की, कौशल्य संपादनाला वातावरण अनुकूल आहे. अनेक माध्यमांतून अनुकरणीय कुशल संगीत प्रस्तुती विपुल ऐकायला मिळते. संगीत शिक्षक, संगीत वर्ग, गुरू, गुरूकुल यांची फार कमतरता नाही. एका गुरूकडे शिकत असताना अन्यत्र काय उपलब्ध आहे, हे सहज पाहता येण्यासारखं आहे.
सधन, सुसंस्कृत घरातली मुलं संगीत शिकतातच असं नव्हे, तर संगीतात करिअर करायला निघत आहेत. गुरूची सेवा करण्यापेक्षा (किंवा करण्याच्या वेळात) मेहनत करताहेत. दुसरी गोष्ट म्हणजे गुरू आपल्या शिष्यांच्या नैपुण्यसंपादनाविषयी जागृत आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे याही क्षेत्रात स्पर्धा आहे आणि स्पर्धेत तग धरण्यासाठी कौशल्य\नैपुण्य ही अधिक भरवशाची गोष्ट आहे. या सर्वांपेक्षा वेगळा मुद्दा म्हणजे बाल-किशोर-युवा वयात कौशल्याचं एक अप्रूप असतं. आपल्याला एखादी गोष्ट जमते आहे, याचाच मोठा आनंद असतो आणि हा आनंद अधिक मेहनतीला प्रवृत्त करतो.
आपल्या एकूण संगीत व्यवहाराचं\संगीत जगताचं वयही कोवळंच आहे! हे विधान अनेकांना पटणार नाही. छोटेखानी संगीत मैफलींत श्रोत्यांच सरासरी वय ६५ ते ७०च्या घरात असतं ही वस्तुस्थिती आहे. तरीही संगीत जगताचा विचार करता ज्येष्ठ श्रोते बहुसंख्य नाहीत. वयानं मोठे, पण नव्यानेच ऐकू लागलेल्या श्रोत्याचं या संदर्भातलं वय लहानच! या वयात करामती करायला आवडतात, करामतींनी भारावून जायला होतं, अंगात उत्साह संचारतो. आणखी एक महत्त्वाची मिती म्हणजे शास्त्रीय संगीताविषयीचा सर्वसामान्य सामाजिक समज. शास्त्रीय संगीत हे ध्वनि माध्यमातलं द्वंद्व युद्ध आहे, अशीच शास्त्रीय संगीताची ओळख जनतेला चित्रपट आणि नाटकांनी सतत करून दिली आहे. या सर्व परिस्थितीत कौशल्य म्हणजेच कला अशी व्याख्या होणं स्वाभाविक आहे. कौशल्य हे साधन, कौशल्य हेच साध्य! यांत्रिकपणा हा या व्याख्येचा अटळ परिपाक. तयारी दाखवणं हेच गायन-वादनाचं जणू उद्दिष्ट!
आता या नाण्याची दुसरी बाजू पाहू. माझ्या गळ्यात बिजलीची तान आहे किंवा हातात जबरदस्त ‘तिरकिट’ किंवा ‘धिर धिर’ आहे, तर मी ते दाखवायचं नाही का? कौशल्य न दाखवणं म्हणजे कला अशी व्याख्या आहे का? आम्ही जे तयारीनं गातो-वाजवतो ते तयारीशिवाय गाता-वाजवता येईल का? आमच्या प्रस्तुतीमधली तयारी आणि त्यामुळे आम्ही जे सौंदर्य उत्पन्न करू शकतो, त्याचा श्रोत्यांना आनंद मिळतच नाही का? सपक गाणं-वाजवणं म्हणजे दर्जेदार किंवा कलात्म का? तीन ताल तर सर्वांनाच येतो. आम्ही साडे नऊ मात्रांत खेळतो तर कौतुक नाही का? याही पुढे जाऊन मला अमूक एक गोष्ट सौंदर्याची\भावाची एक झलक जाणवली आहे, ती मला माझ्या कलाप्रस्तुतीतून अभिव्यक्त करायची आहे. बरं मग, आता त्यासाठी मी कोणती बरं साधनं वापरू? निर्मिती प्रक्रिया अशी बांधेसूद असते का हो? व्यक्त होत असताना काय आणि कसं हा भेदच मिटून जातो. कौशल्याशिवाय कला शक्य आहे का? कौशल्य ही कलेची आवश्यक अट आहे. (पण पुरेशी नाही.) कौशल्याला कमी लेखून चालणार नाही आणि त्यावर संतुष्टही राहून चालणार नाही.
तर कौशिकीचं ‘याद पिया आए’ त्या बुजुर्ग संगीतज्ञाला अधिक तयारीच वाटलं, पण म्हणून ते अधिक वरच्या दर्जाचं संगीत म्हणायचं का? सत्तर-पंचाहत्तर वर्षांपूर्वी जे गाणं-वाजवणं रूढ होतं, त्या गाण्या-वाजवण्याच्या संदर्भात, त्या काळाच्या संदर्भात बडे गुलाम अली यांचं ‘याद पिया की आए’ किंवा ‘आए ना बालम’ वेगळं होतं, नवं होतं. आज कौशिकी ते गाण सफाईनं म्हणते आहे, तिचं कौतुक जरूर आहे, पण तिला तिचं, आजचं ‘याद पिया की आए’ शोधावं लागेल, गावं लागेल…
लेखक अभिनव कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय (भाईंदर, मुंबई) इथं मुख्याध्यापक आहेत.
kdparanjape@gmail.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment