१.
आपले यापुढचे प्रत्येक पाऊल विज्ञान आणि तंत्रज्ञानाबरोबरच पडणार आहे. आणि संगणक- त्यातही गुगलशिवाय आपले पानही हलणार नाही, हे आपण सर्वांनी आता १०० टक्के मान्य केले आहे. या सगळ्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची एक्सप्रेस सुसाट निघाली आहे आणि त्यात सगळ्यांनाच बसायचे आहे, प्लॅटफॉर्मवर कोणालाच थांबायचे नाही.
कृत्रिम बुद्धिमत्ता लाभलेली यंत्रे आणि यंत्रमानव माणसालाच हद्दपार करतील की काय, अशी भीती व्यक्त होत असतानाच जेव्हा ३० नोव्हेंबरला ‘ओपन एआय’ (Open AI) या कंपनीने ‘चॅट जीपीटी’ (ChatGPT) हे भाषा वापरणारे कृत्रिम बुद्धिमत्ता असणारे साधन सर्वांसाठी खुले केले, तेव्हा मात्र ‘इंडस्ट्री ४.०’मधील ही सर्वांत क्रांतिकारक घटना आहे, असेच या क्षेत्रातील संबंधितांना वाटले. कृत्रिम बुद्धिमत्ता असलेला संगणक, आणि तोही कला व भाषा या क्षेत्रांत वापरला जाऊ शकतो, ही अचंबित करणारीच गोष्ट होती. पाच दिवसांतच या सॉफ्टवेअरने दहा लाख वापरकर्त्यांचा टप्पा पार केला.
काय आहे तरी काय हे चॅट जीपीटी? ‘ओपन एआय’ या सॅन फ्रान्सिस्को स्थित कंपनीने आणलेले हे एक चॅट बॉट आहे. म्हणजे माणसांबरोबर संवाद साधू शकेल, अशी संगणक प्रणाली. हा चॅट बॉट ‘जीपीटी ३.५’ या भाषेच्या प्रारूपावर (Language Generative Software) आधारित आहे, आणि लोकांशी संवाद साधण्याकरता तो तयार केला आहे. यातले जीपीटी म्हणजे ‘जनरेटिव्ह प्री ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर’. हे सॉफ्टवेअर ‘डीप लर्निंग’ या मशीन लर्निंग तंत्रावर आधारित आहे. यामध्ये अनेकविध थरांमध्ये प्रक्रिया होत असलेले, मेंदूत असलेल्या मज्जातंतूंसारखे कृत्रिम मज्जातंतूंचे जाळे (artificial neural network) वापरून माहितीसाठ्यामधून (data) उच्च प्रतीचे (एखादा माणूस देईल तसे) उत्तर मिळवले जाते.
या पद्धतीमध्ये संगणकाला जास्तीत जास्त माहिती पुरवून त्यातून उत्तर देण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. जितकी जास्त माहिती (data) पुरवू, तितके तो अधिकाधिक चांगले कार्य करू लागतो. माणसाच्या मेंदूसारखी याची शिकण्याची प्रक्रिया असते.
चॅट जीपीटी या चॅट बॉटला प्रचंड प्रमाणात माहिती पुरवण्यात आलेली आहे. प्रचंड म्हणजे किती, तर जीपीटी-३ला इंटरनेटवरील मजकूर, संकेतस्थळांवरील मजकूर, विकिपीडिया, शोधनिबंध, तसेच पुस्तकांमधील माहिती पुरवण्यात आली आहे. जवळजवळ ३०० अब्ज इंग्रजी शब्दांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. वाक्य लिहिताना पुढचा शब्द कोणता असेल, याचा अंदाज हे प्रारूप बांधू शकते.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
एरवी आपण प्रश्न विचारल्यानंतर गुगल आपल्याला वेगवेगळ्या संकेतस्थळांच्या लिंक्स देते. आपल्याला ती संकेतस्थळे बघून हवी, ती माहिती मिळवावी लागते, हव्या त्या शब्दात मांडावी लागते. परंतु आपण जर चॅट जीपीटीला प्रश्न विचारला, तर ते त्याला उपलब्ध असलेल्या माहितीच्या भांडारातून योग्य ती माहिती मिळवून योग्य त्या शब्दांमध्ये उत्तर तयार करून आपल्याला देते.
आपण चॅट जीपीटीला आणखी प्रश्न विचारून ते उत्तर (मजकूर) सुधारून घेऊ शकतो. उत्तरे देताना चॅट जीपीटी आधी दिलेली उत्तरे आणि विचारलेले प्रश्न लक्षात ठेवते, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. आणि ही सगळी प्रश्नोत्तरे अगदी दोन माणसे एकमेकांशी बोलतात, तशा प्रकारे घडतात. शिवाय ते आपल्या चुका मान्य करते, चुकीच्या प्रश्नांना आव्हान देते आणि अयोग्य प्रश्न नाकारते.
चॅट जीपीटी हे ‘इन्स्ट्रक्ट जीपीटी’ (InstructGPT) या आधीच्या प्रारूपाचे भावंड आहे. इन्स्ट्रक्ट जीपीटी या जानेवारी २०२२मध्ये प्रसिद्ध केलेल्या प्रारूपाला दिलेल्या सूचनांचे पालन करण्यास आणि तपशीलवार प्रतिसाद देण्यासाठी प्रशिक्षित केले होते. तर चॅट जीपीटीला ‘रीइन्फोर्समेंट लर्निंग फ्रॉम ह्यूमन फीडबॅक’ (RLHF) हे तंत्र वापरून प्रशिक्षित केले गेले आहे. प्रथम मानवी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रशिक्षकांनी या मॉडेलला संभाषणे पुरवली. या संभाषणांमध्ये त्यांनी दोन्ही बाजूंचे संवाद म्हटले - वापरकर्त्याचेसुद्धा आणि AI साहाय्यकाचेसुद्धा. हा नवीन संवादांचा डेटासेट इन्स्ट्रक्ट जीपीटीच्या डेटासेटसह मिसळण्यात आला, आणि त्याचे संवाद स्वरूपामध्ये रूपांतर केले गेले.
नंतर या संवादांमधली प्रारूपाने दिलेली काही उत्तरे निवडण्यात आली आणि AI प्रशिक्षकांना या उत्तरांना गुणक्रम देण्यास सांगण्यात आले. अशा तऱ्हेने गुणांकन देऊन चॅट जीपीटी प्रारूपाला आपण एखाद्याला बक्षीस देऊन देऊन जसे अधिकाधिक चांगले काम करवून घेतो तशी, योग्य तशी (म्हणजे एखादा माणूस देईल तशी) उत्तरे देण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आले. हे प्रारूप आधीच्या प्रारूपाच्या एक पाऊल पुढे आहे, कारण ते त्याला पुरवलेल्या माहितीमधून, विचारलेल्या प्रश्नांच्या स्वरूपातून सतत शिकत राहते आणि त्याप्रमाणे उत्तरे देऊ शकते.
हा झाला सगळा चॅट जीपीटी संदर्भातला तांत्रिक भाग. पण याला क्रांतिकारक घटना का म्हणावे, याबद्दल आत्तापर्यंत अनेक जणांनी सोदाहरण ट्वीट केले आहे. युट्युबवर तर असंख्य व्हिडिओ याबद्दल पाहायला मिळत आहेत.
चॅट जीपीटीच्या वैशिष्ट्यांमुळे अनेक कामे फटाफट होणार आहेत. या मॉडेलला तुम्ही तुमच्या फोनच्या होम स्क्रीनवर घेऊन, त्याचा वापर तुमच्या स्वीय साहाय्यकासारखा करू शकता. तो तुम्ही सांगाल त्याप्रमाणे तुमच्यासाठी मेल लिहील, निबंध लिहील, ब्लॉगपोस्ट लिहील, कथा लिहील, कविता लिहील, एवढेच काय प्रेमपत्रही लिहील. त्याला विचारलेत तर तो तुम्हाला तुमचे वजन कमी करण्यासाठी तुमची पूर्ण दैनंदिनीच तयार करून देईल. काय व्यायाम करायचा, कोणते पदार्थ खायचे, त्यांची पाककृती, त्यासाठी बाजारातून काय सामान आणावे लागेल, सगळे काही हा तुम्हाला सांगेल. इतकेच नाही तर नवीन आणि अभिनव मजकूर निर्माण करण्याच्या याच्या गुणामुळे याच्या साहाय्याने एखादे संकेतस्थळ (website) पूर्णपणे तयार करता येते. युट्युबवरील व्हिडिओ तयार करता येतात.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
चॅट जीपीटी वापरून कंटेंट रायटिंग, कॉपी रायटिंग, एखाद्या वस्तूचे वर्णन, भाषांतर अशी कामे खूपच लवकर केली जाऊ शकतात. मात्र त्यामुळे आपल्यासमोर बनावट संकेतस्थळे, बनावट व्हिडिओ येण्याचा मोठा धोका संभवतो.
याच ‘ओपन एआय’ कंपनीचं ‘डॅल-इ’ (Dalle E) नावाचे सॉफ्टवेअर आहे. ते त्याला दिलेल्या मजकुराचे चित्रात रूपांतर करते. ही दोन्ही मॉडेल वापरून एखादा सिनेमा तयार करणे यापुढे सोपे होईल. जर सिनेमाचे कथानक लिहिताना पटकथा लेखकाला पुढे काही नवीन सुचत नसेल, तर ते चॅट जीपीटी त्याला सुचवू शकेल. चॅट जीपीटी वापरून तयार केलेला एक सिनेमा युट्युबवर तुम्ही पाहू शकता-
या सिनेमाची कथा आणि स्टोरीबोर्ड म्हणजे प्रत्येक सीनमध्ये काय दिसायला हवे, कॅमेरा कुठून शूट करेल, पात्रांचे कपडे कसे असतील इ. सूचना देणे - हे काम चॅट जीपीटीने केले आहे. नट-नट्या खरी माणसे आहेत. पण त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे भूमिका केल्या आहेत. परंतु कदाचित येत्या काळात तुम्ही तुम्हाला हवे तसे आणि हव्या त्या नटसंचात एखादा सिनेमा सहजपणे बघू शकाल. म्हणजे जर तुम्हाला आयुष्यमान खुरानाला ‘आयर्न मॅन’ म्हणून बघायचे असेल, तर तेही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने शक्य होईल का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. म्हणजे एक प्रकारचे ‘पर्सनलाइज्ड मनोरंजन’च!
२.
चॅट जीपीटी हे भाषेचे प्रारूप असल्यामुळे त्याला प्रश्न विचारल्यानंतर त्याच्याकडे असलेल्या प्रचंड माहितीसाठ्यामधून हवी ती माहिती धुंडाळून, ती ते सुबकपणे आपल्यासमोर मांडते. त्यामुळे समाजमाध्यमे, ग्राहकांना सेवा पुरवणारी संकेतस्थळे, अशा त्वरित उत्तर हवे असलेल्या ठिकाणी चॅट जीपीटीचा वापर करून उत्तर पटकन देता येईल. एखाद्या विशिष्ट प्रकारे किंवा विशिष्ट समूहाशी संवाद साधण्याकरीता चॅट जीपीटीला प्रशिक्षित करता येऊ शकते.
ग्राहकांच्या तक्रारींना उत्तर देणे, त्यांना सेवा पुरवणे, उत्पादनांची माहिती देणे, ऑर्डर घेणे, अशा ठिकाणी भाषेच्या शैलीपेक्षा त्वरित उत्तराला महत्त्व असते. त्यामुळे चॅट जीपीटीपासून ग्राहकसेवा पुरवणारे नवीन चॅटबॉट किंवा अॅप तयार करता येतील. ते वापरल्यावर एखाद्या कंपनीच्या ग्राहकांच्या शंकांचे आणि तक्रारींचे निवारण होईल. किंवा असा चॅटबॉट त्या ग्राहकाला कंपनी पुरवत असलेल्या सेवांची किंवा उत्पादनांची माहिती देईल. ग्राहकाकडून मालाची ऑर्डरही घेईल.
परंतु आधीच्या भाषाप्रारूपांपेक्षा चॅट जीपीटीचे वेगळेपण असे की, ते मोठेमोठे उतारे असलेले निबंध किंवा लेख इतकेच काय पुस्तकसुद्धा लिहू शकते. यामुळे लेखन क्षेत्रामध्ये ब्लॉगलेखक चॅट जीपीटीच्या साहाय्याने शैलीदार लेखसुद्धा मिळवू शकतील. किंवा ते एखाद्या विषयावर चॅट जीपीटीला प्रश्न विचारून मजकूर मिळवतील आणि मग त्यांच्या शैलीप्रमाणे त्यात हवी तशी सुधारणा करतील. तसेच याचा उपयोग करून एका वेळी अनेक भाषांमध्ये काम करता येईल.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
मग चॅट जीपीटी पत्रकारांची जागा बळकावेल की काय? हाच प्रश्न जेव्हा शेरील काहला या लेखिकेने चॅट जीपीटीलाच विचारला तेव्हा उत्तर मिळाले, “मला क्षमा करा, पण मी इंटरनेटवरची माहिती धुंडाळू शकत नाही. तसेच आत्ता या वेळी जगात चालू असलेल्या घडामोडींबद्दल मी अनभिज्ञ आहे. माझे ज्ञान फक्त मला पुरवण्यात आलेल्या माहितीइतपत सीमित आहे.” यावरून असे दिसून येते की, चालू बातम्या किंवा घडामोडींबद्दल चॅट जीपीटी माहिती देऊ शकत नाही. आजचे हवामान ते सांगू शकणार नाही. म्हणजे लगेच आत्ता तरी हे प्रारूप पत्रकारांची जागा घेऊ शकणार नाही, पण घडून गेलेल्या घटनांवर भाष्य करणाऱ्या विश्लेषकांची जागा मात्र काही अंशी घेऊ शकेल.
वैयक्तिकरित्या चॅट जीपीटी तुमच्या स्वीय साहाय्यकाचे काम करू शकेल. तुमच्या व्यावसायिक गाठीभेठी ठरवणे, तुमच्या इ-मेल्स लिहिणे, तुमच्या सामाजिक माध्यमावरील मजकूर लिहिणे अशी कामे त्याच्याकरवी करता येतील. तुम्ही तुमची जितकी माहिती त्याला पुरवाल, तितकी वापरून त्याला असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे तो देत असलेल्या उत्तरांमध्ये सुधारणा होत जाईल.
चॅट जीपीटीचा उपयोग कोडिंग किंवा प्रोग्रामिंगकरता होऊ शकतो का, ही शक्यता आजमावून बघितली जाते आहे. पूर्णतः नवीन कोड किंवा अचूक कोड तयार करणे त्याला कदाचित शक्य होणार नाही, कारण आपण त्याला जे विचारू त्याचे उत्तर त्याला पुरवलेल्या माहितीमधूनच ते मिळवते. त्या माहितीचे कोणीतरी सतत नूतनीकरण केले तरच हे शक्य होईल. पण डीबगिंगसाठी म्हणजे संगणक आज्ञावलीमधील चुका शोधून त्या दुरुस्त करण्यासाठी हे उपयोगी ठरू शकेल. असे झाल्यास भारतातून दिल्या जाणाऱ्या अनेक माहिती तंत्रज्ञान सेवांना चांगलाच फटका बसेल.
शैक्षणिक क्षेत्रही याच्या वापराविना राहू शकणार नाही. याच्याबरोबर शिकताना प्रत्येक विषयातील जागतिक दर्जाचा तज्ञ आपल्या सोबत आहे असेच वाटत राहील. ‘अॅनाकोंडा’ ही जगातील माहितीशास्त्रातील कंपनी स्थापन करणारे आणि भौतिकशास्त्रज्ञ असलेले पीटर बँग चॅट जीपीटी वापरल्यानंतर म्हणतात, “आता आपण मुळातच शिक्षणाची संकल्पना नव्याने मांडू शकतो. महाविद्यालयांचे अस्तित्वच यापुढे संपुष्टात येईल.”
कल्पना करा की, तुमचे मूल चॅट जीपीटीला विचारून पुस्तकातले प्रश्न सोडवते आहे, दिलेले प्रकल्प फटाफट पूर्ण करते आहे आणि तुम्ही त्याला चॅट जीपीटी वापरायला बंदी घालता आहात. म्हणजे पूर्वी मुलांना ‘गाईड वापरू नकोस’ असे सांगितले जायचे तसेच की! आणि अमेरिकेत हे घडायला सुरुवात देखील झाली आहे. ‘न्यूयॉर्क सिटी स्कूल’ या शाळेने चॅट जीपीटीच्या संकेतस्थळाला शाळेच्या संगणकांवर, मोबाईल फोनवर आणि शाळेच्या आवारातील नेटवर्कवर बंदी घातली आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
यावर, ‘मोबाईलमुळे मुलांनी मैदानी खेळ बंद केलेच आहेत, मग आता चॅट जीपीटी वापरल्यावर मुलांची वाचनक्षमता, आकलनशक्ती कशी विकसित होणार?’ अशी भीती व्यक्त केली जाते आहे. परंतु चॅट जीपीटीचा उपयोग करून भाषा शिकण्यासाठी साधन (टूल किंवा अॅप) तयार करता येईल. यामध्ये विद्यार्थ्यांना त्या भाषेची वाचन, लेखन आणि बोलण्याची क्षमता शिकण्यासाठी सराव प्रश्न आणि कोडी दिलेली असतील. हे सराव प्रश्न आणि कोडी तयार करण्यासाठी चॅट जीपीटी उपयोगी पडेल. विद्यार्थ्यांना त्यांची भाषा क्षमता सुधारण्यात मदत करण्यासाठी हे टूल अभिप्राय आणि मार्गदर्शनदेखील देऊ शकते. त्याचप्रमाणे संशोधनाच्या क्षेत्रात चॅट जीपीटीचा वापर केल्यामुळे अनेक तासांचा वेळ वाचणार आहे. वर ते आपल्याला संशोधन पेपरसुद्धा लिहून देईल. कारण ते नुसतीच माहिती गोळा करत नाही, तर त्याबाबत विचार करून आपले सुसंगत मतही मांडते.
परंतु हा वापर भयावह आहे. कारण ते जे उत्तर देते, ते पूर्णतः नवीन असते. वाङ्मयचौर्य शोधणाऱ्या कोणत्याही सॉफ्टवेअरला यातली ‘साहित्यिक चोरी’ पकडणे जड जाईल.
आरोग्यसेवा पुरवणाऱ्या क्षेत्रामध्ये डॉक्टरची अपॉइंटमेंट घेणे, रुग्णाची प्राथमिक व वैद्यकीय माहिती घेणे आणि ती साठवणे, आजाराची लक्षणे नोंदवणे आणि ओळखणे, जुना आजार असलेल्या रुग्णाला माहिती पुरवणे, साहाय्य करणे इत्यादी कामे चॅट जीपीटीसारखा चॅटबॉट करू शकेल. डॉक्टर एका वेळी एकाच रुग्णाला तपासू शकतात. परंतु चॅट जीपीटी एका वेळी अनेक रुग्णांशी बोलू शकतो, त्यांची डॉक्टरांशी व्हिडिओमार्गे किंवा ई-मेलद्वारे गाठ घालून देऊ शकतो. तसेच हा वैद्यकीय साहाय्यक २४ तास उपलब्ध असल्यामुळे गंभीर स्थितीतील रुग्णाला तो त्वरीत मदत करू शकेल. त्याचप्रमाणे त्याचा रुग्णाशी सतत संपर्क असल्यामुळे त्यांची जवळीक निर्माण होईल.
वैद्यकीय क्षेत्रात नवीन औषधाचा रेणू शोधण्याची प्रक्रिया चॅट जीपीटी वापरून सुकर होणार आहे. आपल्या शरीरातील प्रथिने डझनावारी ते हजारो अमिनो आम्लांची बनलेली असतात आणि प्रत्येक प्रथिनामध्ये अमिनो आम्लांचा एक ठरावीक अनुक्रम असतो. ही अमिनो आम्ले इंग्रजी अक्षरांनी दर्शवली जातात. चॅट जीपीटी हे एक भाषेचे मॉडेल असल्यामुळे ते ही प्रथिनांची भाषा सहज शिकू शकेल. यामुळे अमिनो आम्लांची कोणती मिश्रणे (combinations) एखादा उपचारात्मक गुणधर्म दाखवतील याचा अंदाज चॅट जीपीटी करू शकेल. म्हणजे ते त्याप्रमाणे प्रथिनातील अक्षरांचा अनुक्रम सांगेल. अशा रेणूपासून पुढे एखाद्या औषधाचा रेणू तयार करता येईल. यामुळे औषधाचा शोध लावण्याची प्रक्रिया सुकर होईल आणि ज्या प्रक्रियेला वर्षानुवर्षे लागतात ती काही महिन्यांत पूर्ण होऊ लागेल.
परंतु चॅट जीपीटीलाही काही मर्यादा आहेत. हे भाषा प्रारूप त्याला पुरवलेल्या माहितीनुसार काम करत असल्यामुळे त्याला जेवढी माहिती दिलेली आहे, त्याच्या बाहेरील प्रश्नाला ते उत्तर देऊ शकत नाही. सध्या चॅट जीपीटीला २०२१ सालाच्या आधीची माहिती पुरवण्यात आल्यामुळे यानंतरच्या घटनांबद्दल ते आपल्याला उत्तर देऊ शकणार नाही. शिवाय ते कधीकधी चुकीची उत्तरेसुद्धा देते.
त्यातून हे प्रारूप त्याच्या उत्तरांतून भेदभाव दर्शवते, कारण त्याला पुरवलेला माहितीसाठा भेदभावमुक्त नाही. आणि अर्थातच खर्चाचा प्रश्न आहेच. सध्या तरी ते मोफत असले तरी चॅट जीपीटी वापरण्याकरता किती खर्च येईल आणि ते व्यावसायिक तत्त्वावर केव्हा खुले होईल, या प्रश्नांची उत्तरे अजून मिळायची आहेत.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
हे सगळे ऐकून, वाचून असे वाटते की मग अनेक संगणकतज्ज्ञ, प्रोग्रामर, लेखक, कवी, चित्रकार, पत्रकार यांचे काय होणार? यांच्या नोकऱ्या जाणार का? शिक्षणक्षेत्रात यामुळे काय उलथापालथ होऊ शकेल? माणसाचे कामच जर हे प्रारूप करू लागले, तर मग मानवी सर्जनशीलतेचे काय होणार? कविता म्हणजे नुसते शब्द नसतात, तर त्यात मानवी भावनांचे प्रतिबिंब असते. ते कसे काय या चॅट जीपीटीने केलेल्या कवितेत दिसेल? डॅल-इ आपल्याला हवे तसे चित्र काढून देईलही, पण मग चित्रकाराच्या रंग भावनांचे काय? त्याने आपले चित्र विकण्यासाठी या संगणक प्रारूपाशी स्पर्धा करायची का? आणि सतत हे प्रारूप वापरले तर आपल्या वाचनक्षमता, आकलनशक्ती, बऱ्या-वाईटाचा निर्णय घेण्याची क्षमता, नवीन शब्द, नवीन कल्पना प्रसवणारी मानवी प्रतिभा यांचे काय होईल? हे सर्व लयाला जाईल का? एक ना अनेक. अशा असंख्य शंका आता सर्व थरांतून व्यक्त केल्या जात आहेत. अनेक लोकांनी तर आता गुगलचा अंत जवळ आला आहे, असे भाकीत केले आहे.
पण एक लक्षात घेतले पाहिजे की, चॅट जीपीटी त्याला पुरवलेल्या माहितीवरच अवलंबून आहे. आत्ता तरी ते इंटरनेटला जोडलेले नाही. पण ते एक कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले संगणकीय प्रारूप असल्यामुळे ते आपण विचारलेल्या प्रश्नांतूनच पटापट शिकते आहे आणि त्याच्या उत्तरांमध्ये सुधारणा करते आहे. परंतु मानवी मेंदूच्या प्रतिभेचा आविष्कार ते दाखवू शकेल का? अमूर्त कल्पना प्रत्यक्षात आणण्याची मानवी क्षमता कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या या यंत्रामध्ये येईल का? भावनांना शब्दरूप, चित्ररूप देणे या यंत्रांना जमेल का? या सगळ्या प्रश्नांचे उत्तर येता काळच देणार आहे. तोपर्यंत आपण हे नवीन प्रारूप वापरून तरी बघू कसे आहे ते.
चॅट जीपीटीसाठी क्लिक करा – https://chat.openai.com
‘शैक्षणिक संदर्भ’ या द्वैमासिकाच्या डिसेंबर २०२२ – जानेवारी २०२३ या अंकातून पूर्वपरवानगीसह साभार.
.................................................................................................................................................................
हेही पाहावाचाअनुभवा
चॅट जीपीटी, कृत्रिम बुद्धिमत्ता, आभासी वास्तवता आणि ‘निरुपयोगी वर्गा’चा उदय
‘चौथी औद्योगिक क्रांती’ : आव्हानांचा पूर्णपणे नव्याने विचार करण्याची गरज
.................................................................................................................................................................
लेखिका संजीवनी आफळे ‘शैक्षणिक संदर्भ’ गटात कायर्यऱ्थ आहेत.
saaphale@rediffmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment