भाजपच्या डिसेंबर अखेरीस झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ‘मुस्लीम समुदायातील पसमांदा मुस्लीम घटकाला आपलेसे करा. तुम्ही मतांची चिंता न करता पसमांदा मुस्लीम, बोहरा समाजातील लोक आणि सुशिक्षित मुस्लिमांना भेटा” असे सांगितले. त्याचबरोबर “२०२४मध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला अजून ४०० दिवस बाकी आहेत. तेव्हा या दिवसांचा या कामासाठी उपयोग करा” असेही सुचवले आहे.
भारतात कोष्टी, खाटीक, तेली, धोबी, कासार इत्यादींचा मागास समूहांमध्ये समावेश होतो. अशा मागासलेल्या जनजातींचा समुदाय मोदी यांच्या केंद्रस्थानी पूर्वीपासून आहे, परंतु पक्षाच्या गेल्या दोन कार्यकारिणीत - डिसेंबर २०२२मध्ये हैदराबादेत आणि जानेवारी २०२३मध्ये दिल्लीत - त्यांनी त्यांचा विशेष उल्लेख केला आहे.
पंतप्रधान मोदींचे हे वक्तव्य थोडेसे बाजूला ठेवले, तरी रा.स्वं.संघ व भाजपच्या सर्व तथाकथित हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांचा एकूणच मुस्लीम समुदायावर इतका राग का आहे? ते या समुदायातील लोकांना ‘दुय्यम नागरिक’ का समजतात? दिसते ते असे की, खऱ्या अर्थाने हिंदू धर्माला, त्याचा मूळ पाया असलेल्या जातीव्यवस्थेला ज्या धर्मांनी तडाखा दिला, त्यात पूर्वीपासून मुस्लीम धर्माने फार मोठी भूमिका बजावली आहे. भारतावर जवळपास चौदाशे वर्षे वेगवेगळ्या वंशाच्या, पण मुस्लीम राजांनी राज्य केले.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
यामुळे त्यांचा मुस्लीम धर्मावर सर्वांत जास्त राग आहे. मुस्लीम राज्यकर्त्यानंतर इंग्रज भारतात आले, तेव्हा ख्रिश्चन धर्मानेसुद्धा येथील जातिव्यवस्थेला तडाखा देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी फक्त दीडशे वर्षेच राज्य केले. नंतर त्यांना चालते व्हावे लागले, पण मुस्लीम मात्र येथेच कायम राहिले आहेत. कारण त्यांनी याच मातीत स्वतःला झोकून दिले आणि धर्मांतरित झालेले मातीतले लोक होते.
इंग्रजांच्या काळाचा फार परिणाम झाला नाही. त्यामुळे त्यांचा राग मुस्लीम धर्मियांवर जेवढ्या जास्त तीव्रतेने व्यक्त होतो, तेवढा ख्रिश्चन धर्मीय व इतर धर्मियांवर व्यक्त होत नाही. दुसरे असे की, मुस्लीम धर्मीयांत झालेले धर्मांतर ख्रिश्चन धर्मियांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात आहे.
बरे, त्या काळात हिंदू धर्मीयातील जातीव्यवस्थेने शोषित, पीडित व गांजलेल्या लोकांना जातीव्यवस्थेविरुद्ध संघर्ष करण्याचा एक उपाय म्हणून, दुसऱ्या धर्मात जाण्याशिवाय आणि त्या वेळेस मुस्लीम धर्माशिवाय दुसरा पर्यायही नव्हता. असो.
हे ‘पसमांदा मुस्लीम’ कोण आहेत, हे प्रथम आपण समजावून घेतले पाहिजे.
‘पसमांदा’ हा फारसी शब्द आहे. त्याचा अर्थ ‘मागे राहिलेले लोक’ असा होतो. म्हणजे जे मुस्लीम समाजातील इतर घटकांच्या तुलनेत प्रगतीच्या शर्यतीत मागे राहिले आहेत, त्यांना ‘पसमांदा’ म्हणतात. याचे एक कारण जातिव्यवस्था असल्याचे सांगितले जाते. ‘पसमांदा’ हा शब्द प्रथम ‘वर्ग’ या अर्थाने वापरला जात होता, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये तो मुस्लिमांमध्ये इतर मागास जाती, अनुसूचित जाती आणि जमातींसाठी वापरला जाऊ लागला आहे.
भारतात पहिल्यांदा ‘पसमांदा मुस्लीम’ हा शब्द अली अन्वर अन्सारी यांनी १९९८मध्ये वापरला. तेव्हा त्यांनी ‘पसमांदा मुस्लीम महाज’ नावाच्या संघटनेची स्थापना केली. भारतातील मागास, दलित आणि आदिवासी मुस्लीम हा प्रातिनिधिक शब्द वापरून मुस्लिमांमधील जातीच्या नावावर होणाऱ्या भेदभावाविरुद्ध लढा देणे, हा त्यांचा हेतू होता.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
पसमांदा मुस्लीम समाजाच्या लोकसंख्येबाबत निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही. कारण १९३१नंतर जातजनगणनेचे काम थांबले आहे, परंतु एकूण मुस्लीम लोकसंख्येच्या ८० ते ८५ टक्के पसमांदा मुस्लीम असू शकतात, असा एक अंदाज आहे. मंडल आयोगाने त्यांच्यातील किमान ८२ सामाजिक गट ओळखले होते. त्यांना ‘मागास मुस्लीम’ म्हणून वर्गीकृत केले होते. ‘नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन’ (NSSO) नुसार, मुस्लिमांमधील ओबीसी लोकसंख्या ४०.७ टक्के आहे, जी देशातील एकूण मागास समुदायाच्या १५.७ टक्के आहे.
मुस्लीम धर्मात जातीभेद नाही, परंतु भारतात हिंदू धर्माची लागण मुस्लीम धर्मालाही झाली आणि या धर्मातही जातीयतेने शिरकाव केला. हिंदू धर्मातून विविध कारणाने ज्या लोकांनी मुस्लीम धर्म स्वीकारला, त्यांनी आपल्याबरोबर त्यांच्या त्यांच्या जातीचे संस्कार, रूढी व परंपरा नेल्या. त्यामुळे भारतातील मुस्लीम अनौपचारिकपणे तीन श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत - अश्रफ, अजलाफ आणि अरजल.
‘अश्रफ समुदाय’ हा उच्चवर्णीय हिंदूंप्रमाणे मुस्लिमांमधील उच्चभ्रू समुदायांचे प्रतिनिधित्व करतो. त्यात सर्वसाधारणपणे भारताबाहेरून आलेले सैनिकी पेशातील मुस्लिमांचा जसा समावेश होतो, तसाच हिंदू धर्मियातील ब्राह्मणादी उच्च वर्णातील इनामदार, जहागीरदार, देशमुख इत्यादींसारख्या ज्या हिंदूधर्मिय लोकांनी मुस्लीम धर्म स्वीकारला आहे, त्यांचाही समावेश होतो. यामध्ये सय्यद, शेख, मुघल, पठाण, मुस्लीम राजपूत, तगा\त्यागी मुस्लीम, चौधरी मुस्लीम वा गौर मुस्लीम यांचा समावेश होतो.
याबाबत सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ इम्तियाज अहमद म्हणतात, “अश्रफ म्हणजे उच्च वर्ग, ज्यात असे लोक समाविष्ट आहेत, ज्यांचे पूर्वज अरब, इराण आणि अफगाणिस्तानशी संबंधित होते. यामध्ये उच्च जातीचे हिंदूदेखील आहेत आणि त्यांनी इस्लामचा स्वीकार केलेला आहे.” मुस्लीम समाजातील या जातींची तुलना हिंदूंच्या उच्च जातींशी केली जाते, ज्यात ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांचा समावेश होतो.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
अझीम प्रेमजी विद्यापीठातील समाजशास्त्राचे प्राध्यापक खालिद अनीस अन्सारी म्हणतात, “अश्रफ मुस्लीम हा फाळणीच्या वेळी पाकिस्तानात मोठ्या संख्येने स्थलांतरित झालेला आहे. त्यामुळे भारतातील मागासलेल्या मुस्लिमांची संख्या तुलनात्मकदृष्ट्या वाढली असण्याची शक्यता आहे.” ब्रिटिश सत्ता स्थापन होण्यापूर्वी मुस्लिमांच्या राजवटीत नोकरीपासून जमिनीपर्यंत सर्वच बाबतीत तथाकथित अश्रफांना (उच्चवर्णीयांना) प्राधान्य दिले जात होते.
हिंदू धर्मातील खालच्या जातीतून जे मुस्लीम धर्मात सामील झाले, असे धोबी, शिंपी, न्हावी, विणकर, तेली, अन्सारी, मन्सूरी, कासार, गुजर, बनकर, घोसी, कुरेशी, इद्रीसी, नाईक, फकीर, सैफी, अल्वी, सलमानी यांचा ‘अजलफ मुस्लिमां’मध्ये समावेश होतो. या हिंदू धर्मातील बहुतेक शूद्र समजल्या जाणाऱ्या आणि आता ओबीसी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जाती आहेत.
कुरेशी हे मांस व्यापारी आणि अन्सारी हे प्रामुख्याने कापड विणण्याच्या व्यवसायाशी संबंधित आहेत. हिंदूंमध्ये त्यांची तुलना उत्तर प्रदेशातील यादव, कोयरी, कुर्मी या जातींशी केली जाते.
ज्या दलित व अस्पृश्य समूहांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता, त्या महार, मातंग, चांभार अशा दलित व अस्पृश्य जातींचा समावेश ‘अरजल मुस्लिमां’मध्ये होतो. तसेच हलालखोर, हवारी, रज्जाक या जातींचा यात समावेश आहे. हिंदूंमध्ये सफाईचे काम करणाऱ्यांना हलालखोर आणि कपडे धुण्याचे काम करणाऱ्यांना मुस्लीम आणि हिंदू या दोन्ही समाजात ‘धोबी’च म्हणतात. प्रोफेसर तन्वीर फजल सांगतात की, ज्यांचा व्यवसाय हिंदूंमध्ये अनुसूचित जातीच्या लोकांचा होता असे लोक ‘अरजल’मध्ये येतात. अशा मुस्लीम जातींचे मागासलेपण आजही हिंदूंमधल्या तत्सम जातींइतकेच आहे.
अजलफांच्या तुलनेत अश्रफ आणि अरजल या जाती सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या मागासलेल्या आहेत. तेव्हा अश्रफ आणि अरजल समजल्या जाणाऱ्या मुस्लिमांचा या ‘पसमांदा मुस्लिमां’मध्ये समावेश होतो.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
पसमांदा मुस्लीम हे भारताचे मूळ रहिवासी आहेत. तसेच अजलफमध्ये धर्मांतरित झालेले हिंदू धर्मातील उच्च वर्णीय सरदार, इनामदार, जहागीरदार हे सुद्धा मूळ भारतातीलच आहेत.
‘द्विराष्ट्राचा सिद्धान्त’ मांडणाऱ्या वि. दा. सावरकर यांनी आणि रा.स्व.संघाच्या हेडगेवार, गोळवलकर गुरुजी अथवा बाळासाहेब देवरस अशा कुठल्याही सरसंघचालकांनी मुस्लिमांमध्ये भेदभाव केलेला नाही. त्यांच्या मते हे सर्व मुस्लीम सरसकट ‘हिंदू राष्ट्रवादा’च्या विरोधी आहेत आणि त्यांना ‘हिंदू राष्ट्रा’तील नागरिकत्वाचे कोणतेही हक्क असू नयेत. त्यांनी भारतात ‘दुय्यम नागरिक’ म्हणूनच राहावे. तसाच त्यांचा आजपर्यंतचा व्यवहार झाला आहे.
गुजरातमधील बिल्किस बानोही पसमांदा समाजाच्याच आहेत. त्यांच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपींना गुजरातमधील भाजप सरकारने अलीकडेच समिती नेमून चांगल्या वर्तणुकीची प्रशस्तीपत्रे बहाल करत पुढील शिक्षेतून माफी दिली. इतकेच नव्हे तर भाजपने बिल्किस बानोच्या बलात्कार्यांना आणि तिच्या कुटुंबाची हत्या करणार्यांना नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत तिकीट देऊन निवडूनही आणले आणि त्या बलात्काऱ्यांचा जाहीर सत्कारही केला.
जे मुस्लीम गो-मांस विकतात ते कसाई किंवा खाटीक व कुरेशी जातीचे लोक बहुतेक पूर्वाश्रमीचे हिंदू धर्मातील आहेत. तेही ‘पसमांदा मुस्लीम’च आहेत. कोणत्याही दंगलीमध्ये ज्यांच्या टपऱ्या, दुकाने, गॅरेजेस, जाळल्या जातात, ज्यांच्या फळाच्या अथवा भाजींच्या गाड्या उलटवल्या जातात, ते खालच्या समाजातीलच म्हणजे ‘पसमांदा मुस्लीम’च असतात. तसेच मुस्लिमांमधील हलालखोर, धोबी, मोची, भटियारा, गदेही अशा डझनभर समुदायांना सच्चर आणि रंगनाथ मिश्रा समितीने अनुसूचित जातीचा दर्जा देण्याची शिफारस केली होती, पण या शिफारशी मान्य करणार नसल्याचे सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्टपणे सांगितले आहे. भाजपने या लोकांच्या शिक्षणातील अथवा नोकरीतील आरक्षणाचा मुद्दा फेटाळून लावलेला आहे, हेही येथे ध्यानात ठेवले तर चांगलेच होईल.
थोडक्यात, पसमांदा मुस्लीम समुदायाबद्दल भाजपची ही अशी भूमिका आहे. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते या लोकांकडे जाऊन काय सांगतील? त्यांना कशा प्रकारे आपलेसे कसे करतील? काही विश्लेषक म्हणतात की, ‘‘पसमांदा म्हणवल्या जाणाऱ्या अजलफ आणि अरजल समाजाच्या मतदारांवर भाजपची नजर आहे.’, ‘मोदींना पसमांदा मुद्द्याचा वापर करून ‘पुढारलेले मुस्लीम’ आणि ‘मागास मुस्लीम’ अशी विभागणी करून राजकीय फायदा घ्यायचा आहे,’, असेही काही जण म्हणतात.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनात दोन बाबींचा उल्लेख दिसतो. एक - ‘त्यांच्या मतांची फिकीर न करता’. दोन- ‘२०२४च्या निवडणुकांना अजून ४०० दिवस बाकी आहेत, तेव्हा त्याचा उपयोग करा’. म्हणजे त्यांनी दोन्ही डगरीवर हात ठेवला आहे.
२०१४पासून झालेल्या विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकांतून मुस्लीम मतदारांची, त्यांच्या मताची अजिबात फिकीर न करता किंबहुना त्यांच्या विरोधात राहूनच मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपने निवडणुका जिंकलेल्या आहेत. त्यामुळे मुस्लिमांच्या मताची त्यांना गरज आहे, असे दिसत नाही. त्यांचे नागरिकत्वच त्यांना मान्य नसल्यामुळे ते आता तर मुस्लिमांना उमेदवारीसुद्धा देत नाहीत, हेही स्पष्ट झालेले आहे. नुकत्याच रामपूर येथे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आजम खान यांनी निवडून येऊ नये, यासाठी भाजपने पुष्कळ प्रयत्न केले होते. त्यामुळे तिथे आजपर्यंत कधी नव्हे इतक्या कमी टक्केवारीने मतदान झालेले आहे. मुस्लीम लोक लोकशाही प्रक्रियेचा भाग व्हावा, असे भाजपला वाटतच नाही.
अशी एकंदर स्थिती असताना मुस्लिमांची मतं आपल्याला मिळवीत, यासाठी मोदी असे प्रयत्न करत असतील, असे वाटत नाही. मग ते आपल्या कार्यकर्त्यांना ‘पसमांदा मुस्लिमां’कडे जाण्यासाठी का सांगत असावेत? त्याचे साधे उत्तर असे दिसते की, त्यांना मुस्लिमांमध्ये फाटाफूट घडवून आणायची आहे. यापूर्वीही त्यांनी तसे प्रयत्न करून पाहिले होते. त्यांनी मुस्लीम महिलांना वेगळे पाडण्याचा व त्यांची सहानुभूती आपणाला मिळवण्याचा सर्वांत मोठा प्रयत्न तीन तलाकच्या निमित्ताने करून पाहिला आहे, पण त्यात त्यांना यश आले नाही.
त्याचप्रमाणे शिया समुदायांना आपल्याकडे वळवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला होता. शिया समुदायांचे जे काही धार्मिक कार्यक्रम असतील, त्यात आपल्या कार्यकर्त्यांना भागीदारी करण्याचे सांगितले होते, परंतु त्यातही त्यांना पाहिजे तसे यश मिळाले नाही.
मुस्लिमामध्ये ‘मुस्लीम’ म्हणून एकत्व कायम आहे. तेव्हा त्यांच्यात फाटाफूट कशी पाडावी आणि त्यांचे नीती धैर्य कसे खच्ची करावे, यासाठीच बहुधा ते अशा शकली लढवत असावेत.
.................................................................................................................................................................
लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत.
bhimraobansod@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment