बहिणाबाईंनी माणसाच्या मनाबद्दल खूप छान म्हटलं आहे, ‘मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोरं!' सुखाकडे आपसूकच ओढलं जाणारं माणसाचं मन कितीही संयमी वृत्तीने आवरायचा प्रयत्न केला, तरी ते पुन्हा गुराढोरासारखं उभ्या पिकाकडे धाव घेतंच. अगदी तीच बेचैनीची अवस्था आजच्या किशोरवयीन तरुणांची झालीय. भारतात आजही कुटुंबसंस्था थोडीफार शाबूत असल्याने आणि पालकांनी मुलांवर काही बंधनं लादण्याची परंपरा चालूच ठेवल्यामुळे एकीकडे मुलांचे सगळे समवयीन मित्र पार्टी करत मौजमजा करत असताना या मुलांना मात्र मन मारून घरीच बसावं लागत असल्याचा जास्त त्रास होतो. किशोरवयीन तरुण मनाची सातत्याने कुतरओढ होत राहते. काही जण विवेकबुद्धीने मनाला आवर घालण्याचा कितीही प्रयत्न करत असले, तरी बाकीचे समवयीन मित्र थ्रीलचा अनुभव घेत असताना मी स्वत:ला आवरू कसं? जितकं जास्त मनाला दाबून ठेवावं तितकं जास्त ते वर उसळी घेत राहतं. ‘साला, ये दिल है की, मानताही नही’ किंवा ‘बत्तमीझ दिल, माने ना, माने ना’, अशी अवघड परिस्थिती होऊन बसते.
‘संयम ठेवला पाहिजे' हे बोलायला कितीही सोपं वाटलं, तरीही आचरणात आणायला अगदी कठीण! मित्राच्या मोबाईलवर सहज सेमी पोर्नो दृश्य पाहायला मिळत असतील, तरी त्याकडे दुर्लक्ष करण्याइतकं संत-महंतपणाचं ट्रेनिंग आपण काही मनाला दिलेलं नाहीय. अगदी नेत्रसुख मिळवण्याचे अनेक पर्यायी (सबस्टिट्युट) मार्ग मोबाईलवर, इंटरनेटवर आणि सिनिअर्सच्या अनुभवातून दिसत असतील, तर ते थ्रील कोणाला नको असतं?
‘आठवीच्या वर्गात आल्यावर वर्गातली आपल्याला आवडणारी मुलगी दुसऱ्या मुलाबरोबर शाळेच्या अंधाऱ्या कोपऱ्यात कबुतरगी करत असेल तर आपल्यालाबी वाटणारच ना की, आपुनपण असं लव्ह करावं! त्यात चुकलं काय?’
हिंदी चित्रपटामध्ये दिसलेल्या थ्रीलच्या शोधात गावाकडची मुलं मुंबई-पुणे-दिल्लीसारख्या शहरांमध्ये घरून पळून येतात. स्त्यावरच्या मुलांसोबत काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांचे अहवाल सांगतात की, रस्त्यावर राहावं लागलं तरी बेहत्तर, पण आई-वडलांच्या आणि शाळेच्या जाचापासून मुक्ती मिळवण्यासाठी मुलं शहरात पळून येतात. गरीब असो वा श्रीमंत, चहाच्या टपरीवरचा पोरगा असो की, मुंबईतल्या जुहूमधल्या बंगल्यात राहणारा आठवीतला पोरगा, चिमुकला का असेना, त्याला मोबाईल फोन हवाच. ‘मला पाहिजे म्हणजे आत्ताच पाहिजे ते मिळवण्यासाठी मी काहीही करेन. माझ्या वर्गातल्या सगळ्या (८० टक्के) मुलांकडे एखादी वस्तू असेल, तर मग मला का नाही!’ हा विचार या कोवळ्या मनांना अस्वस्थ करून जातो; बैचेन करतो.
मला आठवतंय, दोन वर्षांपूर्वी मुंबईत भांडूपमधील बैठ्या चाळीत राहणाऱ्या सातवीतल्या एका मुलीने आई-बाबांनी मोबाईल दिला नाही म्हणून त्यांच्याशी भांडून गळफास लावून आत्महत्या केली. ही अधीरता इतक्या टोकाला कशी जाऊ शकते? ‘मनात येताच इच्छेची पूर्तता (इन्स्टंट ग्रॅटीफिकेशन) झाली पाहिजे?', हे स्वभावाचं कोणतं टोक आहे? 'संयम' नावाची गोष्ट या पिढीला शिकवणं गरजेचं आहे, असं मुलांच्या समस्या हाताळणाऱ्या अनेक डॉक्टरांना आता वाटायला लागलंय. ‘वाटता क्षणी’ नव्हे, तर थोडा मागचा-पुढचा विचार करून जरा संयमाने आपल्या इच्छांची पूर्तता करून घेणं (डिलेड ग्रॅटीफिकेशन) आपण मुलांना शिकवायला हवं, असं आता डॉक्टरांना वाटायला लागलं आहे. आपण सगळेच प्रवाहपतितासारखे विवेकशून्यतेनं बाजारपेठी ‘भोगवादा’कडे वाहत जायला लागलो, तर मुलांचं आरोग्य आणि त्यांच्यात उद्भवणारे ‘मनो-शारीरिक’ आजार आपल्या हाताळणीपलीकडे जातील, असा निष्कर्ष दिल्लीतल्या एम्स रुग्णालयातल्या ‘डिपार्टमेंट ऑफ मेंटल हेल्थकेअर’मधल्या डॉ. समीर मल्होत्रा, आणि डॉ. प्रकाश कोठारी यांनी काढला आहे.
२०१० साली महिला व बालविकास मंत्रालयातर्फे लोकसभेत एक विधेयक मांडलं गेलं. ‘प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस बील २०१०’, असं त्याचं शीर्षक होतं. या विधेयकाचा आधार होता, मोठ्या प्रमाणावर होणारं किशोरवयीन मुलांचं लैंगिक शोषण, त्यांनी केलेले बलात्काराचे गुन्हे आणि दिल्लीतल्या, एम्स, फोर्टिस आणि मॅक्स या रुग्णालयांनी ग्रामीण, निमशहरी आणि शहरी भागातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या केसेसच्या आधारे नोंदवलेली धक्कादायक निरीक्षणं!
आपल्या देशातल्या सुमारे २ कोटी ५० लाख किशोरवयीन मुलांपैकी जवळपास ४५ टक्के मुलांनी आपल्या वयाच्या शारीरिक मर्यादा ओलांडून पलीकडचे अनुभव चाखलेले आहेत, असे त्या निरीक्षणातून आढळले आहे. १२ ते २२ वयोगटातील किशोरवयीन तरुणांचे, प्रौढांनी वयाच्या पंचविशीत घ्यावे असे सेक्स, दारू, ड्रग्ज अशा सर्व प्रकारचे उपभोग घेऊन झालेले असतात. आणि त्यातल्या निम्म्या मुलांना त्यांचे व्यसन लागलेले असते. आनंद किंवा थ्रील अनुभवणे वेगळे आणि व्यसनाधीन होणे वेगळे. दोन गोष्टी वेगळ्या असल्या तरी कधीतरी यातल्या सीमारेषा पुसट होत जातात आणि आपल्या आरोग्य खात्यात धोक्याची घंटा वाजू लागते.
सिक्रेट लाईफ ऑफ इंडियन टीनस् – इंडिया टुडे, २५ फेब्रुवारी २०११
२०११ साली ‘इंडिया टुडे’ या मासिकाने काही वादग्रस्त सिनेमांवरील सेन्सॉरशिपच्या निमित्ताने आणि बलात्काराच्या घटना डोळ्यासमोर ठेवून, दिल्ली आणि मुंबईतील कॉन्व्हेन्ट शाळांमध्ये मध्यमवर्गीय तसेच उच्चमध्यमवर्गीय परिस्थितीतून आलेल्या मुलांकडून गुप्त पद्धतीने एक प्रश्नावली भरून घेतली होती. त्या निरीक्षणानुसार पुढे आलेले किशोरवयीन मुलांचे ‘खाजगी जग’ हे इतके धक्कादायक होते की, मोठमोठे समाज विश्लेषक ते वाचून हैराण झालेले दिसतात. वयोमर्यादा घालणाऱ्या कायद्यातून अनेक पळवाटा काढून, पालकांना व शाळेच्या शिक्षकांना अगदी डॉक्टरांना देखील अंधारात ठेवून ४५ टक्के मुलं उपभोगाचे उत्कट आयुष्य जगत होती. मुली गर्भपात करून घेत होत्या, तर शहरी-नीमशहरी भागातील १७ टक्के मुले एसटीडीची म्हणजे लैंगिक गुप्त रोगांची शिकार झालेली होती.
दिल्लीतील सुप्रसिद्ध एम्स रुग्णालयाच्या समाजकल्याण खात्याने केलेल्या ग्रामीण भागातील सर्वेक्षणाचा अहवाल देखील हेच सांगतो की, गावागावातील आरोग्य केंद्रात नोंद झालेल्या सुमारे ४०० मुलांपैकी १५ ते २२ वयोगटातील जवळ जवळ २५ टक्के मुलांमध्ये एसटीडी म्हणजे (सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिज) लैंगिक संबंधांतून संक्रमित झालेले रोग आढळले. हे पाहिल्यावर आणि ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातून आलेल्या अहवालानुसार गुप्तरोगाची शिकार झालेल्या १२ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांचे उपचार कसे करावेत याविषयीचा अहवाल ‘इंडियन पेडियाट्रिक असोसिएशन’ने सरकारला आणि युनेस्को या जागतिक संस्थेला सादर केला.
हे झाले ग्रामीण भागाबद्दल तर शहरात कॉन्वेंट किंवा इंग्लिश मीडियम शाळांमध्ये तर परिस्थिती अगदी खूपच पुढे गेलेली दिसते. उच्चभ्रू किंवा मध्यमवर्गीय पालकांची मुले सर्व दृष्टीने मुक्त आयुष्य अनुभवतात. ४५ टक्के मुले दारू पितात, ६१ टक्के मुलीनी वयाच्या १५व्या वर्षीच सेक्सचा अनुभव घेतलेला आहे. अगदी शाळेच्या शौचालयापासून ते एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्यात कुठेही हा अनुभव घेतला जातो. मुंबईतल्या एका मुलीने तर सांगितले की, आमच्या शाळेत वार्षिकोत्सव चालू असताना कार्यक्रमाच्या वेळी रात्री काही अंधारे कोपरे अशा जोडप्यांनी आधीच राखून ठेवलेले असतात. इतर उत्सव, गरबा, रंगपंचमी किंवा शाळेचे वार्षिक उत्सव या काळात शारीरिक जवळीक, चुंबन, याखेरीज प्रत्यक्ष संभोग इथपर्यंत या अनुभवाचे स्वरूप असते.
इंडियन पेडियाट्रिक असोसिएशनचा किशोरवयीन मुलांच्या प्रजननविषयक आरोग्य (रीप्रॉडक्टीव्ह हेल्थ) विषयक अहवाल २००४ साली प्रसिद्ध झालेला आहे. तो वाचल्यावर लक्षांत येतं की, शहरंच काय पण ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रातून गोळा केलेली आकडेवारी असं सांगते की, १० ते १८ वयोगटातील मुलांमध्ये अशा शारीरिक-मानसिक व्याधी आढळल्या, ज्या पूर्वी २४-२५ पुढील वयोगटातील व्यक्तींमध्ये आढळत असत. या वयात सुरू झालेल्या आरोग्य समस्या २५ पुढील वयोगटापर्यंत खूप तीव्र झालेल्या असतात. या अहवालानुसार ४०० पैकी ९० टक्के मुलांनी सुरक्षित सेक्ससाठी निरोधक साधनांचा वापर केलेला आढळतो. तरीही अज्ञानाने अनेक अल्पवयीन मुली गरोदरदेखील राहतात. त्यामुळे ४८ टक्के किशोरवयीन (१५-१८ वयोगट) मुली गर्भपात करून घेतात. त्यातल्या २० टक्के मुली पालकांना कळू न देताच गर्भपात करून घेतात. हे सारं कायद्याच्या पळवाटा पाहून राजरोसपणे केलं जातं. अनेकांना किशोरवयातच दारू पिणं, हुक्का पार्लरमध्ये जाणं, इंजेक्शन तसंच नाकानं ओढायच्या ड्रग्जची सवय लागलेली असते. त्यातून त्यांना पोटातील आतड्यांचे आजार झाले आहेत. या निरीक्षणात पोटातल्या असह्य वेदनांनी बेजार झालेली २० टक्के मुलं आढळली. काहींचं अवयवांच्या हालचालीवरचं नियंत्रण हरवलेलं दिसलं. अशी आजारी पडलेली जवळपास ९० टक्के मुलं शाळेत जाणे टाळतात, ७६ टक्के मुलं वैफल्यग्रस्त होतात (क्लिनिकल डिप्रेशनमध्ये) जातात. डिप्रेशनमध्ये गेलेली मुलं आत्महत्येचा विचारही करू लागतात.
दिल्लीतील सुप्रसिद्ध श्रीराम हायस्कूलमध्ये एका नववीतल्या विद्यार्थ्याने असं सांगितलं की, त्याच्या वर्गातल्या ५० पैकी १० मुलांना आम्ही ‘चरसी’ म्हणून ओळखतो. कारण त्यांनी सर्व प्रकारच्या स्ट्राँग ड्रग्जचा खूप अनुभव घेतलेला आहे. नाकात तपकिरीसारखं ओढायचं ‘हर्बल’ ड्रग्ज तर काय वर्गात बसल्या बसल्याही हळूच नाकात ओढता येतात. त्यावेळी १५ वर्षांचा असलेला निखिल हा तर या क्षेत्रातला इतका एक्स्पर्ट आहे की, तो नेटवर कोणत्या साईटवर कोणत्या ड्रग्जची माहिती मिळेल आणि कोणत्या कोडवर्डने तो खरेदी करता येऊ शकतो हे सहज सांगू शकतो. आतातर निखिल ड्रग्जच्या तस्करांच्या जाळ्यात पुरता अडकला आहे. इतका की त्याने बाहेर पडायचा प्रयत्न केलाच तर जिवानिशी मारला जाईल
हे ऐकल्यावर असं वाटायला लागतं की, डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी ‘गद्धेपंचविशी’ या पुस्तकात लिहिलेले अनुभव\विचार असोत की, ‘सातच्या आत घरात’, ‘रेगे’, ‘बिपी’ (बालक पालक), ‘देल्ली ६’, ‘उडान’, ‘उडता पंजाब’ आणि अन्य काही सिनेमे असोत, यात दिसलेलं मुलांचं अधोविश्व अगदी मिळमिळीत म्हणायला हवं. ते सगळं मागासलेल्या सांस्कृतिक चौकटीतलं वाटावं इतके धक्कादायक अनुभव ‘इंडियन पेडियाट्रिक असोसिएशन’ आणि ‘इंडिया टुडे’ या मासिकाने केलेल्या शहरी व ग्रामीण सर्वेक्षणातून पुढे आलेले आहेत.
उपभोग विश्वात रमलेल्या ९० टक्के मुलांनी आपलं खाजगी आयुष्य आपल्या पालकांपासून लपवून ठेवलेलं आहे. व्हॉटसअॅप, फेसबुक यांव्यतिरिक्त आपल्याला परिचित नसलेल्या माध्यमांतून कोणाला पत्ताही लागणार नाही, अशा सांकेतिक भाषेत (‘कोड-लँग्वेज’ मध्ये) ‘चॅट’ करत ही मुलं आपल्या वेगळ्या विश्वात रममाण झालेली दिसतात. गेल्या काही वर्षांत ‘रेव्ह पार्ट्यां’वर धाडी टाकल्यानंतर विश्वास नांगरेपाटील यांनी ड्रग्ज आणि दारूच्या वेगवगळ्या कॉम्बिनेशनला या विश्वातील मंडळींनी दिलेले ‘कोडवर्ड’ जाहीर केले होते, हे आठवत असेल.
खरं तर त्यावेळी टीव्हीवर झालेल्या चर्चांमधूनच अनभिज्ञ पालकांना वास्तवाचा जरा अंदाज येऊ लागला होता. परंतु विश्वास नांगरेपाटलांचा पोलिसीखाक्या पाहून, ‘सक्ती’, ‘कायदा’, ‘धाकदपटशहा’, ‘नियंत्रण’, ‘नियमन’, या सगळ्या पद्धतीविरुद्ध असलेल्या पालकांनी ‘लोकशाही संवादा’चा वेगळा सूर लावला. ते साहजिकच आहे. आधुनिकतेच्या आणि लोकशाही स्वातंत्र्याच्या एका वेगळ्या टप्प्यावर आल्यावर ‘मिलिटरी शिस्तीकडे’ जाणं, हे केव्हाही संयुक्तिक होणार नाही, हे पालक चांगलेच जाणतात.
पण एक मात्र निश्चितच, गोंधळलेल्या पालकांना नियंत्रण की, नियमन अशा कात्रीत सापडल्यामुळे आजही निर्णय घेता येत नाहीत. कंट्रोल आणि रेग्युलेशन यात फरक आहे. कंट्रोल आंधळा असतो, आवाज दाबून टाकणारा आणि रेग्युलेशन कायद्याच्या कक्षेत घडतं. त्याचं मॉनिटरींग करता येतं. धोक्याची पातळी ओलांडल्यास त्या व्यक्तीला थांबवता येतं. त्यामुळे अल्पवयात (१५-२०) एसटीडी व गर्भपाताला बळी पडणाऱ्या मुलांच्या पालकांना आता ठरवावं लागेल की, नियंत्रण नको असेल तर पालकांच्या मार्गदर्शनाखालील ‘नियमन’ तरी स्वीकारायला हवं. ज्याला या बाजारपेठी व्यवस्थेनं गोंडस नाव दिलं आहे- ‘अंडर पेरेन्टल गाईडन्स’.
या साऱ्या पार्श्वभूमीवर, युनेस्कोच्या आरोग्य विभागाने (रीप्रॉडक्टीव्ह हेल्थ बाबत) दिलेला इशारा मात्र चिंताजनक आहे. युनेस्कोने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, एड्स आणि गुप्तरोगांबाबतीत येत्या काही वर्षांत भारत हा क्रमांक एकचा देश होऊ शकतो. आशिया खंडातील भारत नेपाळ बांगलादेश, पाकिस्तान या देशातील लैंगिक गुप्तरोगांचा हा वाढता दर इतका भयावह आहे की, प्रौढ वयात आल्यावर किशोरवयीन मुलांचे हे आजार अनेक दुर्धर व्याधींचं उग्र स्वरूप धारण करतात. मुख्य म्हणजे सुख उपभोगाचा जोश उतरल्यावर अनेक पातळ्यांवरच्या भ्रमिष्ट उदध्वस्ततेत ही तरुणाई जगू लागलीय. ज्याचं प्रमाण ७६ टक्क्यांच्या आसपास आहे. या मुलांना स्थिर मानसिक अवस्थेला आणायला त्यांच्या वयाची पस्तिशी उजाडावी लागते. या गोष्टी ऐकल्यावर लाख प्रश्न मनात येऊन जातात. आपल्या शारीरिक प्रेरणांवर, तारुण्यसुलभ भावनांवर, आकर्षणावर नियंत्रण ठेवणं, मनावर संयम ठेवायला शिकणं हे पदवी घेण्यापेक्षाही महत्त्वाचं बनलं पाहिजे, असं अनेक समुपदेशक डॉक्टरांना वाटू लागलंय ते अगदी खरं आहे.
या लेखमालेतील या पूर्वीच्या माझ्या लेखात किशोरवयीन-तरुण मुलांच्या व्यसनाधीनतेवर तसंच त्यांच्या बदलत्या जीवनशैलीवर, दिसणारा मर्दानगीच्या संकल्पनांचा प्रभाव यावर लिहायला सुरुवात केल्याबरोबर काही प्रौढ वाचकांनी असा एक सूर आळवला की, “ही सारी फॅडं शहरी पैसेवाल्यांच्या मुलांमध्ये बोकाळलेली आहेत, आमच्या गावाकडच्या कष्टकरी दलित-बहुजन पोरांकडे ही फॅशन करायला एवढा पैसा कुठून यायला हो?”
ही त्यांना शंका येणे अगदी स्वाभाविक आहे, कारण आपल्या अत्यंत सूक्ष्म-खाजगी आयुष्यापासून प्रौढांना दूर ठेवण्यात नवी पिढी चांगलीच यशस्वी झालेली आहे. किंबहुना प्रत्येकाच्या सूक्ष्म खाजगी जीवनाची स्वायत्तता पालकांनी स्वीकारलेली असल्याने नव्या पिढीची ‘कोड-लँग्वेज’ समजून घेण्याचा पालकही अजिबात प्रयत्न करत नाहीत. पालकांमध्ये नव्या पिढीच्या या ‘नव्या सांकेतिक भाषे’च्या ‘डिकोडिंग’ला तेव्हाच सुरुवात होते, जेव्हा त्याच्या घरात काहीतरी गंभीर राडा झालेला असतो. किंवा डॉक्टरांनी मुलांना गंभीर आजार सांगितलेला असतो.
नुकतीच वर्तमानपत्रात एक बातमी वाचनात आली. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये ‘शेफू संस्कृती’ वाढीला लागलीय. ती बातमी अशी होती की, एका सनदी लेखाकाराच्या दोन उच्चशिक्षित मुली एका वेगळ्याच प्रकारच्या सेक्स मार्केटच्या रॅकेटमध्ये अडकल्या गेल्या आहेत ज्याला ‘शेफू संस्कृती’ असं म्हटलं जातं. खरं तर चीनमधल्या शेफू या मार्शलआर्ट तंत्राचा आणि या धंद्याचा काय संबंध हे अजून कळलं नाही. पण गुन्हे अन्वेषण विभागाकडे दाखल झालेल्या माहितीनुसार या दोन्ही मुलींपैकी मोठी मुलगी विधी महाविद्यालयात तर छोटी एका आर्किटेक्चर कॉलेजमध्ये शिकत होती. अचानक या मुलींच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्याने आई-वडिलांनी चौकशी केली त्यावेळी मुलीने त्यांना कॉलेजमधील मानद प्राध्यापकांसोबत इव्हेंट मॅनेजमेन्ट व्यवसायात काम करणार असल्याचं सांगितलं. त्या व्यक्तीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केल्यावर असं कळलं की, त्याच्यावर दिल्लीत बलात्काराच्या केसेस रजिस्टर झाल्या असून तो तरुणींचा वापर अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी आणि उच्चभ्रू सोसायटीतल्या वेश्या व्यवसायासाठी करतो. ऐकून पालक हादरले असले तरी तोवर प्रकरण हाताबाहेर गेलं होतं.
काही दिवसांनी घराबाहेर रहायला गेलेली मोठी मुलगी घरी परतली आणि आपल्या छोट्या बहिणीला सोबत घेऊन गेली, ती परत आलीच नाही. त्या दोघी सज्ञान आणि स्वत:च्या मर्जीनं या व्यवसायात गेलेल्या असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करता येणार नाही असं पोलिसांनी सुनावले. ते ऐकून आई-वडील गर्भगळीत झाले. अशा प्रकारच्या काही टोळ्या शहरातील महाविद्यालयात कार्यरत आहेत. हे लोक अस्वस्थ तरुण मुलींना हेरून त्यांना जाळ्यात ओढतात आणि उच्चभ्रू सोसायटीतल्या वेश्याव्यवसायासाठी त्यांचा वापर करू लागतात. दिल्ली, कोलकत्ता आणि मुंबईसारख्या शहरात अशा प्रकारचा निरागस चेहरा घेऊन वावरणाऱ्या अनेक मुली या जाळ्यात इतक्या पुरत्या अडकतात की, त्यांना त्यातून बाहेर पडणं मुश्कील होऊन बसते.
खरं तर ती बातमी वाचून मला अजिबात धक्का बसला नाही, कारण काही वर्षांपूर्वीच मुंबईत उच्चभ्रू वस्तीत सेक्स मार्केट कशी चालतात, याबद्दल पोलिसांनी सांगितलं होतंच. पण कुठेतरी हे मात्र जाणवलं की, देहविक्री हा व्यवसाय एकेकाळी सामाजिक अढीचा (सोशल टॅबुचा) विषय वाटत असला तरी आता त्याची व्याख्या बदललीय. एकूणच, कुटुंब व्यवस्थेच्या बदलत्या कल्पना आणि संरचना पाहता किशोरवयापासून मुक्त लैंगिकतेचा अनुभव घेत मोठ्या झालेल्या या नव्या पिढीला, पैसे मिळवण्यासाठी सेक्स करणं ही गोष्ट नगण्य वाटू शकते. कदाचित लहानवयातच अनेकांसोबत तो अनुभव घेत आल्याने, त्यांच्या दृष्टीने ही क्रिया आगदी यांत्रिक गोष्ट बनली असेल. त्यामुळेच कदाचित या प्रक्रियेकडे ही नवी पिढी भावनाशून्यपणे पाहत तर नसेल? शिवाय यात भर घालणाऱ्या आमच्या (पोस्ट मॉडर्निस्ट) स्त्रीवादी मैत्रिणी डान्सबारमध्ये दारुड्या पुरुषांचं लैंगिक मनोरंजन करणं किंवा वेश्याव्यवसाय करणं, हे त्यांचं ‘निवडीचं स्वातंत्र्य आहे’ किंवा ‘फ्रिडम ऑफ चॉईस’ असल्याचं म्हणत आहेतच. कदाचित हीच ‘उत्तर-आधुनिकता’वादी भूमिका या नव्या पिढीची असू शकते. ‘कोणत्याही प्रकारची संरचना ही वर्चस्ववादीच असते’, असे मानणारा हा उत्तरआधुनिकतावादी विचार हा जागीतीकीकरणाच्या प्रक्रियेत जरी बाजारपेठी व्यवस्थेनं आपल्या समर्थनार्थ जोरदारपणे आपल्या देशात पुढे रेटला असला तरी आपण त्याला काय करू शकतो नाही का?
खरं म्हणजे भारतीय कुटुंबसंस्था जगेल की मरेल याची चिंता करण्यापेक्षा पुढची पिढी ही कितपत निरोगी राहील याच प्रश्नावर विचार करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे. नव्हे तेवढंच आपल्या हातात आहे. वर्चस्ववादी पितृसत्ताक कुटुंबव्यवस्था नष्ट व्हायला तर हवीच, पण यातून मुक्त झालेली किंवा मुक्त होऊ पाहणारी नवी पिढी एका वेगळ्याच भयावह दुष्टचक्रात अडकू लागलीय. ते जास्त चिंताजनक आहे. हे दुष्टचक्र बाजारपेठेनं निर्माण केलेलं माणसाचं वस्तूकरण करणारं, त्याला उपभोगासाठी उद्युक्त करतानाच आक्रमक आणि हिंसक बनवणारं आहे. तितकंच माणसा माणसाच्या संबंधांना ते यांत्रिकही बनवणार आहे.
संदर्भ– १) इंडियन पेडियाट्रिक रिपोर्ट ऑन सेक्शुअल एँड रिप्रॉक्टिव्ह हेल्थ, २००४
२) सिक्रेट लाईफ ऑफ इंडियन टीनस् – इंडिया टुडे, २५ फेब्रुवारी २०११
लेखिका सामाजिक कार्यकर्त्या आहेत.
kundapn@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Amol Yadav
Sat , 22 April 2017
Very good article.... Suitably adopted westernization by younger generation may prove dangerous..
Manoj Kulkarni
Sat , 01 April 2017
ग्रामीण भागातील परिस्थिती वैद्यकीयदृष्ट्या फारच भयावह आहे.
Anil Sawant
Sat , 25 March 2017
पालकांच्या आणि आजी आजोबांची झोप उडवणारा लेख आहे हा.
ADITYA KORDE
Fri , 24 March 2017
Best Article ever.. on such an important topic...