बहुसंख्य भारतीय धर्मावर श्रद्धा असणारे आहेत, मग ते हिंदू असोत की मुस्लीम, की इतर धर्मीय. आस्तिक बहुसंख्य आहेत, नास्तिक अल्पसंख्य आहेत. अर्थात यामागे कोणताही संशोधनात्मक पुरावा असण्याची शक्यता नाही. जे आस्तिक असतात, त्यांच्या मनांत धार्मिक परंपरांबद्दल थोडेसे द्वंद्व असले तरी ते त्याविरुद्ध उघड व्यक्त होत नाहीत. कारण त्यासाठी लागणारा अभ्यास त्यांच्याकडे नसतो. अर्थात हे बहुसंख्य जनतेच्या बाबतीत आहे. त्यात काही विद्वान आहेत, जे उघडपणे सकारात्मक, नकारात्मक अशा दोन्ही बाजू सक्षमपणे मांडू शकतात. हेच नास्तिकांच्या बाबतीतदेखील खरे ठरते. त्यांचादेखील अभ्यास असतो असे नाही, अगदी फार थोडे लोक ‘अभ्यासून’ व्यक्त होतात.
अशांपैकी जे अगदी अत्यल्पसंख्य विद्वान आहेत, त्यात अग्रभागी नाव घ्यावे लागते, ते समाजचिंतक नरहर कुरुंदकर यांचे. त्यांनी विपुल लेखन केले आहे. ते अभ्यासून व्यक्त झाले आहेत. त्यामुळे बहुसंख्य सश्रद्ध लोकांना त्यांचे विचार पटले नाहीत, कधी त्यांच्या परंपरागत भावना दुखावल्या गेल्या हे जरी खरे असले, तरी त्यांचे विचार खोडून काढता आले नाहीत, हे देखील तितकेच खरे आहे.
समग्र कुरुंदकर वाचताना माझ्यासारख्या सश्रद्ध माणसाची गोची होते. अन् हे अवघडलेपण मोकळेपणाने मान्य करणे म्हणजे ज्या काळी संदर्भांसाठी हाती ‘गुगल’सारखे सर्च इंजिन नव्हते, त्या काळी अजूनही न खोडता येण्यासारखे लिहिणे, हे कुरुंदकरांचे एक लेखक आणि विचारवंत म्हणून जाणवणारे मोठेपण मान्य करण्यासारखे आहे.
सश्रद्ध मन तयार नाही, ते अजूनही संशोधनावर आपले बौद्धिक व श्रमिक बळ कमी पडत असल्याची ग्वाही देते आहे, आणि पुढ्यात कुरुंदकरांनी घेतलेले सनातन विचारांवरील बौद्धिक/ वैचारिक आक्षेप आहेत. प्रांजळ, लखलखीत असे विवेचन आहे. त्याच्या बाजूने उभे राहणे सोपे आहे, कारण ते काल-सुसंगत आहे, पण त्याच्या विरुद्ध तटावर उभे राहणे सोपे नाही. ते केवळ त्या तोडीची बुद्धिमत्ता आणि श्रमिक सत्ता बाळगणाऱ्यांनाच शक्य होते. या दोन्ही गुणांची आवश्यकता कुरुंदकरांच्या विरोधी तटात उभे राहणाऱ्याकडे असावी लागते, म्हणून विरोधी तटाचा आवाज आज क्षीण वाटतो आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
‘कुरुंदकर मला आवडतात’, म्हणून मोकळे होणे फार सोपे असते. ‘मला कुरुंदकर पटत नाहीत’, म्हणणे अवघड होऊन बसते, कारण त्याचे समर्थनदेखील करावे लागते. पण खरे तर, पहिल्या पठडीतल्या लोकांकडेदेखील ते का आवडतात, याचे समर्थन करता येतेच असे नाही, पण तो मोठ्या रवात मिसळणारा क्षीण वेगळा न काढता येणारा रव असतो, म्हणून त्याला प्रश्न विचारले जात नाहीत. उलट विरोधी रव उठून दिसतो, जाणवतो, आणि मग त्याला एकेका आक्षेपांमागे यत्नांचे डोंगर उभे करावे लागतात. ‘कुरुंदकर डोंगराएवढे मोठे आहेत’, असे एखादा प्रामाणिक सश्रद्ध लेखक जेव्हा लिहितो, तेव्हा त्याला जे जाणवते ते उपर्निर्दिष्ट.
कुरुंदकर सश्रद्ध मनाला पटत नाहीत, ते मन हिंदू असो का मुस्लीम, हे आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे. त्यांचे लिखाण दोन्ही परंपरागत धर्मीयांना अपेक्षित असे नाही. ते केवळ अभ्यासातून, विवेकातून, वस्तुनिष्ठतेतून व्यक्त होणारे प्रामाणिक लेखक व विचारवंत आहेत. निर्भीक आहेत, निडर आहेत, स्वतःच्या बुद्धीवर, चिंतनावर विश्वास असणारे आहेत, म्हणून ते सश्रद्ध मनाला उत्तर देण्यास अवघड वाटावेत, असे प्रश्न मांडू शकतात आणि त्याची मीमांसा करू शकतात. हे कुरुंदकरांचे उजवेपण आहे.
हा श्रद्धावान मनाला अश्रद्ध प्रश्न घालणारा प्रज्ञावान लेखक आहे. ते कोणाचेही अनुकरण करत नाहीत. त्यामुळे ‘ते नेमके कोणाचे?’ हे सहज न कळल्यामुळे कोणी त्यांचेदेखील अनुकरण लगेच करण्याच्या भानगडीत पडत नाही. त्यासाठी अभ्यासाला पर्याय नाही, एवढे मात्र खरे. त्यातून हा लेखक हळूहळू उमजू लागतो; पण तो ‘कळला’, हेदेखील ठामपणाने सांगता येत नाही, कारण त्यांच्या विचारांनी व्यापलेला परीघच एवढा विस्तृत आहे.
“मनू हा ब्राह्मणांचा व ब्राह्मण्याचा संरक्षक म्हणून ब्राह्मणांचे हितसंबंधांवरील प्रेम. हे हितसंबंध टिकावेत हा आग्रह मनूच्या प्रेमाचे रूप घेतो”, असे लिहिणारे कुरुंदकर पुढे “मनू अस्पृश्यता मानत नाही असा ध्वनी ज्यातून निर्माण होईल, अशी मांडणी बाबासाहेबांनी केली आहे. हे एक प्रकारचे शिफारसपत्र आहे. मनूला अस्पृश्यता पाळण्याच्या गुन्ह्यातून संशयाचा फायदा देऊन त्यांनी मुक्त केलेले आहे. माझा या ठिकाणी डॉ. आंबेडकरांशी मतभेद आहे”, असेही म्हणतात. (‘मनुस्मृती’, पृ. ६५).
तसेच “गुलामगिरीच्या शेवटाजवळ उभे राहून आपण पाहू लागलो म्हणजे असे दिसते की, सर्वत्र गुलामगिरी आहे. पण तिचे सर्वांत व्यापक व भयाण रूप ख्रिश्चन धर्माने निर्माण केलेले आहे”, (‘मनुस्मृती’, पृ. १००) असे म्हणतात, आणि “ ‘भगवद्गीता’ हा धर्मश्रद्ध असणाऱ्यांचा ग्रंथ आहे. ‘मनुस्मृती’ हा धर्म वापरणाऱ्यांचा ग्रंथ आहे, हा फरक मी कधी विसरू शकलो नाही. दोन्ही ग्रंथ मला न पटणारे आहेत, पण माझ्या प्रतिक्रिया मात्र ‘गीते’बाबत व ‘मनुस्मृती’बाबत परस्पर भिन्न आहेत”, असेही.
तेच कुरुंदकर पुढे लिहितात, “स्मृतिवाङ्मय ब्राह्मणांचे आहे. शतकानुशतके ब्राह्मणवर्ग हे वाङ्मय पूज्य मानत आला. ब्राह्मणवर्ग वर्णव्यवस्थेचा अभिमानी व समर्थक राहिला हे खरेच आहे. ब्राह्मणांनी या व्यवस्थेचा लाभ घेतला, तिचे समर्थन केले, ती व्यवस्था राबविली, ती बळकट करण्याचा प्रयत्न केला, टिकवण्याचा प्रयत्न केला, हे सारे खरेच आहे. पण हे सारे मान्य केले तरी वर्णव्यवस्था आणि जातिव्यवस्था ब्राह्मणांनी निर्माण केली असा मात्र याचा अर्थ होत नाही! समाजव्यवस्था निर्माण करण्याचे, टिकवण्याचे सामर्थ्य ब्राह्मणांच्याजवळ कधीच नव्हते.” (‘मनुस्मृती’, पृ. १६५).
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
अजून एक. उदा. “प्राचीन काळातले जुने ग्रंथ आपणास कितीही नावडते असोत; ते भूतकाळातील समाजेतिहासाच्या अभ्यासाचे साधन असतात. प्राचीन ग्रंथ जाळून नष्ट करणे, हा रानटीपणा बाबासाहेबांना मान्य नव्हता. ते स्वतःच ज्ञानाचे पूजक व संग्राहक होते. म्हणून मनुस्मृती दहन म्हणजे पृथ्वीच्या पाठीवरून हा ग्रंथ नष्ट करण्याचा कार्यक्रम नव्हे, हे आपण समजून घेतले पाहिजे. खरे भांडण पुस्तकाशी नाही, खरे भांडण समाजरचनेशी आहे.” (‘मनुस्मृती’, पृ. ४८). “भांडण भूतकाळातील मृतांशी नाही. भांडण वर्तमानकाळातील हयात परंपरावाद्यांशी आहे.” (‘मनुस्मृती', पृ. ४४).
कुरुंदकर असे लिहितात, तेव्हा ‘ते आमचे’ म्हणणाऱ्यांची गोची होते. अशा वेळी ते संशोधनातून लाभलेल्या आणि त्यावर केलेल्या सखोल चिंतनाशी प्रामाणिक लेखक, विचारवंत, आहेत, एवढेच कबूल करावे लागते.
‘जागर’मधील त्यांचे ‘सेक्युलॅरिझम आणि इस्लाम’, ‘धर्मग्रंथ-अनुयायी-जीवन’ आणि ‘राजकीय शोध व बोध’, हे तीन दीर्घ लेख म्हणजे मुस्लीम मानसिकतेचे आतापर्यंत झालेले सर्वांत मार्मिक तसेच व्यवच्छेदक विश्लेषण आहे. समाज-विषयाच्या अंतरंगात शिरून कोणत्याही विचारवंताने मुस्लीम मानस जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही किंवा इस्लामच्या जागतिक प्रवासाचा आलेख मोकळेपणाने मांडला नाही किंवा मुस्लीम धर्म भारतात आपले स्थान बळकट का करू शकला नाही, याविषयी सखोल विवेचन केले नाही, (शेषराव मोरे अपवाद समजावेत). अर्थात हे विवेचन सहजासहजी मुस्लीम धर्मीयांच्या पचनी पडणार नाही; जसे ‘मनुस्मृती’वरील त्यांचे परखड विवेचन हिंदूंच्या पचनी पडत नाही.
‘माणूस म्हणजे समाजाचा मूलभूत घटक, त्याचा विकास’, या भावनेतून झालेले त्यांचे लेखन माणसाप्रती प्रामाणिक राहिले आहे, असे करताना ते अलिप्त राहून परिघीय अनुषंग शोधतात. म्हणून त्यांचे लिखाण कोणत्याही एका धर्माप्रती झुकलेले वाटत नाही, तर तटस्थ वाटते. उदा. “शंकराच्या पत्नीवर डोळा ठेवणारा पापी भस्मासुर स्वतःच जळून गेला, ही आनंदाची गोष्ट मानली पाहिजे. पण असल्याच प्रकारच्या गुन्ह्यांमुळे देवांचा राजा होण्याचा इंद्राचा हक्क जातो, असे मानणे बरोबर नाही.”
“लबाड्या करणे हा आपल्या परंपरेत ईश्वराचा राखीव हक्क ठरलेला असून अप्सरांवर भाळणे, हे ऋषिमुनींचे व्यवहारसिद्ध आचरण सर्वमान्य ठरलेले आहे. यावर तक्रार करणे बरोबर नाही.” (‘व्यासांचे शिल्प’, पृष्ठ ४९). असे लिहिणारा लेखक, “आश्चर्याची गोष्ट अशी की, मुसलमानांना पवित्र कुराण आणि महंमद पैगंबर यांच्याविषयी जितके प्रेम दिसते, तितके अल्लाविषयी दिसत नाही. तुम्ही देव माना- न माना, तो सगुण माना- साकार किंवा निराकार माना, या मुद्द्यावर मुसलमान दंगली करणार नाहीत.” (‘शिवरात्र’, १५४), असेही लिहून जातो.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
आजही ‘समान नागरी कायदा’ का अपरिहार्य आहे, हे लोकशाहीवादी भूमिकेतून समजून घेण्यासाठी कुरुंदकरांच्या ‘शिवरात्र’मधील ‘आधुनिक भारतीय राजकारणात मुसलमानांचा प्रश्न’ या लेखाकडे वळावे लागते. “मुस्लीम राजकारणातील अल्पसंख्याकांच्या राजकारणाच्या सर्व रास्त धाग्यादोऱ्यांना भारतीय संविधान हे उचित उत्तर आहे. म्हणून संविधानावर निष्ठा बळकट करीत नेणे, हा पूर्वार्ध आणि अहंकाराला चिकित्सा हेच उत्तर असू शकते, हा उत्तरार्ध. ही दोन सूत्रे जर स्वीकारली नाहीत, तर भारतीय राजकारणात सेक्युलर विचारधारेचा पराभव आता अटळ दिसू लागलेला आहे.” (पृष्ठ १४६)
त्यानंतर ‘मुसलमानांच्या विचारासाठी काही प्रश्न’ या लेखात ते लिहितात, “भारतासारख्या मुसलमान अल्पसंख्य असलेल्या देशात मुसलमानांनी बिगर मुसलमानांचा मुसलमान नसण्याचा हक्क जर मान्य केला नाही, तर मुसलमानांचा मुसलमान असल्याचा हक्क इतर मंडळी सुखाने मान्य करतील, अशी अपेक्षा त्यांनी बाळगू नये. एकमेकांचे हक्क एकमेकांनी मान्य केल्याशिवाय ‘राष्ट्रीय एकात्मता’ या प्रश्नाच्या चर्चेला अर्थ नाही.” (पृष्ठ १५५).
“मुसलमानांना समान नागरिकत्व नको आहे काय? स्वतंत्र देशात अल्पसंख्येला समान नागरिकत्व नसले तर कनिष्ठ नागरिकत्व मिळत असते. हे दुय्यम दर्जाचे नागरिकत्व मुसलमानांना हवे आहे काय, की त्यांना हिंदुस्तानात वरिष्ठ नागरिकत्व मिळेल असे वाटते? आपल्याला वरिष्ठ नागरिकत्व मिळेल, या भ्रमात जे वावरतात स्वप्नरंजनवादी आहेत.” (पृष्ठ १५८).
त्यांचे सामाजिक आणि राजकीय लेखन सखोल आणि परिपक्व आहे. भारतातील स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर राजकीय घडामोडींचा त्यांनी जो आढावा घेतला आहे, त्यांना त्यात सिनेमॅटोग्राफर पाहतो तशा विविध आवरणांतून एकच घटना पाहता येते; अन्यथा इतर लेखकांना प्रावरण तेवढे दिसते. त्यासाठी ‘शिवरात्र’ या पुस्तकातील ‘श्री. गोळवलकर गुरूजी आणि महात्मा गांधी’ हा लेख वाचावा किंवा ‘जागर’मधील ‘महात्मा गांधी काही चिंतन’ आणि ‘शांतिदूत नेहरू’ हे लेख वाचावेत. मुळात दुसरी बाजू व्यवस्थित समजून घेण्याची मानसिकता ठेवूनच हे लिखाण वाचले गेले पाहिजे, म्हणजे घटनेमागील अर्थाचे किती पदर त्यांनी उलगडून दाखवले आहेत, याची कल्पना येते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
आज काही मोठ्या समजल्या जाणाऱ्या तथाकथित इंग्रजी लेखकांचे विचारदेखील उथळ वाटू लागतात, त्या वेळी मराठी भाषिकाला लाभलेल्या या विचारवैभवाचा हेवा वाटतो.
काही उदाहरणे-
“...स्वातंत्र्यपूर्व काळातल्या सामाजिक नेत्यांत धर्मप्रधान नेते म्हणून म. गांधी हेच सर्वश्रेष्ठ ठरतील... गांधीजींचे नेतृत्व सुशिक्षितांचे नेतृत्व होते आणि काँग्रेस संघटना गांधीवादावर श्रद्धा नसणाऱ्यांची संघटना होती... स्वराज्य मिळवण्याची शक्ती चरख्यात नसते, ती एका नेत्याच्या आज्ञेबरोबर लाख माणसे चरखा फिरवू लागतात, या संघटनेच्या शिस्तीत असते. गांधीजी अहिंसावादी होते, पण ही अहिंसा सहनशील अहिंसा नव्हती. त्यांची अहिंसा लढ्याचे हत्यार होती. गांधीजींनी टिळकांच्या राष्ट्रवादात सर्व सुधारणावाद ओतून राष्ट्रवाद व्यापक केला आणि जनतेचा पाठिंबा स्वातंत्र्यलढ्याच्या मागे उभा करून टिळकांची इच्छा साकार केली.” (‘महात्मा गांधी काही चिंतन’)
“सत्याग्रहाचे शस्त्र काँग्रेसने नैतिक चांगुलपण म्हणून स्वीकारलेले नव्हते; ते राजकीय शहाणपण म्हणूनच स्वीकारलेले होते. लोकमतानुवर्ती सरकार या देशात काँग्रेसच्या संमतीशिवाय चालवणे शक्य नाही, हे इंग्रजांना पटवून देण्याचा सत्याग्रह हा एक मार्ग होता.” (‘महात्मा गांधी काही चिंतन’)
“सैद्धांतिक एकेरीपणातून बाहेर पडल्याशिवाय पंडित नेहरूंचे वस्तुनिष्ठ आकलन होणे फार कठीण आहे. हे वस्तुनिष्ठ आकलन करण्यासाठी राष्ट्रे केवळ सिद्धांतानुसार वागत नसतात; सिद्धांतापेक्षा राष्ट्रीय स्वार्थ महत्त्वाचा असतो, हे पहिले सूत्र. प्रत्येक राष्ट्राला एक ऐतिहासिक परंपरा असते. ती परंपरा सोडून एकाएकी ते राष्ट्र फार दूर जात नसते, व या परंपरांवर सैद्धांतिक भूमिका मात करीत नसतात; उलट सिद्धांतावरच परंपरेची मात होते, हे दुसरे; आणि राष्ट्रीय राजकारणात मागच्या परंपरा आजची वस्तुस्थिती यांच्याशी तडजोड घालीत सैद्धांतिक राजकारण चालते, हे तिसरे. ही तीन सूत्रे नीट समजावून घ्यावी लागतात.” (‘शांतिदूत नेहरू’)
“दोन्ही सत्तागटांपासून अलिप्त राहून पंचवीस वर्षांनी साकार होणाऱ्या समृद्ध, उद्योगप्रधान, अन्नस्वावलंबी आणि लष्करीदृष्ट्या बलवान अशा भारताची उभारणी करण्याचा नेहरूंचा प्रयत्न होता. ही त्यांची राष्ट्रीय भूमिका कठोर वास्तववादातून जन्मलेली होती. ‘मी बळकट व्हावे, ही कुणाचीही इच्छा नाही. तरीही मी बळकट होणे ही माझी गरज आहे’, ह्या राष्ट्रीय गरजेच्या चौकटीत व संदर्भात नेहरूंच्या कार्याकडे पहावे लागते...” (‘शांतिदूत नेहरू’)
“भारताच्या इतिहासात विस्कळीतपणा आणि फुटीरपणा हेच आमचे दोष असल्यामुळे पंडित नेहरू आरंभापासून प्रबल केंद्रवादी होते. सर्व भारतात समाजाचे सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन करण्याची जिद्द असणारा आर्थिक नियोजनवादी विचारवंत नेहमी प्रबल केंद्रसत्तावादीच असतो. नेहरूंच्या या भूमिकेकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे. पं. नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार नेहरू बोलले कसे, यावर करता येत नसतो; नेहरू वागले कसे, असा तो विचार करावा लागत लागतो.” (‘शांतिदूत नेहरू’)
आजच्या बदलत्या राजकीय संदर्भात कुरुंदकरांची राजकीय मते तटस्थतेने व व्यासंगीपणाने पाहण्याची, अभ्यासण्याची आवश्यकता आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
‘व्यासांचे शिल्प’ या लेखसंग्रहात त्यांनी ‘महाभारत : एक सूडाचा प्रवास’ या दाजी पणशीकरांच्या पुस्तकाला दिलेली प्रस्तावना आहे. त्यात त्यांच्यातील चिकित्सक दिसतो, आपल्या सुहृदाच्या पुस्तकाला आपण प्रस्तावना देतो म्हणजे त्याबद्दल चांगले लिहिले पाहिजे, हा संकोच त्यांच्याकडे नाही, तो त्यांना मान्यदेखील नाही. त्यामुळे त्यांची प्रस्तावना घेणे म्हणजे लेखकाचे धार्ष्ट्य म्हणायला हवे.
यातील काही वाक्यं पुढे देतो, “दाजी पणशीकर यांचा जो काही अभ्यास आहे, तो नव्या आधुनिक प्रथेचा अभ्यास नाही. परंपरागत विद्येचा परंपरा ज्या पद्धतीने अभ्यास करते, त्या पद्धतीने दाजी पणशीकरांचा अभ्यास झालेला आहे.” (पृष्ठ ४३). “पणशीकरांनी समजूत अशी आहे की- वामन, परशुराम या अवतारांच्या विषयी आपणच तीव्रतेने प्रथम लिहितो आहोत. ही त्यांची समजूत खरी नाही.” (पृष्ठ ५१). “या सूडकल्पेनेबाबत माझ्या मनात आलेल्या दोन कल्पना इथेच नोंदविल्या पाहिजेत. पहिली गोष्ट अशी की- संपूर्ण भारतीय कथानकाची जास्तीत जास्त संगती सूड या कल्पनेत लागते, हे मला मान्य आहे. पण ही जास्तीत जास्त चांगली संगती आहे; ती निर्दोष आणि निरपवाद संगती नाही.” (पृष्ठ ५८).
अशी कित्येक स्थळं आपल्याला सांगता येतील. कुरुंदकर एक विचारवंत म्हणून अगदी स्वतंत्र होते, राहिले, एवढेच यातून दाखवायचे आहे.
‘छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य’ या पुस्तिकेत ते काही स्पष्ट मते मांडतात. उदा., “माणसाचा देव ज्या वेळेला केला जातो, त्या वेळेला त्याच्या अभ्यासाचीही गरज संपते, अनुकरणाचीही गरज संपते. हा श्रद्धेने निर्माण होणार फार मोठा पायगुंता आहे... शिवाजी राजे जसे हिंदू धर्माचे धार्मिक नेते नव्हते तसे ते महाराष्ट्राचे अगर मराठ्यांचेही नेते नव्हते... आपण एतद्देशीयांचे राज्य या देशावर व्हावे या भूमिकेचे समर्थक आहोत, असे छत्रपतींनी मानले आहे आणि हे राज्यसुद्धा त्यांनी स्वतःचे न मानता परमेश्वराचे मानले आहे.”
“आलमगीर औरंगजेब स्वतः भारतात जन्मला, त्याचे वडीलही भारतात जन्मले, पण आपण तुर्कीच्या खलिफाचे प्रतिनिधी आहोत, असे औरंगजेबाने मानले!... शिवाजीचे राज्य हे जनतेचे राज्य होते. शिवाजीच्या नेतृत्वाचा अभ्यास म्हणजे तसा आत्मविश्वास जनतेत निर्माण करणाऱ्या एका चारित्र्यवान युगप्रवर्तक नेत्याचा अभ्यास असतो... शिवाजी म्हणजे युद्ध नव्हे, तर नव्या व्यवस्थेचा आग्रह.’’
आजच्या राजकीय टोलवाटोलवीत हे विचार नव्याने वाचायची गरज आहे. एखादा लेखक ‘समाज’ या संकल्पनेतील कालातीती गुणसूत्रे आपल्या लेखनातून कशी घट्ट धरून ठेवू शकतो, याचा निकष म्हणजे कुरुंदकरांचे लिखाण आहे.
या लेखात कुरुंदकरांच्या भाषासौंदर्य आणि समीक्षणात्मक लेखनाचा विचार करण्यात आला नाही, त्यासाठी एखादा स्वतंत्र लेख लिहावा लागेल. असो.
कुरुंदकर संशोधनाच्या व श्रमाने अर्जित केलेल्या पुराव्याच्या बाजूने ठामपणे उभे राहणारे विचारवंत आहेत. त्यामुळे ते कोणाही आग्रही मताचे किंवा मताधिकाऱ्यांचे नाहीत, हे समजून घेणे गरजेचे आहे. त्यांनी केलेल्या चिंतनाच्या आधारे ते व्यक्त झाले आहेत. ज्या कोण्या मोठ्या माणसांचे वा समाजप्रवर्तकांचे विचार त्यांना पटले नाहीत, ते त्यांनी तसे निर्भीडपणे मांडले आहे, म्हणून कोणत्याही मताला किंवा मोहाला वा बळाला बळी न पडणारे ते निर्मोही आहेत. म्हणून अभ्यासाशिवाय निव्वळ भावनेच्या भरात ‘कुरुंदकर आमचे’ म्हणण्यातही अर्थ नसतो, तो यासाठी.
..................................................................................................................................................................
लेखक जीवन तळेगावकर व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून काम करतात.
jeevan.talegaonkar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment