ज्येष्ठ पत्रकार, राजकीय-सामाजिक चळवळींचे अभ्यासक पुरुषोत्तम महाले यांचा आज पहिला स्मृतिदिन. त्यानिमित्ताने त्यांचं ‘शोध दहशतवादाचा’ हे पुस्तक अक्षर प्रकाशनातर्फे आज प्रकाशित झालं. डॉ. अभिजीत महाले यांनी संपादित केलेल्या या पुस्तकाला ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक निळू दामले यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...
.................................................................................................................................................................
पुरुषोत्तम महाले यांच्या ‘शोध दहशतवादाचा’ या पुस्तकाची प्रस्तावना लिहिण्याची संधी मला ‘अक्षर प्रकाशना’चे निखिल वागळे आणि प्रा. डॉ अभिजीत महाले यांनी दिली, याबद्दल मी त्यांचे प्रथम आभार मानतो.
११ सप्टेंबर २००१ रोजी न्यूयॉर्कमधले जुळे मनोरे ओसामा लादेनने पाडले, या बिंदूपासून प्रस्तुत पुस्तक सुरू होतं आणि १४ मार्च २०१२ रोजी लादेनचा खातमा झाला, त्या बिंदूपाशी संपतं. पुरुषोत्तम महाले यांनी आपल्या मृत्यूपूर्वी साधारण सात ते आठ वर्षे प्रस्तुत पुस्तकाचे लेखन करून ठेवले होते, पण ते अप्रकाशित होते. ओसामाप्रणीत दहशतवादाचा एक विस्तृत इतिहास आणि विश्लेषण महाले यांनी अकरा सप्टेंबरभोवती प्रस्तुत पुस्तकातून मांडलं आहे.
१३ एप्रिल १९९४ रोजी इस्त्रायलमधल्या हादेरा या गावात एक माणूस अंगावर बॉम्ब लादून बसमध्ये शिरला, स्वत:ला आणि बसला नष्ट केलं. ‘मुस्लीम ब्रदरहूड’ ते ‘हमास’ असा प्रवास केलेल्या पॅलेस्टिनी राजकीय विचाराचं हिंसक रूप या घटनेतून प्रथम जगासमोर आलं.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
इस्त्रायलनं १९४६ साली पॅलेस्टाईन बळकावल्यावर इस्त्रायलचं अस्तित्व अमान्य करणारं आणि स्वतंत्र पॅलेस्टाईन मागणारं आंदोलन पॅलेस्टाईनमध्ये, संपूर्ण अरब जगात आणि जगभरच्या इस्लामी समाजात सुरू झालं. पॅलेस्टाईनमध्ये या आंदोलनाचं नेतृत्व यासर अराफत करत होते. अराफत शांततावादी आणि लोकशाहीवादी नव्हते, हिंसक आणि दहशतवादी होते. नाइलाजाने आपल्याला हिंसक व्हावं लागलं, असं ते म्हणत. दहशतवाद ही त्यांची ‘स्ट्रॅटेजी’ होती, धोरण नव्हतं, असंही अराफत म्हणत.
अराफत यांचे प्रयत्न यशस्वी होत नाहीत, इस्त्रायल अधिकाधिक पॅलेस्टिनी जमीन गिळत सुटलं आहे, या वास्तवानं पॅलेस्टिनी हतबल झाले. दहशतवाद ही रणनीती न ठेवता ते धोरणच असायला हवं, असं ‘मुस्लीम ब्रदरहूड’ या इजिप्तमध्ये वाढलेल्या, पण पॅलेस्टाईनमध्ये पसरलेल्या संघटनेनं ठरवलं.
पॅलेस्टाईनमध्ये वाढलेल्या अय्याश याह्या या इंजिनियर मुलानं कुठल्याही दुकानात मिळणाऱ्या वस्तू गोळा करून एक बॉम्ब तयार केला; त्याचा स्फोट अंगावर बाळगून कसा करता येतो, याचं प्रात्यक्षिक वेस्टबँक, पॅलेस्टाईनमध्ये दाखवलं. ही १९९४ सालातली घटना. तिथून पुढं आत्मनाशी हिंसेचा प्रयोग इस्त्रायलमध्ये सुरू झाला, यशस्वी ठरला.
तो प्रयोग ओसामानं व्यापक पातळीवर करायचं ठरवलं. बस नव्हे विमानच उडवायचं त्यानं ठरवलं. इमारतीवर आदळून.
आत्मघाती दहशतवादाचा हा १९९४ ते २००१ असा प्रवास.
महाले यांनी प्रस्तुत पुस्तकात न्यूयॉर्कचे टॉवर कोसळल्यापासून ओसामा लादेनच्या मृत्यूपर्यंतच्या घटना सविस्तर नोंदल्या आहेत. त्यांनी अमेरिकेतलं राजकारण, अमेरिकेचं परदेश धोरण आणि अमेरिकन सरकार यावर या पुस्तकात सविस्तर लिहिलं आहे.
सीआयए या विदेशात हेरगिरी करणाऱ्या संस्थेला कितीतरी आधीपासूनच घातपाती उद्योगाचा सुगावा लागला होता. त्यांच्या विविध अधिकाऱ्यांनी संचालक टेनेट यांना तसं कळवलं होतं. जर्मन इंटेलिजन्सनं कळवलं की, घातपाती अमेरिकेत पोचले आहेत. घातपातींचा ठावठिकाणा अंतर्गत हेरगिरी करणाऱ्या एफबीआयलाही आधीच लागला होता. पण सीआयए, एफबीआय आणि सरकारचं अंतर्गत सुरक्षा खातं यांच्यात समन्वय नव्हता, आपसात विश्वासाचं नातं नव्हतं, प्रत्येक खातं आपण दुसऱ्यापेक्षा कसे शहाणे आहोत, असं समजून दुसऱ्यानं दिलेली माहिती बाजूला सारत होतं.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
अमेरिकन सरकारात अनेक विभाग आहेत. अध्यक्ष विभाग, राष्ट्रीय सुरक्षा विभाग, इंटेलिजन्स विभाग, परदेश विभाग, संरक्षण विभाग, सैन्य, शिवाय काँग्रेस आणि सेनेटच्या विविध कमिट्या. या विभागांतही सतत राजकारण चालत असे, प्रत्येक विभाग दुसऱ्या विभागावर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असे.
सीआयए आणि एफबीआयचे संचालक एक बैठक घेऊन प्रेसिडेंट बुश यांना धोक्याची जाणीव करून देण्याच्या प्रयत्नात होते. बुश जानेवारीत अध्यक्ष झाले, तेव्हाच ही बैठक व्हायला हवी होती. ती शेवटी चार सप्टेंबरला झाली. पण त्या बैठकीतही निर्णय न होता ती स्थगित झाली. अकरा सप्टेंबरला टॉवर कोसळले.
टॉवर कोसळल्यावर प्रेसिडेंट बुश जागे झाले. सीआयए आणि एफबीआयनं गोळा केलेली माहिती समोर आली. ओसामा लादेन यात गुंतलेला आहे आणि तो अफगाणिस्तानात लपलेला आहे, ही पक्की माहिती समोर होती. तरीही न्यूयॉर्कमधला घातपात इराकमधूनच झालाय, सद्दाम हुसेननंच तो केलाय, असं बुश यांना वाटत होतं. बुश सतत इराकवरच हल्ला केला पाहिजे, असं तुणतुणे लावत होते.
अमेरिकेचं इंटेलिजन्स पाकिस्तानवर अवलंबून होतं. पाकिस्तान अमेरिकेला गाळूनसाळून माहिती देत होतं. त्यामुळे ओसामा लादेन कुठं लपलाय, तिथली भौगोलिक परिस्थिती काय आहे, याचा अंदाज अमेरिकेला आलेला नव्हता. अमेरिकेनं अगदी वेड्यासारखी अफगाणिस्तानावर क्षेपणास्त्रं सोडली. पर्वतात गुहेत लपलेल्या ओसामावर त्याचा काहीही परिणाम होत नव्हता. अमेरिकेनं गाढवासारखी अब्जावधी डॉलरची लष्करी सामग्री तिथं वाया घालवली.
ओसामानं अमेरिकेला सॉलिड शेंडी लावली. एवढा बलाढ्य देश किती गाढव आहे, ते त्यानं जगाला दाखवलं, अमेरिकेचं हसं केलं. अमेरिका ज्यांच्यावर अवलंबून ते तालिबान आणि पाकिस्तानचं आयएसआय या दोघांनी अमेरिकेला ‘मामा’ केलं. अमेरिका गाढवासारखी अफगाणिस्तानात लढाई करत राहिली. खूप वेळ आणि पैसा वाया घालवल्यावर अमेरिकेनं पाकिस्तानला वगळून स्वतंत्रपणे ओसामा बिन लादेनची माहिती मिळवली आणि तीन-चार हेलिकॉप्टर वापरून बिन लादेनचा खातमा केला.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
महाले यांनी अमेरिकेच्या अपयशाची वरील कारणं तपशीलवार दिली आहेत. अमेरिकेतले राजकारणी किती उथळ आणि किती अडाणी असतात, याचे अनेक पुरावे महाले यांनी पुस्तकात मांडले आहेत.
‘११ सप्टेंबर’ या घटनेचा अभ्यास कोणाला करायचा असेल, तर हे पुस्तक संदर्भ म्हणून उपयोगी पडू शकेल.
पुरुषोत्तम महाले यांनी प्रस्तुत पुस्तक लादेनच्या मृत्यूनंतर लिहिलं. पत्रकाराच्या लिखाणात एक शिस्त असते. पत्रकार छोटी बातमी लिहो की, मोठं फीचर लिहो की लेखमाला, आपल्याला काय लिहायचं आहे, ते पत्रकाराला चांगलं माहीत असतं. हाताशी टिपणं ठेवत, माहिती संगतवार जुळवत पत्रकार मजकूर उभा करत असतो. जातिवंत पत्रकाराच्या लिखाणाला एक स्ट्रक्चर असतं, त्यात निश्चितपणा असतो, त्यात फापटपसारा आणि अघळपघळ नसते.
महाले यांच्या पुस्तकात त्यांचं पत्रकार असणं दिसतं. ‘११ सप्टेंबर’ची घटना हा त्यांच्या पुस्तकाचा मुख्य विषय आहे. त्या भोवती त्यांनी त्यांचा मजकूर उभा केला आहे. ही घटना घडली यात बिन लादेन आणि त्याचा दहशतवाद गुंतलेला आहे; अमेरिकेचं परदेश धोरण; अमेरिकन राजकारण त्यात गुंतलेलं आहे. महाले यांनी सर्व मुद्दे पुस्तकात नीट रचलेले असल्यानं ‘११ सप्टेंबर’ची घटना चारही बाजूनं समजायला मदत होते.
पुस्तक वाचल्यानंतर मी त्यांचे पुतणे अभिजीत महाले यांच्याशी बोललो. अभिजीतनी सांगितलं की, महाले अमेरिकेत जात असत. तिथं गेल्यावर तिथली वर्तमानपत्रांची ऑफिसं, पुस्तकालयं, युनोचं ऑफिस इत्यादी ठिकाणी ते जात असत, तिथून माहिती गोळा करत असत. विषय डोक्यात ठेवून ते हिंडत, वाचन करत. अभिजित महाले यांना त्यांनी अमेरिकेतून पत्रं लिहिली होती. त्यामध्ये त्यांचं फिरणं, लोकांना भेटणं, माहिती गोळा करणं याचे तपशील येत असत. प्रस्तुत पुस्तक वाचनीय का झालं आणि त्याला एक संदर्भमूल्यं कसं आलं, हे अभिजित महाले यांच्याशी बोलल्यावर कळलं.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
लादेनच्या मृत्यूनंतर २०२२पर्यंत दहशतवादानं खूप वळणं आणि रूपं घेतली. ओसामा गेल्यावर काही काळ त्याचा उजवा हात अयमान अल जवाहिरी यानं ‘अल्-कायदा’ सांभाळलं. परंतु ओसामाच्या मृत्यूनंतर जगातल्या दहशतवादी चळवळीचा केंद्रबिंदू ढळला हे खरं. सुदान, सोमालिया, सीरिया, इराक इत्यादी ठिकाणी दहशतवाद पसरला. ‘अल्-कायदा’ नव्हे, तर त्याची विकसित रूपं तिथं पाहायला मिळाली.
महाले यांनी बिन लादेनच्या दहशतवादाचा अर्थ नेमकेपणानं सांगितला आहे. ‘शासनयंत्रणेची विश्वासार्हता खच्ची करणं, जमातीजमातींमध्ये संशयाचं, अविश्वासाचं, द्वेषाचं वातावरण निर्माण करणं, ही दहशतवाद्यांची कार्यपद्धती असते.’
‘अल्-कायदा’चा दहशतवाद ही जगातल्या वहाबी मुस्लिमांच्या डोक्यात असलेल्या ‘जहिलिया’ची (अंधकारातलं जग) प्रतिक्रिया होती. सहाव्या-सातव्या शतकात उपलब्ध असणारी माहिती, समजूत आणि स्थिती यातून इस्लाम जन्मला. त्या स्थितीच्या पलीकडं न गेलेली मंडळी वहाबी पंथात एकत्र आली होती. जगात आपण, आपला धर्म, आपली समजूतच श्रेष्ठ ही धर्माची मूलधारणा असते. पण इतर धारणा कनिष्ठ मानणं आणि नंतर त्या नष्ट करणं, या धर्मानं तयार केलेल्या कार्यपद्धतीत मुळातच दोष होते आणि आहेत. ते दोष काढण्याऐवजी अधिक तीव्र करण्याकडं काही लोकांचा कल असतो. ‘अल्-कायदा’ हे त्या कलाचं एक संघटित रूप होतं.
‘जहिलिया’बद्दल अविश्वास निर्माण केला की, ते जग नष्ट करणं सोपं जातं, या समजुतीवर ‘अल्-कायदा’चा दहशतवाद आधारलेला होता. पण ते जग नष्ट करता येत नाही, हे दिसल्यावर घातपाती कारवाया करून ते जग खिळखिळं करणं, हा उद्योग ‘अल्-कायदा’नं आरंभला. जिथं लोकशाही असते, तिथं माणसं आपल्या परंपरा, प्रथा, पद्धती तपासत असल्यानं लोकांच्या मनात अविश्वास निर्माण करणं सोपं असतं.
‘अल्-कायदा’च्या दहशतवादाचं एक अमेरिकन रूप म्हणजे ‘ट्रम्पवाद’. ‘अल्-कायदा’चा आधार इस्लाम होता, ‘ट्रम्पवादा’चा आधार ख्रिस्ती धर्मातल्या कालबाह्य आणि निराधार समजुती आहेत. ‘अल्-कायदा’च्याच पद्धतीनं ट्रम्प यानी अमेरिकेतली राज्यघटना, सरकार, न्यायालय इत्यादी सर्व गोष्टी नष्ट करायचं ठरवलं होतं. हिंसक पद्धतीनं.
हिंसा करून दहशतीनं घाबरलेल्या समाजाला कोणता पर्याय ‘अल्-कायदा’ किंवा दहशतवाद देतो?
दहशतवादाकडं कोणताही विधायक पर्याय नव्हता आणि नाही.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
‘अल्-कायदा’ची मशाल, नव्हे नव्हे बॉम्ब, घेऊन सीरियात अल बगदादीनं हाहाकार माजवला. राका या शहराच्या परिसराचा ताबा अल बगदादीच्या जिहादींनी घेतला. काही महिने तिथं त्यानी राज्य केलं आणि आत्मघात करून राका नष्टच केलं. खुद्द जिहादीही कंटाळले आणि जिहाद सोडून पळून गेले. अल बगदादीच्या राज्यात शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी, रोजगार कशाकशाचा पत्ता नव्हता. बगदादीची भाषणं ऐका, हातात जपमाळा बाळगा, प्रार्थना करा आणि अल्लाचा गजर करा. अल्लाचा गजर झाला, पण तो गजर करण्यासाठी जगावं लागतं, हे जिहादींना कळलं नव्हतं.
निषेध, प्रतिक्रिया या घटना समाजाच्या जिवंतपणाचं लक्षण असतं, पण जिवंत माणसं विधायक पर्यायही शोधतात, आपापल्या कुवतीनुसार दोष रिपेअर करत करत पुढं सरकत असतात.
‘अल्-कायदा’, ‘अल शबाब’, ‘बोको हराम’, ‘तालिबान’, ‘लष्करे तैयबा’, या दहशतवादी संघटनांच्या मर्यादा अफगाणिस्तान, सुदान, सोमालिया, इराक, सीरिया, पॅलेस्टाईन, नायजेरिया इत्यादी ठिकाणी लक्षात आल्या, अनुभवास आल्या. पोलिओची लस टोचणं आणि शिक्षण घेणं या दोन्ही गोष्टी अमान्य करून ‘बोको हराम’ने नायजेरियात धुमाकूळ घातला. बोको हराम राज्य करू शकत नाही. शेवटी बिल गेट्स यांची संघटना जीव पणाला लावून मुलांना पोलिओ लस देते आणि देश वाचवते. बिल गेट्स, त्यांची कॉर्पोरेशन, त्यांनी निर्माण केलेले प्रॉडक्ट, एकूणात नफा आणि तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेल्या जगात निर्माण झालेल्या समस्या सतावत आहेत. पण त्यातून वाट काढावी लागते, ‘बोको हराम’ हा काही मार्ग नव्हे.
जगाला हे समजलं. दहशतवादाचं थैमान बऱ्याच अंशी थांबलं. खुद्द इस्लामी समाजातही दहशतवादाबद्दलचे गैरसमज दूर झाले. दहशतवाद सत्ताधारी होऊ शकतो, ही भयानक गोष्ट इराणमध्ये खोमेनी सत्ता स्थापन झाल्यानंतर लक्षात आलं. त्याच इराणमध्ये स्त्रियानी बंड केल्यावर खोमेनीने स्थापन केलेलं नीतिमत्ता लादणारं पोलीस खातं सरकारला बरखास्त करावं लागलं.
तालिबान-अल्-कायदा यांचा दहशती विचार इराणमध्ये पराभूत होतो, ही घटना समाधान देणारी आहे.
‘११ सप्टेंबर’च्या काळातला दहशतवाद आता बदलला आहे, वेगळ्या रूपात वावरतोय. अमेरिकेतला ‘ट्रम्पवाद’ आणि भारतातला ‘हिंदुत्ववाद’ ही त्या दहशतवादाची नवी रूपं आहेत. परंतु दहशतवादाची ही रूपंही लोकांना कळू लागलीत, त्यांचा फोलपणा कळू लागला आहे, हा त्यातल्या त्यात समाधानाचा भाग झाला.
बहरहाल, पुरुषोत्तम महाले यांनी दहशतवादाचा ‘११ सप्टेंबर’ हा टप्पा मराठी वाचकांसमोर तपशीलवार ठेवला, याबद्दल महाले यांचे मरणोत्तर आभार.
‘शोध दहशतवादाचा’ - पुरुषोत्तम महाले
अक्षर प्रकाशन, मुंबई | मूल्य - २५० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment