वरवर पाहता शांत आणि सुंदर वाटणारं कोकण वाटतं, तेवढं शांत नाही. प्रदूषणकारी प्रकल्पांविरोधातल्या आंदोलनांनी ते सतत धगधगतं आहे. नाणार रिफायनरीबद्दल वार्तांकन करणारे पत्रकार शशिकांत वारीसे यांचा नुकताच संशयास्पदरित्या मृत्यू झालाय. या विपरित घटनेमुळे रिफायनरीविरोधातला हा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यात आधी नाणार आणि आता बारसू सोलगाव इथं प्रस्तावित असलेल्या ऑइल रिफायनरीला स्थानिक लोकांचा कडाडून विरोध आहे. पण कोणत्याही परिस्थितीत इथं प्रकल्प आणायचाच, असा सरकारचा निर्धार दिसतो आहे.
रिफायनरी विरोधात आवाज दडपण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या मार्गानं होतो आहे, असा आरोप बारसू सोलगावचे स्थानिक कार्यकर्ते करतायत. प्रकल्पाला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना तडीपारीच्या नोटिसा दिल्या जातात, पोलिसांचं शक्तिप्रदर्शन होतं, सरकारी कामात अडथळे आणल्याच्या आरोपाखाली कारवाई केली जाते... पण गावकरी मागे हटायला तयार नाहीत.
बारसू सोलगावच्या आंदोलनात अनेक तरुण कार्यकर्ते सामील झाले आहेत. सरकारने आमचं ऐकलं नाही, तर पंजाबच्या शेतकऱ्यांप्रमाणे इथल्या सड्यांवर बसून आंदोलन करू, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. त्याआधी इथल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत रिफायनरी विरोधी पॅनल उभी करून ती या गावकऱ्यांनी जिंकूनही आणली आहेत.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
एक पर्यावरण पत्रकार म्हणून कोकणच्या पर्यावरणाचं मी गेली अनेक वर्षं वार्तांकन करते आहे. आणि हे आधीच स्पष्ट करते की, मी एक पत्रकार आहे, या आंदोलनांमधली कार्यकर्ती नाही. त्यामुळे हा प्रकल्प व्हावा की नाही, अशा शब्दांत मला याचं उत्तर द्यायचं नाहीये.
बारसू सोलगावला ऑइल रिफायनरी प्रकल्प होणार की नाही, याचा निर्णय सरकार आणि त्या त्या ग्रामपंचायती म्हणजेच स्थानिक लोकांनी घ्यायचा आहे. पण एक प्रकल्प होताना तिथं नेमकं काय काय होतं, हे सगळ्यांच्या समोर आलं पाहिजे, असं वाटतं.
कोकणची ही कहाणी ‘विकास की पर्यावरण?’ अशा ढोबळ वादांत सांगताच येणार नाही. कोकणच्या लोकांना विकास नको असतो, जे दाभोळच्या एन् रॉ न्रॉनचं झालं, तेच जैतापूरचं होणार… आणि आता नाणार म्हणजे बारसू सोलगावचंही होणार, अशी मांडणी केली जाते. पण हे सगळं म्हणताना किती जण प्रकल्पाच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन आले आहेत, याबद्दल शंकाच आहे.
कोकणातल्या लोकांचा विकासाला विरोध नाही, त्यांना त्यांचं म्हणजे पर्यायानं आपल्या सगळ्यांचंच पर्यावरण राखायचं आहे, हे आपण आता तरी समजून घ्यायला हवं. मुंबईत जानेवारी महिन्यात ‘शाश्वत कोकण परिषद’ झाली होती. त्यात कोकणातून ठिकठिकाणचे कार्यकर्ते आले होते. त्यातले एक कार्यकर्ते उपहासानं म्हणाले, ‘‘आम्ही आता ‘विकास’ या शब्दाचाच धसका घेतला आहे. इतका की, आमच्या मुलाचं नाव ‘विकास’ असं ठेवायचीही आम्हाला भीती वाटते!’’
‘चिपळूणजवळच्या लोटे परशुराम एमआयडीसीमुळे आसपासच्या परिसराचं जे झालं आहे, ते आम्हाला आमच्या गावाचं होऊ द्यायचं नाहीये,’ बारसू सोलगावच्या कार्यकर्त्यांचे प्रतिनिधी नरेंद्र जोशी तळमळीनं सांगत होते...
कोकणची ही कहाणी आत्ताची नाही. ही गोष्ट आहे २०११ची. कोकणच्या या हिरव्यागार चिंचोळ्या पट्टीत तब्बल २० औष्णिक प्रकल्प येणार होते. पश्चिम घाटाशी संलग्न असलेल्या सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या डोंगररांगा खाणींनी पोखरल्या जात होत्या. गावकरी या प्रदूषणाविरुद्ध पेटून उठले होते. सगळीकडे सुटीसुटी आंदोलनं सुरू होती. त्यामुळे हा आवाज दबला जात होता. बऱ्याच ठिकाणी गावात फूट पाडून, पैसे वाटून हा विरोध दडपला जात होता.
जयगडमधल्या जिंदालच्या औष्णिक प्रकल्पाची गोष्ट अशीच. जयगडच्या सड्यावरची म्हणजे सपाट भागावरची शेकडो एकर जमीन घेतली गेली आणि औष्णिक प्रकल्प उभा राहिला. इथंच बंदरातून लाखो टन कोळसा आणला जातो आणि कोळसा जाळून वीज तयार होते.
या औष्णिक प्रकल्पातून निघणारी ‘Fly Ash’ म्हणजेच राख आता सगळ्या परिसरात मिसळली आहे. इथली हवा प्रदूषित झाली आहे. त्याचा आंबा, काजूच्या लागवडीवर मोठा परिणाम झाला आहे. प्रकल्पाच्या प्रदूषित पाण्यामुळे जयगड, नांदिवडेच्या एकेकाळी स्वच्छ गोडं पाणी देणाऱ्या विहिरी प्रदूषित झाल्या आहेत. गावकऱ्यांनी कित्येकदा तक्रारी करूनही कंपनीने या प्रदूषणावर काहीही उपाय काढला नाही. या प्रदूषणामुळे गावातल्या लोकांचे जीवही गेले, पण त्याची कुणालाच पर्वा नव्हती...
हे सगळं समोर आल्यानंतर प्रकरण कोर्टात गेलं आणि जिंदालच्या औष्णिक प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला कोर्टाने परवानगी नाकारली. ‘आयबीएन लोकमत’साठी तेव्हा मी केलेल्या रिपोर्ताजमध्ये हे सगळं चित्रित केलं आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
जयगडप्रमाणेच मी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन वार्तांकन केलं. औष्णिक प्रकल्पामुळे होणारं प्रदूषण अणुऊर्जा प्रकल्पामुळे होणार नाही, मग याला विरोध का करता, असा सरकारचा सवाल होता. अणुऊर्जा प्रकल्पामुळे कोणताही किरणोत्सर्ग होणार नाही, याची हमी सरकार देत होतं, पण गावकऱ्यांचा विश्वास नव्हता. प्रकल्प येण्याआधी, त्यासाठी जमिनी घेण्याआधी आम्हाला सरकारने साधं विचारलंही नाही, अशी गावकऱ्यांची तक्रार होती.
कोणताही प्रकल्प येण्याआधी त्या प्रकल्पाचा तिथल्या पर्यावरणावर काय परिणाम होईल, हे तपासणारा ‘EIA’ (Environment Assessment Impact) म्हणजे ‘पर्यावरण परिणाम अहवाल’ बनवला जातो. जैतापूरच्या प्रकल्पाचाही तसा अहवाल बनवण्यात आला होता, पण ‘NERI’ म्हणजेच ‘नॅशनल एनव्हायर्नमेंट रिसर्च इन्स्टिट्यूट’ने बनवलेल्या पर्यावरण अहवालात इथल्या खाड्यांचा उल्लेखच नव्हता. मग या प्रकल्पाचा इथल्या मच्छिमारांच्या उपजीविकेवर काय परिणाम होईल, हे पडताळून पाहण्याचा प्रश्नच नव्हता. पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी ही गोष्ट सर्वांच्या लक्षात आणूनही दिली होती, पण राजकारण, हिंसा, पैसा, या सगळ्यात हे मुद्दे लक्षात घेण्याची कुणाचीही तयारी नव्हती.
रत्नागिरी जिल्ह्यातली ही परिस्थिती पाहून मी सिंधुदुर्गात गेले. या जिल्ह्यातले दोडामार्ग, सावंतवाडी हे तालुके लोहखनिजाच्या खाणींविरोधातल्या आंदोलनांनी आधीच खदखदत होते. आम्ही ‘आयबीएन लोकमत’च्या विशेष कार्यक्रमांत त्यांचं वेळोवेळी वार्तांकन करत होतो.
दोडामार्गमधल्या कळणे गावच्या आसपास फार विचित्र परिस्थिती होती. दडपशाही, गुंडगिरीने गावकऱ्यांची आंदोलनं दाबली जात होती. कोणत्याही निवडणुका आल्या की, कळणेचं मायनिंग तात्पुरतं थांबे. सगळं शांत झालं की, पुन्हा सुरू होई! २०१३मध्ये पश्चिम घाटावर डॉक्युमेंटरी फिल्म करताना मी कळणेमध्ये गेले होते, तेव्हा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
गावकऱ्यांशी बोलून आम्ही मायनिंगच्या ठिकाणी गेलो, तेव्हा आमच्या पुढे आणि मागे बाउन्सर्सच्या बाइक फिरत होत्या... ही फिल्म मी कोणत्याही चॅनलसाठी करत नव्हते. त्यामुळे माझ्यासोबत मोठं युनिट नव्हतं. माझ्या छायाचित्रकाराला कॅमेऱ्याची तोडफोड होण्याची चिंता वाटू लागली. अखेर कसेबसे पोखरलेल्या डोंगरांचे आणि खाणींचे शॉट्स घेऊन आम्ही अंधार पडायच्या आत गावाबाहेर आलो आणि गोव्याचा रस्ता धरला!
दोडामार्ग आणि सावंतवाडीमध्ये अजूनही मायनिंगविरोधी आंदोलनं सुरूच आहेत. सावंतवाडीजवळच्या आजगाव धाकोरेचे गावकरी आधी भूमिगत औष्णिक प्रकल्पाविरुद्ध आणि आता खाणींविरुद्ध एकवटले आहेत.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
याच आजगाव धाकोरेच्या गावकऱ्यांनी इथल्या भूमिगत औष्णिक प्रकल्पाविरुद्ध कायद्याचा आधार घेऊन लढा दिला. जैवविविधता कायद्यानुसार एखाद्या गावाची जैवविविधता किती आणि कशी आहे, याचा अहवाल बनवता येतो. या गावातल्या लोकांनी असा अहवाल बनवण्यासाठी सरकारची वाट पाहिली नाही. गावातले प्राथमिक शिक्षक आणि झाडांबद्दलच्या, औषधी वनस्पतींच्या जाणकार व्यक्तींनी त्यांच्या जैवविविधतेचा अहवाल बनवला आणि तो थेट राज्य सरकार आणि केंद्राच्या पर्यावरण मंत्रालयाला पाठवला. आमच्या जैवविविधतेचं रक्षण आम्हीच करणार, अशी भूमिका ग्रामसभेने घेतली आणि सरकारला इथला ‘इंड भारत कंपनी’चा भूमिगत औष्णिक प्रकल्प रद्द करावा लागला!
आजगाव धाकोरेच्या या पर्यावरण चळवळींबद्दल बोलणारे नातू काका आता हयात नाहीत, पण या गावात मी गेले, तेव्हा त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं... गावातल्या नारळी-पोफळीच्या आगरांमधून मला त्यांनी जपलेल्या जंगलात नेलं. कितीतरी औषधी वनस्पतींची ओळख करून दिली... गर्द झाडीनं वेढलेल्या भाताच्या शेतांमध्ये एकत्र येऊन गावकऱ्यांनी मला त्यांच्या यशस्वी लढ्याची कहाणी सांगितली... तिथं झुळझुळणारा शुद्ध वारा याचा साक्षीदार होता...
हेच आजगाव धाकोरे गाव आता खाणींच्या विरोधात एकवटलं आहे. या लढाईत तेव्हाही महिलांचा आवाज बुलंद होता... आताही त्या आघाडीवर आहेत. आजगाव धाकोरेचे गावकरी पुन्हा एकदा सनदशीर मार्गाने खाणींवरुद्ध लढा देत आहेत. सावंतवाडीजवळच्या या गावात जेव्हा मी त्यांचा यशस्वी लढा जाणून घेण्यासाठी गेले होते, तेव्हाच हे गाव प्रचंड जागरूक वाटलं होतं. ते अजूनही तसंच ‘पर्यावरणवादी’ आहे.
तेव्हा एक ग्रामसभा घेऊन सगळ्या गावकऱ्यांनी माझ्याशी संवाद साधला होता. मी त्यांच्या गावात नेमकी का आले आहे, माझा उद्देश काय आहे, हे त्यांनी पुन्हापुन्हा मला विचारून घेतलं. माझा हेतू फक्त माहिती घेणं हा आहे, हे पटल्यावर मगच मला त्यांनी त्यांच्या सुंदर गावात नेलं आणि परतताना ओले काजू, मोठ्ठा फणस, सुरंगीचे कळे देऊन निरोप दिला. पत्रकाराने रिपोर्टिंग करताना अशा भेटी घ्यायच्या नसतात, पण मला त्यांचं प्रेम नाकारायचं नव्हतं.
पर्यावरण पत्रकार म्हणून मी अशा अनेक गोष्टींचं वार्तांकन करण्यासाठी कोकणात गेले... तिथले लोक अन्याय, फसवणूक याविरुद्ध चिडले जरूर होते, त्यांचं आंदोलन न थकता सुरू होतं, पण ते अजिबात कडवट झाले नव्हते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
चिपळूणजवळच्या लोटे परशुराम एमआयडीसीमुळे वासिष्ठी नदीकाठच्या गावांची नेमकी काय अवस्था झाली आहे, ते पाहण्यासाठी आम्ही कॅमेरा घेऊन मोठ्या बोटीनं गेलो. नदीकाठच्या कोतिवली गावात आधी सगळे जण मासेमारीचा व्यवसाय करायचे, पण आता त्यांची जाळी खुंटीला टांगली होती.
लोटे परशुराम एमआयडीसीच्या प्रदूषित पाण्यामुळे १९९६ साली इथं नदीत मरून पडलेल्या माशांचा खच पडला होता. तेव्हापासून इथल्या अनेक गावांत मासेमारीच होत नाही. कोयनेच्या जलविद्युत प्रकल्पांतून वीजनिर्मितीनंतर सोडलं जाणारं स्वच्छ पाणी वासिष्ठी नदीत सोडलं जातं आणि एमआयडीसीच्या प्रदूषणामुळे तेही प्रदूषित होऊनच समुद्राला मिळतं!
इथल्या गावकऱ्यांसोबत गावांमध्ये फिरलो. एका घरात लहानग्याचा फोटो लावला होता. माझ्या चेहऱ्यावरचे भाव बघून त्याचे वडीलच म्हणाले, ‘मॅडम, कोकण रेल्वेचा रूळ ओलांडताना गेला माझा मुलगा...’ ते एवढंच म्हणाले, पण त्या दु:खाचं अवडंबर करत बसले नाहीत. उलट मीच उन्हात चालून दमले होते, म्हणून लिंबू-सरबत पाजलं त्यांनी मला.
‘कोकणची माणसं साधी भोळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी...’ असं उगाच फक्त गीतांमध्ये नाही म्हणत! या माणसांना प्रत्यक्ष भेटल्यावर त्याची प्रचिती येते. जंगलातले हत्ती शेतात आले, तर त्यांची पूजा करणारे, त्यांना न मारणारे कोकणच्या डोंगरदऱ्यांतले हे लोक हत्तींचा कितीही उपद्रव झाला, तरी अजूनही सहनशील आहेत.
आपण इथं डोंगराच्या, समुद्राच्या, झाडामाडांच्या सोबतच राहतो, हे इथल्या शेतकऱ्यांना, मच्छिमारांना आणि साध्यासुध्या गावकऱ्यांना मनापासून मान्य आहे. म्हणूनच कोकणात चाललेली ही आंदोलनं विकासाच्या विरोधी नाहीत, तर त्यांनी जपलेल्या निसर्गाला ओरबाडण्याच्या विरोधात आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
सिंधुदुर्गातल्या आजगाव धाकोरेप्रमाणेच विजयदुर्ग जवळच्या गिर्ये गावातही औष्णिक प्रकल्प येणार होता. या प्रदूषणाचा इथल्या देवगड हापूस आंब्यावर त्याचा परिणाम होईल, हे ओळखून इथल्याही गावकऱ्यांनी लढा दिला. त्यांच्या मागणीपुढे सरकारला झुकावं लागलं आणि इथला औष्णिक प्रकल्प रद्द झाला. आता तिथं उभा राहिलेला पवनचक्क्यांचा प्रकल्प तिथली ओळख बनला आहे. पर्यावरणपूरक आणि पारंपरिक ऊर्जा प्रकल्पासाठी कोकणवासियांची ना नाही, याचं गिर्ये हे एक उदाहरण आहे.
कोणताही प्रकल्प होताना खरंच तिथल्या स्थानिकांचं हित साधलं जाणार आहे का? तिथल्या स्थानिक लोकांना तो प्रकल्प हवा आहे का? तिथले लोक त्या प्रकल्पाला का विरोध करत आहेत, असे साधे प्रश्न सरकारने विचारायला हवेत. मूठभर लोकांच्या हितासाठी तुम्ही एखाद्या निसर्गसुंदर प्रदेशाला आणि पर्यायाने गावकऱ्यांना दावणीला बांधणार असाल तर ही कुठली लोकशाही, असा प्रश्न या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, तज्ज्ञ सतत विचारत असतात.
तुम्हाला कोकणचा खरंच विकास करायचा असेल, तर इथली निसर्गसंपत्ती आणि स्थानिक लोकांचं हित साधणारे पर्यटन प्रकल्प, फळोद्योग, मत्स्योद्योग असे प्रकल्प आणा. प्रदूषण न करणारे उद्योग आणा, आयटी पार्क्स आणा, अशी कोकणवासियांची मागणी आहे.
कोकणातल्या लोकांची ही हाक सरकार ऐकणार आहे का, इथल्या लोकांना विश्वासात घेणार आहे का आणि या धगधगत्या संघर्षावर तोडगा काढणार आहे का? हे प्रश्न ‘शाश्वत कोकण परिषदे’त विचारले गेले होते. आता ११ मार्चला कोकणवासियांनी मुंबईमध्ये पुन्हा एकदा मेळावा आयोजित केला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचं ऑडिट करा, गेली दहा वर्षं रस्त्याचं काम रखडल्यामुळे कोकणवासियांचं नुकसान लक्षात घेता त्यावर टोल लावू नका आणि स्थानिक जनतेच्या भावना लक्षात घेऊन जैतापूर आणि बारसू सोलगाव रिफायनरी प्रकल्प रद्द करा, अशा त्यांच्या थेट मागण्या आहेत. सरकारने याची दखल घेतली नाही, तर हा संघर्ष चिघळण्याचीच चिन्हं आहेत… आणि या संघर्षात कोकणचा खरा विकास मागे राहील, हेही तितकंच खरं.
..................................................................................................................................................................
लेखिका आरती कुलकर्णी मुक्त पत्रकार आहेत.
artikulkarni262020@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment