शांताराम पंदेरे : आमच्या पिढीतील आद्य ‘कूल गाय’
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
संजीव चांदोरकर
  • शांताराम पंदेरे
  • Tue , 07 February 2023
  • पडघम कोमविप शांताराम पंदेरे Shantaram Pandere महाराष्ट्र फाउंडेशन Maharashtra Foundation

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांताराम पंदेरे यांना ‘महाराष्ट्र फाउंडेशन’ (अमेरिकेचा)चा २०२२चा ‘समाजकार्य – विशेष पुरस्कार (दलित व भूमिहिनांचे हक्क)’ मिळाला. तो त्यांना नुकताच, म्हणजे २८ जानेवारी २०२३ रोजी पुण्यात ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते समारंभपूर्वक देण्यात आला. त्यानिमित्ताने प्रसिद्ध विनोदी साहित्यिक मुकुंद टाकसाळे यांनी संपादित केलेल्या ‘महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) : स्मरणिका २०२३’मध्ये प्रकाशित झालेला हा लेख...

.................................................................................................................................................................

सध्याचे मिल्लेनियल्स फक्त एखाद्या शब्दातून एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करू शकतात; जसे की ‘कूल गाय’. नेहमी रिलॅक्सड, कधीही एक्साईट न होणारा, फालतू चिंता न करणारा तो ‘कूल गाय’.

शांताराम पंदेरे आमच्या पिढीतील आद्य ‘कूल गाय’ आहेत. गेल्या ४५ वर्षांच्या आमच्या दोस्तान्यात मी शांतारामला कधीही भावनिक झालेला बघितलेला नाही. अपवाद एकच. २०१४मध्ये अर्धांगवायूचा अ‍ॅटॅक आल्यानंतर, आजाराचं गांभीर्य कळल्यानंतर, हॉस्पिटलमधील बेडवर एखाद्या मित्राचा हात हातात घेऊन, निःशब्द रडणारा शांताराम.

ध्यानीमनी नसताना आलेल्या झटक्यामुळे, अक्षरश: पायाला चाके लावून भारतभर फिरणाऱ्या शांतारामचा दिनक्रमच पार बदलून गेला खरा. पण चिकाटीने, आपल्यातील सारा ‘कूलनेस’ पणाला लावत, मंगल-धरती आणि मित्र/सहकाऱ्यांच्या मदतीने, गेल्या आठ वर्षांत, पुन्हा एकदा उभा राहिला आमचा ‘कूल’ दोस्त/कॉम्रेड. महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळी/पक्ष/संघटनातील हजारो कार्यकर्त्यांचे, सामान्य नागरिकांचे ‘बापू’ आणि जवळच्या मित्रांचा ‘शांतू’; मंगल-शांतारामची बायको, मात्र न चुकता त्याला नेहमीच पूर्ण नांवाने संबोधते : शांताराम!

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

१९५४ सालात रत्नागिरीतील लांज्याजवळ केळवलीमध्ये जन्मलेल्या शांतारामची पहिली काही वर्षे गावात गेली. त्या काळात हजारो कोकण्यांप्रमाणे शांतारामचे वडील बुधाजी, चाकरमानी बनून दादरच्या कोहिनूर मिलमध्ये भरती होत, बायको मुलांसह मुंबईत स्थायिक झाले. कोहिनूर मिल चाळीत राहताना, नायगावच्या शाळेत शिकतांना वारकरी वडिलांकडून आणि कुटुंबासाठी अहोरात्र राबणाऱ्या आई-बहिणींचे संस्कार घेत शांताराम रुइया कॉलेजमध्ये दाखल झाला.

मागच्या शतकातील साठी-सत्तरीची दशके, संवेदनशील आणि विचारी मन असणाऱ्या, थोडे बहुत वाचन असणाऱ्या तरुणांची मने ढवळून टाकणारी होती. एखादा मोर्चा किंवा आंदोलन, एखादे भाषण नाहीतर पुस्तक, अशा तरुणांना ‘अॅक्टिव्हिजम’कडे खेचून घ्यायला पुरेसे ठरत असे. जसे कॉ. गोदूताई परुळेकरांच्या ‘जेव्हा माणूस जागा होतो’ने शांतारामला खेचले. मग असे भारावलेले तरुण स्वतःच एकाच वेळी संघर्ष आणि नवनिर्माण करू पाहणाऱ्या एखाद्या परिवर्तनवादी संघटना /पक्षाला शोधत जायचे. कम्युनिस्ट, समाजवादी पक्षाच्या विद्यार्थी / युवक संघटना, दलित पँखर, संघर्ष वाहिनी, युवक क्रांती दल (युक्रांद) अशा कितीतरी संघटना तरुणाईच्या विद्रोह आणि काहीतरी नवीन घडवण्याच्या ईर्ष्येने रसरसलेल्या होत्या.

रुइया आधीच युक्रांदच्या विद्यार्थी संघटनेत खेचला गेलेला शांताराम, विद्यार्थ्यांचे नियतकालिक काढणे, विविध आंदोलनातील सहभाग, अभ्यासवर्ग, शिबिरात गुंतत जात असताना आणीबाणी जाहीर झाली. मराठवाड्यात युक्रांदचे बरेच काम होते. तेथील संघटनात्मक जबाबदाऱ्यांत हातभार लावण्यासाठी शांताराम मराठवाड्यात दाखल झाला. परभणी, औरंगाबाद करत शांताराम वैजापूर तालुक्यात वीरगाव, पाराळा भागात स्थिरावला. आणि तेथेच युक्रांदचा पूर्णवेळ सामाजिक-राजकीय कार्यकर्ता म्हणून काम करण्याचा निर्णय त्याने घेतला. त्यानंतर पुढच्या अनेक दशकांत युक्रांद-लोकसमिती, भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी अशा राजकीय संघटना / पक्षात शांताराम राजकीय कार्य करत राहिला आहे.

त्या सर्वांतील सामायिक धागा एकच - प्रस्थापित सामाजिक-आर्थिक-राजकीय शोषणकारी व्यवस्था बदलण्यासाठी फुले-आंबेडकरी, साम्यवादी-समाजवादी विचारधारेची कास धरणे. विविध वर्तमानपत्रे, नियतकालिकांत लेख लिहिण्याच्या जोडीला नव्वदीमध्ये एक पुस्तक लिहून ‘भगवा : तुकोबाचा की वैदिक हिंदुत्वाचा’ असा रोखठोक प्रश्न विचारणारा शांताराम होता.

वाचन, मनन, चिंतन, अनेक नेते, विचारवंतांच्या सहवासामुळे शांतारामचा सामाजिक-राजकीय कॅनव्हास व्यापक बनत गेला. फक्त आपल्या कार्यक्षेत्रापुरते, फक्त आपण निवडलेल्या समाजघटकांच्या ताबडतोबीच्या प्रश्नांपुरते त्याचे ‘कार्यकर्ता’पण मर्यादित राहणे अशक्य होते. भूमिहीन, आदिवासी, गायरान जमिनी, जाती निर्मूलन, महिलांचे अधिकार, हमाल/ मापाडी / शेतमजुरांचे प्रश्न, रोजगार हमी... महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेच्या जवळपास प्रत्येक ज्वलंत प्रश्नावर शांतारामने राजकीय-वैचारिक भूमिका घेत, राजकीय व्यासपीठावरून संघर्ष आणि संघटनात्मक काम केले आहे.

अशा प्रश्नांवर महाराष्ट्रात झालेल्या पक्ष / संघटनांच्या आंदोलन / आघाड्यांचे शांतारामने नेतृत्व केले आहे. याचाच एक भाग म्हणून ‘भारतीय लोक व पर्यावरण विकास संस्था’ (लोकपर्याय) ही विकासात्मक कामे आणि कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणारी संस्था शांताराम आणि मंगल गेली २० वर्षे चालवत आहेत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

शांतारामच्या राजकीय आणि संघटनात्मक कामाचे महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीतील योगदान मोजता येणारे नाही. पण त्याच्या कार्यक्षेत्रातील उपलब्धीची छोटी झलक : सुमारे १,१०० कुटुंबांना १,५०० एकर गायरान जमीन आणि ३७५ भूमिहीन आदिवासी कुटुंबांना ८०० एकर वनजमीन मिळवून दिली, ज्यात बायकोचे नाव सातबाऱ्यावर आहे. त्याशिवाय सुमारे ३५,००० भिल्ल-ठाकर-पारधी आदिवासींना जात प्रमाणपत्रे मिळवून दिली आहेत.

आणीबाणीच्या काळातच मराठवाड्यात पूर्णवेळ काम करताना शांतारामची मैत्री अहमदनगर जिल्ह्यातील राशीनला जैन-मारवाडी कुटुंबात वाढलेल्या कार्यकर्तीशी, मंगल खिंवसराशी झाली. शांताराम तर स्वत:ची मुळे तोडून आलेला. पण मुलगी असल्यामुळे मंगलचे तसे नव्हते. घरच्यांचा प्रचंड विरोध पत्करून मंगलने शांतारामला जीवनभर साथ देण्याचे ठरवले. गेली ४५ वर्षे जीवनाच्या खाचखळग्यांच्या रस्त्यावरून दोघांनी एकमेकांना जिवाभावाची साथ दिली आहे. पण ही काही त्या दोघांची पर्सनल ट्रीप नव्हती; औरंगाबादेतील मंगल / शांतारामचे प्रत्येक घर चळवळीतील कार्यकर्त्याचे हक्काचे घर राहिले आहे. त्या काळात मंगल-शांतारामचे लग्न आणि त्यांचे एकमेकांना साथ देणे एक आख्यायिका झाले होते; आणि नंतरच्या काळात त्याच आख्यायिकेने भिन्न जाती-धर्माच्या, एकमेकांच्या प्रेमात पडून लग्नाचा विचार करणाऱ्या अनेक तरुण-तरुणींना ताकद दिली आहे.

मंगल-शांतारामने आपली मुलगी ‘धरती’ स्वतंत्र प्रज्ञेची एक प्रौढ स्त्री बनेल हे कसोशीने पाहिले. धरतीने आपल्या आई-वडिलांचा तिच्यावरील विश्वास सार्थ ठरवला. शालेय जीवनापासून जीवशास्त्रात / बायोलॉजीत प्रचंड रस दाखवत, शिष्यवृत्त्या मिळवत, तिने स्वतःच्या हिमतीवर देशातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांतून पदवी / पदव्युत्तर शिक्षण घेतले. सध्या ती अमेरिकेतील ओहियो विश्वविद्यालयात जीव-वैद्यकीय क्षेत्रात संशोधन आणि त्याच वेळी पीएच.डी. करत आहे.

पण शांतारामच्या भावनिक आयुष्याचा कॅनव्हास खूप मोठा आहे. अलीकडे तो त्याच्या फेसबुकवर ‘आठवणीचा खकाना’ सिरीज चालवत आहे. त्यात कोकणातल्या घरातील, शेतातील आठवणीपासून कोहिनूर चाळीतील आयुष्य, तंबाखू-पानाच्या गाद्या, तेथील राडे यांची वर्णने, फोटो तो शेअर करत असतो.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

शांतारामच्या व्यक्तिमत्त्वात ‘लेयर्स’ कमी आहेत. हा एकजिनसीपणा त्याचे जीवनविषयक तत्त्वज्ञान आहे; तुमच्या राजकीय वैचारिक भूमिका, सार्वजनिक आणि व्यक्तिगत आयुष्य यांना ओवणारा एकच एक धागा असला पाहिजे, असा त्याचा आग्रह राहिला आहे. याच आरस्पानी व्यक्तिमत्त्वामुळे दिल्लीतील एखाद्या थिंक टँकच्या बैठकीपासून, एखाद्या कार्यकर्त्याच्या घरातील किचनपर्यंत तो लीलया वावरू शकतो, प्रा. गं. बा. सरदारांसारख्या ऋषितुल्य विचारवंताबरोबर आणि पाराळ्यातील आदिवासी स्त्रीबरोबर सहज-संवाद साधू शकतो आणि रुइया कॉलेज समोरील पायऱ्यांपासून मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयातील पुस्तकात तेवढाच रममाण होऊ शकतो.

वेळेच्या व्यवस्थापनापासून सर्वच बाबतींतील शांताराममध्ये असणारा ‘व्यवस्थापक’ अचंबित करणारा आहे. अगदी साध्या दोघांमधील चर्चेमध्येदेखील स्वतःच्या पॅडमध्ये छोट्या नोंदी करणारा; लेखांकन पद्धतीतील जमाखर्च आणि ताळेबंद यातील ट्रस्टमधील कायदेशीर तरतुदी चिकाटीने समजून घेणारा; प्रत्येक खर्च झालेला रुपया टिपून ठेवणारा; कॉम्प्युटर, स्मार्टफोन, इंटरनेट शिकून त्याचा वापर करणारा; मोजके खाणारा, उशिरा रात्रीपर्यंत चर्चा झाल्यावर दोन-तीन तास झोप घेऊन सकाळी फ्रेश असणारा शांताराम.

शांतारामसारखे नेते / कार्यकर्ते तांत्रिकदृष्ट्या एखाद्या पक्ष संघटनेचे असले तरी ते खऱ्या अर्थाने संपूर्ण परिवर्तनवादी चळवळीचे असतात. गेली अनेक दशके मिळतील तेथून असंख्य पॅम्प्लेट्स, पुस्तिका, पुस्तके भरभरून शांतारामने औरंगाबादला घरी नेली आहेत. महाराष्ट्रातील अगणित अभ्यासवर्ग, बैठकांच्या त्या त्या वेळी काढलेल्या टिपणांच्या असंख्य पॅड्स / वह्यांनी त्याचे घर ओसंडून वाहत आहे. शांताराम महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीचा गेल्या अर्धशतकाचा चालता बोलता संदर्भग्रंथ आहे. घरातून पूर्वीसारखे बाहेर पडता न येण्याच्या आपत्तीचे शांतारामने संधीत रूपांतर केले आहे. पाच दशकांत मिळवलेल्या सामाजिक-राजकीय अंतर्दृष्टीचा वापर करत शांतारामने लिखाणाचे / दस्तावेजीकरणाचे अनेक प्रकल्प राबवायला घेतले आहेत, ज्याची आज नितांत गरज आहे. ‘आवड आणि आनंद वाटणारे काम, कधीच थकवा नाही’ ही टॅगलाईन आहे शांताराम पंदेरे यांच्या फेसबुक पेजची. त्याला नेहमी त्याच्या आवडीचे, आनंदाचे काम मिळो आणि कधीच थकवा न येवो, अशी मित्र म्हणून कामना करूयात!

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......