हिंडेनबर्ग रीसर्चच्या अहवालाने अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत. अदानी समूह आता अमेरिकेतील कोर्टात कधी जातो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे
पडघम - अर्थकारण
श्रीनिवास जोशी
  • अदानी समूहाचे गौतम अदानी आणि हिंडेनबर्ग रीसर्चचे बोधचिन्ह
  • Mon , 06 February 2023
  • पडघम अर्थकारण हिंडेनबर्ग रीसर्च Hindenburg Research अदानी समूह Adani Group

गेल्या लेखात आपण ‘हिंडेनबर्ग रीसर्च’ने दिलेल्या अहवालाच्या प्रस्तावनेत आणि पहिल्या दीड भागात काय म्हटले आहे, हे बघितले. त्यातील मुख्य मुद्दे पुढीलप्रमाणे -

१) अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स आठशे-नऊशे आणि काही बाबतीत हजार ते दोन हजार टक्क्यांनी वाढले आहेत.

२) अदानी समूहातील पाच कंपन्यांचा ‘कॅश-फ्लो’ निगेटिव्ह आहे. म्हणजे त्यांच्यावर असलेली कर्जे परत करणे त्यांना अवघड होणार आहे.

३) अदानी समूहातील कंपन्यांची कंपन्या प्रति-शेअर जेवढा फायदा मिळवत आहेत, त्याच्या चारशे ते आठशे पट या शेअर्सच्या किमती झाल्या आहेत.

४) अदानी कंपन्यांकडे प्रोफेशन मॅनेजमेंटचा अभाव आहे.

५) अदानी समूहावर कर-चोरीचे आरोप पूर्वी अनेक वेळा केले गेले आहेत.

६) अदानी कुटुंबीयांतील एक श्री विनोद अदानी परदेशात राहून ‘शेल कंपन्या’ चालवत आहेत. या शेल कंपन्या अवैध रितीने पैसा आत-बाहेर करण्यासाठी वापरल्या जात आहेत. त्याचप्रमाणे त्या स्टॉक-मॅनिप्युलेशन, स्टॉक-पार्किंग, अकाऊंट मॅनिप्युलेशन या कारणांसाठी वापरल्या जात आहेत.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

‘हिंडेनबर्ग रीसर्च’ने २४ जानेवारी २०२३ रोजी अदानी समूहावर अहवाल प्रकाशित केला. त्याची ओळख करून देणारा पहिला लेख १ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘अक्षरनामा’वर प्रकाशित झाला. त्यानंतरच्या दोन दिवसांत वेगवान घटना घडल्या. अदानी समूहातील शेअर्स आता साधारणतः ६० टक्क्यांनी पडले आहेत. या समूहातील सगळ्यात महत्त्वाची कंपनी ‘अदानी एंटरप्रायजेस’चा शेअर साधारण चार हजार रुपयांना मिळत होता, तो ३ फेब्रुवारीला सकाळी १००० रुपयांपर्यंत पडला होता. म्हणजे तो ७५ टक्क्यांनी पडला आहे. अदानी समूहातील शेअर्स साधारण ८५ टक्क्यांनी पडायला पाहिजेत, म्हणजे मग ते त्यांच्या खऱ्या किमतीला येतील, असे ‘हिंडेनबर्ग रीसर्च’च्या अहवालामध्ये म्हटले गेले होते. ही भविष्यवाणी केवळ दोनच दिवसांत खरी होईल, असे कुणाला वाटले नसेल. ३ फेब्रुवारीपर्यंत अदानी समूहातील शेअर्सची किंमत ९ लाख कोटी रुपयांनी पडली आहे.

याहूनही गंभीर बाब म्हणजे क्रेडिट स्विस आणि सिटी बँक या बँकांनी अदानी समूहातील कंपन्यांनी जारी केलेले रोखे म्हणजे बॉन्डस् तारण म्हणून स्वीकारायला नकार दिलेला आहे. कारण त्यांच्या मते या बॉन्डस्ची किंमत शून्य झालेली आहे. म्हणजे या बॉन्ड्सवरचे व्याजच काय मुद्दलही अदानी समूह भविष्यात देऊ शकणार नाही, असे या जागतिक पातळीवरच्या बँकांचे मत झाले आहे.

हे असेच चालू राहिले तर अदानी समूहाला भविष्यात पैसा उभा करणे फार अवघड होऊ शकते. बॉन्ड्स पैसे उभे करण्यासाठी असतात. उदा. ‘आमचा हा शंभर रुपयांचा बॉन्ड तुम्ही घ्या, आम्ही तुम्हाला दर वर्षी ४ टक्के वगैरे दराने व्याज देऊ’, असे कंपनी म्हणते. कुणी तो बॉन्ड घेतला की, कंपनीकडे १०० रुपये येतात. एखाद्या कंपनीचा प्रमोटर कंपनीच्या अकाऊंटिंगमध्ये घोळ घालत आहे, असा संशय निर्माण झाला, तर हे लोक ‘फ्रॉड’ आहेत. हे गंभीरपणे धंदा करून नफा कमवणारे लोक नाहीत. त्यामुळे व्याजच काय आपले मुद्दलसुद्धा हे लोक परत करू शकणार नाहीत, असा निष्कर्ष काढला जातो.

क्रेडिट स्विस आणि सिटी बँक यांनी ‘हिंडेनबर्ग रीसर्च’चा अहवाल गंभीरपणे घेतला आहे, म्हणून त्यांनी अदानी समूहातील कंपन्यांच्या बॉन्डची किंमत शून्य रुपये एवढी ठरवली आहे, असे समजण्यास आज जागा आहे.

हा अहवाल येऊन आत जवळपास पंधरा दिवस होत आले तरी अदानी समूह अमेरिकेतील कोर्टात गेलेला नाही. ही बाबसुद्धा गंभीर समजली जात आहे. आपली पत टिकवायची असेल तर अदानी समूहाने लवकरात लवकर दावा दाखल करावा, असे त्यांच्या हितचिंतकांना वाटते आहे. अन्यथा, ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने केलेल्या आरोपात तथ्य आहे, असे विचार गुंतवणूकदारांच्या मनात येत राहणार. असो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

हा अहवाल म्हणतो की, आपल्या शेअर्सच्या किमती कृत्रिमरित्या वाढवायच्या असतील, तर कंपनीच्या प्रवर्तकांकडे जास्तीत जास्त शेअर्स असावे लागतात. ‘पब्लिक’कडे कमी शेअर्स असतील, तर कृत्रिमरित्या शेअर्सची मागणी कमी जास्त करता येते. म्हणूनच कुठल्याही प्रवर्तकाकडे ७५ टक्क्यांपेक्षा जास्त शेअर्स ठेवण्याला सरकारने बंदी घातलेली आहे.

हा अहवाल म्हणतो की, आधीच अदानी समूहातील प्रवर्तकांकडे ७५ टक्क्यांच्या आसपास शेअर्स आहेत. त्यात आपल्या शेल कंपन्या हे सारे ‘पब्लिक म्युच्युअल फंड’ आहेत, असे दाखवून अदानी समूह ७५ टक्क्यांपेक्षा जास्त शेअर्स अवैधरित्या बाळगतो आहे.

एखाद्या प्रवर्तकाकडे ७५ टक्क्यांपेक्षा जास्त शेअर्स झाले की, ती कंपनी ‘डी-लिस्ट’ होते. म्हणजे तिच्या शेअर्समधील उलाढाल बंद केली जाते. अहवालाचे म्हणणे असे की, अदानी समूहातील पाच कंपन्या ‘डी-लिस्ट’ होण्याच्या मार्गावर आहेत. त्या अशा -

१) अदानी ट्रान्समिशन - प्रमोटर शेअर होल्डिंग ७४.१९ टक्के

२) अदानी एंटरप्रायजेस - प्रमोटर शेअर होल्डिंग ७२.६३ टक्के.

३) अदानी पॉवर - प्रमोटर शेअर होल्डिंग ७४.९७ टक्के.

४) अदानी टोटल गॅस - प्रमोटर शेअर होल्डिंग ७४.८० टक्के

५) अदानी विल्मार - प्रमोटर शेअर होल्डिंग ८७.९४ टक्के

‘हिंडेनबर्ग रीसर्च’ने ही सगळी माहिती ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’कडून मिळवलेली आहे, असा त्यांचा दावा आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

आपण नेटवर जाऊन शोध घेतला, तर एचडीएफसीसारख्या प्रामाणिकपणे आणि प्रोफेशनल पद्धतीने धंदा करणाऱ्या बँकेच्या प्रवर्तकांकडे फक्त २५ टक्के शेअर्स आहेत. बाकी सगळे ‘पब्लिक’ होल्डर्सकडे आहेत.

पब्लिक फंड म्हणून मिरवणाऱ्या शेल कंपन्या कशा आहेत, याकडे हा अहवाल या पुढच्या भागात वळतो. तो म्हणतो की, अदानी समूहात मोठी गुंतवणूक करणाऱ्या या ‘इनव्हेस्टमेंट फंडां’ची वर्तणूक थोडी विचित्र वाटते. अदानी समूहात गुंतवणूक करणारे हे फंड स्वतःविषयी अत्यंत गुप्तता पाळताना दिसतात. साधारणतः आपण बघतो की, सगळे म्युच्युअल फंड स्वतःची खूप जाहिरात करत असतात. त्यांच्या वेबसाईटस् असतात. त्यावर त्यांच्या प्रमुख अधिकारीवर्गाची माहिती अत्यंत ठळकपणे दिलेली असते. या फंडांशी संपर्क करायचा झाला तर फोन नंबर-पत्ते दिलेले असतात. या फंडांची स्थापना, त्यांची उद्दिष्टे, त्यांनी आतापर्यंत दिलेला परतावा, याची माहिती दिलेली असते. त्यांना पैसा कोठून उपलब्ध होतो आहे, हे सांगितलेले असते.

हे फंड संपूर्ण शेअर बाजारातील कंपन्यांचा अभ्यास करून चौफेर गुंतवणूक करतात. हे फंड कुठल्या तरी एकाच कंपनीमध्ये आपला सगळा पैसा टाकताना दिसत नाहीत. साध्या शब्दांत सांगायचे तर त्यांचा पोर्टफोलिओ ‘बॅलन्सड’ असतो. आपली ‘गुंतवणूक-नीती’ (‘इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी’) काय आहे, याविषयीची व्यवस्थित माहिती, या फंडांच्या वेबसाईटवर असते. गुंतवणूकदाराचा विश्वास प्राप्त करायचा, म्हणजे एवढी पारदर्शकता हवीच.

यातले काहीही अदानी समूहात गुंतवणूक करणाऱ्या या ‘पब्लिक इनव्हेस्टमेंट फंडां’च्या वेबसाईट्सवर दिसत नाही. हे ‘पब्लिक फंड’ अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करताना दिसतात, पण यांच्याविषयी कुठल्याही वर्तमानपत्रात कसल्याही बातम्या नसतात. हे ‘पब्लिक फंड’ आपले अब्जावधी डॉलर्स एकट्या अदानी समूहात टाकून गप्प बसलेले दिसतात. जुलै २०२१मध्ये सेबी अदानी समूहात गुंतवणूक करणाऱ्या या ‘पब्लिक फंडां’ची चौकशी करत आहे अशा बातम्या भारतीय वर्तमानपत्रांत आल्या होत्या. (संदर्भ –दै. ‘बिझनेस स्टॅन्डर्ड’ - २८ जुलै २०२१) ‘हिंडेनबर्ग रीसर्च’ने सप्टेंबर २०२२मध्ये सेबीकडे विचारणा केली, तेव्हा ही चौकशी ‘अजून चालू आहे’, असे सेबीने त्यांना सांगितल्याचे हा अहवाल नमूद करतो.

अहवालाच्या पुढच्या भागात अदानी समूहात आपला सगळा पैसा गुंतवणाऱ्या या पब्लिक फंडांची नावे देण्यात आलेली आहेत आणि हे फंड चालवणाऱ्या व्यक्ती अदानी कुटुंबाच्या जवळच्या कशा आहेत, याचे पुरावे दिलेले आहेत.

‘स्टॉक-पार्किंग’साठी वापरली जाणारी पहिली कंपनी म्हणजे ‘माँटेरोसा इनव्हेस्टमेंट होल्डिंग्ज’. ही कंपनी पाच वेगळे वेगळे इनव्हेस्टमेंट फंड मिळून बनलेली आहे. आणि या कंपनीने साधारणपणे ३० ते ३५ हजार कोटी रुपये अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवलेले आहेत.

माँटेरोसाशी निगडित पाच फंड आहेत. १) एपीएमएस इनव्हेस्टमेंट फंड, २) अल्ब्युला इनव्हेस्टमेंट फंड, ३) क्रेस्टा फंड लिमिटेड, ४) एलटीएस इनव्हेस्टमेंट फंड लिमिटेड आणि ५) लोटस ग्लोबल इनव्हेस्टमेंट फंड. यातील एपीएमएस इनव्हेस्टमेंट फंडाने त्यांच्याकडचा ९९.४ टक्के पैसा अदानी समूहात गुंतवलेला आहे. अल्ब्युला इनव्हेस्टमेंट फंडाने त्यांच्याकडच्या पैशातील ८९.५ टक्के पैसा अदानी समूहात गुंतवलेला आहे. क्रेस्टा फंड लिमिटेड यांनी त्यांच्याकडचा ९७.९ टक्के पैसा अदानी समूहात गुंतवलेला आहे. बाकीच्या दोन फंडांकडे अदानी कंपन्यांमध्ये १ टक्क्यापेक्षा कमी शेअर्स असल्याने त्यांनी किती पैसा गुंतवलेला आहे, याची माहिती देण्याची कायदेशीर गरज नसल्याने ती माहिती जाहीर केली गेलेली नाही. त्यामुळे ‘हिंडेनबर्ग रीसर्च’ने ही माहिती दिलेली नाही.

माँटेरोसा चालवणाऱ्या व्यक्ती अदानी कुटुंबाशी कशा निगडित आहेत, हेसुद्धा या अहवालात दिलेले आहे. यानंतर हिंडेनबर्ग अहवाल ‘स्टॉक पार्किंग’साठी वापरल्या जाणाऱ्या अजून एका ‘पब्लिक’ इनव्हेस्टमेंट कंपनीकडे येतो. ती म्हणजे ‘एलारा कॅपिटल पीएलसी’! या कंपनीचे मुख्यालय लंडनमध्ये आहे. ही कंपनी मॉरिशसमध्ये रजिस्टर झालेले अनेक फंड चालवते. त्यातले दोन मुख्य फंड आहेत- ‘इंडिया ऑपॉर्च्युनिटीज फंड’ आणि ‘व्हेस्पेरा’. 

यातल्या ‘इंडिया ऑपॉर्च्युनिटीज फंडा’ने साधारणपणे २४ हजार कोटी रुपये अदानी समूहाच्या तीन कंपन्यांमध्ये गुंतवलेले आहेत. गंमत म्हणजे आपल्याकडे असलेल्या एकूण पैशांपैकी ९८.७८ टक्के पैसे या फंडाने अदानी समूहातील तीन कंपन्यांमध्ये गुंतवलेले आहेत.

या ‘एलारा’ या कंपनीचे सीईओ म्हणजे मुख्याधिकारी आणि भारत सोडून पळून गेलेले धर्मेश दोशी यांचे एकमेकांशी कसे संबंध होते, हे दाखवण्याचा प्रयत्न ‘हिंडेनबर्ग रीसर्च’ने केला आहे. हे धर्मेश दोशी चार्टर्ड अकाउंटंट होते आणि त्याहून मुख्य बाब म्हणजे बदनाम स्टॉक-मॅनिप्युलेटर केतन पारेख यांचे सहकारी होते. दोशी आणि पारेख या दोघांवरही १९९९-२०००मध्ये स्टॉक मॅनिप्युलेशन करण्याचे आरोप दाखल झाले होते. (संदर्भ - Sebi Order Section 3.2.1)

त्याचबरोबर काही ‘लीक’ झालेले ई-मेल्स उदधृत करून ‘एलरा’च्या मुख्याधिकाऱ्यांचे आणि केतन मेहता वगैरे स्टॉक मॅनिप्युलेटर लोकांचे फार पूर्वीपासून कसे संबंध होते, हे दाखवून देण्याचा प्रयत्न या अहवालाने केला आहे.

यानंतर अहवाल ‘स्टॉक पार्किंग’साठी वापरल्या जाणाऱ्या अजून एका कंपनीचा संदर्भ देतो. या कंपनीचे नाव आहे – ‘न्यू लियाइना इनव्हेस्टमेंट्स’. ही कंपनी सायप्रस या देशात आहे. तिने सुमारे चार हजार कोटी रुपये ‘अदानी ग्रीन एनर्जी’ या कंपनीमध्ये गुंतवले आहेत. हे पैसे ‘लियाइना इनव्हेस्टमेंट्स’कडे असलेल्या पैशाच्या ९५ टक्के आहेत.

ही लियाइना इनव्हेस्टमेंट्स कंपनी ‘अॅमिकॉर्प ग्रूप’ या कंपनीतर्फे चालवली जाते. अॅमिकॉर्प ग्रूप ही ‘कॉर्पोरेट सर्व्हिसेस’ उपलब्ध करून देणारी कंपनी आहे. ही कंपनी संपूर्ण जगभरात आपल्या अवैध कारनाम्यांमुळे अतिशय बदनाम झालेली आहे, असे हा अहवाल सांगतो. या ग्रूपचे आणि अदानी समूहाचे खूप जवळचे संबंध आहेत, असे हा अहवाल सांगतो. या अॅमिकॉर्प ग्रूपची स्वतःची बँकदेखील आहे. तिचा वापर करून हा ग्रूप या देशातून त्या देशात पैसे न्यायला मदत करतो, असे हा अहवाल स्पष्टपणे म्हणतो.

‘1MBD’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या चाळीस हजार कोटी रुपयांच्या फ्रॉडच्या केंद्रस्थानी अॅमिकॉर्प ग्रूप ही कंपनी होती. या अॅमिकॉर्प ग्रूपवर ‘बिलियन डॉलर व्हेल’ या नावाचे पुस्तक लिहिले गेले आहे. त्यात हा ग्रूप मनी लॉन्डरिंग कसे करतो, याचे वर्णन दिले गेले आहे, असे हा अहवाल सांगतो. त्याचबरोबर ‘स्टॉक पार्किंग’ आणि इतर कारणांसाठी खोट्या कंपन्या स्थापन करण्यासाठी लागणारी सगळी मदत हा ग्रूप कशी करतो, याचेही वर्णन या पुस्तकात आहे, असेही हा अहवाल सांगतो. आपण एक ‘म्युच्युअल फंड’ आहोत, असे भासवून ‘अॅमिकॉर्प ग्रूप’सारख्या कंपन्या जगभरातील काळ्या पैशाला वैध पैशाचे रूप कसे देतात, याचे साद्यंत वर्णन या पुस्तकात आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या नंतर हा अहवाल ‘स्टॉक-पार्किंग’साठी उघडल्या गेलेल्या ‘ओपल इनव्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ या अजून एका कंपनीकडे वळतो. ही मॉरिशसमध्ये रजिस्टर झालेली कंपनी आहे. ही ‘अदानी पॉवर’ या कंपनीची सगळ्यात मोठी ‘पब्लिक इनव्हेस्टर’ आहे. या कंपनीची कसलीही महत्त्वाची माहिती वेबवर नाही, असे हा अहवाल सांगतो. आपल्याकडे असलेला सगळा पैसा या कंपनीने ‘अदानी पॉवर’मध्ये लावला आहे. या कंपनीकडे अदानी पॉवरच्या एकूण शेअर्सपैकी ४.६९ टक्के शेअर्स आहेत. म्हणजे ‘पब्लिक’साठी उपलब्ध असलेल्या २५ टक्के शेअर्सपैकी १९ टक्के शेअर्स या कंपनीकडे आहेत. उरलेल्या ६ टक्के शेअर्ससाठी सामान्य गुंतवणूकदार मारामाऱ्या करून त्या शेअरचा भाव अव्वाच्या-सव्वा प्रमाणात वाढवतो आहे. ३ फेब्रुवारीला हा शेअर ४०० रुपयांवरून १०० रुपयांवर आला होता.

पुढे हा अहवाल शेल कंपन्यांविषयी अनेक दाखले देतो. पुराव्यादाखल ‘मॉरिशस कॉर्पोरेट रजिस्ट्री’ची दोन सर्टिफिकेट्स दिलेली आहेत. एक आहे- ‘कृणाल ट्रेड अँड इनव्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी स्थापन झाल्याचे आणि दुसरे आहे- ‘ओपल इनव्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी स्थापन झाल्याचे. ‘कृणाल’चे डायरेक्टर आहेत विनोद अदानी. या दोन्ही कंपन्यांचे सेक्रेटरी आहेत ‘ट्रस्टलिंक इंटरनॅशनल लिमिटेड’. या दोन्ही कंपन्या एकाच दिवशी स्थापन झाल्या आहेत.

वरील सगळ्या कंपन्यांच्या संदर्भात ‘हिंडेनबर्ग रीसर्च’ने दिलेले पुरावे त्रोटक पुरावे वाटतात. याचा अर्थ असा की, काही हुकमाचे पत्ते त्यांनी आपल्याजवळ ठेवले असणार आहेत. पुढची गंमत अशी की, जेव्हा हे सारे प्रकरण अमेरिकन कोर्टात जाईल, तेव्हा या पुराव्यांमधील ‘मिसिंग लिंक्स’ हिंडेनबर्ग रीसर्च अदानी समूहाला कोर्टामध्ये सादर करायला लावेल. त्यांनी तसा इशाराही दिलेला आहे.

..................

या नंतर हा अहवाल या स्टॉक पार्किंगसाठी तयार केलेल्या कंपन्या मोठ्या प्रमाणात अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर ट्रेड करून त्यांच्या किमती कृत्रिमरित्या कशा प्रकारे फुगवतात, हे दाखवून देतो. तो म्हणतो की, अदानी समूहाच्या एखाद्या कंपनीचे जितके शेअर्स एका वर्षात ट्रेड होतात, त्यातले तीस ते चाळीस टक्के शेअर्स या स्टॉक पार्किंग कंपन्या ‘सूत्रबद्धरित्या’ ट्रेड करतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रेड करणे, हे एखाद्या शेअरला ‘कॉर्नर’ करण्यासारखे आहे, असे हा अहवाल म्हणतो. हिंडेनबर्गने ‘अदानी एंटरप्रायजेस’चा शेअर २०१८, २०१९ आणि २०२० साली या स्टॉक-पार्किंग कंपन्यांकडून कसा ट्रेड केला गेला, याचे कोष्टकच दिले आहे.

या कोष्टकातून असे दिसते की, एलारा, क्रेस्टा, अल्ब्युला, एपीएमएस, व्हेस्पारा आणि आणि एलटीएस इनव्हेस्टमेंट फंड या कंपन्यांनी २०१८ साली ७ कोटी ९५ लाख शेअर्स ट्रेड केले. २०१९ साली त्यांनी ६ कोटी १९ लाख शेअर्स ट्रेड केले आणि २०२० साली ६३ लाख शेअर्स ट्रेड केले.

हाच प्रकार अदानी समूहातील इतर कंपन्यांच्या संदर्भातसुद्धा झाला आहे. ‘अदानी ट्रान्समिशन’चे सहा कोटी ८२ लाख शेअर्स या प्रकारे २०१८ साली ट्रेड केले गेले. याच कंपनीचे चार कोटी पस्तीस लाख शेअर्स २०१९ साली ट्रेड केले गेले. ‘अदानी पॉवर’चे ९ कोटी शेअर्स १८ साली आणि १२ कोटी शेअर्स १९ साली ट्रेड केले गेले. हाच प्रकार अदानी समूहातील इतर कंपन्यांच्या संदर्भातसुद्धा झाला आहे.

..................

याच काळात अदानी समूहाच्या शेअर्समध्ये १०० अब्ज डॉलर्सची वृद्धी झाली. केवळ तीन वर्षांमध्ये गौतम अदानी ८ लाख कोटी रुपयांचे मालक झाले.

खरं तर, एलारासारख्या एफपीआय म्हणजे फॉरीन पोर्टफोलिओ इनव्हेस्टर्स यांना सतत ट्रेड करायला म्हणजे प्रत्येक दिवशी ट्रेडमध्ये भाग घ्यायला परवानगी नसते. अशा प्रत्येक दिवशी ट्रेडमध्ये भाग घेण्याला ‘डे-ट्रेड’ म्हणतात. थोडक्यात, या एफपीआयना ‘डे-ट्रेड’ करायला परवानगी नसते. अहवाल म्हणतो, तसे ट्रेडिंग जर केले गेले असेल, तर त्याची चौकशी झाली पाहिजे. इथे या सगळ्या परदेशी कंपन्या सेबीने घालून दिलेल्या नियमांचे तीन तीन वर्षं कसे उल्लंघन करू शकल्या, हा मोठा प्रश्न उभा राहतो.

हे सगळे उल्लंघन होत असताना अदानी कंपन्यांचे शेअर्स हजारो टक्क्यांनी वाढत होते आणि तरीही हे अवैध ट्रेडिंग सेबीच्या लक्षात आले नाही! ‘परदेशी’ कंपन्या परवानगी नसताना ‘डे-ट्रेड’ करत आहेत आणि स्टॉक मार्केटच्या कारभारावर क्षणोक्षणी लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेल्या सेबीला तीन तीन वर्षं पत्ताही लागत नाही, यावर विश्वास बसणे केवळ अशक्य आहे. मग प्रश्न उभा राहतो की, हे सारे कुणाच्या आशीर्वादाने घडले?

अहवालातील हा भाग खरा असेल तर अमेरिकेच्याच काय, पण भारतातील कोर्टातसुद्धा मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतात. कारण स्टॉक एकस्चेंजमधील व्यवहारांची क्षणाक्षणांची माहिती उपलब्ध होऊ शकते. असो. ज्या कुठल्या कोर्टात ही केस उभी राहील, त्या वेळी यासंदर्भात अदानी समूह काय भूमिका घेतो, हे बघण्यासारखे असेल.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

अहवालाच्या या पुढच्या भागात अदानी समूहाचे भारताच्या स्टॉक-मार्केटमधील कुप्रसिद्ध फ्रॉडस्टर्सशी म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये हेराफेरी करणाऱ्या लोकांशी कसे संबंध होते, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी ‘India’s Most Notorious Market Fraudsters’ असे शब्द वापरले आहेत. या फ्रॉडस्टर्सबरोबर हातमिळवणी करून अदानी समूहाने आपल्या अदानी एक्सपोर्टस् या कंपनीचे शेअर्स ‘रिग’ केल्याचे आरोप सेबीने केले होते, हे हा अहवाल अधोरेखित करतो.

१९९९ ते २००५ या काळात सेबीने नव्वद कंपन्या आणि व्यक्तींची चौकशी केली होती. त्यात ‘अदानी प्रमोटर्स’ ही कंपनी अदानी एंटरप्रायजेसचे शेअर्स कृत्रिमरित्या फुगवत आहे, असे सिद्ध झाले होते. पहिल्यांदा १९९९ ते २००१ या काळात केतन पारेख यांची अदानी समूहाचे शेअर्स कृत्रिमरित्या फुगवण्या आणि पाडण्याबद्दल सेबीतर्फे चौकशी झाली होती. हे केतन मेहता कुप्रसिद्ध शेअर्सच्या किमतींमध्ये हेराफेरी करण्यासाठी गेली अनेक दशके प्रसिद्ध आहेत.

‘अदानी प्रमोटर्स यांनी आदानी समूहाच्या शेअर्समध्ये हेराफेरी करण्यासाठी केतन पारेख यांना मदत केली हे सिद्ध झाले आहे’, असे सेबीने २००७ साली दिलेल्या निकालात म्हटले आहे. सेबी आपल्या निकालात म्हणते की, १९९९च्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अदानी एक्सपोर्टचा शेअर ४९५ रुपयांवरून चढत चढत १३०० रुपयांवर गेला. म्हणजे १६२ टक्क्यांचा फायदा झाला. तिथून हा शेअर परत मूळपदावर आला. त्यानंतर मे ते जुलै २००० या काळात तो ५७०वरून परत ११११वर गेला. म्हणजे पुन्हा ९५ टक्क्यांचा फायदा.

या निकालाद्वारे सेबीने अदानी समूहातील काही ‘प्रवर्तक’ आणि सात कंपन्यांवर शेअर खरेदी-विक्रीमध्ये भाग घेण्यासाठी दोन वर्षांची बंदी घातली होती. त्यानंतर ही बंदी उठवली गेली आणि छोटे दंड आकारून हे प्रकरण संपवले गेले.

..................

याच सुमारास अदानी समूहातील १४ प्रायव्हेट कंपन्यांनी आपले शेअर्स केतन पारेख यांच्या ‘टीम’मधील लोकांकडे आणि कंपन्यांकडे ‘ट्रान्सफर’ केले होते. या ‘स्टॉक-ट्रान्सफर’नंतर केतन पारेख यांच्या टीमने ‘अदानी एक्सपोर्ट्स’ या कंपनीच्या शेअर्समध्ये वर सांगितल्याप्रमाणे यथेच्छ स्टॉक-मॅनिप्युलेशन केले, असे सेबीचा निकाल म्हणतो. फेब्रुवारी ते ऑगस्ट २००० या काळात अदानी समूहातील लोकांनी आणि कंपन्यांनी एकूण साडे-तीनशे कोटी रुपयांचे शेअर्स ट्रान्सफर केले होते, असे हा अहवाल म्हणतो.

या संदर्भात पुढे ‘सिक्युरिटीज अपिलेट ट्रिब्यूनल’चा निकाल म्हणतो की, केतन पारेख यांनी ‘अदानी एक्सपोर्ट्स’ आणि इतर अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये ‘सिंक्रोनाइज्ड’ आणि ‘सर्क्युलर ट्रेडिंग’ केले आणि खोटी मागणी तयार केली. सिंक्रोनाइज्ड ट्रेडिंग म्हणजे ‘एकसूत्र ट्रेडिंग’. सगळ्या टीमने ठरल्या वेळी अचानक खरेदी सुरू करायची. भाव चढायला लागले की, सामान्य गुंतवणूकदार त्यात ओढला जातो. सामान्य लोक तो शेअर विकत घ्यायला लागले की, भाव चढवणारे फायदा ‘बुक’ करून हळूहळू पळून जातात.

इतकेच नव्हे तर मोठ्या प्रमाणावर ‘शॉर्ट पोझिशन्स’ही तयार करतात. अर्थातच शेअर पडत जातो. सामान्य माणूस तोट्यात जातो. शेअर मूळ पदावर आला की, ‘शॉर्ट पोझिशन्स’मधील फायदा घेतला जातो. परत एकदा सगळे मिळून तो शेअर एकदम विकत घ्यायला लागतात. चक्र पुन्हा एकदा सुरू होते. याच पद्धतीने ‘स्टॉक मॅनिप्युलेशन’ची अजून दोन उदाहरणे या अहवालात दिली आहेत. असो.

..................

या अहवालाने गंमत वाटावी, अशी एक बाब आपल्या अहवालात दिलेली आहे. सेबीसमोर आपला बचाव करताना अदानी ग्रूपने सांगितले की, मुंद्रा बंदराचा विकास करायचा असल्याने ग्रूपला पैसे हवे होते, म्हणून त्यांनी केतन पारेख यांच्याबरोबर व्यवहार केला. त्यावर सेबीने सांगितले की, ‘तुम्हाला पैसे हवे असतील, तर तुम्ही तुमच्याकडचे शेअर्स बाजारात विका. ‘सिंक्रोनाइज्ड ट्रेडिंग’ आणि ‘सर्क्युलर ट्रेडिंग’ करून पैसे उभे करणे हे अनैतिक तर आहेच, पण बेकायदेशीरसुद्धा आहे.’ भर कोर्टात असा बचाव जर केला गेला असेल, तर या लोकांच्या हिंमतीला सलाम केलाच पाहिजे.

शेवटी २००३ साली सेबीने केतन पारेख यांच्यावर १४ वर्षांसाठी ‘ट्रेडिंग बॅन’ घातला. सतत केलेल्या उपदव्यापांमुळे सेबीला हे पाऊल उचलावे लागले. ‘इतके झाले तरी केतन पारेख आपल्या ‘टीम’मधील वेगवेगळ्या मित्रांच्या साहाय्याने ट्रेडिंग करून हेराफेरी करतच आहेत’, असे भारताच्या ‘इंटेलिजन्स ब्यूरो’ने त्या काळातील आपल्या अहवालात नमूद केले आहे, असे अहवाल सांगतो.

२००३ साली केतन पारेख यांनी आपला सगळा कारभार लंडन येथे हलवला. आपल्या शेकडो कोटी रुपयांच्या काळ्या पैशाची व्यवस्था लावण्यासाठी केतन पारेख वारंवार लंडन जात असतात, असा अहवाल सीबीआयने त्या काळी दिला होता, असे अहवाल सांगतो.

केतन पारेख यांचे लंडनबरोबरच आता सिंगापूरमध्येसुद्धा पूर्ण ‘सेट-अप’ असलेले ऑफिस आहे. भारतातील त्यांच्या टीमच्या ‘निष्ठा’ अजूनही त्यांना पूर्ण वाहिलेल्या आहेत. या तीन्ही ठिकाणच्या ‘सेट-अप’च्या जोरावर केतन पारेख अजूनही स्टॉक-मॅनिप्युलेशनचे उद्योग पूर्वी इतक्याच उत्साहाने करत असतात, असेही अहवाल सांगतो.

या केतन पारेख यांची मुलगी वर दिलेल्या ‘एलारा कॅपिटल’ या कंपनीमध्ये काम करते, असे तिच्या ‘लिंक्डइन’ या अकाउंटचा हवाला देऊन हा अहवाल सांगतो. ही ‘एलारा कॅपिटल’ मॉरिशसमधील एका फंडाद्वारे अदानी ग्रूपचे स्टॉक बाळगून आहे, हे आपण वर पाहिलेच आहे.

हे जे परदेशी कंपन्यांचे जंजाळ विनोद अदानी यांच्या नेतृत्वाखाली तयार केले गेले आहे, त्याचे अनेक दाखले या अहवालाने दिलेले आहेत.

‘स्टॉक पार्किंग’ आणि ‘स्टॉक मॅनिप्युलेशन’ या व्यतिरिक्त या परदेशी शेल कंपन्यांचा पैसा ‘अकाउंट मॅनिप्युलेशन’साठी केला जातो. म्हणजे आपल्या एखाद्या कंपनीला तोटा दिसत असेल आहे किंवा तिचा ‘कॅश-फ्लो’ वाईट दिसत असेल आणि आहे तिला कर्ज पाहिजे असेल, तेव्हा अशी या तोट्यातील कंपनीमध्ये या परदेशी शेल कंपन्यांमधून पैसा ओतला जातो. खरा फायदा झालेला नसताना फायदा दाखवला जातो. कर्ज मिळाले की, हाच पैसा आपली दुसरी तोट्यामध्ये असलेली कंपनी ‘फायद्यात’ कशी आहे, हे दाखवण्यासाठी तिकडे नेला जातो. अशा रीतीने, या शेल कंपन्यांचा पैसा अदानी समूहातील विविध कंपन्यांची अकाउंट गरज पडेल, तेव्हा बाळसेदार कशी आहेत, हे दाखवण्यासाठी केला जातो, असे हा अहवाल म्हणतो.

ही ‘अकाऊंटिंग जादू’ सतत केली जाते. थोडा पैसा फिरवत ठेवून अदानी समूहातील सगळ्या कंपन्या बाळसेदार कशा आहेत, हे दाखवले जाते आणि वेळ पडेल तेव्हा स्टॉक-पार्किंगसुद्धा केले जाते. मूळ कंपनी, तिच्या उपकंपन्या आणि त्या उपकंपन्यांच्या उप-उप कंपन्या असे भले मोठे जाळे तयार करायचे. म्हणजे अकाउंटिंग अत्यंत गुंतागुंतीचे होते. कोणी सरकारी एजन्सी आली, तरी तिला काही थांगपत्ता लागत नाही. एकमेकांशी ‘निगडित’ असलेल्या कंपन्यांचे जाळे जेवढे व्यामिश्र होत जाते, तेवढे फंड सायफनिंग, मनी लॉन्डरिंग आणि राऊंड ट्रिपिंगचे गुन्हे पकडणे अवघड होत जाते.

गोंधळ निर्माण करून ‘गोंधळ’ घालत राहायचे. याचे उदाहरण देताना हा अहवाल म्हणतो की, ‘अदानी यांच्या सात कंपन्यांच्या ५७८ ‘सब्सिडिअरी’ कंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांमध्ये एकट्या २०२२ या वर्षात एकूण ६०२५ व्यवहार झालेले आहेत.’ असो.

..................

या पुढच्या भागात हिंडेनबर्ग रीसर्चचा हा अहवाल विनोद अदानी यांच्या कंपन्या कसे व्यवहार करतात, याची उदाहरणे देतो. ‘रिलेटेड’ आणि ‘अन-रिलेटेड’ व्यवहार करून अकाऊंटिंग फ्रॉड कशी केली गेली आहेत, याविषयीचे दाखले देतो. अदानी समूहाने आपल्या पहिल्या काळात सरकारी म्हणजे करदात्याचा पैसा हडप करून भांडवल कसे उभे केले वगैरे दाखवून देतो. ते आपण पुढच्या लेखात पाहू.

या अहवालाने अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत. अदानी समूह आता अमेरिकेतील कोर्टात कधी जातो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. ही गोष्ट लवकरात लवकर व्हायला हवी, नाहीतर संशयाचे ढग अजून गडद होत जातील. भारतीय बँकांनी आधीच सुमारे पावणे तीन लाख कोटी रुपयांची कर्जे अदानी समूहाला दिलेली आहेत. सध्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे या मार्गानेही पैसे मिळणे बंद झाले आहे. बॉन्डमधून पैसे उभे होणेही बंद झाले आहे. शेअर विकून पैसे उभे करावेत, तर शेअर्स कोण घेणार, अशी परिस्थिती आहे. गौतम अदानी या परिस्थितीतून कसा मार्ग काढतात, याकडे सबंध कॉर्पोरेट जगताचे लक्ष लागले आहे.

..................................................................................................................................................................

लेखांक १ : हिंडेनबर्ग रीसर्च आणि अदानी समूह हा जंगी मुकाबला आहे. हे प्रकरण कुठपर्यंत जाणार, याचा अंदाज आताच लावता येणार नाही!

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

प्रा. मे. पुं.  रेगे यांचे तात्त्विक विचार जागतिक तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात मौलिक असूनही ते विचार इंग्रजीत जावेत, असे त्यांचे चहेते असणाऱ्या सुशिक्षित वर्गाला का वाटले नाही?

प्रा. रेगे मराठी तत्त्ववेत्ते होते. मराठीत लिहावे, मराठीत ज्ञान साहित्य निर्माण करावे, असा त्यांचा आग्रह असला, तरी खुद्द रेगे यांच्या विचारविश्वाचे, त्यांच्या काही लिखाणाचे अवलोकन करता त्यांचे काही विचार केवळ कार्यकर्ते, विचारवंत आणि तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, अन्य तत्त्वज्ञान प्रेमिक यांच्यापुरते मर्यादित नाहीत. त्यांच्या समग्र मराठी लेखनावर इंग्रजीसह इतर भाषिक अभ्यासक, चिंतकांचाही हक्क आहे.......

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......