ज्येष्ठ कथा-कादंबरीकार रंगनाथ पठारे यांना ‘महाराष्ट्र फाउंडेशन’ (अमेरिकेचा)चा २०२२चा ‘दिलीप वि. चित्रे स्मृती साहित्य जीवनगौरव पुरस्कार’ मिळाला. तो त्यांना नुकताच, म्हणजे २८ जानेवारी २०२३ रोजी पुण्यात ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते समारंभपूर्वक देण्यात आला. त्यानिमित्ताने प्रसिद्ध विनोदी साहित्यिक मुकुंद टाकसाळे यांनी संपादित केलेल्या ‘महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) : स्मरणिका २०२३’मध्ये प्रकाशित झालेला हा लेख...
.................................................................................................................................................................
काही लेखक हे एखाद्या दुर्गम अवघड घाटासारखे असतात. चढायला अवघड असतात, पण एकदा उतार लागला की, त्या घाटाच्या नसानसातून वाहणारे पाणी, झाडांच्या पाना-फांद्यांतून ठिबकणारे पाखरांचे आवाज, मध्येच कुठेतरी एखाद्या उंच शिखरावर स्थिरावलेले आकाश आणि या निर्जन एकांतातला एक निखळ आदिम आवाज आपल्या मनाला भिडू लागतो. अशा वेळी आपण तो अवघड चढ, लागलेली धाप विसरून जातो आणि एका कित्येक वर्षांपासून शोधत असणाऱ्या पवित्र एकांतात हरवून जातो. रंगनाथ पठारे हा लेखक वाचताना कोणत्याही शुद्ध वाचकाला येणारा अनुभव हा सर्वसाधारणपणे असा असू शकतो.
‘दुसऱ्या दिवशी नित्याप्रमाणे सगळी कामे केली. सकाळी अभ्यास केला. लेक्चर्सची तयारी केली. ठरल्या वेळी ठरल्यासारखा बोललो. वर्षानुवर्षे हे सगळे करीत आलो असल्याने काहीशा यांत्रिकपणे सगळेच व्यवस्थित झाले. त्यात अडचण काही आली नाही. पण हे सगळे चालू असताना दुसऱ्या एका पातळीवर सारखा ‘तुमच्याकडे लक्ष आहे’चा विचार करीत होतो. त्या आवाजाची आठवण सारखी जाणवत होती, छळत होती, आणि त्यामुळे मनावरील भीतीची सावली अधिक दाटत चालली होती. ‘कोण? का? कशाला?’ या आणि अशा प्रश्नांमुळे विशेष अस्वस्थता वाटत होती. कुणाशी बोलण्यासारखा विषय नसल्यामुळेही आणखी पंचाईत झाली होती.’
‘दिवे गेलेले दिवस’ या पठारे यांच्या १९८२ साली प्रकाशित झालेल्या कादंबरीतील हा अगदी सुरुवातीचा प्रसंग. निनावी फोन आणि त्यावरून दिली जाणारी धमकी- ‘तुमच्यावर लक्ष आहे’. नायकाचे सतत अस्वस्थ असणे. कोण? कशासाठी आपल्यावर लक्ष ठेवतोय? काय हवे आहे त्याला? नेमकी एक प्रकारचे सतत भय वाढवणारी ही अवस्था. एका बाजूने निरागस नायक आणि तरी त्याच्यावर लक्ष आहे म्हणणारा ‘कोणीतरी’. तब्बल चाळीस वर्षांनंतर पठाऱ्यांची ही कादंबरी वरील संदर्भाचा विचार करता आज लिहिलेली का वाटावी?
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
‘दिवे गेलेले दिवस’ (१९८२) ते ‘सातपाटील कुलवृत्तांत’ (२०१९) असा एकूण चौदा कादंबऱ्यांतून मराठी कादंबरी लेखनाचा बहुस्तरीय अवकाश व्यापणारा हा लेखक. या लेखनात केवळ सातत्य दिसते किंवा वाचकाला दमवणारी कथन शैली असेच मानता येईल का? पठारे हे वाचकाला दमवणारे, छळणारे लेखक आहेत, यात वाद नाही, पण या छळवादाचे स्वरूप नेमके कसे आहे? विचार केला तर, हा कादंबरीकार, कथाकार लेखन करताना जसा निर्घृणपणे स्वतःला खोदत जातो, तसाच वाचकालाही. अशा प्रकारची दुर्दम्यता असणारे फारच मोजके लेखक मराठी भाषेत आहेत. लेखन ही जीवननिष्ठा मानणारे फार कमी लेखक असतात.
लेखकाने लिहिणे, चित्रकाराने चित्र काढणे, किंवा कुठल्या तरी कला माध्यमातून, कोणीतरी व्यक्त होणे, ही बाब केवळ तात्कालिक महत्त्व असणारी नसते. मुळात ही जाणीव व्यक्त होणाऱ्यापाशीही असणे गरजेचे असते. कलावंताची कलेच्या बाजूने जाणारी हरेक कृती हा एक प्रकारचा समकाळात केलेला सांस्कृतिक हस्तक्षेप असतो. तो तसा वाटणे, ही एक प्रकारची ‘स्थिती’ असते, अवस्था असते. याचे भान ठेवणारे जे लेखक असतात, तेच आपल्या लेखनाला, व्यक्त होण्याला सार्वकालिक श्रेष्ठत्व देऊ शकतात. रंगनाथ पठारे हे मराठी भाषेतील या संदर्भात अनेक पातळ्यांवर अपवादात्मक लेखक आहेत.
कोणत्याही भाषेत तिची उंची वाढवणारी, काळ आणि प्रदेशाच्या सीमा ओलांडून स्वीकृतीच्या अनेक पातळ्यांवर पोहोचवणारी फार कमी माणसे असतात. अशा माणसांचे व्यक्त होणे त्या त्या भाषा-समाज-संस्कृतीला सार्वकालिक निरपेक्ष श्रेष्ठत्व बहाल करणारे असते. मराठी भाषेतील रंगनाथ पठारे या लेखकाचा एकूण लेखन प्रवास, त्या लेखनाची खोली आणि अवकाश, सांस्कृतिक प्रकटन आणि जबाबदारीचे भान या बाबी लक्षात घेतल्या तर या लेखकाचे असाधारणत्व लक्षात येऊ शकते.
रंगनाथ गबाजी पठारे यांचे लौकिक चरित्र पाहिले तर काही गमतीशीर बाबी दिसतात. जवळे या नगर जिल्ह्यातील, पारनेर तालुक्यातील गावी १९५० साली जन्मलेला हा लेखक. दुसऱ्या महायुद्धात लढलेल्या एका कुणब्याचा मुलगा आहे. खरे म्हणजे लढाई, युद्ध, तलवार यांचे आणि इथल्या मातीत राबणाऱ्या जातींचे नाते पूर्वापार आहे. शिवाजी राजांच्या काळात ते अधिक ठळक झाले आणि त्याला अनेक संदर्भ असलेले नैतिक सखोल परिमाण प्राप्त झाले. पठारे यांच्या कुटुंबाकडे तशी फारशी शेतीवाडी नसावी असे दिसते किंवा असली तरी 'शेतकऱ्यांचे एकुणात काही खरे नसणे, हेही ओघानेच येणारे.
पठारे हे विज्ञानाचे विद्यार्थी, अध्यापक. जवळे, नगर, पुणे, संगमनेर असा एकूण शिक्षण आणि वास्तव्याचा त्यांचा प्रवास. माझा आणि रंगनाथ पठारे यांचा काही दशकांचा बऱ्यापैकी जवळचा, स्नेहाचा म्हणावा असा परिचय असताना अशा काही गोष्टींशिवाय मला फारसे काही ठाऊक नाही. त्यांच्याशी होणाऱ्या संभाषणातूनही कधी मोकळेपणाने ते स्वतःविषयी बोलताना दिसत नाहीत. त्यांच्या मांडणीत व्यक्तीपरतापेक्षा समूहपरताच अधिक असते. यातून त्यांचा एकूण ‘जाणीव’ नावाच्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन सहजपणे दिसून येतो.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
पठारे हा लेखक मी तसा जवळून पाहिलाय. कणखर अशी प्रतिमा, नेमाडेंसारख्या ‘दादा’ वाटाव्यात अशा भरघोस वाढलेल्या मिश्या. बोलतानाचा एक थेट आतून यावा असा रुबाब, सरंजामी वाटावा असा. चालतानाची एक विशिष्ट ढब. मी पाहिलेय या माणसाला जवळून, दुरून. तरी तो मला माझ्या मातीतला वाटला. त्याच्या वरवर राकट, लष्करी असण्याच्या आतात एक खूप देखणा, कोमल, इतरांची काळजी घेणारा कुणबी मी खूपदा पहिलाय, अनुभवलाय. या वरवर डोंगरासारख्या खडबडीत वाटणाऱ्या प्रचंड लेखकाचे दिसणे हे त्याचे आहे, या पहाडातून द्रवणारे कोमल मूलद्रव्य आपले आहे. त्याचे दृश्यरूप म्हणजे त्याचे कालातीत लेखन.
एक प्रसंग मला आठवतो. काही वर्षांपूर्वी रंगनाथ पठारे माझ्याकडे आले होते. एका भिंतीवर आई आणि बापूचे फोटो मी लावलेले. अगदी निखळ कुणबीपणात जन्मलेले आणि जगणारे माझे आई-वडील. भिंतीवरील आईबापूच्या फोटोकडे पठारे सर खूप वेळ अतिशय मन:पूर्वक पाहताना मला दिसले. ते नेमके या फोटोतून कशाचा शोध घेत असावेत, याचा मी बराच वेळ काही न बोलता विचार करत होतो. माझ्या मायबापाकडे एवढ्या स्थिरपणे खोलवर पाहणारा अन्य कोणी अजून मला आढळला नाही. ही घटना केवळ एक सहज घडून गेलेली घटना म्हणून मी बघत नाही. पठारेंसारखा लेखक ज्या वेळी असे काही बघत असतो, त्या वेळी तो बरेच काही अदृश्य असणारे समजून घेत असतो. तो एक प्रकारे काळाचा ठाव असतो. काळाचे एक मोठे दीर्घ प्रवाही संवेदन कवेत घेणे असते. काळ आणि वर्तमानाच्या औपचारिक परिचयापलीकडे जाऊन काळाच्या गोठलेल्या प्रतिकृती पुन्हा जिवंत करण्यासारखे असते ते.
‘सातपाटील कुलवृत्तांत’सारखी कादंबरी यासाठीच आपल्या पूर्वजांचा शोध घेतानाच विश्वभानाची आणि आत्मभानाची गोष्ट होऊन जाते ती यामुळेच. अशी कलाकृती लिहिणे हीच मुळात काही शतकांची वाटावी अशी ‘समाधी अवस्था’ असते. या अवस्थेतून लेखकाला जावे लागणे आणि नंतर व्यक्त होणे हेच खरे तर एक थोर असे मिथक असते. पठारेंसारखा लेखक दरेक कादंबरीतून ते सातत्याने करत आलेला असल्यामुळे तो अपवादातलाही अपवाद मानावा लागतो. काळाच्या स्थिती-गतीचा शोध घेणे, त्याच्या अधीन असणाऱ्या वृत्ती-प्रवृत्तींचा शोध घेणे, ही तशी असाधारण अशी घटना असते. कथा असो की, कादंबरी, की वैचारिक लेखन, पठारेंनी आंतरप्रवाही पद्धतीने काळाच्या स्थिती-गतीला कायमच आव्हान केले आहे. हे समजून घेणे म्हणजे त्या लेखकाचे लेखक म्हणून असणारे अस्तित्व समजून घेणे.
कोणताही समंजस लेखक आपल्या लेखनातून जगण्याचा एक सबंध आकृतिबंध मांडत असतो. खूपदा ही न ठरवताच केलेली गोष्ट असते. तिला असणारी अनौपचारिकता हेच तिचे खरे बळ असते. पठारे यांच्या कादंबरी, कथा लेखनातून एका प्रदीर्घ अशा अस्तित्वावस्थेचे अढळ असे स्थान दिसते. त्यांचे लेखन खूपदा परंपरावादी वाटावे इतके परंपरेच्या जवळ जाताना दिसते, पण त्यातून अगदी स्वयंभू, वेगळी, सार्वभौम वाटावी अशी आधुनिकताच समोर येते.
याचे साधे उदाहरण म्हणून लेखकाचा स्त्री-पुरुष संबंधांकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती वेगळा आहे, हे दाखवणारी त्यांची कादंबरी. ‘दुःखाचे श्वापद’, ‘नामुष्कीचे स्वगत’, ‘चोषक फलोद्यान’, ‘हारण’, ‘चक्रव्यूह’ अशा कादंबऱ्यांमध्ये आपल्या परंपरांनी निर्माण केलेले जगण्याचे सुमार आदर्श लेखकाने ढवळून काढले आहेत. खरे म्हणजे महानुभाव साहित्य, भक्ती परंपरेचे साहित्य, सुफी साहित्य यांनी स्त्रियांच्या जगण्याकडे पाहण्याचा जो उदारभाव निर्माण केला होता, तो आत्मसात करणे आधुनिक लेखनाच्या पातळीवर फारसे कोणाला करता आले नाही. जे करायला गेले, ते एक तर खूप रंजक किंवा उथळ देहभाव निर्माण करणारे किंवा अकारण करुणाभावी असे होते.
पठारे यांच्या साहित्यातील सर्वच स्त्रिया आत्मबळ घेऊन जगणाऱ्या आहेत. त्यांना समजून घेताना वाचक म्हणून कोणताही उन्माद मनात न येता, आपण त्या स्त्री-भावाशी, पर्यायाने एका मूल्याशी समरूप होतो. 'दुःखाचे श्वापद'ची नायिका अशीच आपल्या आतात शिरत जाते, वाचन संपल्यानंतर आपण पुन्हा तिचा शोध घेऊ लागतो.
एखाद्या टिपणाच्या बारीकशा भागात सामावणारा हा लेखक नाही. पठारेंसारखा लेखक समजून घेणे म्हणजे, एका प्रदीर्घ काळाला समजून घेण्यासारखे असते. श्वास-नि:श्वासांसह काही दशका- शतकांचा पसारा अंगावर पांघरून जेव्हा ‘ताम्रपट’, ‘सातपाटील…’ पुढ्यात येतात, तेव्हा गांगरून जायला होते. वर्तमानात सतत इतिहास हुंदडत जाताना दिसतो. इतिहासात रमताना वर्तमानाचे टोकदारपण कधी बोथट होत नाही. या लेखकाचे आणखी वेगळे महत्त्व असे की, हा लेखक अनेकांना ‘आपला लेखक’ वाटतो. खरे म्हणजे एका बाजूने हे तथाकथित पॉप्युलर असण्याचे लक्षण आहे. पण त्या अर्थाने पठारे हे लोकप्रिय लेखक नाहीत. नवखा वाचक त्यांच्या कादंबऱ्यांना हात लावताना खूपदा दचकतो.
पठारे या लेखकावर मनापासून प्रेम करणारे आज जे कोणी बरेच वाचक, समीक्षक आहेत, त्यांचीही सुरुवातीची अवस्था यापेक्षा वेगळी नव्हती. त्यामुळे खूपदा असे वाटून जाते की, पठाऱ्यांच्या साहित्यावरील समीक्षा ही मुळात उत्तम असणाऱ्या वाचकांनी केली आहे. या लेखकाचा पराभव करावा किंवा त्याला थोर म्हणावे, या हेतूने केलेली ही समीक्षा नाही. याचा अर्थ पठारे वाचकांचा अनुनय करतात का? या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ हेच आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
पठारे वाचकांचा अनुनय करणे तर सोडाच पण स्वत:चाही अनुनय कधी करत नाहीत. हा लेखक स्वतःसह वाचकांशीही कठोरपणे वागणारा लेखक आहे, तरी वाचकांना तो आवडतो, यातच त्याचे श्रेष्ठत्व आहे. स्वतःला लेखक म्हणून कायम अपडेट, नित्यनूतन करत राहणे या लेखकाला आवडते. वाचक आपल्या लेखनात गुंतून राहावा, याची कोणतेही ट्रीक न करता आपल्या लेखनातील एकटेपणाला जपणे ही साधी गोष्ट नसते. अगदी सुरुवातीपासूनच पठारेंच्या लेखनात असे एकांताचे खूपसे प्रहर सर्वदूर पसरलेले दिसतात. त्यात बाया-पुरुष आहेत, गर्दी, काळाचे अवशेष आहेत, धावता काळ आहे. रंजकतेच्या आहारी जाऊन लेखक काही तात्कालिक वरवरचे सांगू लागतोय की काय, असे वाटत असतानाच लगेच लागून येणारे खोल गहन असे काही पठाऱ्यांच्या लेखनात आहे.
पठाऱ्यांच्या लेखनाचा अवकाश हा घडवलेला असला तरी तो कृत्रिम नाही. याचे महत्त्वाचे त्यांच्या पात्रांचे निसगीसारखे जगणे हे मलपृष्ठावरून ओघळून जाणार नाही, तर एक प्रकारचे अपरिहार्य असे चिवटपण त्याला जन्मजात चिकटल्यासारखे असते. तोच त्या पात्रांचा प्रकृतीधर्म असतो. त्यांच्या कादंबऱ्यांतले प्राध्यापक, लेखक, स्त्रिया, बलुतेदार सदृश कष्टकरी लोक, राजकीय कार्यकर्ते सगळेच कसे अनौपचारिक सुष्ट-दुष्टता सोबत घेऊन येतात. त्यांची स्वत:ची अशी एक भाषा आहे, जी उद्दाम, कोमल अशी सांगता आली तरी ती खास ‘पठारी भाषा’ आहे. राजन खान या लेखकाने केलेला हा उल्लेख मला विशेष महत्त्वाचा वाटतो.
बोलीभाषेच्या अकारण अट्टहासातून बरेच महत्त्वाचे लेखक प्रादेशिक बनून जातात. न ठरवता पठारे हा धोका सहज टाळतात, याचे कारण त्यांच्या लेखनातून व्यक्त होणारा भाव हा विश्वव्यापी मूल्यांचा आग्रह धरणारा असतो. रंगनाथ पठारे हे आपल्या भाषेविषयी प्रचंड अ-कृत्रिम माया असणारे लेखक आहेत. ‘माझ्या भाषेत अलौकिक वाटावे असे श्रेष्ठ वाङ्मय कित्येक शतकांपासून निर्माण होत आले आहे’, ही त्यांची भूमिका. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हा आग्रह त्यांचा यासाठीच असतो, एवढेच नाही तर, ही भाषा कायम कष्टकऱ्यांच्या शब्दातून बोलत आलेली आहे, त्यांनीच ती घडवली आहे, या अर्थानेही ती अभिजात आहे, ही पठारेंची भूमिका आहे.
पठाऱ्यांच्या कादंबऱ्या, कथा वाचताना खूपदा वाटून जाते या लेखकाला कविता लिहायची आहे. कुठलाही पूर्णविराम न घेता तो पानेच्या पाने बोलत जातो तेव्हा नकळत वाटून जाते, हे महावाक्य महाकाव्याकडे नेणारे आहे. कितीतरी आदर्शाची फेरपालट हा लेखक सहज करत जातो. काळ आणि कालबाह्यता तपासतो, सतत प्रश्न विचारत जातो, ते प्रश्न जगण्याचा बहुपेडी तळ ढवळणारे असतात. त्यांना लौकिक पद्धतीने नाही मांडता येत. जगण्याचा परिपाठ असावा तसे सलग चार दशकांपेक्षा अधिक काळ असे काही करत राहणे ही भयंकर वाटावी अशी गोष्ट आहे. पठारे यांचे ‘सत्त्वाची भाषा’सारखे वैचारिक लेखन हेदेखील त्यांचे कथा-कादंबरीकार असण्याचा वैचारिक कणा वाटावे, इतके ते महत्त्वाचे आहे. सर्जनशील लेखकाने कसा विचार करावा हे कथन करणारे त्यांचे सगळेच वैचारिक लेखन आहे.
रंगनाथ पठारे मुळात विज्ञानाचे अध्यापक, विद्यार्थी. त्यांचे तसे असण्याचा प्रचंड म्हणावा असा लाभ मराठी कादंबरीला झाला आहे. कादंबरी लेखनाचे अनौपचारिक विज्ञान या लेखकाने निर्माण केले. महाराष्ट्राच्या भक्तिपरंपरेवर असाधारण श्रद्धा असणारा (‘वैकुंठीची माती’ आणि ‘चोखोबाच्या पाठी’ या कथा यासाठीच नीटपणाने समजून घ्याव्यात अशा आहेत), कृषी संस्कृतीवर समंजस प्रेम करणारा, मराठी संस्कृती असो की एकूण जगण्याच्या प्रागतिक विचारांवर अव्यभिचारी निष्ठा असणारा हा लेखक आहे. आपल्या भूमीतून पोषणमूल्ये घेत, विश्वव्यापी होत जाणे हे श्रेष्ठ लेखकाचे वैशिष्ट्य असते. पठारेंसारखा लेखक आपल्या माणसांचा द्वेष न करता, आपल्या परंपरांचा, भाषा-रूढी-प्रथांचा जेव्हा आधुनिक पद्धतीने शोध घेऊ लागतो, तेव्हा या लेखकाचे पहाडासारखे असणे कळायला लागते.
पठारेंच्या शैलीच्या प्रयोगाबाबत ‘नामुष्कीचे स्वगत’ या कादंबरीचे उदाहरण देता येईल. प्रख्यात समीक्षक म. सु. पाटील म्हणतात, ‘‘ही शैली सामान्य लेखकाला सहज पेलणारी नाही. तिच्या मागे माणसाबद्दल आणि जीवनाबद्दल एक प्रगाढ सहानुभूती आणि समज असलेले मन आहे. पठारे यांची शैली ही सहज अनुकरण करता येईल अशी नाही. त्यामागील मेहनत दिसत नसली तरी ती परिश्रमपूर्वक घडवलेली शैली आहे; आपल्या परिसरातील बोलभाषा आणि प्रमाणभाषा याच्या बेमालूम मिश्रणातून ती साकार झालेली आहे. तेव्हा बोलभाषेने संस्कारित अशी जी आपली भाषा आहे ती आपल्या अभिव्यक्तीचे सहज माध्यम म्हणून वापरताना कोणतीही दडपणे मानण्याची गरज नाही, असा आत्मविश्वास पठारे यांची ही शैली नव्या लेखकांच्या मनात जागवणारी ठरेल.”
पठारे फक्त शैलीच्या पातळीवरच अनेक शक्यतांशी खेळतात, असे मात्र मानता येणार नाही, जगण्याच्याही अनेक शक्यतांचा शोध ते सतत घेत असतात. हेच त्यांचे एका परीने ‘मोठे असणे’ आहे. जुन्यांचे अकारण गौरवीकरण न करता, त्यातल्या सामर्थ्याचाही शोध घेऊन सर्वंकष आधुनिकतेचा मार्ग प्रशस्त करणारा, रंगनाथ पठारेंसारखा लेखक मराठी भाषेत असावा ही बाब अतिशय देखणी वाटावी, मनाला आल्हाद देणारी वाटावी अशीच आहे.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment