राजन गवस : भारतीय लेखकाला वास्तववादी परंपरेचं विस्तारशील रणांगण असल्यामुळे श्रेष्ठ प्रतीची कादंबरी लिहिता येते, हे सिद्ध करणारा लेखक
पडघम - साहित्यिक
अशोक बाबर
  • ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना राजन गवस
  • Sat , 04 February 2023
  • पडघम साहित्यिक राजन गवस Rajan Gavas महाराष्ट्र फाउंडेशन Maharashtra Foundation

ज्येष्ठ कथा-कादंबरीकार राजन गवस यांना ‘महाराष्ट्र फाउंडेशन’ (अमेरिकेचा)चा २०२२चा ‘वाङ्मयप्रकार पुरस्कार (कथा-कादंबरी)’ मिळाला. तो त्यांना नुकताच, म्हणजे २८ जानेवारी २०२३ रोजी पुण्यात ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते समारंभपूर्वक देण्यात आला. त्यानिमित्ताने प्रसिद्ध विनोदी साहित्यिक मुकुंद टाकसाळे यांनी संपादित केलेल्या ‘महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) : स्मरणिका २०२३’मध्ये प्रकाशित झालेला हा लेख...

.................................................................................................................................................................

राजन गवस हे १९८०च्या दशकातले एक महत्त्वाचे कादंबरीकार म्हणून प्रस्थापित झाले असले तरी त्यांचा मूळ पिंड हा एक संवेदनशील कवी आणि गोष्टी सांगणाऱ्या एका कहाणीकाराचा आहे. ही संवेदनशीलता कोकणशी लगटून असलेल्या गडहिंग्लज, आजरा, गारगोटी आणि कर्नाटकच्या सीमेलगतच्या प्रदेशातील कृषी-संस्कृतीमधील लोकजीवनातील दुःखद् जीवन कहाण्यांमधून निर्माण झालेली आहे. या कृषी-संस्कृतीमधील संवेदनशीलतेमधून निर्माण झालेली त्यांची लेखनावरची श्रद्धा साहित्याच्या एका विस्तृत समाजशास्त्रीय चिंतनशीलतेशी जोडलेली आहे. त्यांचे समग्र साहित्य : कविता, कथा, ललित गद्य, संशोधन आणि कादंबरी, हे कृषी-संस्कृतीत असणाऱ्या समष्टीकेंद्री जीवन् दृष्टीने जरी प्रभावित असलं तरी त्यांनी आजूबाजूच्या चिंतनशील सामाजिक चळवळीमधून आपल्या वैचारिक वाढीसाठी सामाजिक, सांस्कृतिक असणारे तत्कालीन स्रोत स्वतःमध्ये जिरवून सशक्त केलेले आहेत.

गरिबीचे चटके सोसणाऱ्या तरुणांमध्ये असणारं मार्क्सवादाबद्दलचं आकर्षण आणि समाजवादी चळवळीशी लगटसुद्धा गवस यांच्या जडणघडणीत कारणीभूत ठरली. पण या चळवळीचं नातं त्यांनी आपल्या साहित्यिक प्रेरणेसाठी म्हणून सांधून घेतलं. अशाच एका वेगात त्यांची ‘उचकी’ ही एक अप्रतिम कथा ‘सत्यकथे’मध्ये प्रसिद्ध झाली आणि गवस यांचा साहित्यिक प्रवासाचा आत्मविश्वास वाढू लागला.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

डॉ. जे. पी. नाईक यांची गांधीप्रणित देशी विचारधारा त्यांनी गारगोटी येथील त्यांच्या शिक्षक ट्रेनिंगमध्येच रिचवली होती. म्हणून त्यांना स्त्रियांच्याबद्दल प्रचंड कळवळा तर आहेच, पण त्याबरोबर प्रत्येक शोषितांबद्दल त्यांना प्रमाणाबाहेर कणव आहे. त्यांच्या साहित्याची तुलनाच करायची झाली तर ती यु. आर. अनंतमूर्तीच्या कथा आणि कादंबऱ्यांशी करता येईल. अनंतमूर्ती हे स्त्री दुःखाच्या कहाण्या परसदारातल्या स्त्रियांच्या कथनातून शोधतात. गवस यांच्या कथांचं मूळ असंच शोधता येईल. त्यांच्या समग्र साहित्यात कृषी साहित्य संस्कृतीचं चित्रण ढोबळ किंवा भाबडेपणाने मुळीच येत नाही. त्याच संस्कृतीमधून निर्माण झालेल्या दुष्ट प्रथा, रूढी आणि अन्यायाचा विध्वंस हेही त्यांच्या कथांमधून प्रभावीपणे येत राहतं.. हा विध्वंस घडविण्यासाठी त्यांनी बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांची कमालीची विद्रोही परंपरा आत्मसात केलेली दिसते.

कृषी-संस्कृती आणि फुलेप्रणित आयडियालॉजीमधून साकारलेली गवस यांची जीवनदृष्टी त्यांच्या कविता, कथा, कादंबरी आणि अन्य निबंधांतून सलगपणे आणि एकाच सूत्ररूपाने येते. ‘हुंदका’ या कवितेतील आशय त्यांच्या कथेत येतो आणि तोच आशय कादंबरीत विस्तारतो आणि निबंधांमध्येसुद्धा झिरपतो, असं हे त्यांच्या साहित्यात सलग सूत्र आहे.

‘चौंडकं’ आणि ‘भंडारभोग’ या केवळ जोगता आणि जोगतिणी यांचंच चित्रण करणाऱ्या नसून त्या कादंबऱ्यासुद्धा ‘धिंगाणा’ आणि ‘कळप’ या कादंबऱ्यांच्या आशयसूत्राशी लगटून आहेत. देवदासी चळवळीमधल्या त्यांच्या सहभागामध्ये त्यांना देवदासीची जट सोडवताना जो उग्र वास येत होता, तो वास त्यांच्या नाकातून थेट त्यांच्या मस्तकात भिनलेला आहे. त्याचं प्रत्यंतर त्यांच्या अन्य कथा-कादंबऱ्यांमधूनसुद्धा येत राहतं. किंवा ‘ढव्ह आणि लख्ख ऊन’ ही कथा ‘ब, बळीचा’ या कादंबरीत विस्तारली जाऊन ‘ब, बळीचा अन् भ, भ्रष्टाचाराचा’ या बहुजन बाराखडीत रूपांतरित झाल्याचं आढळतं. ‘ब, बळीचा’ हासुद्धा गवस यांचा ‘हुंदका’च आहे.

गवस यांच्या साहित्यकृती स्वतंत्र तरीही एकरूप आणि एकसूत्री आहेत. ही एकरूपता आणि एकसूत्रीपणा त्यांच्या प्रखर जीवनदृष्टीतून आणि ठोस आयडियालॉजीमधून येतो. गवस ‘यमुना पर्यटन’ परंपरेचा स्रोत मानतात आणि ही परंपरा आशयाच्या अनुषंगाने पुढे नेताना स्वतःची अशी खास शैली अंगीकारतात. ‘हुंदका’ हा अगदी छोटेखानी काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला, पण प्रकाशकाबरोबर झालेल्या वादावादीमुळे असेल कदाचित पुन्हा त्यांनी कविता छापण्याचे कटाक्षाने टाळले. कविता लिहून ठेवल्या आहेत. त्या प्रकाशित झाल्यावर त्यांच्या जीवनदृष्टीचा आणखी ठोसपणे धांडोळा घेता येईल. त्यांच्या सुरुवातीच्या काळातल्या कविता कृषी परंपरेतला रोमँटिकपणा सिद्ध करतात. त्यांची, ‘रानात आलीस तेव्हापासून पाखरं कशी खुळावली.../ पानासकट ऊस हसला, पेरात काकवी डचमळली...’ ही कविता त्या काळात फारच दाद देत राहिली आणि गाजलीसुद्धा. तरीही कृषी संस्कृतीमधील दुःखद जाणिवा, त्यात होणारी स्त्रियांची आबाळ असा आशय व्यक्त करणाऱ्या त्यांच्या कविता श्रेष्ठ दर्जाच्याच आहेत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

गवस यांचे ‘रिवणावायली मुंगी’ आणि ‘आपण माणसात जमा नाही’ हे दोन स्वतंत्र आणि रणधीर शिंदे यांनी संपादित केलेले ‘निवडक राजन गवस’ असे कथासंग्रह प्रसिद्ध झाले असले तरी ते सातत्याने कथालेखन करत असतात.

गवस यांच्या बहुतांश कथा या भारतीय स्त्रीवादी आहेत, असं विधान केलं तरी ते वावगं ठरणार नाही, इतक्या त्या स्त्रीकेंद्री जाणिवा स्पष्ट करणाऱ्या आहेत. कृषी संस्कृतीमधील स्त्रियांचं जगणं, त्यांचे प्रश्न, समस्या, कुटुंब व्यवस्थेतील त्यांचं स्थान, याबद्दल या सर्व कथा बोलत राहतात. भारतीय साहित्य खऱ्या अर्थाने परसदारातच लिहिलं गेलं पाहिजे असं वाटणाऱ्या ‘घुसमट’, ‘हुंदका’, ‘तळ’ इत्यादींसारख्या कथा स्त्रीवादी दृष्टीचं महत्त्व अधोरेखित करतात. भारतीय कृषी संस्कृतीमध्ये या स्त्रिया करारी, धाडसी आणि स्वाभिमानी आहेत.

गवस त्यांची साने गुरुजीप्रणित माणुसकीची स्त्रीविषयक दृष्टी कथावकाशातून साकार करतात. ‘खांडूक’सारखी कथा पुढे ‘भंडारभोग’ या कादंबरीत विस्तारते. गवस यांना ‘छळणाऱ्या गोष्टी’ साहित्यविषयक जीवनदृष्टी देतात, आणि ‘छळणाऱ्या गोष्टी’ कादंबरीत विस्तारतात आणि पुढे संशोधन प्रकल्पसुद्धा त्यांना याच छळणाऱ्या गोष्टींचा शोध घेण्यास भाग पाडतात आणि अशाच प्रकारचे शोध प्रकल्प त्यांनी हाती घेतले आणि संशोधन करत राहिले.

एखादी छळणारी गोष्ट जशी गवस यांच्या डोक्यात भिनभिनत असते, तशीच एखादी समस्या त्यांच्या डोक्यात सतत सलत राहिलेली असते. ती समस्या म्हणजे ‘देवदासींची समस्या’. या देवदासींच्या प्रश्नावर प्रचंड पायपीट करून, खूप मेहनत घेऊन देवदासी चळवळ पुढे नेण्यासाठी गवस यांचा वाटा अत्यंत महत्त्वाचा होता. या चळवळीत अहोरात्र काम करत राहिल्याने त्यांच्या डोक्यात देवदासीचा आशय इतका खचाखच भरला होता की, तो ‘चौंडकं’ या कादंबरीत केवळ एक महिन्यामध्ये शब्दबद्ध केला. पुढे याच कादंबरीचा पुढचा भाग म्हणून ‘भंडारभोग’ ही कादंबरी अत्यंत महत्त्वाची (magnum opus) ठरली. ‘चौंडकं’मधील ‘सुली’ आणि ‘भंडारभोग’मधील ‘तायाप्पा’ हे आता जोगतीण आणि जोगता यांची मिथक् सृष्टी निर्माण करणारी ठरली आहेत, इतक्या प्रभावीपणे गवस यांनी त्यांची रचना केलेली आहे. रणधीर शिंदे यांच्या म्हणण्यानुसार ‘गवस यांनी या कादंबऱ्यांतून समस्याप्रधानतेबरोबरच एक विचारविश्वही उभं केलं आहे’.

‘धिंगाणा’ ही कादंबरी वाचताना बऱ्याच वेळा भाऊ पाध्ये यांच्या ‘वासूनाका’ या कादंबरीशी तुलना करण्याचा वाचकांना मोह होतो. त्याचं कारण गवस यांनी भाऊ पाध्ये यांच्या साहित्यावर केलेलं संशोधन हेच असावं; पण ‘वासूनाका’ आणि ‘धिंगाणा’ या दोन्ही कादंबऱ्यांची आणि कादंबरीकारांचीसुद्धा संवेदनशीलता या तुलनेस बाधा आणते. ही संवेदनशीलता केवळ ग्रामीण आणि नागर अवकाशापुरती नसून जीवनविषयक आणि जगण्या-मरण्याच्या धडपडीतून निर्माण झालेली आहे.

‘धिंगाणा’मधील तरुण पदवीधर सभोवतालच्या वास्तवाला शह देण्यासाठी सगळे उपद्व्याप करतो, पण त्यातून तो निराश होतो. परंतु भाऊ पाध्यांच्या ‘वासूनाका’मध्ये पोरवयात बकाल वस्तीतले बकाल आयुष्य जगत असताना बिघडलेल्या अतृप्त लैंगिक वासना चित्रित झालेल्या दिसतात. तरीही भाऊ पाध्ये आणि गवस दोघेही कादंबरीकार नवनैतिकतावादी देशी परंपराच नेहमी पुढे नेण्याचा प्रयत्न करतात; ग्रामीण किंवा नागर अशी विभागणी इथे अप्रस्तुत ठरते.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

त्याच पद्धतीने ‘कळप’ या कादंबरीतील रघु चिलमी याची कहाणी ‘साठात जन्मलेल्या आणि ऐंशीत चेहरा हरवलेल्या तरुणाचं’ सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेशी असलेलं नातं अधोरेखित करतं. काहीतरी अर्थपूर्ण शोधणाऱ्या तरुणांच्या हाती शेवटी निराशा येते; त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे समकालीन सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्षेत्रातील ढोंगीपणा आणि अशा ढोंगी लोकांचे ‘कळप’ जे साहित्य विश्वालासुद्धा मोकळे सोडत नाहीत.

गवस यांची ‘तणकट’ ही कादंबरी साहित्य अकादमीच्या मानाच्या पुरस्कारास पात्र ठरली. या कादंबरीने ‘दलित साहित्य’ या संकल्पनेलाच छेद दिला. ही कादंबरी लिहिताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विशेषत: ‘कास्ट इन इंडिया’, ‘एनहिलेशन ऑफ कास्ट’, ‘मुक्ती कोण पथे’, मातंग तरुणाचं आंबेडकरांना लिहिलेलं पत्र आणि आंबेडकरांनी त्याला दिलेलं उत्तर, हे सगळं पार्श्वभूमीला ठेवून गावगाड्याची कहाणी गवस यांनी साकार केली आहे. कबीर कांबळे आणि मोहन बल्लाळ ही नायकाची जोडी आंबेडकरप्रणित देशी जाणिवा जागृत करते, पण बाळू शेडबाळेच्या रूपाने ‘तणकट’ पेरलं जातं आणि मूळच्या आंबेडकरी पिकाचा नाश करतं. अशा प्रकारची कादंबरी मराठीत क्वचितच लिहिली गेली असावी; परंतु जातीयवादी वाचन या कादंबरीच्या मौलिकतेस बाधा आणते.

‘ब, बळीचा’ ही गवस यांची अत्यंत महत्त्वाची, एक उत्कृष्ट नमुना (master piece) ठरावी अशी कादंबरी. या कादंबरीची रचना करताना गवस यांनी कथानकामध्ये उच्च प्रतीची सर्जनशील ऊर्जा भरून त्या ऊर्जेची तीव्रता वाढवत वाढवत कथानक गतिमान केलं आहे. या कादंबरीतील प्रमुख पात्र कल्लप्पा कोणकेरी याच्या गायब होण्याचं गूढ हे अनेक उपकथांच्या साहाय्याने, विविध साहित्य प्रकारांच्या साह्याने, एकाच कोंदणात ठेवलं आहे. ही सर्व उपकथानकं गुंफताना त्यांनी एकोणिसाव्या, विसाव्या आणि एकविसाव्या शतकातील समांतर आणि विरोधी असणाऱ्या प्रश्नातून निर्माण होणारी खरी आणि खोटी नैतिकता, वास्तव आणि काल्पनिक आशयघनता, बहुजन आणि अभिजनांची नैतिकता, एकमेकांसमोर ठेवल्या आहेत.

‘ब बळीचा’ ही जोतीराव फुले, गांधी आणि आंबेडकरप्रणित भारताची संस्कृती समीक्षा आहे. ती भारताच्या विचार प्रणालीच्या संघर्षाची कहाणी आहे. ही कथा उलगडताना गवस यांनी आंबेडकरांचा अनुकरणाचा संसर्ग हा महत्त्वाचा सिद्धांत मानून ‘ब, बळीचा’ हा एक ‘बळी ते वामन’ हा प्रवास ‘ब, बळीचा अन् भ, भ्रष्टाचाराचा’ या सांस्कृतिक बहुजन बाराखडीत मांडला आहे. भारतीय लेखकाला भारतीय वास्तववादी परंपरेचं विस्तारशील रणांगण असल्यामुळे श्रेष्ठ प्रतीची कादंबरी लिहिता येते, हे गवस यांनी सिद्ध करून दाखवलं आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......