लेखक म्हणून मला ‘संवाद’ ही गोष्ट अतिशय महत्त्वाची वाटते... ती टिकून राहायला हवी...
पडघम - साहित्यिक
गणेश मतकरी
  • ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह आणि लेखक गणेश मतकरी
  • Sat , 04 February 2023
  • पडघम साहित्यिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan गणेश मतकरी Ganesh Matkari

९६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कालपासून वर्धा इथे सुरू झाले. उद्या, रविवारी या संमेलनाचा समारोप होईल. या संमेलनात काल संध्याकाळी ‘आम्हा लेखकांना काही बोलायचे आहे’ या विषयावरील परिसंवाद झाला. त्यात रवींद्र शोभणे, प्रवीण दवणे, गणेश मतकरी आणि पी. विठ्ठल हे लेखक सहभागी झाले होते. त्यापैकी सिनेसमीक्षक, कथाकार गणेश मतकरी यांचे हे मनोगत...

..................................................................................................................................................................

​​​​मुळात हा विषय खूप मोठा आहे. यात राजकीय विचारांपासून ते व्यक्तिगत प्रतिसादापर्यंत, काय वाटेल ते येऊ शकतं. माझ्या मते हा काळ बदलांचा आहे. माध्यमांची आक्रमणं, पुस्तकाच्या व्याख्येतले बदल, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंबंधातले मुद्दे, अशा अनेक घटकांचा विचार या बाबतीत शक्य आहे. त्या दृष्टीने मी बऱ्याच मुद्द्यांना थोडक्यात मांडायचा प्रयत्न केला आहे.

मराठी साहित्याला लेखकांची आणि वाचकांचीही अतिशय मोठी परंपरा आहे. गंभीर साहित्यापासून ते लोकप्रिय वळणाच्या रचनांपर्यंत आणि काव्यापासून ललितेतर साहित्यापर्यंत (नॅान-फिक्शन) सर्व प्रकारचं लेखन आपल्याकडे झालेलं आहे, होतंय, आणि होत राहील अशी अपेक्षा आहे. पिढीप्रमाणे, बदलत्या विचारांप्रमाणे, तत्कालीन राजकीय, सामाजिक आणि वैचारिक वातावरण, तसंच भिन्न विचारधारांमुळे यात बदल होतच असतो. आणि त्यामुळे मध्येमध्ये भाषा टिकेल का, साहित्यनिर्मितीच्या प्रमाणात घट होईल का, या प्रकारचे प्रश्न उपस्थित होतच असतात.

त्याबरोबरच अलीकडे एक आणखीही वेगळा प्रश्न विचारला जायला लागलाय, तो म्हणजे पुस्तकं टिकतील का? पुस्तकं म्हणजे छापील पुस्तकं. आयपॅड, किंडल यांसारख्या टॅब्लेट्समधून आणि भल्या मोठ्या आकाराच्या फोन्समधून भरपूर प्रमाणात साठवली जाणारी आणि क्वचित वाचलीही जाणारी पुस्तकं, त्याबरोबरच मौखिक परंपरेशी नातं जोडता येणारी ऑडिओ-बुक्स हे दोन्ही प्रकार आता लक्षणीय प्रमाणात लोकप्रिय होत चालले आहेत.

यांना पुस्तकं म्हणायचं का? म्हणायला हवं, कारण मुळात लेखकाने पुस्तक म्हणून उतरवून काढलेला, किंवा अलीकडलं म्हणायचं तर टाईप केलेला सारा मजकूर यांमध्ये जसाच्या तसा वाचकांना वाचायला वा ऐकायला मिळतो, पण तरीही, ही ट्रॅडिशनल स्वरूपाची पुस्तकं नाहीत. आपल्याकडे बहुसंख्य वाचक हे टॅब्लेटपूर्व, स्मार्टफोनपूर्व काळातले आहेत आणि पुस्तकं विकत घेणाऱ्यांमध्ये, आणि ती वाचणाऱ्यांमध्येही या वाचकांचं प्रमाण मोठं आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

आपण सोशल मिडियावरच्या अनेक पुस्तकप्रेमी गटांमध्ये फेरफटका मारला, तर आपल्याला दिसून येतं, की या वाचकांना नव्या सुविधा उपलब्ध असल्या तरी त्यांच्या दृष्टीने पुस्तक म्हणजे तेच. जे आपल्याला हाताळता येतं, टॅब्लेट पडून फुटण्याची चिंता न करता आडवं पडून वाचता येतं, ज्याला एक विशिष्ट प्रकारचा वास असतो. पुढल्या काळात हा ‘कन्वेन्शनली’ पुस्तकप्रेमी वाचक किती राहतो, यावर पुस्तकांचं अंतिम स्वरुप ठरेल, तरीही पुस्तकं पूर्णत: नव्या रूपात येण्याची शक्यता नाही.

(अगदी जागतिक स्तरावरही या प्रकारच्या चर्चा झालेल्या आहेत. अशा एका चर्चेचं पुस्तकही माझ्याकडे आहे, ज्याचं नावच ‘धिस इज नॅाट द एन्ड ऑफ द बुक’ असं आहे.) तर अशा वाचन, लेखन, माध्यम, यांमध्ये झपाट्याने होणाऱ्या बदलाच्या काळात आजचा लेखक लिहितो आहे.

समाजमाध्यमं आणि इतर, मनोरंजनाची माध्यमं यांचा सुळसुळाट, आणि त्यांचा लेखन वाचनावर होणारा परिणाम, हादेखील एक विषय मला महत्त्वाचा वाटतो. या दोन्ही गोष्टींचा आताच्या लेखनावर आणि हे लेखन वाचलं जाण्यावर अगदी थेट परिणाम झालेला आहे.

मी जेव्हा शाळेत होतो, (मी दहावीपर्यंतचं शिक्षण मराठी शाळेतून केलंय, त्यानंतर दोन वर्षं सायन्स, आणि मग पाच वर्षं आर्किटेक्चर), तर मी जेव्हा शाळेत होतो, तेव्हा टीव्ही हा प्रकार फारच बेतास बात होता. एकतर तो आठवडाभर फक्त संध्याकाळ ते रात्र आणि केवळ एक चॅनेलपुरता असायचा, आणि शनिवार-रविवारचे सिनेमा वगळता त्यावर हिंदी सिनेमातल्या गाण्यांचे कार्यक्रम वगैरे यांसारखं क्वचितच काही पाहाण्यासारखं असायचं. त्यामुळे मुलांसाठी वाचन हा प्रमुख विरंगुळा होता. (माझ्या स्वत:च्या बाबतीत पाहिलं, तर मी दोन वाचनालयांचा सभासद होतो. साहित्यासाठी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि कॉमिक्स वाचण्यासाठी शिवाजी पार्कजवळ वसंत वाचनालय. त्याशिवाय माझे वडील रत्नाकर मतकरी आणि आजोबा नाट्यसमीक्षक माधव मनोहर, यांचे व्यक्तीगत संग्रह बरेच मोठे होते, जिथूनही माझी उचलेगिरी चालू असायची. आमच्या शाळेचं ग्रंथालय फारसं मोठं नव्हतं, पण त्याने मला फार फरक पडला नाही.)

त्या दिवसांत मराठी शाळांचं प्रमाण अधिक होतं, या शाळाही चांगल्या होत्या, पालकांमध्ये शिक्षणाच्या दर्जावरून चिंता करण्याचं प्रमाण वाढलेलं नव्हतं. त्यामुळे तयार होणारा मराठी वाचक हा खूप मोठ्या प्रमाणात होता. याला पुस्तकांची आवड आणि उपलब्धता हे एक कारण होतं, तसा मनोरंजनाच्या इतर साधनांचा अभाव, हेदेखील एक कारण होतं. त्यामुळे अलीकडे जेव्हा पालक आपल्या मुलांना सांगतात की, आमच्या वेळी आम्ही इतकं वाचायचो, आणि तू सगळा वेळ टीव्ही बघतोस किंवा गेम्स खेळतोस, तेव्हा त्यातला अपरिहार्यतेचा भाग ते विसरलेले असतात. त्यांच्या काळात जर हे सगळं असतं, तर त्यातलेही अनेक जण आज मुलं जे करतायत, तेच करत राहिले असते.

पण कारण काही असो, वाचक तयार होण्याचं प्रमाण मोठं होतं ही गोष्ट आहेच. आजची मुलं ज्या गोष्टी करतात, ओटीटी पाहतात, गेम्स खेळतात, अधिकृत वा अनधिकृत मार्गांनी सिनेमे, सिरिअल्स डाऊनलोड करतात, तेव्हा मला त्याचं आश्चर्य वाटत नाही. ही मुलं दृश्यसाक्षरतेच्या काळात जन्माला आलेली आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी दृश्यभाषा ही आधीच्या पिढ्यांना भाषा होती, तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांच्या तसं असण्याबद्दल तक्रार न करता, तरीही त्यांना वाचनाकडे वळवता येईल का, आणि त्यांना रस वाटेल असं कोणत्या प्रकारचं साहित्य लिहिलं जातय, लिहिलं जावं, असा एक नवा प्रश्नही आमच्यासाठी उपस्थित आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या नव्या समाजाची भाषा, त्याचे विषय, त्याची दृश्यसाक्षरता, या सगळ्याचाच विचार लेखक म्हणून मला करावासा वाटतो. बदलती कुटुंबव्यवस्था, बदलती समाजरचना, इन्टरनेट/ फोन्सचं जाळं यांमधून आज प्रत्येकाच्या व्यक्तीगत अवकाशावरही परिणाम झाला आहे. आज आपण एकाच वेळी सर्वांशी जोडलेले, तरीही आपल्या व्यक्तीगत चौकटीने बांधले गेलेलो आहोत. दोन पिढ्या पूर्वीची समाजरचना आणि आजची समाजरचना यात मूलभूत स्वरूपात फरक पडलाय, असं मला वाटतं. हा बदल साहित्यातून व्यक्त कसा होईल हे पाहणं, हे एक मोठं आव्हान आहे.

मला असंही वाटतं की, पूर्वी जो भेद शहरं आणि गावं यांच्यात होता, मग तो राहणीमानात असेल, एक्पोजरमध्ये असेल, आणखी कशात असेल, हा भेद हळूहळू कमी होण्याची ही सुरुवात आहे. इंटरनेटने आपल्या सर्वांना एका पातळीवर आणलंय. मुलं, तरुण, शहरांमधले असोत वा गावातले, आज एकसारख्याच गोष्टी पहातायत, वाचतायत, सोशल मीडियाने त्यांना जे व्यक्त होण्याचं साधन देऊ केलंय. स्मार्टफोन्स सगळीकडे पोचले आहेत. केवळ नव्या फिल्म्स पहाणंच नाही, तर त्या करणं शक्य झालंय. मी अनेकदा चित्रपट रसास्वादाच्या व्याख्यानांच्या निमित्ताने वेगवेगळीकडे फिरतो. या छोट्या शहरांत, गावांत मुलांना असलेली माहिती, त्यांनी पाहिलेल्या फिल्म्स, त्यांना माहीत असणारे दिग्दर्शक, त्यांना पडलेले प्रश्न मुंबईतल्या मुलांना पडलेल्या प्रश्नांपेक्षा वेगळे नसतात. किंबहुना मुंबईतल्या मुलांपेक्षा शिकण्याची, नवं काही करण्याची अधिक प्रबळ इच्छा मला छोट्या शहरांमध्ये दिसलेली आहे. त्यामुळे मला एकूणच वाटतं की, पूर्वी गाव आणि शहर यात असलेलं अंतर आता कमी झालंय आणि दिवसेंदिवस ते अधिकच कमी होईल. चालीरिती, व्यवस्था, यांमधले बदल तसेच राहिले, तरी आपण एका ‘इक्वीलिब्रिअम’च्या दिशेने पुढे सरकतोय, असं मला वाटतं.

सोशल मीडियाचा उल्लेख केल्याने आता त्याविषयी बोलायला हवं. मघाशी मी लेखन-वाचन यावर थेट परिणाम करणारी गोष्ट म्हणून त्याचा उल्लेख केलाच. समाजमाध्यमांनी एक प्रमुख गोष्ट केली- जी अगदी महत्त्वाची आहे, आणि माध्यमाच्या दुष्परिणामांबद्दल आपण कितीही बोललो, तरी त्याने या एका गोष्टीचं महत्त्व कमी होत नाही. आणि ती गोष्ट म्हणजे ‘लेखणीचं लोकशाहीकरण’. समाजमाध्यमांनी प्रत्येकाला आवाज दिला, प्रत्येकाला व्यक्त होण्याची संधी दिली, प्रत्येकाला आपण लिहू शकतो, याची जाणीव करून दिली. पूर्वी आपण काही लिहिलं आणि आपल्याला ते इतरांपर्यंत जायला हवं असेल, तर मासिकं, वृत्तपत्र हाच पर्याय होता. आणि तिथले संपादक या माध्यमांचे ‘गेटकीपर्स’ होते. जर लिहिलेला मजकूर वृत्तपत्राच्या भूमिकेला अनुसरून नसेल, वा अन्य काही कारणाने तो आवडला नसेल, तर तो नाकारण्याची मुभा संपादकांना होती.

याचे फायदे होतेच. म्हणजे संपादक संस्कार करू शकत, लेखात मांडलेला विचार ठळक होण्यासाठी काय रितीने तो लिहिता येईल, याबद्दल ते अनुभवसिद्ध मार्गदर्शन करू शकत. मात्र त्याचबरोबर तो लेख थांबवणं, हेदेखील त्यांच्या हातात होतं. समाजमाध्यमाने ‘फॉर बेटर ऑर वर्स’, संपादकाला ‘एलिमिनेट’ केलं. आपण कधी काळी लिहू अशी कल्पनाही नसलेले लेखक यातून तयार झाले. मराठी कमी होतेय, आजच्या तरुणांना मराठी लिहायचं नाही, वाचायचं नाही अशी ओरड सुरू असताना इतक्या मोठ्या संख्येने तरुण मराठीत लिहायला, त्या भाषेतून संवाद साधायला लागले. हा एक मोठा फायदा आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

आता तोटे.

यात नव्या लेखकांसाठी मला एक मोठा तोटा दिसतो, तो म्हणजे ‘इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन’, आणि वाचकांसाठी तोटा म्हणजे ‘अटेन्शन स्पॅन’ कमी होणं.

जेव्हा फेसबुकवर लिहिण्याची सवय होत जाते, तसं आपल्याला सुचलेलं लगेच कोणासमोर तरी मांडावं असं वाटायला लागतं. आपण नियमित लिहायला लागलो की, आपला एक वाचकवर्ग तयार होतो आणि त्या वाचकवर्गाचा प्रतिसाद आपल्याला महत्त्वाचा वाटायला लागतो. येणारी लाईक्सची संख्या, कमेन्ट्स, यात आपण रमतो, आणि लेखकाला जो पेशन्स हवा, तो शिल्लक रहात नाही. एका विशिष्ट प्रकारच्या मांडणीची सवय होते आणि मर्यादा पडत जाते. मोठे लेख, कथा, या प्रकारचं लिहिताना आपल्याला काही एक वेळ त्यावर घालवावा लागतो. काही प्रमाणात चिंतन अपेक्षित असतं. त्याचा विचार करावा लागतो, पहिलाच खर्डा जमला आहे, का काही संस्काराची गरज आहे, हे पहावं लागतं. लाईक्सच्या आहारी गेलं, तर हे शक्य होत नाही.

फेसबुकवर पुष्कळ वेळ घालवणारा वाचक हा बहुतेकदा छोट्या रचना चटकन वाचतो, पण मोठं पुस्तक, कादंबरी त्याच्यासमोर ठेवली, तर त्याचं लक्ष लागत नाही, त्यात हल्ली फोन्ससारखी अनेक ‘डिस्ट्रॅक्शन्स’ असतात, ज्यात तो अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे वाचकांचं आणि लेखकांचंही प्रमाण वाढलं तरी यातल्या साहित्याकडे वळणाऱ्या लेखकांचं आणि वाचकांचं प्रमाण हे कमी असतं. याला अपवाद आहेत, पण हे अधिक जनरल स्वरूपाचं निरीक्षण आहे.

लेखक म्हणून मला याहून अधिक गंभीर तोटे वाटतात, ते मात्र तुच्छतावादाचा प्रसार आणि राजकीय गटबाजीतून होणारा समाजमाध्यमांचा गैरवापर हे दोन. आपल्यातल्या बहुतेकांनी हे तोटे अनुभवले असतील. काही वेळा या दोन्ही तोट्यांची सरमिसळही आपल्याला दिसते.

पूर्वी टेलिफोनवर आपली ओळख लपवून शिवीगाळ करणं, धमक्या देणं असा एक प्रकार होता. अलिकडच्या काळात लोकांना प्रत्यक्ष न भेटता ऑनलाईन नोकरीवरून काढून टाकणं, अशा गोष्टी होताना आपण पहातोच. समोर न येण्याने लोकांना एक बळ मिळतं. व्यक्ती समोर असली, की तिच्याशी बोलताना जो सभ्यपणा आपसूकच आपल्यातल्या अनेकांमध्ये असतो, तो सभ्यपणा, तो चांगुलपणा, सोशल मीडियामध्ये दाखवायची गरज पडत नाही.

मी अनेकदा पाहिलंय की, जरी आपण आपलंच नाव ऑनलाईन वापरत असलो, तरी आपली ऑनलाईन पर्सनॅलिटी प्रत्यक्ष व्यक्तिमत्त्वापेक्षा वेगळी असते. जर टोपणनावच असेल तर गोष्टच वेगळी. या ऑनलाईन व्यक्तिमत्त्वात प्रत्येक जण समीक्षकाचा मुखवटा धारण करतो आणि मग साहित्य, नाटक, सिनेमा यांवर अत्यंत जहाल शब्दात मतं व्यक्त केली जातात. खरं तर फेसबुकसारखं मोठी शब्दमर्यादा असणारं माध्यम चर्चेसाठी उत्तम माध्यम आहे. अनेक लेखक, नाटककार, दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ, समीक्षक हे फेसबुकवर वावरत असतात, आणि सभ्य शब्दांत संवाद साधला तर त्यांची बोलण्याची तयारी असते. मला स्वत: लाही अनेकदा फेसबुक मेसेंजरवर लोकांनी प्रश्न विचारलेले आहेत. वाचनासंबंधी, शिफारशीसंबंधी, फिल्ममेकिंग संबंधी. कोणीकोणी चित्रपटाबद्दलची आपली मतं सांगून त्याबद्दल काही प्रश्न विचारले आहेत. पण अलीकडे वाढतं प्रमाण आहे, ते कलाकृतीबद्दल निकाल देण्याचं, म्हणजेच तिचा निकाल लावण्याचं किंवा तिची टिंगल करण्याचं… चर्चा करण्याचं नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

खरं तर आपण एका वैशिष्ट्यपूर्ण काळात राहतो आहोत. याआधी कधीही आपली मतं सहजपणे थेट कर्त्यापर्यंत पोचवण्याची संधी रसिकांना मिळाली नव्हती. पण आता ती मिळालीय, तर कोणीही तिचा योग्य तो फायदा करून घेताना दिसत नाही. केवळ वरवरचं कौतुक, किंवा जहाल टीका, यासाठी हा वापर अधिक प्रमाणात होतो. याचा फायदा ना प्रतिसाद म्हणून लेखक-दिग्दर्शक-अभिनेत्यांना होतो, ना वाचका, रसिकांना. आणि याहून पलीकडचं टोक असतं, ते ट्रोलिंगचं.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आपल्याकडे अनेक वर्ष चर्चेत आहे. तो राजकीय भूमिकेशी जोडलेला आहे, आणि त्यातून लेखकांनी, कलावंतांनी काय करावं, काय करू नये, कशावर मतं द्यावीत, कशावर लिहावं, पुरस्कार स्वीकारावे की नाकारावे, यातल्या प्रत्येक गोष्टीवर सोशल मीडियात अत्यंत टोकाची मतं मांडली जातात. पूर्वी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न नव्हता, हे आताच काहीतरी नवीन उगवलेलं आहे, असं मी म्हणणार नाही, कारण हा प्रश्न कायमच होता. माझ्या वडिलांनीही अनेकदा अशा प्रश्नांवर वृत्तपत्रांमधून, सभांमधून आपले विचार मांडलेले आहेत. वेगवेगळ्या आंदोलनांमधेही ते, आणि इतर समविचारी साहित्यिक वेळोवेळी सहभागी झालेले आहेत.

विचारांच्या स्वातंत्र्यावर बांध घालण्याचे प्रयत्न यथाशक्ती, विविध संघटनांकडून, समूहांकडून, पक्षांकडून होतच असतात. पण आता सोशल मीडियाचा यात एखाद्या हत्यारासारखा वापर केला जातो, जे धोकादायक आहे. जी गोष्ट मुळात मुक्त संवादासाठी योग्य आहे, ज्यातून अनेक नव्या कल्पना पुढे येऊ शकतात, संवाद होऊ शकतो, तिचा असा नकारात्मक वापर टाळता आला, तर समाज म्हणून आपल्या सगळ्यांनाच त्याचा फायदा होऊ शकेल. व्यक्त होण्याचं, आपली भूमिका मांडण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकालाच हवं. यावर कोणी असं म्हणू शकतं की, जसं विशिष्ट बाजूने व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य हवं, तसं विरोध करण्याचंही स्वातंत्र्य हवं. तर ते स्वातंत्र्यही आहेच. पण चर्चा ही चर्चेच्याच पातळीवर राहील, तिचं रूपांतर गदारोळात होणार नाही, हे पहायला हवं.

लेखक म्हणून मला संवाद ही गोष्ट अतिशय महत्त्वाची वाटते. ती टिकून रहायला हवी.

या संवादाशी निगडीत अलीकडे चर्चेत असलेल्या आणखी एका मुद्द्यावर थोडक्यात मत मांडतो, आणि थांबतो. काही दिवसांपूर्वी भाषा ही शुद्ध असावी की, ती तशी नसली तरी काही फरक पडत नाही, या गोष्टीवर बरीच चर्चा झाली. ही चर्चादेखील अनेकदा होत असते, आणि माझा स्वत:चाही या तथाकथित शुद्धतेबद्दल काही अनुभव असल्याने मला त्याबद्दल मत मांडावंसं वाटतं. मी आधी म्हणालो त्याप्रमाणे दहावीनंतरचं माझं शिक्षण व्यावसायिक प्रकारचं. त्यामुळे इंग्रजीत झालंय. या काळात मी इंग्रजी मोठ्या प्रमाणात वाचायला सुरुवात केली होती, इतकी की, मराठीचा एक मोठा बॅकलॅाग तयार झाला, जो अजूनही पूर्ण भरलेला नाही. शिक्षणानंतर कामधंद्यातही भाषेचा वापर हा बराच इंग्रजीच होता. त्यामुळे माझं मराठी चांगलं, म्हणजे बऱ्यापैकी असूनही लिहिताना अनेकदा आपसूक इंग्रजी शब्द डोक्यात येतात. चित्रपटांबद्दल लिहिताना टर्मिनॅालॅाजीही बरीच इंग्रजी असल्याने मराठीतही ते डोकवायचे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

मी जेव्हा नियमित लिहायला लागलो, तेव्हा त्यात इंग्रजी शब्द पाहून बाबा म्हणायचे की, एवढे इंग्रजी शब्द का वापरतोयस? एखाद्या अवघड संकल्पनेला इंग्रजीत सोपा आणि लोकांना परिचित शब्द असेल तर हरकत नाही, पण सोपा पर्याय मराठीत उपलब्ध असेल तर इंग्रजी कशाला? यानंतर मी शब्दांचा जाणीवपूर्वक विचार करायला लागलो. काही वेळा तर अगदी अवघड शब्दांचे (उदाहरणार्थ मेटॅफिजिकल) समानार्थी शब्द मी माझ्या प्राध्यापक मित्रांनाही विचारले, पण नंतर मला जाणवलं की, अनेकदा आपल्या डोक्यात आलेला पहिला शब्द इंग्रजी असेल, तर तसा तो येण्यामागे काही एक कारण असतं. त्या शब्दाच्या अर्थाची विशिष्ट छटा, त्याचं वजन, त्याचा पोत, असं काहीतरी, आणि जर तो शब्द वाचकाला कळण्याजोगा असेल, तर का वापरू नये? माझ्या फिक्शनमध्येही इंग्रजी शब्दांचा वापर असतो, पण तो अवघड, न कळणारा नसतो. माझं ‘खिडक्या अर्ध्या उघड्या’ नावाचं एक पुस्तक आहे, त्यात असा वापर आहे. ते छपाईला जात होतं, तेव्हा आम्ही हा एक प्रयत्न करून पाहिला की, कोणाला जर एखादा शब्द अडला, तरी इतर वाक्य, संदर्भ यावरून अर्थ स्पष्ट होतोय ना.

विशिष्ट प्रांताशी, बोलीशी निगडीत पुस्तकं मी शाळेपासून वाचतोय, त्यामुळे इंग्रजीमिश्रीत मराठी ही आमच्या प्रांताची, व्यवसायाची बोलीभाषा असल्यासारखीच मला वाटते. शेवटी महत्त्वाचं आहे ते आपण मांडतोय, ते दुसऱ्यापर्यंत पोचणं. फिक्शनमध्ये, तसंच लेखांमधूनही. त्यामुळे शुद्धता की संवाद, यांमध्ये माझं मत तरी संवादाच्या बाजूलाच अधिक झुकलेलं आहे.

बोलण्यासारख्या इतरही गोष्टी आहेत. पण आपली वेळाची मर्यादा लक्षात घेऊन मी इथे थांबतो. मला बोलायची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार.

.................................................................................................................................................................

लेखक गणेश मतकरी सिनेसमीक्षक, कथाकार आहेत.

ganesh.matkari@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......