माणसाचे मन मूलतःच स्वतंत्र असते. सगळ्या फॅसिस्टांची आणि हुकूमशहांची तीच खरी अडचण असते...
पडघम - साहित्यिक
नरेन्द्र चपळगावकर
  • संमेलनाध्यक्ष नरेन्द्र चपळगावकर आणि ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह
  • Fri , 03 February 2023
  • पडघम साहित्यिक नरेन्द्र चपळगावकर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

९६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून वर्धा इथे सुरू झाले आहे. रविवारी या संमेलनाचा समारोप होईल. या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध लेखक, चरित्रकार आणि मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती नरेन्द्र चपळगावकर यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा दुसरा अंश...

..................................................................................................................................................................

वैचारिक वाङ्मय म्हणजे काय?

वैचारिक वाङ्मयाचा विचार करताना शास्त्रीय, तत्त्वज्ञानपर आणि माहितीपर लेखन यांच्यात आणि वैचारिक लेखनात असलेला फरक लक्षात घेतला पाहिजे. निरनिराळ्या शास्त्रांमध्ये भर टाकणारे, नवी शास्त्रेच निर्माण करणारे विचार महत्त्वाचे असतात. त्यांची जगाच्या परिवर्तनाला मदतही होते. परंतु अशी विज्ञानाने सिद्ध केलेली नवी सत्ये सांगणे हेसुद्धा अवघड असते. पृथ्वी गोल आहे, हे आज सर्वमान्य असलेले सत्य सांगणाराला धर्मसत्तेचा छळ सोसावा लागला होता. जे ‘बायबल’मध्ये नाही किंवा प्रचलित समजुतीत नाही ते सांगणे, हे धर्मबाह्य कृत्य आहे, असे मानले जात होते. अनेक प्रकारची माहिती वाचकांना सुसंगतपणे देणारे माहितीपर लिखाणही कित्येक वेळा महत्त्वाचे असते, तत्त्वज्ञानातसुद्धा अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात. अनेक बुद्धिमंत त्याचा नव्याने विचार करतात. असे अनेक थोर तत्त्वज्ञानी आपल्या प्राचीन संस्कृतीतही होऊन गेले.

आधुनिक काळातसुद्धा ती परंपरा चालवणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि मेघश्याम पुंडलिक रेगे यांचे कार्य तर अगदीच ताजे आहे. शास्त्रीय, तत्त्वज्ञानपर अगर सखोल माहिती देणारे लेखन महत्त्वाचे असते. परंतु या सगळ्याला वैचारिक लेखन म्हणता येणार नाही. एखादा तत्त्वज्ञ विचारवंतही असू शकतो, पण या दोन्ही भूमिका वेगवेगळ्या आहेत. लक्ष्मणशास्त्री जोशी आणि मे.पुं. रेगे या दोघांनी या दोन्ही भूमिका बजावल्या आहेत. तत्त्वज्ञानात महत्त्वाची भर टाकणारे बट्रॉन्ड रसेल यांनी वैवाहिक जीवनात आधुनिक काळात निर्माण झालेल्या समस्यांचा विचार करून ‘Marriage and Morals’ (‘विवाह आणि नीती’) या नावाचे एक पुस्तकच लिहिले आहे. या पुस्तकाचे लेखक म्हणून त्यांची भूमिका विचारवंताची आहे.

वैचारिक वाङ्मयाचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे ते एखाद्या सामाजिक प्रश्नाबाबत, समस्येबाबत आपली मते सांगत मार्गदर्शन करण्यासाठी लिहिले असते. त्याचा उद्देशच समाजाचे परिवर्तन हा असतो. आपले विचार समाजाने लक्षात घ्यावेत, हीच त्या लेखनकर्त्याची अपेक्षा असते. समाजापुढील एखाद्या प्रश्नाविषयी मते मांडणारे सर्वच लेखन वैचारिक समजता येईल का? आणखी एक निकष उपयोगात आणावा लागतो. मूलभूत मानवी मूल्यांशी सुसंगत असलेल्या नव्या विचारांनाच आपण वैचारिक लेखन समजतो. स्थितीवादी मंडळींचे विचारवाङ्मय भारतात फारसे लिहिलेच गेले नाही.

वैचारिक वाङ्मय कोणते असा प्रश्न मनात आला की, बहुधा गद्यलेखनच आपल्याला आठवते. काही वाङ्मयेतिहासकारांनी लेखन प्रकारांची विभागणी करताना वैचारिक वाङ्मयाला सरळ ‘निबंध’ या सदरात टाकले आहे. पण वैचारिक वाङ्मय गद्यापुरते मर्यादित नाही. मराठीतील दोन ठळक उदाहरणे सांगता येतील. केशवसुतांची ‘ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, न मी एक पंथाचा तेच पतीत की जे आखडती प्रदेश साकल्याचा’ असे सांगणारी ‘नवा शिपाई’सारखी कविता एक विचारकाव्यच आहे. १९४०-४५च्या सुमाराला आर्थिक आणि सामाजिक अवनतीच्या काळात सामान्य माणसाला आलेले नगण्य रूप आणि त्याची हतबलता सांगणार्‍या मर्ढेकरांच्या काही कविता यासुद्धा विचारकाव्येच आहेत. अशा कविता उपदेशासाठी किंवा मार्गदर्शनासाठी जन्माला येत नसतात. उपदेश किंवा मार्गदर्शन हे कवितेचे प्रयोजनच नसते. परंतु समाजाच्या स्थितीगतीचा विचार ज्याच्या मनात आहे, अशा कवीचे आत्मप्रगटीकरण हेसुद्धा विचार प्रगट करणारेच होऊ शकते.

नव्या विचारांना विरोध का होतो?

विचाराच्या क्षेत्रात ज्यांनी नवा मार्ग चोखाळला, समाजाच्या हिताचे, पण त्या काळात समाजाला न पटणारे विचार सांगितले, त्यांना समाजाने नेहमीच उदारपणे वागवले नाही. लोकहितवादीवर शारीरिक हल्ले करण्याच्या धमक्या मिळू लागल्या तेव्हा म. फुल्यांनी दोन व्यायामपटूंना त्यांच्या रक्षणार्थ पाठवले होते. रानड्यांना तर आपल्या घरातच वेदनादायक बहिष्कार सोसावा लागला. गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या विचारांचा आधार धर्मसंहितात शोधला नाही, कारण धर्मशोध ही त्यांची प्रेरणा नव्हती. सर्व माणसांना समान अधिकार आहेत या मूलभूत सिद्धान्तावर आगरकरांचा सामाजिक विचार आधारलेला होता. आगरकरांच्या बुद्धिनिष्ठ आणि विशेषतः स्त्रियांना बरोबरीचे स्थान देऊ पाहणार्‍या विचारांनी चिडलेल्या सनातन्यांनी त्यांची जिवंतपणीच प्रेतयात्रा काढली.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

काळ बदलत गेला समाजाचे रूपही बदलले. कुटुंबजीवनात आणि समाजजीवनात अनेक नव्या गोष्टी आपण स्वीकारल्या. वंचितांच्या मागे राजकीय शक्ती उभी राहिली, तेव्हा इच्छित बदल समाजात घडून आले; परंतु त्यामागेही मूळ प्रेरणा विचारांचीच होती. कोण्या एका व्यक्तीचे विचार सर्व समाजाने लगेच स्वीकारावे, अशी त्याचीसुद्धा अपेक्षा नसते. वैचारिक लेखनाबद्दल समाजात चर्चा झाली पाहिजे, विविध मतांना समजून घेतले गेले पाहिजे. अशा संवादासाठी दुसर्‍यांनाही वेगळी मते असण्याचा आणि ती मांडण्याचा अधिकार आहे, असे मानणारी मानसिकता लागते तरच संवाद होतो. अशा संवादानंतरच तावूनसुलाखून वैचारिक लेखन समाजाने स्वीकारावे, अशीच लेखकांची ही अपेक्षा असते.

लोक विचार करू लागले म्हणजे आपण त्यांच्यावर करत असलेला अन्यायही त्यांच्या लक्षात येईल आणि ते त्याविरुद्ध सघर्ष करतील, ही चिंता तर सगळ्याच हुकूमशहांना वाटत असते, म्हणून सगळ्याच फॅसिस्ट आणि कम्युन्सिट राजवटी स्वतंत्र विचारांच्या प्रगटीकरणाला रोखण्यासाठी सगळे उपाय योजितात. विचारांच्या प्रसाराला प्रतिबंध करतात, वैचारिक संवादाला प्रतिबंध करतात आणि विचार प्रगट करण्याची साधने असलेल्या नियतकालिके, पुस्तके किंवा हल्लीच्या काळात चित्रवाहिन्या यांनाही नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात. सतराव्या शतकात होऊन गेलेला एक स्पॅनिश विचारवंत- बारुश द स्पिनोझा असे म्हणाला होता की, ‘माणसाच्या जिभेवर नियंत्रण ठेवता येते, तसे जर त्याच्या मनावर नियंत्रण ठेवता आले असते तर जगातले सगळे राजे सुरक्षित राहिले असते.’

माणसाचे मन मूलतःच स्वतंत्र असते. सगळ्या फॅसिस्टांची आणि हुकूमशहांची तीच खरी अडचण असते. कितीही दाबून ठेवले तरी मोकळी हवा मिळाली, म्हणजे हे मन पुन्हा बंड करते आणि स्वातंत्र्यासाठी धडपड करू लागते. माणसाचे मन कोंडून ठेवता येत नाही, हे तर आपल्याला आपल्या मराठी कवींनीसुद्धा सांगितले आहे. ‘भिंतीच्या उंचीत आत्मा राहतो का कोंडूनी, मुक्त तो रात्रंदिनी’ याचे कवी यशवंतांनी आपल्याला स्मरण करून दिले आहे. आपले सुदैव असे की, आपल्या भारतीय संस्कृतीत स्वतंत्र आणि वेगवेगळ्या विचारांचे वागत करण्याची परंपरा आहे. वेगवेगळ्या ऋषींनी वेगवेगळी दर्शने सांगितली, मतभेद व्यक्त केले. त्यांच्या अभ्यासकांनी आपसांत संवाद केले, परस्परांच्या मतांचा आदर केला. विचारांना खुरटवून टाकणे आपल्या भारतीय विचारपरंपरेला मान्य नाही. ‘आ नो भद्रा: क्रतवो यन्तु सर्वत:’ (सर्व दिशांनी आमच्याकडे कल्याणकारक विचार येवोत) अशी आपली वैचारिक धारणा आहे.

वाढती असहिष्णुता

व्यक्तीच्या स्वातंत्र्याला बंधन घालू पाहणार्‍या अनेक शक्ती समाजात कमी-अधिक प्रमाणात अस्तित्वात असतात. शासनसत्ता तर त्यात असतेच; शिवाय वेगवेगळ्या रूपात अस्तित्व टिकवून असणारी धर्मसत्ता, जातसत्ता, समुदायसत्ता हीसुद्धा अशा नियंत्रणाचा प्रयत्न करते. राजसत्ता जेव्हा स्वातंत्र्यावर बंधने घालते तेव्हा तिच्याविरुद्ध न्यायालयात दाद मागता येते. न्यायालये व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे रक्षण करतात. साहजिकच अशी बंधने घालणार्‍या सत्ताधीशांना ती आवडत नाहीत. तरीही त्यांनी आपले कर्तव्य निर्भयपणे केलेच पाहिजे. असहिष्णू समाजघटक जेव्हा आपल्या समुदायशक्तीने, दंडामुडपीने त्यांना अमान्य असणार्‍या अभिव्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा न्यायालयात दाद मागण्याचा मार्ग फारसा उपयोगी राहत नाही. या असहिष्णू मंडळींनी अभिव्यक्ती थांबवलेली असते. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हा आघात होऊन गेलेला असतो. त्यांनी करावयाचे ते नुकसान केलेले असते. काही वेळा अशा बेकायदा प्रकारांना काही राजकीय गटांचा छुपा पाठिंबासुद्धा असतो किंवा त्याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करण्याचा मार्ग ते स्वीकारतात.

केवळ वैचारिक साहित्याबद्दलच नव्हे तर इतर ललित साहित्य प्रकारांच्याबाबतसुद्धा असे प्रकार घडलेले आहेत. एखादी कथा किंवा एखादी कादंबरी यामुळे वादळ उठल्याचा आणि तिच्या लेखकांना प्रचंड मनस्ताप भोगाव्या लागल्याच्या घटना आपल्याला आठवत असतील. इतिहासाकडे निर्लेप दृष्टीने पहावयास अद्याप आम्ही तयार झालेलो नाही. ऐतिहासिक कादंबरी, नाटक किंवा चित्रपट लिहिणे- तयार करणे फारच जोखमीचे काम झाले आहे. आम्हाला वाटतो, तोच इतिहास, असा आग्रह लेखकाच्या स्वातंत्र्याच्या मुळाशी जाऊ शकतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

लेखकाच्या मनात काहीही नसताना कोणाच्या भावना कधी दुखावतील, याचा नेम राहिलेला नाही. पेरूमल मुरुगनसारखा एखादा लेखक वैतागाने ‘आपल्यातला लेखक मेला’, असे जाहीर करून लेखनच थांबवतो. नाटक, चित्रपट यांना प्रयोगाची किंवा प्रदर्शनाची परवानगी देताना त्यांची तपासणी करणारी ‘सेन्सॉर बोर्ड’ नावाची कायद्याने स्थापिलेली संस्था आहे. काय प्रदर्शित व्हावे, याबद्दल निर्णय घेण्याचा तिलाच अधिकार आहे. तो पटला नाही तर न्यायालयात त्या निर्णयाविरुद्ध दाद मागता येते. तसे न करता सेन्सॉर बोर्डाचा निर्णय नाकारून आपलेच मत लादण्याचा प्रयत्न होतो. अशी दंडामुडपी सुरू झाली, म्हणजे कायद्याच्या राज्याच्या संकल्पनेचे काय होते? सेन्सॉर बोर्डाचेच नव्हे तर पोलिसांचे आणि न्यायालयाचेही अधिकार अशा मंडळींनी स्वतःकडे घेतलेले असतात.

बदलते सांस्कृतिक व सामाजिक वास्तव

आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला यंदा पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली. या कालखंडात आपल्या राजकीय जीवनाबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातसुद्धा खूप परिवर्तन झाले. स्वातंत्र्याचा पायरव ऐकू लागला, तेव्हापासून म्हणजे सुमारे १९४५-४६पासून एक उत्साहाचे, अपेक्षेचे आणि संकल्पांचे वातावरण निर्माण झाले. या काळात मराठी ललित साहित्याला मोठाच बहर आला. नवी लघुकथा लिहिली जाऊ लागली, नवी कविता लिहिली जाऊ लागली. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या काही भागातील जे जीवन इतर वाचकांना परिचित नव्हते, अशा भागातले लेखक लिहू लागले. पुढच्या आठ-दहा वर्षांत काही लघुकथा लेखक, काही कादंबरीकार आणि काही कवी मराठी वाचकाच्या मनात स्थिर झाले. स्वातंत्र्यानंतर शासनाच्या वतीनेसुद्धा सांस्कृतिक क्षेत्रात काही प्रयत्न झाले. १९६० साली महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. मराठी राजभाषा झाली. ‘साहित्य आणि संस्कृती मंडळा’सारख्या सरकारने स्थापित केलेल्या, पण स्वायत्त असलेल्या संस्थांमार्फत ‘विश्वकोशा’सारखी ज्ञानसाधने उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू झाले.

एकीकडे शासकीय पातळीवर या गोष्टी घडत असताना काही स्वायत्त संस्थांद्वारेसुद्धा सांस्कृतिक क्षेत्रात काम सुरू झाले होते. उदाहरणच द्यावयाचे तर स्वातंत्र्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत शंकरराव देवांनी पुढाकार घेतलेली ‘समाज प्रबोधन संस्था’ आणि तिचे ‘नवभारत’ नियतकालिक सुरू झाले. संस्कृतीच्या क्षेत्रात एक उदार, सर्व मतांना अभिव्यक्तीची संधी देणारे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी ते प्रयत्न होते. ‘अभिरूची’ आणि ‘सत्यकथा’ यासारख्या काही वाङ्मयीन नियतकालिकांनी नव्या वाङ्मयाच्या लेखकांना व्यासपीठ दिले आणि वाचकांची आणि त्यांची भेट करून दिली. शिक्षणाचा प्रसार दूरदूरवर झाला. सामाजिक क्षेत्रात काही उल्लेखनीय घडामोडी झाल्या. दलित चळवळ सुरू झाली. समतेसाठीच्या या संघर्षाचे स्वाभाविक पडसाद साहित्यातही उमटले. दलित लेखक मोठ्या प्रमाणात लिहू लागले. त्यांच्या लेखनात दलितांच्या समाजजीवनाबरोबरच एका आत्मविश्वासाचे आणि स्वाभामिनाचे हुंकारही व्यक्त होऊ लागले. हमीद दलवाई यांनी मुस्लीम समाजात नवजागरणाची मोहीम सुरू केली. नरेंद्र दाभोलकर आणि इतर कार्यकर्त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी चळवळ सुरू केली. अशा अनेक सामाजिक परिवर्तनासाठी झालेल्या चळवळींनी सांस्कृतिक विश्वसुद्धा ढवळून गेले. मराठी वाङ्मय वेगवेगळ्या वाङ्मयीन प्रवाहांनी गजबजून गेले.

हा एक प्रकारच्या वाङ्मयीन आणि सांस्कृतिक उत्साहाचा काळ आपण पाहिला, त्याला आता बराच काळ लोटून गेला. या काळात समाजजीवन खूपच ढवळून निघाले. शहरे वाढत गेली, खेडी गौण ठरू लागली. तीन दशकांपूर्वी खुल्या बाजाराची नवी आर्थिक रचना भारताने स्वीकारली. नव्या आर्थिक रचनेचा एक परिणाम म्हणजे आजवर आर्थिकदृष्ट्या काटकसरीचे जीवन जगत असलेल्या आणि तरीही मराठीच्या आणि मराठी संस्कृतीच्या प्रेमाची नाळ न सोडलेल्या या वर्गाला आर्थिकदृष्ट्या चांगले दिवस लाभले. त्याबरोबरच काही अनिष्ट गोष्टीही निर्माण झाल्या. समाजाचे परस्परावलंबी व्यक्तींचा समूह असे जे स्वरूप होते, ते राहिले नाही. व्यक्ती स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीत गढून गेली. इतर समाजापासून अलिप्त किंवा फटकून राहिले तरी आपल्याला जगता येते, फारसे काही अडत नाही, असेही मध्यमवर्गातल्या काहींना वाटू लागले. पूर्वीही समाजात अनेक भेद होते, वाद होते, तरीही या सुख-दुःखाच्या जीवनात एकूण समाजाशी आपले नाते आहे, ही जाणीव कायम होती. आज ही जाणीव तशीच शिल्लक आहे, असे सांगता येणार नाही.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

दुसरे असे झाले की, समाजाचे एकपण टिकावे, यासाठी प्रयत्न करणार्‍या राष्ट्रीय शक्ती दुर्बल झाल्या. वेगवेगळ्या आधारावर समाजात पूर्वीच असलेल्या भिंती अधिक मजबूत केल्या जाऊ लागल्या. विविध अहंतांना कुरवळण्याचे काम चालू झाले. त्यामध्ये काहींचा फायदा असेल, पण समाजात यामुळे निर्माण होणारी वेगवेगळेपणाची भावना आणि कटुता समाजात खोलवर रुजते आहे याची त्यांनी पर्वा केली गेली नाही. या सगळ्याचा परिणाम निरपेक्षपणे समाजाला मार्गदर्शन करू शकणारे वैचारिक लेखन कमी कमी होत गेले.

समाजाला परखड बोल सुनावणारांच्या मनातही समाजाविषयी ओलच होती. समाजसुद्धा विचारवंतांचे म्हणणे पटो अगर न पटो, त्यांच्याबद्दल राग-लोभाचे असेल, पण एक नाते बाळगून होता. आता कोणी सामाजिक प्रश्नाबद्दल बोलले तर ‘यांना काय करावयाचे’ असा प्रश्न विचारणारेसुद्धा निर्माण झाले आहेत. समाजाची धर्म, जाती, पारंपरिक श्रद्धा अशा अनेक आधारांवर विभागणी झाली आहे. समाजालाच जर आपल्या विचारांची आवश्यकता नसेल तर विनाकारण लिहून त्यांचा राग ओढवून घ्यायचा कशाला? असेही काहींना वाटू लागले असेल. पूर्वी समाजासमोर अनेक प्रश्न होते आणि आता मात्र कोणताही प्रश्न शिल्लक नाही, अशी स्थिती नाही व तशी कधी होतही नसते. नवे प्रश्न निर्माण झालेले असतात आणि त्याबद्दल विचार करून लिहिणारा आणि स्पष्ट प्रतिपादन करणारा विचारवंत समाजाला उपकारकच असतो.

हे मला मान्य आहे की, लेखकांच्या प्रतिभेचे आणि उत्साही, पोषक वातावरणाचे नाते असतेच, असे निश्चित सांगता येत नाही. हुकूमशाही राजवटीच्या तुरुंगात असणारा पाब्लो नेरूदासारखा लेखक उत्तम वाङ्मय लिहितो आणि विविध प्रकारच्या सोयी-सवलती उपलब्ध झाल्या म्हणजे लेखक चांगलेच लिहितो, याची खात्री नाही. हे लक्षात ठेवूनसुद्धा सध्याच्या काळाकडे आपण पाहिले पाहिजे. मराठी साहित्याची आजची स्थिती कशी आहे, याबद्दल आपण कठोरपणे आत्मनिरीक्षण करण्याची गरज आहे. मुख्यतः ज्या साहित्याचा आपण विचार करत आहोत, त्यातील लघुकथा, कादंबरी आणि कविता या आपल्या अधिक परिचयाच्या वाङ्मय प्रकारांची काय परिस्थिती आहे? लघुकथा छापणारी मासिके बंद झाली. दैनिकांच्या रविवारच्या आवृत्त्यातून लघुकथा छापणे बंद झाले. दिवाळी अंकात त्या थोड्याफार दिसतात. पण हे म्हटले पाहिजे की, लघुकथा हा वाङ्मयप्रकार अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. काही कादंबर्‍या वाचकांना आवडल्या, पण त्यांनाही फार वाचक लाभलेले नाहीत.

कविता मात्र विपुल लिहिली जात आहे. खरे म्हणजे कविता हा सर्वांत अवघड वाङ्मयप्रकार, पण अनेकांना तो फारच सोपा वाटतो आहे. कविता म्हणून प्रसिद्ध होणार्‍या बर्‍याच लेखनाला कविता म्हणावेच की, नाही, अशीच शंका समीक्षक उपस्थित करताहेत. नाटकाचे पुस्तक फार कमी वेळा वाचले जाते. त्याचे पुस्तक म्हणून महत्त्व वाचकांच्या लेखी नसते. वाचकांना प्रेक्षक होऊन अभिनीत केले गेलेले नाटक पहावयाचे असते. आज अनेक कारणांनी नवे नाटक पहायचेच असेल तर मुंबई-पुण्याला जावे लागते. सामान्यतः वेगवेगळ्या प्रतिभाशक्तींना मुंबई-पुण्यात वाव मिळतो आहे, लोकप्रिय नाटके हाऊसफुल गर्दीत प्रयोग करताहेत. पण या दोन्हींपासून मोठ्या शहरापासून दूर असलेला मराठी रसिक लांबच आहे.

समीक्षेचे प्रयोजन हरवले?

काय वाचावे, याबद्दल वाचकांना मार्गदर्शन करणे हे समीक्षेचे महत्त्वाचे प्रयोजन आहे. आजकाल वृत्तपत्रात दीर्घ आणि अभ्यासू परीक्षणे प्रसिद्ध होत नाहीत. वृत्तपत्रात जागा नसते, हे एकच कारण नाही. अशी परीक्षणे लिहिणारे समीक्षकसुद्धा कमी कमी होत आहेत. दोन प्रकारची समीक्षा वाचायला मिळते. त्यातली बहुतेक असते समीक्षेचे केलेले जुजबीकरण. लेखकाची व पुस्तकाची ढोबळ ओळख करून देणे आणि एखाददुसरा शेरा मारणे एवढाच तिचा उद्देश असतो. काही वेळा दीर्घ लेखांच्या रूपाने समीक्षा लिहिली जाते, पण ती अनावश्यक पारिभाषिक शब्दांच्या रेलचेलीमुळे वाचकांच्या उपयोगीच राहत नाही. समीक्षेचे कठिणीकरण झालेले असते. काही अपवाद वगळले तर, आता वाचकांना समीक्षेवर अवलंबूनच राहता येत नाही.

दुर्गाबाई भागवतांनी आपल्या एका लेखात एका टीकाकाराचे मत उदधृत केले आहे. ‘आपण वाचलेलं कोणी लिहिलं आहे, यापेक्षा ते कसं लिहिलं आहे, याकडे लक्ष द्यावं म्हणजे आपल्याला समतोलपणे आणि सत्य परीक्षण करून साहित्यातलं बरं-वाईट ठरवण्याची कुवत येते. हिलाच निःपक्षपाती दृष्टी म्हणतात’, असं त्यांनी म्हटले आहे. अशा दृष्टीने लिहिलेले परीक्षण किती लेखकांना मानवेल, हाही प्रश्न आहे. वसंत दावतर ‘आलोचना’ नावाचे एक नियतकालिक चालवायचे. त्यात फक्त परीक्षणे प्रसिद्ध होत आणि त्यावर परीक्षण लेखकाचे नाव नसे. पुष्कळ मोकळेपणाने तेव्हा लिहिता येत असावे.

‘आलोचना’ तर बंद पडले, पण मराठी साहित्य महामंडळाने असे एखादे केवळ परीक्षणे छापणारे नियतकालिक प्रसिद्ध करावयास काय हरकत आहे? इंग्रजीमध्ये अशी काही नियतकालिके प्रसिद्ध होतात आणि त्यांना वाचकही आहेत.

वाचकांचा दुष्काळ

गेल्या पंचाहत्तर वर्षांत झपाट्याने साक्षरता वाढली, पण त्याच्या तुलनेत साहित्याचे वाचक वाढलेच नाहीत. वास्तवातल्या काही अप्रिय गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. शहरामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी इंग्रजी माध्यमात शिकत आहेत. या माध्यमात शिकणारांना मराठी भाषा आणि वाङ्मयाची पुरेशी ओळखच नसते. मातृभाषेतून शिक्षण न झाल्यामुळे त्यांच्या विचारप्रक्रियेचे क्षेत्र मर्यादित झालेले असते. दुसरा वर्ग आहे बहुसंख्येने ग्रामीण भागात मराठीत माध्यमात शिकणार्‍या मुला-मुलींचा. यांना मातृभाषेत शिकण्याचा लाभ मिळतो, पण त्यांचे विचारविश्व समृद्ध होण्यासाठी ग्रंथालयासारखी साधनेच तेथे नसतात. उत्तम ग्रंथालय ही शिक्षणसंस्थांचीच नव्हे तर गावाचीसुद्धा गरज असते, हे आपल्याला पटलेले नाही.

आपल्या शेजारच्या कर्नाटक राज्यात प्रत्येक गावात स्थानिकाच्या सहकार्याने ग्रंथालय उभे करण्याचा प्रयत्न झाला आहे. भारतीय प्रशासन सेवेच्या एका महिला अधिकार्‍याने घेतलेल्या पुढाकाराने हा प्रयत्न झाला आहे. जी मुले शाळेत जाऊ शकली नाहीत किंवा ज्यांनी शाळा सोडून दिली त्यांनाही या ग्रंथालयांचा लाभ घेता येतो. पुस्तकांसाठी रॅक्स, फर्निचर, टेबले आणि संगणकसुद्धा अशा वस्तू पुरवण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. मोठ्या संख्येने अशी ग्रंथालये उभी राहिली आहेत. आपल्याकडेही असे होऊ शकेल. परंतु आपल्याकडे खेडोपाडी प्रत्यक्षात किमान पुस्तकसंख्येसह अस्तित्वात असलेली ग्रंथालये वाढलीच नाहीत. मराठीतले नवे-जुने आपण वाचावे अशी खेड्यातल्या मुलांना इच्छा झाली तरी त्यासाठी तेथे काहीच उपलब्ध नसते.

मराठी माध्यमात शिकणारांच्या नशिबीसुद्धा काही अनिष्ट गोष्टी आल्या आहेत. जे शिकवायला अवघड आहे ते काही चुकीची कारणे सांगून अभ्यासक्रमातून वगळून टाकायचे, हे आपण पूर्वीच सुरू केले आहे. व्याकरण वगळून टाकले. जुन्या मराठीतील जे शिक्षकांना शिकवायला थोडेसे श्रम घ्यावे लागतील, असे वाटले तेही आपण वगळले. परिणाम असा की मराठी शिकणार्‍या या मुलांना मराठीची भाषापरंपराच अवगत होत नाही.

आणखी एका गोष्टीची नोंद घेतली पाहिजे. इंग्रजी माध्यमात जे शिकले व ज्यांना उच्च शिक्षणही घेता आले त्या मराठी मुला-मुलींमधील निदान काही मराठी वाचतच नसले तरी इंग्रजी मात्र आवर्जून वाचतात. त्यातले काही आपल्या अभिव्यक्तीसाठी इंग्रजीची निवड करतात. कदाचित त्यांना अधिक मोठा वाचकवर्ग उपलब्ध होत असेल.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात झालेल्या पुस्तक विक्रीचे आकडे खूप मोठे असतात. पण ते आपल्याला फसवे समाधान देणारे असतात. हल्ली पुस्तके अशा प्रदर्शनातच जास्त विकली जातात, यादृष्टीने पाहिले तर ते आकडे वर्षभराच्या विक्रीचे समजायला पाहिजेत. ललित पुस्तकांची दुकाने कमी कमी होत चाललेली आहेत. काही मोठ्या गावात तर अशी दुकानेच नाहीत. आहेत त्या दुकानातही पुरेशी विक्री नाही. हे वास्तव आपल्याला चिंतित करणारे आहे. पन्नास वर्षांपूर्वी पुस्तकाची एक आवृत्ती हजार प्रतींची काढत आणि ती, पुस्तक वाचकांना आवडले तर ती आवृत्ती तीन-चार वर्षांत संपून जाई. आता एखाद्या पुस्तकाच्या तीन-चारशे प्रती विकल्या तरी प्रकाशकाला धन्य वाटते. कवितांच्या पुस्तकाला तर विकत घेणारा ग्राहकच मिळणे अवघड आहे. पुस्तके विकत घेऊ शकणारा ग्राहक अधिक सुस्थितीत आला असला तरी त्याला पुस्तके विकत घ्यावी, असे का वाटत नाही?

वाचकांची आवड मुद्रित साहित्याकडून इतरत्र वळली आहे काय, याचाही आपण शोध घेतला पाहिजे. की त्याला विकत घ्यावीशी वाटतील अशी पुस्तकेच कमी प्रसिद्ध होताहेत? संगणकावर हल्ली समाजमाध्यमातून काही छोटे लेख प्रसिद्ध होतात. त्यातले काही वाचनीयसुद्धा असतात. ही माध्यमे मर्यादित व्यक्तींच्या आपसातील संवादासाठीच उपयोगात आणली जातात. ती इतरांना उपलब्ध नसतात. तेव्हा अशा मर्यादित म्हणजे खासगी लेखनाचा विचार आपल्याला करता येणार नाही. पण त्यातले जे सर्वांना उपलब्ध होत असेल त्याचा विचार आज ना उद्या आपल्या समीक्षेलाही करावा लागेल. समाजमाध्यमाचा अधिक गांभीर्याने उपयोग जेव्हा होऊ लागेल, त्या वेळेला त्यातील काही लेखनाची गणना साहित्यात करता येण्याचा संभव निर्माण होईल.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......