हिंडेनबर्ग रीसर्च आणि अदानी समूह हा जंगी मुकाबला आहे. हे प्रकरण कुठपर्यंत जाणार, याचा अंदाज आताच लावता येणार नाही!
पडघम - अर्थकारण
श्रीनिवास जोशी
  • अदानी समूहाचे गौतम अदानी आणि हिंडेनबर्ग रीसर्चचे बोधचिन्ह
  • Wed , 01 February 2023
  • पडघम अर्थकारण हिंडेनबर्ग रीसर्च Hindenburg Research अदानी समूह Adani Group

मागच्या पंधरवड्यात, म्हणजे २४ जानेवारी २०२३ रोजी ‘हिंडेनबर्ग रीसर्च’ या अमेरिकेतील रीसर्च आणि इन्व्हेस्टमेंट कंपनीने भारतातील अदानी उद्योग समूहावर एक अहवाल प्रकाशित केला. त्याचे नाव आहे – ‘Adani Group : How The World’s 3rd Richest Man Is Pulling The Largest Con In Corporate History’ (‘अदानी ग्रूप - जगातील तिसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत माणूस जगाच्या कॉर्पोरेट इतिहासातील सगळ्यात मोठी फसवणूक कशी करत आहे!’)

या अहवालाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे – “आम्ही हिशोबलेखनातील फसवणूक, शेअरच्या किमतींमधली गडबड आणि अवैध कमाईचे पुरावे उघड्यावर आणले आहेत. हे सर्व प्रकार अनेक दशके चाललेले आहेत. ही अतिप्रचंड (फसवणुकीची) कामगिरी अदानी यांनी सरकारमधील मदतनिसांच्या साहाय्याने आणि परदेशात स्थापन केलेल्या अनेक छोट्या छोट्या कंपन्यांच्या साहाय्याने पार पाडली आहे.”

हा अहवाल म्हणतो की, भ्रष्टाचाराची ही समस्या भारतातील सरकारी यंत्रणेच्या अनेक पातळ्यांवर पसरलेली आहे.

हिंडेनबर्ग रीसर्चने या अहवालाच्या शेवटी अदानी समूहासाठी ८८ प्रश्नांची एक प्रश्नावली दिली आहे.

जगाच्या उद्योग जगतातील अब्जावधी डॉलर्सचे कारनामे कसे असतात, याचा अंदाज मराठी वाचकाला यावा म्हणून सोप्या भाषेत हा लेख लिहायचा प्रयत्न केला आहे. अदानी समूह किंवा हिंडेनबर्ग रीसर्च यातील कुणाही एकाची बाजू घेण्याचा इरादा या लेखात नाही. वाचकांनी त्यांची त्यांची मते स्वतः या अहवालाचा अभ्यास करून बनवावीत.

हा जसा ज्ञानाचा विषय आहे, तसा पैशाचाही विषय आहे. हिंडेनबर्ग रीसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहच्या सात महत्त्वाच्या कंपन्यांचे शेअर २०-२० टक्क्यांनी कोसळले. एकंदर नुकसान साडेचार लाख कोटी रुपयांचे झाले. अदानी समूहामध्ये ज्या ज्या बँकांचे पैसे अडकले आहेत, त्या सगळ्या बँकांचेही शेअर चार-पाच टक्क्यांनी कोसळले. ते नुकसान वेगळेच.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

अदानी समूहातील कंपन्यांमध्ये आमच्या ‘शॉर्ट पोझिशन्स’ आहेत, असे हिंडेनबर्ग रीसर्चने म्हटले आहे. थोडक्यात अदानी समूहच्या कंपन्यांचे शेअर्स पडले, तर हिंडेनबर्ग रीसर्चला प्रचंड पैसा मिळणार आहे. पुढे जाण्याआधी ‘शॉर्ट पोझिशन’ म्हणजे काय हे पाहू. समजा, तुमच्याकडे एक सफरचंद आहे. ते तुम्ही चार रुपयाला विकत घेतले आहे आणि तुम्हाला त्यातून तीन रुपये नफा मिळवायचा आहे, तर तुम्हाला ते सात रुपयांना विकायला लागेल. नफा कमावण्याचा अजून एक मार्ग म्हणजे आधी जास्त किमतीला ते सफरचंद विकणे आणि नंतर कमी किमतीला विकत घेणे. उदा. तुम्हाला जर कळले की, सफरचंदांचे भाव पडणार आहेत, तर तुम्ही तुमच्याकडचे सफरचंद चार रुपयांना विकू शकता आणि भाव पडल्यावर एक रुपयाला परत विकत घेऊ शकता. म्हणजे याही परिस्थितीत तुम्हाला तीन रुपयांचा फायदा होतो. भाव पडल्यावर नफा कमावण्याच्या इराद्याने आधी शेअर विकणे, याला ‘शॉर्ट पोझिशन्स’ तयार करणे असे म्हणतात. तर सांगायचा मुद्दा असा की, अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स पडणार आहेत, असे या समूहाच्या कारभाराचा दोन वर्षे अभ्यास केल्यावर हिंडेनबर्ग रीसर्चला वाटले म्हणून त्यांनी ‘शॉर्ट पोझिशन्स’ तयार केल्या आहेत.

आता तुम्ही म्हणाल की, शेअर्स पाडण्यासाठीही हा अहवाल दिला गेला असेल. तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. ती शक्यताही आहेच. परंतु काही लोक असेही म्हणू शकतात की, हिंडेनबर्ग रीसर्चने स्वतःच्या अहवालावर कोट्यवधी डॉलर्स लावले आहेत. अहवाल खोटा निघाला आणि अदानी समूहाचे शेअर्स वर गेले, तर हिंडेनबर्ग रीसर्चचे कोट्यवधी डॉलर्स पाण्यात जाणार नाहीत का? त्यामुळे हे लोक पैसे लावून बोलत आहेत, यावरून ते अभ्यास करून अत्यंत गंभीरपणे बोलत आहेत, असा निष्कर्ष काढायला हरकत नाही. या लोकांचेही बरोबर आहे, हीसुद्धा शक्यता नाकारता येणार नाही.

थोडक्यात, काय तर वाचकांनी त्यांचे त्यांचे निष्कर्ष काढावेत.

हे प्रकरण कुठपर्यंत जाणार, याचा अंदाज आताच लावता येणे अशक्य आहे.

अदानी समूह हिंडेनबर्ग रीसर्चवर दावा लावणार आहे. तो अर्थातच अमेरिकेत जाऊन लावावा लागेल. अमेरिकन कोर्टात वर्षानुवर्षे दावे रखडत नाहीत, त्यांचा काही महिन्यांत निकाल लागतो. त्यामुळे या प्रकरणात ‘दूध का दूध, पानी का पानी’ लवकरच होण्याची शक्यता आहे.

स्कूटरवरून फिरणारा एक व्यापारी तीस-पस्तीस वर्षांत १७-१८ लाख कोटी रुपयांचे साम्राज्य उभे करतो, म्हणजे त्याची उद्यम-क्षमता अतिप्रचंड असणार! दुसरीकडे हिंडेनबर्ग रीसर्चने जगातील मोठ्या मोठ्या कंपन्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढून त्यांना लोळवलेले आहे. प्रसिद्ध इनव्हेस्टर बिल अ‍ॅकमन म्हणाला आहे की, हिंडेनबर्ग रीसर्च ही अत्यंत गांभीर्याने काम करणारी संस्था आहे. थोडक्यात, काय तर अदानी समूह आणि हिंडेनबर्ग रीसर्च हा जंगी मुकाबला आहे.

हा अहवाल आपण बघायला हवा, कारण यात आपलेही आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत. कारण विविध बँकांनी अदानी समूहाला सुमारे पावणे तीन लाख रुपयांची कर्जे दिलेली आहेत. १२-१३ सालापर्यंत या समूहाला सुमारे पासष्ट हजार कोटी रुपयांची कर्जे दिली गेली होती. गेल्या आठ-नऊ वर्षांत हा आकडा पावणे तीन लाख कोटी रुपयांवर गेला आहे. हे पैसे आपल्याच ठेवीमधून तयार झालेले आहेत. ही कर्जे बुडाली, तर आपण भरलेल्या करांमधूनच या बँकांना वाचवण्याची पाळी येणार आहे.

हे सगळे लक्षात घेऊन आपण अहवालाकडे पाहू.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

हा अहवाल सुरुवातीलाच म्हणतो- अदानी समूहातील मुख्य कंपन्यांच्या एकूण शेअर्सची किंमत १८ लाख ५३ हजार कोटी रुपये आहे. गेल्या तीन वर्षांत अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स अत्यंत गूढ पद्धतीने अतिप्रचंड प्रमाणात वाढले आहेत. ‘अदानी एन्टरप्रायजेस’चा शेअर १३९८ टक्क्यांनी वाढला आहे, ‘अदानी टोटल गॅस’चा २१२१ टक्क्यांनी वाढला आहे, ‘अदानी ट्रान्समिशन’चा ७२९ टक्क्यांनी, ‘अदानी ग्रीन एनर्जी’चा ९०८ टक्क्यांनी, ‘अदानी पॉवर’चा ३३२ टक्क्यांनी, ‘अदानी पोर्ट्स’चा ९८ टक्क्यांनी, तर ‘अदानी विल्मार’चा १४९ टक्क्यांनी वाढला आहे.

अहवाल म्हणतो की, तुम्ही आमचा अहवाल नाकारलात तरी काही हरकत नाही. तसेही अदानी समूहातील सात मुख्य कंपन्यांच्या शेअर्सचे मूल्यांकन त्यांच्या योग्य किमतीपेक्षा ८५ टक्क्यांनी जास्त आहे. थोडक्यात, जिथे एखाद्या शेअरची योग्य किंमत १ रुपया आहे, तिथे हे शेअर आज ८५ रुपयांना मिळत आहेत.

अदानी समूहातील या कंपन्या मुख्यतः  ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपन्या आहेत. जगभरातला अनुभव असा आहे की, या ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपन्यांची वाढ अत्यंत कमी वेगाने होते. अत्यंत थोड्या काळात अतिप्रचंड वाढ व्हायला या काही गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यासारख्या टेक-कंपन्या नाहीत.

एका शेअरमागे एखादी कंपनी किती मिळकत करते, याचा हिशोब करून त्या शेअरची किंमत ठरते. अदानी समूहाच्या शेअरच्या संदर्भात या सगळ्या हिशोबांना काहीच अर्थ उरलेला नाही, असे हा अहवाल म्हणतो. साधारणतः कंपनीच्या शेअरची किंमत आणि कंपनीची मिळकत, यांचे गुणोत्तर २५च्या (प्राईस टू अर्निंग रेशो) आसपास असते. हा पीई रेशो पन्नासकडे गेला, तर तो शेअर त्याच्या लायकीपेक्षा खूप महाग झाला, असे म्हटले जाते. सोप्या शब्दांत सांगायचे, तर एखादी कंपनी जेव्हा एका शेअरमागे एक रुपया फायदा मिळवते, तेव्हा तिच्या शेअरची २५ रुपये ही किंमत योग्य असते. कंपनीचा फायदा, तिच्याकडे असलेली स्थावर-जंगम मालमत्ता आणि तिची भविष्यात होणारी वाढ, या सर्वांचा विचार करून २५ रुपये ही किंमत योग्य असते.

अदानी ग्रीन एनर्जी या कंपनीचा पीई रेशो ८१५X (८१५ एक्स) झालेला आहे. म्हणजे अदानी ग्रीन एनर्जी जेव्हा तिच्या प्रत्येक शेअर मागे १ रुपया फायदा मिळवते, तेव्हा तिच्या एका शेअरचा भाव ८१५ रुपये इतका झालेला आहे. अदानी ग्रीन एनर्जीसारख्या जगातील इतर कंपन्यांचे पीई रेशो साधारणपणे २४X एवढे असतात. अहवालाचे म्हणणे असे आहे की, हा विचार केला तर अदानी ग्रीन एनर्जी हा शेअर त्याच्या सध्याच्या किमतीपासून ९७ टक्क्यांनी पडला, तर तो या कंपनीच्या मिळकतीशी मिळता-जुळता होईल.

अदानी समूहातील इतर कंपन्यांचा या दृष्टीने विचार केला, तर अदानी पॉवर १८ टक्क्यांनी पडायला पाहिजे, अदानी टोटल गॅस ९७ टक्क्यांनी पडायला पाहिजे, अदानी ट्रान्समिशन ९२ टक्क्यांनी पडायला पाहिजे, अदानी एन्टरप्रायजेस ९७ टक्क्यांनी पडायला पाहिजे, अदानी विल्मार ६७ टक्क्यांनी पडायला पाहिजे आणि अदानी पोर्ट्स ९३ टक्क्यांनी पडायला पाहिजे. याच अर्थाने हिंडेनबर्ग रीसर्च म्हणत आहे की, ‘आमचा अहवाल तुम्ही नाकारलात तरीसुद्धा केवळ हे शेअर त्यांची अतिरेकी वाढ झाल्यामुळे पडायला हवेत.’

हा झाला अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती आणि त्यांच्या मिळकतीतील तफावतीचा मुद्दा. हिंडेनबर्ग रीसर्चचा अहवाल या कंपन्यांमधील पैशाचा ओघ आणि त्यांच्यावरील कर्जे यांच्या प्रमाणाचाही विचार करतो. आपण बँकेमध्ये कर्ज काढायला जातो, तेव्हा आपल्याकडे किती पैसा येतो-जातो आहे, याचा विचार करून आपल्याला कर्ज दिले जाते.

या दृष्टीने एखाद्या कंपनीचा विचार करायचा झाला, तर त्या कंपनीकडे असलेला वाहता पैसा आणि त्या कंपनीला नजीकच्या काळात चुकवावी लागणारी कर्जे यांचे नाते बघावे लागते. याला ‘करंट रेशो’ असे म्हणतात.

अदानी समूहातील मुख्य सात कंपन्यांपैकी पाच कंपन्यांना त्यांच्याकडे असलेल्या वाहत्या पैशापेक्षा जास्त किमतीचे हप्ते भरायचे आहेत. याला ‘निगेटिव्ह कॅश फ्लो’ असे म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे तर पगारापेक्षा कर्जाचा हप्ता मोठा झालेला आहे.

‘करंट रेशो’ एक असेल तर कंपनीकडचा वाहता पैसा आणि तिच्या कर्जाचे हप्ते यांचे प्रमाण एकास एक आहे. करंट रेशो एकपेक्षा जास्त असेल, तर कंपनीकडे कर्जाच्या हप्त्यापेक्षा जास्त पैसे आहेत. आणि करंट रेशो एकापेक्षा कमी असेल, तर कंपनीकडे कर्जाच्या हप्त्यापेक्षा कमी पैसे आहेत, असा अर्थ होतो. अदानी समूहाच्या सातपैकी पाच कंपन्यांचा ‘करंट रेशो’ एकापेक्षा कमी आहे. थोडक्यात, या कंपन्या अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये आहेत. परंतु त्यांचे शेअर्स किमतीच्या दृष्टीने कुठे पोहोचले आहेत, हे आपण वर पाहिलेच आहे.

‘क्रेडिटसाईट्स’ (CreditSights) या रीसर्च कंपनीने अदानी समूहातील कंपन्यांच्या कर्जाविषयी अत्यंत चिंता व्यक्त केली होती. ‘ही परिस्थिती अदानी समूहाच्या साम्राज्याचे पतन घडवून आणू शकते’, असा अहवाल या कंपनीने ऑगस्ट २०२२मध्ये दिला होता. अदानी समूहाशी झालेल्या चर्चेनंतर या कंपनीने आपला अहवाल थोड्या मवाळ शब्दांत मांडला, परंतु पूर्णपणे मागे घेतला नाही.

यावर टिप्पणी करताना हिंडेनबर्ग रीसर्चचा अहवाल म्हणतो की, अदानी समूहातील कंपन्या एकमेकांशी निगडित आहेत. त्या पूर्णपणे स्वतंत्र नाहीत. सोप्या शब्दांत सांगायचे, तर सगळ्या कंपन्यांचे पायात पाय गुंतलेले आहेत. कॅश-फ्लो संपल्यामुळे एक कंपनी कोसळली, तर त्याचा परिणाम समूहातील सगळ्या कंपन्यांवर होईल.

.................................................................................................................................................................

आधीच अदानी समूहातील कंपन्यांनी आपल्याला झेपणार नाहीत, एवढी कर्जे घेतलेली आहेत. त्यात भर म्हणून या कंपन्यांच्या प्रवर्तकांनी (प्रमोटर) आपल्याकडचे शेअर तारण ठेवून अजून कर्जे घेतली आहेत. शेअर तारण ठेवणे हा कर्ज घेण्याचा धोकादायक पर्याय असतो, कारण शेअरच्या किमती पडू शकतात. जर दुसरे काही तारण उरले नाही, तर बँकांना हे तारण ठेवलेले शेअर्स सतत पडत राहणाऱ्या किमतींना विकत राहावे लागतात. त्यामुळे एक दुष्टचक्र सुरू होते. शेअर्सच्या किमती पडत राहतात आणि जास्त जास्त शेअर्स विकावे राहावे लागतात. आधीच या साऱ्या कंपन्यांचे शेअर्स किती वाढले आहेत, हे आपण पाहिलेच आहे.

.................................................................................................................................................................

अहवालातील पुढचा मुद्दा असा की, अदानी समूहावर अदानी कुटुंबातील व्यक्तींचेच नियंत्रण आहे, प्रोफेशनल मॅनेजमेंट नाही. अशा परिस्थितीत एकतर्फी आणि अपारदर्शक असे आर्थिक निर्णय घेतले जातात, असा जगभरचा अनुभव आहे. अदानी समूहाचे संस्थापक आणि चेअरमन गौतम अदानी यांनी शालेय पातळीवरच शिक्षण सोडले आहे, अशी टिपण्णी हा अहवाल या ठिकाणी करतो.

पुढच्या काळात ते हिरा खरेदी-विक्री व्यापारात आले आणि नंतर प्लॅस्टिक ट्रेडिंगमध्ये आले. आता ते सातपैकी सहा अत्यंत मोठ्या अशा कंपन्यांचे चेअरमन आहेत.

अदानी समूहातील सर्व कंपन्यांची सर्व सत्ता एकाच व्यक्तीच्या हातात केंद्रित झाल्यामुळे, या सगळ्या कंपन्यांच्या पुढे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात, असा धोक्याचा इशारा ‘क्रेडिटसाईटस’ यांनी त्यांच्या ऑक्टोबर २०२२मधील अहवालात दिला होता, असे हा अहवाल सांगतो.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

गेल्या दोन दशकांमध्ये अदानी समूहावर भ्रष्टाचार, अयोग्य मार्गांनी पैसे कमवणे आणि सरकारी करांची चोरी करणे (Corruption, Money Laundering and Theft Of Taxpayer Funds), या संदर्भात अनेक केसेस दाखल केल्या गेल्या आहेत, असे हिंडेनबर्ग रीसर्चचा अहवाल नमूद करतो.

हा अहवाल पुढे म्हणतो की, हे सर्व आरोप एकत्रित केले तर एकूण १७ अब्ज अमेरिकन डॉलरची अफरातफर केल्याचे आरोप आजपर्यंत अदानी समूहावर झालेले आहेत. आजची डॉलरची किंमत ८२ रुपये प्रति डॉलर धरली, तर फसवणुकीचा हा आकडा १ लाख ४० हजार कोटी रुपये एवढा होतो. डॉलरची गेल्या वीस वर्षांतली सरासरी किंमत ४० रुपये जरी धरली तरी हा आकडा ७५ हजार कोटींजवळ पोहोचतो.

गौतम अदानी यांचे धाकटे बंधू राजेश अदानी यांच्यावर २००४ ते २००६ या काळात हिरे व्यापारात अफरातफर केल्याचे आरोप ‘डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स’ या कस्टम्स खात्याच्या विभागाने केले होते. या विभागाला ‘डीआरआय’ या संक्षिप्त नावाने ओळखले जाते. या ‘डायमंड ट्रेडिंग स्कॅम’ची आखणी राजेश अदानी यांनी केली, असा आरोप त्या वेळी ‘डीआरआय’ने केला होता.

या व्यतिरिक्त राजेश अदानी यांना कस्टम्स ड्यूटी चुकवणे, खोटी कागदपत्रे तयार करणे, अवैध प्रकारे आयात करणे (Customs Tax Evasion, Forging Documents And Illegal Imports), अशा विविध आरोपांखाली वेगवेगळ्या वेळी अटकसुद्धा झाली होती. सध्या हेच राजेश अदानी समूहाचे ‘मॅनेजिंग डायरेक्टर’ आहेत, अशी टिप्पणी हा अहवाल करतो.

गौतम अदानी यांचे मेहुणे समीर व्होरा हे ‘डायमंड ट्रेडिंग स्कॅम’चे नेते होते, असा आरोप ‘डीआरआय’ने केला होता. त्या वेळी सरकारची दिशाभूल करण्याचा (Making False Statements To Regulators) आरोप या समीर व्होरांवर केला गेला होता. आता हे समीर व्होरा ‘अदानी ऑस्ट्रेलिया’चे ‘एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर’ आहेत, हे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

गौतम अदानी यांचे थोरले बंधू विनोद अदानी हे या सर्व काळात अदानी समूहाचे ‘ग्रूप एक्झिक्युटिव्ह’ होते. त्या काळी त्यांच्यावरदेखील ‘डायमंड अँड पॉवर इक्विपमेंट स्कॅम’मध्ये सामील असल्याचे आरोप ‘डीआरआय’ने केले होते. आता हे विनोद अदानी, अदानी समूहात कोठलेही पद भूषवत नसल्याचे सांगण्यात येते. ते आता फक्त अदानी समूहाचे शेअर होल्डर असल्याचे सांगण्यात येते. मात्र या अहवालाच्या मते हे विनोद अदानी भारताबाहेर राहून ‘शेल कंपन्यां’चे जाळे चालवतात.

शेल कंपनी म्हणजे काय? तर – ‘A shell corporation is a business that is formed that has no actual business operations. They are mostly created for money laundering or sometimes for parking early startup funds. They do not employ anyone or provide any services.’

थोडक्यात, ‘शेल कंपन्या’ या खोट्या कंपन्या असतात. अवैध पैसा अवैध मार्गांनी देशातून आत-बाहेर करण्यासाठी त्यांचा वापर होतो.

हिंडेनबर्ग रीसर्चने दोन वर्षे शोध घेतला, तेव्हा त्यांना मॉरिशस, सायप्रस, यूएई, सिंगापूर आणि कॅरिबियन बेटे या ठिकाणी विनोद अदानी यांच्याशी संबंध असलेल्या शेल कंपन्यांचा शोध लागला. त्याचे पुरावे या अहवालात दिलेले आहेत.

.................................................................................................................................................................

अहवालाच्या पुढच्या भागात या शेल कंपन्यांचा वापर अदानी समूह कशा प्रकारे करतो आहे, हे मांडले आहे.

या शेल कंपन्यांमार्फत अदानी समूह ‘स्टॉक पार्किंग’ करतो, असे या अहवालाचे म्हणणे आहे.

‘स्टॉक पार्किंग’ म्हणजे अवैधरीत्या शेअर्स विकत घेणे. सोप्या भाषेत बोलायचे तर कंपनीच्या प्रमोटर लोकांना कंपनीच्या एकूण शेअर्सपैकी ७५ टक्के शेअर्स स्वतःकडे ठेवता येतात. बाकीचे २५ टक्के शेअर्स ‘पब्लिक’मध्ये विकावे लागतात. हा नियम ‘सिक्युरिटीज अँड इक्विटीज बोर्ड ऑफ इंडिया’ उर्फ ‘सेबी’ या संस्थेने केलेला आहे. ही सरकारी संस्था शेअर बाजारात सुव्यवस्था नांदावी म्हणून स्थापन केली गेलेली आहे.

७५ टक्क्यांपेक्षा जास्त शेअर्स प्रवर्तकांकडे राहिले, तर त्याला आपल्या शेअर्सच्या किमती कृत्रिमरीत्या चढवणे आणि पाडणे सहज शक्य होते, म्हणून ७५ टक्क्यांची मर्यादा घातली गेली आहे.

आपल्या कंपनीचे जास्तीत जास्त शेअर आपल्याकडेच राहावेत, अशी अनेक प्रवर्तकांची इच्छा असते. हिंडेनबर्ग रीसर्चचे म्हणणे असे की, या शेल कंपन्यांमार्फत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त शेअर्स अदानी कुटुंबीय विकत घेत आहेत. या शेल कंपन्या जेव्हा शेअर विकत घेतात, तेव्हा त्या परदेशी असल्यामुळे असे चित्र दिसते की, अनेक ‘फॉरिन इनव्हेस्टमेंट फंडज्’नी अदानी समूहाचे शेअर्स विकत घेतले आहेत. प्रत्यक्षात हे शेअर्स अदानी समूहाच्याच नियंत्रणात असतात.

आता प्रश्न असा येतो की, यासाठी लागणारा पैसा नक्की कुठून येतो? याचे उत्तर असे की, एखादी कंपनी आपल्या व्यवसायात काळा पैसा तयार करून तो अवैध पद्धतीने बाहेर नेऊन त्यातून हे शेअर्स विकत घेऊ शकते.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी हे सगळे कसे केले जाते, याचा एक फ्लो-चार्ट दिला आहे. तोच फ्लो-चार्ट हिंडेनबर्ग रीसर्चने आपल्या अहवालात वापरला आहे.

या फ्लो-चार्टमध्ये विनोद अदानी यांनी तयार केलेल्या शेल कंपन्यांकडून अदानी समूहाकडे पैसा येतो आहे, असा बाण दाखवला आहे. विनोद अदानी यांच्याकडे कोठून पैसा येतो आहे, हा बाण दाखवलेला नाही. हा काळा पैसा आहे का? हा राजकारणी लोकांचा पैसा आहे का? का अजून कुठल्या मार्गाने मिळवलेला पैसा आहे? हा खरं तर ‘जॉइंट पार्लमेंटरी कमिटी’ स्थापून शोध घेण्याचा विषय आहे.

या चार्टमध्ये पैसा गोल गोल फिरवून ‘स्टॉक पार्किंग’ केले जाते. या यंत्रणेद्वारे शेअर्सच्या किमती कृत्रिमरित्या वाढवल्या जातात. या सगळ्यात या प्रकाराची जाणीव नसलेला शेअरमध्ये पैसा टाकणारा सामान्य माणूस भरडला जातो.

महुआ मोईत्रा या संदर्भात म्हणाल्या आहेत की, हा कुणाचा पैसा आहे? हा अदानींचा पैसा असेल तर सामान्य गुंतवणूकदार या साऱ्या अनैतिक प्रकारात भरडला जाणार आहे.

पैसा फिरवण्याच्या या पद्धतीला ‘राऊंड-ट्रिपिंग’ असे म्हटले जाते.

अशा रितीने आपण कंपनीच्या ‘आतले’ आहोत, या परिस्थितीचा अवैध फायदा घेऊन शेअर्समध्ये पैसा कमवण्याच्या या पद्धतीला ‘इनसायडर ट्रेडिंग’ म्हणतात.

हा गोल गोल फिरवलेला पैसा अजूनही काही कारणांसाठी वापरला जातो. ती कारणे कुठली हे आपण पुढच्या लेखांकात पाहू.

असो.

हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल पाच भागांत विभागला गेलेला आहे. प्रस्तावना वेगळी.

या लेखात आपण प्रस्तावना आणि पाहिल्या दीड भागाचा परामर्श घेतला आहे. या पुढच्या लेखांमध्ये आपण पुढच्या भागांचा अगदी थोडक्यात परामर्श घ्यायचा प्रयत्न करू. तोपर्यंत अदानी समूहाचे काहीतरी उत्तर आपल्या समोर येईलच!

सध्यातरी चित्र असे दिसते आहे की, अदानी समूहाचे शेअर अत्यंत महाग झाले आहेत. अदानी समूहाने न झेपणारी कर्जे घेतली आहेत. अदानी समूहावर वेळोवेळी ‘डीआरआय’ वगैरे सरकारी विभागांनी केसेस केलेल्या आहेत.

या पहिल्या भागाने अनेक प्रश्न उभे केले आहेत. अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर असे महाग कसे झाले? कॅश-फ्लो नसताना मोठ मोठी कर्जे अदानी समूहाला कशी मिळाली? या पूर्वीच्या सगळ्या केसेसचे पुढे काय झाले?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. हे सर्व अत्यंत योग्य पद्धतीने झालेले आहे, अशी हमी शेअर बाजारात आपला पैसा लावणाऱ्या गुंतवणूकदाराला मिळाली पाहिजे. कारण, शेअर बाजारामध्ये आता फक्त श्रीमंत सटोडिये गुंतवणूक करत नाहीत. बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिटसवरचे दर खाली आल्यामुळे वाढत्या महागाईला ते पुरे पडत नाहीत. याच कारणासाठी अगदी सामान्यातले सामान्य नागरिकसुद्धा आपल्या कष्टाच्या पैशातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात.

हिंडेनबर्ग रीसर्चचा अहवाल म्हणतो आहे, त्याप्रमाणे काही गोंधळ असेल तर अदानी समूह, त्यांना कर्जे देणाऱ्या बँका, स्टॉक मार्केटवर लक्ष ठेवणारी सेबी या सगळ्यांकडून याची उत्तरे अपेक्षित आहेत.

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......