अजूनकाही
गांधींच्या शतकोत्तरी सुवर्णजयंती समारंभाच्या निमित्ताने ‘भारतीय विद्या भवन’ने गांधींवर भारताच्या विविध भाषांमध्ये जे लेखन झाले आहे, त्याचे इंग्रजीत भाषांतर करण्याचा एक प्रकल्प हाती घेतला. यात असमिया, बंगाली, बोडो, काश्मिरी, कन्नड, कोंकणी, गुजराती, हिंदी, मैथिली, मल्याळम, मराठी, मणिपुरी, खासी, गारो, नेपाली, ओडिया, पंजाबी, तामिळ, तेलगू, उर्दू, तसेच भारतीय लेखकांचे आणि जागतिक लेखकांचे इंग्रजीतील लिखाण इंग्रजीत अनुवाद करून सोळा खंड प्रकाशित केले जाणार आहेत. त्यापैकी बंगाली, तामिळ आणि कन्नड या पहिल्या तीन खंडांचा प्रकाशन समारंभ नुकताच आदरणीय दलाई लामांच्या हस्ते धर्मशाळेत (हिमाचल प्रदेश) झाला. येत्या दोन वर्षांत उरलेले खंड प्रकाशित होतील. या प्रकल्पाचे संपादक गणेश देवी आणि श्याम पाखरे आहेत. या खंडांना गांधी अभ्यासक रमेश ओझा यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा मराठी अनुवाद....
.................................................................................................................................................................
जगाच्या ज्ञात इतिहासात गांधींसारखी दुसरा व्यक्ती नसावी, जिने आपल्या जीवनकाळात लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणात आकर्षित करून घेतले! गांधींना आपल्या जीवनकाळात लाखो प्रशंसक आणि अनुयायांसोबत मिळाले, तसेच मोठ्या संख्यने टीकाकार आणि निर्भत्सना करणारेही. आजवर जितके मसीहा झाले, त्यांना आपल्या जीवनकाळात एकतर उपेक्षा सहन करावी लागली किंवा त्यांना प्रताडित करून मार्गातून दूर करण्याचे प्रयत्न झाले. मृत्यूनंतर अनुयायांद्वारे त्यांची पुनर्स्थापना करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या जीवन व तत्त्वज्ञानावर त्यांच्या अनुयायांच्या आकलनाची किंवा गरजांची छाया पडली. गांधी या मसिहांपेक्षा वेगळे ठरतात. कारण त्यांच्या हयातीत कोणालाही त्यांची उपेक्षा करता आली नाही आणि आजही करता येत नाही. त्यामुळेच गांधींचे चारित्र्यहनन केले जाते. त्यांचे समकालीन आणि सहयोगी, तसेच अनुयायांना त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही, कारण त्यांची उक्ती आणि कृती अक्षररूपात उपलब्ध आहे. गांधी जगातील सर्वांत जास्त दस्तऐवजीकरण झालेली व्यक्ती आहेत आणि त्याचे श्रेयदेखील त्यांनाच जाते.
आपल्याकडे श्रुतिसाहित्याला ‘आकर-ग्रंथ’ म्हणतात. ‘आकर’ म्हणजे खाण. प्रत्येक युग, परिस्थिती आणि प्रसंगाला समजून घेण्यासाठी जेथून निरंतर प्रकाशाचा झोत प्राप्त होतो, त्याला ‘आकर’ म्हणतात. श्रुतिसाहित्याप्रमाणेच आपल्याला गांधींचे जीवन आणि अक्षरदेहातून निरंतर प्रकाश मिळत राहतो. गांधींमध्ये असे काही तरी होते, जे त्यांच्यापूर्वीच्या महापुरुषांमध्ये दिसत नाही.
१८९३ साली गांधी दक्षिण आफ्रिकेत गेले. २४ एप्रिल १८९३ रोजी ते मुंबईला आगबोटीत बसले आणि २४ मे रोजी डरबनला उतरले. तेव्हा त्यांच्या मनात तत्कालीन जगाच्या कोणत्याही प्रश्नात हस्तक्षेप करण्याचा कुठलाही विचार नव्हता. तोपर्यंत ते एक अयशस्वी वकील होते आणि उदरनिर्वाहासाठी पैसे कमवण्याच्या हेतूने डरबनला गेले होते.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
तिथं पोचल्याच्या एक आठवड्यानंतर, ३१ मे रोजी गांधी प्रिटोरियाला जाण्यासाठी निघाले. तेव्हा त्यांनी विचारदेखील केला नव्हता की, ती रात्र जगाला एक नवीन प्रकाश देणारी असेल आणि ते त्या प्रकाशाचे माध्यम असतील. त्या रात्री त्यांना ट्रेनमधून पीटरमारित्झबर्ग स्टेशनवर बाहेर फेकून देण्याचा प्रसिद्ध प्रसंग घडला. त्याचा उल्लेख गांधींनी ‘जीवनाला कलाटणी देणारा अनुभव’ असा केला आहे. त्या वेळी त्यांनी संकल्प केला की, जी गोष्ट मानवतेला शोभनीय नाही, ती कधीही स्वीकारार्ह होऊ शकत नाही. गोष्ट तशी फार सरळ होती- ‘जे मानवतेला अशोभनीय ते अस्वीकारार्ह’. अमानुष असलेल्या सर्व गोष्टींचा अस्वीकार करावा लागेल.
आपल्याकडे दोनच विकल्प असतात. एक म्हणजे असत्य व अमानुषतेशी तडजोड आणि शरणागती किंवा त्याचा अस्वीकार. परंतु अस्वीकाराची किंमतदेखील मोजावी लागते.
केवळ चार वर्षांत गांधी अमानुषतेचा अस्वीकार करायला शिकले आणि त्यांनी निर्भयता व निर्वैरता आत्मसात केली. तरीही एक गोष्ट शिल्लक होती. ती म्हणजे ‘स्व’चे विसर्जन. स्वार्थ एक बंधन असते आणि ते भयाचेही कारण होऊ शकते. गांधी आपल्या मोठ्या भावाला लिहिलेल्या पत्रात जाहीर करतात की, त्यांनी ‘स्व’चे विसर्जन केले. ते लिहितात, “माझा स्वतःवर कोणताही अधिकार राहिलेला नाही आणि माझे-परके हे द्वैत उरलेले नाही. आता मला भय म्हणजे काय हे माहीत नाही”.
त्या दिवसापासून गांधींनी आपल्या खोलीचा दरवाजा आतून बंद करणे सोडून दिले. त्यांनी स्वतःला या संसाराचा एक अणू म्हणून घोषित केले. असा अणू जो स्वतंत्र, स्वयंसिद्ध आणि शक्तिवान आहे. ती बाह्यशक्ती नव्हे, तर अंतर्शक्ती आहे. केवळ चार वर्षांत गांधींनी स्वतः मुक्त होऊन जगाला ‘मुक्त’ करण्याचा मार्ग दाखवला, आणि तोही संसार व संसाराच्या प्रश्नांच्या मध्ये राहून.
जेव्हा गांधी आपल्या आयुष्यात येतात, तेव्हा ते आपल्यात प्रचंड स्थित्यंतर घडवून आणतात. आपल्याला काही गोष्टींचा त्याग आणि काहींचा स्वीकार करावा लागतो. त्यापासून सुटका नाही. म्हणूनच आपण गांधींची उपेक्षा करू शकत नाही. त्यामुळेच काही लोक गांधींपासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना गांधी परवडत नाही. गांधींची हत्या झाली आणि आजदेखील त्यांची शाब्दिक हत्या होतच असते, तरीदेखील ते आपल्या आतील मानवतेला आवाहन करत राहतात आणि आपण भयभीत होऊन जातो.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
गांधींचे व्यक्तित्व अपूर्व होते. असे म्हणतात की, गांधींवर जगातील विविध भाषांमध्ये एक लाखापेक्षा अधिक पुस्तके लिहिली गेली आहेत. गांधी जगातील सर्वांत जास्त चर्चा केली गेलेली व्यक्ती आहेत. गांधींवर केवळ समाजशास्त्रज्ञांनीच लिहिले असे नाही. साहित्यिक आणि कलाकारांनी त्यांच्यावर लिहिले किंवा त्यांना आपल्या कलेचा विषय बनवले आहे. कथा, कादंबऱ्या, निबंध, कविता, नाटक, चित्रपट, संगीत, नृत्यनाटिका, चित्रकला, लोककला यांसारख्या सर्व कलामाध्यमांचे गांधी विषय राहिले आहेत.
झारखंडमधील ताना भगतांचे आदिवासी अनुयायी आजदेखील ‘गांधी-गीत’ गातात. चंपारणमध्ये निळ मळेवाले आणि तिनकठीया शेतमजूर यांच्यातील प्रश्नोत्तरांवर आधारित कव्वाली गायली जाते.
सर्व सर्जनशील व्यक्तींना गांधींमध्ये काही ना काही सापडतेच. मी माझी मातृभाषा गुजरातीमध्ये जे वाचले-ऐकले आहे, त्या आधारावर सांगू शकतो की, सर्जनशील व्यक्तींमध्ये कोणत्याही प्रकारची विशेषता किंवा वेगळेपण शोधून काढण्याचे आणि त्याचे सादरीकरण करण्याचे कौशल्य असते. अद्वितीय व्यक्तीची गोष्ट जेव्हा वेगळ्या पद्धतीने सांगितले जाते, तेव्हा ती हृदयाचा ताबा घेते. माझ्या व्यक्तिगत आयुष्यात गांधींचा प्रवेश कवितेच्या माध्यमातून झाला. मी काही व्यासंगी नाही. त्यामुळे समाजशास्त्रज्ञांद्वारे नव्हे, तर सर्जनशील व्यक्तींद्वारे गांधींनी माझ्या मनोविश्वात प्रवेश केला.
मला वाटते की, तुम्हालादेखील माझ्यासारखा अनुभव आला असेल. गांधी काही कार्ल मार्क्स नव्हते, गांधी ‘गांधी’च होते. त्यामुळे आपल्या परिचयासाठी त्यांना समाजशास्त्रज्ञांची आवश्यकता नव्हती. प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या ‘Gandhi Before India’ या पुस्तकात १८९६ साली गांधींवर लिहिलेली कविता पाहून मला आश्चर्य वाटले. कदाचित गांधींवर लिहिलेली ती पहिली कविता असेल. सर्जनशीलता आणि गांधींचा संबंध अतूट आणि अन्योन्याश्रित आहे.
गांधींच्या शतकोत्तरी सुवर्णजयंती समारंभाच्या निमित्ताने ‘भारतीय विद्या भवन’ने गांधींवर भारताच्या विविध भाषांमध्ये जे लेखन झाले आहे, त्याचे इंग्रजीत भाषांतर करण्याचा एक प्रकल्प हाती घेतला. हा प्रकल्प फार आव्हानात्मक असेल याची आम्हाला कल्पना होती. कारण विविध भारतीय भाषांमध्ये गांधींवरील लिखाणात कविता, कथा, कादंबऱ्या, निबंध असे विविध सर्जनात्मक लेखनप्रकार आहेत. प्रत्येक लेखकाची विशिष्ट शैली आहे. हे सर्व इंग्रजीमध्ये कसे आणता येईल? अनुवाद प्रक्रियेदरम्यान सर्जनशील लेखकांना झालेले गांधींच्या अद्वितीयत्वाचे आकलन निसटायला नको, याचीही काळजी घेणे आवश्यक होते. कारण अनुवादाच्याही काही मर्यादा असतातच.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
त्याशिवाय काही व्यावहारिक प्रश्न होते. ज्याला भारतीय भाषांची जाण आणि कलात्मक दृष्टी असेल, असा प्रकल्प संपादक शोधणे आवश्यक होते. तिला बोडो, संथाली, कोंकणी, डोगरी यांसारख्या भाषांबद्दलदेखील प्रेम आणि आदरभाव असणेही आवश्यक होते. आमचा शोध ‘पीपल्स लिंग्विस्टिक सर्वे’चे मुख्य संपादक डॉ. गणेश देवींपाशी येऊन थांबला. त्यांनी या प्रकल्पासाठी आपला अमूल्य वेळ देण्याचे कबूल केल्यामुळे आम्ही निश्चिंत झालो. डॉ. श्याम पाखरे हे मुंबईच्या किशीनचंद चेलाराम महाविद्यालयाच्या इतिहास विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत. आम्ही त्यांना या प्रकल्पात सहसंपादक म्हणून सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आणि त्यांनी ते स्वीकारले. भारतीय विद्या भवनचे कार्यकारी सचिव श्री. होमी दस्तूर या प्रकल्पामागे खंबीरपणे उभे राहिले. अशा प्रकारे प्रकल्पाचे काम सुरू झाले.
या प्रकल्पात पुढील भारतीय भाषांचे इंग्रजीत अनुवाद करून सोळा खंड प्रकाशित करण्याचे नियोजन आहे - असमिया, बंगाली, बोडो, काश्मिरी, कन्नड, कोंकणी, गुजराती, हिंदी, मैथिली, मल्याळम, मराठी, मणिपुरी, खासी, गारो, नेपाली, ओडिया, पंजाबी, तामिळ, तेलगू, उर्दू, तसेच भारतीय लेखकांचे आणि जागतिक लेखकांचे इंग्रजीतील लिखाण. प्रत्येक खंडासाठी त्या भाषेतील तज्ज्ञ व्यक्तींची संपादक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक भाषेसाठी सक्षम अनुवादकांचा चमू उभा करण्यात आला आहे. या सर्व खंडांची एकूण छापील पृष्ठसंख्या दहा हजारांपर्यंत होईल. मधल्या दोन वर्षांत कोविडमुळे प्रकल्पाचा वेग मंदावला होता, परंतु आता त्याने वेग घेतला आहे. अलीकडेच बंगाली, तामिळ आणि कन्नड या पहिल्या तीन खंडांचा प्रकाशन समारंभ आदरणीय दलाई लामांच्या हस्ते धर्मशाळेत (हिमाचल प्रदेश) झाला. येत्या दोन वर्षांत उरलेले खंड प्रकाशित करण्याचा आमचा संकल्प आहे.
आतापर्यंत केवळ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असलेले गांधींवरील लिखाण ‘महात्मा गांधी इन इंडियन लँग्वेज’ या मालिकेअंतर्गत सर्वांना उपलब्ध होत आहे. गांधी विचारांचे अभ्यासक, समाजशास्त्रज्ञ, संशोधक, विद्यार्थी आणि सामान्य वाचक यांना त्याचा लाभ मिळेल, असा आमचा विश्वास आहे. भारतीय विद्या भवनचे संस्थापक कन्हैय्यालाल मुन्शी आणि गांधीजी यांचे भावनिक आणि विश्वासाचे नाते होते. ही संस्था गांधींच्या मूल्यांना समर्पित आहे.
या प्रकल्पाद्वारे गांधींच्या स्मृतीला अभिवादन करण्याचा आमचा नम्र प्रयत्न आहे.
Mahatma Gandhi in Indian Languages Series
Series Editors- Ganesh Devy and Shyam Pakhare
Bharatiya Vidya Bhavan
.................................................................................................................................................................
लेखक रमेश ओझा भारतीय विद्या भवनचे सल्लागार आहेत.
ozaramesh@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment