आशाताई बगे : शालीन, सुसंस्कृत आणि विलक्षण उंचीच्या लेखिका
पडघम - साहित्यिक
प्रवीण बर्दापूरकर
  • कथा-कादंबरीकार आशाताई बगे आणि त्यांची काही पुस्तके
  • Mon , 30 January 2023
  • पडघम साहित्यिक आशा बगे जनस्थान पुरस्कार

नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा अतिशय बहुमनाचा ‘जनस्थान पुरस्कार’ (२०२३) ज्येष्ठ कथा-कादंबरीकार आशा बगे यांना जाहीर झाला आहे. मराठी कथा आणि कादंबरी लेखनात मानवी जीवनाचे सूक्ष्म कंगोरे उलगडणाऱ्या आशा बगे यांच्या लेखनाचं स्थान फार उंचीचं आहे. मराठी साहित्यात अढळ ध्रुवपद प्राप्त केलेल्या आशाताई बगे यांचं व्यक्तिमत्त्वही विलक्षण साधं, शालीन आणि आश्वासक आहे. आशाताईंच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा हा लेख ‘क्लोज-अप’ या देशमुख आणि कंपनीनं प्रकाशित केलेल्या पुस्तकातून साभार...

.................................................................................................................................................................

दैनिक ‘नागपूर पत्रिका’च्या साकवि (साहित्य-कला-विज्ञानचा संक्षेप) या रविवार पुरवणीची सूत्रं यमुनाताई शेवडे यांच्या हाती होती. त्यांच्या हाताखाली रविवार पुरवणीचं काम मी आणि मंगला  करत असण्याचे ते दिवस होते. (तेव्हा मंगला माझे बेगम व्हायची होती)  पत्रकारितेत येऊन जेमतेम चार-पाच वर्षं झालेली, म्हणजे उमेदवारीचा काळ होता तो माझा. तर उमेदवारीच्या सुरुवातीच्या काळातच पणजी ते नागपूर व्हाया कोल्हापूर, सातारा, चिपळूण आणि मुंबई असा प्रवास झालेला. त्यामुळे मी कुठेच स्थिर झालेलो नव्हतो. साहजिकच सतत कोणा न कोणावर अवलंबून राहावं लागत असे. यमुताई शेवडे यांच्या लाडक्या लेखकात तेव्हा आशा बगे यांचं नाव अग्रक्रमानं  होतं. दिवाळी अंकासाठी त्यांची कथा मागायला मंगलासोबत गेलो, त्याला आता किमान चार दशकं सहज उलटून गेली.

तेव्हा नागपूर-विदर्भाच्या सांस्कृतिक क्षेत्रातील ज्येष्ठांच्या नावासोबतच सुरेश भट, महेश एलकुंचवार, ग्रेस, भास्कर लक्ष्मण भोळे, वसंत डहाके, यशवंत मनोहर, सुरेश द्वादशीवार यांच्या नावाचे नगारे महाराष्ट्रात वाजायला सुरुवात झालेली होती. या सर्वांच्या तुलनेने वयाने लहान असूनही नारायण कुळकर्णी कवठेकर त्याच्या कविता ‘सत्यकथे’त प्रकाशित होत असल्यानं आणि गारुड करणार्‍या वक्तृत्व शैलीमुळे राम शेवाळकर यांचीही नावे चर्चेत होती. कोणत्याही प्रादेशिक मर्यादा न येता आणि न मानता स्वकर्तृत्वाने ही मंडळी महाराष्ट्राच्या साहित्यप्रांती दीर्घकाळ तळपणार याची खात्री झालेली होती. यात एक अग्रक्रमी नाव आशा बगे यांचं होतं. त्यामुळे त्यांना भेटण्याची उत्सुकता अर्थातच होती.

आशा बगे यांची भेट झाली आणि माय-मावशीच्या नात्यातलं कोणी तरी भेटलं, अशी जी भावना तेव्हा झाली, ती आजही कायम आहे. खरं तर ओळख, मैत्रीवर असं नात्याचं कवच निर्माण होऊ द्यायला म्हणा की घालायला म्हणा, माझा कायम नकार असतो. मैत्री आणि नातं यांची सरमिसळ होऊ देता कामा नये, कारण या दोन्हींची खोली आणि तीव्रता भिन्न असते, भावनात्मक पातळी वेगळी असते, असं माझं ठाम मत आहे. तरीही लीलाताई चितळे, आशा बगे आणि जया द्वादशीवार याला अपवाद आहेत. कथा मिळण्याबाबत बोलणी झाल्यावर आशा बगे मंगलला म्हणाल्या, ‘अगं, पण माझं अक्षर समजेल नं कंपोझिटरला?’ आपलं अक्षर चांगलं नाही, हे सांगण्यातही इतका निरागसपणा त्यांच्यात होता की, तो मला खूपच भावला.

हे असं निरागस असणं हे आशा बगे यांचे एक खास वैशिष्ट्य, ते त्यांनी कायम जपलं आहे. नंतर पंचवीसएक वर्षांनी जीवनव्रती पुरस्कार मिळाल्यावर आम्ही भेटायला गेलो, तेव्हा स्मिता स्मृती अंकासाठी पाठवलेला लेख छानच झालाय, हे मी सांगितलं तर त्या पाठवलेल्या लेखाचं अक्षर समजलं की नाही, हा त्यांचा प्रश्न पहिला होता आणि ते सांगतानाचा निरागसपणा तो तसाच कायम होता. मग मौजचे राम पटवर्धन यांनी त्याचं अक्षर समजण्यासाठी काय काय केलं ते सांगण्यात आशाताई रंगून गेल्या.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

साहित्य क्षेत्रातील राजकारण आणि राजकारणातील उलाढाली याबाबत आशाताईंना गम्य नसतं, त्यावर काही बोलणं सुरू असलं की, ते सगळं त्यांना नवीन असतं. ‘हो का? मला बाई त्यातलं कसं काहीच ठाऊक नाही,’ असा भाव त्यांच्या चेहर्‍यावर पसरलेला असतो. त्यांच्या वर्तन आणि व्यवहारातल्या स्पष्ट नितळपणाला हे असं असणं एकदम साजेसं असतं.

आशा बगे जन्म आणि जगण्याने अस्सल नागपूरकर आहेत. (अर्थात विवाहानंतर मधली काही वर्षं अकोल्यात वास्तव्य झालं, हा अपवाद आहे.) महालातल्या देशपांडे कुटुंबात त्यांचा जन्म झाला. दक्षिणामूर्ती चौकातले हे देशपांडे प्रख्यात. आशाताईंचे आजोबा विश्वनाथ देशपांडे यांना इंग्रज सरकारने ‘सर’ ही पदवी दिलेली होती. वडील वामन विश्वनाथ देशपांडे त्या काळातले प्रख्यात वकील होते, त्यांना अण्णासाहेब म्हणत. चतुर वकील अशी त्या काळात ओळख होती. श्रीमंत बाबुराव देशमुख आणि देशपांडे कुटुंबीय साहित्य आणि कलेचे केवळ चाहतेच नव्हते, तर आश्रयदाते होते. श्रीमंत बाबुराव देशमुख हे तर रसिकाग्रणीच! पु.ल. देशपांडे, भीमसेन जोशींपासून ते अनेकांच्या मैफली त्यांच्या घरी रंगत. आशाताईंवर संगीताचा पहिला संस्कार इथंच झाला आणि शब्दांनीही त्यांच्या मनात मूळ धरलं ते इथेच. पुढे शब्दांच्या दुनियेत आशाताईंनी ऐसपैस मुशाफिरी केली आणि संगीतानं त्या मुशाफिरीवर सावली धरली. आशाताईंच्या लेखनात संगीताचे जे संदर्भ वैपुल्यानं येतात, त्याचं उगमस्थान इथे आहे. एम. ए.ची पदवी त्यांनी सुवर्ण पदकासह प्राप्त केली. एल.ए.डी. हे त्यांचं महाविद्यालय आणि विद्यापीठ नागपूर.

आशाताईंच्या लेखनाची जातकुळी जन्मजात अभिजात आहे. त्यात मानवीनात्यांचा शोध असतो, त्यातील पीळ असतो, पेच असतो, ते वाचताना एक वेगळं भावविश्व आपल्यासमोर अलवारपणे उलगडत जातं. त्या भावविश्वात आपणही गुंतत जातो. ते भावविश्व आपलंच आहे, ही जाणीव अनेकदा सख्खी होते, इतकं ते आपल्याशी नाळेचं नातं सांगतं. आशाताईंची सर्जनशीलता संयततेची साथ मात्र कुठेच सोडत नाही. भावनांचा कल्लोळ मोठा होत जातो पण त्याचा उद्रेक होत नाही, विद्रोहाच्या वाटेवर तर तो चालतच नाही, आशाताईंच्या शालीन व्यक्तिमत्त्वाला हे साजेसं असतं. हा मजकूर लिहित असताना जाणवलं, आशाताईंच्या लेखनाच्या प्रेरणा कोणत्या, त्यांच्या लेखनाची निर्मिती प्रक्रिया कशी असते वगैरे समीक्षकी थाटाचे प्रश्न आपण त्यांना कधी विचारलेच नाहीयेत, इतके त्यांच्या लेखनात आपण गुंतून गेलो, त्या लेखनाचा एक भाग झालेलो आहोत.

आशाताईंचे वागणं आणि व्यवहार एकदम सोज्ज्वळ. नागपूरकरांनी त्यांना कायम पाहिलं ते सोज्ज्वळच. डोळे दिपवणार्‍या अलंकारात आकंठ सजलेल्या आणि भपकेबाज वस्त्र परिधान केलेल्या आशाताई नागपूरकरांना ठाऊक नाहीत, कारण तसं त्यांना कधी नागपूरकरांनी पाहिलेलंच नाही. मंदिरात नुकतीच पूजा झालेली असावी, देवाला अर्पण केलेल्या हार-फुलं आणि धूप-उदबत्तीचा गंध दाटून आलेला असावा, सूर्याला ढगाआड करणारा नेमका श्रावण महिना असावा, अशा वातावरणांत समईच्या सर्व ज्योती उजळळेल्या असाव्यात. किंचित अंधारल्या त्या दिवसात समईचा तो प्रकाश खूप आश्वासक वाटतो. नास्तिकालाही तो गंध, तो प्रकाश प्रसन्न करतो, ते वातावरणच उमेद देणारं असतं, निराशा झटकून टाकणारं असतं. समईच्या त्या प्रकाशासारखा वडीलधारा आश्वासक वावर आशाताईंचा असतो. सार्वजनिक कार्यक्रमातला त्यांचा वावर आणि वर्तनही अतिशय साधं. त्या एवढ्या मोठ्या लेखिका असल्याचा तोराच नाही तर मग आव तरी असणार कुठे? कार्यक्रमस्थळी त्या आल्यावर त्या सस्मितच दिसणार आणि ओळखीच्या सर्वाना भेटणार, पहिल्या रांगेत तर बसणारच नाहीत, दुसर्‍या-तिसर्‍या किंवा क्वचित चौथ्याही रांगेत त्या विराजमान होणार, कार्यक्रम संपल्यावर पाहुण्याला (त्याचं भाषण कितीही टपराट झालेलं असलं तरी) त्याचा सन्मान कायम ठेवत, भाषणाची स्तुती करत भेटणार आणि मगच कार्यक्रम स्थळ सोडणार. त्यांना न ओळखणार्‍याला आपण इतक्या ग्रेट लेखिकेला भेटतो आहोत , बघतो आहोत याची जाणीवही त्यांच्या देहबोलीत नसते. सन्मान साहित्य अकादमीचा असो की विदर्भ साहित्य संघाचा जाहीर झालेला सर्वोच्च जीवनव्रती असो, तो जाहीर झाल्यावर तोच शांत नम्रपणा. जीवनव्रती सन्मान ग. त्र्यं. माडखोलकरांच्या नावे असून आणि यापूर्वी तो ना. घ. देशपांडे, सुरेश भट, ग्रेस आणि महेश एलकुंचवार यासारख्यांना मिळालेला आहे .  यावरुन त्याचे वजन लक्षात यावं, आशाताई मात्र आजच्या पिढीच्या भाषेत सांगायचं तर एकदम कुल!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आपल्याला भाषण करता येत नाही ही आशाताईंची स्वयंघोषित धारणा आहे. अशी कोणतीही स्वयंघोषित धारणा एकदा चिलखत म्हणून धारण केली की स्वत:ची प्रायव्हसी मस्त जपता येते, हा फार मोठा फायदा आहे. ‘मला नाही बाई सलग चारही मिनिटं बोलता येत,’ असं सांगत कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणेपद, अध्यक्षपद नाकारण्याची कला त्यांनी मस्त संपादन केलेली आहे. त्यांना भाषण करता येत नाही यात खरं तर काहीच तथ्य नाही. मी त्यांची काही भाषणं ऐकली आहेत, कव्हर केली आहेत पण, ते जाऊ द्या.

एक प्रसंग सांगतो - महेश एलकुंचवार यांना नागभूषण सन्मान वितरण कार्यक्रमाला अध्यक्ष राजकीय नेते होते आणि अपरिहार्य राजकीय अडचणींमुळे त्यांना कार्यक्रमाला दांडी मारावी लागली. ऐनवेळी अध्यक्षपद आशाताईंना भूषवावं लागलं; म्हणजे तशी गळच त्यांना घातली गेली. अंगभूत भिडस्तपणामुळे आणि एलकुंचवारांप्रती असलेल्या आस्थेमुळे त्यांना नाही म्हणता आलंच नाही. मुकाबला एलकुंचवार आणि कुमार केतकर यांच्यासारख्याशी होता, पण अवघ्या साडेचार-पावणेपाच मिनिटांच्या भाषणात आशाताईंनी सर्वांची मनं जिंकली. त्यांचं भाषण मनाच्या गाभार्‍यातून आलेलं होतं. त्यामुळे साहजिकच ते सर्वांना भावलं. पण भाषण करता येत नाही हे त्या प्रांजळपणे सांगताहेत याची इतकी खात्री समोरच्याला पडते की, तो स्वत:हूनच पाहुणेपद किंवा अध्यक्षपदाच्या ऑफरपासून माघार घेतो! नेमकं हेच कारण पुढे करत आशाताई अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या धुराळ्यापासून स्वत:ला लांब ठेवत आहेत. खरं तर केवळ साहित्य क्षेत्रातील नाही तर एकूण सर्वच राजकारणापासून त्यांना लांब राह्यचं आहे, याची जाणीव त्यांना असा आग्रह करणार्‍या सर्वांना आहे, पण एखाद्या वेळी त्या आग्रहाला बळी पडतील अशी भाबडी आशा बाळगायला काय हरकत आहे?

आशाताई संभाषणही छान करतात. छान म्हणजे आपल्या कानाला आणि मनालाही तृप्त करेल अशा शब्दात. एखादी बातमी त्यांना सांगितली किंवा त्यांचा एखादा मजकूर किंवा त्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली, तर त्या कशा उत्तरतील किंवा आपल्या भाषण-परफॉर्मन्सवर त्यांची प्रतिक्रिया कशी असेल, यावर मी आणि माझी पत्नी मंगल बर्‍याचदा अंदाज बांधण्याचा खेळ खेळतो. अनेकदा आमची मैत्रीण आणि ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरेही त्यात असते. बरं त्या जे काही बोलतात त्यात कृत्रिमता मुळीच नसते.

अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर; मध्यंतरी ‘हितवाद’ या इंग्रजी दैनिकात विजय फणशीकरने आशाताईंवर कशाच्या तरी निमित्ताने छानसा लेख लिहिला. (या इंग्रजी दैनिकाचा विजय संपादक आहे.) आशाताईंना हे सांगण्यासाठी फोन करण्याआधी मी म्हणालो, ‘आशाताई म्हणतील तुमचा निरोप कसा मंदिरातल्या घंट्या किणकिणल्यासारखा वाटला’ आणि घडलं अगदी तस्संच. कवितेचा कार्यक्रम संपल्यावर त्या अरुणा ढेरेला म्हणणार, ‘किती छान गुणगुणल्यासारख्या सादर केल्या गं तू कविता, माझी तर तुझ्यावरून नजरच हटली नाही बाई,’ आणि मग आपल्याला मनातलं तेच आशाताई कशा बोलल्या, याचं आम्हाला समाधान वाटणार.

असं छानसं बोलत-वागत त्या जगत असतात, लिहीत असतात. त्यांच्या लेखनातून आपल्याला आनंद देत असतात. त्यांच्या स्वभावात काही उणं-दुणं नाही असा दावा नाहीच, पण त्यापेक्षाही त्यांच्या लेखनातून मिळणारा आनंद किती तरी जास्त आहे, मोठा आहे. आशाताईंचं ॠणी राहायचं ते त्यांनी दिलेल्या याच आनंदासाठी.

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......