अजूनकाही
ज्येष्ठ पत्रकार, 'महाराष्ट्र टाइम्स'चे माजी संपादक गोविंद तळवलकर यांचे वयाच्या ९१व्या वर्षी अमेरिकेत निधन झाल्याची वार्ता सकाळी समजली. तेव्हा क्षणभर विश्वासच बसेना. त्यांच्या पुतण्याशी संपर्क साधला आणि दुर्दैवाने बातमी खरी असल्याची खातरी झाली. तळवलकर यांच्या निधनाने मराठी पत्रकारितेतील एका पर्वाचा अंत झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. तळवलकर अखेरपर्यंत कार्यरत होते. १९६५ ते १९९५ अशी २९ वर्षे 'महाराष्ट्र टाइम्स'चे संपादकपद सांभाळून निवृत्त झाल्यानंतर ते अमेरिकेत वास्तव्यास होते, परंतु निवृत्तीनंतरही ते अजिबात स्वस्थ बसले नाहीत. त्यांचा व्यासंग आणि लेखन अव्याहत चालूच होते. साप्ताहिक साधना, लोकमत, लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्समधून प्रासंगिक विषयांवर त्यांचे अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध होत होते. ते जसा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करीत होते, तितकेच त्यांचे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींकडे बारकाईने लक्ष असे; परंतु गेल्या काही महिन्यांत त्यांची प्रकृती ढासळू लागली आणि अखेर मंगळवारी दुपारी त्यांचे प्राणोत्क्रमण झाले.
गोविंदराव तळवलकर यांचा जन्म २२ जुलै १९२५ रोजी डोंबिवलीतील एका सुसंस्कृत कुटुंबात झाला होता. ज्येष्ठ कवी व लेखक गोपीनाथ तळवलकर आणि ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर हे त्यांचे काका. पदवीधर झाल्यानंतर गोविंदराव 'नवभारत'सारख्या नियतकालिकातून लेखन करू लागले. लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे, आगरकर, एम. एन. रॉय आदींच्या विचारांचा आणि लेखणीचा गोविंदरावांवर प्रभाव होता. हाच वारसा घेऊन ते पत्रकारितेत आले. प्रारंभी काही वर्षे 'लोकसत्ता' दैनिकात उपसंपादक म्हणून ह. रा. महाजनींसमवेत त्यांनी काम केले. पुढे 'महाराष्ट्र टाइम्स' सुरू झाल्यानंतर ते तेथे सहसंपादक म्हणून रुजू झाले. तेव्हा तेथे द्वा. भ. कर्णिक संपादक होते. दोघेही रॉयवादी, परंतु त्यांच्यात सतत मतभेद होत. कर्णिकांनी तळवलकरांना बराच काळ काहीही काम न देता अक्षरश: बसवून ठेवले होते, असे सांगतात; परंतु तळवलकरांनी या संधीचे सोने केले. या काळात ते सतत काही ना काही वाचत व लिहीत राहिले. त्यांनी व्यासंग वाढविला. कर्णिकांच्या नंतर तळवलकर मुख्य संपादक झाले आणि त्यांच्या लेखणीला बहर आला! राजकीय घडामोडींचा अभ्यास व निरीक्षण करून लिहिलेले त्यांचे अग्रलेख गाजू लागले. त्यांचा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास तर होताच, पण त्यांना सामाजिक भानही होते. त्यामुळे अग्रलेखांमधून ते समाजातील अपप्रवृत्तींवर तुटून पडू लागले. कोणत्याही क्षेत्रातील भ्रष्टाचाराची कुणकुण लागताच आपल्या वार्ताहरांना पाठवून त्याचा छडा लावून ती प्रकरणे वेशीवर टांगू लागले. यातून सहकारसम्राट शंकरराव मोहिते, तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांच्यासारखे अतिरथीही सुटले नाहीत. भ्रष्टाचारावर लिहिताना तळवलकरांच्या लेखणीला धार चढत असे. अकलूजच्या लक्षभोजनावरील, अंतुल्यांच्या सिमेंट भ्रष्टाचारावरील त्यांचे अग्रलेख वाचक अजूनही विसरलेले नाहीत. साहित्य क्षेत्रातील कंपूशाहीवरदेखील त्यांनी लिहिले. आणीबाणीच्या काळात मात्र आविष्कार स्वातंत्र्यावरील दडपणांना 'टाइम्स'च्या धोरणामुळे फारसा प्रभावी विरोध ते करू शकले नाहीत, याची तळवलकरांना खंत होती. आणीबाणी उठल्यानंतर लेख लिहून तशी जाहीर कबुली त्यांनी वाचकांना दिली. राजकीय क्षेत्रात सत्ताधाऱ्यांवरही तळवलकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि विचारांचे दडपण असे. जनमानसात मात्र त्यांच्या परखड व तेजस्वी पत्रकारितेविषयी आदरच होता. अनेक राजकारणी त्यांच्याकडे मार्गदर्शक म्हणून पाहात. परंतु काही सन्माननीय अपवाद वगळता राजकीय नेत्यांना तळवलकरांनी कधीच आपल्या जवळपासदेखील फिरकू दिले नाही.
ऐंशीच्या दशकात गोविंद तळवलकर यांना ‘हस्तिदंती मनोऱ्यातील संपादक’ म्हणून आणि माधव गडकरी यांच्याकडे ‘चळवळीतील लोकाभिमुख संपादक’ म्हणून पाहिले जात असे. परंतु कोणी काही म्हणो, या दोन्ही संपादकांचे योगदान मराठी पत्रकारितेत मोलाचे आहे.
कर्णिकांनंतर 'महाराष्ट्र टाइम्स' ला परिपूर्ण व दर्जेदार वृत्तपत्र म्हणून ओळख देण्यासाठी तळवलकर यांनी सर्वार्थाने प्रयत्न केले. मराठीतील ख्यातनाम लेखकांना, तसेच इतरही क्षेत्रातील नामवंतांना तळवलकरांनी लिहिते केले. पु. ल. देशपांडे शांतिनिकेतनात राहून परत येताच 'महाराष्ट्र टाइम्स'च्या रविवार पुरवणीत त्यांचे 'वंगचित्रे' हे सदर प्रसिद्ध होऊ लागले. चीनने भारतावर आक्रमण केले, तेव्हा कविवर्य कुसुमाग्रजांची कविता दैनिकाच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध करण्याचा प्रयोग तळवलकरांनीच केला. अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. साहित्य कला मनोरंजन या क्षेत्रांबरोबरच अर्थकारण, उद्योग, विज्ञान, क्रीडा क्षेत्रांतील घडामोडी, उपक्रम, विशेष बाबींना आवर्जून स्थान देण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. पुस्तके आणि पुस्तकांचे जग हा तर त्यांचा विशेष आवडीचा प्रांत. इंग्रजी पुस्तकांचा परिचय करून देणारे सदर दर आठवड्याला त्यांनी सुरू केले. एवढेच नव्हे तर 'वाचता वाचता' या सदरातून त्यांनी स्वत:देखील वाचस्पती या टोपणनावाने अनेक इंग्रजी पुस्तकांची ओळख मराठी वाचकांना करून दिली.
तळवलकरांनी केवळ मराठीतच नव्हे तर टाइम्स ऑफ इंडियासह एशियन एज, टेलिग्राफ, फ्रंटलाईन आदी इंग्लिश नियतकालिकांतूनदेखील वेळोवेळी प्रासंगिक लेखन केले. जगाचा इतिहास, साहित्य आणि पत्रकारिता या विषयात त्यांनी अभ्यासपूर्ण ग्रंथलेखन केले असून त्यापैकी सोव्हिएत साम्राज्याचा उदय आणि अस्त (खंड १ ते ४), नियतीशी करार, सत्तांतर १९४७ (खंड १ ते ३), भारत आणि जग, वैचारिक व्यासपीठे ही काही उल्लेखनीय. पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना लोकमान्य टिळक, बी. डी. गोएंका, दुर्गरतन , रामशास्त्री व यशवंतराव चव्हाण अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. मराठी पत्रकारितेतील मानदंड म्हणून गोविंद तळवलकर यांच्याकडे आजचीच नाही तर पुढील अनेक पिढ्या पाहतील.
माझ्या स्वत:च्या आयुष्यात तळवलकर आणि गडकरी या दोन्ही संपादकांचे स्थान फार फार महत्त्वाचे आहे. बी. ए. नंतर पत्रकारितेचा अभ्यास करण्यासाठी मी पुणे विद्यापीठात वृत्तपत्र विद्या विभागात प्रवेश घेण्यासाठी गेलो. त्याच वर्षी विद्यापीठाने पत्रकारितेचा पदवी अभ्यासक्रम सुरू केला होता. (१९७३-७४). तत्पूर्वी विद्यापीठात फक्त पदविका अभ्यासक्रम होता. प्रवेश देण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यासाठी मुलाखत घेण्यात येत होती. ही मुलाखत देण्यासाठी गेलो, तेव्हा समोर साक्षात गोविंदराव तळवलकर यांना पाहून छाती दडपून गेली. मी आधीपासून त्यांचे अग्रलेख वाचत होतोच. त्यामुळे आत्मविश्वासाने उत्तरे दिली. परंतु काय वाचता या प्रश्नावर त्या वेळच्या लोकप्रिय कथा-कादंबऱ्या व कवितासंग्रहाची नावे सांगितली. तेव्हा त्यांनी माझी कानउघाडणी केली. पत्रकारितेसाठी वादविवेचन माला, आजकालचा महाराष्ट्र यासारखी पुस्तके वाचली पाहिजेत, असा सल्ला दिला. मी विनम्रपणे मान्य केले. पण धडधडत्या अंत:करणानेच बाहेर पडलो. अर्थात प्रवेश मिळाला.
पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी धडपडत होतो. 'केसरी'त नोकरी पक्की झाली होती, परंतु न्यूज प्रिंट कटचे सरकारी धोरण आडवे आले. दरम्यानच्या काळात 'मॅजेस्टिक साहित्यिक गप्पांचे ' वार्तांकन करताना माधवराव गडकरींची भेट झाली. ते गोव्यात दैनिक गोमन्तकचे संपादक होते. त्यांनी विचारले, 'येतोस का गोव्यात माझ्याकडे?' मी तात्काळ हो म्हटले आणि गेलो गोव्याला.
गोव्याहून वर्षभरातच पुन्हा पुण्याला येऊन 'केसरी'त रुजू झालो. दोन वर्षे न्यूज डेस्क आणि रविवार पुरवणीचे संपादनाचे काम मोठ्या उत्साहाने केले. त्या काळात मी केलेल्या कामाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. कधी काळी आपण महाराष्ट्र टाइम्समध्ये उपसंपादक म्हणून जाऊ, असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण लवकरच तोही योग आला. मुलाखत गोविंदराव तळवलकर आणि महाव्यवस्थापक राम तर्नेजा यांनी घेतली. आणीबाणीनंतर लगेचच मी महाराष्ट्र टाइम्समध्ये रुजू झालो. पुण्यातील साहित्य संमेलनाच्या वार्तांकनासाठी खास निवडही झाली. आवडीचे काम जिद्दीने केले. पुढे लॉन्ग मार्च व नामांतर आंदोलनदेखील कव्हर केले. दिवाळी वार्षिक निर्मितीत संपादन साहाय्य करण्याची संधीही मिळाली. तळवलकर, दि वि गोखले, रा.के.लेले, चित्तरंजन पंडित, दिनू रणदिवे, चंद्रकांत ताम्हाणे, दिनकर गांगल, रा. य. ओलतीकर या सारख्या ज्येष्ठ ज्ञानी अनुभवी पत्रकारांसमवेत भरपूर काम करण्याची संधी मिळाली. साहित्य क्षेत्रात विशेष रस असल्याने तळवलकरांचा व्यक्तिगत लोभही वाट्यास आला. 'आनंद यादव पत्रिका' हा अग्रलेख लिहून होताच तळवलकरांनी तो प्रथम मला वाचायला दिल्याचे आजही आठवते. कौटुंबिक अडचणीमुळे मी महाराष्ट्र टाइम्स सोडून पुण्याला परत येण्याचे ठरविले, तेव्हा तळवलकर यांच्या हस्तेच भेटवस्तू देऊन मला निरोप देण्यात आला होता.
लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.
subhashn50@gmail.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Nivedita Deo
Mon , 27 March 2017
चांगला. आवडला.