अजूनकाही
२२ जानेवारी २०२३ रोजी वरळीच्या NSCI Domeमध्ये उपस्थित हजारो प्रेक्षक-श्रोत्यांनी ‘लाईफ टाइम’ म्हणावा असा स्वर-तालाचा अनुभव घेतला. निमित्त होतं उस्ताद झाकीर हुसेन आणि John McLaughglin यांनी सुरू केलेल्या ‘इंडियन- कर्नाटक- जॅझ’ या फ्युजन बँडला या वर्षी पन्नास वर्षं झाल्याचं. त्या निमित्तानं भारतातील दिल्ली- कोलकत्ता- बंगलोर- मुंबई या भारतातील प्रमुख शहरांत कॉन्सर्ट्स आयोजित केल्या गेल्या. त्यापैकी मुंबईतील कॉन्सर्ट अनुभवण्याची संधी मिळाली.
आठवणी तरी कशा, एका स्वरातून दुसऱ्या स्वराचा प्रवास दाखवणाऱ्या, एका शब्दातून दुसऱ्या शब्दाची पायवाट जोखणाऱ्या आणि एका प्रतिमेकडून असंख्य प्रतिमांचा रस्ता दाखवणाऱ्या... तशीच ही स्वरांची वहिवाट, कधी तरी ठाणे-मुंबईतील भाऊगर्दी, ट्रॅफिक आणि एकूणच जगण्याशी चाललेली झटापट सहन न होऊन गाव का सोडलं, अशी प्रश्नांची हाणामारी मनातल्या मनात होत असते. तेव्हा स्वर -प्रतिमा आणि गंध मदतीला येतो. एल. शंकर, नोरा जोन्स, अनुष्का शंकर, सतत बारा वर्षांची ‘अब्बाजी की बरसी’ आणि त्यातला तालवाद्यांचा धुमाकूळ, सुफी, खुसरो-कबीर, पंडित मुकुल शिवपुत्र असे अशक्यप्राय वाटणारे कलावंत बघितले आणि ऐकले. तेव्हा कृतज्ञ वाटतं.
एनसीपीएच्या सभागृहात जॅझ आणि रॉक अनुभवणं तर भन्नाटच! बाकी माझ्या एकलपणात संगीत सतत माझ्यासोबत असतं, एका मेमरीतून दुसरी अशी प्ले-लिस्ट सातत्याने वाजत असते. या आठवणीतून शक्तीची ही आठवण उगवली. मी थेट पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे १९७४मध्ये सुरू झालेल्या शक्ती आणि ‘रिमेम्बर शक्ती’पर्यंत पोचले. शक्ती म्हणजे creative intellegence, beauty and power. संगीतातील सौंदर्याचा आणि संगीतातातील क्षमतेचा हा एकत्रित आविष्कार भाषा, व्याकरण आणि देशांच्या सीमा यांना ओलांडून असीम होतो आणि क्षितिजापल्याडचं जग आपल्याला दाखवतो.
भारताच्या उज्वल शास्त्रीय संगीताच्या परंपरेला भारताबाहेर घेऊन जाण्याचं श्रेय पंडित रविशंकर आणि उस्ताद अली अकबर खान यांना जातं. खरं तर दोन वाद्यांचा स्वर-मिलाप किंवा जुगलबंदीची सुरुवात ही या दोघांनीच केली. दोघंही मैहर घराण्याच्या उस्ताद बाबा अल्लाउद्दीन खान यांचे शिष्य, सतार आणि सरोद या वाद्यात पारंगत. या दोन स्ट्रिंग इंस्ट्रुमेंट्स व्यासपीठावर एकत्रित आणून, जो स्वरांचा झंकार निर्माण व्हायचा, ते अनुभवून श्रोते मंत्रमुग्ध व्हायचे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
हा प्रयोग भारतात यशस्वी झाल्यावर तो पंडित रविशंकर यांनी इंग्लंड, अमेरिका आणि इतर देशांत करायला सुरुवात केली. कालांतरानं तबला नवाज उस्ताद अल्लारखांसाहेब त्यात सामील झाले. उस्ताद अल्लारखांसाहेबांचे सुपुत्र झाकीर हुसैन हे वयाच्या बाराव्या वर्षांपासून व्यासपीठावर ख्यातनाम कलावंतांना तबल्यावर साथसंगत करत आले आहेत. त्यांच्यातलं हे टॅलेंट उपजत आणि child prodigy यात मोडलं जायचं.
पंडित रविशंकरांनी सुरू केलेल्या या वाद्यमेळात कालांतरानं पाश्चात्य वादकही समाविष्ट झाले. १९६७मध्ये अमेरिकेतील प्रसिद्ध व्हायोलिन वादक येहुदी मेन्युहिन आणि पंडित रविशंकर यांनी ‘वेस्ट मिट्स इस्ट’ या बॅण्डची सुरुवात केली आणि त्यात उस्ताद अल्लारखांही साथसंगत करायला लागले. ही पार्श्वभूमी शक्तीचा प्रवास जाणून घेण्यापूर्वी समजून घेणं महत्त्वाचे ठरतं.
उस्ताद अल्लारखांसोबत वयाच्या बाराव्या वर्षांपासून झाकीर हुसैन परदेशातील मैफलींना जायला लागलं होतं. त्यांची जॉर्ज हॅरिसन (इंग्लिश सॉंग रायटर आणि संगीतकार, द बीटल्स (रॉक बँड)मधील प्रमुख गिटारिस्ट म्हणून प्रसिद्ध) आणि माईकी हार्ट (अमेरिकन तालवादक) या दिग्गजांशी मैत्री होती. उस्ताद अल्लारखांसोबतच किंवा स्वतंत्र तबला वंदन करायलाही सुरुवात केली होती.
अशाच उस्ताद अली अकबर खान यांच्या कॅलिफोर्नियातील घरात झालेल्या कार्यक्रमांत झाकिरजींची पहिल्यांदा ओळख ब्रिटिश गिटारिस्ट John McLaughglin यांच्याशी झाली. John McLaughglin यांना ‘महाविष्णू जॉन’ असंही संबोधलं जातं. जॉन यांचा जन्म ब्रिटनमधील संगीत घराण्यात झाला. त्यामुळे संगीत त्यांच्या रक्तातच आहे. त्यांनी लहान वयातच संगीत क्षेत्रातील अनेक शिखरं पादाक्रांत केली. उस्ताद अल्लारखां यांच्या घरी त्या दोघांनी एकत्र वादन केलं. तेव्हा झाकिरजींचं वय होतं २१ वर्षं आणि जॉन होते २७ वर्षांचे. नंतर १९६९मध्ये ते दोघं न्यूयॉर्कला भेटले. दोघांमध्ये सृजनाचा एक सामान धागा जुळला. John McLaughglin भारतीय तत्त्वज्ञान आणि शास्त्रीय संगीत ओढले गेले होते आणि त्यांनी आध्यत्मिक गुरू स्वामी चिन्मय यांच्याकडून दीक्षा घेतली होती. त्यांच्या इतर सांगीतिक कर्तृत्वासोबतच त्यांचं जॅझ फ्युजनच्या रचनेतलंही अव्वल स्थान प्राप्त होतं.
अशा सर्व सांगीतिक तारा जुळूनही त्या दोघांनाही हा एकत्रित संगीत प्रवास पुढची पन्नास वर्षं एकत्रित असणार आहे, याची तेव्हा मात्र कल्पना नव्हती. झाकीरजी त्या काळात अनेकदा अमेरिकेत कॉन्सर्ट्ससाठी जात असत. त्यांच्यासोबत अनेकदा एल.शंकर (व्हायोलिन वादक, संगीतकार) साथीला असत. दोघं भारतीय वाद्य वादनाचे कार्यक्रम एकत्र करत. झाकीरजींना भेटल्यानंतर जॉन यांनी भारतीय आणि जॅझ संगीताचं फ्युजन अशा संकल्पनेतून एकत्रित कार्यक्रम करायला सुरुवात केली. त्यांना स्वतःला जॅझ संगीत आणि भारतीय संगीतातील अनेक सामान शक्यता दिसत होत्या.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
इंडियन म्युझिक-जॅझ या फ्युजनच्या एकत्रित कलात्मक आविष्काराचे कार्यक्रम करायला सुरुवात केली आणि त्याला खूप यश मिळालं. जॉन यांनी भारतीय संगीताचा जॅझमध्ये वापर करून १९७१मध्ये स्वतंत्र अशी ‘द महाविष्णू ऑर्केस्ट्रा’ (जॅझ फ्युजन)ची सुरुवात केली होतीच. एका वाद्यातून दुसरं आणि एका वादकापासून दुसऱ्या वादकापर्यंतचा प्रवास घडत गेला. जॉन एकदा मृदंगम वादक रामनाथ राघवन यांना भेटले आणि त्यांनी तेव्हाचे उदयोन्मुख व्हायोलिन वादक एल. शंकर आणि घटम वादक विकू विनायक्रम यांची ओळख करून दिली. राघवन, एल.शंकर आणि विकूजी यांच्यामुळे जॅझ, भारतीय शास्त्रीय संगीतासोबत शक्तीमध्ये कर्नाटक शास्त्रीय संगीतही अलगद मिसळून गेलं. अशी १९७४मध्ये शक्तीची सुरुवात झाली.
१९७४-७९ या पाच वर्षांच्या काळात ‘Shakti with John McLaughglin’, ‘A handful of beauty’ आणि ‘Natural Elements’ असे तीन अल्बम्स शक्तीतर्फे आले. त्यानंतर शक्तीच्या कॉन्सर्ट्स आणि सांगीतिक प्रवासाला ब्रेक लागल्यासारखा झाला. पुन्हा १९९७मध्ये ‘द आर्टस् कॉन्सिल ऑफ इंग्लंड’ यांनी उस्ताद झाकीर हुसैन यांच्याशी संपर्क साधून शक्ती बँड पुन्हा सुरू करण्याची विनंती केली. मग त्याचं नामकरण ‘रिमेम्बर शक्ती’ असं करून त्याच्या कॉन्सर्ट्स सुरू झाल्या.
दरम्यान मूळ शक्तीमधील दोघांनी झाकीर भाई आणि जॉन यांनी एल. शंकर यांना संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते होऊ शकला नाही, तेव्हा इतर वादक त्यात सहभागी झाले. १९९७च्या पहिल्या टूरमध्ये झाकीर, जॉन यांच्यासमवेत पंडित हरिप्रसाद चौरसिया (बासरी) आणि विकूजी होते. झाकीरजी आणि जॉन यांची शक्तीसाठी तेव्हा पहिली पसंती हरिजींना नव्हती, परंतु एल. शंकर यांच्याशी संपर्क न झाल्यामुळे त्यांना बासरीचा या बँडमध्ये समावेश करायला लागला. हरिप्रसादजींच्या बासरी वादनानं शक्तीचं बळ अधिकच वाढलं आणि कार्यक्रमांना चार चाँद लागले. जॉन आणि झाकीरजी फार खूष झाले की, पुन्हा त्यांची रिप्लेसमेंट शोधणं कठीण वाटायला लागलं.
बर्लिन जॅझ फेस्टिव्हलचा व्हिडिओ जॉन यांनी बघितला. त्यात विकूजींसोबत एक तरुण मेंडोलिन वाजवत होता. मेंडोलिनचे स्वर आणि वाजवणाऱ्याची नजाकत बघून जॉन मंत्रमुग्ध झाले. मग त्या तरुणाचा, मेंडोलिनचा शक्तीमध्ये समावेश झाला. त्या तरुणाचं नाव होतं- यू. श्रीनिवास. १९९७च्या पहिल्या टूरनंतर विकू विनायक्रम यांच्याऐवजी त्यांचा मुलगा व्ही.सेल्वागणेश या ग्रुपमध्ये सामील झाला. सेल्वागणेश कंजीरा आणि मृदंगम अप्रतिम वाजवतात. तसंच वडिलांसारखेच घटम वाद्यातही ते पारंगत आहेत. सेल्वागणेशसोबत व्होकल्ससाठी शंकर महादेवन हेही ग्रुपमध्ये आले.
शंकर महादेवनच्या निमित्तानं पहिल्यांदाच शक्तीमध्ये कंठसंगीताचा समावेश झाला. ‘शक्ती’पेक्षा ‘रिमेम्बर शक्ती’ भारतीय संगीताच्या अधिक जवळ जाणारं होतं. कदाचित जॉन सोडून, त्यात सहभागी असणारे सर्व कलावंत भारतीय असल्यामुळेही असेल. जॉन यांना शक्तीच्या मैफली एखाद्या पेंटिंगसारख्या वाटतात. एका विशिष्ट काळात गोठून जाणाऱ्या आणि त्यातून येणारी आध्यात्मिक अनुभूती त्यांना दृश्यकलेच्या अधिक जवळ घेऊन जाणारी वाटते.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
शक्ती बँड सुरू झाला, तेव्हा त्यात ताल वाद्यांसोबत तार वाद्याचा (व्हायोलिन, इलेक्ट्रिक गिटार) प्रभाव होता. ते अधिक जॅझ आणि भारतीय शास्त्रीय संगीताच्या जवळ जाणारं होतं. त्यात पुन्हा पंडित हरिप्रसादजींच्या निमित्तानं बासरी आली, मेंडोलिन आलं आणि कंठसंगीत आलं. त्याचा विस्तार अधिक व्यापक, संगीत पद्धती, देशांच्या सीमा, संगीताचं व्याकरण या सगळ्यांना ओलांडून पुढे जात राहिला, ते खऱ्या अर्थानं वैश्विक संगीत झालं.
‘रिमेम्बर शक्ती’च्या ‘सॅटर्डे नाईट इन मुंबई’ या अल्बममधील काश्मीर या संगीत रचनेमध्ये पंडित शिवकुमार शर्मा यांच्या संतूर वाद्याचा सुरेख वापर केला आहे. पंडित रविशंकर यांनी सुरुवात केलेला हा संगीत-मिलापाचा उपक्रम शक्तीने फार पुढे नेला आणि भारतीय संगीताची जागतिक संगीतावर अमीट छाप उमटवली.
मूळ शक्तीमधील उस्ताद झाकीर हुसैन (७१) आणि जॉन (८१) हे दोन दिग्गज अजूनही शक्तीचा अविभाज्य भाग आहेत आणि मुंबईच्या कॉन्सर्टसाठी स्वतः विकूजी (८०) उपस्थित होते.
व्हायोलिनची आर्तता, बासरी आणि संतूरमधील नादमाधुर्य, तबल्याचा अनहद नाद, गिटारीचा लार्जर दॅन लाईफ झंकार, कांजिऱ्यातील हर्षोल्लास आणि घटमच्या तालातील आध्यात्मिक अनुभूती, जगण्यातील सगळ्या भावनांचा मेळ शक्तीमध्ये गुंफलेला आहे. तो भाषेपल्याड आणि सीमा ओलांडून पार पुढे जातो. तेच शक्तीचं कालातीत सामर्थ्यही आहे.
हा भारतातील दौरा जाहीर झाल्याबरोबर आपली तिकिट्स बुक करणारी अनेक चाहते भेटले. अनेक जण बडोदा, अहमदाबाद , इंदोर अशा शहरांमधूनही या कार्यक्रमासाठी मुंबईला आले होते. शक्तीच्या नेहमीच्या रचनांसोबत काही नवीन रचना, सुधारणांचाही त्यात समावेश होता. विकूजी यांच्या घटमने कार्यक्रमाचं चैतन्य अनेक पटीने वाढवलं. प्रत्येक स्वतंत्र नादासह, सहनादाचा अविस्मरणीय सोहळा झाला. झाकीरभाईंच्या बोटांची जादू तर व्यासपीठावर पसरलेलीच असते. जॉन यांना आपण नेहमी पाश्चात्य संगीताच्या तालावर गिटार वाजवताना ऐकतो, शक्तीमध्ये त्यांची गिटार सेल्वागणेश, शंकर महादेवन आणि गणेश राजगोपाल यांच्या भारतीय संगीतनादात तल्लीन झालेली असते.
मुंबईसारख्या अवाढव्य शहरांत शक्तीचे चाहते एकत्र येतात आणि ‘वन्स मोअर करत’ या कार्यक्रमात तल्लीन होतात, हे अदभुतच म्हणावं लागेल.
Long live Shakti!
..................................................................................................................................................................
लेखिका अंजली अंबेकर चित्रपट समीक्षक, साहित्य अभ्यासक आहेत.
anjaliambekar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment