राष्ट्रभावनेचा प्रवास - एक आकलन (उत्तरार्ध) : सामाजिक संक्रमण
पडघम - देशकारण
मंदार काळे
  • भारताचा तिरंगा ध्वज
  • Fri , 27 January 2023
  • पडघम देशकारण राष्ट्रवाद Nationalism राष्ट्रभक्ती Rashtrabhakti राष्ट्रभावना Patriotism राष्ट्रीय एकात्मता National Integration

आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत

सहा-आठ महिन्यांपूर्वी राज्य सरकारने ‘साहित्य आणि संस्कृती मंडळ’ व ‘मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा’वर नियुक्त्या जाहीर केल्या, आणि रतीब घातल्यासारखा ‘पार्शालिटी, पार्शालिटी’चा गजर झाला. निवड झाल्या-झाल्या प्रथम त्या निवडीकडे जातीय, विभागीय, धार्मिक, गट, शहर/गाव आदि भूमिकेतून पाहून, चोवीस तासांच्या आत त्यावर आक्षेप नोंदवणार्‍यांचे मला कौतुक वाटते. कुठलेही मंत्रीमंडळ स्थापन झाले की, त्यात कुठल्याशा ओसाडवाडीतील भकासगल्लीला वा कुठल्या तरी महान जातीला वा राज्याला/शहराला पुरेसे प्रातिनिधित्व मिळाले नाही, म्हणून राजकीय विरोधक कांगावा करतात.

एखाद्या पुस्तकात वा चित्रपटात खलनायक वा खलनायिका आपल्या जातीची/धर्माची दाखवून आमच्या जाती-धर्माच्या भावना दुखावल्याचा कांगावा करत धुडगूस घालणार्‍या सेना, ब्रिगेड वा संघटनांचा गल्ली-बोळांत ढेकणांसारखा बुजबुजाट झालेला दिसतो. माध्यमेही त्यांच्या त्या अस्मितेच्या गळूला, त्या नकारात्मतेला मूळ कलाकृतीपेक्षा अधिक वाव देणारी आहेत. ‘हिंद देश के निवासी सभी जन एक हैं’ वगैरे म्हटले तरी माझे कुटुंब, माझी जात, माझा धर्म, माझी ओसाडवाडी, माझी भकासगल्ली जग्गात भारी आहे, असा बहुतेकांचा समज असतो... आणि ‘आपला तो नाही’ हा गैरसमजही असतो.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

पहिल्या लेखांकाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या प्रतिज्ञेमधील ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत’ आणि ‘माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे’, हे भारतीय नागरिक केव्हाच विसरले आहेत. ‘माझ्या धर्माचे, माझ्या जातीचे, माझ्या उपजातीचे, माझ्या गावाचे लोक, माझ्या - धार्मिक वा राजकीय - बुवाचे स्वयंघोषित अनुयायी वा मानसिक गुलाम हेच फक्त माझे भाईबंद आहेत’, अशी नवी प्रार्थना चॅनेल्सवरून, भाट छपाई माध्यमांतून, व्हॉट्सअ‍ॅपवरून घोकून घेतली जात आहे. भरीला याची कणभरही लाज वाटू देऊ नका, असे बिनदिक्कतपणे सांगणारे नेते पैशाला पासरी झाले आहेत.

विडंबनकार रामदास फुटाणे यांनी आसपासची ढासळती राजकीय नि आर्थिक नैतिकता, उग्र होत जाणार्‍या धार्मिक, जातीय अस्मिता आणि विखंडित होत जाणार्‍या समाजावर भाष्य करताना या प्रतिज्ञेचे विडंबन केले होते-

‘भारत कधी कधी माझा देश आहे.

आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत.

माझं आयुष्य हा काही राष्ट्रीय एकात्मतेचा प्रबंध नाही

त्यामुळे अन्य जाती धर्माशी माझा काडीचाही संबंध नाही...’

बांधीलकी ते भक्ती

साधारण दोन-तीन दशकापूर्वीपर्यंत ‘राष्ट्रीय एकात्मता’ हा शब्द परवलीचा होता. आता त्याची जागा ‘राष्ट्रभक्ती’ या शब्दाने घेतली आहे. दोन्हींत महत्त्वाचा फरक आहे. पहिल्यामध्ये परस्पर-बांधीलकी आहे, तर दुसर्‍यामध्ये केवळ समान आदर्शापुढे झुकणारी भक्ती आहे. त्या भक्ती-विषयाची ठेकेदारी बळकावणारे तिचे पौरोहित्य करून सामान्यांनी तिच्या चरणी अर्पण केलेला मलिदा ओरपत आहेत. आणि जे झुकत नाहीत, त्यांना झुकण्यास भाग पाडण्यासाठी साम-दाम-दंड-भेद-छद्म-झुंड आदि सर्व वैध-अवैध मार्गानी ही खुजी मंडळी आपली उंची वाढल्याचा आभास निर्माण करत आहेत.

बांधीलकीची अपेक्षा आता निष्ठेच्या अपेक्षेत रूपांतरित झाली आहे. आणि निष्ठेला, अस्मितेला छेद देण्यासाठी मग जातीय अस्मितेची विषवल्लीही वेगाने वाढू लागली आहे. माणसांना बांधीलकीऐवजी अस्मिता, द्वेष यांचा आधार घ्यावासा वाटतो आहे. देशाची, देशप्रेमाची उभारणी ही बांधीलकीपेक्षा द्वेषावर अधिक होते आहे. यातील विसंगती समजून घेण्याची बहुतेकांची इच्छा नाही नि कुवतही. माणसे मानसिकदृष्ट्या एका बाजूने भीती आणि ती दडपण्यासाठी अभिनिवेशी त्वेषाने इतकी भारली आहेत की, सर्वांचे आदर्श हळूहळू रचनात्मक कृती करणार्‍यांपेक्षा प्रासंगिक शूरवीरांकडे अधिक सरकले आहेत.

आदर्शांचे ‘बाहुबली’करण

डॉ. आंबेडकरांसारखा चतुरस्र बुद्धिमान माणूस शोषित वर्गाला पुरेसा वाटत नाही. त्यांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’, या सशक्त दृष्टीकोनापेक्षा प्रासंगिक, कर्मकांडसदृश विद्रोह त्यांना अधिक आकर्षक वाटतो. त्यासाठी इतिहासातून आपले शूरवीर उचलण्याची गरज वाटते. इतर जातींनीही आप-आपल्या जातीतील संतांचे बोट सोडून इतिहास खंगाळून आप-आपले वीर शोधून काढले आहेत. धनगरांच्या कार्यक्रमांतून सर्वकल्याणकारी अहिल्याबाईंची जागा हळूहळू रणझुंजार मल्हाररावांनी घेतली.

फार कशाला, प्राचीन कालापासून स्वत:ला बुद्धिजीवी म्हणवणार्‍या ब्राह्मणांनीही आपल्या संघटनेचा आदर्श म्हणून त्या जातीतील असंख्य बुद्धिमंताऐवजी क्षत्रिय-निर्दालक परशुराम निवडला. त्यामागे प्राचीनतेचा अट्टाहास तर आहेच, त्याचबरोबर याला ब्राह्मण जातीअंतर्गत कोकणस्थांचा वरचष्मा स्थापन करण्याचा मार्ग (कोकणस्थ-> कोकण-> अपरांत-> निर्माता-> परशुराम अशा बादरायण संबंधाने) म्हणूनही पाहता येते. म्हणजे गटातल्या गटातही उपगटांची कुरघोडीही कमी नसते. माणसे बुद्धिला, रचनात्मक, निर्मितीक्षम कामांपेक्षा, अस्मितेला, त्यांच्या झेंड्यांना, सतत भावना दुखावण्याला, इतर गटांवर दात धरून राहण्याला प्राधान्य देऊ लागली आहेत.

गटनिष्ठेच्या माकडउड्या

करोनासारख्या अभूतपूर्व आणीबाणीच्या काळातही कोणतीही नवी माहिती, नवी घटना ही कायम अस्मिता-द्वेषांच्या चष्म्यातून पाहिली जात होती. केंद्राचे काम चांगले, राज्याचे वाईट आणि पुन्हा मनपाचे चांगले असे पुण्यातील एका बाजूच्या गटाचे मत होते. तर उलट बाजूच्या मंडळींच्या दृष्टीने केंद्रातील सरकारचे वाईट, राज्यातले काम चांगले नि मनपाचे पुन्हा वाईट अशी भूमिका होती. आंधळी गट-निष्ठा राखण्यासाठी तर्काच्या अशा माकडउड्या मारल्या जातात. 

बरं या विधानांना कोणताही वस्तुनिष्ठ आधार नसतो. आपल्या बाजूच्या विरोधकांवर आग ओकणे, शक्य त्या माध्यमांतून जळजळीत द्वेष पसरवणे, इतकेच ‘माझे देशबांधव’ आता करू लागले आहे. माणसे बुद्धीचा कमीत कमी वापर करून केवळ अस्मिता-द्वेषांच्या पार्ट्या पाडून खेळ खेळू लागली आहेत. याला व्हॉट्सअ‍ॅप वा फेसबुकसारख्या माध्यमांतून निरर्गलपणे होणारा स्वार्थानुकूल अफवांचा संघटित प्रसार भरपूर हातभार लावतो.

धंदेवाईक माध्यमांचे प्रदूषण

समाजकारणाने नि राजकारणाने जसे या विघटनवादाला खतपाणी घातले, तसेच भांडवलशाहीने आणलेल्या धंदेवाईकतेनेही. चॅनेलवर साधकबाधक चर्चा होण्यापेक्षा शाब्दिक लठ्ठालठ्ठी झालेली त्यांच्या मालकांना हवी असते. कारण मग तो व्हिडिओ समाजमाध्यमांतून फिरतो. त्याला त्या चॅनेलच्या वेबसाईटवर वा यू-ट्यूब चॅनेलवर भरपूर हिट्स मिळतात. आणि इंटरनेटच्या जमान्यात हिट्स/क्लिक्स = पैसा हे गणित असल्याने मालक खुश होतात. साधकबाधक, विषयाला धरुन पण उद्बोधक चर्चा झाली, तर त्यातून चॅनेल मालकांना पैसा मिळत नाही. म्हणून चर्चेमध्ये अद्वातद्वा बोलणारे, एकमेकांवर हेत्वारोप करणारे वगैरे चर्चक अधिक प्रेमाने बोलावले जातात. ‘आमच्या बाजूच्याने विरोधी बाजूच्या चर्चकाची आरडाओरडा करून बोलती कशी बंद केली’, म्हणून खुश होत अल्पबुद्धी समाजमाध्यमी तो व्हिडिओ ‘व्हायरल’ करतात.

हे पुरेसे नसते म्हणून चर्चेचे पक्षपाती सूत्रसंचालक कोणत्या बाजूला टीआरपी अधिक मिळेल (आणि त्यांचे मालक कुण्या पक्षाकडून अधिक मलिदा मिळेल) याचा अंदाज घेऊन ती बाजू घेऊन लढतात. स्वत:च बोलावून आणलेल्या विरोधी मुद्दे मांडणार्‍यांचा अपमान करतात, त्यांची मुस्कटदाबी करतात. त्यांना दूषणे देणार्‍या अन्य सहभागी चर्चकांच्या उद्धटपणाकडे कानाडोळा करून ती बाजू अप्रत्यक्षपणे उचलून धरतात.

चर्चांपलीकडे अन्य मनोरंजनात्मक कार्यक्रमातही गुणवत्ता अथवा सर्जनशीलतेपेक्षाही ‘खपाऊ’ मालालाच प्राधान्य असते. त्यातून माध्यमे लोकानुनयी होतात. खासगी माध्यमे ‘आम्हाला कुठे यातून पैसा मिळतो? आम्ही हे का करावे? हे आमचे काम नाही, कारण आम्ही व्यावसायिक आहोत, नफा मिळवणे हे आमचे एक आणि एकच साध्य आहे. त्यापलीकडे समाजाचे आम्ही काहीही देणे लागत नाही’, अशी भूमिका घेऊन उभी असतात. यातून बहुसंख्येच्या मनोरंजनाच्या संकल्पनेत न बसणारे विषय बाद होऊन जातात. जिथे विज्ञानासारख्या आवश्यक विषयाला कणभर जागा मिळत नाही, तिथे समाजहिताची भूमिका घेऊन केलेल्या प्रबोधनप्रधान कार्यक्रमांची उत्तरक्रिया केव्हाच होऊन गेली आहे.

सर्जनशीलता नि प्रबोधनाचा अस्त

तीन-चार दशकांपूर्वी चॅनेलमाध्यमांचा सुळसुळाट होण्यापूर्वी ‘दूरदर्शन’ हे शासन-संचालित एकमेव चॅनेल कार्यरत होते. त्याची आर्थिक बाजू शासनाने सांभाळलेली असल्याने म्हणा की मिळू शकणारा शेवटचा पैसाही प्रेक्षकाकडून वसूल केला पाहिजे, असा बाणा घेऊन जन्मलेली मॅनेजमेंट नावाच्या सर्वविषय-अर्धशिक्षित आणि स्वयंघोषित सर्वज्ञ जमात उदयाला आलेली नसल्याने कार्यक्रमांचे विषय, दिशा आणि मांडणी, ही अद्याप सर्जनशील व्यक्तींच्या हाती होती. 

त्याचबरोबर शासकीय मालकी असल्याने शासनाच्या विविध योजनांचा प्रचार-प्रसारही त्यातून होत असे. प्रबोधन-प्रचार-मनोरंजन अशा तीनही प्रकारांना त्यात समान महत्त्व होते. पंचवार्षिक योजनेतील धोरणांबद्दल, तिच्या यशाबद्दल प्रचार होत होता, तसेच कुटुंब-नियोजनासंबंधी जनजागृती करण्यासाठी लाल-त्रिकोण, सर्वशिक्षा अभियान यांसारख्या जनहिताच्या योजनांबद्दल करमणुकींच्या कार्यक्रमांच्या माध्यमातूनच प्रबोधनाचे कार्यही केले जात होते. याशिवाय सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, सांस्कृतिक वैविध्य असलेल्या देशात त्याचा विध्वंस न करता आपण सारे सहप्रवासी आहोत, ही भावना ‘राष्ट्रीय एकात्मता’ या संकल्पनेच्या आधारे रुजवण्याचा प्रयत्न केला जात असे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘मिले सुर मेरा तुम्हारा’, ‘सौ रागिनियों से सजा भारत’ किंवा ‘सारा भारत ये कहे’ यांसारखी गाणी सादर करण्याची ना शासनाला गरज वाटते ना जनतेला. व्यावसायिकांनी तर ‘यात नफा नाही’ या नावाखाली केव्हाच हात वर केले आहेत. कुणी पदरमोड करून कुणी केलीच, तरी तरी तिला प्रस्थापित माध्यम मिळत नाही. आणि मिळालीच, तर गणपतीबाप्पासमोरच किंवा कृष्णभक्तीचा आव आणत ‘चिकनी चमेली’ किंवा ‘जलेबीबाई’बरोबर नाचण्यात धुंद झालेल्या प्रेक्षकांचे त्याच्याकडे फारसे लक्ष जात नाही. 

यात भर म्हणून अगम्यताप्रेमी, उन्नतनासिका समीक्षक अशा लघुपटांना, गीतांना ‘प्रचारकी’ म्हणून नाके मुरडू लागतात. आणि त्यांच्या पारंब्यांना लटकून कणभर सरस सामाजिक स्थान मिळवून सामान्यांपेक्षा अर्धी पायरी वर राहण्याची धडपड करणारे त्यांचे भाट त्यांची री ओढत तो समज पसरवण्याचे काम जोमाने करत राहतात.

शत्रूलक्ष्यी विचारांचा उदय

राष्ट्रभक्तीची संकल्पना आणि म्हणून राजकारण, सामाजिक विचार, एवढेच काय कलासमीक्षाही शत्रूलक्ष्यी होत गेली आहे. काय स्वीकारार्ह यापेक्षा काय त्याज्य याची चर्चा अधिक करू लागली आहे. याला अर्थातच अनियंत्रित माध्यमांचा सुळसुळाट हे एक कारण आहे. कोणतीही जबाबदारी न घेता बेफाट विधाने करणे आता सोपे झाले आहे. अशा बेफाट बेमुर्वत विधानांचे पीक प्रचंड वेगाने नि व्याप्तीने वाढते आहे. त्याला आव्हान देऊन त्यातील फोलपणा सिद्ध करताना साधकबाधक विचार करू शकणार्‍या, तारतम्याला अजूनही तिलांजली न दिलेल्यांची दमछाक होते आहे. यातून काही जण सरळ विचार बंद करून ‘मुख्य धारेत’ प्रवेश करून त्या प्रवाहाबरोबर वाहात जाणे पसंत करू लागले आहेत.

एखादा बागुलबुवा तयार करून त्याच्या विरोधात आपला एक गट तयार करणे याला आता प्राधान्य मिळू लागले आहे. राष्ट्रवादी विचार तर बांधीलकीला संपूर्ण त्यागून केवळ शत्रूलक्ष्यी मांडणी करणार्‍यांनी अपहृत केलेला आहे. आणि त्यांचे विरोधक ‘त्यांना विरोध की राष्ट्रवाद या संकल्पनेला विरोध’ या संभ्रमात भरकटत चालले आहेत.

अगदी सामाजिक न्यायाचा विचार करणारेही असाच विचार करू लागले आहेत. ‘त्यांच्या’ व्यासपीठावर जायचे नाही, हा अलिखित नियम तर झालाच आहे, पण बहुतेक वेळा आपल्याशी एकमत असलेल्या एखाद्याने जरा न पटणारे मत मांडले, की लगेच ‘तो छुपा तिकडचा’ म्हणून त्याला पलीकडे ढकलण्याची त्यांची अहमहमिका एकुण समाजाच्या हिताची तर नाहीच, पण आपलेच वर्तुळ आपल्या सोयीचे लहान करत नेणारी आहे. ‘पुण्यात शुक्रवारातले पुरोगामी नारायण पेठेतल्या पुरोगाम्यांच्या वार्‍याला उभे राहात नाहीत, आणि नव्या पेठेतले पुरोगामी या दोघांना हाताच्या अंतरावर ठेवत असतात’, असे मी गंमतीने म्हणत असतो.

जातीय अस्मितांचे प्रवाह

प्रत्येक जाती/धर्म/गट/प्रदेश यांतील एकांगी मतांचे अनेक लोक प्रबळ होऊ लागले आहेत. ते त्या त्या गटाचे नेतृत्व बळकावून बसले आहेत. यातील ब्राह्मणांच्या मते देशाची दुरवस्था ही ‘साल्या आरक्षणवाल्यां’मुळे किंवा आमच्या गुणवत्तेला डावलून पुढे जाणार्‍या ‘फुकट्यां’मुळे आहे. पोरवडा वाढवून हे लोक बहुमताच्या आधारे आम्हा अल्पसंख्याकांची मुस्कटदाबी करतात, अशी यांची तक्रार असते. त्यामुळे बहुमताला झुगारून उभी राहणारी हुकूमशाही यांची लाडकी असते. सत्तर वर्षे लोकशाही रुजलेल्या देशात हुकूमशाहीच्या अनुभवाअभावी तिचा अर्थ समजण्याइतकी समज त्यांच्याच विकसित झालेली नाही. नव्या व्यवस्थेमध्ये गुणवत्ते(?)नुसार ‘आपले’ राज्य येईल, अशी यांना भाबडी आशा असते.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

म्हणून महाराष्ट्रात फडणवीस मुखमंत्री होताच मनातल्या मनात ‘आनंद पोटात माझ्या माईना’ गात गात ‘राज्याला प्रथमच ‘ण’ला ‘ण’ म्हणणारा मुख्यमंत्री मिळाला’, असे विधान हे लोक समाजमाध्यमातून फिरवू लागतात. आणि असा तद्दन खोटा दावा करताना, बाळासाहेब खेर हे मुंबई प्रांताचे पहिले पंतप्रधान आणि नंतर मुख्यमंत्री, तर सेनेचे मनोहर जोशी हे युतीचे मुख्यमंत्री होते, हे सोयीस्कररित्या विसरून जातात. कारण त्यातही पुन्हा खेर काँग्रेसचे नि जोशी सेनेचे; त्या तुलनेत भाजप/संघ अधिक शुद्ध धारेतला ब्राह्मणी असल्याने त्यांच्या मुख्यमंत्र्याचे कौतुक अधिक हे ओघाने आले.

उलट दिशेने आंबेडकरी म्हणवणार्‍यांतील एकांगी मंडळींच्या मते ‘हे सारे ब्राह्मणांचे (पळवाट : ब्राह्मण्यवादाचे) पाप आहे’. एका आंबेडकरी विचारवंताने तिच्या एका लेखाची सुरुवातच मुळी ‘देशात जे जे सगळे वाईट आहे, ते ब्राह्मण्यवादाचे आहे, असे मानले जाते’, या विधानाने केलेली माझ्या वाचण्यात आली आणि मी गार पडलो होतो. संगणकावर प्रोग्रामिंग करणार्‍यांना ‘गार्बेज कलेक्टर’ नावाची संकल्पना माहीत असेल. संगणकाच्या स्मरणमंजुषेचा कोणत्याही प्रोग्राम/ प्रणालीला नको असलेला, टाकाऊ भाग हा गार्बेज कलेक्टरमध्ये सामावला जातो. ब्राह्मण्य/ब्राह्मण हे असे गार्बेज कलेक्टर आहेत, अशीच तिची व्याख्या दिसली.

थोडक्यात, ब्राह्मण्यवाद (स्वगत : ब्राह्मण) हे सार्‍या पापाचे मूळ आहेत, असा यांचा दावा आहे. ‘पूर्वी अस्पृश्य म्हटले गेलेले पददलित, हे नरकाची खाण, मागील जन्मातील अध:पतित’, असे म्हणणार्‍या ब्राह्मणी अतिरेकी दाव्यातील दुराग्रही एकांगीपणाशी मला याचे साधर्म्य दिसते. पण यापैकी कुणालाही सांगायला गेलात, तर एकमेकांकडे बोट दाखवून ‘त्यांना आधी सांगा’ म्हणून झटकून टाकले जाईल, याची खात्री देता येते.

त्याचप्रमाणे मुस्लीम अतिरेकी व्यक्तींची मानसिकता ‘पूर्वी आम्ही सत्ताधारी जमात होतो. त्यामुळे हिंदू ही गुलाम नि आम्ही सत्ताधारी जमात आहोत. फक्त इस्लामच्या तत्वांचे तंतोतंत पालन केले की आम्ही पुन्हा त्या वैभवशाली भूतकाळात होतो तसे सत्ताधारी होऊ’, अशी आहे. हा समज ‘आम्ही भूतकाळात कधीतरी जगाचे राजे होतो आणि ही साली लोकशाही जाऊन (अन्य जातींपेक्षा आम्ही बुद्धिमान या अहंकारातून) बुद्धिमंतांची म्हणजे ‘आमची’ हुकूमशाही केव्हा येईल’, याकडे डोळे लावून बसलेल्या ब्राह्मणांच्या समजाइतकाच भाबडा नि हास्यास्पद आहे. हिंदुत्ववाद्यांनी जसा आपला अतिरेकी विचार एकुण हिंदू समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला आहे, तसाच मुस्लिमधर्मीय माथेफिरूंनी त्यांच्याही आधी तो सामान्य मुस्लिमांत रुजवण्याचा प्रयत्न केला आहे.  

आर्थिक-राजकीय सत्तेचा प्रवाह

‘एक व्यक्ती एक मत’ तत्त्वावरील लोकशाही प्रस्थापित झाल्यावर मोजक्या ठिकाणी असलेले ब्राह्मण प्राबल्य वगळता सर्वत्र त्या त्या राज्यातील क्षत्रिय/शेतकरी जमातींनी राजकीय आणि म्हणून आर्थिक (आणि उलटही) वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे पूर्वीच्या ब्राह्मण वा मुस्लिमांप्रमाणेच ‘आता आपण कायमस्वरूपी सत्ताधारी जमात झालो आहोत’, असा समज त्यांच्यातही प्रबळ होऊ लागला. केशवसुतांच्या ‘आम्ही कोण म्हणुनि काय पुससी?’ या कवितेच्या चालीवर ‘आम्ही कोण म्हणुनि काय पुसता, आम्ही नेते सर्वांचे । देवाने दिधले असे भोगव्य सारे आमुच्याच गोतावळ्या॥’, असा या क्षत्रिय म्हणवणार्‍या जमातींचा समज होऊ लागला होता.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

पण ब्रिटिश सत्तेच्या काळात उद्योगधंदे आणि बूर्ज्वा रोजगाराला चालना मिळाली. नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीला भारताने खुले आर्थिक धोरण स्वीकारल्यावर सेवाक्षेत्राने मोठी झेप घेतली. त्यातून अर्थकारणातला शेतीचा हिस्सा कमी होत गेला. शिवाय पिढ्यान्‌पिढ्या त्यांच्या जमिनी विभाजित होत गेल्यामुळेही त्यांच्या आर्थिक आणि पर्यायाने राजकीय सत्तेचा आधार असलेला शेती-व्यवसाय दिवसेंदिवस आतबट्ट्याचा होऊ लागला.

त्याच वेळी ‘शिक्षण, आरक्षण आणि रोजगार यातून आलेले आर्थिक स्थैर्य वा प्रस्थापित झालेले सामाजिक स्थान यामार्गे तथाकथित खालच्या जमाती आपल्या मांडीला मांडी लावून बसू लागल्या आहेत नि सर्वच क्षेत्रातील आपला वाटा कमी होत चालला आहे’, हे त्यांच्या ध्यानात येऊ लागले, तेव्हा विविध राज्यांतून या जमातींनी तो वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचा पहिला टप्पा म्हणून सर्वत्र आर्थिक, राजकीय आरक्षणाची मागणी सुरू झाली आहे. राजस्थानात गुर्जर, पंजाब/हरयानामध्ये जाट आणि महाराष्ट्रामध्ये मराठा या जमातींची आंदोलने यातूनच उभी राहिली आहेत.

आम्ही श्रेष्ठ तुम्ही दुष्ट

विभागणीच्या धर्म वा जात या रेषाही पुरेशा न वाटून गाव/शहर/शिक्षणसंस्था यांच्या आधारेही गट पाडले जातात. कोणत्याही वस्तुनिष्ठ, संख्याशास्त्रीय पुराव्याखेरीज प्रत्येक गटाचे अध्याहृत असे गुण नि अवगुण मानून त्या आधारे शाब्दिक लढाया नि माफक राजकारणही केले जाते. हे सारे गट-धार्जिणे अतिरेकी नेहमीच ‘त्यांना सांगा की’ या हुकमी तर्काचा आधार घेतात. जोवर समोरच्या गटात अतिरेकी विचाराची वा अन्य-गट-द्वेष्टी एक तरी व्यक्ती दाखवता येते, तोवर तीच त्या गटाची प्रातिनिधिक असल्याची मखलाशी करत ते आपल्या अतिरेकी मानसिकतेचे समर्थन करत राहतात.

या सार्‍या जात/धर्म अस्मितेच्या मंडळींना नाके मुरडणारे नि स्वत:ला पुरोगामी म्हणवणारेही यांच्याहून वेगळे नाहीत. हिंदुत्ववाद्यांच्या मते मुस्लीम देशाच्या सर्व सामाजिक समस्यांचे (आणि राजकीय पातळीवर काँग्रेस) मूळ आहे, ब्राह्मणांच्या मते ‘आरक्षण’ आणि ते लाटणारे ‘फुकटे’ हे देशाच्या प्रगतीला खीळ घालणारे, स्वयंघोषित शोषितांचे ठेकेदार म्हणतात, ‘ब्राह्मण्य (मनात : ब्राह्मण) हे सर्व सामाजिक, आर्थिक समस्यांचे गुन्हेगार’... तसेच अनेक पुरोगामी मंडळी ‘मध्यमवर्ग’ (म्हणजे कोण?) हा सर्व समस्यांचे मूळ मानतो. कुठलाही कार्यकारणभाव दाखवता येत नसला तरीही या वर्गाला ओढून आणून त्यावर खापर फोडत बसतात. यात डाव्या म्हणवणार्‍यांचा समावेश अधिक आहे.

एक देव नि एक सैतान

मूळ मुद्दा असा आहे की, प्रत्येक गट आपापले पारलौकिक तसंच भौतिक देवबाप्पा शोधत असतो आणि सोबतीला त्याच्या भलामणीसाठी सार्‍या पापांची कचरापेटी म्हणून वापरता येईल असा एक तथाकथित सैतानही शोधून ठेवत असतो. मग त्यांचे सारे विचार ‘चांगले सारे बाप्पाचे, वाईट सारे सैतानाचे’ या सोप्या निवाड्याभोवती फिरत राहतात. त्या संकुचित विचारवर्तुळाच्या बाहेर जाण्याची गरज त्यांना वाटेनाशी होते. त्यांच्या जगण्याला तेवढे पुरेसे असते.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

कोणत्याच समाजगटात सर्वच व्यक्ती सर्वस्वी निर्दोष असणे अशक्य आहे, हे उघड आहेच. शिवाय मुळात दोष कशाला म्हणावे यातही प्रचंड सापेक्षता असते. ‘आमच्या गटावर अन्याय केला’, हे गृहितकही समोरच्या गट वा व्यक्तिचा दोष म्हणून जाहीर करता येतेच. थोडक्यात, परस्परविरोधी अतिरेकी हे ‘एकमेका साह्य करू’ भूमिकेतच असतात. त्यांना एकमेकांची मदतच होत असते. महाभारतातही दुर्योधन पांडवांकडे बोट दाखवून शंभर कौरवांची एकता राखू शकला आहे. एरवी नव्व्याण्णव बंधू असता कुरू साम्राज्य अखंड राखणे त्याला अशक्यच होते. आता राष्ट्रीय एकात्मतेसारख्या व्यापक बांधीलकीऐवजी लहान गट करून त्या गटापुरती अस्मितेची मोट बांधणे लोक अधिक पसंत करतात, आणि त्या गटाच्या आधारे ‘बार्गेनिंग’ करून राजकीय, आर्थिक तसंच सामाजिक सत्तेमधील आपापला चिमुकला वाटा हस्तगत करून स्वत:ला धन्य समजत असतात.

अस्मितांचे धुमारे

अस्मिता अर्थात आयडेंटिटी ही एकाच वेळी समावेशक (inclusive) आणि विभाजक (exclusive) हवी असते. त्यातून आपला ‘देवतुल्य’ पक्ष आणि ‘त्यांचा’ राक्षसपक्ष अशी सोपी विभागणी करता येते, ज्यातून कुणाच्या हाती हात द्यायचा नि कुणाच्या ‘माथा हाणू काठी’ करायचे, हे अनायासे निश्चित होऊन जाते. त्यामुळे राष्ट्रवादातील राष्ट्रीय एकात्मतेची हाक असो वा मार्क्सवाद्यांची जागतिक बंधुभावाची हाक असो, सर्वसामान्यांना ती पुरेशी वाटत नसते. म्हणून मग कम्युनिस्ट म्हणवणारेही कळीच्या मुद्द्यांवर आपापल्या जातींच्या वळचणीला गेलेले दिसतात. तसंच ‘हिंदू सारा एक’ म्हणणारे सामाजिक-आर्थिक पातळीवर मागे राहिलेल्या वा ठेवलेल्या हिंदूंच्या उत्थानाची जबाबदारी न घेता, ‘आम्ही अधिक लायक म्हणून आम्ही पुढे गेलो’ असा दावा करतात. यासाठी हर्बर्ट स्पेन्सरच्या ‘सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट’ या एकांगी दाव्याचा आधार घेतात, आणि ज्याचे अखंड कीर्तन ते करत असतात त्या अखंड(!) हिंदू समाजात ‘आपण आणि ते’ अशी निर्लज्ज विभागणी करून ठेवतात.

स्वातंत्र्याच्या व्याख्येमध्ये जसे ‘कशाचे स्वातंत्र्य’ या बरोबरच ‘कशापासून स्वातंत्र्य’ असे दोन भाग पडतात. त्याच धर्तीवर तसेच अस्मितेच्या, आयडेंटिटीच्या भुकेचे ‘आपण कोण’ आणि ‘आपल्याहून वेगळे कोण’ असे दोन भाग पडतात. आणि जे आपल्याहून वेगळे ते आपल्याहून मुळातच दुय्यम किंवा दुसर्‍या बाजूने शोषक, किंवा लायकी नसता पुढे गेलेले, असे गृहितक बळावू लागते. थोडक्यात, राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पनेच्या अनुपस्थितीत वेगळेपण हे विभागणीकडे, वैराकडे वाटचाल करू लागते.

देश देव्हार्‍यात आहे

या सार्‍या धुमश्चक्रीमध्ये देश हा देव्हार्‍यात ठेवलेला देव म्हणून शिल्लक राहिला आहे. श्रावणात एखाद्या देवाच्या नावे उपवास धरावा तसे किंवा राष्ट्रीय एकात्मतेच्या श्राद्धाचे पिंड घातल्यासारखे फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर वगैरे समाजमाध्यमांतून देशभक्तीच्या डरकाळ्यांच्या पिपाण्या वाजवल्या की पुरते. मग देवाला नैवेद्य दाखवून आपापली ताटे वाढायला घ्यावीत तसे आपण स्वत:च्या स्वार्थी आयुष्यात सहज परतून येतो. ‘तू मोठा देशभक्त की मी’ या अहमहमिकेतून मग राष्ट्रभक्तीचे जास्तीज जास्त मेसेजेस कोण फॉरवर्ड करतो, कोण सर्वात उंच झेंडा उभारतो, कोण जास्तीत जास्त विरोधकांना राष्ट्रद्रोही म्हणून गुण मिळवतो याची स्पर्धा चालू होते. देशाच्या अवनतीचे खापत अन्य धर्म/जात/राज्य/विभाग यावर फोडून काहीही ठोस कृती न करताही आपला गट आणि पर्यायाने आपण अधिक राष्ट्रभक्त ठरतो, असे बहुसंख्येला वाटू लागले आहे.

पण देश म्हणजे जमिनीचा तुकडा नव्हे. देश म्हणजे त्या देशातील समाज, माणसे, संस्कृती, भाषा या सार्‍याचा समुच्चय. जेव्हा त्यातील एखाद्या अनुषंगाचा तुम्ही तिरस्कार करता तेव्हा तुम्ही देशभक्त असूच शकत नाही, भले बारा महिने तुमचा फेसबुक-डीपी तिरंगा दाखवू दे, भले जगातील सर्वात जास्त देशभक्तीपर मेसेजेस तुम्ही फॉरवर्ड केलेले असू देत, भले इतर कुणाहीपेक्षा जास्त देशद्रोही तुम्ही शोधून काढलेले असू देत. भले त्याच्यासारखे अनेक जण एकत्र येऊन तशी घोषणा करत असले, तरीही ज्याच्या मनात बांधीलकी नव्हे तर द्वेष आहे, तो देशभक्त असूच शकत नाही.

या परिस्थितीत बदल कसा होणार, हे आज सांगणे फार अवघड आहे. जंगलाला लागलेली आग किती पसरेल, किती जिवांचा बळी घेऊन, किती झाडांची राख करून शांत होईल हे सांगणे जसे अवघड, तसेच हे ही. मुळात आग लागली आहे, हेच वाळूत मान खुपसून बसलेल्या शहामृगी नागरिकांना अमान्य असेल, त्यातही आपलाही वाटा आहे, हे समजून घेण्यास सर्व गट आणि गट-बांधिल व्यक्ती तयार नसतील, तर त्या आगीचे निर्दालन करण्याची सुरुवातही होणे अवघड आहे. अशा वेळी तिच्या अंताचे भविष्य वर्तवणे मूर्खपणाचेच ठरेल.

(समाप्त)

..................................................................................................................................................................

लेखक मंदार काळे राजकीय अभ्यासक, ब्लॉगर आहेत.

ramataram@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......