अजूनकाही
‘चॅट जीपीटी’मुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. फार प्राथमिक अवस्थेत असलेल्या या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अल्गोरिदमने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘चॅट जीपीटी’वर लोक कविता, गोष्टी, निबंध, न्यूज रिपोर्ट इत्यादी लिहू लागले आहेत. कोड लिहिण्यासाठी, शोधनिबंध लिहिण्यासाठीसुद्धा त्याचा वापर होऊ लागला आहे. ‘चॅट जीपीटी’मध्ये बऱ्याच त्रुटी आहेत, आणि तरीही जे काही भविष्यात येऊ घातले आहे, त्याची ही एक छोटीशी झलक आहे, असे म्हणतात.
प्रत्येक औद्योगिक क्रांतीनंतर सामान्य कौशल्याची कामे कालबाह्य झाली, आणि त्यांची जागा अधिक क्लिष्ट तांत्रिक कौशल्याच्या कामांनी घेतली. या प्रत्येक क्रांतीत सामान्य कौशल्ये बाळगणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या. आधुनिक कौशल्ये शिकलेल्या कर्मचाऱ्यांना अधिक पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या. कामाचा वेग वाढला. अधिक क्लिष्ट कामे कमी वेळात होऊ लागली. त्याचा परिणाम म्हणून अधिक वस्तू व सेवा यांचा पुरवठा सहज करता येऊ लागला.
सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या निमित्ताने येऊ घातलेल्या नवीन औद्योगिक क्रांतीविषयी अनेक तर्क-वितर्क केले जात आहे. २०१७ साली युव्हाल नोआ हरारी यांनी एक खळबळजनक भाकीत केले होते. अजूनही ते खोटे ठरलेले नाही. त्यांचा अंदाज खरा ठरतो की काय, ही भीती वर्षानुवर्षे वाढतच चालली आहे.
काय म्हणाले होते हरारी?
प्रत्येक औद्योगिक क्रांतीनंतर एक नवीन वर्ग उदयास आला. मध्यमवर्ग, कामगार वर्ग असे वर्ग बनले. गरीब वर्गात जन्माला आलेल्या कित्येकांना स्वतःची ओळख मिळाली. नवीन ध्येये मिळाली. आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी स्थिर उत्पन्न, अन्न-वस्त्र-निवारा यांची शाश्वती, स्वतःचे घर, गाडी. समाजात ओळख निर्माण झाली. आणि या ध्येयांनी प्रेरित होऊन कामगार, मध्यमवर्ग वाढीस लागला.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
पण या होऊ घातलेल्या ‘एआय’ औद्योगिक क्रांतीने कुठला नवा वर्ग येऊ घातला आहे? कारण ही क्रांती पूर्णपणे कामगारांना पर्याय म्हणून उभी राहते आहे. प्रत्येक नव्या औद्योगिक क्रांतीत कामगारांची गरज कमी होत गेली. या क्रांतीत ती सर्वांत कमी असेल. कामगारविरहित बँका, कार असेम्ब्ली लाईन, गाईचे गोठे हे आपण आज पाहतो आहोतच.
इतिहासकार युव्हाल नोआ हरारी एक भक्कम भविष्यवाणी देतात- ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरणामुळे कामगार वर्ग तयार झाला, त्याचप्रमाणे ‘एआय क्रांती’मुळे एक नवीन निरुपयोगी वर्ग तयार होईल. यांत्रिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी होऊ शकते, अशी भीती लोकांना फार पूर्वीपासून वाटत होती. पण तसे काही झाले नाही, कारण जुने व्यवसाय कालबाह्य होत गेले, नवीन व्यवसाय विकसित झाले आणि यंत्रांपेक्षा मानव बऱ्याच काही गोष्टी चांगल्या रितीने करू शकतो, ही शक्यता कायम शिल्लक राहिली. तरीही हा निसर्गाचा नियम नाही आणि भविष्यातही तो असाच राहील, याची शाश्वती काहीच नाही. कृत्रिम अल्गोरिदमच्या आवाक्यापलीकडे माणसांमध्ये नेहमीच एक अनोखी क्षमता असेल, ही निव्वळ काल्पनिक कल्पना आहे.
हे खरे आहे की, अजून तरी अशा असंख्य गोष्टी आहेत, ज्या मानव प्राणी अल्गोरिदमपेक्षा चांगल्या पद्धतीने करू शकतात. आणि तज्ज्ञांनीसुद्धा वारंवार जाहीर केले आहे की, काही गोष्टी अल्गोरिदमच्या आवाक्याबाहेर ‘कायमसाठी’ राहतील. परंतु इतिहास असेही सांगतो की, हे ‘कायमचे’ याचा अर्थ बऱ्याचदा एक किंवा दोन दशकांपेक्षा जास्त नाही.
काही काळापूर्वीपर्यंत चेहऱ्याची ओळख (Face Recognition) हे सर्वांत शक्तिशाली संगणकसुद्धा व्यवस्थितरित्या करू शकत नसत. अगदी दोन वर्षांची मुलेसुद्धा शक्तिशाली संगणकापेक्षा चांगल्या रितीने चेहरा ओळखत. आज चेहऱ्यावरील ओळख करणारा संगणक अल्गोरिदम मानवांपेक्षा अधिक कार्यक्षमतेने आणि त्वरित लोकांना ओळखू शकतो.
२००४मध्ये एमआयटीचे प्राध्यापक फ्रँक लेव्ही आणि हार्वर्डचे प्राध्यापक रिचर्ड मर्नेन यांनी नोकरीच्या बाजारपेठेवर संशोधन प्रकाशित केले. त्यात ऑटोमेशन होण्याची शक्यता असलेल्या व्यवसायांची यादी केली गेली. नजीकच्या भविष्यात शक्यतो स्वयंचलित होऊ न शकणाऱ्या नोकरीचे उदाहरण म्हणून ट्रक ड्रायव्हिंग दिले गेले. अवघ्या १० वर्षांनंतर गुगल आणि टेस्ला यांनी स्वयंचलित वाहने यशस्वीरित्या रस्त्यावर पळवली.
युवल हरारी म्हणतात ही नव औद्योगिक क्रांती म्हणजेच ‘निरुपयोगी वर्गा’(Useless Class)ला जन्म देते आहे. पुढे अशा काही पिढ्या जन्म घेतील, ज्यांची समाजाला, बाजाराला, उद्योगांना गरजच नसेल. त्या पिढ्यांकडे कुठलेही ध्येय नसेल, कुठली आकांक्षा नसेल.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
या निरुपयोगी वर्गाला शांत ठेवणे, त्यांच्या रिकाम्या डोक्यांना काहीतरी खुराक देऊन त्यांना गुंगवून ठेवणे, हे ‘रुलिंग क्लास’पुढे मोठे आव्हान असेल. त्यासाठी युनिव्हर्सल बेसिक इन्कम, मोफत मोबाईल फोन, गेमिंग कन्सोल, मोफत इंटरनेट, साखरयुक्त हलक्या दर्जाचे जंक फूड, पॉर्न इत्यादीचा वापर करून निरुपयोगी वर्गाला गुंगवून ठेवले जाईल.
२०१७च्या शेवटी फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांनी हार्वर्ड विद्यापीठात दिलेल्या ‘Commencement Speech’चा मुख्य विषय होता- ‘ध्येय’. येणाऱ्या पिढ्यांपुढचे सर्वांत मोठे आव्हान ‘ध्येय’ हेच असणार आहे. झुकरबर्ग यांनी हरारी यांच्याइतके स्पष्टपणे सांगितले नसले, तरी त्यांचा आणि हरारी यांचा रोख एकाच दिशेने होता, हे कळते.
तर या येऊ घातलेल्या निरुपयोगी वर्गाला ध्येयेसुद्धा ‘रुलिंग क्लास’ पुरवणार. ते काय असणार? तर मेटाव्हर्ससारख्या Virtual reality (VR) आणि Artificial intelligence (AI)वर बनलेल्या आभासी व्यवस्थेमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणे. VR gamesमध्ये पुढच्या लेव्हलवर जाणे, घरातून बाहेर न निघता, रस्त्यावर न येता दिवस-रात्र मोबाईलवर, गेमिंग कन्सोलवर पुढच्या लेवलवर पोहोचण्यासाठी धडपडणे. आपले मूळ आयुष्य विसरून आभासी जगातील, गेम्स, सोशल मीडियातील आपली जी प्रतिमा आहे, तिच्यात पूर्णपणे गुंतून जाणे इत्यादी इत्यादी. त्यांना जगण्यासाठी स्वस्त, हलक्या दर्जाचे अन्न पुरवले जाईल आणि पॉर्नमध्ये गुंगवून ठेवले जाईल.
ही पिढी रस्त्यावर येऊन आपल्या मानवी हक्कांसाठी कधीच संघर्ष करू नये, खरे तर आपण जिवंत मानव असून भौतिक जगात आपले काही अस्तित्व आहे, हेच तो निरुपयोगी वर्ग विसरून जाईल, अशी सोय केली जाईल.
२०१७ साली बिल गेट्स यांनी एक सूचना केली होती. सरकारने इंडस्ट्रीवर ऑटोमेशन टॅक्स लावावा. थोडक्यात, रोबोट्सनेसुद्धा कर भरावा, असे काही तज्ज्ञांना वाटते. आणि त्यातून बेरोजगार झालेल्यांना (निरुपयोगी वर्गाला) युनिव्हर्सल बेसिक इन्कम (UBI) दिले जावे. जगण्यापुरते अन्न, इंटरनेट डाटा, वस्त्र यांची सोय युबीआयमधून होईल, अशी सोय केली जाऊ शकते.
हरारी यांनी मांडलेल्या कल्पना त्यांच्या दृष्टीने नव्या नाहीत. ते म्हणतात, आजचे VR गेम्स खेळण्यासाठी काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे लागतात. पण काही मानवनिर्मित VR गेम्स हजारो वर्षांपासून कुठल्या उपकरणाशिवाय खेळले जात आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, धर्म (Organised Religion) हेसुद्धा एक प्रकारचे VR गेम्स आहेत. त्यात करोडो लोक हजारो वर्षांपासून हिरिरीने भाग घेत आहेत. धर्माच्या VR गेमसाठी काही नियम बनवले गेले. अमुक गोष्ट खाऊ नका, इतक्या वाजता प्रार्थना करा, काही विशिष्ट मंत्रोच्चार करा. नियम पाळणाऱ्यांना काही गुण मिळतात आणि न पाळणाऱ्यांचे गुण कापले जातात. धर्मरूपी VR गेम्समध्ये पुढची लेव्हलसुद्धा आहे. उदा., स्वर्ग, नरक. आणि स्वर्ग वा नरक प्राप्तीसाठीसुद्धा काही नियम आहेत.
धर्म आपल्याला दाखवतात त्याप्रमाणे आभासी वास्तव म्हणजेच VR एका वेगळ्या चौकटीत गुंफण्याची गरज नाही. त्याऐवजी ते भौतिक वास्तवावर अवलंबून असू शकते. पूर्वी हे मानवी कल्पनाशक्तीने आणि पवित्र पुस्तकांद्वारे केले जात होते, भविष्यात ते स्मार्टफोनद्वारे केले जाऊ शकते.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
तरीही निरुपयोगी वर्गाचा उदय म्हणजे मध्यम वर्गाचा अस्त नाही. उद्योगांना कामगारांची गरज राहीलच. फक्त ती गरज कमीत कमी कामगारांकडून भागेल. आणि कौशल्याच्या पातळीची अपेक्षा ही दर औद्योगिक क्रांतीत उंचावली जाईल हे नक्की. एक पिढी शाळा-कॉलेजात जे काही तांत्रिक ज्ञान शिकेल, ते ज्ञान काही दशकांत कालबाह्य होताना त्याच पिढीला पाहावे लागेल. त्यामुळे सतत नवीन तंत्रज्ञान शिकत राहण्याची गरज निर्माण केली जात आहे.
हे सगळे जसेच्या तसे खरे होईल?
माहीत नाही.
पण आपल्या समाजात, आजूबाजूला मोबाईल, इंटरनेट, गेम्स, पॉर्न यांमुळे जे बदल घडत आहेत, ते उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्यांना भविष्याची नांदी स्पष्ट दिसत आहे. आणि ती निदान सध्या तरी फारशी आशादायी नाही, हे खरं...
.................................................................................................................................................................
युवाल हारारी यांचा लेख
https://www.theguardian.com/technology/2017/may/08/virtual-reality-religion-robots-sapiens-book
मार्क झुकरबर्ग यांचे भाषण
बिल गेट्स यांचा ऑटोमेशन करविषयीचा सल्ला
https://www.cnbc.com/2017/06/02/bill-gates-robot-tax-eu.html
.................................................................................................................................................................
लेखक अमोल साळे संगणक अभियंता आहेत. अर्थशास्त्र, आधुनिक तंत्रज्ञान व त्यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत.
amoalsale@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment