‘Grief is the price we pay for love.’ - Queen Elizabeth II
“If you think of the mind as having 100 circuits of energy, grief takes up 99 of those. Grief is like your brain turning this information over and over and over and trying to find a place where it fits. It’s not going to fit, but your mind is trying to make it so. It’s trying to make this story work out in a way that is acceptable. How do you make this death acceptable? You can’t, but your brain's working on it, which means that you have one unit of energy left for everything else." - Megan Devine, Psychotherapist, and author of ‘It's OK that You’re Not OK’
“There are really only two stages of grief, … who you were before and who you are after.” - Ted Rynearson
२०२०, २०२१ व २०२२ अशी तीन वर्षे जगाने करोना महामारीचा सामना केला. करोना अजूनही पूर्णपणे गेलेला नाही. हा काळ आपल्या सर्वांसाठी जगण्याचा एक प्रयोग होता असे म्हणता येईल, कारण आपल्या जगण्याचा मूळ ढाचा या महामारीने बदलला. करोना साथीचा रोग असल्याने लोकांना जिवाच्या भीतीने घरात राहावे लागले. त्यामुळे आपल्या सामाजिक आयुष्याला वेगळीच दिशा मिळाली. त्याचबरोबर आपल्या शारीरिक, आर्थिक व मानसिक आरोग्यावर दूरगामी परिणाम केले आहेत. त्याचे ठसे काही वर्षे तरी नाहीसे होणार नाहीत.
अब्जाधीशांचा अपवाद सोडला तर करोनाने जगाचे प्रचंड आर्थिक नुकसान केले. परिणामी संपूर्ण जग मंदीच्या उंबरठ्यावर उभे आहे. जगात व विशेषकरून भारतात - जिथे ९० टक्के असंघटित कामगारांची व कर्मचाऱ्यांची संख्या आहे - करोनामुळे रोजगाराची व उत्पन्नाची साधने गमावल्यांची संख्या लक्षणीय आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
आपला मेंदू प्रत्यक्ष देवाणघेवाणीसाठी तयार असतो, त्याला गूगल कॉल किंवा व्हॉट्सअॅप चॅट समजत नाही. त्याच्यासाठी ती केवळ एका मशीनशी सुरू असलेली चर्चा ठरते. त्यातून कोणतेही नैसर्गिक बंध निर्माण होत नाहीत. परिणामी करोना काळात आपल्यापैकी बहुतेकांमध्ये एकटेपणा आला, विशेष परिणाम लहान मुले व वयस्कर व्यक्तींवर झाला.
करोना महामारी आपल्या सर्वांसाठीच मानसिक आघात होती. उदा. हिटलरच्या छळछावण्यात ज्यू लोकांचे जे हाल झाले, त्या पद्धतीने आपण करोनाच्या काळात मृत्यूची भीती अनुभवली, प्रत्यक्ष मृत्यू अनुभवले. त्यामुळे जे परिणाम हिटलरच्या छावण्यांतील ज्यू लोकांच्या मानसिक आरोग्यावर झाले, तेच परिणाम करोना काळात जगभरातील लोकांच्या मानसिक आरोग्यावर झाले. त्याचा आपल्याला अजून काही काळ सामना करावा लागणार आहे. ‘मानसिक आरोग्य म्हणजे वेडेपणा’ अशी समजूत असलेल्या, मानसिक आरोग्याची यंत्रणा कुचकामी असलेल्या आणि कोणत्याही मानसिक त्रासावर गोळ्यांद्वारे उपचार केले जाणाऱ्या भारतासारख्या देशात करोना काळ अधिकच जीवघेणा ठरला. ज्यांना करोना झाला, त्यांना शारीरिक त्रासासोबत मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागले. त्याचबरोबर कुटुंबीयांपैकी किंवा जवळच्या नातेवाईकांपैकी ज्यांना करोना झाला, त्यांच्या उपचारांवर झालेल्या खर्चाचा ताण होताच.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात जे घडले, ते महाभयंकर होते. उपचारांवर लाखो रुपये खर्च करूनही हजारो लोक प्राणाला मुकले. कित्येक कुटुंबांतील एकापेक्षा जास्त व्यक्ती मृत्युमुखी पडल्या. २४ तास बातम्यांच्या नावाखाली भीती वाढवणाऱ्या वृत्तवाहिन्या तर या सर्वांवर कहर होत्या. त्यामुळे बहुतेक भारतीयांना मानसिक आघाताचा सामना करावा लागला.
भीतीच्या छायेत वावरल्यामुळे कित्येकांच्या मेंदूत बदल झाले. धोका जाणवल्याने मेंदूने त्याच्या पद्धतीने काम केले. शरीराला सतर्क करून ताण संप्रेरक स्त्रवणे, रक्तदाब व शरीरातील साखर वाढणे, जेणेकरून शरीर सतर्क राहील आणि आलेल्या संकटाचा सामना करता येईल इत्यादी इत्यादी.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
या काळात शरीर व मेंदू करोनाच्या अदृश्य धोक्याचा सामना करत असताना आपल्यापैकी अनेकांनी ‘शोकावस्था’ अनुभवली. अनेकांचे कुटुंबीय, प्रेमाची माणसे, आर्थिक उत्पन्नाचे साधन करोनाने हिरावून घेतले. मानसशास्त्रज्ञाच्या मते ज्या वेळेस कोणत्याही व्यक्तीला पुढील प्रकारच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो, त्या वेळेस ती व्यक्ती ‘शोकावस्था’ अनुभवते.
- जवळच्या व्यक्तीचा मृत्यू
- जोडीदारासोबतचे नाते संपणे (घटस्फोट/ब्रेकअप/मृत्यू).
- आर्थिक उत्पन्नाचे साधन गमावणे
इंग्रजीत या स्थितीला ‘Grief’ (शोक) म्हणतात. ही एक अवस्था असते. आणि ती नैसर्गिक, उत्स्फूर्त अशी सामान्य प्रतिक्रिया आहे. ती अनुभवताना आपल्या मेंदूचे कार्य व त्याची रचना बदलते. ‘शोकावस्था’ अनुभवताना आपल्याला दुःख, निराशा, ताण, चिंता, भीती, अपराधीपणा अशा अनेक नकारात्मक भावनांचा काही महिने किंवा काही वर्षेसुद्धा सामना करावा लागतो. एप्रिल २०२२मध्ये ‘American Psychological association’ने ‘PGD - Prolonged Grief Disorder’ हा मानसिक आजार म्हणून घोषित केला आहे. त्यामागचे कारण आहे - जगभरातील लोकांनी करोना काळात अनुभवलेली ‘शोकावस्था’. परदेशात या विषयावर अनेक चांगली पुस्तके आहेत, मात्र आपल्याकडे अजूनही याविषयी फारशी माहिती आणि जागरूकता नाही.
करोना काळात ज्या पद्धतीने अनेकांना त्यांचे प्रियजन गमावावे लागले, ते क्लेशकारक होते. अनेकांना त्यांच्या प्रियजनांवर अंत्यसंस्कार करता आले नाहीत, त्यांना साधा स्पर्श करता आला नाही किंवा पाहताही आले नाही. पैसे असूनही वेळेवर इलाज न मिळाल्याने अनेकांना प्राण गमावावे लागले.
थोडक्यात, करोना काळात आपल्या सर्वांच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला. हॉलिवुडच्या चित्रपटात शोभावेत, असे चित्तथरारक प्रकार लोकांनी भोगले. त्यामुळे ‘PTSD’ (Post-Traumatic Stress Disorder) आणि ‘PGD’चे परिणाम त्यांच्या आरोग्यावर झाले.
पूर्वीच्या काळी कोणाकडे मृत्यू झाला तर आजूबाजूचे लोक, नातेवाईक काही दिवस त्या कुटुंबाची काळजी घ्यायचे, धीर द्यायचे. पूर, भूकंप यांसारख्या आपत्तीच्या वेळी तर अनोळखी लोकदेखील स्वत:हून मदतीचा हात पुढे करत. मात्र करोनातील नियमांमुळे शोकाकुल व्यक्ती/कुटुंब यांना नीट सांत्वना, आधार द्यायला लोक पुढे येऊ शकले नाहीत. काहींना कोरोनाबाधित झाल्यावर आरोग्याच्या समस्यांमुळे नोकरी सोडावी लागली किंवा त्यांना अन्यायकारक रितीने नोकरीतून काढून टाकण्यात आले. आर्थिक विवंचनेतून अनेकांनी किंवा काही वेळा संपूर्ण कुटुंबीयांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या. हे सर्व प्रकार मानसिक शांतता हिरावणारे होते.
शोकावस्थेत मेंदूत होणारे बदल वरील आकृती प्रभावीपणे दाखवते. त्याविषयी बरेच संशोधनही उपलब्ध आहे. त्यांच्या मते जवळच्या व्यक्तीचा मृत्यूमुळे संबंधित व्यक्तीच्या मेंदूत मोठ्या प्रमाणावर बदल होतात. भावनिक मेंदू जास्त सक्रिय होऊन तार्किक मेंदू क्षीण होतो. अनेक महिने ताण संप्रेरके स्त्रवत राहिल्याने मेंदूला सूज येऊ शकते. मेंदूची स्मरणशक्ती, निर्णयक्षमता, दीर्घकालीन नियोजन करण्याची ताकद कमी होते. मेंदू भावना नीट नियंत्रित करू शकत नाही. वारंवार दुःखद घटना आठवतात, परिणामी त्रास आणखी वाढतो.
भारतात करोना काळात मृत्युमुखी पडलेल्यांचा अधिकृत आकडा साडेपाच लाख इतका आहे, मात्र यापेक्षा नक्कीच जास्त प्रमाणात मृत्यू झाले आहेत, अशी शक्यता अनेक अभ्यासकांनी वर्तवलेली आहे. एका व्यक्तीच्या मृत्यूचा शोक तिच्याशी संबंधित असलेल्या कमीत कमी नऊ जणांना होतो. हे लक्षात घेतले तर ‘PTSD’ व ‘PGD’ अनुभवणाऱ्यांची संख्या काही लाखांत जाते. त्यापैकी किती जणांना आपल्याला काय होत आहे, याची कल्पना असेल? किती जणांनी या दुःखातून बाहेर पडण्यासाठी मानसिक उपचार घेतले असतील?
२०२०मध्ये करोनाच्या पहिल्या लाटेत माझ्या वडिलांचा मृत्यू झाला (करोना नसता तर ते जगले असते असे वाटते) आणि २०२२मध्ये मला व आईला करोना झाला. मला करोनाचा जास्त त्रास झाला. त्या वेळेस मी मानसिक व शारीरिकदृष्ट्या पूर्ण तंदुरुस्त होते, मात्र उच्च रक्तदाब व रक्तातील साखर वाढली. त्यामुळे डॉक्टरांनी मला विश्रांती घ्यायला सांगितली. त्या वेळी नोकरी करत असलेल्या कंपनीने हवी तशी साथ न दिल्याने मी नोकरी सोडली. करोना काळात अति ताणामुळे प्राण गमवाव्या लागलेल्या काही घटनांची माहिती असल्याने मी विश्रांती घेणे पसंत केले. मात्र करोनानंतरचे चार महिने हा कसोटीचा काळ होता.
करोनाच्या आधी मी महिन्याला १०० किमी सायकल चालवायचे, पण नंतर १ किमीसुद्धा चालू शकत नव्हते. धाप लागायची, बोलताना त्रास व्हायचा. त्यामुळे हट्ट न करता सक्तीचा आराम केला. उत्तम तब्येतीमुळे आपल्याला काही होणार नाही, असे वाटत असताना करोनाने माझा भ्रमनिरास केला. त्याचा माझ्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला. सतत घरी राहिल्याने आणि काम करू न शकल्याने आत्मविश्वासावर परिणाम झाला. सामाजिक संबंध कमी झाले, चिडचिड वाढली, झोपेवर परिणाम झाला. आपल्याबाबतच असे का झाले, म्हणून बऱ्याच वेळा रडलेसुद्धा. लिखाण सुरू असल्याने थोडा विरंगुळा होता, पण ऊर्जा कमी झाल्याने सगळ्याच गोष्टींवर परिणाम होत होता.
चार महिन्यानंतर मी हळूहळू हलक्या व्यायामाला सुरुवात केली, जिमला जायला लागले. आता करोना होऊन सात महिने पूर्ण झाले. अजूनही मी पूर्णपणे बरी झालेली नाही, पण काही महिन्यांत नक्की होईल, अशी आशा आहे. या काळात मी माझ्या दुसर्या पुस्तकावर काम सुरू केले आणि ते बर्यापैकी लिहूनही काढले. करोना काळात माझ्या कुटुंबीयांना व मला जो त्रास झाला, तो कमी-जास्त प्रमाणात जवळपास सगळ्यांनाच झाला.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
एक किंवा अनेक आघात अनुभवल्यावर आपला मेंदू अस्तित्वाची लढाई लढण्यात गुंगतो. त्यामुळे इतर बाबी मागे पडतात. गरजेपुरते पैसे असतील तर व्यक्ती आधी पोट भरण्याचा विचार करते, त्याला प्रेमाच्या कविता करणे, प्रेम करणे जमत नाही. त्यानुसार ‘PTSD’ व ‘PGD’ अनुभवत असलेला मेंदू आनंद उपभोगू शकत नाही. उदा. सामाजिक संबध, लैंगिक सुख, शिक्षण इ. या काळात नैराश्याचा धोका वाढतो. चिंतेमुळे शारीरिक व्याधी जडतात. मात्र जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास शोकाची तीव्रता कमी होऊ शकते.
संशोधन सांगते की, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू अनुभवल्यावर किमान तीन (तीव्रता कमी होत जात) वर्षे शोकावस्था असते. या काळात समुपदेशन, मनातील विचार व्यक्त करणे, व्यायाम, नियमित झोप, छंद, विश्रांती व मनोरंजन आवश्यक ठरते. या स्थितीत कोणत्याही प्रकारची जोखीम (नोकरी सोडणे, दारू, तंबाखू, जुगार) टाळायला हवी, कारण शरीर व मन नाजूक अवस्थेत असल्याने धोका वाढू शकतो. या काळात मेंदूची सर्व ऊर्जा अस्त्वित्व टिकवण्यासाठी खर्च होते. त्यामुळे मेंदूला ताण सहन होत नाही, मेंदू नवीन शिकण्याच्या स्थितीत नसतो.
तुम्ही करोना काळात मानसिक आघाताचा अनुभव घेतला असेल आणि अजून त्या धक्क्यातून पूर्णपणे बाहेर आलेले नसाल, तर पुढील गोष्टी करून पाहाव्यात-
- स्वतःला सावरण्यासाठी वेळ द्या. स्वतःवर दया करा.
- सध्याच्या मोटिव्हेशनच्या युगात ‘स्लो डाउन’ होणे शक्य नाही, पण भावना दाबल्याने समस्या वाढतात, हेही तितकेच खरे.
- भावनांना नाव द्या आणि त्या आपल्या शरीरावर परिणाम करतात, हे समजून घ्या. उदा. भीतीने पोटात गोळा येणे, खांदा व मान येथील स्नायू ताठरणे.
- ताण देणाऱ्या व्यक्ती वा नाती किंवा गोष्टी टाळा.
- समुदेशकाचा सल्ला घ्या. शक्यतो तीव्र नकारात्मक भावना टाळण्यासाठी झोपेच्या गोळ्या/दारू यांचा वापर करू नका.
- किमान दहा आठवड्यांचा योगा व प्राणायाम करा.
- वेळेवर झोपा व वेळेत उठा.
- किमान वर्षभर कोणत्याही प्रकारचा बदल टाळा. उदा नोकरी, राहती जागा, नवी नाती.
- या काळात मेंदूतील बदलांमुळे जिथे आहोत, त्याच परिस्थितीत व लोकांमध्ये राहणे फायदेशीर ठरते.
तुमच्याबाबत जे घडले आहे, ते विश्वासू लोकांशी शेअर करा, मन मोकळे करत राहा.
- सोशल मीडिया व २४ तास बातम्या देणाऱ्या वृत्तवाहिन्या पाहणे बंद करा.
- जागरूक राहा. त्यामुळे आपले मन वर्तमानात राहते. फार मागे किंवा फार पुढे धावत नाही.
- ध्यानधारणा करा.
- तुमच्या जवळपास, मित्रमैत्रिणींमध्ये, ऑफिसात कोणी जवळच्या व्यक्तीच्या मृत्युमुळे शोकग्रस्त असेल, तर तिला शक्य तितका आधार\पाठिंबा द्या.
- ज्यावर तुमची श्रद्धा असेल, त्याची रोज प्रार्थना करा.
मृत्यू हे श्वाश्वत सत्य आहे, मात्र त्याचा स्वीकार करायला वेळ लागतो, पण ते स्वीकारून पुढे जाणे आणि वारंवार मागे वळून न बघणे आवश्यक असते, विशेषत: आपल्या मानसिक आरोग्यासाठी.
शोकावस्था काही काळ राहून आयुष्य पुढे जाते, मात्र ते पूर्वीसारखे नक्कीच असणार नाही, असू शकत नाही. त्यामुळे या कसोटी पाहणाऱ्या काळाकडे ‘शिकण्या’चा काळ म्हणून पहा. आपल्या जवळची, हक्काची व्यक्ती सोबत असताना जो आनंद व सुख आपण अनुभवतो, ती अचानक आपल्याला सोडून जाते तेव्हा दु:ख होणे साहजिकच आहे. प्रेम असते म्हणून दु:ख होते. अनोळखी व्यक्तीसाठी कोणी अश्रू गाळत\ढाळत नाही…
..................................................................................................................................................................
लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत मानसशास्त्रज्ञ आहेत.
vrushali31@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Vitthal Sawant
Wed , 25 January 2023
खुप छान लेख लिहिला आहे. मानवाला वास्तविक दुःख कमी आणि मानसिक दुःख जास्त होत असते. सुरुवातीचे पहिले वाक्य खूप महत्वाचे आहे. मन ज्याच्यावर जास्त प्रेम करते त्यांच्या पासूनच ते जास्त दुःखी होत असते. म्हणजेच बहुतेक दुःखे हि केवळ मानसिक असतात. शरीराने स्वतःच्या जिविताचा विचार करण्यासाठी मन हे एक app बनविले आहे. ते ॲप त्याचे ते काम सोडून त्याच्या मनोरंजनाचे विविध उपक्रम करत राहते, स्वप्ने पाहत राहते आणि ते सर्व वास्तविक नसल्यामुळे त्याच्यातून त्याला मानसिक दुःख होत राहते. आपला मी, आपला अहंकार, आपले मन हे सर्व एकच असतात आणि त्या सर्वांचा पाया आपले अनावश्यक विचार असतात. जीवनावश्यक विचार करताना अनावश्यक विचार टाळता आले तर जीवन सहज होते. अनावश्यक विचार टाळण्यासाठी कोणतेही उपाय नसतात फक्त ते अनावश्यक आहेत याचे आकलन व्हावे लागते.