१.
खूप वर्षांपासून मी सिंहगडावर जातो आहे. ८६-८७पासून म्हणजे अगदी कॉलेजच्या वयापासून! तेव्हा नुकतीच बाजारात आलेली हीरो होंडा माझ्याकडे होती. वीस रुपये जमले की, एखाद्या मित्राला घेऊन सिंहगडावर जात असे. पाच रुपयांचं अर्धा लिटर पेट्रोल टाकायचं. गाडीत आधीचं शंभर-दोनशे सी सी पेट्रोल असायचं. तेवढ्यावर सिंहगडाची एक ट्रिप व्हायची. घाट रस्त्यानं थेट गडावरच्या पार्किंग लॉटपर्यंत जायचं. येताना आणि जाताना पेट्रोल वाचवण्यासाठी प्रत्येक उतरावर गाडी बंद करायचो. बाकीच्या पंधरा रुपयांत दोघांचा खडकवासल्याला चहा, गडावरचा चहा आणि भजी होत असत.
तेव्हापासून माझे पार्किंग लॉटमधील हॉटेलवाल्यांचे संबंध आहेत. पार्किंगच्या एका बाजूला चार काठ्या रोवून, वर छप्पर म्हणून पोतं बांधून साहेबराव यादव यांनी पहिलं हॉटेल टाकलं. आम्ही त्यांना तेव्हा ‘सायबू’ म्हणत असू. हसतमुख आणि कर्तबगार सायबू! कांदे, बटाटे, बेसन, तेल, दूध आणि चहा-पावडर असं सगळं, सायबू खालच्या मोरदरी या गावातून स्वतःच्या खांद्यावर आणत असे!
सायबू नुसताच कर्तबगार नाही, तर प्रेमळसुद्धा होता! कधी कधी म्हणायचा, ‘अजून एक प्लेट भजी देतो.’ आम्ही म्हणायचो, ‘सायबू, पैसे नाहीत तेवढे.’ तो प्लेट हातात ठेवत म्हणे – ‘परत याल तेव्हा द्या.’
सायबू शेतकरी! शेती म्हणजे फक्त भाताची खाचरं! त्यात काय संसार चालणार? पुण्याला यायचं म्हणजे पहिल्यांदा शिवापूरला जायचं, मग कात्रज घाट आणि मग पुणे! इतक्या लांब दूध घालायचं कसं?
सायबूने गडावर हॉटेल काढायची शक्कल काढली. अमाप कष्ट करून पैसा मिळवला. आपल्या पोरांना कोल्हापूरच्या तालमीत पहिलवान बनण्यासाठी पाठवावं, असं त्याचं स्वप्न होतं. त्या काळी त्यासाठी दर महिन्याला चार हजार रुपये लागत होते. कोल्हापुरात तालमीत राहणं आणि खुराक म्हणजे इतका खर्च होणारच होता. सायबू हा सगळा खर्च हॉटेल चालवून कमवू लागला. सगळ्या गावाचे डोळे चपापले. हळूहळू पार्किंगच्या बाजूनं वेगवेगळी हॉटेल्स उभी राहू लागली! पुढच्या वीस-पंचवीस वर्षांत अकरा-बारा हॉटेल्स उभी राहिली.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
पार्किंगच्या पश्चिम भिंतीला लागून पंधरा-वीस फुटांचा उतार होता. तो या लोकांनी हळूहळू भराव टाकून भरून काढला. अकरा-बारा घरातले लोक राबू लागले. सासू, सून, मुलं, नातू सगळे. जसे पैसे येत गेले, तसा लोकांनी तो भराव अजून व्यवस्थित केला. त्यावर सीमेंट ओतलं. त्यात चांगले अँगल्स रोवले. वर पत्रे टाकले. वाऱ्या-वादळात पत्रे उडून जाणं बंद झालं. प्रत्येकाचं जवळ जवळ सात-आठशे स्क्वेअर फुटाचं हॉटेल झालं. खेळता पैसा आला. शेतीला हातभार लागला.
बायका दिवसभर भजी, झुणका-भाकरी करू लागल्या. चहाची आधणं न कंटाळता चढवू लागल्या.
पूर्वी पार्किंगवर उभं राहिलं की, खालच्या दऱ्या दिसत तो नजारा या हॉटेलांमुळे गडप झाला. नुसतीच माणसांची ये-जा दिसू लागली. मन थोडं खट्टू झालं, पण मनात आलं- एवढा मोठा पन्नास-साठ स्क्वेअर किलोमीटर एरिया असलेला सिंहगडाचा आणि त्याच्या सोंडांचा विस्तार! दोन एकरांवर थोडी हॉटेल्स आली, तर काय बिघडलं? पर्यावरणाचा नाश वगैरे गोष्टी आपण करायला नको. गडाखालच्या मोरदरी आणि कल्याणसारख्या गावातले लोक कामाला तर लागले!
मधली दहा-बारा वर्षं मी कामानिमित्त पुण्याबाहेर होतो. गडाशी संपर्क तुटला. एक-दोनदा कार घेऊन गेलो एवढंच!
परत पुण्यात आलो. बारा सालानंतर दर आठवड्याला गड चढून जायचं व्यसनच लागलं.
तोपर्यंत वातावरण खूप बदललं होतं. आता गर्दी वाढली होती. घाटात शनिवारी आणि रविवारी ट्रॅफिक जॅम वगैरे व्हायला लागले.
पार्किंगच्या बाजूच्या हॉटेलात गर्दी उसळू लागली होती. बैंगन-भरता वगैरे नवनवीन पदार्थ मिळू लागले. ऑर्डर आली की, चुलीवरच्या कढईत भज्यासाठी उकळलेल्या तेलात वांगे सोडायचं. काही मिनिटात भरीत तयार. गिऱ्हाइकं खूप वाढली. भाकरी थापणाऱ्या बायकांना उसंत मिळणं मुश्किल झालं. हळूहळू नव्या जमान्याला गडावरच्या हॉटेलांनी आपलंसं केलं. गडावर चक्क मॅगी मिळू लागली! मिनरल वॉटर आणि सॉफ्ट ड्रिंक्स मिळू लागली.
सायबू एव्हाना मोठा माणूस झाला. हॉटेल पोरांच्या हाती सोपवून जमिनींचे व्यवहार करू लागला. उद्यमशील सायबूकडे पजेरो आली. ९० साली भरार वाऱ्यात फरफऱ्या स्टोव्हला पंप मारणारा सायबू आता मोठा माणूस झाला होता. आज रोजी त्याच्याकडे एक रेंज रोव्हर, एक लँड क्रूजर आणि दोन फॉर्च्यूनर या गाड्या आहेत. सायबू एवढी मोठी ‘सक्सेस स्टोरी’ अख्ख्या गडावर नाही. बाकी सगळे अजूनही ‘गरीब’ या प्रकारातच मोडतात.
२.
सिंहगडावर मिळणारं दही हा एक अजब प्रकार आहे. त्याची हजारो मडकी आता खपू लागली होती. मोरदरी-कल्याणमधल्या लोकांनी सत्तर सत्तर हजार रुपयांच्या म्हशी घेतल्या होत्या दुधासाठी.
घरातल्या कुणीतरी म्हशींची उस्तवास्त करावी, दूध काढावं, तापवावं! रात्री विरजण लावून मडकी चुलीच्या ऊबेत ठेवावीत. आणि मग पहाटे गडावर यावं. विशेषतः शनिवार-रविवारी! दर महिन्याला दहा-पंधरा हजाराची जोड शेतीला मिळू लागली. कष्ट खूप होते, पण घरात पैसाही येत होता. आज रोजी खालच्या चार-पाच गावांतल्या दोनशे तरी बायका गडावर दही विकायला येतात.
गुरुवार, शनिवार आणि रविवार ट्रेकर्स लोकांची गर्दीसुद्धा खूप वाढली. गड चढून आलेले कित्येक लोक उतरण्यासाठी जीप वापरू लागले. गड चढून यावं आणि दर माणशी पन्नास रुपये देऊन जीपने परत खाली जावं, अशी पद्धत सुरू झाली. पंधरा-वीस जीपगाड्या गडावर जमल्या. दही वगैरे विकून आलेल्या पैशातून लोकांनी विविध कंपन्यांच्या जुन्या गाड्या घेतल्या. पंधरा-वीस पोरांना रोजगार मिळू लागला. पोरं पहाटे साडेतीनला गडावर येऊन नंबर लावू लागली. शनिवार-रविवार मिळून सहा ट्रिपा जरी झाल्या तरी खूप होत्या. बाकी दिवशी मग खालच्या खाली काही ट्रिपा मिळाल्या तर मिळाल्या! महिन्याचे आठेक हजार दर गाडीमागे सुटू लागले. दोन-तीन लाखांची जुनी गाडी आठ हजार रुपये महिना देऊ लागली, अजून काय पाहिजे!
एवढं सगळं झालं तरी धंद्यामध्ये खूप अडचणी येत राहतात! रोजगार सतत चालू-बंद होत राहतो. आज काय तर म्हणे रस्ता सीमेंटचा करायचा आहे, म्हणून तीन महिने घाट बंद. उद्या काय, तर दरडी कोसळू नयेत म्हणून जाळ्या मारायच्या आहेत, म्हणून घाट दोन महिने बंद. आता काय कोविड आला, म्हणून गड चार महिने बंद!
पण या अशा काळात या लोकांची कामावरची निष्ठा कमी झाली नाही. प्रत्येक वेळी समजुतीची भाषा! चेहऱ्यावर थोडंसं उदास हास्य! बस इतकंच!
शेतकरी, दारुण परिस्थितीतही का टिकून राहतो, याचं कोडं त्याची ही मनोवृती बघितली म्हणजे समजतं.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
३.
१८सालानंतर गडावरची गर्दी अजून वाढली. या सगळ्या हॉटेलांचं उत्पन्न भल्याभल्यांना खुपू लागलं.
तेव्हाच मला जाणवलं- आता या लोकांचे बरे दिवस फार काळ टिकणार नाहीत.
गेली दहा वर्षं मी दर आठवड्याला गडावर जात असल्यामुळे माझं सगळं ठरून गेलं आहे. नेहमीचा ढाबा, नेहमीचा दहीवाला संतोष यादव आणि उतरण्यासाठी नेहमीचा जीपवाला दत्ता खाटपे.
दर शनिवारी दत्ताचा मेसेज येतो – ‘येणार का?’
गेल्या महिन्यात एका शनिवारी त्याचा फोन आला ‘उद्या येऊ नका, वनविभागाने सगळी हॉटेलं पाडली आहेत. सगळा राडारोडा पार्किंगमध्ये पडला आहे.’
गडावरील पर्यावरण बिघडतंय म्हणून वनविभागाने सगळी हॉटेल्स पाडली. मला वाटलं- हॉटेलवाल्या लोकांमध्ये असंतोष असेल. पण पुढच्या आठवड्यात मी गेलो तेव्हा लोक गप्प होते. गडावर वरच्या पठारावर पर्यायी जागा देणार आहेत, अशी चर्चा होती!
दोन आठवड्यांनी कळलं- चार बाय सहा अशी चोवीस फुटांची जागा या सगळ्या हॉटेलवाल्यांना देण्यात येणार आहे. पार्किंगवर जशी हॉटेले होती, तशीच गडाच्या वरच्या विस्तीर्ण सपाटीवरसुद्धा अनेक हॉटेल्स होती. आता सगळी एकाच ठिकाणी आणण्याचं नियोजन चाललं होतं. एकाच ठिकाणी सगळी गर्दी झाली म्हणजे पर्यावरणाचा नाश होणार नाही, असा विचार असावा!
पार्किंगमधल्या हॉटेलांचं एक बरं होतं. वृद्ध, लहान मुलं असे सगळे कारमध्ये बसून पार्किंगपर्यंत येत आणि त्यांना लगेच पाहिजे ते मिळत असे. आता या सगळ्यांनी चालत चालत एक किलोमीटरवर पाचशे फुटांचा चढ चढत जायचं, मग त्यांना खायला-प्यायला मिळणार! अगदी पाणी किंवा कोल्ड-ड्रिंकसुद्धा! असं केल्याने पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, असा वनविभागाचा विचार असावा बहुतेक!
या शिवाय, ज्याचं हॉटेल सातशे स्क्वेअर फुटांचं होतं, त्याला चोवीस स्क्वेअर फुटांची टपरी दिली की, त्याचं पुनर्वसन केल्याचं पुण्य मिळेल, असाही विचार असावा!
मी हॉटेल-मालकांशी बोलायचा प्रयत्न केला, कोणी बोलायला तयार नाही. सगळे मुळातले गरीब, नव्यानं थोडा पैसा पाहिलेले लोक. हक्कांची जाणीव नाही. जे मोडलं आहे, ते मोडलं आहे. नवीन जे काही मिळत आहे, ते तुटपुंजे असलं तरी पदरात पाडून घ्यावं, असा विचार!
४.
गडावर आता ‘रोप-वे’ होणार आहे म्हणे! त्यामुळे गर्दी वाढेल आणि पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, असा विचार आहे. या ‘रोप-वे’मुळे जी गर्दी वाढेल, त्यासाठी मोठाली चीज-बर्गरवाली शहरी हॉटेलं लागणार. त्यांचा विस्तार मोठा असणार. या श्रीमंत हॉटेलवाल्यांना मोठी जागा द्यायची, तर गरिबांना छोटी जागा दिली पाहिजे. मोठ्या लोकांसाठी गरिबांची कामधेनू काढून घेतली जात आहे, असे काही नेहमीचे ट्रेकर्स बोलत होते. जे लोक ‘डेव्हलेपमेंटल प्लॅन’ करत आहेत, त्यांचंही बरोबर आहे. या गरीब लोकांना पैसा कशाला पाहिजे? गरीब तसाही पैशाविना तगून जातो. पैशाची खरी गरज ‘श्रीमंतां’नाच असते!
गडाच्या पुण्याच्या बाजूच्या पायथ्यापाशी अतकरवाडी आणि गोळेवाडी नावाची गावं आहेत. या दोन गावांच्या परिसरात अभिनेते नाना पाटेकरांसहित अनेक नागरिकांच्या इस्टेटी आहेत. त्याशिवाय, अनेक मोठी मोठी रिसॉर्ट्स आहेत. रामदेवबाबांचं ‘पातंजली योगा सेंटर’सुद्धा आहे. एक वॉटर पार्क तयार होत आहे. या सर्व इस्टेटी ग्रामपंचायतीच्या हद्दीत किती आणि वनखात्याच्या जमिनीवर किती, याचं ऑडिट करण्याची अर्थातच गरज नाही. कारण हे सर्व लोक श्रीमंत आहेत. ते कोर्टात वगैरे जातात.
या प्रकारात किती साग, किती पळस, किती पांगारे आणि अजून किती विविध प्रकारची झाडं कापली गेली, याची मोजदाद नाही. करायची गरजही नाही. या सगळ्या श्रीमंत लोकांना परवानग्या देताना किंवा त्यांची अनधिकृत बांधकामं ‘रेग्युलराईझ’ करताना पर्यावरणाचा व्यवस्थित विचार झालेला आहे. आणि, पर्यावरणाचा व्यवस्थित विचार करूनच गडावरची गरिबांची हॉटेल्स पाडण्यात आली आहेत!
अतकरवाडीमध्ये चालत गड चढणाऱ्या लोकांना त्यांच्या कार पार्क करता याव्यात, म्हणून अनेक शेतकऱ्यांनी शेती बंद करून पार्किंग लॉट तयार केले आहेत. भाताच्या खाचरातून वर्षाला असे कितीसे पैसे मिळणार? आठ-दहा गुंठे जागेत एका आठवड्यात शंभर जरी गाड्या पार्क झाल्या, तरी प्रत्येक गाडीचे तीस रुपये या हिशोबानं एवढ्या छोट्याश्या जागेत आठवड्याचे तीन हजार तयार होतात. आठ-दहा गुंठ्यांमध्ये वर्षाचा एक-दीड लाखाचा भात थोडाच पिकणार आहे?
या मार्गानं शेतकऱ्याला पैसा मिळू लागला आहे. यात पाचर मारण्याची आयडिया नियोजकांपैकी कुणाला अजून कशी सुचली नाही, याचंच आश्चर्य वाटतं! ही सारी पार्किंग्ज बंद करून कुठल्या तरी कंपनीला भला मोठा पार्किंग लॉट काढून दिला गेला की, पर्यावरणाची मोठी सेवा होईल!
अतकरवाडीपासून गडाची तीन साडेतीन किलोमीटरची चढण सुरू होते. सगळी उरावरची चढण! कुठेही उतार सोडा, साधं पठारदेखील नाही. नव्यानं चढणाऱ्या माणसाला हातात रुमालदेखील नको वाटतो.
या तीन किलोमीटरच्या चढणीवर सगळे मिळून सात-आठ कट्टे तयार केले गेले आहेत. कट्टे म्हणजे सीमेंट वगैरे काही नाही. दगड रचून त्यात मुरूम माती भरून कट्टा तयार केलेला. त्यात लाकडी डांब रोवून वर साधे पत्रे ठोकलेले किंवा नायलॉनचे नेट बांधलेले. भिंती वगैरे काही नाही. एकूण एरिया दहा-पंधरा स्क्वेअर फुटांचासुद्धा नाही.
गडाच्या चढणीच्या मध्यात ‘मेट’ नावाची छोटेशी वस्ती आहे. या मेटावर आठ कुटुंबं राहत होती. तिथं एक सुंदर मंदिरसुद्धा आहे. तानाजीच्या काळापासूनचं!
५.
सिंहगडाची एक गंमत आहे. गडावरच्या कुणासाठीही काळाचे दोन भाग पडतात. तानाजीच्या आधीचा आणि तानाजीपासूनचा! तानाजीच्या आधीच्या काळाबद्दल अर्थातच कुणीही बोलत नाही. या कालमापनाला आम्ही ‘बिफोर तानाजी’ आणि ‘आफ्टर तानाजी’ - बीटी आणि एटी - असं नाव दिलं आहे.
पप्पू डोंगरे यांचे मेटावरचे घर आणि अंगणातला त्यांचा कट्टा
तर या मेटावरच्या तानाजीच्या काळापासूनच्या आठ घरांपैकी आता तीनच घरं उरली आहेत. त्यातले एक पप्पू डोंगरे यांचं, दुसरं दत्ता नाईलकर यांचं आणि तिसरं सोपान पढेर यांचं.
ही आठ घरं डोंगर उतरावर नाचणी आणि डाळी पिकवून गुजारा करत. पण माकडं आणि रानडुकरं यांनी हैराण होऊन बहुतेक सारे लोक मेट सोडून गेले. आता मेटावर तीनच घरं उरली आहेत.
आता पप्पू डोंगरे, दत्ता नाईलकर आणि सोपान पढेर हे तिघं त्यांची कट्ट्यांवरची ‘दुकानं’ चालवतात. लिंबू सरबत, लिमलेटच्या गोळ्या, कैऱ्यांचे तिखट मीठ लावलेले काप, आवळे, अननसाचे काप वगैरे.
दत्ता नाईलकर यांच्या दुकानापुढे अडुळशाची झुडपं आहेत. नोव्हेंबर-डिसेंबरात त्यांच्यावर सुंदर शुभ्र फुलं येतात. त्या फुलातला मध चाखायला सनबर्ड्स येतात. बाकी करवंदाची झुडपं आहेत. त्यांच्यावर उन्हाळा सुरू होता होता, पांढरी शुभ्र फुलं येतात. ही सगळी मजा दत्ता नाईलकर मला नेहमी दाखवतात.
नाईलकरांचा वा पप्पू डोंगरे यांचा कट्टा, हे पर्यावरणाचेच भाग आहेत. तेही कट्टे वनखात्यानं उदध्वस्त केले. तिथं फारसं काही नव्हतंच म्हणा! त्यामुळे नुसते पत्रे उडवले.
नाईलकर दुसऱ्या दिवशी माथ्यावर पत्र्याऐवजी नायलॉनची हिरवी नेट बांधून हजर होते. त्यांची ‘व्हिटॅमिन सी – आवळा’ ही पेटंट साद मेटावर हजर होती. पप्पू डोंगरे आपल्या पातळ आवाजातील ‘आवळा खा मावळा’ या सादेसह आपल्या गुलमोहराच्या छायेतल्या कट्ट्यावर हजर होते. यांचे कट्टे उदध्वस्त करून वनखात्याने पर्यावरणाची नक्की काय सेवा केली, हे माझ्या अजूनही लक्षात आलेलं नाही!
दोघंही दर सोमवारी आणि शुक्रवारी पुण्याला गुलटेकडी मार्केटमध्ये येतात. कैऱ्या, आवळे, अननस, लिमलेटच्या गोळ्या घेऊन परत मेटावर येतात. इतके कष्ट करून त्यांना किती रुपये महिना मिळत असेल, याचा विचार करायचाही धीर होत नाही.
नाचणी, भात आणि कडधान्यावर पोसलेले आपले काटक देह घेऊन ही सारी उस्तवार हे दोघं करतात.
दहा वर्षांपूर्वी डोंगऱ्यांचे वडील डोक्यावर मालानं भरलेली टोपली घेऊन गड चढत होते. उन्हाळा होता. मला हातातल्या रुमालाचेही वजन नको वाटत होतं. मी उगीच गंमत म्हणून म्हणालो, ‘काकड्यांऐवजी कलिंगडं विकली, तर जास्त पैसे मिळतील’. सिनियर डोंगरे म्हणाले, ‘एवढं वजन घेऊन आता चढवत नाही, दोन वर्षांपासून कलिंगडं नेणं बंद केलं’. डोंगरे साठीचे वाटत होते. मी विचारलं, ‘काका वय किती?’ डोंगरे म्हणाले, ‘पंच्याऐंशी!’
मला हातात रुमाल झेपत नव्हता पंचेचाळीसाव्या वर्षी आणि हे काका डोक्यावर कलिंगडं घेऊन त्र्याऐंशीव्या वर्षापर्यंत गड चढत होते!
अशा तानाजीच्या काळापासून मेटावर राहणाऱ्या लोकांचे कट्टे वनखात्यानं उदध्वस्त केले आहेत. पर्यावरणाची सेवा करायची म्हणजे एवढं करणं आलंच!
दत्ता नाईलकर व त्यांचा छप्पर उडवलेला कट्टा आणि सोपान पढेर व त्यांचा कट्टा
६.
मेटापासून अजून वर गेलं की, सोनाबाई उघडे यांचा कट्टा आहे. सत्तरीच्या ठसठशीत सोनाबाई या वयात खालच्या खानापूरवरून पहाटे गडावर येतात आणि दिवसभर हॉटेल चालवतात. पाणी, चहा आणि अगदी भजीसुद्धा! गेली तीस वर्षं त्यांचा इथं राबता आहे. दही दहा पैसे मडकं होतं, तेव्हापासून सोनाबाई दही विकत आहेत. आता दह्याचं मडकं पंचवीस रुपयाला मिळतं.
सोनाबाईंचं स्पिरिट बघण्यासारखं आहे. मध्यंतरी पेपरात बातमी आली की, गडाच्या परिसरात ‘ढाण्या वाघ’ म्हणजे ‘रॉयल बेंगॉल टायगर’ आला आहे. नेहमीचे खूपसे ट्रेकर्स या बातमीनं टरकले. गर्दी खूप कमी होती त्या रविवारी. जे अट्टल ट्रेकर्स आले होते, त्यांच्यातही वाघाचीच चर्चा सुरू होती. मी सोनाबाईंच्या हॉटेलावरून चाललो होतो, तेव्हा कुणीतरी सोनाबाईंना विचारलं, ‘मावशी वाघ बघितलात का?’ सोनाबाईं म्हणाल्या, ‘अरं, कसला वाघ. त्याला काय मी आवडत नाही का, म्हणून जिवंत ठेवलंय व्हय त्यानं मला? कसला वाघ अन् कसलं काय? गेली पन्नास वर्षं राहते आहे मी इथं, कधी बघितला नाही मी वाघ. बिबटं मात्रं आहेत.’ गर्दी नसल्यामुळे सोनाबाई चिडल्या होत्या, पण त्यांचा मुद्दा खरा होता. पन्नास वर्षं न दिसलेलं जनावर एकदम कसं दिसेल? शेवटी वनखात्यानेही खुलासा केला की, या परिसरात ढाण्या वाघाचा ‘अधिवास’ नाही.
अशा या सोनाबाई. इथल्याच. त्यांचंही हॉटेल उदध्वस्त केलंय. सोनाबाईंचं मनच मोडलं. परवा गडावर गेलो, तेव्हा सोनाबाई दिसल्या नाहीत. त्यांची मुलगी सुनीता खुटेकर होत्या. त्या म्हणाल्या, ‘आई आलीच नाही गेले तीन आठवडे’. वाघालाही न जुमानणाऱ्या सोनाबाईंचं स्पिरिट वनखात्यानं भुईसपाट केलंय.
वर चढताना किंवा उतरताना ट्रेकर्स किंवा वृद्ध किंवा लहान मुलं धडपडतात, जखमी होतात. त्यांना सोनाबाई, नाईलकर, डोंगरे यांचाच आधार असतो. मध्यंतरी मेटावर दोन स्ट्रेचर्ससुद्धा ठेवण्यात आली होती.
सोनाबाई उघडे आणि त्यांचे ‘दुकान’
सोनाबाईंच्या हॉटेलापासून अजून थोडं वर गेलं की, लागतो विठ्ठल खामकर यांचा कट्टा. खामकर साठीचे आहेत. एका पायानं अपंग आहेत. जीपने गडावर येतात आणि मग खाली उतरून आपल्या कट्ट्यावर. त्यांचं विक्रीचं सामान काही नेहमीचे ट्रेकर्स आपल्या खांद्यावरून वाहून कट्ट्यापर्यंत आणतात. त्यांना देण्यासाठी विठ्ठलरावांपाशी आशीर्वादाशिवाय काहीच नसतं. हे विठ्ठलराव दिवस मावळायला आला की, पाय ओढत ओढत सिंहगडाची शेवटची अवघड चढण चढून जातात. शेतीवर भागत नाही, तेव्हा माणसाला जगण्यासाठी काहीतरी करावंच लागतं.
मी या सगळ्या परिस्थितीवर लिहितो आहे, हे सांगितल्यावर विठ्ठलराव म्हणाले, ‘माझ्यासारखा अपंग कष्ट करून जगतो आहे, यात काही चुकतं आहे का?’ त्यावर काय बोलणार? बोलता बोलता विठ्ठलरावांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना वनखात्याचा एक गार्ड अद्वा-तद्वा बोलला होता. विठ्ठलराव म्हणाले, ‘मी स्वाभिमानानं कष्ट करत जगत आलो आहे. माझ्या आयुष्यात असं कुणी नाही बोललं नाही मला साहेब.’
विठ्ठल खामकर यांचा उदध्वस्त कट्टा!
अजून थोडं वर गेलं की, खाटपे वहिनींचा कट्टा! हे सगळे कट्टे उरावरच्या चढणी हेरून त्या चढणींच्या माथ्यावर केले गेले आहेत. ट्रेकर्स जिथं थकून थांबतात, ते स्पॉट हेरून तयार केले गेले आहेत. पांढऱ्या शुभ्र दह्याच्या पाट्या डोक्यावर घेऊन खाटपे वाहिनी तिथं येतात. त्यांच्याही डोळ्यात पाणी! परिस्थितीच अशी आणली गेली आहे! मी लेख लिहितो आहे म्हटल्यावर त्यांनी संक्रांतीच्या दिवशी माझ्यासाठी आठवणीनं तिळगूळ आणला होता! मोठ्या मायेनं त्यांनी मला तिळगूळ दिला.
खाटपे वाहिनी आणि त्यांचा कट्टा
या सगळ्या लोकांनी मिनरल वॉटरच्या रिकाम्या बाटल्या साठवण्यासाठी खांबांना पोती बांधली आहेत. बाटल्या साठल्या की, हे लोक ती पोती खाली घेऊन जातात! पर्यटक चढता चढता बाटल्या रस्त्यात टाकतात. त्याला हे लोक जबाबदार कसे? बरं, रस्त्यात खूप बाटल्या दिसतात असंही नाही. अनेक उत्साही तरुण-तरुणींचे ग्रुप्स रस्त्यातील बाटल्या गोळा करून निमितपणे खाली घेऊन जातात.
मग प्रश्न असा येतो की, हा सारा उपदव्याप का चालला आहे? काही मोठा ‘डेव्हलपमेंटल प्लॅन’ तयार झाला आहे का? मुंबई-बेंगलोर हायवेचा पुणे बायपास सिंहगडावच्या मागून न्यायचं ठरलं आहे का? सिंहगड मुंबईच्या लोकांसाठी एक आकर्षण म्हणून प्रोजेक्ट करायचं आहे का? सिंहगडाच्या पश्चिमेच्या जमिनींच्या किमती पूर्वेच्या जमिनींसारख्या वाढणार आहेत का? का हा फक्त वनखात्याचा ‘खेळ’ आहे?
नुसता पर्यावरणाचा विषय असेल तर अतकरवाडी आणि गोळेवाडी भागातल्या पर्यावरणाचा समतोल आधी साधायला नको का? का तानाजीच्या काळापासून इथं राहणाऱ्या लोकांना उदध्वस्त करूनच पर्यावरणाचा समतोल राखणं गरजेचं झालं आहे?
श्रीमंत आणि गरीब अशा दोन ध्रुवांमधला हा ताण आहे, हेच खरं!
मेटावरचे पप्पू डोंगरे म्हणाले, ‘गेली पंचवीस वर्षं दुकान चालवतो आहे. वनखात्याला सांगा, या जुन्या गोष्टी फार सुंदर आहेत. या चालू राहू द्या.’ नाचणी आणि कडधान्यांवर पोसलेला आपला शेलाटा देह राखण्यासाठी डोंगरे अमाप कष्ट करत आहेत. अगदी तुटपुंज्या मिळकतीवर खुश आहेत. जादा मिळालं तर हवं आहे, पण कुणाचा घास ओढून घेऊन त्यांना काही नको आहे. नव्यानं तयार झालेल्या परिस्थितीला त्यांना विरोध करायचा नाहिये किंवा आंदोलनही करायचं नाहिये.
तानाजीच्या काळापासून त्यांचे पूर्वज मेटावरच्या घरात राहत आहेत. आपल्याच अंगणात एक मांडव टाकून दुकान चालवायला कुणी का हरकत घ्यावी, असा प्रश्न हे सगळे बघून माझ्या मनात आला.
मला गंमत वाटली की, गडावरच्या कुणालाही डोंगरे यांच्यासारखाच कुणालाही विरोध करायचा नाहिये किंवा आंदोलनही करायचं नाहिये.
सगळे अजूनही आशेवर आहेत की, आपल्याला कुणी इथून हाकलून देणार नाही. अजूनही सगळ्यांना वाटतेय की, आपली रोजीरोटी आपल्याला परत दिली जाईल.
७.
या सगळ्या लोकांचं काय होणार? विकासाच्या राक्षसी रेट्यात या लोकांना आपण जगू देणार की नाही?
हे लोक अजूनही निराश झालेले नाहीत. गरिबी तर गरिबी, कष्ट तर कष्ट… ते घाबरलेले नाहीत... . आपलं कष्ट करण्याचं सामर्थ्य आणि स्वातंत्र्य अजूनही अबाधित आहे, असंच त्यांना वाटतंय. धोका असा आहे की, या लोकांना लवकरच त्यांच्या धंदा-पाण्यापासून वंचित केलं जाईल. जिथं या लोकांची स्वतःची हॉटेल्स होती, तिथं त्यांच्या मुलाबाळांवर वेटर म्हणून राबण्याची वेळ येईल. हे स्वतंत्र लोक नोकरीच्या गुलामीत ढकलले जातील. तिथं त्यांच्या आयुष्यातला आनंद आणि उमेद संपेल.
व्हॉल्टेअर हा अठराव्या शतकातला फ्रेंच तत्त्ववेत्ता. त्याचं एक वाक्य आहे – “It's not inequality which is the real misfortune, it's dependence.” (‘विषमता हे खरं दुर्भाग्य नसतं, परावलंबित्व हे खरं दुर्भाग्य असतं.’)
शेतकरी आत्महत्या करतो, कारण तो पाऊस, हवामान, बाजारभाव, कर्ज आणि दलाल, अशा अनेक घटकांवर अवलंबून असतो. हे परावलंबित्व सहन न झाल्यामुळे तो आत्महत्या करतो. कष्टावर त्याचा विश्वास असतो, कष्ट करण्याची त्याला उमेद असते. पण बाकी परावलंबित्वामुळे तो हताश होतो, नैराश्यग्रस्त बनतो.
हे सगळे गडाच्या आसपासचे लोक शेतीतून सुटून स्वातंत्र्याकडे आलेले आहेत. त्यांच्यासमोर सायबूने केलेल्या प्रगतीचं उदाहरण आहे. आता या लोकांवर वेटर वगैरे व्हायची पाळी आली, तर प्रगतीची सर्वच दारं बंद होणार आहेत.
…देशात जागोजागी हेच घडत आहे.
चिनुआ आचेबी (Chinua Achebe) या नायजेरियन लेखकाची ‘Things Fall Apart’ नावाची एक प्रसिद्ध कादंबरी आहे. त्यात त्यांनी भूमिपुत्रांविषयी अत्यंत सुंदर वाक्य लिहिलंय – ‘A child cannot pay for its mother’s milk’. (‘कुठलंही मूल आपल्या आईच्या दुधासाठी पैसा मोजण्याच्या परिस्थितीत नसतं.’)
सिंहगडाच्या भूमिपुत्रांजवळ येणाऱ्या विकासाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी लागणारा पैसा नाहीये, भांडवल नाहीये. त्यांना फुकटामध्येच येणाऱ्या विकासाच्या लाटेवर स्वार होऊ दिलं गेलं पाहिजे. तो त्यांचा नैसर्गिक हक्क आहे! का त्यांना विकासाच्या दुधाच्या बदल्यात आपल्या स्वातंत्र्याची किंमत द्यावी लागणार आहे? त्यांना गुलाम होऊनच या विकासाचे दोन थेंब जिभेवर घ्यावे लागतील?
हे सगळं पाहिल्यावर मेधा पाटकरांनी आयुष्यभर केलेल्या विविध आंदोलनांचा खरा अर्थ कळू लागतो.
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Wed , 25 January 2023
भूमिपुत्रांबद्दल आजचं सरकारी धोरण हा मेकॉलेछाप शिक्षणाचा नंगानाच आहे. विकासाच्या भ्रामक कल्पनांवर १९९० सालापासून एक आख्खी पिढी पोसली गेली आहे. हे निरर्थक चक्र उलट फिरवावं लागेल. बराच संघर्ष आहे.
-गामा पैलवान