गेल्या चाळीस वर्षांत चीनने आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाचे स्थान कसे मिळवले आणि त्यामुळे चीन व जगापुढे काय प्रश्न निर्माण झालेत, याची चर्चा या पुस्तकात आहे
ग्रंथनामा - झलक
सतीश बागल
  • ‘चिनी महासत्तेचा उदय’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 20 January 2023
  • ग्रंथनामा झलक चिनी महासत्तेचा उदय Chinee Mahasattecha Uday सतीश बागल Satish Bagal

अवघ्या चाळीस वर्षांत चीनने जगाचे डोळे दिपवून टाकणारी प्रगती केली आहे. नवी महासत्ता म्हणून चीन उदयाला आला आहे. आपल्या या बलाढ्य शेजाऱ्याच्या आर्थिक आणि राजकीय वाटचालीचा, त्यामागील विविध प्रेरणांचा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांचा मागोवा घेणारा माजी सनदी अधिकारी डॉ. सतीश बागल यांचा ‘चिनी महासत्तेचा उदय : डेंग झिओपेंग ते क्षी जिनपिंग’ हा ग्रंथ नुकताच साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. त्याला बागल यांनी लिहिलेलं हे मनोगत...

.................................................................................................................................................................

‘चिनी महासत्तेचा उदय’ हे पुस्तक वाचकांच्या हातात देताना मला आनंद होतो आहे. साधना साप्ताहिकातून २०२०मध्ये या विषयावरील माझी दीर्घ लेखमाला प्रकाशित झाली; प्रस्तुतचे पुस्तक या लेखमालेवर आधारित आहे. माओच्या मृत्यूनंतर गेल्या चाळीस वर्षांत अर्थव्यवस्था खुली करत चीनने आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत मानाचे स्थान प्राप्त केले. चीनने थोड्या अवधीत हे मोठे यश कसे प्राप्त केले, त्या प्रक्रियेतच अनेक परस्परविरोध कसे सामावलेले आहेत आणि त्यामुळे चीनपुढे आणि जगापुढे काय प्रश्न निर्माण झाले आहेत, याची चर्चा या पुस्तकात आहे. गेली पाच-सहा वर्षे या विषयावरील माझे काम सुरू होते.

योगायोग असा की ‘चिनी महासत्तेचा उदय’ ही लेखमाला सुरू असताना २०२० या वर्षात करोना साथीमुळे जगभरात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. त्याच्या केंद्रभागी सर्वाधिक चर्चा चीनबद्दलची होती. याच वर्षात भारत-चीन सीमेवर चीनच्या लष्करी साहसामुळे मोठा तणाव निर्माण झाला. या वादळाच्या केंद्रभागीही चिनी महासत्तेच्या उदयामुळे निर्माण झालेली परिस्थिती होती. या घटनांमुळे हे मात्र स्पष्ट झाले की, यापुढे आंतरराष्ट्रीय राजकारणात, अर्थकारणात आणि जागतिक घडामोडीत अमेरिकेप्रमाणे चीनही केंद्रभागी राहणार आहे. तसेच या दोन देशांतील संबंधावर जागतिक व्यवस्थेचे भवितव्य अवलंबून असेल. 

वास्तविक पाहता २००८पूर्वी चीन या विषयाशी माझा फारसा संबंध नव्हता. आर्थिक सुधारणा आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे विषय माझ्या अभ्यासाचे आणि सरकारी नोकरीशी संबंधित होते; तर युरोपचा इतिहास आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे माझ्या आवडीचे आणि वाचनाचे विषय. त्यात चीन फारसा नव्हता. मात्र २००८चे बीजिंग ऑलिम्पिक झाल्यानंतर एका महिन्याने सरकारी कामकाजाच्या निमित्ताने मला चीनला भेट द्यावी लागली. एका उच्चस्तरीय सरकारी शिष्टमंडळाचा सदस्य म्हणून आणि मुंबईतील मेट्रो, मोनोरेल आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांच्या संदर्भात ही भेट होती. चीनमधील अनेक मोठ्या शहरांना आणि प्रकल्पांना भेटी, तसेच चीनचे वरिष्ठ सरकारी अधिकारी, मंत्री आणि इतरांशी चर्चा असा हा कार्यक्रम होता. 

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

चीनने १९८०च्या दशकानंतर मोठे परिवर्तन घडवून आणून, आर्थिक प्रगती साध्य करून अमेरिकेलाही आव्हान दिले होते. ही अर्थातच कौतुकाची बाब होती. चीनने केलेली भौतिक प्रगती, तासाला ५०० किलोमीटरहून अधिक वेगाने जाणारी मॅग्लेव्ह ट्रेन, बुलेट ट्रेन्स, चकचकीत एअरपोर्ट, त्यात लगबगीने वावरणारे सुखवस्तू शहरी मध्यमवर्गीय आणि हे सारे अभिमानाने दाखवणारे चिनी यजमान ही चित्रे काही काळ स्मरणात राहिली आणि नंतर विरूनही गेली. मात्र या भेटीच्या निमित्ताने चीनमधील आर्थिक सुधारणा, आर्थिक धोरणे, चीनमधील राजकारण आणि चीनचा इतिहास याबाबत कुतूहल निर्माण होऊन चीनबद्दल थोडे फार वाचन सुरू झाले! चीनमधील अनेक चित्रे विस्मरणात गेली असली तरी माझ्या बाबतीत घडलेला एक गमतीदार प्रसंग मी विसरू शकलो नाही. शांघायमध्ये एक मोठा मॉल आणि त्याच्या बाजूचा वॉकवे या परिसरात खिशात मोबाईल नसल्याने मी एक संध्याकाळभर चक्क हरवलो. चिनी भाषा न येणाऱ्या आणि इंग्रजीत बोलू पाहणाऱ्या परदेशी इसमाकडे चीनमध्ये किती संशयाने पाहिले जाते, याचा मी थोडा वेळ अनुभव घेतला!

चीनने १९७८पासून झपाट्याने आर्थिक विकास साध्य करत महासत्तेकडे वाटचाल कशी केली आणि आज स्वतःसाठी आणि जगासाठी काय प्रश्न निर्माण करून ठेवले आहेत, याची चर्चा या पुस्तकात आहे. त्यामुळे चीनने वेळोवेळी आखलेली आर्थिक धोरणे, केलेल्या आर्थिक सुधारणा, हे सारे येथे आले आहेच.

याशिवाय चीनमधील राजकारण, समाजकारण, राज्यव्यवस्था, प्रशासन, परराष्ट्र धोरण, पर्यावरणविषयक प्रश्न यांचाही मागोवा घेतला आहे. परंतु केवळ राजकीय धोरणे आणि आर्थिक सुधारणा यांच्यातून चीनचे जागतिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीचे आकलन होणे अवघड आहे. प्रत्यक्षात धोरणकर्ते, सुधारणा करणारे नेते आणि त्यांची नेतृत्वशैली याही बाबी महत्त्वाच्या असतात. शिवाय ज्या ऐतिहासिक कालखंडात चीनची राष्ट्र बांधणी झाली, त्या इतिहासाची सावलीही वर्तमानावर पडलेली आहे. त्यामुळे चिनी महासत्तेच्या उदयाच्या या कथनात इतिहासातील अनेक संदर्भ तसेच माओ, डेंग झिओपेंग, जियांग झेमिन, हु जिंताओ, क्षी जिनपिंग आणि इतर नेत्यांचे चरित्र विषयक तपशीलही आले आहेत.

आधुनिक चीनमध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणण्याचे काम प्रामुख्याने डेंग झिओपेंग यांनी केले असल्याने ते आधुनिक चीनचे महत्त्वाचे शिल्पकार आहेत. त्यामुळे पुस्तकाच्या सुरुवातीच्या भागात डेंग यांचे चरित्रविषयक तपशील आणि त्यांची अर्थव्यवस्था खुली करण्यामागची भूमिका हे सर्व विस्ताराने आलेले आहेत.

गेल्या चाळीस वर्षांतील चीनच्या वाटचालीचे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांचे आकलन होण्यासाठी डेंग झिओपेंग यांच्या चरित्रातील अनेक तपशील महत्त्वाचे आहेत. डेंग यांचे चरित्र मुळातच ढंगदार आहे. चीनमधील साम्यवादी क्रांतीतील अनेक साहसी आणि रोमहर्षक प्रसंगातील सहभागापासून ते १९७८मध्ये चीनची अर्थव्यवस्था खुली करण्यापर्यंत अनेक कामे त्यांनी केली.

समाजवादावर निष्ठा असणाऱ्या डेंग यांनी १९८०च्या दशकात भांडवलशाहीचे तंत्र आणि मंत्र समजावून घेऊन अर्थव्यवस्था खुली केली आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित केली. समाजवादी विचारसरणी आणि खुली बाजारचलित अर्थव्यवस्था यांच्यात परस्परविरोध नाही, हा विचार त्यांनी मांडला आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला तो स्वीकारायला लावला. पुढे तर १९९२मध्ये आर्थिक सुधारणांच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांनी मार्केट्‌स, कार्यक्षमता आणि इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्‌स, यावर चीनचे प्रबोधनही केले आणि चीनला उच्च आर्थिक विकासाच्या दिशेने नेले. सांस्कृतिक क्रांतीच्या दरम्यान रेड गार्डसच्या छळवादामुळे कायमचे पंगुत्व आलेल्या आपल्या मुलाची शुश्रूषा करणारे कुटुंबवत्सल डेंग जितके खरे तितकेच राजकीय सुधारणा करण्याचे नाकारून हजारो बुद्धिमंतांना तुरुंगात डांबणारे डेंगही खरेच! असे अनेक रंग आधुनिक चीनच्या या शिल्पकारात दिसतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

पुस्तकाच्या उत्तरार्धात चीनचे सध्याचे प्रमुख नेते क्षी जिनपिंग यांचे चरित्रविषयक तपशील, त्यांचे चीनबद्दलचे स्वप्न आणि त्यांचे महत्त्वाचे उपक्रम याबद्दल चर्चा आहे. त्यातही क्षी जिनपिंग यांची भ्रष्टाचार विरोधातील वैशिष्ट्यपूर्ण मोहीम, या मोहिमेचा चीनच्या अर्थकारणाशी आणि राजकारणाशी असलेला संबंध याची चर्चा महत्त्वाची आहे.

या बरोबरच चीनच्या अर्थव्यवस्थेचे प्रश्न, पर्यावरणविषयक प्रश्न तसेच चीनमधील गव्हर्नन्स हा पुस्तकातील भाग चीनचे आकलन होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. 

गेल्या वीस-पंचवीस वर्षांत चीनबद्दलचे कथन सतत बदलत आहे. १९९०च्या दशकात चीनबद्दल कौतुकाने लिहिले जात असे. चीनने भौतिक प्रगती कशी केली, अर्थव्यवस्था कशी खुली केली याविषयी उदाहरणे दिली जात. यानंतरच्या काळात चीनच्या आर्थिक विकासाच्या मॉडेलबद्दल साशंक असणाऱ्या पाश्चात्त्य अभ्यासकांनी चीनचा अभ्यास सुरू केला. भांडवलशाहीतील आंतरविरोधांचा भेदक अभ्यास करणाऱ्या डॅनियल बेल यांच्यासारख्या ज्येष्ठ अमेरिकन समाजशास्त्रज्ञाने चीन भांडवलशाहीतील विरोध टाळू शकणार नाही, असे निरीक्षण नोंदवले होते.

२००१ मध्ये चीन जागतिक व्यापार संघटनेत आला आणि पाश्चात्त्य राष्ट्रे चीनकडे भविष्यातील स्पर्धक म्हणून पाहू लागली. २००८मधील बीजिंग ऑलिम्पिकमध्ये चीनने सर्वांत अधिक सुवर्णपदके तर जिंकलीच; शिवाय आपल्या आर्थिक कामगिरीचे उत्तम प्रदर्शन करून जगभरच्या प्रेक्षकांची मनेही जिंकली. मात्र २००८मध्ये आणखी काही महत्त्वाचे घडत होते. जागतिक मंदीमध्ये पाश्चात्त्य देशांच्या अर्थव्यवस्था डबघाईला येत असताना चीनची आर्थिक आघाडीवर जोमदार वाटचाल चालू होती. पाश्चात्त्य देशांच्या मर्यादा चीनने ओळखल्या होत्या आणि त्याचा परिणाम चीनच्या ताठर परराष्ट्र धोरणात दिसू लागला.

पुढे क्षी जिनपिंग २०१३मध्ये सत्तेवर आल्या नंतर तर चीनच्या प्रगतीबद्दल वाटणाऱ्या विस्मयाची आणि कुतूहलाची जागा चीनबाबत वाटणाऱ्या चिंतेने घेतली आहे. आपल्या मोठ्या आर्थिक, व्यापारी आणि लष्करी शक्तिनिशी बलाढ्य अमेरिकेला आव्हान देणाऱ्या चीनकडे संशयाने पाहिले जाऊ लागले. चीनच्या उदयामुळे प्रस्थापित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतही खळबळ निर्माण झाली.

चीनने कोट्यवधी लोकांना भीषण दारिद्य्रातून बाहेर काढले, ही चीनची मोठी कामगिरी आहे. मात्र चीनची एक मोठी समस्याही आहे. एक पक्षीय हुकूमशाही असलेल्या राज्यव्यवस्थेत आर्थिक सुधारणा करायच्या, मात्र राजकीय सुधारणा करायच्या नाहीत हे चीनचे धोरण झाले आहे. आर्थिक सुबत्तेमुळे सुशिक्षित, मध्यमवर्गाची संख्या चीनमध्ये मोठी झाली आहे, वाढते आहे. या वर्गाला राजकीय सुधारणा आणि थोडे स्वातंत्र्य हवे आहे. मात्र डेंग झिओपेंग पासून ते क्षी जिनपिंगपर्यंतच्या सर्वच नेत्यांनी राजकीय सुधारणा करण्याचे नाकारले. एका मर्यादेपर्यंत आर्थिक सुधारणा करण्याची तयारी, मात्र राजकीय सुधारणा करण्यास नकार- यामधील विरोधातून एक मोठा तणाव चीनमध्ये निर्माण झाला आहे. भविष्यात चीन या सततच्या तणावाला कसा सामोरा जाईल यावर चीनचे भवितव्य अवलंबून असेल असे मला वाटते.  

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

गेल्या चाळीस वर्षांत चीनचा जो मोठा आर्थिक विकास झाला, त्यात अमेरिकेचे खास स्थान आहे. अमेरिकेने १९७०च्या दशकाच्या सुरुवातीपासून   चीनबरोबरचे संबंध दृढ करण्यावर भर दिला. पुढे चीनने अमेरिका आणि पाश्चात्त्य देशांच्या मदतीने त्यांच्या गुंतवणुकींचा फायदा करून घेत, अर्थव्यवस्था खुली केली आणि जागतिक व्यापारात अव्वल स्थान मिळवले.

चीनला मदत करताना अमेरिकेची आणि पाश्चात्त्य देशांची अशी समजूत होती की, चीन भविष्यात केव्हा तरी राजकीय सुधारणा करील, चीनमध्ये लोकशाही येईल आणि चीनचे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत सामिलीकरण सुकर होईल. चीनने राजकीय सुधारणा केल्या नाहीतच. क्षी जिनपिंग यांच्या काळात तर चीनमध्ये स्वातंत्र्याचा अधिक संकोच झाला आणि चीन अधिक महत्त्वाकांक्षी झाला. जागतिक अर्थ व्यवस्थेत आणि व्यापारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या चीनला या व्यवस्थेत अमेरिकेप्रमाणेच महत्त्वाचे स्थान हवे आहे. अशा चीनचे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत शांततापूर्ण मार्गाने सामिलीकरण कसे करायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. चीन आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचे स्वरूप हे असे आहे. 

चीनच्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतील सामिलीकरणाप्रमाणेच भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भविष्य काळात भारत-चीन संबंध कसे असणार आहेत, हा आहे. भारत-चीन संबंध हा या पुस्तकाचा प्रमुख विषय नाही; तरीही या प्रश्नाची दोन प्रकरणांत चर्चा केली आहे. भारत आणि चीन यांच्यातील वाढत्या तणावाचे कारण म्हणजे भारत आणि चीन यांच्यातील वाढता आर्थिक, राजकीय आणि लष्करी असमतोल हेच आहे, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. या प्रश्नाकडे प्रखर राष्ट्रवादाच्या भिंगातून न पाहता व्यावहारिक शहाणपण आणि अधिक उच्च दर्जाच्या पुरेशा आर्थिक विकासाची आवश्यकता या दृष्टीने पाहिले, तरच चीनने उभे केलेले आर्थिक आव्हान भारताला पेलवता येईल, अशी भूमिका मांडली आहे. विशेषतः पुढील पंधरा ते वीस वर्षे तरी भारताने इतर सर्व व्यावधानांतून लक्ष काढून घेऊन, थोडी उसंत घेऊन, उच्च दराच्या व उच्च गुणवत्तेच्या आर्थिक विकासाचा ध्यास घेणे आवश्यक आहे.

चीनविषयी लिखाण करताना येणारी महत्त्वाची अडचण म्हणजे साहित्याची उपलब्धता. दहा-पंधरा वर्षांपूर्वी, विशेषतः २०१०पूर्वी, चीनबद्दल फारसे साहित्य उपलब्ध नव्हते. होते ते बरेचसे शोधनिबंधांच्या स्वरूपात आणि मुख्यतः ॲकॅडेमिक होते. मात्र २०१०नंतर चीनसंबंधी काही चांगली पुस्तके, साहित्य आणि राजकीय चरित्रे उपलब्ध झाली आहेत. अर्थात त्याच्या मर्यादाही आहेत. असे असले तरीही अलीकडे चीनबद्दल राजकीय, सामजिक, आर्थिक, चरित्रपर असे अनेक प्रकारचे साहित्य उपलब्ध झाले आहे. एझरा व्होगेल आणि अलेक्झांडर पँझॉव्ह यांनी लिहिलेली डेंग झिओपेंग यांची तपशीलवार चरित्रे; १९७०च्या दशकातील चीन-अमेरिका संबंधांचे शिल्पकार हेन्री किसिंजर यांचे अनेक ग्रंथ; जॉन फेअरबँक, जोनाथन फेन्बी, फ्रँक डीकॉटर अशा अभ्यासकांचे लिखाण; एलिझाबेथ इकॉनॉमी, केरी ब्राऊन, हार्वर्डचे मिन्क्षीन पे इत्यादींचे अलीकडचे चिनी प्रशासनावरचे अभ्यासपूर्ण लिखाण; असे काही मर्यादित परंतु महत्त्वाचे साहित्य सध्या उपलब्ध आहे. जिज्ञासू वाचकांसाठी परिशिष्टामध्ये संदर्भ ग्रंथांची सूची दिली आहे.             

नियतीने चीन आणि भारत यांना एकत्र आणून ठेवले आहे. हे देश शेजारी असूनही या दोन देशांतील समाजांमध्ये फारसा संपर्क नाही; परस्परांच्या इतिहासाबद्दल, राजकारणाबद्दल किंवा समकालीन घडामोडींबद्दल फारशी माहिती नाही. उलट दोन्ही देशांमध्ये १९६२च्या युद्धामुळे कटुता आहे. दोन्ही देशांत राष्ट्रवादाची तीव्र भावनाही आहे. चीनशी मोठा व्यापार असला तरी त्यातील चीनच्या वर्चस्वामुळे तो तणावपूर्ण वाटतो. चीनच्या वाढत्या आर्थिक आणि लष्करी प्रभावाच्या संदर्भात चीनने उभे केलेले आव्हान समजून घेणे आणि ते समर्थपणे पेलणे आवश्यक आहे. त्यासाठी चीनमधील राजकारण, अर्थकारण, चिनी समाज आणि चीनचा इतिहास याबद्दल माहिती करून घेणे आवश्यक आहे. चीनविषयी असे लिखाण भारतात फारसे झालेले नाही. या पुस्तकामुळे ही उणीव अंशतः भरून निघेल, अशी आशा वाटते.

‘चिनी महासत्तेचा उदय : डेंग झिओपेंग ते क्षी जिनपिंग’ – सतीश बागल

साधना प्रकाशन, पुणे | पाने – ४१६ | मूल्य – ५०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......