मानवाचा अहम् अजिंक्य असल्याने तो आपल्या मर्जीने राजवंश, धर्मगुरू किंवा प्रेषितांच्या नावाने जगाला काळाच्या चौकटीत बसवतो. दुसरीकडे गेली शेकडो हजारो वर्षे जगातील घटना अलिप्तपणे घडत असतात. या घटनांचे स्वत:च्या कार्यकारण शक्तीने ठरवले जाणारे एक स्वत:चे वेगळेपण असल्याने नव्या शतकातील घटनांना गेल्या शतकातील घटनांपासून फारच ढोबळमानाने वेगळे करून बघता येईल.
वर्तमान मानसिकतेचा विचार करता नव्या शतकात मनुष्यप्राणी समाजाला कोणती दिशा देऊ शकतो, याचा अंदाज बांधता येतो. मात्र हे अंदाजच असतील, कारण मनुष्य विचार करण्यामध्ये स्वतंत्र आहे. त्याचे विचार कधी कोणते वळण घेतील आणि त्यातून घटना कोणती दिशा घेतील, हे कोणीही ठामपणे सांगू शकणार नाही.
अंदाज बांधण्यामध्ये अजून एक समस्या जोडलेली आहे. मानवी संबंधांमध्ये घटनांना स्वतःला सिद्ध करण्याच्या किंवा खोटे ठरवण्याच्या मार्गात भविष्यवाणी किंवा भाकिते प्रभाव टाकतात. युरोपियन नेत्यांनी १९व्या शतकाच्या अखेरीस सत्ता संतुलनातून शांतता स्थापन करून संवाद कायम केले होते, तेथेच विसाव्या शतकात दोन महायुद्धे, देशांच्या स्वातंत्र्यांचे संघर्ष आणि अंतहीन स्थानिक युद्धे यांची कल्पना कोणाला होती? रशियन क्रांती १९१७मध्ये यशस्वी होऊन सोव्हिएत स्थापनेनंतर १९८७ उजाडताना त्याच्या संपूर्ण विघटनाची कल्पना कोण करू शकत होता?
शेवटी माणूसच इतिहास घडवतो आणि त्याची मानसिकता बदलत असते, म्हणून सध्याच्या काळातील त्याच्या मानसिकतेच्या संदर्भात निसर्गाने आखून दिलेल्या सीमेच्या अंतर्गत काही संकेत किंवा सिग्नल देण्याशिवाय जास्त काही सांगता येणार नाही.
विसावे शतक हे विज्ञानयुग नव्हे
विसाव्या शतकाला सर्वसाधारणपणे ‘विज्ञानाचे युग’ म्हटले जाते. त्यामुळे नव्या शतकात लोक वैज्ञानिक दृष्टीने आपल्या समस्या सोडवतील, अशी अपेक्षा ठेवता येईल. थोडा विचार केल्यावर कळते की, हा मानवी मनात खोलवर रुतलेला एक भ्रम आहे. खरं तर काही अपवाद सोडल्यास वैज्ञानिक साध्याच्या दृष्टीने विसावे शतक पूर्ण सपाट आहे. जे ज्ञान मानवी बुद्धीला विश्वाच्या बाहेर, तसेच पदार्थ आणि सजीवाच्या आतील सीमांत भागापर्यंत नेऊन, त्यातील रहस्यांना आमच्या संकल्पनांमध्ये समाविष्ट करते, त्यास आम्ही ‘विज्ञान’ म्हणतो. विसाव्या शतकाला विज्ञानाच्या दृष्टीने सपाट म्हणणे काहीसे आश्चर्यकारक किंवा अचंबित करणारे वाटेल. मात्र आजच्या काळातील सर्व महत्त्वाचे वैज्ञानिक शोध हे १९व्या शतकातील आहेत, हे आढावा घेतल्यानंतर कळून येईल.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
विसाव्या शतकातील प्रारंभीच्या वर्षातील वैज्ञानिक प्रभावामुळे विसाव्या शतकातील वैज्ञानिक वातावरण प्रकाशित राहिले. अगदी एक एक करून मोजता येतील. ऊर्जेच्या क्षेत्रातील जेम्स क्लर्क मॅक्सवेलचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिद्धांत १८७३चा आहे. त्याच्याशी जोडलेल्या हर्टझच्या प्रयोगांच्या आधारावर मार्कोनीने १९९५मध्ये वायरलेस टेलिग्राफी म्हणजे रेडिओचा शोध लावला. १८९५मध्येच रोमंटजनने एक्स-रेचा शोध लावला. पीएरे आणि मेरी क्युरीने १९९८मध्ये रेडियमचा शोध लावला आणि आण्विक भौतिक शास्त्राच्या संबंधित रसायनशास्त्राची पायाभरणी केली. मॅक्स प्लॅकने १८९०मध्ये ब्लॅक बॉडी रेडिएशनच्या प्रयोगातून क्वांटम भौतिक शास्त्राची सुरुवात केली. आईन्स्टाईनने स्पेशल थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी आणि फोटो-इलेक्ट्रिक इफेक्टच्या सिद्धान्तांचे प्रतिपादन १९०५ आणि १९०९मध्ये गेले. जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी १९१६पर्यंत विकसित झाली होती.
विसाव्या शतकाच्या पहिल्या तीन दशकांत विकसित झालेले बोर, श्रोडिंजर, डीराक आणि हायझेनबर्ग यांच्या सिद्धान्तांचे हेच आधार होते. ऊर्जा आणि काळ यांच्या संबंधातील आपल्या संकल्पनांमध्ये मूलभूत बदल करणारा ‘अँट्रोपी’चा सिद्धान्त तर, कारनेटने वाफेच्या इंजिनाच्या आपल्या प्रयोगातून १८२४मध्ये विकसित केला होता.
आजच्या काळातील सर्वांत मोठी तांत्रिक उपलब्धता कम्प्युटर मानले जाते. मात्र त्याचे मूलभूत सिद्धांत चार्ल्स बैबाज (१७९२ ते १८७१)ने विकसित केले होते आणि त्याची आवश्यक तांत्रिक पद्धती जॉर्ज बुलने (१८१५ ते१८६४) आपल्या बीजगणितातून विकसित केली. आजच्या काळातील जैवविज्ञानातील सर्वांत महत्त्वाचे संशोधन जेनेटिक्स क्षेत्रामध्ये होत आहे. मात्र अनुवंशिकतेसंबंधी मूलभूत शोध ग्रेगोरे जोहान मेंडेले १८६६मध्ये लावला. त्यानंतर या आधारावर थॉमस हंट मॉर्गनने शोध घेत क्रोमोझोमवरील जीन्स साखळीचा नकाशा तयार करण्यात १९१९ ते १९२३मध्ये यश मिळवले. सध्याच्या काळातील विकसित तंत्रज्ञानाचा आधार असलेल्या ह्युमन जेनोम प्रोजेक्ट याच प्रयोगांचा विस्तार म्हटला जाऊ शकतो.
विसाव्या शतकात चमत्कार पाहिल्यावर आपण विसाव्या शतकाला ‘विज्ञानाचे युग’ मानू लागलो. ते खरे तर तांत्रिक शोधातील महत्त्वपूर्ण प्रगतीचे परिणाम आहेत. मानवाने पदार्थांच्या गुणवैशिष्ट्यांचा अधिकाधिक अभ्यास करून त्यातील मिळणाऱ्या माहितीचा आपल्या विस्तृत गरजांच्या पूर्ततेसाठी प्रयोग करण्याच्या इच्छेचा हा परिणाम आहे. हा कोणताही मूलभूत वैज्ञानिक शोधाचा परिणाम नाही. उदाहरणार्थ टीव्ही, लेझर, मायक्रो चिप्स, ऑप्टिकल फायबर, इंटरनेट, जेनेटिकली सुधारणा केलेले अन्न, कृत्रिम उपग्रहांचे प्रक्षेपण इत्यादी.
गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं. जर माणसांच्या गरजांचा स्फोट झाला तर शोधलेल्या वस्तू ढिगाने तयार होणे, हे स्वाभाविक आहे. विसाव्या शतक विज्ञानाचे आहे असे आपण म्हणतो, पण ते खरे तर ‘उपभोगवादी तऱ्हेवाईकपणाचे शतक’ आहे. या शतकात चमत्कार करणारा चकचकीतपणा दिसतो, जो वर्तमान समाजाच्या संकटाचेसुद्धा कारण आहे. विज्ञानाच्या दिशेमध्ये आलेल्या परिवर्तनाची दोन कारणे वाटतात. प्रारंभी विज्ञान हा तत्त्वज्ञानाच्या क्षेत्राचा विस्तारित भाग होता. त्यामध्ये आपल्या स्वतःला, विश्वाला आणि दोघांमधील संबंधाला समजून घेण्याची इच्छा होती. म्हणजेच द्रष्टा आणि दृश्य याच्यातील संबंधाला समजून घेण्याची इच्छा.
आधुनिक औद्योगिक विकासाच्या गरजांच्या दबावाखाली अमेरिकेत जॉन डीवी यांचे जनकत्व असलेला व्यावहारिकतेच्या एका प्रयोगवादी रूपाचा विकास झाला. त्यानुसार वस्तू समजून घेणे. तिच्या विविध गुणांचे आकलन करणे आहे. तत्त्वज्ञानाच्या संदर्भात हीच दृष्टी कार्ल मार्क्सची होती. दीडशे वर्षांपूर्वी फायरबाख वरील प्रबंधात त्यांनी लिहिलेय की- ‘दार्शनिकांनी आजपर्यंत विश्वाची व्याख्या देण्याचा प्रयत्न केला, मात्र समस्या ते बदलण्याची आहे’.
याच प्रकारे आजच्या विज्ञानाचे लक्ष्य विश्व दृष्टीच्या निर्माणावरून विखंडनावर केंद्रित आहे. आज अणू, रेणू, पेशी, डीएनए आदींना खंडित करून त्यांच्या सूक्ष्मतम खंडाच्या गुणांच्या अध्ययनावर वैज्ञानिकांनी लक्ष केंद्रित केले आहे. या प्रक्रियेत ज्यांची कधी कल्पनाही केली नव्हती, असे पदार्थांचे नवनवे पैलू आपल्यासमोर येणे, हे स्वाभाविक आहे. जेव्हा आपण वस्तूचे विविध गुण समजून घेतो, तेव्हा त्यांचा उपयोग काय होऊ शकतो, तेसुद्धा माहीत करून घेतो. यातून नित्य नवीन आविष्काराचे मार्ग मोकळे होतात.
अशा प्रकारे समाजाच्या उपभोगवादी मूल्यांचे विज्ञानाच्या प्रयोगवादी वृत्तीसोबत स्वाभाविक नाते बनते. बहुतेक वैज्ञानिक या दिशेला वळले आहेत. वैज्ञानिक शोधांचे प्रायोजकत्व बहुदा औद्योगिक किंवा संरक्षण संस्थांकडे असते ज्यांचे उद्दिष्ट मर्यादित असते. या स्थितीचे अजून एक कारण दिसत आहे. मानवाची ज्ञानेंद्रिय या निसर्गाचीच अंगे आहेत. मानवाचे अवलोकन अशा सीमेपर्यंत पोहोचले आहे की, ज्यामध्ये यापुढील विश्वाच्या संकल्पना योग्य की अयोग्य, हे बहुदा सिद्ध होऊ शकणार नाही, जे आजपर्यंत वैज्ञानिक सिद्धान्तांची कसोटी मानले गेले होते. या दिशेने विज्ञानाची वाढ झाल्यास ते तत्त्वज्ञानात्मक अनुमानाच्या प्रांतात प्रवेश करेल, जेथून विज्ञानाने प्रयोगात्मक चाचणीचा अंगीकार करण्यासाठी झेप घेतली होती.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
आज फार कमी वैज्ञानिक या अनुभवांच्या दिशेला जात आहेत, कारण संस्थांना तत्त्वज्ञानात्मक कल्पकतेची गरज नसून व्यावहारिक लाभ हवा आहे. कोणत्याही शोधासाठी लागणारा आवश्यक पैसा त्यांच्याकडेच आहे.
सामाजिक शास्त्रांचे अपयश
कोणत्याही काळात ज्ञानाचा विस्तार पाण्यावरील तरंगांच्या विस्तारणाऱ्या परिघासारखा असतो, म्हणजे प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान कमी अधिक प्रमाणात खांद्याला खांदा लावून चालते. व्यापक समस्यांच्या परिप्रेक्ष्यात समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र आदि ज्ञानशाखांचा जन्म झाला. मात्र आज त्यांची व्यापक समस्यांना भिडण्याची वृत्ती दिसत नाही. अर्थशास्त्र आता फक्त दररोजच्या बाजारातील लाभ-हानीच्या शक्यता वर्तवण्यापुरते राहिले असून त्यासाठी ते गुंतागुंतीच्या गणिती समीकरणांचा शोध लावत आहे. समाजात आणि संस्थांमध्ये दररोज होणाऱ्या छोट्या संघर्षाचे अभ्यास आणि सोडवण्याचे उपाय शोधण्यात समाजशास्त्रज्ञ गुंतलेले आहेत. संपूर्ण समाजाच्या समस्यांवरील सार्वत्रिक उपायांची चिंता हा या क्षेत्रातील उपहासाचा विषय बनलेला आहे.
ते म्हणतील की, संपूर्ण समाजात समस्यांची आणि कारणांची इतकी विविधता आहे की, त्यांना कोणत्याही अर्थपूर्ण चौकटीत बांधता येणार नाही. ‘विचारसरणीचा अंत’, ‘इतिहासाचा अंत’ इत्यादी चर्चा म्हणजे पूर्ण समाजाच्या प्रश्नांना भिडण्याच्या इच्छाशक्तीचा अभाव आणि भविष्याबद्दलच्या नैराश्याची अभिव्यक्ती वाटते. संपूर्ण समाजाचा विविध दृष्टीकोनातून अभ्यास करणे हे औद्योगिक संस्थांच्या फायद्याचे स्त्रोत होऊ शकत नाही, मग याचा प्रायोजक कोण बनणार?
विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या दिवसात विश्व आणि समाजाच्या गुंतागुंतीला समजून घेत प्राप्त होणाऱ्या ज्ञानातून समाजातील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा निश्चय आणि आत्मविश्वास होता. तो एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी दिसत नाही. दीडशे वर्षांपूर्वी समाजवाद, विश्वबंधुत्व, जगातील गरिबांची एकजूट इत्यादी स्वप्ने जगातील लोकांना प्रेरणा देत होती, हा या आत्मविश्वासाचा परिणाम होता. याच्या उलट आज बौद्धिक क्षेत्रात वैचारिक संकुचितपणा आल्याने लोक स्वतःबद्दल किंवा स्वतःच्या छोट्या समूहाच्या तात्कालिक गरजांच्या पुढे ते विचार करत नाहीत.
मनुष्याची भौतिक स्थिती आणि त्याच्या जीवनाला लागणाऱ्या आवश्यक स्त्रोतांसाठी अपेक्षित उपलब्ध क्षेत्राचा झालेला संकोच हा दुसरा महत्त्वाचा संकोच आहे. विसाव्या शतकाच्या प्रारंभी मानवी मनामध्ये विश्वाला निर्बंध नव्हते. आपण आपल्या गरजा कितीही वाढवल्या, त्यासाठी कितीही वस्तू निर्माण केल्या, तरी त्याच्या पूर्ततेवर सृष्टी बंधने आणणार नाही असा मानवाचा विश्वास होता. फक्त हवा आणि पाणी नव्हे तर शेतीसाठी जमीन, ऊर्जेसाठी स्त्रोत आणि आवश्यक औद्योगिक वस्तूंची उपलब्धता अनिर्बंध वाटत असे.
एखाद्या ग्रहाच्या मर्यादित जमिनीवर अनिर्बंध स्त्रोतांची कल्पना करणे मूर्खपणाचे आहे, हे कधीही लक्षात आलं असतं, मात्र कुठेही कमतरता जाणवत नसल्याने यावर विचार करणं जरुरीचं वाटलं नाही. आज आपल्याला हे नेमके माहीत आहे की, आपल्या उत्पादनक्षमतेवर ओलांडता न येणारी मर्यादा असल्याचे दिसून येत आहे. फक्त जमीन किंवा खनिज नव्हे तर हवा आणि पाण्याच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. औद्योगिक उत्पादनाच्या उत्सर्जनातून अॅसिडचा पाऊस, ओझोन कवचाला भोके पडणे, पृथ्वीचे तापमान वाढणे हे निश्चित पुराव्याने सिद्ध झालेले आहे. तरीही विशाल औद्योगिक संस्थातील ज्ञानी व्यवस्थापक, यातील बहुतेक संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या अमेरिका देशामध्ये आहेत, हे मान्य करायला तयार नाहीत.
तसेच मानव जातीचे अस्तित्व धोक्यात आल्याच्या संदेशांचा स्वीकार करायला ते नकार देतात. अविरतपणे फायदा टिकवण्यासाठी त्यांनी वाईट बघणार नाही, ऐकणार नाही आणि बोलणार नाही, या आदर्शला आत्मसात केले आहे. त्यामुळे पर्यावरण तज्ज्ञांनी दिलेले इशारे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. औद्योगिक उत्सर्जनावर निश्चित निर्बंध आणण्याची सक्ती असलेल्या क्योटो प्रोटोकॉलमध्ये स्वतः अमेरिका सहभागी असताना तो लागू करण्याला राष्ट्रपती बुश यांनी नकार दिला. अशा प्रकारे विनाशाच्या दिशेने निश्चिंतपणे आंधळेपणाने विश्व आगेकूच करत आहे. वादळे, प्रलय, मोठ्या प्रमाणात बर्फ वितळणे, अशा घटना आपल्याला धोक्याचे संकेत देत आहेत.
एकसाची संस्कृती म्हणजे मानवजातीची सामूहिक आत्महत्या
नव्या शतकाच्या पहिल्या महिन्यातच गालापागोस द्वीपसमूहाजवळ एक तेलवाहू जहाज अपघातग्रस्त झाले आणि त्यामुळे अनेक दुर्मीळ प्रजातींचे अस्तित्व संकटात आले. अनेक प्रयत्न करूनही त्यांना वाचवण्याची शक्यता अत्यल्प आहे. गालापागोस द्वीप समूहाचे एक विशेष प्रतीकात्मक महत्त्व आहे. बाहेरच्या जगापासून दूर राहून इथे अनेक प्रजाती लाखो वर्षे स्वतंत्र रूपात विकसित होत होत्या. डार्विनने आपल्या ‘ओरिजिन ऑफ स्पेशिज’ या प्रसिद्ध पुस्तकात या द्वीपकल्पाचा उल्लेख केला आहे कारण या द्वीपकल्पाने त्याच्या संशोधनासाठी निसर्गाने संरक्षित केलेल्या प्रयोगशाळेची भूमिका पार पाडली होती. आताही प्रयोगशाळा कायमची नष्ट होण्याचा संभव आहे. हा अपघात म्हणजे व्यापारकेंद्री वैश्विक व्यवस्थेकडून नव्या शतकात घडणाऱ्या विनाशाचे प्रतीक मानता येईल. जगातल्या वेगवेगळ्या भागात, वर्तमान विकासापासून, कसेबसे आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून जगणाऱ्या मानवी संस्कृतींवरील येणाऱ्या संकटाचा हा पूर्वसंकेत आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
जीन्स बँकांमध्ये जैविक वैविध्याचे संरक्षण करण्याचा प्रयत्न मनुष्य आपल्या स्वार्थापोटी करत आहे. मात्र संस्कृतीची वैशिष्ट्ये जपून ठेवण्यासाठी त्याने अजून तरी कोणतीही वैज्ञानिक पद्धती शोधलेली नाही. आपण हे लक्षात ठेवायला हवं की या जगात मानवानेच संस्कृती निर्माण केल्या आहेत आणि त्याचे अस्तित्व अनिवार्यपणे मानवी समूहांच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. मानव समूहाच्या पलीकडे निसर्गात ते आपल्याला सापडत नाही. दगड, कागद इत्यादींवर कोरली गेलेली संस्कृतीची स्मृतिचिन्हे सापडतील. मात्र या संस्कृतींची समग्रता नेहमीच स्मृतीचिन्हातून मागे ठेवलेल्या धारणांच्या बाहेर असते.
संस्कृतींमधील वैविध्य नष्ट करून सांस्कृतिक एकरूपता आणण्याचा संकल्पच नव्या शतकातील विचारधारेने केला आहे. संस्कृतीचा विकास आणि तिचे नष्ट होणे ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे असे मांडता येईल. ठीक आहे. माणसाने जन्म घेऊन मरण्यासारखंच म्हणू. मग त्यातून असा निष्कर्ष निघू शकतो का की, साठ लाख ज्यूंची हत्या करणारे हिटलरचे होलोकॉस्ट स्वीकारार्ह आहे? नवे शतक जागतिकीकरणाचा शुभसंदेश घेऊन आले आहे. एका अर्थाने ते ‘संस्कृतींचे होलोकॉस्ट’ आहे. या प्रक्रियांवर आधारलेली, आण्विक शस्त्रास्त्रांनी लगडलेली आणि विरोधात्मक स्पर्धेच्या मानदंडांनी निर्मिलेल्या मानवी संबंधांवर आधारित ही एकमात्र जागतिक संस्कृती असेल. मग तिला आत्महत्येपासून कोण थांबवू शकेल. तिच्या आत्महत्येनंतर अशी कोणतीही जागा राहणार नाही की, उरलासुरला जिवंत माणूस पुन्हा एक संस्कृती निर्माण करू शकेल.
ईर्ष्या आणि लोभ
आपला विषय आहे एकविसावे शतक आणि आतापर्यंत आपण चर्चा करत आहोत, सरत्या शतकाची मूल्ये, संस्था आणि प्रवृत्तीची. आपण जो विचार करतो, जे साध्य करू इच्छितो आणि जी कृती करतो, त्यांच्यामुळे घटनांचे सातत्य टिकून राहते. त्याहीपेक्षा समाजामध्ये मूल्यभान किती व्यापक आहे, यावर सातत्य अधिक निश्चित होते. बाकी शतक, कालखंड वगैरे हे मानवाद्वारा आरोपीत केलेले आहेत. विसाव्या शतकाप्रमाणेच २१व्या शतकातसुद्धा जगाचे वाईट घडण्याची सर्वाधिक शक्यता अर्थशास्त्रामुळे आहे आणि खरं तर त्याला शास्त्र म्हणून मान्यताही नाही. विश्वाचे वस्तुनिष्ठ अवलोकन, अभ्यासाच्या विषयाचे विश्लेषण आणि त्याच्या विविध बदलणाऱ्या संबंधांना नियमबद्ध करणे, हे विज्ञानाचे आधार असतात. वस्तूच्या गुणांच्या वैशिष्ट्यांवर आधारलेल्या नियमांचे संभाव्य परिणाम वर्तवले जातात. ते वस्तूचे गुण असतात. उदाहरणार्थ, पदार्थात शैथिल्याचा किंवा सुस्तीचा गुण हा बाहेरून लावता येत नाही. याच्या उलट मानवी कृतीचा पाया हा लोभ आणि ईर्ष्या आहे, यास अर्थशास्त्र मान्यता देते.
एवढेच नाही तर माणसास आर्थिक मानव मानले जाऊन त्याचे वरील गुण आदर्श मानले जातात. प्रत्येक व्यक्तीने लोभ आणि इर्षा या आदर्श गुणांच्या आधारावर व्यवहार करावा अशी अपेक्षा केली जाते. मात्र या उलट दया, प्रेम परोपकार आधी गुणांनीसुद्धा मानवी जीवन कार्य करत असते, ही वस्तुस्थिती आहे. अनेक आदिवासी समाजात शौर्य, बलिदान आणि लोकांना संपत्ती वाटण्यात, खायला-प्यायला घालण्यात प्रतिष्ठा असते.
भांडवलदारी समाजाने अंगीकारलेल्या आदर्शांना अर्थशास्त्र ‘मनुष्य-स्वभाव’ मानते आणि त्या आधारावर समाजाची इमारत निर्माण करू इच्छिते. परस्पर संबंधांच्या आधारावर, ईर्ष्या आणि लोभ नसलेल्या समाजात, लोकांनी ईर्ष्या आणि लोभाला आदर्श मानून व्यवहार करावा, असेच प्रयत्न केले जातात.
सध्या समाजशास्त्रज्ञ समाजाला समुदायभावावर आधारित आणि व्यक्तिनिष्ठ या श्रेणीमध्ये विभाजित करत आहे. विकासासाठी दुसऱ्या म्हणजे व्यक्तीनिष्ठ पद्धतीत समाजाचे परिवर्तन व्हायला हवे, असे मानले जाते. म्हणजे सगेसोयरे यांच्या संबंधातून मनुष्याने मुक्त होऊन शुद्ध रूपाने आपले हेतू साधू शकेल, अशा समाजाकडे जायचे आहे. अशा प्रकारे अर्थशास्त्र विवरणात्मक न राहता आदेशात्मक अनुशासन बनलेले आहे.
औद्योगिक भांडवलशाहीच्या मूल्यांना मानवी स्वभावाचे पायाभूत गुण मानून अर्थशास्त्राची पूर्ण चौकट तयार होत आहे. ‘स्मॉल इज ब्युटीफूल’ या शूमाकर यांच्या पुस्तकात मांडलेले मेनार्ड केन्स यांचे विचार लक्षणीय आहेत. केन्स मान्य करतात की, लोभ आणि ईर्ष्या नष्ट व्हायला हवेत. मात्र ते पुढे असेही म्हणतात की, पुढची शंभर वर्षे मानवाच्या विकासासाठी ते टिकून राहणे गरजेचे आहे. त्यानंतर जीवनात उच्च आदर्श परत येतील.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
केन्स यांनी हे मांडून जवळजवळ दोन तृतीयांश काळ उलटून गेला आहे. मात्र लोकांच्या जीवनावरील लोभ आणि ईर्ष्येची पकड वाढत जात आहे. यादरम्यान लोभ आणि विरोधकांवर मात करण्याच्या ईर्ष्येने एक भीषण युद्ध होऊन गेले आणि छोट्या-मोठ्या स्थानिक युद्धांमध्ये जग होरपळून निघत आहे. ती युद्धे कांगोमधील हिऱ्यांसाठी असतात, आखाती देशातील तेलासाठी असतात किंवा कोलंबियातील मादक पदार्थांच्या बेकायदेशीर व्यापारासाठी असतात. यातून निर्माण होणाऱ्या विषमतेतून ईर्ष्या आणि लोभ अधिकाधिक वाढत जाणार आहे.
आज तरी याच स्वार्थाला केंद्र मानून वस्तूंचे उत्पादन आणि विनिमय होत असते. वस्तूंची विक्री वाढावी म्हणून विविध प्रकारच्या आकर्षक जाहिराती रेडिओ, टीव्ही आणि वर्तमानपत्रांतून येत असतात. इंग्रजीत सैतानाला शब्द आहे- ‘टेम्परर’. ज्याचा अर्थ आहे ‘मोहक’. जाहिरातींच्या मागे मोहक (सैतान)चा हात स्पष्ट दिसत नाही का? सहसा जाहिराती या असत्यावर आधारित असतात. या जाहिरातीत दारू, सिगरेट आणि यासारख्या मानवी स्वातंत्र्य आणि विवेक नष्ट करणाऱ्या वस्तूंना प्राधान्य असते. या मोहक जाहिराती मानवी संस्कृतीच्या आधार बनल्या आहेत, असं सर्वत्र डोळे उघडे ठेवून पाहिल्यावर लक्षात येईल.
जगातील सर्व समाजमाध्यमे जाहिरातींना आपला दरवाजा ओलांडून अंथरुणापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत. ई-कॉमर्स तर हेच करते. महात्मा गांधींनी पाश्चात्त्य संस्कृतीला ‘सैतानी संस्कृती’ म्हटले, तेव्हा निश्चितपणे त्यांच्यासमोर संस्कृतीचे हे चित्र डोळ्यासमोर असेल. गांधीजींनी सांगितले आहे की, जगातील सर्व मानवांच्या गरजा पूर्ण करायला पुरेशा वस्तू आहेत, मात्र एका माणसाची लालसा पूर्ण करायला पृथ्वी असमर्थ आहे.
ही गोष्ट आता जागतिकीकरणाच्या काळात स्पष्टपणे दिसत आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या एकमेकांना ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात असल्याच्या प्रमुख बातम्या औद्योगिक क्षेत्रात असतात. यातील अनेक कंपन्यांची स्थिती अनेक देशांच्या राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा जास्त असते. लाखो करोडो डॉलरच्या या महाकाय कंपन्या समाधानी नसतात. त्यांची इतर कंपन्यांना गिळण्याची लालसा कमी होत नाही. त्यांच्यातल्या एका कंपनीने इतर सगळ्या कंपन्या गिळंकृत केल्या, तरीही अधिक वाढायचा त्यांचा मोह कधीच कमी होणार नाही. भावी काळात उपरोक्त वर्णन केलेल्या आकांक्षांच्या पृष्ठभूमीवर नवे शतक आकाराला येईल, हे स्पष्ट आहे.
संपत्तीच्या कल्पनेपलीकडील केंद्रीकरणामुळे निर्धन आणि किमान मानवी जीवनापासून वंचित होत असलेल्या जनसमूहांना वरील शक्तीविरुद्ध जागृत करणे, हे नव्या शतकातील आव्हान असेल. या आधारावर समाज एका सम्यक पायावर उभा राहील, अशा नवीन मूल्यांची स्थापना करण्याचा प्रयत्न करावा लागेल.
आर्थिक केंद्रीकरणाच्या प्रक्रियेचे परिणाम संपन्न औद्योगिक देश आणि जगातले इतर देश यामध्ये वेगवेगळ्या आहेत, हे आज आपल्याला समजत आहे. महाकाय कंपन्यांची एकमेकांशी स्पर्धा अधिकाधिक तीव्र होत जाईल, हा भांडवलशाहीचा अध्याहृत नियम आहे. त्याचा परिणाम म्हणजे सर्व संस्था मजुरांवरील खर्च कमी करण्यासाठी स्वयंचलित यंत्रे किंवा संगणकीकरण करून मजुरांची संख्या कमी करतील. श्रमशक्ती कमी करत नेणे, हा औद्योगिक संस्था संपादन करण्याचा उद्देश आहे. स्पर्धेत न टिकणारे उद्योग बंद होत असल्याने त्यांचे कामगार बेरोजगार होत आहेत. युरोपातील जवळजवळ सगळ्या देशातील श्रमशक्तीचा एक भाग कायम बेरोजगार राहत असतो. जपानमध्ये पूर्वी बेरोजगारी नव्हती, सध्या जपानला मंदी आणि बेरोजगारीने घेरले आहे. दिवसेंदिवस हे संकट अधिकाधिक गंभीर होत जाणार आहे. तिकडच्या अर्थव्यवस्थांवर दिवसेंदिवस बेरोजगार लोकांचा दबाव वाढत जाणार आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
लोकसंख्या कमी होणे हा औद्योगिक विकासाचा एक पैलू आहे. त्यामुळे संपन्न औद्योगिक देशातील लोकसंख्येमध्ये वृद्धांचे प्रमाण वाढत जाईल आणि काम करण्यास योग्य असणाऱ्या तरुण श्रमिकांची कमतरता होईल. शेवटी बाहेरून मजुरांना आणले जाईल जे रंगीत आणि गैर युरोपीय समाजातील असतील. बाहेरून येणाऱ्या लोकांच्या विरोधात रंगभेदांवर आधारित फॅसिस्ट हिंसा वाढेल. युरोपातील अधिकांश देशात ही स्थिती प्रत्यक्ष किंवा अप्रकट रूपात अस्तित्वात आहे.
जोपर्यंत आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या या देशांचा औद्योगीकरण नसलेल्या देशांशी व्यापार सुरू आहे आणि औद्योगीकरण नसलेल्या देशांना आपल्या कच्च्या मालाचे आणि काही प्रमाणात बाजाराचे एक क्षेत्र उपलब्ध आहे, तोपर्यंत हे संपन्न देश आपल्या अर्थव्यवस्थेवरील दबाव सहन करू शकतील. या व्यापारी संबंधातून मागास अर्थव्यवस्थांना मानवी पातळीवरील जीवन उपलब्ध झाले, तरच हे शक्य होईल. मात्र संपन्न आणि मागास अर्थव्यवस्थांच्या नात्यातून असे होणे संभवत नाही.
श्रीमंत देशाने श्रीमंत होणे आणि गरीब देशांनी आपले दिवाळी निघेपर्यंत दरिद्री होणे, हे या नात्यांमध्ये अध्याहृत आहे. यातून संघर्षाची परिस्थिती निर्माण होईल. पाश्चिमात्य देशांची सतत प्रभावी होत जाणारी युद्धनीती कृतीत उतरेल. अमेरिकेने ‘मिसाईल डिफेन्स शील्ड’ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘बॅलन्स ऑफ टेरर’ म्हणजे परस्परांच्या दहशतीतून निर्माण होणाऱ्या अणूयुद्धाची शक्यता टाळणे, असे म्हणायला हवे.
आता परत ही शक्यता आहे, मात्र योद्धा एकच आहे, अमेरिका. इराकने कुवेतवर हल्ला केल्यानंतर तेलाच्या पुरवठ्यात संकट येत आहे असं आढळल्यावर ही युद्धनीती किती वेगाने काम करते ते दिसून आले आहे. आता अमेरिकेने व्हिएतनांमध्ये जमिनीवरून सैनिक पाठवून हस्तक्षेप केल्यासारखे नसेल. आता हल्ले कसे असतील याचा अंदाज युगोस्लावमध्ये नाटोने केलेल्या हस्तक्षेपावरून करता येईल. जीवनोपयोगी सगळी साधने आकाशातूनच नष्ट करून त्या देशाला गुडघे टेकून शरणागतीसाठी अगतिक करता येते. मात्र नैसर्गिक संसाधने मर्यादित असल्याने जबरदस्तीने प्राप्त झालेला पुरवठासुद्धा शेवटी समाप्त होतो.
सामूहिकता व परस्परावलंबन हाच मार्ग
मात्र औद्योगिक देशांनी दुसरा मार्ग अवलंबण्याचीसुद्धा शक्यता असू शकते. जीवनाच्या अखेरच्या स्थितीला आल्यावर ही शक्यता निर्माण होऊ शकते. पाश्चिमात्य देशांनी उच्च दर्जाचे तंत्रविज्ञान विकसित करण्याच्या प्रक्रियेतील एक प्रकारची बौद्धिक लवचीकता संपादन केली आहे. हीच लवचीकता व्यापारी वृत्तीच्या बंधनातून मुक्त होऊन अस्तित्व रक्षणाच्या कर्तव्य भावनेने काम करू शकते. काळ पुढे जाईल तसा औद्योगिक विकास होईल, पर्यावरणाचा ऱ्हास होईल आणि नैसर्गिक संसाधनांची मर्यादा स्पष्टपणे जाणवू लागेल.
सध्या पश्चिमेचे पर्यावरणतज्ञ अंदाज करत आहे की, एकविसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत दोन ते सहा सेल्सिअसने विश्वाचे तापमान वाढेल. यातून अनेक प्रकारची नैसर्गिक संकट येतील जी पश्चिमी देशांना सुद्धा कवेत घेतील. प्रदूषणाची पातळी वाढल्याने जीवन कठीण होईल. अर्धशतक पार करत असतानाच संसाधनांच्या अभावातून उच्च दर्जाची जीवनशैली सांभाळणे कठीण होऊन जाईल. यातून ‘ग्रीन पीस’सारख्या आंदोलनांना पाठबळ मिळेल. याशिवाय सध्याच्या औद्योगिक आणि व्यापारी व्यवस्थेत स्पर्धा वाढल्याने जीवनात तणाव निर्माण होईल.
ही स्पर्धा फक्त व्यापार क्षेत्रात नसेल तर समाजातील कष्टकरी आणि व्यवस्थापकांमध्येसुद्धा रोजगारात शिरकाव आणि पुढे जाण्यासाठी स्पर्धा असेल. जीवनातील अशा स्थितीने सांसारिक जीवन नष्ट होईल. युरोपातील काही देशांमध्ये सध्या स्त्री-पुरुष संबंध हे तात्पुरते करार आहेत. एका पाहणीनुसार अमेरिकेतील एक तृतीयांश मुले ही विवाहबाह्य संबंधातून जन्म घेतात. याचा एक परिणाम असा होईल की, संपत्ती, पैसा आणि साक्षात जीवन अर्थहीन वाटू लागेल.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात औद्योगिक संस्कृतीच्या प्रभावातून अस्तित्ववादी विचारसरणीचा उदय झाला. यामध्ये जीवन आणि मूल्यांच्या अर्थहीनतेमुळे चिंता ही कायमस्वरूपी जीवनाची स्थिती वाटू लागली. त्या काळात ही भावना अति संवेदनशील विचारवंत आणि कलाकारांपुरती मर्यादित होती.
सध्या वर्तमान स्थितीत निर्माण झालेला ‘निहीलिझम’ (सर्व मूल्यांना नाकारणारा) अधिक व्यापक असेल. त्याची अभिव्यक्ती हिंसक फॅसिझम आणि युद्धात होऊ शकते. याच फॅसिझमच्या मागील अनुभवांच्या संदर्भात हा मार्ग अधिकांश जनतेला मान्य होणार नाही. यातून बाहेर पडायच्या दुसरा मार्ग अस्तित्ववादी विचारवंत कार्ल यास्पर्स यांनी सांगितला होता. समुदाय, मैत्री, विवाह यांसारख्या बंधनाद्वारा दुसऱ्या व्यक्तींची संबंध जुळवणे. यातून परिस्थितीचे संक्रमण होऊ शकते.
एकंदरीत हा समुदायाकडे परत जाण्याचा रस्ता आहे. गेल्या शतकात माणूस यापासून दूर गेला होता. वर्तमान जीवनाच्या संदर्भात एक प्रकारे कोणत्या तरी रूपातल्या समाजवादी पद्धतीकडे परत जाणे आहे. मात्र हे सर्व बाकी जगासोबतच्या संबंधांच्या नव्या नियमांशिवाय होऊ शकणार नाही. त्यांना सर्व जगाशी व्यापारी बंधनांपेक्षा मानवी नात्यांनी जोडावे लागेल. तेच त्यांच्या, आपल्या आणि जगाच्या हिताचे असेल.
पश्चिमेच्या विकासाचा गैर औद्योगिक विश्वावरील परिणाम हा आतापर्यंत विघटनकारीच राहिला आहे आणि पुढील काळात तो अधिकच विघटनकारी होण्याची शक्यता आहे. पश्चिमी देशांच्या संपर्कात आल्यानंतर या देशातील पारंपारिक उत्पादन आणि वितरण व्यवस्था, तसेच परस्परावलंबी जीवनपद्धती आणि संस्कृती नष्ट झाली आहे. या देशांचे जीवन पूर्णपणे पश्चिमी देशांचे आश्रीत बनले आहे. पश्चिमी देशातून आयात केलेल्या उद्योगांची केंद्रे या देशांमध्ये सुरू झाली आहेत.
पूर्वी गृह उद्योगातून निर्माण होणाऱ्या वस्तूंचे या केंद्रांमधून उत्पादन होत होते. नवीन उद्योगांच्या प्रचंड जाहिरात क्षमतेमुळे गुणवत्तेच्या दृष्टीने खूप चांगल्या असणाऱ्या गृह उद्योगांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या प्रक्रियेतून पारंपरिक उद्योग आणि छोटी शेती नष्ट होत आहे. लोक कामाच्या शोधात शहरांकडे जात आहेत. त्यामुळे गावे शहरांमध्ये आणि शहरे महानगरात रूपांतरित होत आहेत.
मेक्सिको, शांघाय, दिल्ली, मुंबई ही शहरे अल्पावधीत जगाच्या सर्वांत मोठ्या महानगरांच्या श्रेणीत आली आहेत. या शहरांमध्ये उद्योग आणि व्यवस्थेचे मध्यवर्ती क्षेत्र असते, जिथे रचनात्मक नियोजन असते. याच्या परिघावरील विशाल क्षेत्रात राहणारे लोक हे कायमच्या उत्पन्नाच्या स्त्रोतापासून वंचित असतात आणि मध्यवर्ती क्षेत्राच्या तात्कालीन गरजा पूर्ण करण्यासाठी अकुशल कामांमध्ये वापरले जातात. हे काम करणाऱ्या लोकांच्या मूलभूत मानवी गरजा पूर्ण करणे हे व्यवस्थेच्या कामाच्या यादीत नसते. जगण्यासाठी काहीही करून त्यांना स्वतःची व्यवस्था स्वतःच तयार करावी लागते.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
हे लोक जेथे जागा मिळेल तिकडे झोपड्या उभ्या करतात. गलिच्छ वस्तीत जागा असेल तर तेथे किंवा फुटपाथवर राहू लागतात. या लोकांना अत्यावश्यक सेवा पुरवावी, यासाठी शहरातील सुखी संपन्न लोक आग्रही असतात मात्र त्यांच्या उपस्थितीचा त्यांना त्रास होतो, थोडी दहशतही वाटते.
या गरिबांसाठी पाणी, शौचालय आदि किमान गरजांची व्यवस्था करावी असे शहरातील अभिजनांना वाटत नाही त्यामुळे गरिबांच्या जीवनासोबत गलीच्छपणा अनिवार्यपणे जोडला जातो. या शहरांच्या व्यवस्थेत बुलडोझरची फौज असते. ही फौज झोपडपट्ट्या तोडून, जुन्या वस्तू फेकून द्याव्यात, तसे लोकांना शहराच्या बाहेर काढत असते.
सत् व असत् यांतील सनातन द्वंद्व
हा विजोडपणा दिवसेंदिवस वाढत जाईल. त्यामुळे विभागीय विषमता आणि फुटीरतावाद वाढत जात आहे. जगातल्या सर्व मागास अर्थव्यवस्थांमध्ये अशा शक्तींचा प्रसार झाल्याचे दिसून येत आहे. यातून निर्माण होणाऱ्या विघटनकारी स्थितीला प्रस्थापित मूल्य संकल्पनांनी नष्ट करता येणार नाही. विश्व नव्या मूल्यांच्या निर्मितीतून आपल्या संकटावर उपाय शोधत असते. बौद्ध, ख्रिश्चन किंवा इस्लाम धर्म ही त्याची उदाहरणे आहेत. मात्र मानवाच्या मूल्य संकल्पना आपल्या आंतरिक दंद्वापासून कधीच मुक्त होत नाहीत.
मानवी व्यवहारांचा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांनी मांडले आहे की, मानवामध्ये परमार्थ आणि आक्रमकता या दोन्ही परस्परविरोधी प्रवृत्ती कायम कार्यरत असतात. यातील आक्रमकता तात्काळ आणि स्वयंस्फूर्तीने कार्यरत होते. धर्मचिंतकांनी या अंतर्विरोधाला भगवान आणि सैतान, दैवी आणि पाशवी शक्तींच्या रूपात प्रस्तुत केले. महात्मा गांधींनी याच अर्थाने गीतेतील कृष्ण-अर्जुन संवादाला ऐतिहासिक घटनेच्या बदली मानवी मनात निर्माण झालेल्या प्रतिकूल प्रवृत्तीच्या दंद्वांच्या रूपात मांडण्याचा प्रयत्न केला होता. सनातन काळापासून मानवाचा हा गुण बदलेला नाही. संस्कृती आपल्या मूल्यांप्रमाणे यातील एका दुसऱ्यास प्रोत्साहन देत राहिली आहेत. मात्र हे द्वंद्व चिरंतन आहे.
इंग्रज कवी टी. एस. एलियट याने आपल्या कवितेत म्हटले आहे-
‘विश्व फिरत असते विश्व बदलत असते
मात्र एक गोष्ट बदलली नाही
अनेक वर्षातील जीवनाच्या अनुभवातील एक गोष्ट बदलली नाही
कितीही झाकला तरी बदलला नाही
चांगुलपणा आणि वाईट यातील अंतहीन संघर्ष… ’
उद्याचा समाज कसा असेल याचे अंदाज करण्यात काही अर्थ नाही. चांगुलपणा आणि वाईट यातील संघर्षात आपली बाजू निवडून विनाशाच्या कडेलोटावर पोचलेल्या जगाला आपण पूर्ण ताकदीनिशी वाचवू शकतो. यातील सैतानाची बाजू कोणती हे समजायला कठीण नाही. लोभ आणि ईर्ष्येमध्ये विकासाचे मर्म बघणारी पूर्ण अर्थव्यवस्था हाच सैतानाचा चमत्कार आहे. इतिहासात पूर्वी घडल्याप्रमाणेच आजच्या काळात याच्या विरोधात द्वेष आणि हिंसेला हत्यार बनवले गेल्याने सैतानाचा अंतिम विजय हा त्याचा स्वाभाविक परिणाम आहे.
विसाव्या शतकात याच्या विरोधात महात्मा गांधींनी अहिंसा आणि विरोधकाशीसुद्धा प्रेम हे हत्यार दिले होते. हे हत्यार सैतानाच्या शक्तीला अंतिमतः निष्प्रभ करू शकते. लोभी भांडवलदार आणि जमीनदारांच्या विरोधात दलित किंवा मजूर वर्गाच्या लालसेला प्रोत्साहन देऊन चांगला समाज घडविता येत नाही. बर्ट्रांड रसेल यांनी १९१८मध्ये रशियातील प्रवासानंतर ‘प्रॅक्टिस अँड थेअरी ऑफ बोल्शेविझम’ हे पुस्तक लिहिले. त्यामध्ये लेनिन सोबत झालेल्या मुलाखतीचा तपशील दिला आहे. लेनिनने त्यांना म्हटले की, शेतकऱ्यांमध्ये जमीन मिळवण्याचा लोभ निर्माण करणे त्याच्यासाठी आवश्यक होते. त्यानंतर स्वतः शेतकरीच जमीन मालकांना जवळच्या झाडावर लटकवून फाशी देऊ लागले. ही घृणा आणि लोभ शेवटी सोव्हिएत शासनाच्या कठोर हुकूमशाहीमध्ये व्यक्त झाला. आजच्या शोषित जनतेला समता आणि बंधुत्वाच्या विचारांनी पुन्हा प्रशिक्षित करावे लागेल, अन्यथा शोषणाची नवी केंद्रे तयार होतील. नव्या शतकातील समाज कसा असेल, हे या आव्हानांना आपण किती प्रामाणिकपणे स्वीकारतोय यावरून ठरेल.
‘सर्वंकष’ या त्रैमासिकाच्या जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर २०२२च्या अंकातून साभार
(‘भूमंडलीकरण की चुनौतीयाँ’ या पुस्तकात हा लेख समाविष्ट केलेला आहे. प्रकाशन साल - २००३, वाणी प्रकाशन, नवी दिल्ली.)
अनुवाद : विजय तांबे | vtambe@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment