१४ डिसेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात जन्माला आलेले सुनील मनोहर देशमुख यांनी अमेरिकेतील मायामी बीचवर ४ जानेवारी २०२३ रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांना ७५ वर्षांचे आयुष्य लाभले. १९७०मध्ये ते मुंबई येथून केमिकल इंजिनियर होऊन अमेरिकेत गेले, तेव्हा २३ वर्षांचे होते. त्यानंतरची ५२ वर्षे त्यांचे वास्तव्य अमेरिकेत होते. मात्र दर वर्षी एकदा किंवा दोनदा ते भारतात येऊन जात होते, प्रत्येक वेळी दोन ते चार आठवड्यांसाठी. म्हणजे अर्धशतकात मिळून पाऊणशे ते शंभर वेळा त्यांनी भारताला भेट दिली असावी. मात्र तरीही भारतात काय घडते आहे आणि त्यातही महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक वर्तुळात काय उलथापालथी होत आहेत, याची त्यांना चांगलीच माहिती असायची. इतकी की, इथे वास्तव्य करणाऱ्यांनाही ती माहिती काही वेळा चकित करून जायची.
अमेरिकेत गेल्यावर सुनील देशमुख यांनी कायदा आणि एमबीए या दोन्ही पदव्या घेतल्या आणि उद्योगक्षेत्रात, वायदेबाजारात दोन अडीच दशके काम केले. त्या काळात त्यांनी अमेरिकेला पूर्णतः स्वीकारले. मात्र या संपूर्ण काळातही महाराष्ट्रापासून ते मनाने किंचितही तुटले नाहीत. वयाच्या ४८व्या वर्षी कौटुंबिक व व्यावसायिक जीवनात स्थिरस्थावर झाले असताना त्यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे, त्यांच्या आयुष्याला वेगळे प्रयोजन मिळाले आणि महाराष्ट्राच्या साहित्य व सामाजिक क्षेत्रांतील अभिक्रियांना एक उत्प्रेरक मिळाला.
रसायनशास्त्रात ‘उत्प्रेरक’ (कॅटलिस्ट) हा खूप महत्त्वाचा घटक मानला जातो. जो पदार्थ रासायनिक अभिक्रिया घडवून आणण्यासाठी मदत करतो, मात्र तिच्यात सहभागी होत नाही किंवा निमित्तमात्र सहभागी होतो आणि अभिक्रिया घडवून आणली की बाहेर पडतो, त्या पदार्थाला ‘उत्प्रेरक’ असे म्हटले जाते. सुनील देशमुख यांनी मागील २८ वर्षांत जी भूमिका निभावली ती पाहता, त्यांना महाराष्ट्राच्या सामाजिक व साहित्यिक क्षेत्रांतील ‘कॅटलिस्ट’ संबोधने योग्य ठरेल.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
वस्तुतः अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी १९७८मध्ये स्थापन केलेल्या ‘महाराष्ट्र फाउंडेशन’ (अमेरिका) या संस्थेच्या संस्थापक सदस्यांमध्ये सुनील देशमुख हे एक महत्त्वाचे नाव होते. आणि त्या फाउंडेशनमार्फत होणाऱ्या विविध सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक उपक्रमांमध्ये ते सहभागी होत होते. मात्र १९९४मध्ये त्यांनी ‘महाराष्ट्र फाउंडेशन’ला एक कोटी रुपयांची देणगी दिली आणि फाउंडेशनमार्फत मराठी साहित्य पुरस्कार दर वर्षी देता यावेत, याची पायाभरणी केली. त्यानंतर दोन वर्षांनी १९९६मध्ये त्यांनी आणखी एक कोटी रुपयांची देणगी देऊन महाराष्ट्रातील समाजकार्य पुरस्कार योजना सुरू केली. तेव्हापासून दर वर्षी ९ ते ११ या प्रमाणात पुरस्कार प्रदान केले जाऊ लागले. त्यामुळे आतापर्यंतच्या २८ वर्षांत दिल्या गेलेल्या एकूण पुरस्कारांची संख्या ३५० इतकी आहे. या सर्व पुरस्कारांच्या प्रकारांवर, ते दिले गेले त्यांच्या नावांवर, त्यासाठी नियुक्त्या केलेल्या निवडसमित्या सदस्यांच्या व अध्यक्षांच्या नावांवर, आणि ते समारंभ प्रदान करण्यासाठी निमंत्रित केलेल्या पाहुण्यांच्या नावांवर नजर टाकली, तर कोणीही मराठी माणूस अचंबित झाल्याशिवाय राहणार नाही. इतकी विविधता, गुणवत्ता आणि उंची असलेली ती माणसे होती आणि आहेत. वरवर पाहिले तर भव्य असा पुरस्कार वितरण समारंभ तेवढा दिसतो, मात्र ते हिमनगाचे टोक असते. या प्रक्रियेचा खूप मोठा भाग जवळपास अदृश्य असतो. कारण ती प्रक्रिया नऊ महिने चालत असते.
साहित्यामध्ये साहित्य जीवनगौरव, ग्रंथ पुरस्कार (ललित, वैचारिक, अपारंपारिक), वाङ्मयप्रकार पुरस्कार (कविता, कथा, कादंबरी, बालसाहित्य, अनुवाद), नाट्यलेखन पुरस्कार, प्रकाशन संस्थांना पुरस्कार, नियतकालिकांना पुरस्कार इत्यादी प्रकार आहेत. समाजकार्यामध्ये जीवनगौरव (व्यक्ती व संस्था), कार्यकर्ता पुरस्कार (प्रबोधन, रचना, संघर्ष), विशेष कार्य पुरस्कार, युवा पुरस्कार इत्यादी प्रकार आहेत. त्यातही पर्यावरण, शिक्षण, महिला, भटके विमुक्त, आदिवासी, असे वर्गीकरण आहे. ही सर्व विविधता अचंबित करणारी आहे. साहित्य व समाजकार्य या दोन्ही क्षेत्रांत मिळून ३५० पुरस्कार दिले गेले आहेत. या पुरस्कारांची रक्कम २५ हजार, ५० हजार, एक लाख, दोन लाख रुपये अशी राहिली आहे. महाराष्ट्रात अन्य कोणत्याही संस्थेने इतके व असे सातत्य दाखवलेले नाही. भारतातील अन्य राज्यांतही असे काम करणाऱ्या संस्था हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच असतील.
दर वर्षी एप्रिल-मे महिन्यात साहित्य व समाजकार्य या दोन्ही प्रकारांतील नऊ ते अकरा पुरस्कार निवडण्यासाठी, तीन-चार निवडसमित्या भारतात नियुक्त केल्या जातात. प्रत्येक समितीत तीन ते पाच सदस्य व एक अध्यक्ष असतो. या निवडसमित्यांच्या प्रत्येकी दोन ते तीन बैठका होतात. त्यासाठी एकूण तीन-चार महिन्यांचा कालावधी घेतला जातो. दरम्यान महाराष्ट्रातील ५००हून अधिक मान्यवरांना पत्र पाठवून शिफारशी मागवल्या जातात. त्या सर्व शिफारशी व निवडसमिती सदस्यांकडून आलेली नावे, शिवाय सर्वांनी एकत्र बसून शोधलेली नावे, यांवर अनेक बाजूंनी चर्चा होते.
निर्विवादपणे पुरोगामी म्हणता येईल असे विचार व कार्य असले पाहिजे, हा पहिला निकष असतो. अर्थातच जात, धर्म, भाषा, प्रांत, लिंग याबाबत संकुचित नसणे किंवा अधिकाधिक उदारमतवादी असणे हा पुरोगामीत्वाचा गाभा मानला जातो. शिवाय त्या-त्या व्यक्तीच्या कामाचा काही एक परिणाम झालेला असला पाहिजे किंवा तशी क्षमता तरी त्या व्यक्तींमध्ये असली पाहिजे, हा प्रधान निकष असतो. ते काम उल्लेखनीय व अनुकरणीय असले पाहिजे, परिवर्तनाला गती देणारे असले पाहिजे हा दुसरा निकष असतो. प्रतिकूल परिस्थितीत व जिथे गरज आहे त्या ठिकाणी व त्या क्षेत्रांत ते काम असले पाहिजे हा तिसरा निकष असतो.
अशा चर्चेनंतर प्रत्येक पुरस्कारासाठी तीन नावे निश्चित करणे, प्रत्येकाच्या संदर्भात निवडसमितीने एक टिपण तयार करणे, त्या-त्या व्यक्तीची पुस्तके किंवा त्यांच्यावर प्रसिद्ध झालेले लेख मिळवणे, त्यांची अन्य माहिती गोळा करणे इत्यादी सर्व जुळवून त्या सर्व म्हणजे साधारणतः ३० व्यक्ती व संस्थांचा परिचय करून देणारा ऐवज अमेरिकेतील निवडसमित्यांकडे पाठवला जातो. तिथे साहित्य व समाजकार्य या दोन्हींसाठी मिळून आठ-दहा सदस्य असतात. त्या सर्व सदस्यांकडून भारतातून आलेल्या प्रत्येक तीन नावांचा विचार केला जातो. त्यासाठी भारतातून पाठवलेला तो ऐवज अभ्यासला जातो आणि मग प्रत्येक तीन नावांतून एका नावावर शिक्कामोर्तब केले जाते. मग ती अंतिम यादी भारतातील संयोजक संस्थेकडे पाठवली जाते, तोपर्यंत ही सर्व नावे गोपनीय ठेवली जातात. त्यानंतर पुरस्कारासाठी निवड झालेल्या व्यक्तींची वा संस्थांची संमती घेतली जाते आणि त्यानंतरच पत्रकार परिषद घेऊन पुरस्कार जाहीर केले जातात. अमेरिकेतील प्रक्रिया दोन महिने तरी चालते.
पुरस्कार जाहीर केल्यानंतर पुढील दोन महिन्यांच्या काळात, पुरस्कार वितरण समारंभ आणि पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या विचारकार्याचा वेध घेणारे लेख किंवा मुलाखती असलेली स्मरणिका/विशेष अंक यांची तयारी होते. प्रत्यक्ष पुरस्कार वितरण समारंभ डिसेंबर जानेवारी महिन्यात पार पाडला जातो, राष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त अशा एक किंवा दोन व्यक्ती प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केल्या जातात. त्या समारंभात सर्व पुरस्कारप्राप्त व्यक्तींची मनोगते व्यक्त होतात. त्याच दरम्यान त्यासंदर्भात माध्यमांतून बातम्या, लेख प्रसिद्ध झालेल्या असतात. शिवाय अनेक लहान-मोठ्या बैठका, स्वागत समारंभ, अनौपचारिक भेटी यांद्वारे चर्चामंथन होत असते.
या सर्व प्रक्रियेत सुनील देशमुख हे प्रत्येक टप्प्यावर सामील असतात. प्रत्येक निवडसमितीची स्वायत्तता जपणे आणि संयोजक संस्थेचा शब्द अंतिम मानणे, हे करत असताना प्रत्येक लहान-मोठे काम आणि प्रत्येक निवड अधिकाधिक चांगली व्हावी यासाठी ते प्रयत्न करतात. स्वतः काही नावे पुढे करतात, पण स्वीकारलीच पाहिजेत असा आग्रह धरत नाहीत. निवडसमिती व संयोजक संस्था यांनी सुचवलेली सर्वच नावे त्यांना पूर्णतः पसंत असतात असे नाही, पण एकूण सर्वांचा कल लक्षात घेऊन त्याला मान्यता देतात.
म्हणजे मागील २८ वर्षांतील सर्व संयोजक संस्था व निवडसमित्या यांना जोपासत आणि आवश्यक तिथे आपला कल स्पष्ट करत पुरस्कारांची कार्यवाही घडवून आणण्यासाठी सुनील देशमुख यांना अनेक आघाड्यांवर सातत्याने लढत राहून तोल सांभाळावा लागत होता. हे सर्व पाहिले तर, त्यांनी दोन कोटी रुपये देणगी देणे हे एका पारड्यात आणि त्यांनी २८ वर्षांत दिलेले हे योगदान दुसऱ्या पारड्यात टाकले तर दुसरे पारडे इतके जड असेल की किंचितही वर उचलले जाणार नाही.
सुनील देशमुख यांनी जानेवारी २०१९मध्ये सदा डुम्बरे व विनोद शिरसाठ यांना दिलेल्या व्हिडिओ मुलाखतीत असे म्हटले आहे की, ‘मी ‘लिधो-दिधो’ धंद्यात होतो. त्यामुळे केलेल्या गुंतवणुकीतून प्रचंड परतावा मिळावा असाच माझा प्रयत्न इथेही होता.’ म्हणजे ‘महाराष्ट्र फाउंडेशन’ पुरस्कार योजनेत पैसा, वेळ, उर्जा यांची त्यांनी जी गुंतवणूक केली, ते पाहता- त्यातून प्रचंड परतावा मिळवण्याचा तो उपक्रम होता असेच म्हणावे लागते. तसे पाहता, दोन कोटी रुपये रक्कम आता काय आणि त्या वेळी काय व्यक्तीच्या दृष्टीने मोठी असली तरी संस्थात्मक कामाच्या दृष्टीने ती खूपच लहान रक्कम होती आणि आहे. त्यामुळे ते दोन कोटी रुपये दिले आणि त्यातून हे पुरस्कार चालू राहिले किंवा ठेवले हे अंशत:च खरे आहे.
सुनील देशमुख यांनी दोन कोटी रुपये ही प्रारंभीची गुंतवणूक केली, ते केवळ भागभांडवल होते आणि नंतर २८ वर्षे त्यांनी स्वतःचा वेळ, ऊर्जा, बुद्धी यांची जी गुंतवणूक केली, तिचे मूल्य शेकडो कोटी रुपयांमध्ये मोजावे लागेल. अन्यथा दोन कोटी रुपये देणारे पूर्वीही कमी नव्हते आणि आजही कमी नाहीत. पण असे दोन कोटी रुपये देऊन असे पुरस्कार या पद्धतीने व या प्रकारे देऊन इतके परिणामकारक काम करता येणार नाही.
त्यामुळे एका उद्योजकाने पैसे कमावून हे पुरस्कार दिले, असे कोणी म्हणत असेल तर ती शुद्ध फसवणूक आहे. एवढेच नाही तर, असे कोणी तरी दोन कोटी रुपयांच्या व्याजातून रक्कम आपल्याला देते आहे म्हणून त्या बळावर पुरस्कार निवड व वितरण कार्यवाही घडवून आणण्यासाठी ‘केशव गोरे स्मारक ट्रस्ट’, ‘लोकवाङ्मय गृह’, ‘साधना ट्रस्ट’ आणि ‘मासूम’ या पुरोगामी संस्था त्यांच्यामागे धावणार नाहीत. चारही संस्थांच्या पूर्वीच्या व आताच्या चालकांइतकेच किंबहुना काही बाबतीत अधिक पुरोगामी वर्तन व व्यवहार आणि पक्की विचारनिष्ठा सुनील देशमुख यांच्याकडे होती; म्हणूनच या सर्व संस्था त्यांच्या कार्यात सहभागी होऊ शकल्या. किंबहुना सुनील देशमुख यांच्या कर्तृत्वाचा उत्कर्ष बिंदू दाखवायचा असेल तर तो हाच आहे की, अशा चार संस्थांना संयोजक बनवून, याशिवाय काही लहान-मोठ्या संस्था संघटना यांची मदत त्या-त्या वेळी घेऊन, अनेक माध्यमसंस्थांचे सहकार्य मिळवून, कित्येक साहित्यिक व कार्यकर्ते यांचा सहभाग वाढवून, इतका दीर्घकाळ त्यांनी ही प्रक्रिया राबवली.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
खरे तर सुनील देशमुख यांचे सर्वोच्च कर्तृत्व हे आहे. त्या दृष्टीने ‘सामाजिक उद्योजक’ हेच नामाभिधान त्यांना योग्य ठरेल. अशी उदाहरणे मराठी मातीत दुर्मीळ आहेत.
या निमित्ताने हेही स्पष्ट केले पाहिजे की, ‘महाराष्ट्र फाउंडेशनच्या या पुरस्कार प्रदानप्रक्रियेत चिक्कार पैसा अमेरिकेतून येतो’, असा एक भलताच गैरसमज अगदी सुरुवातीपासून काही लोकांच्या मनात बळावलेला आहे. सांगोवांगी गोष्टींवरून तो तयार झालेला आहे. वस्तुस्थिती मात्र अजिबात तशी नाही. वस्तुस्थिती अशी आहे की, दोन कोटी रुपयांच्या व्याजातून पूर्वीपासून आत्तापर्यंत दर वर्षी सरासरी १५ लाख रुपये इतकेच व्याज मिळत आले आहे. आणि त्या रकमेतील अर्धी रक्कम दहा-अकरा पुरस्कारप्राप्त व्यक्तींना थेट दिली जाते, तर उर्वरित अर्ध्या रकमेतून स्मरणिका किंवा विशेष अंक आणि पुरस्कार वितरण समारंभ यासाठीचा खर्च होतो. यातून कोणत्याही संयोजक संस्थेला काहीही आर्थिक फायदा होत नसतो. उलट त्यांची स्वतःची वेळ, उर्जा, मनुष्यबळ हे जवळपास मोफत त्या कामी खर्च होत असते.
संयोजक संस्थेला फायदा होतो तो वेगळा. अशा कार्यात सहभागी होण्यामुळे प्रतिष्ठा वाढते, स्वतःच्या कार्याचा व संस्थेचा परिघ वाढवण्यासाठी मदत होऊ शकते, अन्य अनेक व्यक्ती- संस्था- संघटना यांच्याशी बंध अधिक घट्ट होतात, नव्या व्यक्ती- संस्था- संघटना जोडल्या जातात. हे ‘बायप्रॉडक्ट’ त्यांच्यासाठी महत्त्वाचे असते आणि अर्थातच त्यांनी स्वतः हाती घेतलेल्या कार्याला ‘महाराष्ट्र फाउंडेशन’चे हे कार्य पूरक असते. त्यामुळेच २८ वर्षांपैकी आधीची पंधरा वर्षे मुंबईत ‘केशव गोरे स्मारक ट्रस्ट’ने ‘लोकवाङ्मय गृहा’च्या सहकार्याने कार्यवाही केली, नंतरची दहा वर्षे ‘केशव गोरे स्मारक ट्रस्ट’ने ‘साधना ट्रस्ट’च्या सहकार्याने कार्यवाही घडवून आणली, आणि मागील तीन-चार वर्षांपासून ‘साधना ट्रस्ट’च्या सहकार्याने ‘मासूम’ संस्था ही कार्यवाही घडवून आणते आहे. या चारही संस्थांना सुनील देशमुख यांचे जाणे चटका लावून जाणारे आहे. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!
‘साधना’ साप्ताहिकाच्या १४ जानेवारी २०२३च्या अंकातून साभार
.................................................................................................................................................................
सुनील देशमुख यांचं ‘अक्षरनामा’वरील लेखन
ग्लोबल फेनामेना : ‘ते’ विरुद्ध ‘आपण’
किंग करोना अमेरिकेची सत्त्वपरीक्षा पाहतो आहे!
‘ट्रम्प ही सबंध जगावरच आलेली आपत्ती आहे’
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment