‘महाराष्ट्र फाउंडेशन’ (अमेरिका) यांच्या वतीने मागील २८ वर्षांपासून दिल्या जाणाऱ्या ‘मराठी साहित्य’ व ‘महाराष्ट्रातील समाजकार्य’ या दोन्ही प्रकारांतील पुरस्कारांचे प्रवर्तक सुनील देशमुख यांचे ४ जानेवारी २०२३ रोजी अमेरिकेतील मियामी इथे निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांनी अमेरिकेत ‘महाराष्ट्र फाउंडेशन’ या समाजसेवी संस्थेची स्थापना करून मराठी साहित्य आणि सामाजिक चळवळी यांत भरीव काम करणाऱ्या व्यक्तींचा यथोचित सन्मान करण्यासाठी या संस्थेला दोन कोटींचा निधी दिला. त्यातून १९९४पासून दरवर्षी महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे मराठी साहित्य व समाजकार्य या दोन क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कारांच्या रूपाने गौरव केला जातो. गेल्या २८ वर्षांत या पुरस्कारांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पाच दशकांपूर्वी अमेरिकेत जाऊन स्वकर्तृत्वावर तिथेही नावलौकिक मिळवणाऱ्या पिढीतले सुनील देशमुख. त्यांनी महाराष्ट्र फाउंडेशन आणि सिएरा क्लब या दोन संस्थांच्या माध्यमातून भारत आणि अमेरिकेत अनेक समाजोपयोगी कामं केली. पर्यावरणापासून स्त्रीहक्कांपर्यंत अनेक चळवळी-संघटनांमध्ये त्यांचा सहभाग होता.
मितभाषी, साधे, ऋजु व्यक्तिमत्त्वाच्या देशमुख यांना स्वत:विषयी बोलायला फारसे आवडत नसे. त्यांचं मनोगत ‘ऋतुरंग’च्या २०१४च्या दिवाळी अंकासाठी शब्दांकित करण्याची विनंती अरुण शेवते यांनी केली, तेव्हाही देशमुखांनी आधी थोडा वेळ मागून घेतला. पुन्हा पुन्हा विनंती केल्यानंतर ते बोलायला तयार झाले. हा लेख पुढे अरुण शेवते यांनी संपादित केलेल्या ‘माझे गाव, माझे जगणे’ (ऋतुरंग प्रकाशन, मुंबई, २०१६) या पुस्तकात समाविष्ट केला गेला. तो लेख ‘अक्षरनामा’च्या वाचकांसाठी संपादित स्वरूपात…
- राम जगताप, संपादक, अक्षरनामा
.................................................................................................................................................................
स्वत:विषयी लिहिणं कठीण असतं. कठीण या अर्थानं की, आपल्याकडे सांगण्यासारखं विशेष काही आहे, असं मला वाटत नाही. माझ्या सामान्यपणाची मला जाणीव आहे. पण ही आत्मपरीक्षण करण्याची आणि त्याच वेळी तुमच्याशी संवाद साधण्याचीही एक संधी आहे, या विचारानं हा लेख लिहितो आहे.
‘मुखवट्याच्या आड चेहरा, लपविला नाही कधी मी
वेष्टनातून माल नकली, खपविला नाही कधी मी
ज्या चुका हातून घडल्या, त्या तशा मी मांडल्या
झूट सबबींचा मुलामा, चढविला नाही कधी मी
सजवुनी काळोखही, शब्दांतुनी मी मांडला
कागदावर चंद्र खोटा, डकविला नाही कधी मी’
माझ्या आयुष्याचा सारांश या ग़ज़लेच्या काही शेरांतून चांगल्या प्रकारे व्यक्त होतो, असं मला वाटतं.
अमेरिकेत कमॉडिटी ट्रेडिंगमध्ये वॉल स्ट्रीटवर यशस्वीपणे व्यवसाय करणारा आणि महाराष्ट्रात पुरोगामी सामाजिक कार्याला मदत करणारा उद्योजक अशी माझी ओळख महाराष्ट्रातल्या निदान काही जणांना असण्याची शक्यता आहे. एकंदर भारतीय जनमानसात उद्योजकाची प्रतिमा म्हणजे दोन्ही हातांनी ओरबाडणारा असंवेदनशील माणूस अशीच आहे. त्यातून तो चाळीसेक वर्षं अमेरिकेत राहत असेल, तर त्याचा मराठी भाषेशी कितपत संबंध उरला असेल? ‘महाराष्ट्र म्हणजे काय रे भाऊ?’ असे बाळबोध प्रश्न तो विचारत असेल, अशीही समजूत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण टिपिकल एनआरआयपेक्षा फार वेगळे आहोत, असा काही माझा दावा नाही, पण मी माझ्यापरीने काहीतरी खटपट सतत करत असतो, एवढं मात्र नक्की.
मी मूळचा सांगली जिल्ह्यातला. भारतासारख्या व्यक्तिपूजक देशात आदर्श, गुरू, नेता किंवा मार्गदर्शक असल्याशिवाय सहसा माणसाला स्वत:चा मार्ग काढणं वा विचार करणं जमत नाही. अचानक दृष्टान्त वा साक्षात्कार होऊनही काहींचे विचार वा आयुष्य बदलतं. मला यातल्या कशाचीही गरज कधी लागली नाही. लहानपणापासून माझे विचार हे माझेच होते. कुठलीही गोष्ट ‘बाबा वाक्यम् प्रमाणम्’ न मानता ती विचार व विवेकाच्या कसोटीवर पारखून घेण्याचा माझा स्वभाव आहे. अगदी शाळेपासून चाकोरीबाहेरचा आणि स्वतंत्र विचारांचा विद्यार्थी म्हणून माझी ओळख होती. मी एसएससीला सांगली बोर्डात चौथा आलो. पुढे मला वकील होऊन सामाजिक कार्य करायचं होतं. शिवाय माझी प्रकृतीही थोडी कवीमनाची होती. पण घरची परिस्थिती अगदीच सामान्य होती. त्यामुळे वडिलांनी व्हेटो काढला- ‘‘वकील माशा मारतात. आपल्याकडे दातावर मारायला नवा पैसा नाही. तुझी तू रोजीरोटी कमावली पाहिजे. तेव्हा डॉक्टर किंवा इंजिनिअर हो.’’ सत्य विदारक असतं, आणि मुख्य म्हणजे ते कवीकल्पनांवर मात करतं.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
त्यात डॉक्टरकी म्हणजे रक्त, पू वगैरे अशा आमच्या कल्पना. म्हणून मुकाट्यानं इंजिनिअरिंगचा रस्ता पकडला. त्यातही केमिकल इंजिनिअरिंगला मॅकनिकल इंजिनिअरिंगपेक्षा ५० रुपये जास्त पगार असतो, असं ऐकायला मिळालं. परिणामी मी मुंबईला ‘युडीसीटी’ (University Department of Chemical Technology of the University of Bombay, आताचे Institute of Chemical Technology) मध्ये १९६६ साली केमिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. त्यात मन रमलं नाही, पण परीक्षेत चांगले मार्क्स मिळवणं कठीण गेलं नाही.
याच काळात माझा विद्यार्थी आणि काही इतर सामाजिक सामाजिक चळवळींशी संपर्क आला. क्रांती शहा, डॉ. कुमार सप्तर्षी या त्या वेळच्या विद्यार्थ्यांच्या नेत्यांकडून (खरा शब्द वापरायचा तर ‘हिरोंकडून’) बरंच काही शिकायला मिळालं. पण पूर्णपणे सामाजिक कार्यात झोकून देण्याचं काम काही माझ्या हातून घडलं नाही. मेधा पाटकर, डॉ. नरेंद्र दाभोलकर अशी माणसं ते कसं करू शकतात, त्यामागे कोणती ऊर्मी असते, हे मला अजूनही न सुटलेलं कोडं आहे. अशा वेळी मध्यमवर्गीय कातडीबचाऊ व खुज्या मनोवृत्तीचा पगडा आपल्यावर किती आहे, याची जाणीव होते.
आगगाडी जशी बोगद्याच्या एका बाजूनं आत शिरून दुसऱ्या बाजूनं बाहेर पडते, तशाच आयआयटी, युडीसीटीच्या बॅचेसच्या बॅचेस मुंबईला आत शिरून अमेरिकेत अवतरतात. (आजही थोड्याफार फरकानं तशीच परिस्थिती आहे.) मीही त्यातलाच एक. तुमच्यातली संवेदनशीलता पूर्णपणे ठार झाल्याची खात्री केल्याशिवाय त्या काळी इंजिनिअरिंगची पदवी देत नसत. ‘घोका आणि ओका’ असाच तो साचा असतो.
त्यानुसार १९७० साली इंजिनिअरिंगची पदवी मिळवून प्रवाहपतितासारखा मी १९७१साली अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी दाखल झालो. पण अमेरिकेत साचेबद्ध, रूढीबद्ध असं काहीही नाही. आचारविचाराचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. चुका करण्याचंही पूर्ण स्वातंत्र्य आहे. हे खुलं पर्यावरण मला भावलं. सामाजिक समता, स्त्रियांना मानाचं स्थान आणि धर्माचं अवडंबर नाही, या गोष्टींनी माझ्या वैचारिक प्रगल्भतेचं भरणपोषण केलं.
अमेरिकेत आल्यावर मी दोन गोष्टी केल्या. (तत्पूर्वी काही काळ Exxon refineryमध्ये इंजिनिअर काम केलं आणि काही दिवस वकिलीही केली.) एक म्हणजे चक्क इंजिनिअरिंगची सरळ वहिवाट सोडून वकिलीचं अधुरं स्वप्न पुरं केलं. ती माझी महत्त्वाकांक्षा तर होतीच, पण अमेरिका हा देश प्रामुख्याने वकिली मंडळी चालवतात, याही कारणानं त्याला बढावा मिळायला, असं म्हणायला हरकत नाही.
आणि दुसरं, मराठी माणसाला असाध्य, घृणास्पद वाटणाऱ्या कमॉडिटी ट्रेडिंगमध्ये- म्हणजे वायदेबाजारात घुसलो. प्रचंड जोखीम, त्वरीत निर्णय घेणं, यामुळे मी या क्षेत्राकडे आकर्षित झालो. त्यासाठी मला माझ्या केमिकल इंजिनिअरिंगमधील शिक्षणाचा, एमबीएचा आणि वकिलीचा उपयोग झाला. माझ्या या पार्श्वभूमीमुळे ‘गोल्डमन सॅक्स’ या वॉल स्ट्रीटवरील नामांकित कंपनीनं १९८६ साली मला नोकरीची ऑफर दिली. बॉब रुबेन या गोल्डमनच्या व्यवस्थापकीय भागीदारानं रितसर मुलाखत घेऊन माझी निवड केली. (हे रुबेन पुढे सेक्रेटरी ऑफ ट्रेझरी झाले. हे पद आपल्या भारतातील अर्थमंत्र्याच्या बरोबरीचं मानलं जातं.)
कमॉडिटी ट्रेडिंग म्हणजे येत्या दोन-तीन-चार वर्षांतील खरेदी-विक्रीचे व्यवहार आताच आगावूपणे करायचो. यात जोखीम खूप मोठ्या प्रमाणावर असते. त्याच वेळी तुमचे प्रतिस्पर्धी हे तितकेच चाणाक्ष, हुशार आणि कष्टाळू असतात. त्यामुळे हा व्यवसाय नोकरीत आणि व्यक्तिगत आयुष्यात खूपच ताणतणाव निर्माण करणारा आहे. यात यशाची शक्यता ही ५० टक्केच असते. उदा. समजा आता तेलाच्या एका बॅरलचा भाव १०० रुपये आहे. त्याप्रमाणे ते विकत घेतले आणि उद्या युद्ध सुरू झालं, तर तोच भाव २०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त होऊ शकतो. अशा वेळी तुमचा फायदा होतो. पण भाव अचानक गडगडले, तर तुमचं नुकसानही होतं. त्यामुळे हा व्यवसाय शेअर मार्केटपेक्षाही जास्त जोखमीचा मानला जातो. ‘झिरो सम गेम’ असं या व्यवसायाचं वर्णन केलं जातं. पण मी या व्यवसायात नेटानं आणि कष्टपूर्वक तगून राहिलो.
पुढील आठ वर्षांत गोल्डमन सॅक्स या कंपनीला चांगला फायदा मिळवून दिला. त्यामुळे वॉल स्ट्रीटवर माझं नाव झालं. परिणामी सीटी बँकेनं मला मोठी ऑफर देऊन बोलवलं. १९९२ साली मी सीटी बँकेच्या कमॉडिटी ट्रेडिंगचा प्रमुख झालो.
या पदापेक्षा त्यामागील धाडस, साहस व आत्मविश्वास अधिक महत्त्वाचा. वायदेबाजाराचा हा मार्ग डॉक्टर, इंजिनिअर, संगणक अभियंता यांपेक्षा वेगळा आणि असुरक्षित म्हणवा अशा प्रकारचा आहे. याला इंग्रजीत ‘हायरिस्क, हायरिवार्ड’ असं म्हणतात. तुमच्याकडून कंपनीला तोटा झाल्यास तुम्हाला लगेच बाहेरचा रस्ता दाखवला जातो. आणि इतर कंपन्याही तुम्हाला नोकरीत घेत नाहीत. म्हणजे तुम्ही या व्यवसायातून जवळपास आऊट होता. पण याउलट नफा मिळवून दिल्यास त्याचा उत्तम हिस्साही दिला जातो. प्रचंड जोखीम पत्करून स्वीकारलेला व्यवसाय करत राहण्याची कला गुजराती-मारवाडी यांनाच जमते असं म्हणतात. पण माझ्यासारख्या मराठी, महाराष्ट्रीय माणसालाही ती प्रयत्नपूर्वक जमली.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
पंचवीसेक वर्षांपूर्वी प्रा. एन. डी. पाटील त्यांच्या एका भाषणात म्हणाले होते, ते मला आठवतं- ‘‘तू मळलेल्या वाटेने जाऊ नकोस. ती वाट (राजरस्ता) जिथे जाईल, तिथे तुला जावे लागेल. तुझी तू वाट काढ. तिथे काटे आणि खड्डे असतील, पण तुला जिथे जायचे, तिथे तू जाशील.’’
या वेगळ्या वाटेनं जाण्याच्या धाडसापेक्षाही समाजासाठी काही करण्याचा माझा निर्णय अधिक धाडसी होता, असं मला वाटतं. बहुतेकांना पैशाचा मोह सुटत नाही आणि वाढत्या वयाबरोबर धर्मांधता वाढते वा मोक्षाची आस लागून लोक निर्वाणाच्या गप्पा करायला लागतात. वीस वर्षांपूर्वी व्यावसायिक यशाच्या शिखरावर असताना मी काही कोटी रुपये गुंतवून ‘महाराष्ट्र फाउंडेशन’च्या माध्यमातून प्रगत साहित्य व समाजकार्य गौरव पुरस्कार योजना सुरू केली. गेल्या वीस वर्षांच्या काळात या पुरस्कारांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वर्तुळात आपली जी प्रतिमा निर्माण केली आहे, ती सर्वांच्या समोर आहे. त्यामुळे त्याविषयी अधिक काही सांगण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही.
भारतात उद्योजकांनी सक्रिय पुरोगामी आचार-विचार दाखवणं ही तशी दुर्मीळ आणि आश्चर्याची गोष्ट आहे. परंतु अमेरिकेतील बरेचसे उद्योजक हे पुरोगामी विचारांचेच आहेत. ते समाजकार्यासाठी आपला वेळ व पैसा आवर्जून देतात. बिल गेटस, वॉरन बफेट, जॉर्ज सोरोस इ. जगातील सर्वाधिक श्रीमंत मानली जाणारी मंडळी उघडपणे समाजकार्याचा पुरस्कार करतात आणि आपली ९० टक्के संपत्तीही त्यांनी समाजकार्यासाठी दिलेली आहे. मी जिथे व्यवसाय करतो, त्या वॉल स्ट्रीटवर बरेचसे ज्यू लोक आहेत. तेही आपला वेळ व पैसा पुरोगामी समाजकार्याला देतात. बराक ओबामा निवडून येण्यात याच मंडळींचा पुढाकार होता. थोडक्यात काय तर, उद्योजकता आणि पुरोगामित्व यांचा मेळ अमेरिकेत सर्वत्र दिसतो. त्यामुळे महाराष्ट्रातील पुरोगामी समाजकार्यासाठी माझ्याकडून काहीएक मदत होणं, ही साहजिक गोष्ट मानायला हवी.
अमेरिकेत ४० वर्षं राहिल्यानंतर इथल्या समाजाचं-माझ्या कर्मभूमीचंही मी देणं लागतोच. त्यामुळे इथंही समाजकार्य करणं मी माझं कर्तव्य मानतो. इथं अमेरिकेत मी पर्यावरण संवर्धनाचं काम करतो. गेली दहा वर्षं ‘सिएरा क्लब’ या जगातील सर्वांत जुन्या व मोठ्या पर्यावरणवादी संस्थेसाठी काम करतो आहे. तिच्या ग्लोबल वॉर्मिंग कमिटीचा संस्थापक सदस्य आहे. याशिवाय मी भारतात ‘सिएरा क्लब एन्व्हार्नमेंटल अवार्ड’ सुरू केलं. त्याचं पहिलं पारितोषिक पुरस्कार अहमदाबादमधील इला भट यांच्या ‘सेवा’ या संस्थेला देण्यात आलं आहे. अमेरिकेत सध्या ख्रिश्चन मूलतत्त्ववादी लोकांनी उचल खाल्ली आहे. त्यामुळे त्यांना विरोध करून अमेरिकेतील धर्मनिरपेक्ष लोकशाही बळकट करणाऱ्या संस्थांचंही मी गेली २० वर्षं काम करतो आहे.
अमेरिकेत मराठी तरुणांना उद्योगासाठी प्रोत्साहन देणाऱ्या मॅक्सेल अवार्डच्या सल्लागार मंडळात गेली तीन वर्षं डॉ. रघुनाथ माशेलकर आणि कुमार केतकर यांच्यासह सहभागी आहे. पुरस्काराचे निकष, धोरण आणि निवड याबाबतीत आमचा सहभाग आहे.
साठी आल्यावर आयुष्यभर दारू-मटण खाणारे लोकही एकदम अध्यात्माच्या बाता करायला लागतात. पूजाअर्चा, अध्यात्म, मोक्ष, पाप-पुण्य इ. शब्द चलनासारखे वापरू लागतात. कोणा बापू वा बाबाच्या चरणी पैसा ओतून स्वत:साठी स्वर्गाचा पास मिळवण्याचा प्रयत्न करतात. या गोष्टी मला हास्यास्पद वाटतात. माझा स्वभाव बुद्धिप्रामाण्यवादी आणि कृती विवेकवादी आहे. मी लहानपणापासून नास्तिक आहे. तुकडोजी महाराज, गाडगेबाबा हेच खरे वंदनीय आहेत, असं मला वाटतं. संतांनी सांगितलेला समाजसेवेचा मार्ग मला पटतो. कारण माझा शाश्वत मानवी मूल्यांवर विश्वास आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
येता काळ हा मोठ्या जागतिक संघर्षाचा आहे, असं मला वाटतं. निरनिराळ्या धर्मांचे हिंसक मूलतत्त्ववादी त्या-त्या ठिकाणी धर्मनिरपेक्ष लोकशाही नष्ट करून धार्मिक राजवट आणायच्या प्रयत्नात आहेत. अशा वेळी सुसंस्कृत लोकांनी वेळीच जागं होऊन या धर्मांध शक्तींचा सामना केला, तरच जगात प्रगती व संस्कृती टिकून राहील, अशी माझी समजूत आहे. स्त्रियांना तर मूलतत्त्ववादी लोकांपासून फारच धोका असतो, आहे. कारण जगाच्या इतिहासात जिथे जिथे धार्मिक राजवटी आल्या, तिथे तिथे स्त्रियांना रूढी, परंपरा-कर्मकांडाच्या बेड्यांत अडकवून शिक्षण, मूलभूत अधिकार इत्यादींपासून वंचित ठेवलं गेलं. तेव्हा भारतीयांनी आतापासूनच सावधान राहायला हवं, असं सुचवावंसं वाटतं.
मी इथं सर्व मराठी वर्तमानपत्रं नियमितपणे वाचतो. काही मराठी मासिकं आणि पुस्तकंही सतत वाचत असतो. त्यामुळे महाराष्ट्रातील घडामोडींची मला साधारण कल्पना असते. समाजकार्यच खरा बदल घडवून आणू शकते यावर माझा दृढ विश्वास आहे. त्यामुळे मी राजकारणापासून तसा लांब राहण्याचा प्रयत्न करतो. तरीही अवलोकन व चिंतनानं कोणता नेता चांगला, हे आपण तारतम्यानं नक्कीच ठरवू शकतो. त्यानुसार मला सोनिया गांधी या प्रभावी आणि सच्च्या वाटतात. काही कडव्या लोकांना त्यांचं नावही वर्ज्य आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे. सोनिया या कशा आणि किती परदेशी आहेत हे आमचे एनआरआय बंधू स्वत: कायम अमेरिकेत राहून पटवायचा प्रयत्न करत असतात. पुण्या-मुंबईचे उच्चमध्यमवर्गीय आरएनआर (रेसिडेंट नॉन इंडियन्स) त्यांच्याविषयी कायम कुत्सितपणे बोलत असतात, याचीही मला कल्पना आहे. पण या पुण्या-मुंबईच्या उच्चमध्यमवर्गीयांपेक्षा सोनिया गांधी या खऱ्या ‘भारतीय’ आहेत, असं मला वाटतं. कारण हे लोक भारतात राहत असले तरी त्यांची जीवनशैली पूर्णपणे पाश्चात्य आहे. भारतीय राजकारण आणि नाठाळ राजकारणी यांना हाताळणं हे काही केवळ सद्भावनेवर होणारं काम नाही. पण सोनिया गांधी यांनी या दोन्ही गोष्टी कुशल प्रकारे हाताळून व्यवस्थापन, नेतृत्व आणि संवाद याबाबतीत आपलं कौशल्य सिद्ध केलं आहे. भारताला लोकशाही व धर्मनिरपेक्ष मार्गावर ठेवण्याचं काम सोनियाच करू शकतात.
असो. वाचन, छंद, आवडीनिवडी याही माझ्या जीवनाचा व व्यक्तिमत्त्वाचा मोठा भाग आहेत. इंग्लिशमध्ये माझे वाचन हे ललितेतर प्रकारातले आहे. कॉस्मॉलॉजी (जगाच्या व्युत्पत्तीचे शास्त्र) या विषयाची मला फार आवड आहे. नुसतं वाचनच नव्हे तर निरनिराळ्या संशोधन केंद्रांत व विद्यापीठांत जाऊन तेथील आधुनिक व ‘कटिंग एज’ संशोधन बघणं मला फार आवडतं. जगाची व्युत्पत्ती हा सर्वांत मूलभूत प्रश्न आहे. गेल्या ३०-४० वर्षांत सर्वांत जास्त संशोधन वा प्रगती याच विषयात झाली आहे. जगाच्या निर्मितीचं कोडं सोडवण्याचा प्रयत्न अलीकडेच सर्न येथे ‘बिग बँग’द्वारे केला गेला. त्यात वस्तूमान धारण करणारा एक कण सापडला. ‘हिग्ज बोसान’ हे त्याचं नाव.
कॉस्मॉलॉजीचं महत्त्व मला आणखी एका कारणानं वाटतं. धर्मांध, मूलतत्त्ववादी लोक जगाची व्युत्पत्ती आपल्याच देवानं कशी केली, याची रसभरीत व बेफाम वर्णनं करतात. आपल्या तर्कबुद्धीला ती मूर्खपणाची वाटत असली तरी कोट्यवधी लोक त्यावर अंधश्रद्धेनं विश्वास ठेवतात. कॉस्मॉलॉजी विवेक व बुद्धिप्रामाण्यवाद वाढवून सामाजिक जीवन प्रगत व विवेकनिष्ठ बनवण्याची कामगिरी करू शकतं, असं मला वाटतं.
माझा पुनर्जन्म वगैरे भाकडकथांवर विश्वास नसल्यानं आला क्षण महत्त्वाचा मानतो. सतत मजा केली पाहिजे असं मलाही वाटतं. पण माझी मजेची व्याख्या जरा वेगळी आहे. सत्कृत्य करणं आणि सुहृदय, बुद्धिवादी, कलावंत, कवी इत्यादी लोकांचा सहवास मला मनापासून आनंद देतो. मी तो भरभरून मिळवत आलो आहे. डॉ. श्रीराम लागू, निळूभाऊ फुले यांच्यासारख्या विचारवंत कलावंतांचा सहवास मिळाला. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, डॉ. भालचंद्र मुणगेकर, डॉ. नरेंद्र जाधव इत्यादींबरोबर वारंवार भरपूर चर्चा\गप्पा होतात. कलाक्षेत्रातील मकरंद साठे, अतुल पेठे, अमोल पालेकर अशा संवेदनशील व्यक्तींबरोबर नाळ जुळते. डॉ. नरेंद्र दाभोलकरांशी तर तीस वर्षं चर्चा-बैठकी असा धागा जुळलेला होता. त्यांच्या हत्येनं मी खूप अस्वस्थ झालो आहे, खंतावलो आहे.
मराठी साहित्यात ग़ज़ल हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. जीवनाचं सार आणि तत्त्वज्ञान दोन ओळींत प्रकटण्याची ताकद असलेला हा अभिव्यक्तीचा एकमेव प्रकार. मराठीतले बहुतांश ग़ज़लकार अगदी तळागाळातून आलेले आहेत. त्यांना आपल्या अस्तित्वाची लढाई रोज खेळावी लागते. त्या वास्तवातून, दर्दातून उमटलेले तरंगही लाटांसारखे नसतील तरच नवल. ‘तोच चंद्रमा’ किंवा ‘निळ्या निळ्या लाटा’ इ. मध्यमवर्गीय, हलक्याफुलक्या साहित्यापेक्षा ग़ज़लचे शेर काळीज हेलावून जातात. मराठी ग़ज़लनवाजांबरोबर मैफली आणि त्या जिंदादिल, भावनिक आणि प्रांजळ कवींचा सहवास ही मला मेजवानीसारखी प्रिय गोष्ट आहे. इलाही जमादार, मनोहर रणपिसे, दिलीप पाढंरपट्टे इत्यादी ग़ज़लकारांच्या आणि भीमराव पांचाळे, माधव भागवत इत्यादी ग़ज़लगायकांच्या भेटीगाठी आणि मैफली मला विशेष प्रिय आहेत.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
शेवटी, अमेरिकेत शिक्षणासाठी वा नोकरीसाठी येऊ इच्छिणाऱ्या महाराष्ट्रीय आणि भारतीय तरुणांना माझ्या अनुभवावरून मी हे सांगेन की, अमेरिकेत कल्पकतेला फार महत्त्व आहे. गेल्या काही वर्षांत आपली जीवनशैली आमूलाग्र म्हणता येईल, अशा पद्धतीनं बदलवणारे शोध हे अमेरिकेतील वय वर्षं २० पेक्षा कमी वय असलेल्या तरुणांनी लावलेले आहेत. भारतीय शिक्षणपद्धती कल्पकतेच्या बाबतीत फार मागे असल्याने ती आपल्या प्रगतीच्या आड येते. त्यामुळे तुम्हाला यश मिळवायचं असेल, तर मुक्त विचार आणि कृती या जोरांवर ते मिळू शकतं. अमेरिकेतील तरुण मंडळी आपल्यापेक्षा फार हुशार आहेत, असं नाही, पण ती खूप कल्पक आहेत. आपल्याकडील तरुणांमध्येही ती कल्पकता मोठ्या प्रमाणावर आहे. फक्त त्याला कष्टांची, अभ्यासाची जोड द्यायला हवी. जे तरुण ती देतात, त्यांना अमेरिकेतच काय, पण जगाच्या पाठीवर कुठेही यश मिळवता येतं. त्यामुळे इथे आल्यावर कुठलेही भारतीय संकेत पाळायची गरज नसते. गरज असते ती मुक्त चिंतनाची. भारतात रुटीन काम केलं जातं, तर अमेरिकेत कल्पकतेचं काम केलं जातं.
थोडक्यात काय तर, दिवसा समाजसेवक, उद्योजक, मित्रमंडळी यांच्याबरोबर, तर रात्री कलावंत आणि गज़लांची सोबत अशी माझी एक अखंड मैफल चालू आहे…
शब्दांकन : राम जगताप
.................................................................................................................................................................
सुनील देशमुख यांचं ‘अक्षरनामा’वरील लेखन
ग्लोबल फेनामेना : ‘ते’ विरुद्ध ‘आपण’
किंग करोना अमेरिकेची सत्त्वपरीक्षा पाहतो आहे!
‘ट्रम्प ही सबंध जगावरच आलेली आपत्ती आहे’
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment