या पुढील काळात मासिक स्वरूपाने आपल्यात ‘मुक्त-संवाद’ घडत राहणार आहे…
पडघम - माध्यमनामा
संपादक मुक्त-संवाद
  • ‘मुक्त-संवाद’ या मासिकाच्या जानेवारी २०२३च्या अंकाचे मुखपृष्ठ
  • Tue , 17 January 2023
  • पडघम माध्यमनामा मुक्त-संवाद Mukta-Sanvaad

‘मुक्त-संवाद’चा अंक गेली दोन वर्षे पाक्षिक स्वरूपात प्रकाशित झाला. वृत्तपत्रीय मर्यादा ओलांडून शोध-संशोधनपर विचारप्रवर्तक लेखनाला झुकते माप देणारा हा पर्यायी (alternative) पत्रकारितेचा प्रयोग बऱ्यापैकी रुजला आहे. त्या रुजण्यातून वा मुळे धरण्यातून तरारून आलेल्या या रोपट्याने बाळसे धरावे आणि यथावकाश स्वतःचा स्वतः तोल सांभाळत आपले स्वतंत्र असे अस्तित्व राखावे, या उद्देशाने जानेवारी २०२३पासून ‘मुक्त-संवाद’ मासिक स्वरूपात प्रकाशित होत आहे. या पहिल्या मासिक अंकाचे हे संपादकीय...

.................................................................................................................................................................

प्रिय वाचकहो,

सर्वप्रथम आपणा सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!

जवळपास दोन वर्षांहून थोड्या अधिक काळाचा आपला भावना आणि विचारांचा दोस्ताना आहे. म्हटले तर हा अगदीच मामुली काळ आहे. परंतु या काळात इतक्या उलथापालथी घडून आल्या आणि त्या-त्या प्रसंगांना तोंड देताना, वैयक्तिक आणि सार्वजनिक स्तरावर जी लढाई आपण सर्वांनी लढली, ती दोन वर्षांची नव्हे, दोन तपांचा अनुभव देणारी होती. या काळात नेमका आकडा सांगता यायचा नाही, परंतु इ-मेल, फेसबुक, ट्विटरवर आणि व्हॉट्सअॅप यावरून एकाच वेळी जवळपास ४ ते ५ हजार वाचकांपर्यंत अगदी खात्रीने ‘मुक्त संवाद’चा अंक नियमितपणे पोहोचत राहिला. आताशा प्रतिक्रियांचे स्वरूप आणि पद्धतही बदलते आहे, ती पाहता ‘मुक्त संवाद’च्या येण्याची एव्हाना बहुतेकांना चांगली सवय झाली आहे, असे ठामपणे म्हणता येते.

वृत्तपत्रीय मर्यादा ओलांडून शोध-संशोधनपर विचारप्रवर्तक लेखनाला झुकते माप देणारा हा पर्यायी (alternative) पत्रकारितेचा प्रयोग एव्हाना बऱ्यापैकी रुजलादेखील आहे. त्या रुजण्यातून वा मुळे धरण्यातून तरारून आलेल्या या रोपट्याने बाळसे धरावे आणि यथावकाश स्वतःचा स्वतः तोल सांभाळत आपले स्वतंत्र असे अस्तित्व राखावे, या उद्देशाने नव्या वर्षाची सुरुवात करत आहोत.

गेली दोन वर्षे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही ‘मुक्त संवाद’चा अंक पाक्षिक स्वरूपाने प्रकाशित होत राहिला. आता या पुढील काळात मासिक स्वरूपाने आपल्यात ‘मुक्त संवाद’ घडत राहणार आहे. अर्थात, आसपासचे सगळे जग डिजिटल मार्गावर तेही दृश्यचित्रात्मक स्वरूपाने प्रचंड वेगाने, ट्रेंड सेट करत किंवा ट्रेंडचा पाठलाग करत धावत असताना, लिखित साहित्यात कितींना रस असणार आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहेच.

याच मुद्द्याला धरून उलट्या दिशेने विचार करता, वाचक वा प्रेक्षकांचा पारंपरिक लिखित साहित्यात रस उरू नये, त्यापेक्षा बाजारपेठीय शक्तींचे पूर्ण नियंत्रण असलेल्या आणि वैचारिक विरोधकांना नामोहरम करण्यासाठी या बाजारपेठीय शक्तींशी सालेलोटे करणाऱ्या शासनसत्तेला प्रचार-अपप्रचाराला मोकळे रान मिळवून देणाऱ्या डिजिटल माध्यमांवरच तो सर्वाधिक काळ अडकून राहावा, यामध्ये कोणाकोणाला अधिक रस आहे, असाही प्रश्न विचारता येतो.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

प्रश्न असाही विचारता येतो की, ज्यांना कोणाला डिजिटल माध्यमांमध्ये रस आहे, त्यांचे बाजाराशी, समाजाशी, सत्तेशी संबंध वा हितसंबंध आहेत तरी कसे, त्यांचे हेतू आणि उद्दिष्टे आहेत तरी काय, त्याचा लोकशाहीशी किंवा लोकशाहीला सुरुंग लावण्याशी संबंध आहे तरी काय?

आहे डिजिटल तरीही....

या साऱ्या प्रकट-अप्रकट प्रश्नांचा माग काढण्याचा उद्देश डिजिटल माध्यमाचे अस्तित्व नाकारणे, हा खचितच नाही. या माध्यमावर विधायक मार्गाने लोकशाही रक्षणासाठी जीवाची बाजी लावणारेही लेखक-पत्रकार-भाष्यकार निदान सध्या तरी आपले अस्तित्व जपून आहेत. अशा प्रसंगी, डिजिटल माध्यमाच्या सम्यक वापराचे भान विस्तारावे, संस्कृती-परंपरा, समाज आणि राजकारणाच्या परिप्रेक्ष्यात लिखित साहित्याची शाश्वतता वेळीच ध्यानात यावी, डिजिटल माध्यमातील लोकशाहीविरोधी कारस्थानी नियंत्रकाच्या अस्तित्वाची तसेच स्व-नियंत्रणापद्धतीतल्या सामर्थ्यांची वेळीच जाणीव व्हावी, हे सारे मुद्दे वरील प्रश्नांशी जोडले गेले आहेत.

आजचे युग डिजिटल तंत्राचे आहे, हे खरेच, या तंत्रात पारंगत असलेल्या विधायक-विघातक अशा दोन्ही प्रकारातल्या लोकांनी सध्या जनमानसावर गारुड केले आहे. याच तंत्राचा बेलगाम वापर करून आपल्याला हव्या त्या पद्धतीने सत्ता राबवल्या जात आहेत. हवे तसे राजकीय कथन घडवून आणले जात आहे. या कथानकाचा शासनसत्तेच्या उघड-छुप्या पाठबळावर विखारी प्रचार-प्रसार केला जातो आहे. सत्ताधाऱ्यांच्या हातचे जणू विघातक खेळणे बनलेल्या या तंत्रावर आता हळूहळू विरोधकही आपली पकड निर्माण करू पाहताहेत, हे तर उघड्या डोळ्यांनी दिसते आहे, परंतु, प्रश्न हे आहेत, या तंत्रावर सर्वोच्च नियंत्रण कोणाचे आहे? या सर्वोच्च नियंत्रण असलेल्यांशी कोणाचे हितसंबंध आहेत आणि यावर दर सेकंदांना जे प्रसृत होते आहे, ते अंतिमतः टिकणार किती आहे? ते टिकणार असेल/ नसेल तर त्याचे फायदे/तोटे कोणाला होणार आहेत?

या प्रश्नांची उत्तरे कमी गुंतागुंतीची नाहीत. आजच्या घडीला इ-मेल, फेसबुक, ट्विटरवर आणि व्हॉट्सअॅप ही सर्वसामान्यांच्या वापराची प्रमुख समाजमाध्यमे आहेत. यावर दिनरात रहदारी सुरू असते. राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक- सिनेमा आदी प्रकारात तर चोवीस तास दृश्यचित्रांचा रतीब सुरु असतो. यावर अर्थातच बाजारपेठेवर, राजकीय, सांस्कृतिक सत्तेवर नियंत्रण असलेल्यांचे वर्चस्व आहे. यांचा अजेंडा स्पष्ट आहे, तो म्हणजे, आपल्या हवे तसे राजकीय कथन आकारास आणून शक्य होईल तितक्या वापरकर्त्यांचे मेंदू ताब्यात घेणे आणि वापरकर्त्यांच्या क्रिया-प्रतिक्रियांची दिशा ठरवणे. तशी ती ठरवताना, इतिहास आणि वर्तमानातली अडचणीची प्रतिमा प्रतीक वापरकर्त्यांपर्यंत पोहोचू नये, पर्यायाने विरोधकांच्या हाती राजकीय कथनाचे नियंत्रण जाऊ नये, यासाठी सोयीच्या प्रतिमा-प्रतीकांचा अखंड मारा सध्या होताना दिसत आहे. त्यात सत्यासत्याचे, दैनंदिन समस्यांचे, भवितव्याचे एतद्देशीय समाजाचे भान पुरते सुटून गेले आहे. किंबहुना, ते कायम सुटलेले असावे, यासाठीच सत्ताधाऱ्यांनी कायद्याच्या चौकटीत हा सारा घाट घातलेला दिसतो आहे.

वाचक प्रेक्षकांवर उत्सवांचा हल्ला

या गदारोळात कुठल्याच विषयाचे समाधानकारक आकलन वाचक प्रेक्षकांना होत नाही. विषय खोलात जाऊन समजून घ्यावा, असेही बहुसंख्य वाचक प्रेक्षकांना वाटत नाही. एखादा विषय वाचावा, समजून घ्यावा, स्वतःमध्ये मुरवावा, त्यावर चिंतन-मनन करावे, त्यातून व्यापक बदलाचे बीज पडावे ही प्रक्रिया स्वतःला सुजाण, सुशिक्षित, सुसभ्य म्हणवणाऱ्या समाजात जैविकपणे घडायला हवी. परंतु, तेवढी उसंत वाचक प्रेक्षकांना मिळू नये, त्याने साकल्याने विचार करायला सुरुवात करू नये, यासाठी दीपवून टाकणाऱ्या, धक्का देणाऱ्या घटना सतत घडवून आणणे, उत्सव साजरे करणे सुरू आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

खरे तर या सगळ्या जाणीवपूर्वक घडवून आणलेल्या अनागोंदीत मुख्य प्रवाहातला दैनंदिन स्वरूपातला मीडिया आणि सोशल मीडियामध्ये बरेच काही विचारप्रवर्तक, खूप काही बुद्धी आणि मनाला भिडणारे प्रसृत होत असते. पण, राज्यकर्ते जाणीवपूर्वक घटनांचा असा काही वेग वाढवतात की, दर मिनिटाला त्या घटनांशी संबंधित माहितीचे, अपमाहितीचे, अपप्रचारी स्वरुपाच्या माहितीचे डोंगरच्या डोंगर उभे राहत जातात. अर्थपूर्ण, स-भान वाद-विवादांपेक्षा बेभान क्रिया-प्रतिक्रियांचे चक्र गतिमान होत जाते. त्या आक्रमक, उद्दाम नि आततायी व्यवहारांतून जे डोंगर उभे राहतात, त्या डोंगराखाली गांभीर्याने घ्यावे असे लिखित वा दृश्यचित्रात्मक साहित्यही गाडले जाते. त्या साहित्याचे मूल्य कितीही मोठे असले तरीही, काही मिनिटांत वा तासांत सार्वजनिक चर्चेतून ते गायब होते वा केले जाते.

आपल्याला ठाऊक असेल, एकेकाळी सकाळी प्रकाशित होणारे वृत्तपत्र शिळे होण्याचा कालावधी बऱ्यापैकी मोठा म्हणजे, संध्याकाळपर्यंतचा चांगला बारा-तेरा तासांचा असे. मग माहिती-तंत्रज्ञानाधिष्ठित इंटरनेट युग अवतरले. त्यामुळे हा बातम्या शिळे होण्याचा कालावधी झपकन निम्म्यापेक्षा कमी झाला. गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून मूल्य व्यवस्थेची कोणतीही चौकट न मानणाऱ्या सोशल मीडियाने संपादकीय मूल्यव्यवस्थेशी बांधील असलेल्या वृत्तपत्रसृष्टीवर शिळोप्यानेच प्रकाशित होण्याची नौबत आणली आहे. वस्तुतः अबाधित संपादकीय मूल्य व्यवस्थेचा (Editovial Value System) थेट संबंध लोकशाहीच्या सुदृढतेशी आहे. परंतु, यासंबंधातले प्रस्थापितांचे भान सुटत चालत चालले आहे. ही अवस्था अधिकारीशाही हुकूमशाही प्रवृत्तीच्या राज्यकर्त्यांच्या कमालीशी सोयीची आणि लोकशाहीवादी जनतेसाठी तितकीच धोकादायक आहे.

‘मुक्त-संवाद’ची उद्दिष्टे

या वास्तवाचे भान राखून नव्या ‘मुक्त संवाद’ची आम्ही रचना केली आहे. याचा मुख्य उद्देश, वाचक प्रेक्षकांनी उथळ क्रिया-प्रतिक्रियांच्या सत्ताधाऱ्यांनी लावलेल्या सापळ्यात न अडकता, व्यक्ती आणि समष्टीच्या पातळीवर स्वतःचा नव्याने शोध घ्यावा हा आहे. स्वतःला आणि समष्टीला शोध घ्यायला भाग पाडणारा एक लक्षवेधी प्रयोग सध्या काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने राबवत आहेत. त्यांचा उद्देश जनतेच्या मनातला विद्वेष नि विखार काढण्याचा, त्याला पुन्हा एकदा सुजाण नागरिक बनवण्याचा दिसतो आहे. म्हणजेच एका स्तरावर राहुल गांधी विद्यमान सत्ताधाऱ्यांनी निर्माण केलेल्या मूल्यविहिन राजकीय व्यवस्थेत नागरिकांच्या सहभागाने परिवर्तन घडवू इच्छित आहेत.

राहुल यांच्या या उपक्रमाचा पक्षविस्ताराच्या पातळीवर कसा उपयोग करून घ्यायचा, हे काँग्रेस पक्षापुढील आव्हान असणार आहे. काँग्रेसजन त्यांची जबाबदारी पेलतील न पेलतील. मात्र, भारत जोडो यात्रेमुळे मन आणि मतपरिवर्तन झालेले नागरिक प्रभाव ओसल्यानंतर पुन्हा एकदा शासनसत्तेपुढे शरण गेलेल्या प्रस्थापित मीडिया आणि सोशल मीडियाच्या अपप्रचाराच्या गर्तेत ओढले जाण्याची शक्यता खूप मोठी आहे. ते टाळण्यासाठी या वाचक प्रेक्षकरूपी नागरिकांना पुन्हा एकदा सत्याधारित निर्भेळ माहिती - ज्ञानाकडे वळवण्याची खूप मोठी जबाबदारी समातंर वा पर्यायी स्वरूपाची पत्रकारिता करणाऱ्यांना घ्यावी लागणार आहे, याचीदेखील जाण नव्या वर्षात आपल्यापुढ्यात येताना आम्ही बाळगून आहोत.

लोकशाहीतला दांडगाईखोर विद्यार्थी

आता थोडा वेगळा मुद्दा, पण प्रस्तुत विषयाला धरून असलेला. अलीकडेच निवडणूक तज्ज्ञ यशवंत देशमुखांनी डिजिटल चॅनेलवरच्या एका चर्चेदरम्यान लोकशाहीत निवडणुकाच तर सर्वोच्च परीक्षा असतात, असे अर्धसत्य कथन करणारे विधान केले. पंतप्रधान मोदी प्रत्येक परीक्षेत सर्वतयारीनिशी उतरतात, प्रत्येक परीक्षा गांभीर्याने घेतात. त्यात तन-मन झोकून देतात, यात काहीच चुकीचे नाही, असे सांगताना, राहुल गांधी मेहनत घेतात, आताही ‘भारत जोडो’ यात्रेत त्यांची मेहनत दिसतेय, पण परीक्षा गणिताची आहे, आणि तयारी चाललीय इंग्रजी पेपरची... त्यात बीए ऑनर्स मिळवण्याची! असा उपरोधिक सूर या महाशयांनी लावला.

मात्र, नरेंद्र मोदी नावाचा, परीक्षेसाठी सर्व आयुधांसह सदा उत्सुक, सदा सज्ज असलेला हा विद्यार्थी आपले सामाजिक-राजकीय वजन वापरून कुलगुरू, प्राचार्य, पर्यवेक्षक, परीक्षक अशा सगळ्यांना वश करतोच, पण ऐन परीक्षेच्या तोंडावर परीक्षेला बसलेल्या वा बसू इच्छिणाऱ्या इतर विद्यार्थ्यांची वह्या-पुस्तके आदी साधनसामग्री जप्त करवतो, त्यांच्या तयारीत, अभ्यासात अनंत अडथळे आणवतो, या विद्यार्थ्यांविरोधात गावभर कंड्या पिकवतो, त्यांचे मानसिक-भावनिक पातळीवर खच्चीकरण करतो, त्यांना शिक्षा घडवतो, प्रसंगी मोठी अद्दलही घडवतो. अशा सर्व प्रकारच्या राजकीय लांड्यालबाड्या करून, व्यवस्था खिशात ठेवून दरवेळी तो परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण होत जातो. त्याला ना निरीक्षक अडवतात, ना परीक्षक त्याला मिळत असलेल्या भरघोस सोयीसवलतींवर आक्षेप घेतात.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

अरविंद केजरीवालांसारखे जे त्यांच्यासारख्याच लांड्यालबाड्या करण्यात वाकबगार असतात, वा लांड्यालबाड्या करण्याची धमक दाखवतात ते काही वेळा मोदींना हरवतातही. म्हणजे एकूण निवडणूक नावाची ही परीक्षा तुम्ही ‘बाय हूक और क्रूक’ कशीही जिंकली पाहिजे, असेही यशवंत देशमुख सुचवतात. पण याच ट्वेंटीफोरबायसेव्हन साम-दाम-दंड-भेद नीतीने या देशामध्ये विद्वेष आणि विखार पेरला आहे. एका नागरिकाचा रोबोटिक मतदार तेवढा करून ठेवला आहे. सत्ताधाऱ्यांसाठी तो निवडणूक जिंकून देणारा वा हरवणारा निव्वळ एक आकडा होऊन बसला आहे.

या रोबोमध्ये चलाखीने प्रोगाम फिट केले गेले आहेत. म्हणजे, लाल, हिरवा हा रंग दिसताच वा इस्लाम, ख्रिश्चन हे शब्द नजरेस येताच, हल्ले करण्याची कमांड या व्यवस्थेने फिड करून ठेवलेली आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनास जरी हिरवा रंग दिसला तरीही हे नागरिकनामक रोबो ऑफलाइन ऑनलाइन हल्ले सुरू करतात, कडव्या लाल रंगाशी संबंधित लेखकाच्या अनुवादित पुस्तकाला जाहीर झालेल्या राज्य पुरस्काराविरोधात रान पेटवतात की मग सत्तेत बसलेले या रोबो मंडळींचे छुपे रक्षणकर्ते अडाणीपणाचा कळस गाठत क्षणात निर्णय फिरवतात.

या वर्तमानातील दंडेलीविरोधात राहुल यांची ‘भारत जोडो’ यात्रा सुरू आहे, याची दखल घेणे मात्र हे देशमुख महाशय (आणि स्वतःस वस्तुनिष्ठ पुरोगामी म्हणावणारे अनेक) नाकारतात. न पेक्षा मोदींच्या शत्रुकेंद्री राजकारणापुढे तुम्हाला टिकायचे असल्यास एनजीओटाइप कार्यक्रम हाती घेण्यापेक्षा तसेच आणि तितकेच विखारी राजकारण विरोधकांना करावे लागेल, अन्यथा खैर नाही, असेही अप्रत्यक्षपणे सुचवतात. हा आग्रह निःसंशय कारस्थानी स्वरूपाचा असतो.

या गदारोळात मुद्दा नागरिकांचे स्वभान जागवण्याचा, उथळपणा टाळून अर्थवाहीपण सांभाळण्याचा आहे. हिट्स, लाइक्सच्या पलीकडे जाऊन वाचकांनी गांभीर्याने परिस्थिती समजून घेण्याचा, त्यावर चिंतन-मंथन होण्याचा, त्यातूनच सघन परस्पर वाद-संवाद घडत जाण्याचा आहे. आम्ही गेली दोन वर्षे याच दिशेने प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. ‘मुक्त-संवाद’ला सुरुवात केली, तेव्हा या अंकाचा वाचक मुख्यत्वे जागतिक घडामोडींचे भान असलेला, बहुश्रुत नि बहुविध विषयांची जाण असलेला असा होता. मात्र, हे वाचकवर्तुळ विस्तारत जाऊन ज्या वर्गसमूहांत पहिली किंवा दुसरी पिढी वाचू-लिहू लागली आहे. ज्या पिढीची वाचनभूक मोठी आहे, अभिव्यक्तीची आस मोठी आहे, अशा वर्गांपर्यंत पोहोचण्याचा, त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय कथनाचा भाग होतील, हे पाहण्याचा ‘मुक्त संवाद’चा यापुढील काळात प्रयत्न असणार आहे. अर्थातच, जी-२० देशाच्या वार्षिक प्रमुखपदापासून ते २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंतचा काळ एका पातळीवर चढत्या भाजणीने उत्सवी होत जाणार असला तरीही वैचारिक विरोधकांसाठी खूप आव्हानात्मक असणार आहे. कारण, याच उत्सवांच्या चकचकीत आवरणाखाली विरोधी विचार बंदिस्त करण्याचे हरतऱ्हेने प्रयत्न होत राहणार आहेत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

२०१४नंतर राजकारण आणि संस्कृतीकारणाचे नियम उलटेपालटे केले गेले. तत्पूर्वी कोण, कुठल्या विचारधारेचा, पक्षाचा वा संघटनेचा हे न पाहता परस्परसंबंधांत सुरळीतपणा कायम होता. खूनशी राजकारण आजच्या इतके घरादारांत शिरले नव्हते. परंतु, आता बारशापासून अंत्यविधीपर्यंतच्या प्रसंगांत सत्ता समर्थक आणि सत्ताविरोधक यांच्यात काळ वेळ न बघता वादाचे, भांडणाचे, वितुष्टाचे प्रसंग उद्भवताना दिसत आहेत.

रोबोटिक बनलेला सत्ताप्रेमी वर्ग विरुद्ध विवेकबुद्धी शाबूत असलेला सत्ताविरोधी वर्ग असा भेद आता घरापासून सार्वजनिक सभा-समारंभापर्यंत ठळक दिसतो आहे. हे खरे तर आजारी मनोवृत्तीच्या समाजाचे लक्षण आहे. सत्ताकारण हेच अंतिम ध्येय या विचाराने पछाडलेल्यांना समांतरपणे बळावत चाललेल्या मनोविकाराशी तसेही काही देणेघेणे दिसत नाही.

अशा प्रसंगी विचारांच्या माध्यमातून लोकशाहीसंगत विधायक मार्ग अवलंबून एक वीट रचण्याचा मानस आम्ही बाळगून आहोत. शेवटी, प्रस्थापित व्यवस्थेला सर्वाधिक भय शस्त्रास्त्रांचे नव्हे, तर मुक्त विचारांचे, मुक्त संवादप्रिय व्यक्ती वा समाजाचे असते. त्यामुळे जेव्हा जेव्हा या व्यवस्थेमध्ये भयाची भावना दाटून येते, तेव्हा तेव्हा प्रस्थापित आणि वैचारिक विरोधक यांच्यात कडवा संघर्ष उभा ठाकतो.

त्या अर्थाने आम्ही निवडलेली वाट अवघड खरी, परंतु या नव्या वाटेवरल्या नव्या वळणावर तुमची साथसोबत कायम असेल ही खात्री आहे.

पुन्हा एकदा आपणा सर्वांना नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि आपणास आरोग्य नि मनाची शांतता निरंतर लाभत राहो, ही मनोकामना.

हॅपी न्यू इयर!!!

.................................................................................................................................................................

‘मुक्त-संवाद’संदर्भातील प्रतिक्रिया आणि सूचनांसाठी संपादक डॉ. विवेक कोरडे यांच्याशी 09833075606 या मोबाईल क्रमांकावर अथवा drvivekkorde@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 18 January 2023

काय हो संपादक महाशय,
तुम्ही म्हणता की खुनशी राजकारण आजच्या इतके घरादारांत शिरले नव्हते. मग १९९० साली काश्मिरी हिंदूंचा जो नरसंहार झाला तो खुनशी नसून फार प्रेमळ होता होय? उद्या हीच परिस्थिती अन्य हिंदूंवर येऊ शकते. त्याविषयी कोणी आवाज उठवायचा? तुम्ही उठवणार का?
आपला नम्र,
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......