२०२२चे सोलापूरचे ‘लोकमंगल साहित्य पुरस्कार’ रविवार, ८ जानेवारी २०२३ रोजी समारंभपूर्वक दिले जात आहेत. त्यानिमित्ताने त्यातील एका पुस्तकाचा हा परिचय...
............................................................................................................................................
रमेश इंगळे उत्रादकरांची ‘कादंबरीची गोष्ट’ ही प्रत्यक्षात तिच्या निर्मितीमागच्या अपरिहार्य वेदनांची गोष्ट आहे. आपले लेखक हे बिरूद अभिमानाने मिरवणाऱ्या लिहित्या लेखकाला एका कादंबरीलेखनाच्या सर्वार्थाने त्रासदायक तरी हव्याहव्याशा वाटणाऱ्या अनुभवातून पार होत असतानाच करोनाकाळात समाज आणि शासनव्यवस्थेच्या, नोकरशाहीच्या अत्यंत विकल करणाऱ्या अनुभवाला सामोरे जावे लागते. संक्रमित झालेली त्यांची मोठी बहीण हातभर अंतरावर असूनही एकाकी अवस्थेत जाते. या अनुभवाचा, दुःखाचा, हतबलतेचा आपल्या सर्जनशील म्हणवतो, त्या लेखनाशी कसलाच संबंध नाही, हे जाणवून भांबावून जातो लेखक. आपले शब्द प्रत्यक्षातल्या आयुष्यात कसलाच हस्तक्षेप करू शकत नाहीत, आपली-आपल्यांची दुःखंव्यथावेदनाकाळज्या यांच्यावर कसलीच फुंकर ते घालू शकत नाहीत, या जाणिवेनं अंतर्बाह्य हादरून जातो, घायाळ होतो लेखक. त्यातून लिहिणं वा कुठलीही निर्मिती शेवटी कशासाठी असते नक्की, या मूलभूत प्रश्नाशी त्याचा झगडा सुरू होतो, त्याची ही गोष्ट आहे. कुठल्याही गंभीर निर्मितीमागच्या अटळ वेदनेची गोष्ट.
शिस्तशीर क्रमाने घडत गेलेला सुखवस्तू म्हणावासा, लेखकपणाच्या प्रतिष्ठेची शाल अभिमानानं मिरवणारा, पण लेखनक्रिया गांभीर्याने घेणारा असा हा लेखक. भवतालाचं आपलं भान व्यापक, सजग आहे, अशी जाणीव त्याला आहे. लेखनाची सुचण्यानंतरची त्याची कागदावर उतरण्याची केवळ कष्टसाध्य निर्मितीप्रक्रिया तो नव्या नुकत्याच लिहून हातावेगळ्या केलेल्या तिसऱ्या कादंबरीच्या निमित्ताने सांगतोय.
लेखक एखादी गोष्ट आधी मनात रचतो, नंतर शब्दांच्या आधारानं कागदावर उभी करतो. दोनशे, तीनशे, चारशे वगैरे पानं लिहून काढतो. अक्षरशः ढोरमेहनत. पोट-कंबर एक होते. तासनतास भिंतीला टेकून बसतो तो. घड्याळ विसरतो, सगळी दैनंदिनी उलटीपालटी होते. तहान-भूक विसरते. लिहून लिहून हाताला वात येतो, डोळे शिणू-दुखू लागतात. पाठीचा कणा ठणकू लागतो. माकडहाडातून कळा उठतात. कुल्ल्याला टिचरं पडल्यासारखं होतं… खूप काही होतं. तो ते भोगतो, विनातक्रार सोसतो. सांगेल कुणाला? कुणी काही लिहिण्यासाठी त्याच्या हातावर गूळ दिलेला नसतो, त्याचीच खाज असते. तो ती मिटवतो.
मग खर्डे… समोरच्या कागदांच्या चळतीत विषयाला धरून पण काहीएक संगती नसलेला आशयांच्या पुंजक्यांचा विस्कळीत पसारा. तो आवरत नाही तोवर अस्वस्थता, घालमेल संपत नाही. तो डोळ्यांखालून पुन्हा घालायचा, मनात संगती धरून काही भर-घट होते. अनिश्चिततेच्या ताणाचे दिवस. याही काळात घरगुती विवंचना व्यवधानं चुकत नाहीत. त्यात मनात समांतर अस्ताव्यस्त पसरलेली गोष्ट. ती हाका मारत राहते. त्या थांबल्या तर वेगळीच तडफड. पुन्हा असह्य वाट पाहिल्यावर नव्यानं भिडणं. दुसरा खर्डा. पहिल्यात कागदाच्या दोन्ही बाजूला सोडलेले समास बारीक अक्षरांच्या नक्षीने भरत जातात. आता काही आकार येतो. संवाद-भाषा-पात्रं-घटनाप्रसंग बदलतात. समाधान नावाची गोष्ट मनात वस्तीला आलेली नसतेच तरी.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
लिहिणारा एक, वाचणारे हजार. तरी या टप्प्यावर आपले असे काही सहृदयी मित्र, समीक्षक असे थांबे असतात. त्यांचा सल्ला विचारात घेऊन मग तिसरा खर्डा. त्यात निसटलेले-पुनरावृत्त झालेले संदर्भ तपासत गोष्टीला आपला असा आकार द्यायचा. काही उणे असतेच तरी आता काहीसे प्रसववेदनेनंतरचे समाधान गाठीला येते.
कादंबरी लिहण्याचा हा काळ आणि नंतरही ती लिहून पुरी होते तरी पुस्तकांत प्रकाशित होऊन सार्वजनिक झालेली नाही असा मधला काळ. यात हा लेखक कादंबरीचे वा कुठल्याही कलात्मक लेखनाचे लेखकाशी असलेले जैवनाते उलगडत राहतो वेगवेगळ्या संदर्भात. म्हणजे कादंबरीतली इतका काळ मानगुटीवर बसून राहिलेली पात्रं, त्यांचे प्रत्यक्षात कुठे कुठे दिसत राहणे, त्यांच्या ‘जाती’, सामाजिक पार्श्वभूमी... कथेतल्या त्यांच्या वर्तनाचा सांधा याच्याशी जुळतोय नं? हे सगळं वाचक कसं घेतील? यावर मग लिहायचं ते वाचकाला आवडावं म्हणून का स्वतः लेखकाला? संपूर्ण निर्दोष, परिपूर्ण अशी रचना असते का? लेखनकाळात मनातल्या या सगळ्या मंथनात त्याला ती बाह्य जगापासून तोडू पाहते.
एका वास्तव जगात वावरताना तो दुसरेच (कल्पित?) जग डोक्यात घेऊन वावरतो, काहीसा एकलकोंडा होत जातो. रचलेले, म्हणून नियंत्रित भासणारे डोक्यातल्या कथेतले जग आणि बाहेरचे वास्तवातले अनियंत्रित जग यातले वाढत जाणारे अंतर कळतंय पण वळत नाही असा त्रास देते. रचना मनाजोगती पुरी होईतो, वास्तवातल्या पण या काळात बदललेल्या जगात परतेतो व्यापून असणाऱ्या कासाविशीतच लेखक खऱ्या जगात परततो काहीशा नाईलाजाने, तेव्हा प्रत्यक्षात ही ‘कादंबरीची गोष्ट’ सुरू होते.
लेखन आणि लेखनप्रक्रिया याला वाचकांच्या मनात असलेल्या कथित ग्लँमरची पुटं बाजूला सारत लेखनाची दमवणारी शारीर-मानसिक प्रक्रिया या कादंबरीत सुरुवातीलाच तपशीलानं मांडतात उत्रादकर. कारण नंतरच्या गोष्टीशी त्याचा नाळेचा संबंध आहे. ती बरीचशी त्यांच्याच शब्दांत सांगितली, कारण पुढे एका असह्य घटनाक्रमात लेखक आपले लेखनाशी असलेले नातेच खोटे, प्रत्यक्ष जगण्यापासून लांब घेऊन जाणारे, कृतक ठरवून तोडू पाहतो, तेव्हा त्याचे गांभीर्य उमजावे. निर्मितीच्या सगळ्या शारीर मानसिक उलाघालीत सहा-सात वर्षं शिणून लेखक समाधानाच्या समेवर येतो, तेव्हा करोना नावाचा राक्षस गावाच्या वेशीवर धडका देतो आहे.
सुरुवातीच्या सक्तीच्या बंदिवासात आभासी माध्यमांमधून डोळ्या-कानांवर आदळणाऱ्या वास्तवातून आपल्याच जगाच्या अंतर्मनाचे उलगडत गेलेले भयाण ताणेबाणे बधिर करत जातात लेखकाला. आपण समजून-उमजून, चिंतन वगैरे करून, जाणत्या सुहृदांशी सल्लामसलत करून लिहित होतो, ते प्रत्यक्षातल्या जगण्यापासून इतके लांब होते, ही या काळात होत जाणारी जाणीव त्याला तळातून हादरवते. लादलेल्या एकान्तात फक्त स्मशानवाटांवर वाढत चाललेली बेवारशी रहदारी आधी केविलवाण्या न् मग थंड अलिप्ततेने पाहणे. लेखकाचे मन काही नोंदी करतच असते, तरी येणाऱ्या अनुभवांचा आकार एवढा अक्राळविक्राळ मोठा होत जातो की, एका वेळेस सगळेच नियंत्रणाबाहेरचे, केविलवाणे, संदर्भहीन होते तरी त्याला व्यक्तिगत संदर्भ अजून यायचेच असतात.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
अकाली गेलेल्या नवऱ्यानंतर एकटीने हिंमतीने संसाराचा गाडा रूळावर आणणारी मोठी बहीण संक्रमित होते. आईनं परिस्थितीवश खस्ता खात एकटीनंच वाढवलेली वयानं जाणती, अशी दोन्ही भाचरं भांबावून जातात. आधी नाईलाजाने फोनवरूनच सल्लामसलत. असहायता, हतबलता भरून आली आहे सगळीकडेच. चित्रकार मित्र हा लेखकाचा विसाव्याचा थांबा. तोही फोनवरून कविता ऐकवतो,
‘...आपल्या लांबी रूंदी एवढा
जमिनीचा एक तुकडा असतो
आपल्या येण्याची वाट बघत बसलेला
जन्मजन्मांतरीची चिरपरिचित माती असते
आपल्यातल्या पंचमहाभूतांच्या
भेटीसाठी आसुसलेली.’
ऐकून लेखकाला वाटते, कलावंत-लेखकानं संवेदनशील असावं पण हतबल, पराभूत होऊन नये… पण रस्तोरस्ती चाललेले मरणांचे तांडे मूकपणे पाहताना संवेदनेचे यापेक्षा वेगळे काय व्हावे?
बहिणीला करोनाची बाधा झाली या नुसत्या संशयानेच भवताल बदलत जातो. शेजारीपाजारी, गाववाले अंग आक्रसून घेतात. आप्तांचं, अगदी घरातल्याही, वागणं बदलत जातं तरी त्याला सोईस्कर कप्प्यात कसे ढकलावे? मरणभय काय काय करवून घेते… आपला लेखक आणि गोंधळूनभांबावून गेलेली त्याची भाचरं मिळून त्यांची जणू अंतहीन किंवा कदाचित आत कुठेतरी अपरिहार्य अपयशी शेवटाची जाणीव असलेली लढाई लढू लागतात.
या काळातला लेखकानं नोंदवलेला घटनाक्रम हा काळाचा, आपला अपराधगंड शाबूत ठेवावा यासाठी तरी किमान, गोंदवून ठेवावा असा दस्तऐवज आहे. आधी एरवी ओळखीचे, नेहमीचे डॉक्टर भेटत नाहीत, मग बाहेर न्यायला वाहन. माणसं अचानक आपापल्या कोशात जणू मिटून गेलीत. कसाबसा जुगाड करून नेल्यावर शासकीय दवाखान्यातले, एकूण व्यवस्थेतलेच माणुसकीची नापास होणारी परीक्षा पाहणारे अंतहीन हेलपाटे. ‘आत आणि बाहेरही हवेत दुःखाचा, वेदनेचा चिरंतन गंध’ असे शब्द वापरतात उत्रादकर. चांगुलपणा, माणूसकी आणि एकूण आयुष्यावरचाच विश्वास मुठीतल्या वाळूसारखा निसटत जातो. या सगळ्याला झगड्याचं, संघर्षाचं, प्रयत्नांचं रूप येतच नाही. पराकोटीची हतबलता.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
एकूण या संकटाची व्याप्ती पाहता हेही समजून घेता यावे असा पुढचा, बहिणीचा शेवटचा प्रवास. आपल्यापासून लांब, जणू अज्ञातात एकटीच रात्री आपण बाहेर खाण्या-झोपण्याचा जुगाड करत होतो त्या काळात कधीतरी गेली ती. ‘जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी...’ असे वाटून मूक रूदन करत राहतो लेखक.
त्याला वाटते, ‘दुर्लक्ष, हलगर्जी, निष्काळजीपणा, हेळसांड, टोलवाटोलवी, कोरडेपणा, अनागोंदी, बेपर्वाई, उदासीनता, ढिसाळपणा, आत्मकेंद्रितता, उडवाउडवी, बेजबाबदारपणा, कामचुकारपणा, असहकार्य, अधर्म, अडवणूक, असहिष्णुता, अनास्था… सगळ्यांनी मिळून ही शस्त्रं वापरली, आणि तिला मृत्यूच्या कराल दाढेत लोटून दिलं…’
या कादंबरीत नव्या कादंबरीच्या लेखन काळात, नंतरही समांतर घडत असणारे करोनाचे क्रूर दीर्घस्वप्नासारखे वास्तव, त्यांच्या आगेमागे घडणाऱ्या अनेक सामाजिक, राजकीय पटावरील घडलेल्या घटनांचे संदर्भ येतात. त्यामुळे या काळानं लादलेल्या सक्तीच्या एकांतातली लेखकाची चिंतनशील स्वगतं ही रचित संभाषितं न वाटता या भयाण बाह्य वास्तवात आतून आलेले म्हणून कदाचित अधिक परिणामकारक, अंतर्भान वाटते. गांभीर्याने केलेले लेखन ही लेखकाची राजकीयसामाजिक व्यवहारांवरची प्रतिक्षिप्त क्रिया असावी तितकी सहज पण सजग प्रतिक्रिया वाटत आली, ते प्रत्यक्षात आपले आपल्याच कोशात स्वान्तसुखाय रमणे होते? रोम जळत असताना सम्राट नीरो फिडल वाजवत होता म्हणे, तसे? हजारो वर्षांच्या लोकव्यवहारातून अस्मानी-सुलतानी संकाटांमधून तावून सुलाखून निघालेले संस्कृती नावाचे भरजरी वस्त्र प्रत्यक्षात इतके कुचके, विरलेले होते? लेखक म्हणून आपण पांघरलेली प्रतिष्ठित पणाची झूलही?
बहीण विपरीत परिस्थितीत जाताना जणू लेखकाची लिहिण्याची, व्यक्त होण्याची इच्छाच घेऊन जाते. त्याला वाटते, ‘लेखनासाठी आवश्यक विश्वास आणि बळ दोन्ही आता आपल्याजवळ उरलेले नाही. मनात या काळात एक अगोचर भय वस्तीला आलं आहे. घडले ते रचण्यासाठी कल्पनेत पुन्हा अनुभवावे लागते, त्याचीच भीती वाटतेय’ इथपासून ‘काय मिळतंय लिहून, काय फरक पडतोय त्यानं तुझ्या, इतरांच्या आयुष्यात? जे घडलंय वा घडणार आहे त्यात काही हस्तक्षेप करता येतोय का तुझ्या शब्दांना? यातनावेदनाजखमा यांना थोपवून धरले शब्दांनी, असं झालंय? वेदनेची, दुःखाची गोष्ट शब्दांनी लिहिता येते, पण वेदना-दुःखाचे पर्याय होतात का शब्द? एकंदर प्रत्यक्ष जगण्याला पर्याय होते लिहिणेवाचणे?’ अशा उत्तरहीन प्रश्नांनी घायाळ होत राहतो लेखक.
शब्दांनी एखादा व्यूह रचणं आणि त्यातून काही नवनिर्माण केल्याच्या समाधानात तरंगणं निरर्थक वाटू लागतं त्याला. चित्रकार मित्राशी हा अनुभव तपशीलानं वाटून घेत लेखक काही रिता होतो. प्रश्न असतातच मनात तरी. यानंतर चित्रकार मित्रानं लेखकाला वॉट्सपवर लिहिलेले दीर्घपत्र हे मराठीतले निर्मितीसंदर्भातले अलिकडचे महत्त्वाचे संभाषित ठरावे. प्रत्यक्षातल्या अशा अनुभवान्ती येणारं वैफल्य, नैराश्य या अटळ अवस्था आहेत कलावंताच्या आयुष्यातल्या. पण तरी सर्जनाची वाट क्षणिक उद्वेगातून वाटले, तरी सुटत नाही. गृहितकं, धारणांची मोडतोड होते तरीही. अभिव्यक्तीची आस असलेले कलावंत हे यात्रिक असतात, शाश्वताच्या निरंतर शोधयात्रेतले. आपल्याला जगणं कवेत घेतलंय, असं प्रत्येक निर्मितीच्या वेळी वाटतं, तरी प्रत्येक वेळी लक्षात येतं की, त्यापलीकडे जगणं उरलेलं आहेच, याअर्थाने निरंतर.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
हे वाचताना मला ‘कादंबरी वा कुठलीही लेखनकृती ही स्थिर गोष्ट असते. सांगून झालेली असते याअर्थी स्थिर. अन आयुष्य वाहते असते, निरंतर बदलते. नदीत येणारे पाणी प्रत्येक क्षणी बदलेले असते तसे. म्हणून अभिजात म्हणतो तशा साहित्यकृती कालान्तरात येतच राहतात’, असे सरदेशमुख कादंबरीवरील चिंतनात म्हणाले आहेत, त्याची आठवण झाली. अर्थात जगणं सहज सोपं नसलं तरी सुंदर आहेच. वैफल्य, नैराश्य मळभासारखं, ते कायम राहत नाही... असं काही लेखकाला फार मूलभूत, वेगळं नाही तरी आवश्यक असं महत्त्वाचं सांगत राहतो तो..
आपला त्रागा, चिडचिड ही तात्कालिक उद्वेगातून आलेली खरी तरी ती अखेर प्रतिक्रियाच होती, हे लक्षात आलेल्या लेखकाच्या चेहेऱ्यावर काही समाधानाचे हसू परत आले आहे, आकाश निरभ्र होत आहे..
ही कादंबरी अनेकार्थाने महत्त्वाची आहे. ‘निशाणी डावा अंगठा’मधला उत्रादकरांचा उपरोधाचा धारदार सूर ‘सर्व प्रश्न अनिवार्य’मधल्या वास्तवदर्शनाने काहीसा स्तंभित, हतबल झालेला आहे. या कादंबरीत तो यापुढच्या नैराश्याकडे वळताना दिसतो, तरी त्यात सर्जनातल्या मूलभूत अस्वस्थतेचेही दर्शन होते. लेखन वा कुठलीही अभिव्यक्ती आणि प्रत्यक्षातले आयुष्य यातल्या अंतःसंबंधाची यात चर्चा होते. कादंबरीचा शेवट मात्र अपरिहार्य तरी काहीसा ओढूनताणून आणलेला वाटतो, आधीच्या सगळ्या वाचनानंतर वाचकांवरही आलेले मळभच हे.
‘एका कादंबरीची गोष्ट’ - रमेश इंगळे उत्रादकर
शब्द पब्लिकेशन, मुंबई
पाने १७१ | मूल्य - ३०० रुपये.
............................................................................................................................................
लेखक नीतीन वैद्य पुस्तकप्रेमी आहेत.
vaidyaneeteen@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment