२०२२चे सोलापूरचे ‘लोकमंगल साहित्य पुरस्कार’ रविवार, ८ जानेवारी २०२३ रोजी समारंभपूर्वक दिले जात आहेत. त्यानिमित्ताने त्यातील एका पुस्तकाचा हा परिचय...
............................................................................................................................................
रवींद्रनाथ हे भारतीय साहित्यसृष्टीला पडलेले आणि सत्यजित राय हे भारतीय सिनेमाने पाहिलेले पहाटस्वप्न होते. बंगाली जाहिरात क्षेत्रात, प्रकाशनात पुस्तकांच्या निर्मितीच्या अंगाने (मुखपृष्ठं - नेहरूंच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’च्या मूळ आवृत्तीचे मुखपृष्ठ राय यांचे होते -, टाईपसेटींग - ज्यात चार नवीन फॉण्ट्सची निर्मिती केली - आणि मांडणी) दशकभर मूलभूत महत्त्वाचे काम केल्यानंतर पुढील तीन साडेतीन दशकांत पटकथालेखन, दिग्दर्शन आणि संगीत यासह स्वतःचे ३६ चित्रपट - ज्यांना १००+ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पारितोषिकांनी गौरवले गेले -, पटकथालेखन, संगीत, निवेदन असा १८ बाहेरच्या चित्रपट-लघुपट-जाहिरातपटांतील सहभाग, सिनेमा-आत्मकथनपर चार पुस्तकांसह बालकुमार, विज्ञान, गुप्तहेर रहस्य अशा १००+ कथा-लघुकादंबऱ्यांचे लेखन- बहुतेक सर्व मुखपृष्ठं आणि चित्रसजावटीसह -, वडिलांच्या मृत्यूनंतर बंद पडलेल्या त्यांच्या ‘संदेश’ मासिकाचे चार दशकांनी पुनरुज्जीवन करून पुढे त्यात दीर्घकाळ लेखन, चित्रांसह संपादन. दादासाहेब फाळके, ऑस्कर आणि तीनही पद्मसन्मानांसह भारतरत्न, देशविदेशातील नऊ विद्यापीठांची डि.लिट. वा मानद डॉक्टरेट… ही सगळी एका माणसाच्या एका आयुष्यातली घटिते आहेत, यावर विश्वास बसू नये एवढे हे अचाट कर्तृत्व आहे.
मागे ‘बुक्स ऑन बुक्स’ प्रकारातल्या काही पुस्तकांचा शोध घेताना ‘लिटररी बायोग्राफी ऑफ ऑस्कर वाईल्ड’ आणि हिटलरवरचे ‘हिज प्रायव्हेट लायब्ररी’ या दोन पुस्तकांबद्दल वाचले होते. दोन्हीत त्यांच्या लेखकांनी ही अचाट माणसं, त्यांचं आयुष्य आणि त्यांचं वाचन वा त्यांनी जमवलेली, सांभाळलेली पुस्तकं या दोन्हीत समान, परस्परावलंबी असं काही सापडतंय का याचा शोध घेण्यासाठी दीर्घकालीन परिश्रम केलेले होते. दोन्ही पुस्तकांचे नायक अचाट, बरी-वाईट अफाट प्रसिद्धी लाभलेले, त्यांची वेगवेगळ्या अंगांनी चरित्रंही भरपूर आलेली. तरी यापलीकडे एक मुद्दा धरून पुन्हा त्यांच्याकडे जाण्याची काही नवी, कदाचित आजवर प्रकाशात न आलेलं काही दिसेल अशी वाट सापडतेय का? असा प्रयत्न या लेखकांनी केलेला होता.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
ही पुस्तकं आणि विजय पाडळकर यांचे ‘तो उंच माणूस’ हे सत्यजित राय यांचे चरित्र, यांच्यात काही तुलना अजिबात मनात नाही. पण एखादी अफाट, अचाट व्यक्ती आणि त्याच्या आयुष्यभराची प्रेरणा हा शोध कसा दीर्घकाळ मानगुटीवर बसतो, तसेच अचाट काम करून घेतो एवढ्यापुरतेच हे संदर्भ. शिवाय ही अचाट, अफाट माणसं आणि त्यांचं बरं-वाईट कर्तृत्व यांच्याकडे पाहण्याची आपली अशी एक वाट निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणूनही याकडे पाहता येते.
सत्यजित राय आणि त्यांचं सिनेमा आणि विविध कलांनी समृद्ध आयुष्य यांनी पाडळकरांनाही दोन दशके झपाटून टाकले होते. ‘तो उंच माणूस’मधून पाडळकरांनी ड्रोन कॅमेरातून टिपावे, तशा या ‘भारतीय सिनेमातल्या एवरेस्ट’पर्यंत पोचणाऱ्या अनेक वाटा एकाच वेळी प्रकाशात आणायचा प्रयत्न केला आहे.
हे सोपे, नुसत्या दीर्घकालीन परिश्रमांवर होणारे, संदर्भांच्या चवडींवर भागणारे काम नाही. तरी पाडळकर यात बरेचसे यशस्वी झालेत असे म्हणता येते. ‘बरेचसे’ अशासाठी की, राय यांच्या सिनेमांची, त्यांच्या निर्मितीची, मागच्या-पुढच्या कहाण्यांची, मानसन्मानांची, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या उमटलेल्या पडसादांची तपशीलवार नोंद होते, ‘बाकी राय’ नोंदले जातात इतकेच. अर्थात असे होणे काहीसे अपरिहार्य तरी… असो.
या चरित्रात प्रास्ताविक मनोगताआधी ‘अपूर संसार’ या चित्रपटात अपूच्या तोंडी असलेली रवींद्रनाथ यांची कविता आणि त्याखाली जणू अज्ञातात पाहत असलेले सत्यजित राय असे एक पान आहे. त्या कवितेतल्या ओळी अशा आहेत-
‘आणखी किती दूर तू मला नेणार आहेस?
कुठल्या किनाऱ्याला तुझी ही सोन्याची नाव थांबणार आहे?
मी तुला विचारतो आणि तु फक्त तुझे ते मृदू हास्य करतोस..
तुझ्या मनात काय चालले आहे हे मला समजत नाही.
निशब्दपणे तू बोट उचलतोस आणि किनारा नसलेल्या
समुद्राकडे निर्देश करतोस.
काय आहे त्या दिशेला?
काय आहे जे मी शोधायला निघालो आहे?’
इथे रवींद्रनाथ अर्थात निर्मिकाला उद्देशून बोलत आहेत. सत्यजित राय यांच्या संदर्भात त्यातली अस्वस्थ तगमग काही अंशी तरी पोचवणे, हे पाडळकरांचे मोठे यश म्हणायला हवे. सर्व सिनेमांची साखळी जोडताना त्यातला हा धागा त्यांनी सुटू दिलेला नाही, हे महत्त्वाचे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
सत्यजित राय जागतिक किर्तीच्या सिनेमांचे कर्ते आहेत, त्याआधी ते उत्तम वाचक, लेखकही आहेत. त्यांचे बहुतांश लेखन विज्ञान, रहस्यकथा, बालकुमार वाङ्मयातले असले तरी साहित्याची त्यांची जाण उच्च दर्जाची आहे. त्यामुळे अभिजात साहित्य आणि राय यांचा सिनेमा यात नाळेचा संबंध आहे.
सत्यजित राय यांच्या सिनेमात साहित्यकृतीला असलेले महत्त्व हा पाडळकरांना त्याकडे ओढणारा महत्त्वाचा धागा असावा. ४५ वर्षांपूर्वी ते सिनेमाचे हौशी प्रेक्षक होते, त्या काळी ‘शतरंज के खिलाडी’मधून सत्यजित राय यांच्या कामाशी त्यांचा प्रथम परिचय झाला. त्याचा चित्रपट म्हणून ठसा कालौघात पुसट झाला असणार तरी त्यातल्या वेगळेपणाचा प्रभाव राहून गेला असावा. पुढे राय गेले तेव्हा दूरदर्शनवर पाहण्यात आलेला ‘पथेर पांचाली’ ही या बुजत चाललेल्या संबंधाची लोभस पुनर्भेट होती. त्यात ‘शतरंज के खिलाडी’ पुन्हा पाहिल्यावर त्यात राय यांनी प्रेमचंदांच्या मूळ कथेतल्या आपल्याला जाणवलेल्या आशयाचा भोवतीचा फापटपसारा टाळून केलेला प्रभावी संक्षेप जाणवला. राय यांचे यासंदर्भातले संभाषित त्यांनी प्रास्ताविक मनोगतात नोंदवलेय- “... मी एखादी कथा निवडतो कारण तिच्यातली काही मूलतत्त्वे मला आकर्षित करून घेतात. पटकथा लिहिताना मी काही बदल करतो पण ती मूलतत्त्वे बहुतेक तशीच कायम असतात.”
यातला ‘काही मूलतत्त्वे’ हा कळीचा मुद्दा आहे. पुढे राय यांच्यावर पहिल्यांदा त्यांनी लिहिले त्या अपुत्रयीवरील ‘नाव आहे चाललेली’ (राजहंस, २००४) या पुस्तकात ‘पथेर पांचाली’ आणि ‘अपूर संसार’ या विभूतीभूषण बंदोपाध्याय यांच्या दोन कादंबऱ्यांवर आधारित राय यांनी केलेल्या सिनेत्रयाचा (पथेर पांचाली, अपराजितो आणि अपूर संसार) वेध घेणारे लेखन केले, तेव्हाही ते दोन कादंबऱ्या आणि तीन सिनेमे यांच्या मध्यावर उभे आहेत हे जाणवते.
पुढे दशकभराने ‘गगन समुद्री बिंबले’ (राजहंस, २०१६) या पुस्तकात त्यांनी साहित्य आणि चित्रपट या विषयावर सर्वांगाने चर्चा केली. कादंबरी वाचताना तिला असलेल्या दृश्यमूल्यामुळे मनाच्या पडद्यावर आपण ती नकळत पाहिलेली असते, त्याची आणि राय यांनी पडद्यावर प्रत्यक्ष उभ्या केलेल्या कादंबरीची तुलना होणे साहजिक. हा तसा तुम्हाला अपेक्षांच्या चौकटीत बांधणारा पूर्वग्रह म्हणता येईल. सिनेमा ही स्वतंत्र कला, त्यामुळे अशी तुलना अयोग्य, अस्थानी, काहीशी अन्यायीही, मानणारा जाणकारांचा मोठा वर्ग आहे. पण मूळ साहित्यकृती आधी प्रकाशित होऊन लोकप्रिय झालेली असेल तर राय यांच्यासारख्या दुसऱ्या प्रतिभावंताने त्यातला आशय कसा साकार केला असेल, याची उत्सुकता निश्चित अस्थानी नाही. यात आक्षेपांचा मुद्दा मूळ कथेत केलेले बदल हा नाही, तर ‘मूळ कृतीतल्या आशयाशी राखलेले इमान’ हा असू शकतो. (अर्थात तिथेही दिग्दर्शकाला जाणवलेल्या आशयासंदर्भातच मतभेद असतील तर काय? हा प्रश्न आहेच.)
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
राय यांनी स्वतः लेखक असूनही अपवाद वगळता आपल्या गाजलेल्या बहुतेक कृतींसाठी अन्य लेखकांच्या प्रभावी साहित्यकृतीच निवडल्या आहेत, हेही विसरून चालणार नाही. राय यांनी पटकथा लिहिताना केलेले बदल अभ्यासताना कादंबरीकडे, आपल्याला झालेल्या तिच्या आकलनाकडे पुन्हा पाहण्याची एक संधीही मिळते हाही वेगळा मुद्दा.
अलिकडे फ्रेंच तत्त्वज्ञ, समीक्षक रोला बार्थ याच्यावरचे प्रा.डॉ.आनंद कुलकर्णी यांनी लिहिलेले परिचयपर पुस्तक वाचत होतो. लेखक, त्यानं निर्मिलेली संहिता, ती प्रकाशित झाल्यावर वाचकाचे त्याचा अर्थ लावण्यासंदर्भातले स्वातंत्र्य यावर त्यात बार्थने केलेल्या आगळ्या मांडणीचा परिचय करून दिला आहे. संहिता आणि साहित्य यात फरक करताना संहिता हे अनेकपदरी विणकाम असते, ती वाचकाला सुख देते, तिचं स्वरूप आणि आशय नव्यानं मांडू देते, तिचं पुनर्लेखन करू देते, त्यामुळे काळावर मात करून उरते ती संहिता, कालौघात नामशेष होते ते साहित्य असे (अर्थात विषय गुंतागुंतीचा, त्याचा इतका सुलभ संक्षेप करता येणार नाही तरी) ढोबळमानाने असे म्हणता येईल.
‘तो उंच माणूस’ आणि ‘रोला बार्थ’ एकापाठोपाठ वाचल्याने असेल, पण राय यांनी सिनेमासाठी निवडलेल्या मोठ्या साहित्यकृती या अशा अर्थाने उत्कृष्ट ‘संहिता’ आहेत, असे थोडे विषयांतर करून म्हणता येईल. जगभरच्या अभिजात साहित्यकृतींची 'अनेक' वाचनं केलेल्या पाडळकरांना त्याची ओढ वाटण्यामागच्या कारणांमध्ये हेही एक महत्त्वाचे कारण असू शकते.
राय यांच्या चित्रपटांचा गाजावाजा भारतापेक्षा बाहेरच अधिक झाला आहे. त्यांच्या आंतरराष्ट्रीय सन्मानाची संख्या भारतीय सन्मानांपेक्षा जास्त आहे. तरी त्यांचा सिनेमा पाश्चात्य सिनेमांच्या अजिबात प्रभावाखाली नव्हता, तो अस्सल भारतीय सिनेमा आहे हेही खरे. ‘व्हॉट्स राँग विथ इंडियन फिल्म्स?’ या सात दशकांपूर्वी लिहिलेल्या लेखात त्यांनी तत्कालीन भारतीय सिनेमा, बाहेरील जगात त्याची ‘शेवटी तो भारतीय चित्रपट आहे’ अशा शब्दांत होत असलेली हेटाळणी यावर तळमळीने लिहिले आहे. त्यात या दुखण्यामागचे महत्त्वाचे कारण पाश्चात्य (त्यातही अमेरिकन) सिनेमांचा प्रभाव, तिथल्याही उथळ, तिकडे नावीन्य संपलेल्या कल्पनांची नक्कल हे नोंदवले आहे.
कान आणि डोळे उघडे ठेवून पाहिलेले इथले जीवन हा कच्चा माल, स्वतंत्र कल्पनाशक्ती, प्रामाणिकपणा आणि आपल्या तांत्रिक आणि इतरही मर्यादांचे भान या चांगल्या भारतीय सिनेमासाठी आवश्यक बाबी ठरवल्यात. त्यांचा पहिला सिनेमा यायलाही तेव्हा अजून पाच-सहा वर्षं होती. पुढच्या दीर्घ कारकिर्दीत राय यांनी तयार केलेले सिनेमे पाहिले, तर त्यांनी अननुभवी तरुणवयात केलेले लेखनही स्वतःशी किती प्रामाणिक राहून केले होते, हे लक्षात येते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
कलानिर्मिती, विचारांच्या धुंदीत राय त्यातल्या व्यवहाराच्या बाजूबद्दल अनभिज्ञ राहिले वा काही समजूनही अभिव्यक्तिच्या विलक्षण असोशीने त्यातल्या व्यवहाराबद्दल त्यांना काहीसे बेफिकीर केले असावे. जवळजवळ पूर्ण आयुष्यभर ते भाड्याच्या घरांत राहिले, घर बदलताना, बदलावे लागताना आपण सध्या किती भाडे भरतोय, पुढे किती परवडू शकेल याचीही कल्पना त्यांना नसे. त्यामुळे आयुष्यभर आर्थिक चणचणही कायमची. आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू कशा, कोणत्या असाव्यात हे लग्नाआधी त्यांची आई ठरवे, नंतर अर्थात पत्नी. यातला आपल्या कामाव्यतिरिक्त अन्य बाबीत कसल्याच अपेक्षा नसण्यातला साधेपणा लक्षात घेण्याजोगा.
बौद्धिक संपदेबाबतही दोन वेळेस नामवंत पाश्चात्यांनी त्यांची आर्थिक, बौद्धिक फसवणूक केली. (पाडळकर ही दोन्ही प्रकरणे तपशीलाने लिहितात. ती वाचताना काहीशी खिन्नता येते) तरी चालू कामात व्यत्यय नको म्हणत त्यांनी ती लावून धरणे टाळले. पाडळकर राय यांच्या चरित्रकार मारी सेटनचे एक उदधृत नोंदवतात, त्यात त्यांनी राय यांच्या अडचणी आणि त्रासांकडे दुर्लक्ष करत शांतपणे आपले काम करण्याच्या क्षमतेचा उल्लेख केला आहे.
धर्म, सामाजिक समस्या आणि त्यासंदर्भातली विचारी कलावंत म्हणून असलेली बांधीलकी यावर अर्थात राय यांनी विचार केलेला होता, असणार. त्यांनी सिनेमांची विषयवस्तू म्हणून निवडलेल्या साहित्यकृती हाच त्याचा पुरावा आहे, असे सहजच म्हणता येते. पण एकूणच वाचन आणि संस्कार दोन्हीत एकारलेपण नसल्याने (किंबहुना मोकळेपण असल्याने) त्यांच्या कृतींमध्येही कुठे ते डोकावत नाही. राय अर्थात रूढ अर्थाने अजिबात धार्मिक नव्हते, अर्थात आधुनिकतेचे पुरस्कर्तेही. पण घरातील अन्य कुणाच्या धार्मिकतेची त्यांनी कुठेही हेटाळणी केली नाही. यातले ‘समजून घेणे’ त्यांच्या सिनेमांमध्येही उतरले असावे. पाडळकर राय यांच्या व्यक्तिमत्त्वातले असे विविध कंगोरे असे प्रसंगोत्पात दाखवून देतात, ज्यातून राय यांच्या या ‘पोर्ट्रेट’मध्ये तपशीलांचे रंग भरत जातात.
पाडळकरांनी राय यांचे सिनेमे आधी पाहिले असले तरी त्यावर सलग विचार कदाचित त्यांनी चित्रपट रसग्रहण अभ्यासक्रम केल्यानंतर सुरू केला असावा. अपुत्रयी, त्यात चित्रित झालेली अपरिहार्यता, हतबलतांसह असलेली आयुष्याची सुंदर जीजीविषा, त्याचे या साऱ्यासह असलेले वाहतेपण, दोन अडीच तासांच्या पडद्यावरच्या खेळाने आयुष्य व्यापून टाकण्याचा, तुम्हाला त्याच्या निकट घेऊन जाणारा अनुभव हे लगेच सांगावे-मांडावेसे वाटून त्रयीवर त्यांनी ‘नाव आहे चाललेली’ हे छोटेसे पुस्तक लिहिले होते.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
पुढे अभिजात साहित्य आणि त्यावर आधारलेला सिनेमा हेच सूत्र पुढे नेत त्यांनी राय यांच्या विभूतीभूषण, रवींद्रनाथ, प्रेमचंद आणि इब्सेन यांच्या कृतींवरील राय यांच्या एकूण नऊ सिनेमांवर लिहिले ते ‘समुद्री गगन बिंबले’ या पुस्तकात. याव्यतिरिक्त ‘आनंदाचा झरा’ या अलीकडेच आलेल्या पुस्तकातही ‘आगंतुक’ या सिनेमावरचा लेख आहेच. राय यांच्या सिनेमावर असे बरेचसे लिहून झाले असले तरी त्यांच्याबद्दलचे आकर्षण कायम राहिले यामागचे कारण काय असावे? या मोठ्या कलावंताच्या बहुतेक महत्वाच्या कृतींचा आस्वादविश्लेषणात्मक वेध घेतल्यानंतरही असे काय होते जे पाडळकरांना ‘अजून राहिले आहे’ असे वाटत होते? वा शोधायचे होते? सुरुवातीची टागोरांची कविता आता पाडळकरांच्या संदर्भातच ऐकू येऊ लागते.
चित्रपटांबाहेरचे राय, सगळ्या सिनेमाच्या एकत्रित आकलनातून दिसणारे राय यांचे व्यक्तिमत्त्व, या अफाट कर्तृत्वामागचा दोन हात आणि दोनच पाय असलेला माणूस, अशा अनेक शोधाच्या बाबी असतीलच, पण त्याही पलीकडे आभासी का होईना या विराट माणसाच्या सहवासाचे, संवादाचे सुख..?
‘कंथा’ ही श्यामबिहारी श्यामल यांनी लिहिलेली जुन्या काळातील बुजुर्ग हिंदी कवी, नाटककार जयशंकर प्रसाद यांच्यावरील बृहत् चरित्र कादंबरी अलीकडेच वाचनात आली. ऐंशी ते शंभर वर्षांपूर्वीचे हिंदी साहित्यविश्व त्यांनी बारीकसारीक तपशीलांनिशी त्यात जिवंत केले आहे. त्याच्या प्रास्ताविक मनोगतात त्यांनी संदर्भ गोळा करण्यात दहा-बारा वर्षं गेल्यावर त्यांचा अर्थ लावत प्रत्यक्ष लिहिण्याचा सहा वर्षांचा अनुभव लिहिला आहे, त्यांचं शीर्षक आहे- ‘दो हजार रातों का सवेरा’. म्हणतात, “ये लंबा समय महान सर्जकों के सीधे संसर्गसुख में बीता. कभी लगता प्रसाद के साथ घूम रहा हुं, कभी सामनेसे बोलते प्रेमचंद आते, तो कभी कविता बांचते निराला दिखाई देते…”
वाटते पाडळकरांचीही संदर्भ गोळा केल्यानंतरची प्रत्यक्ष लेखनाची तीन-चार वर्षं अशीच गेली असतील. आपापल्या काळाची सरमिसळ करत सत्यजित राय, रवींद्रनाथ, विभूतीभूषण, प्रेमचंद, घटक-सेन आणि अशा आपलं फाटकं जगणं समृद्ध करणाऱ्या महान सर्जकांच्या सहवासात. या चरित्रातून अशा परात्पर सुखाचे काही तुषार आपल्याही वाट्याला येतात, एका पुस्तकाकडून यापेक्षा अधिक काय मिळावे?
‘तो उंच माणूस’ - विजय पाडळकर
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे
पाने - ५०२ | मूल्य - ७०० रुपये.
............................................................................................................................................
लेखक नीतीन वैद्य पुस्तकप्रेमी आहेत.
vaidyaneeteen@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment