२०२२चे सोलापूरचे ‘लोकमंगल साहित्य पुरस्कार’ रविवार, ८ जानेवारी २०२३ रोजी समारंभपूर्वक दिले जात आहेत. त्यानिमित्ताने त्यातील एका पुस्तकाचा हा परिचय...
............................................................................................................................................
डॉ.बाळ फोंडके अणुभौतिकी आणि जैवभौतिकी या शाखांमधील ख्यातनाम संशोधक आहेत. यात त्यांनी देश-परदेशातील नामवंत विद्यापीठांमधून प्राध्यापकीबरोबरच रोगप्रतिबंधकशास्त्र, पेशी आणि कर्करोग यासंबंधात संशोधनही केले आहे. पण लहानपणापासून असलेल्या वाचनाच्या नादाने त्यांना याला पूरक तरी एका वेगळ्याच वाटेवर आणून सोडले. ज्यांनी लहानपणी झपाटून टाकलं, त्या बाबुराव अर्नाळकरांच्या रहस्यकथेत इन्स्पेक्टर अमृतराव आणि त्यांचे बुद्धिमान मित्र डॉ.कौशिक यांच्या माध्यमातून विज्ञान केंद्रस्थानी आणत त्यांनी शेकडो विज्ञानकथा लिहिल्या. मानवी मनाच्या अगम्य खेळामागचे विज्ञान सुगम भाषेत, वेगवेगळे प्रसंग-शक्यता कल्पित चपखलपणे कथेत बसवले, त्यामागे समजून घेण्याची आणि सांगण्याचीही आस आहे.
वैज्ञानिक माहितीपर लेखनही या काळात त्यांनी बरेच केले तरी ‘ऋणानुबंध’ हे त्यांच्या या दीर्घ लेखनप्रवासातले नवे लोभस वळण आहे. या पुस्तकात फोंडके सहज मानवी प्रवृत्ती आणि त्याच्याशी निगडीत पिढ्यानपिढ्या आपल्या मानसिकतेत रुजलेल्या संकल्पना, त्यातून निर्माण झालेले पूर्वग्रह यांची चर्चा वैज्ञानिक दृष्टीकोनातून, प्राध्यापकी शिस्तीत पण अजिबात बोजड न होऊ देता ललित अंगाने, रोजच्या जगण्यातली उदाहरणं देत करतात. त्यामागे विज्ञान आणि त्याभोवती असलेलं गूढ आवरण काढून सामान्यजन आणि भवतालाशी संबंधित विज्ञान यातलं अंतर कमी करण्याची तळमळ आहे.
२०१३ साली बॉस्टन इथल्या बृहन्महाराष्ट्र मराठी अधिवेशनात ‘ऋणानुबंध’ या विषयावर बीजभाषण करत विचारमंथन सुरू करण्याची संधी फोंडकेंना मिळाली, तेव्हा विज्ञानाशी थेट संबंधित असलेल्या-नसलेल्या हजारोंच्या जनसमुदायाला संबोधित करताना लागलेला संवादी सूर ही या पुस्तकाची नांदी. ऋणानुबंध म्हणजे काय नक्की? फक्त नातीगोती? त्यापलीकडे जात, धर्म, भाषा, राष्ट्र असा कोणताही समान धागा नसतानाही प्रस्थापित होणारे आणि आपलं आयुष्य मजबूत करणारे भावबंध म्हणजे ऋणानुबंध… असं अलिकडेच एका भाषणात ते म्हणालेत. याच शीर्षकाच्या पुस्तकात त्यांनी या संकल्पनेत समाविष्ट विविध आयामांचा विज्ञानाच्या अंगाने शास्त्रीय वेध घेणारे लेखन केले आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
‘ऋणानुबंध’ या पहिल्याच शीर्षकलेखात सर्वसामान्यांचे नातेसंबंध, सख्खे-चुलत-आते-मामे अशी त्यातली उतरंड, बव्हंशी त्यानुसार असलेली त्यातली तीव्रता-जवळीक, सख्खे नंतर उतरत्या भाजणीत असलेले रक्तातून आलेले आणि त्यापलीकडचेही, आपण मनात नकळत अशी जी श्रेणीव्यवस्था ठरवतो, त्यामागे असणारा मेंदूतला ‘केमिकल लोच्या’, माणसाला अन्य प्राणीसृष्टीपेक्षा वेगळं करणाऱ्या त्याच्या सांस्कृतिक-सामाजिक उत्क्रांतीत असलेली या सगळ्याची मुळं यांचा स्तिमित करणारा वेध येतो.
हजारो वर्षांच्या भटकेपणातून (या काळात संपूर्ण सृष्टीत शिकार करून तीवर जगणारे जे प्राणी अस्तित्वात होते, त्यात माणूसप्राणी केंद्रस्थानी तर नव्हे, तर दहाव्या पातळीवर होता, असं युवाल हरारीनं दाखवून दिलं आहे. त्यावरून तो काळ मानवासाठी किती बेभरवशाचा, रोजच्या अस्तित्वसंघर्षाचा असणार हे लक्षात येते.) अन्नसुरक्षेच्या शोधात माणसानं शेतीचा शोध लावला, ज्यातून वैयक्तिक मालकी आणि कुटुंबव्यवस्था या संकल्पना उत्क्रांत पावल्या. त्यानंतर झालेल्या सामजिक आणि सांस्कृतिक उत्क्रांतीतून आपला, परका यातल्या सीमारेषा नकळत तयार झाल्या. हजारो वर्षांत हे बंध अधिकाधिक आवळत, घट्ट होत गेले, हे फोंडके इतिहासातल्या दाखल्यांनिशी दाखवून देतात.
पण आता एकविसाव्या शतकात जागतिकीकरण, उदारीकरण, माहितीतंत्रज्ञानाचा स्फोट, रोजच्या आवाक्यात आलेले जैवतंत्रज्ञान आणि सर्वव्यापी दहशतवाद यांतून बसत असलेल्या हादऱ्यांतून या बंधांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह लागतेय. त्याची, त्यातून आज होत असलेल्या, भविष्यात शक्य असलेल्या बदलांचीही चर्चा फोंडके करतात आणि शेवटी ‘पसायदाना’तल्या ‘जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूतां परस्परे जंबो, मैत्र जीवांचे’ या भरतवाक्यावर येतात.
खोटं बोलणं अनैतिक आहे, पाप आहे, अशी समाजाची ढोबळमानाने धारणा असली तरी माणसं सर्रास खोटं बोलतात. यावरचं फोंडकेंचं लेखन कीर्तन रंगावं तसं रंगलेलं आहे. अनेक वैज्ञानिक संदर्भ देत खोटं बोलण्यामागं काय प्रेरणा असू शकतात, काय ‘केमिकल लोच्या’ असू शकतो, मेंदूत ज्यातून माणसं खोटं बोलणं अनैतिक, चूक असल्याचं मान्य असूनही सहजपणे खोटं बोलतात, हे फोंडके रोजच्या अनुभवातली उदाहरणं देत मांडतात.
खोटेपणा जन्मजात असत नाही वा त्याला कारणीभूत असा एखादा जीन असत नाही, तर आपल्या दांभिक वागण्यातून लहानपणापासून बाळावर जे संस्कार होतात, त्यातून मुलांच्या मानसिक, बौद्धिक विकासाचा भाग म्हणून तो येतो. त्याला शास्त्रीय परिभाषेत ‘कॉग्निटिव अकॉम्प्लिशमेण्ट’ (बौद्धिक प्राविण्य) असं नाव आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
खरं बोलण्यापेक्षा खोटं बोलण्याला जास्त अक्कल लागते, असा मज्जाशास्त्रज्ञांचा दाखलाही देतात. अर्थात कुटुंबाइतकाच सामाजिक, परिस्थितीचा संस्कारही महत्वाचा. यातून पुढे खोट्यालाच खरं मानणारा अतिरेकही शक्य होतो. खोटं उघडं पाडण्यासाठी प्राचीन काळी प्रचलित असलेल्या ‘अरबी टेस्ट’पासून आजच्या ‘लाय डिटेक्टर’, नार्को टेस्ट (यात खोटं बोलण्यासाठी सावधपणा बाळगत जे बौद्धिक परिश्रम करावे लागतात, ते शक्य होऊ नयेत, अशी रसायनं दिली जातात. परिणामी तोंडून खरेच बाहेर पडते)पर्यंत अनेक बाबतीत यातल्या वैज्ञानिक माहितीचा कसा उपयोग केला जातो, याच्या सुरस हकिकतीही येतात.
शेवटी सत्याचे प्राबल्य असणारे समाज एकसंध, जोडलेले असतात, तर खोटं प्रमाणाबाहेर वाढतं, प्रतिष्ठा पावतं तसे विस्कळीत होतात, माणसं एकटी होत जातात असं गंभीर निरीक्षणही नोंदवतात. अर्थात त्यात पुन्हा समाजासाठी खोट्यात विधायक आणि विघातक असा भेदही आवश्यक मानताना पुन्हा शेवटी डार्विनचाच दाखला देतात. तो म्हणे आपल्या मुलाविषयी म्हणायचा- ‘ही इज अ लायर बट गुड चॅप...’
असेच देशोदेशीच्या मिश्कील उदाहरणांनी भरलेले विनोदाख्यानही रंगते. विसंगती, त्यातून आलेला विनोद, त्याची ताणतणावांपासून मुक्तिसाठी असलेली गरज, त्यावर देशोदशी झालेले निरनिराळे अभ्यास आणि पाहण्या, त्यातून पुढे आलेले निष्कर्ष असे टप्पे येतात. यात विनोदाचे तीन सिद्धांत (प्रकार म्हणा) येतात. पहिला, अर्थात तणावापासून मुक्तीची गरज म्हणून येणारा, तसा निर्विष. दुसरा, दुसऱ्यावर ओढवलेल्या प्रसंगाचा काहीसा विकृत म्हणावासा आनंद वाटण्यातून येणारा, तर तिसरा, वागणे आणि परिस्थितीतील विसंगती मधून जाणवणारा निकोप म्हणता येईल असा आनंद देणारा विनोद. अर्थात यासाठी तशीच विनोदबुद्धी आवश्यक, तिचं स्थान मेंदूत गुंतागुंतीच्या क्रिया्, सुसंस्कृत सुसंबद्ध संभाषण याचं नियंत्रण करणाऱ्या 'फ्रंटल लोब' जवळच असावं, याचीही नोंद करतात.
विनोद आणि त्यातून फुलणारे हास्य यांचे शरीरक्रियांवर होणारे परिणाम अभ्यासणारी गेलॉटॉलॉजी ही नवीन ज्ञानशाखाच उदयाला आली आहे. आता विनोद हा केवळ टवाळांना आवडणारा, आपण समजतो तसा टाईमपास उद्योग नव्हे, हे कळण्यासाठी एवढे पुरे.
लाज वाटणं (शरम नव्हे, गालावर लाजेची लाली चढणं याअर्थी), त्याचा स्त्री-पुरुषातल्या आकर्षणाशी असलेला संबंध यांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण येते. पण सांस्कृतिक-सामाजिक पर्यावरण अलिकडे वेगाने बदलत गेल्याने ‘लाज’ या संकल्पनेचा स्त्री-पुरुषांतल्या ‘रोमान्स’मध्ये असलेला महत्त्वाचा रोल संपत चालल्याने यापुढे तिचे आविष्कार कदाचित यू-ट्यूबसारख्या माध्यमातून मानवी सांस्कृतिक इतिहासाचा भाग म्हणूनच पाहिले जातील, हेही स्पष्ट करतात.
‘मातृत्वा’वरील लेखात त्याचा भावनिक पदर, शारीरिक गुंतवणुकीतून निसर्गातल्या सजीवांच्या सर्व प्रजातीत तिचे असणे, त्यातून तिला असलेले अनंत संशोधनात्मक आयाम, यातल्या पुनरूत्पादनावर नियंत्रण मिळवण्याचे वैज्ञानिकांचे दीर्घकालीन प्रयत्न असा मोठा पट येतो. यातले काही यश दृष्टीपथात येताच दुबळ्या आणि कमजोर जनुकं असणाऱ्या गर्भांचा जन्मच होऊ नये, असे प्रयत्न (युजेनिक्स) जहाल वंश-राष्ट्रवाद्यांच्या काळात सुरू झाले. त्यातून एस्टोजेनेटीक्स अर्थात शरीरबाह्य प्रजनन, हा विषय प्रथम मांडला गेला. त्याला पुढील वर्षी शंभर वर्षं होतील.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
एवढ्या दीर्घ काळात अनेक वैज्ञानिक, नैतिक आणि त्यातल्या अभूतपूर्वतेमुळे निर्माण झालेले अजूनही बऱ्याच अंशी अनुत्तरित असलेले देशोदेशीचे कायदेशीर प्रश्न यांतून अनेक स्थित्यंतरं यात येत आता थेट ‘मेड टु ऑर्डर’ अशा डिझायनर बेबीपर्यंतच्या भीतीदायक वळणावर मातृत्वाचा प्रवास येऊन ठेपलेला आहे. त्यातून ही नैसर्गिक, वैज्ञानिक त्यामुळे भावनिक गुंतवणूक असलेली संकल्पनाच नष्ट होण्याच्या मार्गावर असण्याचीही नोंद गांभीर्याने करतात.
‘सुख म्हणजे नक्की काय?’ हा पुरातनापासून भेडसावणारा, कुतुहलाचा प्रश्न. त्याला देशोदेशीचे वेगवेगळे असलेले विविध सांस्कृतिक सामाजिक संदर्भ या प्रश्नाला सापेक्ष ठरवतात. मन नावाचा जाणवणारा, आपल्यापुरते त्याचे काही निकष निश्चित करणारा असा अवयव आहे का, असेल तर शरीरात नक्की कुठे? एक्स रे, सीटी स्कॅन, पेटस्कॅन अगदी एमाराय कशातही हे कळलेले नाही. अर्थात त्याचा दृश्य, जाणवणारा परिणाम हा सगळा मज्जातंतू मधील जाळ्यांचा असंख्य, अगणित शक्यता असलेला अद्भुत खेळ असतो यावर वैज्ञानिक जगतात एकमत आहे.
त्याचे परिणाम काय होतात आयुष्यावर? ते नियंत्रित करता येतात का? यावरही असंख्य शास्त्रशुद्ध पाहण्या झाल्या. पराकोटीचे सुख वा दुःख,वेदना यातून तसे प्रमाणानुसार आयुष्यात काही मुलभूत बदल होतात तरी माणसं परिस्थितीशी - दोन्ही प्रकारच्या - जुळवून घेत पुढे जात राहतात हेच दिसते, हे कसे? डोपामाईन - एन्डॉर्फिन्स - सेरॉटॉनिनसारखी अंतर्गत रसायनं यांची यातली भुमिका, बाहेरून घेतल्या जाणाऱ्या नशिल्या पदार्थांचा काय परिणाम होतो, त्यावर वेगवेगळ्या देशाकाळात झालेले प्रयोग अशी विविध स्तरांवर चर्चा फोंडके करतात.
पण शेवटी अशाच एका पुस्तकाचा हवाला देऊन सांगतात- जे आवडतं ते करण्यात आनंदाचं रहस्य नाही तर ते आहे जे करावं लागतं ते आवडून घेण्यात, निरामय कर्मयोगात. हे काहीसे डोंगर पोखरून उंदीर काढावा तसे पण ते अनुभवाचे, उपदेशाचे बोल म्हणून नव्हे तर तर्कशुद्ध वैज्ञानिक कसोट्यांवर पारखून घेतलेले सत्य म्हणून येते, म्हणून महत्त्वाचे.
याशिवाय मानवी स्वभावाचा अविभाज्य भाग असलेली स्वार्थभावना, वैज्ञानिक दृष्टीकोनातून तिचे काहीसे अपरिहार्य असलेले व्यापक स्वरूप, जोडीने जगभर विविध कारणांनी होत असलेल्या मानवी स्थलांतरांच्या पार्श्वभूमीवर ‘आपले आणि बाहेरचे’ या मनात रूजलेल्या संकल्पना, प्रतिभा म्हणजे नक्की काय असतं? या शोधात सृजनशीलतेचे रहस्य शोधण्याचे विज्ञानाच्या विविध ज्ञानशाखांमधून होत असलेले प्रयत्न, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बळावर बाहेरून होत असलेले ‘निर्मिती’चे प्रयत्न (यात मेंदूच्या ज्या रचनेत आणि कार्यपद्धतीत सृजनाचे मूळ शोधण्याचा प्रयत्न होतोय तिचाच वापर त्या शोधासाठी केला जातोय, लक्ष्य आणि साधन एकच अशी यातली नेमकी मेखही फोंडके लक्षात आणून देतात.)
‘ठेविले अनंते तैसेचि रहावे’ ही नेमकी काय प्रवृत्ती आहे? अफाट वेगवान बदलांच्या काळात मुदलात बदलच नको असणाऱ्यांचे भवितव्य काय असेल? अशाही प्रश्नांना, त्यावरच्या अभ्यासांना भिडतात फोंडके.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
या लेखनात साध्या, रोजच्या व्यवहारातील गोष्टींत, त्या तशाच असण्यामागे, आपल्या तत्संबंधी धारणांमागे विज्ञानाची चौकट आहे, ती आकलनाच्या कक्षेत आली तर व्यवहारांवर आपल्याला सकारात्मक नियंत्रण शक्य आहे हा संवादी सूर आहे, तो महत्त्वाचा आहे. यात फोंडके कुठेही जजमेंटल होत नाहीत. काय योग्य, काय नाही याचा निर्णय करीत नाहीत. तुम्हाआम्हाला जे आहे ते का, कशामुळे हे समजून घेण्याच्या रस्त्यावर ते आणून सोडतात. पुढचा प्रवास आपला आपल्यालाच करायचा असतो.
संपूर्ण विज्ञानवादी, तार्किक चिकित्सक नजरेने पाहणे, तरी यात कुठेही जुने मोडीत काढणे, जनमानसांत रूजलेल्या संकल्पना, भावनांना वेडगळ ठरवणारा टिंगलीचा सूर नाही, तर त्याची तार्किक संगती विज्ञानाच्या मदतीने लावत, शोधत समजून घेण्याची सहानुभावी दृष्टी आहे. त्यामुळे हे लेखन प्रभावी संवाद करते. त्यांच्याच आधीच्या लेखनापेक्षाही वेगळे होते.
कथात्म म्हणतो त्या वा अन्यही ललित साहित्यापेक्षा वेगळे लेखन निव्वळ माहितीपर वा प्रचारी बोधपर असण्यापलीकडे असे संवादी, तरी फार गंभीर न होता विचार करायला भाग पाडणारे असू शकते, हे एरवी फारसे दिसत नाही. त्यातून अफाट माहितीची संगतवार आणि उदाहरणांसह केलेली मांडणी, हे या लेखनाचे स्वरूप, त्यापलीकडे जात आपल्यात एक स्वीकारशील समजुतीचे बीज रुजावे, असा प्रयत्न करते.
फोंडकेंनी याआधी माहितीपर तसेच कथात्म रितीनेही विज्ञान वाहते करण्याचा प्रयत्न करणारे लेखन भरपूर केले आहे. ‘ऋणानुबंध’ हे त्यातले वेगळे, निर्णायक वळण आहे.
‘ऋणानुबंध’ - डॉ. बाळ फोंडके
मौज प्रकाशन गृह, मुंबई
पाने - १८६ | मूल्य - ३०० रुपये.
............................................................................................................................................
लेखक नीतीन वैद्य पुस्तकप्रेमी आहेत.
vaidyaneeteen@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment