स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्वत्रयी भारतीय संविधानाचा पाया आहे. २५ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधानसभेतील आपल्या शेवटच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याबाबतच्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेले आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वत्रयीचा आपल्याला एकत्रितच विचार करावा लागतो, त्यांचा सुटासुटा विचार करता येत नाही, असे बाबासाहेब त्या वेळी म्हणाले आहेत. समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांचे बहुतांश लोकांवर प्रभुत्व निर्माण करणे होय; स्वातंत्र्याशिवाय समता ही वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरेल. आणि बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य व समता स्वाभाविकरित्या अस्तित्वात राहणार नाहीत, त्यांच्या अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणेची गरज भासेल. याच भाषणात त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, भारतीय समाजात दोन गोष्टींची उणीव आहे, हे वास्तव आपण स्वीकारले पाहिजे, त्या दोन गोष्टी म्हणजे समता आणि बंधुत्व.
बंधुता हा मानवी मनाचा सहजभाव असावा
आज समाजात संविधानाबद्दल अनेक अंगांनी चर्चा सुरू असताना स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांबद्दल जेवढी चर्चा होते, तेवढी चर्चा बंधुता या मूल्याबद्दल होताना दिसत नाही. सर्वांना स्वातंत्र्य उपभोगायला मिळावे आणि त्यासाठी संधीची समानता अस्तित्वात असली पाहिजे, यासाठीच्या रचनेला कायद्याचे पाठबळ देता येते. पण बंधुता हा मात्र मानवी मनाचा सहजभाव असावा लागतो. ही भावना आतून यावी लागते. बंधुत्वाची भावना कायद्याने निर्माण करणे अशक्य आहे.
भारतीय संविधानात अप्रत्यक्षपणे बंधुतेचं मूल्य जागोजागी डोकावताना दिसते. पण संविधानात दोन ठिकाणी बंधुत्वाचा थेटपणे उल्लेख आहे. पहिला उल्लेख संविधानाच्या उद्देशिकेत आहे... आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून.... असा तो उल्लेख आहे.
बंधुता कशासाठी? तर प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा जपली जाईल आणि त्यातूनच राष्ट्रीय ऐक्य आकाराला येईल, यासाठी समाजात बंधुतेची भावना वाढीस लावण्याचा संकल्प आपण संविधानाद्वारे स्वीकारला आहे. बंधुतेबाबतचा दुसरा उल्लेख संविधानातील कलम ५१ क मध्ये आहे. नागरिकांची मूलभूत कर्तव्ये स्पष्ट करणारे हे कलम आहे. त्याच्या उपकलम ड मध्ये असे म्हटले आहे, “धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे; स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे, हे नागरिक म्हणून आम्हा भारतीयांचे मूलभूत कर्तव्य आहे”.
बंधुतेच्या पायावर बळकट राष्ट्राची उभारणी शक्य
भारताला एक राष्ट्र म्हणून जर समर्थपणे उभे रहायचे असेल, तर प्रत्येक व्यक्तीला एक माणूस म्हणून आदराची आणि सन्मानाची वागणूक इतरांकडून व व्यवस्थेकडून मिळाली पाहिजे. बंधुतेच्या भावनेशिवाय इतरांबद्दल अशी वागणूक, हा आपल्या आचरणाचा भाग बनणार नाही. एक राष्ट्र म्हणून भारताला जर समर्थपणे आपली वाटचाल करायची असेल, तर नागरिकांमध्ये सामंजस्य आणि परस्पर सहकार्याची भावना वाढीस लागली पाहिजे, असाच आपल्या संविधानाचा सांगावा आहे.
बंधुतेशिवाय संविधानाची प्रामाणिक अंमलबजावणी अशक्य
लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि राष्ट्रप्रेम ही संविधानाची पंचसूत्री आहे. जात, धर्म, भाषा आणि लिंगाधारित भेदभावाला मूठमाती देऊन सर्व भारतीय नागरिकांमध्ये आदर व सहकार्याची भावना जोवर वाढीस लागत नाही, तोवर वरील पंचसूत्रीपैकी एकही गोष्ट समाजात रुजू शकणार नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाचं मत विचारात घेऊन निर्णय होणे अपेक्षित आहे. हा निर्णय कधी एकमताने होईल, तर कधी बहुमताने होईल. बहुमताचा निर्णय अल्पमतवाल्यांनी स्वीकारायचा. पण त्याचबरोबर आपण बहुमतात आहोत, म्हणजे आपण काहीही दांडगाई करायला मोकळे आहोत, असे बहुमतवाल्यांनी न मानता, त्यांनी अल्पमतातील नागरिकांच्या भावनांचा आदर करत, त्यांना सोबत घेऊनच पुढील वाटचाल करायची, हा लोकशाही व्यवहाराचा गाभा आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
एकमेकांबद्दलच्या आदराची भावना जर मनात नसेल, तर दोन्ही बाजूंनी लोकशाहीला पूरक असा समंजस व्यवहार होणे अवघड आहे. समाजवादाचा जो आर्थिक आशय आहे, तो प्रत्येकाला आपले आयुष्य फुलवण्याची समान संधी मिळाली पाहिजे, या सूत्रातून व्यक्त होतो. प्रत्येक मुली-मुलाला चांगले शिक्षण मिळावे, प्रत्येकाच्या हाताला सक्षम रोजगार मिळावा या संविधानिक तरतुदीवर प्रभावी अंमलबजावणी झाल्याशिवाय प्रत्येकाला आपल्यातील सुप्त क्षमतांचा विकास करता येणार नाही. राष्ट्राच्या प्रगतीत सहभागी होता येणार नाही.
संविधानातील अडतिसावे कलम हे नागरिकांच्या आर्थिक उत्पन्नांमधील विषमता कमी करण्याची जबाबदारी सरकारवर टाकते. जगण्यासाठीची साधने व संपत्तीचे केंद्रीकरण मूठभरांच्या हाती होणार नाही, तसेच समाजातील भौतिक साधनांचे स्वामित्व व वितरण बहुसंख्य समाजाच्या हिताच्या दृष्टीनेच व्हावे, अशी आर्थिक धोरणे राबविण्याची अपेक्षा एकोणचाळीसाव्या कलमाने राज्यव्यवस्थेकडून केलेली आहे.
आता याबाबत शासनसत्ता कायदे कधी करेल? किंवा केलेल्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी कधी होऊ शकेल? माझ्यासोबतच इतरांचाही सन्मानाने जगण्याचा संवैधानिक अधिकार आपण सर्व जण जेव्हा मनापासून स्वीकारू तेव्हाच हे होऊ शकेल.
संविधानाचे पंचविसावे कलम, भारतीय नागरिकांना वैयक्तिक जीवनात आपल्या पसंतीप्रमाणे धर्मपालनाचा वा सद्सदविवेकाने वागण्याचा अधिकार देते. पण हा अधिकार देताना संविधानाने याला काही मर्यादाही घातल्या आहेत. आपल्यापेक्षा वेगळी श्रध्दा बाळगणाऱ्या इतर नागरिकांच्या तशी श्रद्धा बाळगण्याच्या अधिकाराचा प्रत्येकाने आदर केला पाहिजे, ही त्यापैकी एक मर्यादा आहे. याशिवाय, आपल्या धार्मिक आचरणामूळे इतर नागरिकांच्या कुठल्याही मूलभूत अधिकारांचा संकोच होणार नाही, ही काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे.
बाबासाहेब म्हणाले तसं, भारतीय समाजात बंधूतेच्या भावनेची उणीव असल्याने, आज स्वधर्माबद्दल कट्टर अभिमान बाळगणारे लोक आणि काही कट्टर धर्मांध संघटना इतरांच्या धर्माबद्दल वाट्टेल तसे गरळ ओकताना, विषारी प्रचार करताना दिसतात. त्यातून वाढणारे धार्मिक तणाव, होणाऱ्या धार्मिक दंगली अनेक निरपराधांची आयुष्ये उदध्वस्त करतात. मॉब लिंचिंगसारख्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडतात. सार्वजनिक संपत्तीची नासधुस केली जाते. नागरिकांमधील परस्पर स्नेह आणि सामंजस्याच्या भावनेशिवाय भारतीय संविधानाला अपेक्षित धर्मनिरपेक्षतेची संकल्पना भारतीय समाजात कशी रुजेल.
अलीकडील काळात जातीय अत्याचार आणि महिला अत्याचारांच्या घटनांमधील क्रौर्य वाढलेले दिसत आहे. एक माणूस म्हणून आपल्याला मिळालेल्या संविधानिक अधिकारांची जाणीव झाल्याने, शोषित जातीसमुहातील नागरिक, महिला यांनी आपल्यावरील अन्याय, शोषण हे पुर्वीप्रमाणे मुकाटपणे सहन करण्याचे नाकारायला सुरुवात केली आहे. आपल्या सन्मानाबद्दल, संवैधानिक अधिकारांबद्दल बोलायला सुरुवात केली आहे.
कालपर्यंत जे आपल्या समोर मान वर करत नव्हते, ते आज अधिकारांची भाषा करायला लागलेत, ही बाब अजूनही उच्चजातवर्णीय मानसिकता बाळगून असणाऱ्यांना सहन होत नाही. त्यातून हे क्रौर्य वाढत आहे. जातीय अत्याचार, महिला अत्याचार रोखण्याच्या हेतूने बनवलेले अनेक कायदे असताना आणखी नव्या कठोर कायद्यांची मागणी होते. नवे कायदे केलेही जातात पण अत्याचारांची मालिका थांबत नाही. संविधानाने सर्वांना आपलं आयुष्य फुलवण्याचं स्वातंत्र्य दिलंय, जन्माच्या आधारे भेदभावाची भूमिका नाकारलीय, सर्वांना बरोबरीच्या रांगेत आणून बसवलय. हे जे संविधानाचं स्वप्न आहे, ते रुजवण्यासाठी कायदे तर आवश्यक आहेतच, पण कायद्यांच्या जोडीला नागरिकांच्या मनामनात बंधुतेची भावना वाढीला लागल्याशिवाय त्या स्वप्नाच्या दिशेने निर्धाराने वाटचाल होणार नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
सामाजिक न्याय हा भारतीय संविधानाचा गाभा आहे. मुले, बालके, दिव्यांग समूह, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास समूह, आदिवासी जमाती, पुर्वाश्रमीचे अस्पृश्य जाती समूह अशा सर्वांनाही प्रगतीच्या रस्त्यावर चालण्याची समान संधी असावी, म्हणून अशा समूहांना विशेष संधी वा प्राधान्याने संधी उपलब्ध व्हावी, यासाठी राज्यव्यवस्था कायदे करू शकते, राखीव निधी ठेवू शकते, विकासाच्या विशेष योजना आणू शकते, शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद करू शकते. सरकारने केलेल्या अशा अनेक कायद्यांची व योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही, कारण विविध पातळ्यांवरील सत्तासमूहांनी वा निर्णयप्रक्रियेच्या केंद्रस्थानी असणारांनी अजूनही समान संधीबाबतचा संविधानाचा सांगावा मनोमन स्विकारलेला नाही, हे लक्षात येते.
विवेकी भारतीय प्रबोधन परंपरा
स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिली असं मानलं जातं. शालेय अथवा विद्यापीठीय शिक्षणात हेच शिकवलं जातं. आम्ही तेचं सांगत राहतो. ते योग्यही आहे. परंतु भारतीय समाजात गौतम बुद्ध ते संत कबीर, बसवण्णा ते संत तुकाराम, संत सोयराबाई ते संत जनाबाई अशी जी एक सकस विवेकी प्रबोधन परंपरा होऊन गेली, या परंपरेने आम्हाला काय शिकवलं, हेच तर शिकवलं. गौतम बुद्ध जेव्हा प्रज्ञा, शील आणि करुणेवर आधारित धम्माचा संदेश देत असतात, तेव्हा ते मानवतावादाची, प्राणीमात्रावर प्रेम करण्याची शिकवणच देत असतात. चातुर्वर्ण्याला नकार देणारे तथागत जन्माच्या आधारे कुणीतरी छोटा आणि कुणीतरी मोठा ही विषमतेची परंपरा नाकारत असतात.
वैष्णवांचा धर्म सांगताना संत तुकाराम जेव्हा
“विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म,
भेदाभेद भ्रम अमंगळ!”
ही रचना करतात तेव्हा तेही हेच तर सांगत असतात. याच अभंगात तुकोबा पुढे म्हणतात,
“कोणाही जीवाचा न घडो मत्सर,
वर्म सर्वेश्वर पुजनाचे!”
प्रेमाचा, बंधुभावाचा यापेक्षा प्रभावी संदेश कुठला असणार!
संत कबीर प्रेमाचे महत्व सांगताना म्हणतात,
“पोथी पढि पढि जग मुआ,
पंडीत भया न कोय!
ढाई आखर प्रेमका,
पढे सो पंडीत होय!”
कितीही पोथ्या, ग्रंथ वाचले तरी तुम्ही काही विद्वान होऊ शकत नाही, पण तुम्हाला जर प्रेमाची भावना समजत असेल, तुम्ही निरपेक्ष प्रेम करू शकत असाल तर तुम्ही खरे ज्ञानी आहात. एकूणच भक्ती संप्रदायाने प्रेमभावनेला महत्त्व दिले आहे. वारकरी संप्रदायाने नामस्मरणाचे महत्त्व सांगितले आहे. ईश्वरावरील भक्तीसाठी कुठलेही कर्मकांड करायची गरज नाही. ईश्वर आणि भक्ताच्या मध्ये मध्यस्थाची गरज नाही. आपले काम नीट करत असताना हरीचे नाव मुखी असावे. आणि ईश्वरावर प्रेम करायचे म्हणजे ईश्वराने निर्मिलेल्या सृष्टीवर, प्राणीमात्रावर प्रेम करायचे. निरपेक्ष प्रेम हाच भक्तीसंप्रदायाचा पाया आहे.
बाराव्या शतकात जातीअंतासाठी, आंतरजातीय विवाहासाठी आपले पद व प्रतिष्ठा पणाला लावणारे बसवण्णा यांनी सर्वांच्या सहभागातून निर्णय घेणारी ‘अनुभव मंटप’ ही प्रक्रिया सुरू केली. बसवण्णांची अनेक वचने उदारमतवादाची, मानवधर्माची भूमिका स्पष्ट करणारी आहेत. हा कोणाचा, हा कोणाचा असे म्हणू नये तर, ‘हा माझा हा माझा’ असे म्हणावे अशी त्यांची शिकवण होती.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
ज्ञानोबा माऊलींनी ‘पसायदाना’द्वारे सकल जगाचे कल्याण चिंतिले आहे. त्यांनी सांगितलेला ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ गीतेवरील भाष्य म्हणून प्रसिद्ध आहे. गीता या ग्रंथातील सातशे संस्कृत श्लोकांचे स्पष्टीकरण करण्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी नऊ हजार ओव्या मराठीत लिहील्या.
सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा विनाश हे ‘गीता’ या ग्रंथाचे सारभूत तत्त्व आहे.
‘यदा हि यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत!
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्!!
परित्राणाय साधूनां विनाशायच दृष्कृताम्!
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे’
या संदेशामध्ये दुष्टांच्या समूळ निर्दालनाची भूमिका मांडली आहे. त्यासाठी भगवंत पुन्हा पुन्हा अवतार घेतात अशी श्रद्धाळूंची मान्यता आहे. ज्ञानेश्वर हे मात्र संत होते. त्यांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा समारोप करताना मागितलेल्या ‘पसायदाना’मध्ये,
‘जे खळांची व्यंकटी सांडो,
तया सत्कर्मी रती वाढो!’
असे म्हणत दुष्टांचा दुष्टपणा गळून पडावा व त्यांना सत्कार्याची आस लागो, अशी भूमिका घेतली आहे. आणि मग शेवटी सर्वांच्या कल्याणाची अपेक्षा केलेली आहे. प्रेम हाच भक्ती संप्रदायाचा पाया आहे.
निरर्थक कर्मकांडाच्याद्वारे पूरोहितशाहीकडून बहुजन समाजाच्या होणाऱ्या लुटीबद्दल म. फुले यांनी अतिशय कठोर शब्दांत आसूड ओढलेले आहेत. पुरोहितशाहीच्या विषमतावादी प्रथा-परंपरांना पर्याय म्हणून सत्यशोधक समाजाचा पाया घालणाऱ्या म. फुले यांनी आपली रचनात्मक भूमिका स्पष्ट करणारे अनेक अखंड रचले आहेत. एका अखंडात त्यांनी,
‘ख्रिस्त महंमद मांग ब्राम्हणासि,
धरावे पोटाशी बंधुपरी!’
असे म्हणत आपल्या मनातील बंधुत्वाच्या व्यापक भूमिकेला स्पष्ट केले आहे. आपली भूमिका आणखी नेमकेपणाने मांडताना एका दुसऱ्या अखंडात ते म्हणतात,
‘सर्वांचा निर्मिक आहे एक धनी,
त्याचे भय मनी धरा सर्व!
न्यायाने वस्तुंचा उपभोग घ्यावा,
आनंद करावा भांडू नये!’
मला वाटते, या अखंडाचा अर्थ उलगडून सांगण्याची गरज नसावी.
महाराष्ट्राचे आधुनिक संत म्हणून ओळखले जाणाऱ्या साने गुरुजींनी,
‘खरा तो एकचि धर्म,
जगाला प्रेम अर्पावे’
या साध्या, सरळ रचनेतून विश्वबंधुत्वाचा संदेश दिलेला दिसतो. त्रिचनापल्लीच्या तुरुंगात असताना सोबत तुरुंगात आलेल्या सहकाऱ्यांसमोर ‘आंतरभारती’ची संकल्पना स्पष्ट करताना साने गुरुजींनी मनाला फार भिडणारे एक उदाहरण दिले आहे. पायात काटा मोडला तर त्याची वेदना मेंदूमध्ये जाणवते, ती वेदना डोळ्यांमधून अश्रुंद्वारे बाहेर येते आणि त्या वेदनेचे कारण म्हणजेच पायातला काटा दूर करण्यासाठी हात पायाकडे सरसावतात. एका शरीराचे हे वेगवेगळे अवयव असले तरी, त्या अवयवांतील अशा एकतानतेप्रमाणेच विविध भाषा बोलणाऱ्या भारतीयांनी परस्परांच्या सुखदुःखात सामील होण्याची भूमिका घेतली, तर राष्ट्रीय ऐक्य हा हा म्हणता साधले जाईल, ही साने गुरुजींची भूमिका आजही तितकीच अनुकरणीय आहे.
कृतज्ञता - एक निर्मळ मानवी भावना
मानवी समाजाचा आजवरचा प्रवास हा अनेकांच्या मेहनतीतून, प्रयोगांमधून आणि अभ्यासातून झालेला आहे. आपलं दररोजचं जगणं आनंदी आणि सुखकर बनवण्यासाठी आज आपण ज्या अनेक संकल्पनांचा, शोधांचा, उपकरणांचा, सोई-सुविधांचा वापर करत असतो, त्या सर्व बाबी शोधण्यासाठी, बनवण्यासाठी अनेकांनी आपली आयुष्य खर्ची घातलेली असतात. त्याबद्दल त्यांना फार काही लाभ मिळालेले नसतात. मानवी संस्कृतीचा हा प्रवास अक्षरशः लाखोंच्या योगदानातून पुढे जात राहिलेला आहे. आज कुणीही आपल्या व्यक्तीगत आयुष्यात जे काही साध्य केलेलं असतं, ते काही केवळ त्या व्यक्तीच्या वैयक्तिक कर्तृत्वामुळेच साध्य केलेलं नसतं. त्यामध्ये समाजातील अनेकांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग असतो. अशा सर्वांचं आपल्या आयुष्यावर काही ना काही ओझं आहे, आपण त्यांना काही देणं लागतो, ही कृतज्ञतेची भावना फार सुंदर असते. निर्मळ मनाची द्योतक असते. अशा वेळी मग आपलीही काही जबाबदारी ठरते. बंधुतेच्या भावनेनं, प्रेमाच्या भावनेनं इतरांसोबत व्यवहार करत सहकार्याची, समन्वयाची प्रवृत्ती वाढीस लावण्यासाठी हातभार लावण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
सोबतीने चालूया आनंदाच्या गावाचा रस्ता
आपल्या सुखदुःखात सामील होणारं कुणीतरी आहे. आपल्यावर संकट आलं तर रात्री बारा वाजता धावून येणारं कुणीतरी आहे, असा स्नेह, आपलेपणा ज्यांच्या वाट्याला येतो, अशी माणसे संकटे आल्यावर गलितगात्र न होता, धैर्याने संकटाचा मुकाबला करतात. आपल्या आयुष्यात पुढे जायचं स्वप्न पाहतात. मानवी मन आणि त्या मनाच्या सुचनांप्रमाणे वागणारं शरीर यांच्या एकत्रित क्षमता अफाट आहेत. मानवी उत्क्रांतीच्या प्रवासात मानवी मन व शरीराच्या अफाट क्षमता अजूनही पुर्णपणे समोर आलेल्या नाहीत, वापरल्या गेल्या नाहीत. सहकार्याच्या आणि समन्वयाच्या वातावरणातच हे होणे शक्य आहे. जात, खानदान, धर्म, भाषा यांच्या टोकदार अस्मिता द्वेष वा हेवेदावे शिकवतात. द्वेष आणि हेव्यादाव्याच्या प्रभावात मनाची सकारात्मकता गळून पडते. नकारात्मकतेच्या प्रभावात प्रगतीची वाट हरवून जाते. आपली गुणवत्ता सुधारण्यासाठी निकोप स्पर्धा मदत करते.
पण आज एका बाजूला जात-धर्माच्या टोकदार अस्मितांचे जीवघेणे संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला पुढे जाण्यासाठी सुरू असलेली गळेकापू स्पर्धा, अशा वातावरणात मानवी मनाची सर्जनशीलता मारली जातेय. नवनिर्माणाच्या शक्यता मावळत आहेत. मागील जन्म आपल्याला आठवत नाही, पुढचा जन्म आपल्याला माहीत नाही. अशा वेळी मिळालेल्या या जन्मात प्रत्येक जीवाला सुखी होण्याचा अधिकार आहे आणि ते शक्यही आहे. एकमेकांना समजून घेत, एकमेकांच्या क्षमतांचा परस्परपूरक पद्धतीने उपयोग करून घेत आपल्याला सामूहिकरित्या आनंदाच्या गावाचा रस्ता सापडणे शक्य आहे. पण त्यासाठी बाबासाहेबांनी व्यक्त केलेली खंत दूर केली पाहिजे. भारतीय समाजातील बंधुतेच्या भावनेची उणीव भरून काढली पाहिजे. तथागत गोतम बुद्ध, बसवण्णा, संत कबीर, संत सोयराबाई, संत जनाबाई, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, म. फुले, साने गुरुजी आणि या सर्वांच्या जोडीला भारतीय संविधानाचाही हाच आपल्यासाठी सांगावा आहे. आपण तो आचरणात आणूया.
(‘आंदोलन’ मासिकाच्या डिसेंबर २०२२ व जानेवारी २०२३च्या अंकातून साभार)
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment