अजूनकाही
सध्या ‘पठाण’ या हिंदी चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यामध्ये दीपिका पदुकोणने परिधान केलेल्या बिकिनीच्या रंगावरून वाद सुरू आहे. किंबहुना तो जाणीवपूर्वकच निर्माण करण्यात आलाय. मध्यंतरी महाराष्ट्रात ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात वीर दौडले सात’ या चित्रपटांतील इतिहासाच्या चुकीच्या मांडणीवरून वाद झाला होता. ऐतिहासिक चित्रपटांवरून होणारे वाद ही तर नित्याचीच बाब होऊन बसलेली आहे. ‘पठाण’च्या वादामध्ये शाहरूख खान व दीपिका पदुकोण हे दोघे केंद्रस्थानी, तर बाकीच्या दोन चित्रपटांच्या बाबतीत ऐतिहासिक मांडणी वादाच्या केंद्रस्थानी राहिली आहे.
असे वाद निर्माण करणारे लोक खरंच धर्मप्रेमी असतात? धर्माच्या प्रतीकावरून भडकणारे वा भडकवणारे महापुरुषांची मानहानी का बरे सहन करतात? त्यांच्या सहनशीलतेचा नेमका रंग ओळखायचा कसा?
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
अशा वेळी दोन शक्यता पुढे येतात. पहिली – कोणत्या तरी हेतूने जाणीवपूर्वक कोणत्या तरी छुप्या अजेंड्याला बळी पडून अथवा राजकीय, धार्मिक आश्रयासाठी चित्रपट निर्माते हे करत असतील का? ही शक्यता ऐतिहासिक चित्रपटांच्या मांडणीच्या बाबतीत जास्त प्रबळ वाटते.
दुसरी शक्यता अशी की, त्यांच्याकडून कळत-नकळत किंवा अजाणतेपणाने काही चुका घडत असतील, पण त्याचे आपल्या राजकीय, धार्मिक हेतूसाठी मूठभर लोकांकडून भांडवल केले जाताना दिसते. हे धार्मिक प्रतीकांवरून होणाऱ्या वादाच्या बाबतीत जास्त प्रमाणात घडताना दिसते.
या लोकांना नेमका धर्माचा रंग प्रिय असतो की, धर्माचा रंग देता येण्यायोग्य संधी प्रिय असते, या बाबतीत आपण सामान्य माणसांनी विवेकी असणे गरजेचे वाटते. वरील दोन्ही शक्यता व त्यांच्याशी जोडले गेलेले वर्ग किंवा त्यांना छुपा पाठिंबा असणारे लोक कोणते धार्मिक हित साध्य करतात? ते नेमके कोणत्या सामाजिक सलोख्याची, कोणत्या प्रकारच्या राष्ट्राची जडणघडण करू इच्छित आहेत? त्यांना नेमका कसल्या प्रकारचा धर्म रूढ करायचा आहे?
विखार, हिंसा, असहिष्णूता, दहशत, स्त्रियांचे वस्तुकरण, महापुरुषांची बदनामी, हे कोणत्या धर्माचे तत्त्व असू शकते? थोडक्यात, ते फक्त आणि फक्त आपला छुपा हेतू साध्य करत असतात. समाज पेटवून आपली भाकरी भाजून घेणे, हाच त्यांचा धंदा आणि मनसुबा असतो. त्यांच्या वागण्याचे रंगच खरे तर बेशरम असतात आणि ज्यांच्या वागण्याचा, नीतिमत्तेचा रंगही बेशरमच असतो.
स्वतःला धर्मरक्षक म्हणवून घेणारे लोक आणि त्यांचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष समर्थन करणाऱ्या संघटना व राजकीय पक्ष यांनी ‘पठाण’विरोधी भूमिका घेतली आहे. त्याचे प्रदर्शन होऊ देणार नाही, असा निर्धार केला आहे. पण हाच वर्ग जेव्हा आपल्या इतिहासाचे विकृतीकरण होते, तेव्हा मौन धारण करतो. त्यामुळे शाहरुख खान मुस्लीम असल्याने आणि दीपिका पदुकोणने जेएनयूमधील विद्यार्थ्यांचे समर्थन केले होते, म्हणून या दोघांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे का, असा प्रश्न पडतो.
धार्मिक कट्टरतावादी लोक एखाद्या कृतीचा किंवा विधानाचा अर्थ बोलणाऱ्या व्यक्तीच्या धर्मावरून, त्याच्या राजकीय भूमिकेवरून काढतात. त्या व्यक्तीने हे वक्तव्य वा कृती जाणीवपूर्वक केल्याचा कांगावा करून समाजामध्ये तिच्याविरुद्ध किंवा त्या व्यक्तीच्या धर्माच्या, पक्षाच्या वा विचारधारेच्या विरुद्ध वातावरण निर्मिती करण्याचे आणि एकत्रित व नियोजनबद्ध ‘सोशल डिस्कोर्स’ तयार करण्याचे काम केले जाते.
असे करत असताना लोकांचे लक्ष एका विशिष्ट ठिकाणी केंद्रित होईल, याची सर्वोतोपरी खबरदारी घेतली जाते आणि वस्तुस्थिती लोकांपुढे येऊ दिली जात नाही. हेच ‘पठाण’बाबत दिसून येते. या चित्रपटातील गीतकारापासून, निर्माता, दिग्दर्शक, लेखक, वेशभूषाकार, संगीतकार यांच्या धार्मिकतेचा वापर करून या सर्व प्रकरणाला वेगळा रंग देता आला नसता, ही बाब आपल्या लक्षात येईल. कारण यातील बहुतेक लोक धर्माने हिंदू आहेत. त्यामुळे कोणत्याही एका व्यक्तीला किंवा धर्माला ‘टार्गेट’ करता आले नसते. मग जे ‘सॉफ्ट टार्गेट’ असते, ते लक्ष्य केले जाते. उदा., अलीकडेच कालीचरण महाराज यांनी सर्व हिंदू देव-देवता हिंसक असल्याचे विधान केले. जर हे विधान एखाद्या गैर-हिंदू व्यक्तीने केले असते, तर या ‘रंगप्रेमीं’नी त्याला कोणता रंग दिला असता?
कधी कधी हे धर्माचे ठेकेदार, राजकीय पुढारी किंवा चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक, प्रसिद्धीच्या मोहापायी स्वार्थी हेतूने काही हस्तकांच्या मदतीने वाद पेटवतात की काय, या शक्यतेला जागा उरते. परंतु एक समाज म्हणून आपल्या व्यवस्थेवर असल्या घातक प्रकारांचा विपरित परिणाम होतो.
वाद खरे तर रंगाचा अथवा धर्माधर्माचा नसतोच, तो कुणाच्या तरी महत्त्वाकांक्षेचा, स्वार्थाचा वा व्यावसायिक प्रमोशनचा असतो. परंतु यामुळे धर्मा-धर्मांमध्ये, माणसा-माणसांमध्ये, जाती-जातींमध्ये जी दरी निर्माण होते, ती मात्र कदाचित कधीही भरून न येणारी असू शकते. अशा प्रकारच्या घटनांचा एक समाज म्हणून आपण अतिशय गांभीर्याने आणि साकल्याने विचार करून हे विघातक हेतू असफल करणे गरजेचे ठरते.
चित्रपट हे समाजजागृतीचे माध्यम म्हणूनही काम करत आले आहे. त्यावर अनेकांचा विश्वास आहे. तसेच या क्षेत्रावर अनेकांची उपजीविकादेखील अवलंबून आहे. त्यामुळे असे वाद निर्माण करणाऱ्या लोकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, त्यांच्या आततायीपणामुळे समाजास व चित्रपटक्षेत्रास धोका पोहोचत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांनी याबाबतीत अतिशय चांगले मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या की, ‘अशा प्रकारचे वाद हे अतिशय दुर्दैवी आहेत. यामुळे चित्रपट क्षेत्र संपुष्टात येईल आणि मला वाटते, हे आपल्या सर्वांसाठी अतिशय दुर्दैवी असेल.’
कोणताही वाद जेव्हा सुरू होतो, तेव्हा बाजूने उभे राहणारे व विरोध करणारे दोन गट आपोआप तयार होतात. जेव्हा हा वाद धार्मिक प्रतीकांवरून होतो, तेव्हा तर हे दोन्ही गट तयार होणे अटळच होऊन बसते. खरं तर धर्माची नैतिक पातळी व प्रतीकरूपातील धर्म, या दोन वेगवेगळ्या बाबी असतात. त्यामुळेच धर्माच्या नैतिक मूल्यांवरून फारसे वाद होताना दिसत नाहीत, कारण नैतिक पातळीवर सर्व धर्मांची शिकवण जवळपास सारखीच आहे. परंतु प्रतीकांच्या बाबतीत असे होत नाही. लोक जेव्हा नैतिक मूल्यांऐवजी प्रतीकांनाच खरा धर्म मानायला लागतात आणि प्रतीकांवरून वाद घालायला लागतात, तेव्हा समाज अधोगतीच्या दिशेनेच जातो. माणूस आपल्या धार्मिक प्रतीकांना घट्ट कवटाळतो, तेव्हा त्याची सदसद विवेकबुद्धी योग्य प्रकारे काम करत नाही.
अशा वादग्रस्त स्थितीच्या वेळी ज्या दोन बाजू तयार होतात, त्याच्याशिवाय वास्तव, सत्यनिष्ठ तिसरी बाजू असू शकते किंवा इतर काही पैलू असू शकतात, पण ते समजून घेण्याची दोन्ही बाजूंची तयारी नसते. त्यामुळे त्या अनभिज्ञ राहतात. या तिसऱ्या बाजूची समज असणारा एक वर्ग समाजात असतो. पण उगीच कशाला धार्मिक वादात किंवा राजकीय वादात पडा, म्हणून यापासून स्वतःला तो या सर्वांपासून अलिप्त ठेवतो.
दुसरा वर्ग हा अशा वादांमध्ये स्वतःच्या राजकीय महत्त्वकांक्षा साध्य करून घेऊन आपल्या ‘वोट बँक’ मजबूत करणाऱ्या राजकीय लोकांचा व धर्माच्या ठेकेदारांचा असतो. तिसरा वर्ग धर्माची अफूची गोळी घेऊन गुंग असणारा आणि इतर धर्मांचा द्वेष करणारा व ज्यांच्या मेंदूचे अगदी लहानपणापासूनच अभिसंधान झालेले असते, अशा लोकांचा असतो.
या तिन्ही वर्गांव्यतिरिक्त असत्याला बळी पडणारा किंवा या असत्यामुळे बळी जाणारा चौथा वर्ग असतो. तो मोठ्या प्रमाणात सर्व धर्मीय सामान्यांचा असतो. या मोठ्या जनसमुदायासाठी रोजच्या रोजी-रोटीचे प्रश्न महत्त्वाचे असतात. परंतु त्यांना या सर्व गोष्टींमुळे समाजातील कलुषित वातावरणाचा, एक प्रकारच्या भीतीचा, एका अनामिक असुरक्षिततेचा सामना करावा लागतो.
मूठभर लोक आपल्या स्वतःच्या धार्मिक, राजकीय आकांक्षांपोटी छोट्या छोट्या गोष्टींचे धार्मिक स्तरावर भांडवल करतात. ते लोकांना एकसंध समाजाचे स्वप्न दाखवून प्रत्यक्षात समाज तोडण्याचेच काम करतात. तेव्हा असे वाद निर्माण झाल्यानंतर समाजाने सजग होऊन यावर विचार केला पाहिजे आणि सत्याची व धर्माच्या नीतीमूल्यांची बाजू समजून घेतली पाहिजे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
सध्या सर्वच चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, त्यावरून दाखवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या उत्पादनांच्या जाहिराती, यांतून होत असलेले स्त्रियांचे वस्तूकरण आणि त्यामुळे स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन, यावर कोणीही भाष्य करताना दिसत नाही, कारण नीतीमूल्यांपेक्षा या लोकांना प्रतीकांचेच अवडंबर माजवायचे असते.
अलीकडच्या काळात काही निर्मात्यांनी व कलाकारांनी आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी राजकीय वळचण पकडलेली आहे आणि राजकीय-धार्मिक प्रोपगंडा करणाऱ्या चित्रपटाची निर्मिती सुरू केलेली आहे. त्यामुळे कदाचित त्या व्यक्तिगत निर्मात्याचे कलाकाराचे भले होईल, परंतु एकूण समाजाचे व चित्रपट क्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान होणार आहे, ही बाब अशा स्वतःला राजकीय दावणीला बांधून घेतलेल्या कलाकारांनी व निर्मात्यांनी समजून घेतली पाहिजे. खरं तर हे सर्व लोक आपल्या पुढे देशप्रेमाचे नाटक करून, बेगडी धर्म प्रेम दाखवून फार मोठा देशद्रोह, जनद्रोह व समाजद्रोह करत आहेत, याचे भान आपण सर्वांनी ठेवले पाहिजे. त्याचे खरे ‘बेशरम रंग’ आपण ओळखले पाहिजेत.
.................................................................................................................................................................
लेखक डॉ.संजय करंडे बार्शीच्या बी. पी. सुलाखे वाणिज्य महाविद्यालयामध्ये सहायक प्राध्यापक आहेत.
sanjayenglish@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment