या नव्या वर्षात करोनाकाळाच्या दु:खद आठवणी आणि इतिहासाचा काळा कोळसा उगाळत राहायचा की, ‘झेनोफोबिया’तून बाहेर पडण्याचा संकल्प करायचा?
संपादकीय - संपादकीय
संपादक अक्षरनामा
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 02 January 2023
  • संपादकीय Editorial अक्षरनामा Aksharnama झेनोफोबिया Xenophobia

‘आप के साथ’ या नावाचा १९८६ सालचा एक हिंदी सिनेमा आहे. त्यात पडद्यावर अनिल कपूर हा अभिनेता अतिशय उत्साहात, मस्तीत, नाचत-बागडत, शॅम्पेनची बाटली उघडत म्हणतो -

‘आने वाले साल को सलाम

जाने वाले साल को सलाम

नये साल का, हो नये साल का

पहला जाम, आपके नाम

हॅपी न्यू इअर, हॅपी न्यू इअर’

‘अक्षरनामा’च्या वाचकांना, हितचिंतकांनाही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!

नवीन वर्षाचं स्वागत करायची पद्धत आहे. जगभर ती पाळली जाते. विशेषत: शहरांमध्ये. नागरीकरणाने जे नवे आयाम मानवी आयुष्याला दिले आहेत, हा त्यातलाच एक. ३१ डिसेंबर रोजी रात्री १२नंतर ‘हॅपी न्यू इअर’चा जल्लोष केला जातो, तोही प्रामुख्याने शहरांमध्ये आणि शहरवजा गावांमध्ये. ग्रामीण भागात हे लोण अजूनही तितकंसं पसरलेलं नाही. आदिवासी पाडे, लमाणांचे तांडे, भिल्लांच्या वस्त्या, फिरस्त्या धनगरांची पालं, इथं काही घडत नाही. ३१ डिसेंबरच्या रात्री तिथं अजूनही धूमधडाक्यात नाचगाणी, चिकन-मटन-दारू आणि आतषबाजी यांच्या पार्ट्या झडत नाहीत. पण स्थिरता हा काही जगाचा गुणधर्म नाही. त्यामुळे आज ना उद्या तिथंवरही ‘हॅपी न्यू इअर’चा जल्लोष साजरा करण्याची पद्धत पोहचेल, अशीही आशा करू या.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

जुनं संपतं आणि नवीन वर्ष सुरू होतं, म्हणजे नेमकं काय होतं? भिंतीवरची दिनदर्शिका बदलते. पण महिने तर तेवढेच असतात. आणि महिन्याचे दिवसही प्रत्येकी ३०-३१च असतात. दिवसाचे तासही तितकेच असतात. तासाची मिनिटं आणि मिनिटांचे सेकंदही. सूर्य नेहमीप्रमाणे पूर्वेलाच उगवतो आणि पश्चिमेलाच मावळतो.

मग नेमकं काय बदलतं?

तर आपल्या धारणा. मनोकामना. इच्छा-आकांक्षा. सरलेले दिवस कसेही गेले असले तरी ते आपले जगून झालेले असतात. झाल्या गोष्टीला इलाज नसतो. म्हणूनच येणाऱ्या दिवसांबाबत आपण आशावादी राहतो. म्हणजे त्याच्याकडून आशावाद व्यक्त करतो. त्या आशेचा उत्सव साजरा करण्यासाठी जल्लोष करतो, आनंद व्यक्त करतो. पार्ट्याबिर्ट्या, आतषबाजीही करतो.

खरं म्हणजे आपण जगत असतो, तो वर्तमान काळ हेच एकमेव वास्तव असतं. भूतकाळ जगून झालेला असतो. तो आता आपल्याला परत जगता येत नाही. त्यातलं काहीच परत पुन्हा करून पाहता येत नाही. आणि भविष्यकाळ हा क्षितिजावरचा दिवा असतो. तो दिसतो लोभस. कारण त्याच्याविषयीच्या आपल्या बहुतेक कल्पना स्वप्नाळू असतात. पण जेव्हा तो वर्तमानाच्या कक्षेत प्रवेश करतो, तेव्हा झपाट्यानं त्याची भूतकाळाची दगडीशिळा होत जाते.

सोप्या शब्दांत सांगायचं तर अशी कल्पना करा की, तुम्ही अनेकांबरोबर एका किल्ल्याच्या कड्यावरून चालताय. तुमच्या पुढे खूप जण आहेत आणि मागेही. त्यामुळे तुम्हाला मागे-पुढे पाहत चालावं लागतंय. एकेक पाऊल जपून टाकावं लागतंय. वेळप्रसंगी मागच्याचा वा पुढच्याचा आधार घ्यावा लागतोय. आपण जगत असलेला वर्तमानकाळ हा नेहमीच त्या निसरड्या कड्यासारखा असतो. आणि भूतकाळ व भविष्यकाळ त्या मागच्या-पुढच्या माणसांसारखा.

काळ चांगला असो की वाईट, आपण तो जगतो आपल्या प्रयत्नांच्या शिकस्तीनेच. त्यासाठी आपण मनाला आशेचा दिलासा देत असतो. पण हाच दिलासा आपल्याला इतरांकडूनही मिळाला तर, आपल्या आशावादात भर पडते. आपल्याला आनंद होतो. आपण जो आपल्या जगण्याचा क्रूस खांद्यावरून वाहत असतो, त्याचा भार थोडासा हलका झाल्यासारखा वाटतो. त्यामुळे इतरांकडून शुभेच्छा, सदिच्छा मिळवण्यासाठी आणि त्या इतरांनाही देण्यासाठी आपण वेगवेगळी निमित्तं शोधतो. सामाजिक सौहार्द आपल्या आणि कुटुंबाच्या सौख्यासाठी गरजेचं असतं, तसंच आपल्या भवतालासाठी, प्रदेशासाठी, देशासाठीही. शुभेच्छा-सदिच्छांची देवघेव त्यासाठीच करायची असते.

मागच्या वर्षांत सामाजिक सौहार्दाची गंगा आपल्याकडून कळत-नकळत किंवा जाणीवपूर्वक मलिन झाली असेल, तर त्याचं परिमार्जन आपल्याला या नव्या वर्षांत करता येईलच की! नवे वर्ष नवे संकल्प करण्यासाठी तर असते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘अक्षर’च्या २००० सालच्या दिवाळी अंकातल्या ‘व्यक्ती आणि काळ नावाची वल्ली’ या कथेत अवधूत परळकर यांनी म्हटलंय-  “काळ बदलतो की आपण बदलतो? माणसांच्या वृत्ती-प्रवृत्ती बदलतात आणि आपण म्हणतो काळ बदलला आहे. माणसात काळ बदलण्याचं सामर्थ्य असतं की, काळामध्ये माणूस बदलण्याचं सामर्थ्य असतं? या प्रश्नांची निश्चित उत्तरं मिळतील तेव्हा मिळतील. काळ आणि माणूस यांच्यात काहीतरी अद्भुत नातं असतं, हे मात्र खरं.

कालातीत असं कुणीतरी ‘काळ आणि माणूस’ यांच्या नात्यासंदर्भात बोलून ठेवलं आहे- ‘Change with the time, unless you are influential enough to change the time.’ (काळ बदलण्याचं सामर्थ्य अंगी नसेल, तर काळानुसार स्वत:ला बदला).”

काळानुसार बदला म्हणजे काय करा, तर आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी\राहण्यासाठी काही हितकारक बदलांचा स्वीकार करा. जो बदलत नाही, तो टिकत नाही; बदलतो तोच टिकतो. बदलायचं म्हणजे स्वत:चं सत्त्व, स्वत्व गमवायचं नाही, स्वत:चं स्वातंत्र्य, अभिव्यक्तीही गमवायची नाही. बदलायचं म्हणजे चांगल्याचा स्वीकार करायचा. मनाला लागलेली कोळीष्टकं काढून टाकायची, बुद्धीला चढलेली बुरशी झाडून टाकायची. मन आणि बुद्धी स्वच्छ केली की, तिला तजेला मिळतो, तरतरी येते.

‘कालाचा अन्त’ या नावाचं जे. कृष्णमूर्ती आणि डेव्हिड बॉम यांचं एक छोटंसं पुस्तक आहे. एक धर्मगुरू आणि एक पदार्थविज्ञानातला शास्त्रज्ञ या पुस्तकात काळाविषयी चर्चा करतात. त्यांच्या चर्चेत एक प्रश्न उपस्थित होतो – अंत नसलेलं विभाजन, संघर्ष आणि विनाश निर्माण करणारं चुकीचं वळण मानवतेनं घेतलं आहे का? त्यावर कृष्णमूर्ती म्हणतात – ‘आपण जे प्रत्यक्षात आहोत ते स्वीकारण्यातील आपली असमर्थता आणि आपण जे झालं पाहिजे, या संबंधीच्या आपल्या भ्रामक ध्येयपूर्तीच्या हव्यासातून ते चुकीचं वळण पडलेलं आहे.’ आपल्या संबंधीच्या कल्पना आणि ‘स्व’संबंधीच्या आपल्या चुकीच्या धारणांनी बनलेली चुकीची जाणीव, याची या पुस्तकात चर्चा आहे.

जे. कृष्णमूर्ती केवळ धर्मगुरू वा आध्यात्मिक गुरू नाहीत, ते तत्त्वचिंतकही आहेत. त्यामुळे त्यांचं लेखन काळजीपूर्वक वाचलं की, बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

आपण चुकीचं वळण घेतलंय ही गोष्ट तर खरीच आहे. सोशल मीडियाचा प्रभाव आणि बाजारपेठेचा दबाव, यांत आपण कळत-नकळत भरडले जात आहोत. आपल्या जगण्यावर या दोन्ही गोष्टींनी अतिक्रमण केलंय. फेसबुक पोस्ट, ट्विटस, व्हॉटसअप फॉरवर्ड यांतून आपण काय देतो एकमेकांना? तर इतिहासातली मढी, पुराणपुरुषांचा दुरभिमान, आंधळ्या राष्ट्रप्रेमाचा उमाळा, जातीचा अहंकार, पक्षीय विचारसरणीचा गर्व… त्यातून आपण ‘फेक न्यूज’ पसरवत राहतो.

तर्कशुद्ध विचार करणं हे माणूसपणाची पूर्वअट आहे, असं म्हणतात. पण काहीही झालं तरी विचार करायचा नाही, तर्कशुद्ध तर नाहीच नाही, हा आपला ‘बाणा’ झालाय. त्यातून आपण ‘झेनोफोबिया’ (Xenophobia)चे वाहक कधी झालो, हे आपल्यापैकी बहुतेकांच्या अजूनही लक्षात आलेलं नाही. ‘झेनोफोबिया’ म्हणजे ‘जो आपल्यातला नाही त्याची घृणा’. गेल्या काही वर्षांपासून हा भयगंड अतिशय वेगानं वाढताना दिसतोय. विद्यमान राज्यकर्ते त्याचे वाहक आहेतच, पण त्यांच्याआधीपासून त्याच्या वाढीला सुरुवात झालेली आहे. आणि तो जगभरच वाढतो आहे, आपल्या देशात जरा जास्त वेगानं वाढवला जातोय इतकंच. सोशल मीडिया या ‘झेनोफोबिया’ला मोठ्या प्रमाणावर खतपाणी घालतो आहे.

‘झेनोफोबिया’ हा काही शारीरिक आजार नाही. तो काही गँगरीन वा कॅन्सर नाही. हा आपल्या मनाला, बुद्धीला आणि विचाराला झालेला आजार आहे. त्यामुळे आपला जीवच काय, तर शरीराचा कुठलाही अवयवही न गमावता, त्यावर मात करता येऊ शकते… अर्थात आपण ठरवलं तर.

मागच्या वर्षात जे ‘झेनोफोबिया’चे शिकार झालेले आहेत, त्यांना या नव्या वर्षात त्यातून बाहेर येण्याचा संकल्प करता येईल. आणि तो संकल्प करून सोडून न देता, पूर्ण करण्याचा प्रयत्नही करता येईल. ज्यांनी मागच्या वर्षात कुठलाही विचार न करता आलेली ट्विटस, पोस्टस, व्हॉटसअप फॉरवर्डस इतरांना पाठवून त्यांची मनं कलुषित केली असतील, त्यांनी ती न करण्याचा संकल्प या नव्या वर्षात करून पाहता येईल. कुठल्याही गोष्टीवर वाचता-पाहता क्षणी विश्वास न ठेवता, ती शक्य तोवर पडताळून पाहण्याचाही काहींना संकल्प करता येईल. काहींना फॅक्ट-चेकचा पर्याय पडताळून मगच कुठलीही पोस्ट फॉरवर्ड करण्याचा संकल्प करता येईल. काहींना आपल्याला न आवडणाऱ्या विषयांवरची मतं वाचून त्यावर संतापून व्यक्त होण्याऐवजी संयमानं व्यक्त होण्याचा संकल्प करता येण्यासारखा आहे. ‘गुगलून टाका जीवा, दुबळेपणा मनाचा’ हाही संकल्प तसा सहजसोपा आहे.

फार मोठे संकल्प आपला खूप दम काढतात. छोट्या संकल्पांचं तसं नसतं. ते पुरेशा निग्रहानिशी तडेला नेता येतात.

नव्या वर्षात करोनाकाळाच्या दु:खद आठवणी आणि इतिहासाचा काळा कोळसा उगाळत राहायचा की, ‘झेनोफोबिया’तून बाहेर पडण्याचा संकल्प करायचा?

आपला निर्णय आहे… आपल्यालाच घ्यायचा आहे…

‘डिअर जिंदगी’ या २०१६ सालच्या चित्रपटात एक गाणं आहे –

‘जो दिल से लगे, उसे कह दो हाय, हाय, हाय;

जो दिल ना लगे, उसे कह दो बाय, बाय, बाय…’

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वर्गणी भरण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा -

Pay Now

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भारतीय जनतेने ‘एनडीए आघाडी’ला सत्ता दिली, पण तिचा हर्षोन्माद व्हावा, अशी दिली नाही आणि ‘इंडिया आघाडी’ला विरोधी पक्षात बसवले, पण हर्षोन्माद व्हावा, इतकी मोठी आघाडी दिली!

२०२४ची लोकसभा निवडणूक ही १९७७नंतरची सर्वांत महत्त्वाची निवडणूक आहे, असे प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी काही दिवसांपूर्वी लिहिले होते. ते ‘रायटिंग ऑन वॉल’ होते, हेही भारतीय जनतेने मोदींना स्पष्टपणे बजावले आहे. ते मोदी कितपत गांभीर्याने घेतात किंवा नाही, हे येत्या काही दिवसांत समजेलच. मोदी आणि भाजपनेते ‘चार सौ पार’चा जयघोष करत राहिले, पण भाजपला अपेक्षित बहुमतही मिळालेले नाही, हेही नसे थोडके.......