अजूनकाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई, हिराबा यांचं आज पहाटे वयाच्या १००व्या वर्षी निधन झालं. १८ जून रोजी त्यांनी शताब्दी वर्षांत पदार्पण केलं होतं. त्यानिमित्तानं मोदी यांनी आईविषयी हिंदीमध्ये दीर्घ लेख लिहिला होता. त्यात त्यांनी आईविषयी व्यक्त केलेल्या भावनांचा हा गोषवारा...
.................................................................................................................................................................
आई हा केवळ एक शब्द नाही. जीवनाची ही अशी एक भावना आहे, ज्यात स्नेह, धैर्य, विश्वास असं खूप काही सामावलेलं आहे. जगातला कुठलाही कोपरा असो, कुठलाही देश असो, प्रत्येक मुलाच्या मनात सर्वाधिक प्रेम आईविषयीचं असतं. आई केवळ आपल्याला जन्म देत नाही, तर आपलं मन, व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वासही घडवते. आणि हे करण्यासाठी ती स्वत:ला झिजवते, विसरते.
आज माझ्या आयुष्यात आणि व्यक्तित्वात जे काही चांगलं असेल, ती आई-वडिलांचीच देण आहे. माझी आई जितकी सामान्य आहे, तितकीच असामान्य आहे. तशी प्रत्येकच आई असते. माझ्या आईविषयी हे लिहिलेलं वाचताना तुम्हाला असं वाटेल की, ‘अरे, आपली आईही अशीच आहे, तीही असंच करते’. हे वाचताना तुमच्या मनात तुमच्या आईची प्रतिमा तरळेल.
आईची तपश्चर्या तिच्या मुलाला लायक माणूस बनवते. आईचं प्रेम तिच्या मुलाला मानवी संवेदनांनी परिपूर्ण करून टाकतं. आई केवळ एक व्यक्ती, एक व्यक्तित्व नाही, तर आई हे एक तत्त्व आहे. आमच्याकडे म्हणतात- भाव तसा देव. तसंच आईच्या बाबतीत आहे. ज्याच्या मनात आईविषयी जशा भावना असतील, तशी त्याला त्याची आई दिसेल.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
माझ्या आईचा जन्म मेहसाणा जिल्ह्यातल्या, वडनगरजवळच्या विसनगरमध्ये झाला. माझ्या आईला तिच्या आईचं प्रेम मिळालं नाही. शतकापूर्वी आलेल्या जागतिक महामारीचा प्रभाव अनेक वर्षं राहिला होता. तिने आजीला आईपासून हिरावून नेलं. आई तेव्हा केवळ काही दिवसांचीच असेल. त्यामुळे तिला आपल्या आईचा चेहरा, तिच कुश काहीच आठवत नाही. आईचं बालपण तिच्या आईशिवाय गेलं. ती आपल्या आईकडे कुठलाच हट्ट करू शकली नाही, आईच्या मांडीवर आपलं डोकं टेकवून झोपू शकली नाही. आईला अक्षरओळखही करून घेता आली नाही, तिने शाळेचं तोंडही पाहिलं नव्हतं. तिने काय पाहिलं, तर फक्त गरिबी आणि घरात प्रत्येक गोष्टीचा अभाव.
माझ्या आईचं आयुष्य खूप संकटमय होतं. कदाचित परमेश्वरानंच तिला असं आयुष्य दिलं असावं. त्याची आठवण आली की, आई म्हणे- ‘ही परमेश्वराचीच इच्छा असावी’. पण आपल्या आईचा चेहराही पाहू न शकण्याचं दु:ख तिला होतं.
बालपणीच्या संघर्षांनी आईला अकाली प्रौढ केलं. ती तिच्या कुटुंबात सर्वांत मोठी होती, आणि लग्नानंतर सर्वांत मोठी सून झाली. माहेरी ती सर्वांची काळजी घ्यायची, सारी कामं करायची, त्या सगळ्या जबाबदाऱ्या तिला सासरीही सांभाळाव्या लागल्या. पण आई नेहमी शांतपणे आपल्या कुटुंबाला सांभाळत राहिली.
आई सतत कामात गढून गेलेली असायची. पण ती आम्ही मुलांना कधीही म्हणायची नाही की, अभ्यास थोडा वेळ बाजूला ठेवून मला थोडी मदत करा. तिचं पाहून आम्हा भावा-बहिणीला तिची मदत कराविशी वाटे. घर चालवण्यासाठी आई इतरांच्या घरी भांडी घासण्याचंही काम करायची. वेळ काढून चरखाही चालवायची. त्यातून काही पैसे मिळायचे. कापसापासून रुई काढणं, रुईपासून धागा बनवणं, ही सगळी कामं आई स्वत: करायची. तिला वाटायचं की, कापसाच्या बीची टोकं आम्हाला टोचू नयेत. आपल्या कामासाठी दुसऱ्या अवलंबून राहणं, आपली कामं इतरांकडून घेणं तिला कधी आवडलं नाही.
आईला घर सजवण्याची, नीटनेटकं ठेवण्याचीही आवड होती. ती मातीची सुंदर भांडी तयार करून ती रंगवत असे. जुन्या गोष्टींपासून नवी गोष्टी बनवण्याची आम्हा भारतीयांची जी आवड आहे, त्यात आई चॅम्पियन होती.
आईची एक खूप वेगळी आणि अनोखी गोष्ट आठवते. ती नेहमी जुने कागद चिंचेसोबत भिजवून त्याची पेस्ट बनवत असे. त्या पेस्टच्या साहाय्यानं ती भिंतीवर काचेचे तुकडे चिकटवून सुंदर चित्रं तयार करायची. बाजारातून काही वस्तू आणून ती घराचा दरवाजाही सजवत असे.
प्रत्येक गोष्ट पर्फेक्शननेच करण्याचा तिचा स्वभाव होता. गांधीनगरमध्ये भाऊ, पुतण्या यांची कुटुंबं आहेत, पण शक्यतोवर आपली कामं आपणच करण्याचा तिचा प्रयत्न असे.
आईची एक चांगली सवय मला नेहमीच आठवते. ती म्हणजे प्राणी-पक्ष्यांवर प्रेम करण्याची संस्कारभूत आवड. इतरांच्या आनंदात आनंद मानण्याची तिची प्रवृत्ती होती. भलेही आमच्या घरात जागा कमी असेल, पण तिचं मन खूप मोठं होतं.
आईचा माझ्यावर नेहमीच विश्वास राहिला. तिला तिच्या संस्कारांवर पूर्ण भरवसा होता. आई माझ्यासोबत कधीही कुठल्याही सरकारी वा सार्वजनिक कार्यक्रमाला आली नाही, फक्त दोन अपवाद वगळता. पहिला, जेव्हा मी ‘एकता यात्रे’नंतर श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा ध्वज फडकावून परतलो, तेव्हा अहमदाबादमध्ये झालेल्या नागरिक सन्मान कार्यक्रमात आईने व्यासपीठावर येऊन मला ओवाळलं होतं.
आईसाठी तो एक भावनिक क्षण होता. कारण एकता यात्रेदरम्यान फगवाडामध्ये हल्ला झाला होता, त्यात काही लोक मृत्युमुखी पडले होते. तेव्हा आईला माझी खूप चिंता वाटली होती.
दुसरा, जेव्हा मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली, तेव्हा आई माझ्यासोबत आली होती. आईची माझ्यासोबतची ती शेवटची उपस्थिती. त्यानंतर पुन्हा ती कधी माझ्यासोबत आली नाही.
न शिकताही एखादा माणूस खऱ्या अर्थानं सुशिक्षित कसा असू शकतो, हे मला आईमध्ये पाहायला मिळतं. तिची विचार करण्याची पद्धत, मूलगामी दृष्टी मला अनेक वेळा कोड्यात पाडते.
नागरिक म्हणून आपल्या कर्तव्यांबाबत आई नेहमीच सजग राहिली. जेव्हापासून निवडणुका सुरू झाल्या, तेव्हापासून तिने प्रत्येक निवडणुकीत मतदान केलं. काही दिवसांपूर्वी झालेल्या गांधीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीतही तिने मतदान केलं होतं.
ती मला नेहमी सांगायची की, ‘हे बाबा, ईश्वराचा आणि जनतेचा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. तुला कधीही काहीही होणार नाही. आपलं शरीर नेहमी चांगलं ठेव. स्वत:ला स्वस्थ ठेव, कारण ते चांगलं राहिलं, तरच तुला चांगलं काम करता येईल.’
मी कधी आईला कुणाविषयी तक्रार करताना पाहिलं, ऐकलं नाही. तिने कधी कुणाकडून कसल्या अपेक्षाही केल्या नाहीत. तिच्या नावावर कुठलीही संपत्ती नव्हती. तिच्या अंगावर मी कधी सोन्याचे दागिने पाहिले नाही. ती आपल्या छोट्याशा घरात आनंदात राहत असे.
आईचा परमेश्वरावर खूप विश्वास होता, पण ती अंधश्रद्धांपासून कोसो लांब होती. आमच्या कुटुंबाला तिने नेहमीच अंधश्रद्धांपासून लांब ठेवलं. सुरुवातीपासूनची ती संत कबिराची भक्त होती. जपमाळेची मात्र तिला सवयच जडली होती. दिवसभर भजन आणि जपमाळ यात तिचा कितीतरी वेळ जात असे. त्यामुळे घरातल्या लोकांना तिची जपमाळ लपवून ठेवावी लागत असे, तेव्हा कुठे ती जाऊन झोपत असे.
मी लहानपणापासून आईमध्ये इतरांच्या इच्छेचा सन्मान करण्याची भावना, इतरांवर आपल्या इच्छा न थोपवण्याची भावना पाहत आलो. माझ्या आणि माझ्या निर्णयांच्या मध्ये न येण्याबाबत ती नेहमीच खबरदारी घ्यायची.
आईनं मला नेहमी आपल्या सिद्धान्तावर ठाम राहण्यासाठी, गरिबांसाठी काम करत करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. मला आठवतं, मी जेव्हा मुख्यमंत्री बनणार हे ठरलं, तेव्हा मी गुजरातमध्ये नव्हतो. विमानतळावरून मी थेट आईला भेटायला गेलो. तेव्हा आनंदी झालेल्या आईनं मला विचारलं होतं, ‘आता तू हेच करत राहणार का?’ अर्थात तिला माझं उत्तरही माहीत होतं. त्यामुळे तीच म्हणाली, ‘मला तुझं राजकीय काम काही समजत नाही, पण मला वाटतं, तू कधी लाच घेऊ नकोस.’
माझ्या आईच्या आणि वडिलांच्या जीवनाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय असेल तर, इमानदारी आणि स्वाभिमान. ते आयुष्यभर गरिबीशी लढत-झगडत राहिले, पण त्यांनी कधी इमानदारीचा मार्ग सोडला नाही आणि कधी स्वाभिमानाशीही तडजोड केली नाही. त्यांच्याकडे प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग होता – कष्ट, दिवस-रात्र कष्ट.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
वडिलांनी आपल्या हयातीत नेहमीच आपला कुणावर बोजा पडू नये, हे पाहिलं. आईनंही तेच केलं. जेवढं शक्य तेवढं आपलं आपण काम करत राहिली. मी जेव्हा आईला भेटत असे, तेव्हा ती म्हणत असे, ‘मी मरेपर्यंत कुणाकडूनही सेवा करून घेऊ इच्छित नाही. बस, असंच चालत-फिरत असतानाच जाण्याची इच्छा आहे.’
मी माझ्या आईमध्ये या देशातील तमाम मातृशक्तीची तपश्चर्या, त्याग आणि योगदान पाहतो. मी जेव्हा माझी आई आणि तिच्यासारख्या कोट्यवधी महिलांचं सामर्थ्य पाहतो, तेव्हा मला असं कुठलंही लक्ष्य दिसत नाही, जे भारताच्या लेकीबाळींसाठी अशक्य आहे.
अभाव की हर कथा से बहुत ऊपर, एक मां की गौरव गाथा होती हैं।
संघर्ष के हर पल से बहुत ऊपर, एक मां की इच्छाशक्ति होती हैं।
.................................................................................................................................................................
मूळ हिंदी लेखासाठी पहा -
https://www.narendramodi.in/hi/mother-562570
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Wed , 04 January 2023
आईबापांचं अस्तित्व हे एक प्रकारचं छत्र असतं. आज मोदींवरचं हे छत्र लौकिक अर्थी हरपलं आहे. मात्र त्याची मोदींना स्मृतिरूपे सदैव साथ लाभो, हीच इच्छा.
-गामा पैलवान