अजूनकाही
उल्हास नलावडे यांचे ‘गोडसेवाद्यांचे असत्याचे प्रयोग’ हे पुस्तक नुकतेच अक्षर प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. प्रदीप दळवी यांच्या ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाला नाटकाच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी ‘मी पण नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक लिहिणाऱ्या लेखकाचे हे नवे पुस्तक. या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश…
.................................................................................................................................................................
गोळी लागल्यानंतर खाली कोसळताना महात्मा गांधी ‘हे राम’ असे म्हटलेच नाहीत, असा युक्तिवाद ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकात ऐकला होता. ज्या पद्धतीने नायकाने प्रेक्षकांना ती गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्न केला होता, तो नक्कीच वाखाणण्याजोगा होता. जेव्हा मी ते नाटक पहिल्यांदा पाहिले होते, तेव्हा मला त्यांचा युक्तिवाद पूर्णपणे पटला होता. गांधीजी मरताना ‘हे राम’ म्हटले असे कुणीतरी मृत्यूनंतर पसरवले असावे, यावर माझा पूर्ण विश्वास बसला होता आणि तो विश्वास इतका दृढ झाला होता की, त्याबद्दलची शहानिशा करावीच वाटली नाही. अनेक वर्षानंतर जेव्हा मी महात्मा गांधींविषयी अभ्यास सुरू केला तेव्हा सत्य समोर आले.
महात्मा गांधी ‘हे राम’ म्हटलेच नव्हते, असा दावा आतापर्यंत कुणीकुणी केला आहे, याचा अभ्यास केल्यावर पुढील गोष्टी समोर येतात. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकात हा दावा केला गेला. अर्थात त्या नाटकातील दाव्याचा संदर्भ या गोपाळ गोडसे यांच्या पुस्तकांशी जोडला जाऊ शकतो. गांधी हत्या झाल्यापासून तोपर्यंत असा दावा कुणी केल्याचे माझ्या वाचनात नाही. जरी तसा कुणी केला असेल तर त्या वेळी तो नाकारण्यात आला असावा. १९८४ साली प्रदीप दळवी यांनी ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटक लिहिण्याआधी कुणीही इतक्या भक्कमपणे असा दावा केला नव्हता.
त्यानंतर २००६ साली गांधींचे वैयक्तिक परिचारक असलेले श्री कल्याणम् यांनी गांधीनी ‘हे राम’ म्हटले नव्हते, असा तर्क मांडला होता. त्यांनी केलेल्या त्या विधानानंतर बराच गोंधळ झाला होता. गांधीजींची हत्या झाल्यानंतर जवळपास ५८ वर्षांनंतर त्यांना हे शहाणपण सुचले होते. पण पुढे १२ वर्षांनी म्हणजे २०१८ साली, त्यांनी स्पष्टीकरण दिले- “मी कधीही गांधीजींनी ‘हे राम’ म्हटले नव्हते, असे बोललो नव्हतो. एवढेच म्हटले होते की, मी गांधीजींनी ‘हे राम’ म्हटल्याचं ऐकलं नव्हतं. गांधीजींवर जेव्हा गोळ्या झाडण्यात आल्या, तेव्हा प्रत्येक जण ओरडत होता. मला गोंधळात काहीही ऐकू येत नव्हते. ते ‘हे राम’ असे बोलले असावे, पण ते मला माहीत नाही.” यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कल्याणम हे ३० जानेवारी रोजी बिर्ला भवन येथे होते की नव्हते, हे सिद्ध झालेले नाही.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
अलीकडे २०१४नंतर राजकीय पक्षांकडून समाजमाध्यमांचा राजकारणासाठी वापर होऊ लागल्यानंतर मात्र अशा अनेक तर्कांना उधाण आले आहे.
३० जानेवारीला सायंकाळी ५:१७ वाजता गांधीजींची हत्या झाल्यानंतर साडेचार तासांनी तुघलक रोड पोलीस स्टेशनमध्ये असिस्टंट सबइन्स्पेक्टर ढालुराम यांनी प्राथमिक माहिती अहवालाची (एफआयआर) नोंद केली होती. त्यात गांधीजींचे जवळचे सहकारी नंदलाल मेहता यांनी असे म्हटले आहे की,
“पुणे येथील रहिवासी नारायण विनायक गोडसे (ज्याचे नाव मला नंतर समजले) गांधीजींच्या जवळ गेले आणि साधारणपणे २/३ फूट अंतरावरून एका पिस्तूलमधून महात्मा गांधीजींवर तीन गोळ्या झाडल्या. त्या महात्मांच्या पोटात आणि छातीत लागल्या आणि रक्त वाहू लागले. महात्माजी ‘राम-राम’ म्हणून खाली कोसळले.”
आता नंदलाल मेहता अशी खोटी जुबानी पोलिसांना का देतील? त्या धक्कादायक आणि तणावपूर्ण वातावरणात नंदलाल मेहता यांनी काही बनवाबनवी केली असे म्हणणे, म्हणजे त्यांच्या हेतूबद्दल शंका घेणे असे होईल आणि त्यांच्याबद्दलचा अनादर ठरेल. नंदलाल मेहतांचा तो ‘एफआयआर’ आजही कायदेशीर दस्तवेज म्हणून उपलब्ध आहे.
जर नंदलाल मेहता खोटे बोलले असे मानले तरी मनुबेन नावाच्या गांधीजींच्या नातीने काय म्हटले आहे, हे बघावे लागेल. ही तीच मनुबेन आहे जिला गोडसेने जबरदस्तीने बाजूला सारून गांधीजींवर गोळ्या झाडल्या होत्या. प्रार्थनास्थळाकडे जाताना गांधीजींच्या एका बाजूला मनुबेन आणि दुसऱ्या बाजूला गांधीजींची दत्तक पुत्री आभा चटर्जी म्हणजेच कानुबेन होत्या. गांधीजी त्या दोघींना आपल्या ‘कुबड्या’ असे संबोधत असत. मनुबेनच्या म्हणण्यानुसार-
“एक खाकी सदरा घातलेला मनुष्य गर्दीतून वाट काढत समोर येत होता. त्याच्या जोडलेल्या हातामुळे तो गांधीजींच्या पायाला स्पर्श करू इच्छित आहे, असे तिला वाटले. तिने त्याला बाजूला सारण्याचा प्रयत्न करताना ‘गांधीजींना आधीच दहा मिनिटे उशीर झाला आहे, तुम्ही त्यांना अडचण करू नका.’ असे सुनावले. तेवढ्यात गोडसेने तिला जोराने बाजूला सारले, तिचा तोल गेला आणि हातातल्या वस्तू खाली पडल्या. वस्तू सावरण्याचा आणि उठण्याचा प्रयत्न करत असतानाच तिने गोळ्यांचे आवाज ऐकले. तिची नजर जेव्हा गांधीजींकडे गेली, तेव्हा त्यांचे दोन्ही हात जोडले गेले होते आणि तोंडातून ‘हे राम’ हे शब्द बाहेर पडत होते. आभाबेनही खाली पडली होती आणि गांधीजी तिच्या मांडीवर पडले होते.”
वरील घटनाक्रम मनुबेनने ‘लास्ट ड्रीम्स ऑफ बापू’ या तिच्या पुस्तकात लिहून ठेवला आहे.
गांधीजींचे वैयक्तिक सचिव आणि शिष्य असल्येल्या प्यारेलाल यांनीसुद्धा गांधीजींनी ‘हे राम’ म्हटले असल्याचे त्यांच्या ‘महात्मा गांधी : लास्ट फेज’ या पुस्तकात लिहिले आहे.
घटनेच्या साक्षीदारांनी सांगितलेल्या गोष्टीवरून तरी गांधीजींनी ‘हे राम’ म्हटले होते हे सिद्ध होते. उलट बाजूचे तर्क अलीकडच्या काळातले आहेत. जर तुम्हाला कुणी गांधीजींच्या मृत्यूनंतर चार तासांत नोंदवलेल्या ‘एफआयआर’वर किंवा प्रत्यक्षदर्शीनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्याऐवजी त्यांच्या मृत्यूनंतर २३ वर्षांनी मांडलेल्या तर्कावर विश्वास ठेवायला सांगितला, तर तुम्ही काय कराल? पण तरीही गांधीजी ‘हे राम’ म्हटले नव्हते, असा अट्टाहास गोडसेवादी का करत आहेत, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यास काही गोष्टी समोर येतात. त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे गांधीजींची हत्या करण्याचे पाच असफल प्रयत्न झाले होते. गांधीजींना माहीत असावे की, मारेकऱ्यांचे हे प्रयत्न त्यांच्या मृत्यूनंतरच संपतील. कदाचित त्यामुळेच त्यांनी एका सायंप्रार्थनेत (२० जानेवारीला बॉम्ब फेकून खुनाचा प्रयत्न असफल झाल्यानंतर ते ३० जानेवारीला हत्या झाली त्यादरम्यान) असे विधान केले होते की,
“मागच्या आठवड्याप्रमाणे परत एखादा स्फोट झाला किंवा माझ्यावर कोणी गोळी झाडली. मी त्याची गोळी उसासा न टाकता माझ्या छातीवर झेलली आणि माझ्या ओठांवर रामाचे नाव आले, तरच मी खरा महात्मा आहे असे म्हणावे. याचा लाभ भारतीय जनतेला होईल.”
कदाचित हाच धागा पकडून नथुरामवाद्यांनी गांधीजी ‘हे राम’ म्हटले नसावेत हा युक्तिवाद केला असावा. कारण शेवटी कुठल्या न कुठल्या कारणाने गांधीजींना बदनाम करणे आणि गांधीजी महात्मा कसे नव्हते, हे पटवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न करणे, हेच या सर्व खटाटोपामागचे कारण असावे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
आणखी एक गोष्ट म्हणजे ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकात नथुराम गोडसे गोळ्या झाडण्याआधी गांधीजींच्या पाया पडतो आणि गांधीजींनी जी देशसेवा आणि त्याग केला त्यासाठी वंदन करतो, असा आव आणला गेला आहे. नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करण्याचे आणि तो कसा श्रेष्ठ होता, हे दाखवण्याचे अनेक कल्पक प्रयत्न या नाटकात केले गेले आहेत. हा त्यापैकीच प्रयत्न एक आहे, असे मी मानतो. नथुरामचे जोडलेले हात पिस्तूल लपवण्यासाठीच होते, जर कुणाला वाटत असेल की त्याने गांधींना वंदन केले, त्यांनी नथुरामची गांधीजींविषयीची मते आणि पंजाब उच्च न्यायालयात केलेले अपील वाचावे-
“Have I that non-violence of the brave in me? My death alone will show that. If someone killed me and I died with prayer for the assassin on my lips, and God's remembrance and consciousness of His living presence in the sanctuary of my heart, then alone would I be said to have had the non-violence of the brave.” (The Last Phase by Pyarelal, Vol. II, p. 101)
गांधीजी रोज अर्धा तास चरख्यावर सूतकताई करत असत आणि आपल्या अनुयायांनाही तसे करण्यास सांगत असत. चरख्याच्या चाकाबरोबर गांधी ‘राम-राम-राम’ असा जप करत असत. गांधीजींनी संपूर्ण आयुष्यात जेवढ्या वेळा रामनामाचा उच्चार केला असेल, तेवढा किंबहुना त्याच्या अर्धा तरी रामाच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी केला असेल का? गांधीजी ‘हे राम’ म्हणाले की, ‘राम-राम’ म्हणाले, याच्यावर विवाद होऊ शकतो, पण त्यांनी शेवटी रामाचे नाव घेतले, हे सत्य आहे.
आज गोडसेवादी काहीही म्हणत असले, तरी राजघाट येथील महात्मा गांधीजींच्या समाधीवर ‘हे राम’ ठळकपणे कोरले आहे, ते कुणीच पुसू शकणार नाही, हे नक्की.
‘गोडसेवाद्यांचे असत्याचे प्रयोग’ – उल्हास नलावडे
अक्षर प्रकाशन, मुंबई | पाने - १३५ | मूल्य – २०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment