‘देह वेचावा कारणी’ : आपल्याबरोबर आपला समाज, आपले लोक आणि त्यांच्या स्वातंत्र्योत्तर वाटचालीचे मार्मिक विवेचन
ग्रंथनामा - झलक
अरुण साधू
  • बाळासाहेब विखे पाटील आणि त्यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मकथनाचे मुखपृष्ठ
  • Tue , 27 December 2022
  • ग्रंथनामा झलक बाळासाहेब विखे पाटील Balasaheb Vikhe Patil देह वेचावा कारणी Deh Vechava Karni काँग्रेस शिवसेना Shivsena इंदिरा गांधी Indira Gandhi राजीव गांधी Rajiv Gandhi

‘देह वेचावा कारणी’ माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचे हे आत्मकथन अलीकडेच राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले. गेल्या वर्षी त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या पुस्तकाला ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू यांनी लिहिलेली ही प्रस्तावना…

.................................................................................................................................................................

श्री. एकनाथराव तथा बाळासाहेब विठ्ठलराव विखे पाटील यांचे प्रस्तुत आत्मचरित्र मराठीतील इतर नेहमीच्या आत्मकथांपेक्षा खूपच वेगळे आहे. ते अशा अर्थाने की, या कथनात बाळासाहेव केवळ ‘स्व’ची कहाणी सांगत नाहीत; तर आपल्याबरोबर आपला समाज, आपले लोक व त्यांच्या स्वातंत्र्योत्तर वाटचालीचेही मार्मिक विवेचन ते करतात. किंबहुना त्यांच्या आत्मचरित्राला भव्य अवगुंठन आहे, ते आधुनिक भांडवलशाही व अर्थकारण यांच्या झपाट्यात सापडलेल्या भारतीय कृषक समाजाच्या अस्तित्वाच्या लढाईचे. म्हणूनच हे पुस्तक मराठी आत्मकथनात विशेष असे उठून दिसू शकते.

लेखकाने आयुष्याच्या वाटचालीत पाहिलेले विशाल जग, विविध विषय, त्यांची हाताळणी, निवेदनाच्या शैलीचा मोकळा, सडेतोड, थोडासा ग्रामीण ढंगाने येणारा बाज हे सगळे वेगळेच रसायन आहे. शेती, सहकार, ग्रामीण समाजाची सर्जनशीलता, शेतीपासून तो खेड्यांमधील घरांचे वास्तुशास्त्र, घरबांधणी, विहीरबांधणी व शेतीमधील अनेक तंत्र-शास्त्रीय कृतींचा पारंपरिक विकास इत्यादींचे अफलातून वर्णन इतरत्र वाचायला मिळणे कठीण. कृषि-विद्यापीठांच्या पुस्तकांमध्ये तरी असे तपशील असतील काय, असा प्रश्न पडावा.

अनुषंगाने येणाऱ्या प्रमुख विषयात लोक, ग्रामीण समाजाचे स्वरूप, त्यातील विविध समूहांची मानसिकता आणि अर्थातच राजकारण - म्हणजे केवळ निवडणुकांचे राजकारण नव्हे, तर समाजकारण, विविध समाजसमूहांच्या आशा-आकांक्षांचा संघर्ष, त्यातून ढवळले जाणारे संस्कृतीकारण, वैयक्तिक स्वार्थ, मानापमान, कपट, सूड, ईर्ष्या... या प्रकारच्या निवेदनातही आश्चर्यकारक मोकळेपणा, साधेपणा, थोडासा आवश्यक असा फटकळपणा तर आहेच; पण त्यातूनही लेखकाच्या मनाचा उदारपणा दिसतो.

बाळासाहेबांनी उणी-पुरी चाळीस क्रियाशील वर्षे लोकसभेत काढली. संसदेच्या कामकाजाचे, विशेषतः संसदीय समित्यांच्या कार्यशैलीचेही जे तपशील त्यांनी निवेदनात दिले आहेत, तसे पूर्वी मराठीत तरी वाचनात आले नव्हते. या सर्व निवेदनात त्यांनी जी जीवनविषयक, मनुष्य-स्वभावासंबंधी भाष्ये केली आहेत; तीही भावण्यासारखी आहेत.

लोणी-प्रवरानगरचे बाळासाहेब विखे पाटील हे राजकारणातील व सहकार क्षेत्रातील बिनीचे नेते म्हणून सर्वज्ञात आहेत. महाराष्ट्रातील नव्हे, तर देशातील शेतकऱ्यांच्या पहिल्या सहकारी साखर कारखान्याची निर्मिती ज्यांच्या पुढाकारातून झाली, ते लोणीचे विठ्ठलराव विखे पाटील हे त्यांचे वडील. बाळासाहेब नगर जिल्ह्यातील मतदारसंघांमधून आठ वेळा लोकसभेवर निवडून गेले. १९९१च्या निवडणुकीतील विचित्र परिस्थितीत ते एकदाच पराभूत झाले, परंतु तेव्हाही कोर्टात केस लढवून ती निवडणूक त्यांनी रद्दबातल ठरविली.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

बाळासाहेबांना इंदिरा गांधींचे महाराष्ट्रातील विश्वासू दूत मानले जात असे. पण इंदिराबाईंचे कडवे समर्थक असूनही कार्यकर्त्यांना आधार हवा, म्हणून काही काळ ते शिवसेनेत गेले (इंदिराबाई गेल्यानंतर). त्याच काळात वाजपेयी यांच्या केंद्रीय सरकारात ते मंत्रीपदावर होते. पुन्हा काँग्रेसमध्ये परतले. अडचणीमुळे काही काळ पक्ष सोडला, तरी डोक्यावरील तिरपी पांढरी टोपी कधी ढळली नाही. इंदिराबाईंनी आणलेल्या आणीबाणीचे ते कडवे समर्थक होते व अजूनही आहेत. त्यांच्या समर्थनाचा सारांश असा, की बहुसंख्य मध्यमवर्गीय व उच्च-वर्गीयांच्या लोकशाही-स्वातंत्र्याच्या विशिष्ट संकल्पनांच्या भिंगातून आणीबाणीकडे पाहून टीका झाली. याउलट बहुसंख्य अशा कोट्यवधी निम्नवर्गीय गरिबांच्या नजरेतून पाहिले, तर वेगळे मत होते. खेड्यापाड्यातील गरिबांमध्ये नव्या आशा-आकांक्षा आणीबाणी काळात निर्माण झालेल्या लेखकाने अनुभवलेल्या आहेत. शिवाय तत्कालीन कठीण परिस्थितीत देशाची एकता व लोकशाहीची सुरक्षा सांभाळण्याच्या दृष्टीने हा जालीम उपाय कसा अपरिहार्य होता, हेही इंदर मल्होत्रा व इतर देशी-परदेशी अभ्यासू टीकाकारांच्या साक्षी काढत सांगितले आहे. या पुस्तकात ही बाजू सविस्तर मांडली असून वाचकांनी ती मुळातच वाचायला हवी.

संसदेमध्ये शेती व ग्रामीण विषयांवर अधिकारवाणीने बोलणारे अभ्यासू खासदार म्हणून विखे पाटलांकडे पाहिले जात असे. प्रवरानगर (लोणी) येथील प्रवरा सहकारी साखरकारखान्याची धुरा नीट सांभाळत त्यांनी कल्पकतेने विकासाची अफाट कामे केली. ग्रामीण भागात सर्व प्रकारच्या शिक्षणाची संकुले उभारून स्थानिक तरुणांमधे आत्मविश्वासाचे व उत्साहाचे वारे निर्माण केले. संसदेच्या कामासाठी दिल्लीला बराच काळ वास्तव्य करावे लागत असले; तरी त्यांची महाराष्ट्राशी, आपल्या लोकांशी असलेली नाळ कायम घट्ट होती व महाराष्ट्राच्या राजकारणातील दबदबा कायम होता.

काँग्रेसच्या कालखंडात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न निघाला की, संभाव्य यादीत बाळासाहेबांचे नाव फोटोसह पुढाकाराने झळकत असे. दिल्ली व मुंबईच्या पत्रकारांना वरवर ‘बावळ्या’ वाटणाऱ्या, सतत पायजमा, ग्रामीण धर्तीचा पांढरा कुडता व पांढऱ्या टोपीत वावरणाऱ्या या मूर्तीबद्दल मोठेच कुतूहल वाटत असे. पण येता-जाता पत्र-परिषदा घेऊन प्रसिद्धी मिळेल, अशी भीमदेवी थाटाची निवेदने करण्याची त्यांची प्रवृत्ती नाही. त्यांचे ‘राजकारण’ फारसा गाजावाजा न करता गुपचूप चालते, असा समज होता. पण स्वतः बाळासाहेब मात्र सांगतात, ‘अरे, बाबा, मी राजकारण नाही करत, समाजकारण करतो.’

अर्थात इंदिराबाईंच्या कारकिर्दीत त्यांच्या शब्दाला दिल्लीत मोठे वजन होते. आणि वाजपेयी यांच्या सत्ता कालखंडातही! दिल्लीत व महाराष्ट्रात उच्च स्तरावर काय राजकारण शिजते आहे, याची त्यांना खडा न् खडा माहिती असायची. साहजिकच या आत्मनिवेदनात त्यांच्या राजकारणाचे भरपूर संदर्भ येणे वाचकांना अपेक्षित असणार. ते तसे येतातही. पण राजकारणाचे भारी डाव-पेच, लफडी-कुलंगडी, किस्से वगैरे रंगवून सांगण्यात लेखकाला फारसा रस दिसत नाही. तरीही सांगण्याच्या ओघात बऱ्याच चविष्ट राजकीय घटना येतात, नाही असे नाही. पण वाचकांच्या असे लक्षात येते की, बाळासाहेबांना मनस्वी ध्यास आहे तो सामान्य लोकांचा, शेतकऱ्यांचा - त्यातही छोटे शेतकरी, भूमिहीन शेतमजूर वगैरे.

त्यांच्या ध्यासाचे इतर विषय या आत्मचरित्रात दिसतात. ते म्हणजे, ग्रामीण भागात बहुआयामी शिक्षणाच्या सुविधा निर्माण करून शेतकऱ्यांच्या मुलांना आधुनिक जगातील स्पर्धांसाठी सक्षम करणे, भारतातील शेती-संस्कृती व शेतीव्यवसायाचे भवितव्य, त्या अनुषंगाने सहकार चळवळीचे भवितव्य आणि भारतातील राजकारणावर व समाजकारणावर वाढत चाललेले कॉर्पोरेट भांडवलशाहीचे धोकादायक वर्चस्व. त्यांच्या या आत्मकथेत हे विषय वारंवार मोठ्या पोटतिडिकेने विविध अंगांनी चर्चिले गेले आहेत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

प्रवरानगरमध्ये बाळासाहेबांनीच स्थापन केलेल्या अभ्यास मंडळाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांसंबंधी पाहण्या व संशोधन केले आहे. बाळासाहेबांची या विषयावर ठाम मते असून ती त्यांनी या पुस्तकात मांडली आहेत. स्पर्धात्मक वातावरणामुळे शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला असून तो छोट्या व मध्यम शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर चालला आहे. पिढ्या न् पिढ्या जमिनीचे तुकडे पडत जाऊन लहान तुकड्यांवरील शेती आता अधिकच परवडेनाशी होत आहे. या परिस्थितीत एक अशी भांडवलदारी विचारसरणी बळावत चालली आहे की, कॉर्पोरेट क्षेत्राला शेतीमध्ये उतरण्याची मुभा मिळाल्यास व्यापारी कंपन्या मोठ्या प्रमाणावर भांडवल ओतून आधुनिक तंत्रज्ञान व यंत्रे वापरून शेती किफायतशीर करू शकतात, तसेच अन्नधान्याचे उत्पादनही वाढवू शकतात. हा विचार भांडवलशाही मंडळी तसेच काही बडे राजकीय पुढारीही नेटाने रेटत आहेत. वरवर पाहता हा उपाय योग्य वाटणे शक्य आहे. पण बाळासाहेबांचे म्हणणे असे, की शेतजमिनीवर भांडवली कॉर्पोरेट्सना रान मोकळे सोडले, तर शेतीवरच अवलंबून असलेल्या भारतातल्या साठ-सत्तर कोटी लोकांचे काय करायचे?

अमेरिकेत आधुनिक तंत्रज्ञान व मशिनरीच्या साहाय्याने पाच-सात जणांचे कुटुंब हजारो एकराची शेती किफायतशीरपणे करू शकते. शेतमजुरांची संख्या नगण्य. भारतात व्यापारी कंपन्या किंवा शासन शेतीवर जगणाऱ्या या कोट्यवधी लोकांची काय सोय लावणार? तेव्हा हा उपाय म्हणजे भयंकर उत्पाताला निमंत्रण. बाळासाहेबांच्या मते मोठ्या प्रमाणावर सहकारी पद्धतीने शेती करणे हाच तोडगा, या बाबतीत निघू शकतो. मात्र सध्या ‘सहकार’ या विषयालाच बदनाम करण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू असून त्यात कॉर्पोरेट क्षेत्रासह काही राजकीय पुढारी, काही खुद्द सहकारी नेते व व शासकीय नोकरशाहीतील काही लोक आघाडीवर आहेत.

सहकाराचा प्रयोग फसला, लोकांची मानसिकता सहकाराला अनुकूल नाही, हे दाखवून देण्यासाठी सहकारी कारखान्यांचे खासगीकरण करण्याच्या उद्योगात हे लोक आहेत. लांड्या-लबाड्या करून सहकारी कारखाने तोट्यात न्यायचे आणि ते दिवाळे काढून स्वत:च विकत घेऊन मालकी तत्त्वावर चालवायचे, अशी टूम निघाली आहे. जे या गोष्टीला विरोध करतात, त्यांची बदनामी करायची. मीडियामध्ये सहकार या विषयाचीच टवाळी करायची. केवळ साखर उद्योगच नव्हे, तर शेतमालांवर प्रक्रिया करण्याचे इतर उद्योग व शेती हा साराच विषय सहकाराखाली आणणे हाच या कोट्यवधी ग्रामीण जनतेला वाचविण्याचा उपाय आहे, असे बाळासाहेबांचे म्हणणे आहे. सध्याच्या राजकारणात व जागतिक भांडवलशाहीच्या वादळात या बाबीचा कोणी गांभीर्याने विचार करत नाही, याची त्यांना खंत आहे. परंतु न थकता ही बाजू ते नेटाने सतत मांडत असतात

बाळासाहेबांचे वडील विठ्ठलराव यांना घरची शेती सांभाळण्यासाठी तिसरीनंतर शाळा सोडावी लागली. अंगच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी पुढे खूप जबाबदाऱ्या पार पडल्या. आपण शिकू शकलो नाही, पण शेतकऱ्यांना आपल्या मागचे पिढ्यान् पिढ्यांचे दारिद्र्याचे शुक्लकाष्ठ दूर करण्यासाठी त्यांच्या मुलांनी शिक्षण घेतले पाहिजे, हे त्यांनी तारुण्यावस्थेतच ओळखले व तेव्हापासूनच ग्रामीण मुला-मुलींच्या शिक्षणाचा सक्रिय प्रचार सुरू केला.

बाळासाहेबांनी तोच वसा नेटाने पुढे नेऊन लोणी-प्रवरानगरास शिक्षणाचे मोठे केंद्र म्हणून विकसित केले. मात्र त्यांना स्वत:लाही कुटुंबाच्या शेतीची जबाबदारी स्वीकारण्यासाठी मॅट्रिकनंतर शिक्षणास राम-राम ठोकावा लागला. लोणीतील प्राथमिक शाळेनंतर त्यांचे माध्यमिक शिक्षण संगमनेर, अहमदनगर, पुणे, नाशिक असे चतुस्थळी झाले. विठ्ठलराव मोठे शिस्तीचे. तीनही ठिकाणी बाळासाहेब ज्यांच्याकडे राहत त्या घरची धुणी-भांडी, केर काढणे, पाणी भरणे, भाज्या-किराणा वगैरे आणणे अशी सर्व प्रकारची कामे करूनच शाळेत जायचे. ओसरीत गोधडीवर झोपायचे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

वडील यजमानांना पैसे, धान्य वगैरे द्यायचे; पण बाळासाहेबाच्या हाती पैसाही ठेवायचे नाहीत. वडील सार्वजनिक कामात व सहकारात व्यग्र. घरची शेती बऱ्यापैकी म्हणजे सांपत्तिक स्थिती काही वाईट नव्हती. तरीही असे मोठ्या कष्टात कसोशीने शिक्षण केले. सुटीत घरी आले की, गड्यांबरोबर शेतीची कामे. याच काळात लहानपणी शेतावरची सर्व प्रकारची कामे ते शिकले. कित्येक वेळा गड्यांबरोबरच राहत व जेवत. त्याबद्दल बाळासाहेबांनी विस्ताराने लिहिले आहे. त्यात वडलांबद्दल कटुता तर नाहीच, उलट आदरच आहे. आपल्याला असे ठेवण्यात वडलांचा विशिष्ट हेतू आहे, हे त्यांना तेव्हाही कळत असावे.

घरीही त्यांना तीन आया, दोन सावत्र. त्या विशिष्ट परिस्थितीत घरी त्यांची आबाळ होत आक्रस्ताळेपणा असे, नव्हे सावत्र वागणूकच मिळत असे; पण निवेदनात रडगाणे नाही, नाही, महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणाबद्दल कटुताही नाही. त्या वयात वडील पाठीशी उभे राहत नसत, याबद्दल तक्रार नाही. उलट वडलांचे समर्थनच आहे. थोडा खेद, किंचित खंत. पण निवेदन स्वच्छ, वस्तुनिष्ठ. त्यांना अशा दिव्यातून जावे लागले, म्हणूनच पुढील आयुष्यात सार्वजनिक जीवनात ते समतोल राखून लोकात मिसळू शकले असावेत.

कुटुंबाच्या शेतीची आबाळ होत होती, म्हणून पुढे महाविद्यालयीन शिक्षण न करण्याचा निर्णय घ्यावा लागला. वडलांनी सहकारी चळवळीला व नियोजित प्रवरा कारखान्याच्या व्यापाला पूर्ण वाहून घेतले होते. बाळासाहेबांनी शेतीला वाहून घेतले. पाणी उपसण्यासाठी विहिरींवर डिझेलची इंजिने नव्याने बसू लागली. इंजिने बंद पडत ती दुरुस्त करण्यात बाळासाहेबांनी प्रावीण्य मिळवले. मदतीसाठी जो शेतकरी बोलवेल, त्याची इंजिने दुरुस्त करून देत. ही मदत विनामूल्य. पंचक्रोशीभर त्यासाठी हिंडत. त्या वेळचा त्यांचा अवतार पाहण्यासारखा होता. हात-पाय कपडे डिझेलने माखलेले, सायकलच्या कॅरिअरवर इंजिन टाकून, पायजाम्याला क्लिपा लावून डोक्यावरची टोपी सावरत पायडल मारत हिंडतो आहे बाळासाहेब खेडोपाडी. शेती कसण्याचे व शेती व्यवसायाचे त्यांना सखोल ज्ञान आहे, याचे श्रेय ते देतात शेतीवरच्या अनुभवी गड्यांना आणि अर्थातच वडलांना. शेतीचे शास्त्र तसेच शेतीतील तंत्रे आणि कौशल्ये यावर स्वतः विठ्ठलरावांचे असे काही प्रभुत्व होते की, मोठमोठे शेतीतज्ज्ञही त्यांना वचकून असत.

तोच वसा बाळासाहेबांनीही पुढे चालवला. गड्यांशी, तरुणांशी शेतीविषयी बोलताना तर विठ्ठलरावांची वाणी काव्यमय होत असे. ते म्हणायचे, “फावल्या वेळी शेतामधून हिंडायचं, पिकांना आंजारायचं, गोंजारायचं. म्हणजे पिकंही प्रसन्न होऊन तरारून उठतात. पिकं बोल लागतात, डोलू लागतात, पिकं गाऊ लागतात. शेत सांगतं कुठे कीड आहे, कुठे अजून पाणी पाहिजे, कुठे खड्डे आहेत. शेत आपली सुख-दुःखं तुम्हाला सांगू लागतं...”

बाळासाहेबांवरही शेतीचे हे गारुड आहे, ते ठायी ठायी जाणवते. लोकसभेमध्ये कृषी किंवा ग्रामीण विषयावर अथवा पाणीप्रश्नावर बोलायला हा जेम- तेम मॅट्रिक झालेला गडी उठला की, जाणकार खासदार सावरून बसत, पंतप्रधानही कान देऊन ऐकत. संसदेत त्यांना शेती व ग्रामीण प्रश्नावरील विशेषज्ञ मानले जाई.

लोणीच्या शेतीमधून लोकसभेपर्यंत बाळासाहेबांनी भरारी कशी मारली, ती मोठी मनोरंजक व उद्बोधक हकीकत आहे. प्रथम त्यांना जिल्हापरिषदेच्या निवडणुकीसाठी आग्रह होऊ लागला, तेव्हा मुलाने राजकारणाच्या व निवडणुकींच्या फंदात पडायला विठ्ठलरावांचा कसोशीचा विरोध होता. मुलगा भोळा (‘येडा’) आहे, त्याला काही कळत-समजत नाही, त्याला कोणीही फसवेल, डोक्यावरून हात फिरवेल, असे ते म्हणत. बाळासाहेबांचा ग्रामीण प्रश्नांमधे रस असलेला समवयस्क तरुण मित्रांचा गट जमला होता. या मित्रांनी आग्रहाने त्यांना जिल्हापरिषदेसाठी उभे केले, तेव्हा विठ्ठलरावांनी खूप आकांडतांडव केले. बाळासाहेब निवडून आले, परिषदेचे उपाध्यक्ष झाले.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

पुढे त्यांची तडफ पाहून १९७१-७२च्या लोकसभा निवडणुकीचे काँग्रेसचे तिकीट बाळासाहेबांच्या गळ्यात कसे पडले, ती गुंतागुंतीची गोष्ट विस्ताराने सांगितली आहे. इंदिराबाईंच्या करिअरमधील व इंदिरा-काँग्रेसच्या दृष्टीने ही महत्त्वाची निवडणूक. निवडणुकीसाठी पक्षीय उमेदवार निवडताना वेगवेगळ्या शक्ती व गट तसेच व्यक्ती कशा कार्यरत होतात, कार्यकर्त्यांना कसे सांभाळून वागवावे लागते व अंतिम निर्णयावर उपलब्ध राजकीय व सामाजिक परिस्थिती कशी प्रभाव टाकते याचा मार्मिक केस-स्टडीच जणू बाळासाहेबांनी येथे पेश केला आहे. लोकसभेच्या नऊ निवडणुका त्यांनी लढवल्या. प्रत्येक निवडणूक केस-स्टडी.

वर १९९१च्या निवडणुकीत बाळासाहेबांना हार पत्करावी लागली, असा उल्लेख आहे. त्या बाबीसंबंधी काही सांगितले पाहिजे. संसदेत काँग्रेस पक्ष विरोधात होता. त्यावेळी बाळासाहेबांनी इंदिरा काँग्रेसच्या डाव्या धोरणांचा व विचारांचा झेंडा संसदेत उचलून धरण्यासाठी खासदारांचा फोरम काढला. पक्षात गैरसमज पसरवले गेले. राजीव-सोनिया यांचे कान भरून त्यांचा असा समज करवला गेला की, हा फोरम त्या दोघांच्या विरोधात आहे. परिणामी १९९१च्या निवडणुका जाहीर झाल्यावर काँग्रेसने बाळासाहेबांचे तिकीट कापले. इकडे पूर्ण तयारीत असलेल्या मतदारसंघातील बाळासाहेबांचे कार्यकर्ते संभ्रमित झाले. बाळासाहेबांची जिद्द, कार्यकर्त्यांचा दबाव यामुळे ते अपक्ष म्हणून उभे राहिले.

सगळे व्यवस्थित चालले होते. अचानक राजीव गांधींची हत्त्या झाली. काँग्रेसच्या बाजूने सहानुभूतीचे वारे आले. इतरही काही घटक होते. बाळासाहेब प्रथमच निवडणुकीत पडले. पुढे केस करून कोर्टामार्फत निकाल रद्दबातल करून घेतला, हे वर सांगितले आहेच. या व इतर निवडणुकीत प्रभाव टाकणारे फोर्सेस, त्या विभिन्न शक्तींचे गुणविशिष्ट स्वभाव, त्यांच्या एकमेकांशी होणाऱ्या बऱ्या-वाईट प्रक्रिया व त्यांचे परिणाम हे सगळे डायनामिक्स वा क्वांटम गणित बाळासाहेबांनी चांगले आत्मसात केले आहे, असे त्यांच्या निवेदनातून जाणवते. लोकसभेच्या नऊ निवडणुका, जिल्हापरिषदेच्या निवडणुका, साखर- कारखान्यांच्या, को-ऑपरेटिव संस्थांच्या तसेच आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या, मित्रांच्या विधानभेच्या निवडणुका असा या रणक्षेत्राचा अफाट अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. परंतु त्यांचा भर हा असे डाव-प्रतिडाव, शह-काटशह व मतांची कोरडी गणिते यावर नसतोच. त्यांच्या या निवडणुकीय यशाचे रहस्य आहे - अथांग लोकसंग्रह! मतदार म्हणून नव्हे, तर सामान्य लोक म्हणून.

निवडणुकांसाठी किंवा राजकारणासाठी प्रयत्नपूर्वक त्यांनी हे कौशल्य कमावले आहे, असे ज्यांना बाळासाहेब माहीत आहेत किंवा जे हे पुस्तक वाचतील ते म्हणू शकणार नाहीत. लोकांना जीव लावणे, हा त्यांच्या स्वभावाचा भाग आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात उच्च स्तरावर पोचलेल्या नेत्यांची स्मरणशक्ती अफाट असते, असा अनुभव आहे. बाळासाहेब त्या वर्गात आहेत. कार्यकर्ता असो, दूर खेड्याच्या झोपडीतील भूमिहीन, शेतावरील कामकरी बाई, विद्यार्थी असो - एकदा का नावा-गावाची ओळख झाली की, ती त्यांच्या मेंदूच्या मेमरी चिपमध्ये पक्की बसते, असा त्यांच्या निकटवर्तीयांचा अनुभव आहे.

बहुतेक बड्या नेत्यांचे हे गुणवैशिष्ट्य असते. दहा वर्षांनंतर माणूस भेटला, तरी त्याच्या मुला-बाळांची नावे घेऊन चौकशी करणार. साहेब आपणास नावाने ओळखतात, चौकशी करतात, याचेही सामान्य जनांना मोठे अप्रूप असते. लोकांना धरून ठेवण्याची पुढची पायरी म्हणजे त्यांच्या लहान-मोठ्या तक्रारी व न्याय्य कामे शब्द टाकून मार्गी लावणे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

बाळासाहेबांचे वैशिष्ट्य असे की, ते नुसताच शब्द टाकत नाहीत; तर गरिबांच्या कामासाठी स्वतः वेळ देऊन पाठपुरावा करतात. असे लोक मग त्यांचे स्वयंघोषित कार्यकर्तेच बनतात. अर्थात नुसता लोकसंग्रह पाठीशी असूनही राजकारणात नेहमीच काम भागते असे नव्हे. वेळ आलीच, तर शह-काटशह, डाव-प्रतिडाव या धुमश्चक्रीत आपणही कमी नाही, हे त्यांनी अनेक वेळा दाखवून दिले आहे.

लोकसंग्रहाबरोबरच बाळासाहेबांचे आणखी एक वैशिष्ट्य या पुस्तकातून जाणवते, ते त्यांचे शासनाच्या विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांशी असलेल्या संबंधांचे. जिल्हा परिषदेपासून संसदेपर्यंतचा त्यांचा विस्तीर्ण अनुभव, जिल्हापरिषदेच्या उपाध्यक्षपदापासून केंद्रीय मंत्री तसेच संसदीय समित्यांचे सदस्यत्व व अध्यक्षपदे अशा विविध स्तरांवरून त्यांना नोकरशाहीच्या अगदी खालच्या स्तरापासून तो सर्वोच्च श्रेणीतील केंद्रीय अधिकाऱ्यांबरोबर कामे करावी लागली. अधिकाऱ्यांना आपलेसेही करायचे आणि वचकही बसवायचा व प्रेमाने कामे करवून घ्यायची याचे त्यांनी स्वविकसित कौशल्य कमावले होते. अधिकाऱ्यांच्या ताटाखालची मांजरे बनून त्यांच्या कलाने घेणाऱ्या आजच्या तरुण पुढाऱ्यांना त्यातून खूप शिकण्यासारखे आहे. पण त्यासाठी स्वतःचे ज्ञान हवे, अभ्यास हवा, पूर्वतयारी हवी. आत्मविश्वास हवा. आपल्याला काही माहिती नाही, असे दर्शवीत बारीक-सारीक प्रश्न विचारत राहायचे. हळूहळू अधिकाऱ्याला उमगू लागते की, साहेब दिसतात तसे ‘बावळे’ नाहीत, आहेत. तो चपापतो, सरळ मार्गावर येतो. साहेबांबद्दल आदर वाढतो.

स्वत:ची माहिती व अभ्यास अद्ययावत ठेवण्यासाठी बाळासाहेबांची अपार कष्ट घेण्याची तयारी असे. संसदेच्या ग्रंथालयात अभ्यासासाठी जास्तीत जास्त वेळ बसणाऱ्या सदस्यांपैकी ते होते. त्यामुळे लोकसभेचे स्पीकर व संसदेतील डाव्या पक्षांच्या व इतर अभ्यासू सदस्यांना त्यांच्याविषयी आदर असे. एका मराठी पत्रकाराने कुत्सितपणे लिहिले, ‘लोकसभेत या या खासदारांचे प्रश्न असायचे ते परराष्ट्रधोरण, सार्क, संरक्षण, मॅरिटाईम स्ट्रॅटेजी, पतधोरण अशा गंभीर विषयांवर; तर बाळासाहेव विखे पाटलांचे प्रश्न खूप, पण ते असायचे शेती, दुष्काळ, पाणी शेतकऱ्यांचे कर्ज असल्या (म्हणजे फुसकट) विषयांवर.’ बाळासाहेबांना ही ‘कॉप्लिमेंट’ वाटली.

काँग्रेस हायकमांडशी खटकल्यावर आणि अपक्ष म्हणून निवडणूक हरल्यावर राजकीय भविष्याचा प्रश्न उभा राहिला. स्वतःपेक्षा नेत्याच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांची अशा वेळी मोठीच गोची होते. पक्ष त्यांना तुसडेपणाने, संशयाने वागवतो. कामे होत नाहीत. त्यांची उभारी जाते. त्यांना कोठल्या तरी पक्षाचे छत्र आवश्यक असते. चिरंजीवांना शिवसेनेने पळवले होते. त्यामुळे त्या काळात परिस्थिती अशी विचित्र निर्माण झाली की, बाळासाहेबांना भाजपसारख्या संघटित व घट्ट विचारसरणी असलेल्या पक्षापेक्षा कोणतीही राजकीय विचारसरणी नसलेल्या शिवसेनेत जाणे श्रेयस्कर वाटले. शिवसेनेलाही ग्रामीण भागात विस्तार करायचा असल्याने दोन्ही बाजूने ही व्यवस्था सोयीस्कर होती.

बाळासाहेब स्वतः पक्के डाव्या विचारसरणीचे असूनही त्यांचे शिवसेना स्वीकारणे खूप लोकांना खटकले. या विषयीचे सविस्तर लॉजिक त्यांनी एका प्रकरणात दिले आहे. पुष्कळांना हे समर्थन पटणार नाही, पण एक मात्र खरे - शिवसेनेतही बाळासाहेबांनी आपला डावा काँग्रेसी बाणा सोडला नाही. एवढा की, आपल्या शिवसैनिकांना बाळासाहेब हायजॅक करतात की काय, अशी भीती सेनेतील काही सरदारांना वाटू लागली. त्याची परिणती अचानक बाळासाहेबांना मंत्रीपदावरून काढून टाकण्यात झाली. बाळासाहेबांच्या राजकीय जीवनातील हा एपिसोड वादास्पद असला, तरी त्यावर त्यांनी काही लपवाछपवी न करता लिहिले आहे, हे विशेष. ते मुळातच वाचणे इष्ट.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

बाळासाहेबांनी शिवसेनेत काही काळ मुसाफिरी केली, तसा १९७७च्या काँग्रेस पराभवानंतर इंदिरानिष्ठ अशा काही सहकाऱ्यांसह ‘महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस पक्ष’ (मसकाँ) राज्यापुरता काढला. शंकरराव चव्हाणही त्यात होते. शरद पवारांनी बंडखोरी करून वसंतदादांना बाजूला सारून भाजपसह आपले ‘पुरोगामी लोक दला’चे (पुलोद) मंत्रीमंडळ बनवले. त्यात शंकररावही मसकाँकडून सामील झाले. तिकडे दिल्लीत इंदिराबाईंना हे खटकले. त्यांची नाराजी दूर करून मसकाँचे लॉजिक पटवून देण्याचे काम बाळासाहेबांनाच करावे लागले. पुढे पुन्हा इंदिरा काँग्रेसचे राज्य आल्यावर अंतुले यांच्यानंतर वारंवार मुख्यमंत्री बदलावे लागले. तेव्हाही बाळासाहेबांनी चव्हाणांसाठी रदबदली करण्याचा प्रयत्न केला. इंदिराजी तेव्हा वैतागून म्हणाल्या की, ‘अहो, स्वत:साठी काही मागा की, इतरांचं सोडा...’ (हे त्यांनी स्वत:च नोंदवले आहे). त्यांनी त्याही वेळी स्वतःसाठी काही मागितले नाही, हे उघड आहे.

शंकरराव दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले, ते इंदिराजी गेल्यानंतर, मार्च १९८६ मध्ये. बाळासाहेबांना जे मुंबई-दिल्लीचे पत्रकार व राजकारणातील लोक जवळून ओळखतात. त्यांचे म्हणणे असे की, बाळासाहेबांनी राजकारणातील आपल्या मित्रांसाठी शब्द टाकून त्यांना खूप काही मिळवून दिले; त्यांच्या मित्रांनी मात्र बाळासाहेबांसाठी कधी शब्द टाकला नाही. त्याबद्दल या पुस्तकात तरी बाळासाहेबांनी कुठे खंत व्यक्त केली नाही. आपल्याला अमुक-तमुक पद पाहिजे होते वगैरे काहीच लिहिले नाही. फक्त वर दिलेले इंदिराबाईंचे वाक्य. सूक्ष्म खंत व्यक्त करण्याचा एक प्रकार?

बाळासाहेबांना स्वत:ची काहीच महत्त्वाकांक्षा नव्हती की काय? त्यांचे नेतृत्व स्वयंभू होते हे खरे. ते अशा अर्थाने की त्यांना राजकीय शक्ती सामान्य लोकांमधून मिळत होती. त्यांच्या महत्त्वाकांक्षा या पुस्तकात व्यक्त होतात; त्या सर्वसामान्य लोकांसाठी काय करायचे त्यासंबंधीच्या, शेतकरी, ग्रामीण तरुण वर्ग, स्त्रिया वगैरे दुर्बल समूहांबद्दलच्या. त्यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नेहमी असायचे, हे वर आले आहे. त्यांना खरेच मुख्यमंत्री व्हायचे होते की काय, याबद्दल त्यांनी एक चकार शब्द या पुस्तकात लिहिला नाही. पद मिळवण्यासाठी जी व्यूहरचना करावी लागते, आपली प्यादी ठिकठिकाणी पेरून ठेवावी लागतात, योग्य त्या बिंदूवर वजने टाकत पुढे सरकावे लागते, तसे त्यांनी केल्याचे दिसत नाही. आपण जे रचनात्मक काम करतो आहोत, त्यात ते समाधानी आहेत असे दिसते.

केंद्रात मंत्रीपदाची संधी मिळाली; तीही वाजपेयींचे युती सरकार होते, तेव्हा शिवसेनेतर्फे, काँग्रेसतर्फे नव्हे. मात्र काँग्रेसने त्यांची कार्यक्षमता व त्यांचा अभ्यास लक्षात घेऊन अनेक संसदीय समित्यांवर त्यांना नेमले. सोनिया गांधींनीदेखील झाले गेले विसरून, नंतर त्यांना २००५ साली संसदेच्या संरक्षणविषयक स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून नेमले.

लिहिण्याच्या ओघात लेखकाने त्याच्या संपर्कात आलेल्या अनेक राजकीय नेत्यांची व्यक्तिचित्रे व वैशिष्ट्ये थोडक्यात उभी केली आहेत. त्यातही बाळासाहेब ज्या प्रकारे गुण-विश्लेषण करतात, त्यात त्यांचा वेगळेपणा लक्षात येतो. वसंतराव नाईक ११ वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. परंतु सर्वसामान्य वाचकांना त्यांच्याबद्दल फारशी ओढ किंवा माहिती असते, असे वाटत नाही. बाळासाहेबांनी त्यांची कृतिशीलता, कल्पकता व कामावरील निष्ठा यांचे फार मार्मिक वर्णन केले आहे. इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, सोमनाथ चॅटर्जी, यशवंतराव चव्हाण, अटलबिहारी वाजपेयी, धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, बाळासाहेब ठाकरे, भाजपचे गुरुमूर्ती, प्रमोद महाजन व कित्येक उच्चाधिकारी यांची स्वभाववैशिष्ट्येही त्यांच्या नजरेतून सुटत नाहीत.

त्यांचा अहमदनगर जिल्हा म्हणजे पुढाऱ्यांचे आगर. मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून हाक मारली, तरी प्रत्येक तालुक्यातील पाच-सात पुढारी धावून येतील. याही राजकारणाबद्दल शेती, सहकार, प्रवरा कारखाना, पाटबंधारे, शिक्षणसंस्था वगैरेच्या संदर्भात लेखकाने लिहिले आहे. तसेच लहान-मोठ्या कार्यकर्त्यांचीही मोठ्या प्रेमाने दखल घेतली आहे. आणि अर्थातच त्यांचे वडील विठ्ठलराव विखे पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप बाळासाहेबांच्या संपूर्ण जीवनावर आहे, तेही जाणवते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

लेखकाची मानसिकता समाजाशी एवढी एकरूप आहे की, आपल्या जन्माचे, कुटुंबाचे वर्णन करताना ते त्या काळात गृहिणींच्या १२-१५ प्रसूती होणे कसे सहज होते, दारिद्र्यामुळे व आरोग्य व्यवस्था उपलब्ध नसल्याने त्यातील आठ-दहा अर्भके कशी मृत्युमुखी पडत व लोकसंख्येचा तोल कसा सांभाळला जात असे, अशा सोप्या समाजशास्त्रीय विवेचनात शिरतात. ठायी ठायी तरुण वाचकाचे कुतूहल शमवतील अशी विश्लेषणे त्यांच्या लिखाणात येतात.

बाळासाहेबांचे आणखी एक वैशिष्ट्य या पुस्तकातून दिसते. त्यांनी धार्मिक कर्मकांड, देवदर्शन-पूजा, मुहूर्त-पंचांग, बाबा-बुवा, गंडे-दोरे अशासारख्या गोष्टींचे थोतांड कधी माजवले नाही. लोकांबरोबर रहायचे, समाजाच्या सात्त्विक भावना अगदीच झिडकाराच्या नाहीत, म्हणून कार्यकर्त्यांबरोबर विशिष्ट प्रसंगी देवळात जाऊन नारळ फोडणे वगैरे बाबी करत. स्वतः अगदी ‘नास्तिक’च म्हणजे पूर्ण ‘निरीश्वरवादी’, असे म्हणता येणार नाही, वाटल्यास ‘अज्ञेयवादी’ म्हणावे. निवेदनात त्यांनी या बाबीची खोलात जाऊन चर्चा केली नाही. पण वाचक म्हणून हा निष्कर्ष काढायचा. डाव्या विचारांशी जवळीक असल्यानेही कदाचित हे असेल. पण लोकप्रिय राजकीय पुढाऱ्यांपेक्षा हा एक वेगळाच पैलू, असे म्हणता येईल. बाळासाहेबांचा विश्वास लोकांवर व त्यांच्यासाठी काम करत राहण्यावर.

लोणीसारखे दुर्गम खेडेगाव, मागासलेले, दरिद्री... तेथे विठ्ठलरावांनी गाडगीळ व मेहता यांच्या आधारे लहान शेतकऱ्यांचा पहिला सहकारी कारखाना उभारला. सहकारी मालकीचे तत्त्व शिकवले. कारखान्याचा फायदा केवळ सभासद शेतकऱ्यासाठी सीमित न ठेवता परिसरातील साऱ्याच लोकांना, विशेषतः भूमिहीन गोरगरिबांना मिळायला पाहिजे, सहकारी प्रकल्प ही एक सामाजिक जबाबदारी आहे, हे तत्त्व ठोकून ठोकून, स्वार्थपरायण विरोधी लोकांची पर्वा न करता लोकांच्या गळी उतरवले. त्यानंतर इतरत्र निघालेल्या बऱ्याच सहकारी साखरकारखान्यांनीही हा वसा स्वीकारला. वडलांच्या मागे काटेकोरपणे ही तत्त्व सांभाळत बाळासाहेबांनी सहकाराच्या सामाजिक जबाबदारीचे वचन हिरिरीने पाळले. सर्व तऱ्हेच्या आधुनिक शिक्षणाच्या सुविधा या खेड्यात आणल्या.

१९५०मधील लोणी आणि ६६ वर्षांनंतरचे आजचे सर्व आधुनिक सुविधांनी भरभराटलेले लोणी-प्रवरानगर, शेतकऱ्यांच्या मुला-मुलींनी शिक्षण, नोकऱ्या, व्यवसाय वगैरे क्षेत्रात मारलेल्या भराऱ्या, सुधारलेली सांपत्तिक स्थिती व ग्रामीण तरुणांचा वाढता आत्मविश्वास व उंचावणाऱ्या आकांक्षा... हे चित्र बाळासाहेब नजरेसमोर आणतात व समाधान पावतात. ज्या सहकारामुळे हे साध्य झाले, तो सहकार व त्याच्या सामाजिक जबाबदारीचे तत्त्व हे टिकले पाहिजे; तरच भारतातील शेतकऱ्याला भवितव्य आहे, असे ते ठामपणे मांडतात. मोठ्या राजकीय पटावर त्यांची जी प्रदीर्घ कारकीर्द झाली, त्यापेक्षा हे सहकारातून सर्वांगीण विकासाचे भागधेय त्यांना अधिक मोलाचे वाटते, असे त्यांच्या लिखाणातून दिसते. या आत्मचरित्रात राजकारणापेक्षा अधिक पाने याच विषयाला वाहिली आहेत, दिसेल.

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर बाळासाहेब आपले जगणे हे समाज, कृषि संस्कृती, सामाजिक व राजकीय अधिकारांची उतरंड, बदलत्या अर्थव्यवस्थेतील दरिद्री शेतकऱ्यांच्या रोजच्या जीवनातील घालमेल यांच्याशी जोडूनच सांगतात. महाराष्ट्रातील कृषिसंस्कृतीची खास वैशिष्ट्ये, पाण्याचा प्रश्न, ग्रामीण कारागिरांची विविध विषयांतील विशेष कौशल्ये व पारंपरिक ज्ञान, खेड्यातील घरे बांधण्याच्या पद्धती व वास्तुशास्त्र आणि अर्थातच शेतीचे शास्त्र व जमिनीचे प्रेम हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय वारंवार त्यांच्या निवेदनात सहज व मनोरंजक पद्धतीने येतात. त्याला पार्श्वभूमी आहे महाराष्ट्राच्या व देशाच्या विकासाच्या राजकारणाची, तसेच जागतिक अर्थकारणाची.

‘देह वेचावा कारणी’ - बाळासाहेब विखे पाटील

राजहंस प्रकाशन, पुणे | पाने – ७५४ | मूल्य – ५०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......