अजूनकाही
कॅमेऱ्यावर विश्वास आहे म्हणता? तो जे दाखवेल ते मानले पाहिजे, असे मत आहे ना तुमचे? मग एक सांगा, आजकाल टीव्हीतल्या बातमीदारांचे कॅमेरेसुद्धा मनुष्यबळ कपात करू लागली आहेत का? त्याबद्दल बोला. नाही कळले? मला असे म्हणायचे आहे की, एखादे चार-पाच जणांचे टोळके अथवा डझनभरांची एखादी टोळी आणि अगदीच भुक्कड वाटू नये म्हणून पाच-पंचवीस जणांचा जमाव चक्क ‘न्यूजमेकर’ होताना दिसत आहे. समजले का? म्हणजे असे बघा की, एखाद्या रस्त्याचे अधिकृत उदघाटन ठरले आहे, पण एकाएकी चार-पाच जण त्या रस्त्यावर जमून पाटीबिटी लावून स्वत:च त्याचे उदघाटन करतात; किंवा सात-आठ जण कोणत्या तरी जलाशयात कमरेपर्यंत उभे आहेत अन घोषणा देत काही सांगत आहेत; किंवा मग डझनभर मंडळी वारकऱ्यांच्या वेशात उभी असून ती कोणाला तरी माफी मागायला लावत आहे; अथवा इकडे बघा : चार-सहा जण रस्त्यावर टायर्स आणून त्यांची होळी करत असून कशाचा तरी निषेध करत आहेत…
आणि त्या तिथे पाहा, त्या घोळक्याने कोणाचा तरी कापडी पुतळा जाळायला सुरुवात केली आहे आणि त्या आधी त्या पुतळ्याला पायताणांनी फटकेही देऊन झाले आहेत. घोषणा, द्वेष, घृणा, हिंसक चेहरे असे सारे भाव कॅमेऱ्यांनी टिपले आहेत…
कॅमेऱ्यापुढे विरळ होत चाललेल्या या उपस्थितीची जाणीव झाली आहे का तुम्हाला? पूर्वी अवघे कॅमेरे प्रचंड गर्दी टिपता टिपता घामेघूम होत होते, असे नाही म्हणायचे मला. सतत माणसांचा समुद्र त्या भिंगांमधून आपल्या घरापर्यंत यायचा अन् आपण लोकशाहीच्या त्या प्रपातात चिंब भिजायचो, असेही कधी काही घडत नसे आधी. म्हणजे बिनचेहऱ्यांची गर्दी, अनामिकांचा समुदाय, निनाव्यांचा समूह किंवा अज्ञातांचा लोंढा अन लोकांचा लोट, असे काही टीव्हीचे अॅडिक्शन होते, अशातला भाग नाही.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
निर्भयाला न्याय मिळावा म्हणून खवळून पब्लिक झालेली ती तरुणाई, भ्रष्टाचारावर चिडलेली तिरंगे फडकवत निघालेली ती जनता आणि आपल्या भक्तीभावासाठी यात्रेत पालटून गेलेले ते भाविक, यांच्यासाठी हा बातम्यांचा टीव्ही आसुसलेला असे, हेही फार थोड्यावेळी घडले.
एवढी आडमाप लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशात तो कॅमेराच कशाला, आपण सारेच वैतागलो आहोत- रोजच्या रेटारेटीला अन प्रत्येक अंगचटीला. इतक्या अफाट संख्येचे कौतुक कोणाला?
ते असो. गेल्या चार-सहा महिन्यांत असे वाटू लागले आहे की, पथनाट्यांच्या बातम्या होत आहेत. अगदीच सराईतासारखे काही सेकंदांचे नाट्याविष्कार घडत आहेत. आता हे खरे आहे की, टीव्ही हे मोठे नाटकी अन नाट्यवेडे माध्यम. त्याला सारखा ‘ड्रामा’ हवा घडायला. सिनेमासारखा त्याला ना मौनाचा अवधी, ना चिंतनाची सवड! कैक निमिटांचा दिलीपकुमारचा नि:शब्द वावर असो की, हिचकॉकचा गाढ शांततेत पाठलाग करणारा कॅमेरा. सिनेमाला मुक्याची भाषा व भाषेचे मौन खूप सरावलेले. नव्हे, ती खरी चित्रभाषा. वर्गात सांगितलेले की, जितका लहान पडदा तितका त्याचा आवाज मोठा. मोबाईल फोन नाही का कर्कश्श असतात… बाळांचे रडणे ते भोकाड पसरणे! मोठ्यांचे रडणे म्हणजे मुसमुसणे, स्फुंदणे. भोक आणि भोकाड यांतला फरक ध्वनीच्या पल्ल्यातला…
तर हातवारे, आरडाओरडा, हालचाली अन आंगिक आविष्कार टीव्हीची भूक असते. त्याला ती कितीही फीड केलीत, तरी त्याचे पोट भरणार नाही. म्हणून टीव्ही मनुष्यप्रिय माध्यम म्हटले जाते. इहलोकातला तो साऱ्या मानवी घडामोडींचा एक अनिवार चाहता आहे. त्याचे माणसाविना काही चालत नाही. सध्या तर मुळीच नाही. तेच तर या निमित्ताने सांगायचे आहे.
एक इशारा : लोकशाहतले हक्क, अधिकार आणि अन्य तरतुदी यांच्या विरोधातली ही एक मोहीम आहे अथवा घरबश्या सुखासीनांचा हा एक कांगावा आहे, असे समजू नये. कॅमेऱ्यापुढे जे घडते आहे, ते कॅमेऱ्याच्या मागे कसे घडवले जात आहे, याबाबत करावयाचा हा विचारविनिमय आहे, असे समजावे.
वर ज्या घटनांचा उल्लेख केला आहे, त्या साऱ्या उत्स्फूर्त व लोकहितासाठी घडल्या आहेत का, याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. तो शास्त्रोक्त, सर्वेक्षणाधिष्ठित आणि तटस्थ नाही. दुर्लक्ष, कानाडोळा त्याकडे करणेच अशक्य.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
झाले आहे असे की, टीव्हीचा मुख्य स्पर्धक मोबाईल फोन घटना-घडामोडींच्या बाजारात आस्ते आस्ते डोईजड होऊ लागला आहे. या फोनमधले कॅमेरे, रेकॉर्डर टीव्हीहून खूप जास्तच आतुरलेले होत आहेत. कशात म्हणता? अहो, माणसांच्या वागण्या-बोलण्यात. कोणाचेही बेसावध क्षण हे कॅमेरे पकडून ठेवतात. खाजगी मते, संभाषणे साठवून ठेवतात. लपूनछपून चित्रीकरण करणे आणि पूर्णपणे बेतीव चित्रण करणे, यांतही त्यांचा हातखंडा झालेला आहे. इंटरनेटची जोडणी असल्यावर अशा प्रकारची दृश्ये जगात कोठेही व कोणालाही धाडून द्यायची त्याची क्षमता टीव्हीच्या दृकश्राव्य जगाला आखूड करत निघाली आहे. त्यामुळे टीव्हीच्या पोटावर पाय आला. त्यातून उगवले ते काय आहे, ते पहा-
आंदोलने आजकाल आखीव-रेखीव होत आहेत. शिंप्याकडे काही शिवायला देताना जशी मापे घेतली जातात आणि घेतल्याप्रमाणे कपडे शिवले जातात, तशी आंदोलने सध्या होतात. म्हणून कॅमेऱ्यापुढ्यात मोजकी डोकी दिसत आहेत. हे का घडतेय, ते कसे घडतेय, याची विचारपूस दोन मातब्बर टीव्ही पत्रकारांकडून करून घेतल्यावर समजले.
ते असे : लोक जमवायला आता फार यातायात करावी लागते. अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न असला तरच लोक एकत्र येतात आणि एखादी राजकीय कृती करायला तयार होतात. महागाई, भ्रष्टाचार, बेघरपणा, दारिद्रय, उपासमारी, कुपोषण, रोगराई, सरकारी दिरंगाई, भ्रष्टाचार, वशिलेबाजी, जातीयता, विषमता अशा मुद्दयांवर लोक जमा होण्याचा काळ मागे पडला. त्यांची जागा भावनिक प्रश्न घेऊ लागले आहेत. मुद्दाम उच्चारलेले अपशब्द असोत की अनवधानाने तोंडात आलेले आणि चुकून झालेला शरीरस्पर्श असो की लैंगिक छळ, अचानक भडका उडावा तसा लोळ उठतो. तो काही दिवस पेटवापेटवी करत सुटतो.
कधी कधी मात्र लोळ, जाळ, धग निर्माण करावी लागते. त्यात राजकीय पक्ष, कार्यकर्ते आणि टीव्हीचे कॅमेरे यांचे संगनमत असते. कसे? आरंभी ज्या घटना वर्णिल्या आहेत, त्या साऱ्या बनावट, बेतीव आहेत. त्या कार्यकर्त्यांची गरज म्हणून किंवा वाहिनीची म्हणून घडवून आणलेल्या आहेत. काही कार्यकर्ते पक्षात आणि समाजात आपली प्रतिमा उजळवण्यासाठी पत्रकारांना वापरतात. पक्षालाही हे चालते. कारण फायदा दोन्हीचा असतो. कुप्रसिद्धी असो की सुप्रसिद्धी, सध्याचा काळ दोहोंच्या तेजीचा आहे. लोकांनी बघितले ना, मग पुरे असा निर्लज्जपणा खूप बोकाळला आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
पत्रकारांनादेखील ‘आपण सर्वांत आधी’ त्या घटनेचे प्रक्षेपण केले, तसेच ‘आपण होतो म्हणून’ आपल्याला ती टिपता आली, याची टिमकीही वाजवता येतो. त्यामुळे अशा घटना दुहेरी, दुपदरी लाभ देतात. पत्रकारांना मुख्यालयातून आदेश जातो की, अमूक एक विषय तापवायचा आहे. मग तो अथवा ती पत्रकार, त्या विषयानुरूप राजकीय गट, कार्यकर्ते, संघटना शोधतात. ‘तुम्हाला टीव्हीवर झळकवतो’, या आमिषावर काही जण सज्ज होतात. झेंडे, फलक, घोषणा, स्थळ, वेळ सारे व्यवस्थित ठरल्यावर अॅक्शन सुरू होते. टीव्ही ती टिपतो. आपण ती पाहतो.
लागलीच महाराष्ट्रात खळबळ, तीव्र प्रतिक्रिया, जनतेत असंतोष, सरकारवर रोष, पक्षावर नाराजी, अमूक अडचणीत, तमुकांच्या राजीनाम्याची मागणी, अशी सरबत्ती होऊ लागतो. ठिकाण अर्थातच टीव्ही आणि तोंडे निवेदकांची! खरोखर फार मोठा समुदाय तसे म्हणतो आहे का? जनता अन् लोक अशा असीम संख्येचा आधार घेऊन भावना व्यक्त होत आहेत का? कोणी याचा विचार करत नाही. दिसले आहे ना, दाखवले आहे ना, म्हणजे ते मान्य केलेच पाहिजे, हा हेकेखोरपणा दोन्ही बाजू करत राहतात.
राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्राच्या माध्यमांनी जेवढी टिपली, तेवढी अन्य राज्यांच्या नाही, असे बजावून त्या पत्रकारांपैकी एक सांगू लागला की, दुसरी बाजूसुद्धा तितकीच खरी आहे. म्हणजे राहुल यांचा मराठी मुलखात प्रवेश होताच टीव्हीवाल्यांनी अफझलखानाची कबर, सुप्रिया सुळे यांच्यावरील टिपणी, जितेंद्र आव्हाड यांच्यावरील आरोप, महापुरुषांविषयी अनादरसूचक विधाने, अशा काही विषयांची इतकी चलती करवली की, लोकांचे लक्ष भरकटलेच. दुसऱ्या मातब्बराने एका वाहिनीचे नाव घेऊन सांगितले की, ती आताशा इव्हेंट ‘मॅनेज’ करण्यात पटाईत झालेली आहे. उठवळ व वावदूक विषय हाताळण्यात तीच आघाडीवर आहे. तिच्या एका बातमीदाराला पोलीस मुख्यालयाने बोलावून दमच दिला की, अशी पेटवापेटवी करशील तर बघच!
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
या मूठभर तथाकथित कार्यकर्त्यांमुळे आणि त्या आंदोलनजीवी कॅमेऱ्यांमुळे राजकीय धोरणे, निर्णय, कार्यक्रम यांवर प्रभाव पडत चालला आहे. कुरघोड्या आणि वरचढपणा, या दोनच क्रिया (भाजपच्या राज्यात दुसरे काय म्हणा?) आजच्या राजकारणात ठळक जाणवत राहतात त्या याचमुळे.
माध्यमे जर लोकशाही राज्यव्यवस्थेत एवढा थेट हस्तक्षेप करू धजतील, तर उद्याचे पक्ष, त्यांचे विचार आणि देशाचे नेते यांची जडणघडण आणि लालनपालन तीच करत राहतील. म्हणजे माध्यमांचे मालक, त्यांचे संपादकीय हस्तक आणि व्यापार-उद्योग यांमधले मित्र, यांचेच अप्रत्यक्ष राज्य देशावर चालणार असे झाले.
तुम्ही विचारपूर्वक मतदान करा की करू नका, राज्यकर्ते तुमचे प्रतिनिधी न बनता या माध्यमिक राज्यसंस्थेची खेळणी बनून जातील.
राजकारण कधी या पडद्यावर तर कधी त्या पडद्यावर गेल्यावाचून राहणार नाही.
मग काय बघायचे अन काय दिसणार?
नुसता अंधार…
संघपरिवाराला तोच हवा आहे….!!
..................................................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment