दहशतीच्या छायेत... एका काश्मिरी मुलीची कैफियत!
पडघम - देशकारण
चाहत कुरेशी
  • या लेखातील सर्व छायाचित्रं प्रातिनिधिक आहेत
  • Wed , 22 March 2017
  • पडघम देशकारण काश्मीर Kashmir कर्फ्यु Curfew लष्कर Indian Army दहशतवादी Militant

काश्मीरमध्ये असताना मी कधी नीट झोपलेच नाही. असं वाटायचं, घरी कोणीतरी येईल आणि गोळ्या घालून आम्हाला ठार करेल. मी शाळेत शिकत असताना माझ्या वडिलांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून मारलं. ते टास्क फोर्समध्ये होते. दोन काका आर्मीमध्ये होते. एके दिवशी माझ्या डोळ्यांसमोर हल्ल्यामध्ये मी बाबांचा जीव जाताना पाहिलं. तेव्हा मी १४ वर्षांची होते. तेव्हापासून मी कधी नीट झोपलेच नाही. लहानपणापासून मनात भीतीच बसली. सतत असं वाटायचं, ‘मला, माझ्या आईला, बहिणींना असंच कोणीतरी येऊन गोळ्या घालून ठार करेल.’ आपला जीव कधीही जाऊ शकतो, या दडपणाखाली मी जगत होते. काश्मीरला ‘जन्नत’ म्हणतात, पण या जन्नतमध्ये तुमच्या जीवाची किंमत काहीच नाही.

सतत होणारी घुसखोरी, फुटिरतावादी लोक, कर्फ्यु, गोळीबार, लष्कराचा वावर, या वातावरणामुळे मी सतत काश्मीरमधून बाहेर कसं पडता येईल याचा विचार करायची. कसं जावं? तिथं कसं वातावरण असेल, असाही विचार मनात यायचा, पण काश्मीरच्या भीतीयुक्त वातावरणातून मला बाहेर पडायचं होतं. याच काळात योगायोगानं बॉर्डरलेस फाउंडेशनची माहिती मिळाली. त्यांच्या मदतीने पुण्यात दाखल झाले. माझ्या पंखांना बळ मिळालं. सध्या मी पुण्यात एका आयटी कंपनीत नोकरी करत आहे.

पुण्यात येण्याचा निर्णय घेणं माझ्यासाठी सोपा झाला, याचा कारण माझी आई. ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. तिने माझ्यावर पूर्ण विश्वास दाखवला. आपली स्वप्नं पूर्ण करायची असतील तर येणाऱ्या संकटांना सामोरं जाण्याची क्षमता स्वत:मध्ये निर्माण करायची असते, हे मी आईकडून शिकले. वडील गेल्यानंतर आम्हा भावडांना तिनेच वाढवलं. आमची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती, पण आई खंबीरपणे जगली. तिने आम्हालाही तसंच वाढवलं. ती खूप मोकळ्या विचारांची आहे. मला दोन बहिणी व एक भाऊ आहे. आम्हा सर्वांना तिनं चांगलं शिक्षण दिलं. काश्मीरमधल्या दहशतीच्या वातावरणात आई मला नेहमी सावरायला मदत करायची, पण माझी भीती काही जात नव्हती. शेवटी मी काश्मीर सोडायचा निर्णय घेतला. त्यातही आई माझ्यासोबत होती.

आता पुण्यात मी वेगळंच आयुष्य अनुभवते. सुरुवातीला ऑफिसमध्ये काश्मिरी मुलगी म्हणून माझ्याकडे वेगळ्या दृष्टीनं बघितलं जायच. त्यात भाषेचीही अडचण होती, पण ऑफिसच्या लोकांनी खूप लवकर मला आपलंसं करून घेतलं. पुण्यात खूप मोकळं वातावरण आहे, विशेषतः मुलींसाठी. काश्मीरमध्ये तसं नाही. तिथं सर्व मुस्लिम समाज आणि सतत दहशतवादी हल्यांची भीती असते. यामुळे संध्याकाळच्या आतच महिला घरी जातात. तिथं कामकाजाच्या वेळाही त्यानुसारच आहेत.

काश्मीरचे लोक खूप हुशार, प्रामाणिक, मेहनती असतात, पण त्यांना कामाच्या संधीच उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्यांचं ज्ञान आणि कौशल्य वाया जाताना दिसतं.. पुण्यात तसं नाही. इथं हजारो-लाखो शिक्षणाच्या, नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या आवडीचं काम करायची मुभा आहे. हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. पुण्यातील लोकांची धावपळ, काम करण्याची क्षमता बघून मी थक्क झाले. पण काश्मिरी लोकांमध्ये असलेली आपुलकीची वागणूक, आदरतिथ्य, आदर करण्याचा गुण पुणेकरांमध्ये मला कधीच जाणवला नाही. पुण्याच्या या धावपळीच्या जगात कुठंतरी प्रेम, जिव्हाळा हरवला आहे. लोक व्यवहारी आहेत, असं जाणवलं.

पुण्यात मला व्यसनाधिनतेचंही प्रमाण खूप असल्याचं जाणवतं. जागोजागी पान शॉप, बिअर बार, स्मोकिंग करणारे मुलं-मुली बघून वाईट वाटतं. काश्मीरमध्ये व्यसनाधिनतेचं प्रमाण खूपच कमी आहे.

पुण्यातल्या लोकांचे काश्मीरबद्दल वेगळेच समज असतात. काश्मीरमध्ये मुस्लीम समाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तिथं बुरखा पद्धत असेल, स्त्रियांना स्वातंत्र्य नसेल, शैक्षणिक मागसलेपण असेल...वगैरे वगैरे. पण असं अजिबात नाही. आमच्या इथं स्त्री-पुरुष समानता आहे. लहानपणापासूनच इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिलं जातं. तोंडी तलाक, बुरखा, बहुपत्नीत्व यांचं प्रमाण अत्यंत कमी आहे. घरगुती हिंसेचं प्रमाणही खूप कमी आहे. अंधश्रद्धा पाळल्या जात नाहीत. लग्न ठरल्यावर मुलीकडून कोणताही स्वरूपात हुंडा घेतला जात नाही. हुंडा घेणं कमीपणाचं समजलं जातं. दोन्हीकडचे लोक लग्नात एकत्रित खर्च करतात. काश्मिरी लोक विचारांनी खूप आधुनिक आहेत. सध्या तरी राहतगर, बॉर्डरलेस फाउंडेशन यासारख्या सामाजिक संस्थांच्या मदतीनं मुला-मुलींना परराज्यात शिक्षणासाठी पाठवतात. पण पुणेही मला तितकंच भावलं आहे. मला सर्व ठिकाणी चांगले लोक भेटत गेले. काश्मीरमधून आली आहे या उत्सुकतेपोटी मला आदर, प्रेम मिळालं. ऑफिसमध्ये दिलेल्या वडा-पाव,चहाच्या पार्ट्यांमुळे मलाही वडा-पाव खूप आवडायला लागला आहे. दीड वर्षांत मी मराठीही शिकले आहे. आता मी व्यवस्थित मराठी बोलू शकते. मीही आता हळूहळू पुणेकर बनली आहे.

पुण्यात मी भीतीमुक्त वातावरणात जगत असले तरी काश्मीरची स्थिती बघून खूप अस्वस्थ होते. माझ्यासारख्या खूप मुली अजूनही त्याच दहशतीच्या वातावरणात जगत आहेत. सतत गोळीबार, लष्कराचा वावर याचा समाजावर खोलवर गंभीर परिणाम होतो. माझा लहान भाऊ बारावीला होता, पण बुरहान वाणी प्रकरणामुळे वर्षभर शाळा बंद आहेत. कर्फ्यूमुळे सगळी मुलं घरीच बसून आहेत. रिकामं डोकं शैतानाचं घर असं म्हणतात. मला सतत भीती वाटते, माझ्या भावानेही दगड हातात उचलला तर? किंवा तो काही वेगळ्याच मार्गावर गेला तर? त्यालाही मला पुण्यात आणायचं आहे, पण शाळा बंद असल्यामुळे आवश्यक कागदपत्रांची उपलब्धता होत नाही. पुण्यात प्रवेश घ्यायचा असेल तर चांगले मार्क पडायला हवेत, पण शाळा बंद असल्यामुळे अभ्यासच नाही. असं असलं तरी परीक्षा वेळेतच होतील. काय होईल त्याच्या शिक्षणाचं याची खूप काळजी लागून राहिली आहे. त्याचं हे वर्ष वाया तर जाणार नाही ना? ऑफिसच्या वतीने मला परदेशात जाण्याचीही संधी आली होती, पण काश्मीरच्या स्थितीमुळे पासपोर्ट बनवता आला नाही!

पुण्यात राहत असले तरी माझं सगळं लक्ष काश्मीरच्या स्थितीकडे असतं. त्यात माध्यमांमध्ये दाखवलं जाणारं चित्र आणि तिथले लोक जगत असलेलं जीवन यात खूप फरक आहे. त्यात तेथील राजकारणी लोक अनेक मुलांचा वापर करून घेतात. किती वर्षांपासून काश्मीरमध्ये सामान्य लोकांसाठी आवश्यक सुधारणाच केल्या जात नाहीत. तिथं लोकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे फुटिरतावादी लोक त्यांचा वापर करून घेतात. लष्कराच्या सततच्या वावरानं तिथला प्रश्न अजूनच बिकट होत चालला आहे. आम्ही भारतावरही खूप प्रेम करतो आणि काश्मीरवरही. पण आपल्या या जन्नतची ही अवस्था पाहवत नाही. आम्हाला सर्वसामान्य माणसांसारखं आयुष्य जगायचं आहे. आमचे मूलभूत प्रश्न दुर्लक्षित आहेत आणि वेगळ्याच समस्यांना तोंड द्यावं लागतं. आणि याचे परिणाम फक्त सामान्य लोकांनाच सोसावे लागतात. राजकारणी, श्रीमंत यांच्यावर त्याचा फारसा परिणाम होत नाही. दगड उचलणाऱ्यांमध्ये, बळी जाणाऱ्यांमध्ये त्यांच्यातील कोणीच नसतं. त्यात असतो तो सामान्य मध्यमवर्गीय नागरिक. मला घरच्यांची खूप काळजी वाटते. किती दिवस मला त्यांच्याशी संपर्क करता येत नव्हता. ते जिवंत तर आहेत ना असं वाटायचं.

हे सगळं कधी ठीक होईल? काश्मिरी लोकांना एक सर्वसाधारण, नॉर्मल आयुष्य कधी जगता येईल? हे सर्व प्रश्न मनात सलत राहतात. या विचारानं रात्री मध्येच केव्हा तरी जाग येते. त्यानंतर मी झोपूच शकत नाही...

शब्दांकन - मिनाज लाटकर

minalatkar@gmail.com

Post Comment

????? ???????

Sat , 23 February 2019

खुप छान


????? ???????

Sat , 23 February 2019

खुप छान


Heena khan

Wed , 22 March 2017

मिनाज चांगल मांडल आहेस.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......