मराठी विज्ञानकथांनी गेली शंभर वर्षं आपलं मनोरंजन केलं आहे. सुरुवातीला नुसत्या कल्पनेच्या भराऱ्या मारणाऱ्या कथा हळूहळू काटेकोरपणे विज्ञानाचा विचार करायला लागल्या. डॉ. जयंत नारळीकर, डॉ. बाळ फोंडके, निरंजन घाटे, सुबोध जावडेकर, लक्ष्मण लोंढे, माधुरी शानभाग, शुभदा गोगटे, डॉ. अरुण मांडे या मान्यवरांनी दीर्घकाळ उत्तम कथा-कादंबऱ्यानी हा साहित्यप्रकार मराठीत रुजवला.
गेल्या दहा-पंधरा वर्षांमध्ये थोडा बदल होताना दिसायला लागला आहे. आपल्या वाचकांना इंटरनेटवर जागतिक साहित्य वाचण्याची संधी मिळाली. परदेशी चॅनेल्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर तऱ्हेतऱ्हेच्या मालिका उपलब्ध झाल्या. ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये विज्ञान भरपूर दिसायला लागलं. मार्व्हलवाल्यांनी आपलं एक विश्व उभं केलं. या साऱ्या माध्यमांत काही मजकूर विज्ञानाचा उचित वापर करणारा होता, तर काही बऱ्यापैकी स्वातंत्र्य घेणारा. हॅरी पॉटर आणि अनेक प्रकारच्या सुपरहीरोंवर पोसलेल्या वाचक / प्रेक्षकांना विज्ञान, कल्पनारम्यता, रहस्य, गूढ, अॅक्शन, हे मिश्रण आवडताना बघून अशा मजकुराचं प्रमाण वाढायला लागलं. या बदलाचा परिणाम म्हणून की काय, मराठीतही ‘स्पेक्युलेटिव्ह फिक्शन’ हा साहित्यप्रकार बहरताना दिसतो आहे.
आज जे वास्तवात नाही, किंवा ते कधी असल्याचा पुरावा आपल्याकडे नाही, ते दाखवणाऱ्या ‘स्पेक्युलेटिव्ह फिक्शन’मध्ये खूप मोठी कक्षा येते. एका टोकाला विज्ञान मध्यवर्ती आणि अचूक असणारं ‘सायन्स फिक्शन’ आणि दुसऱ्या टोकाला विज्ञानाशी तिळमात्र संबंध नसलेल्या ‘फॅंटसी’ अशी कक्षा आहे. त्यांच्या दरम्यान खूप काही येतं. विज्ञान फॅंटसी, सायबरपंक, स्टीमपंक, फ्यूचरिस्टिक, डिस्टोपियन, युटोपियन, अपॉकॅलिप्टिक, पोस्ट-अपॉकॅलिप्टिक, ऑल्टरनेट हिस्टरी, सुपरहीरो, क्लायमेट फिक्शन, आणि इतर अनेक प्रकार. काही जणांच्या मते त्यात ‘सुपरनॅचरल’चाही अंतर्भाव होतो. पण या लेखात विज्ञान / तंत्रज्ञानाशी संबंध असेल अशाच ‘स्पेक्युलेटिव्ह’ कथांचा विचार करतो आहोत.
दोन वर्षांपूर्वी मराठीतल्या विज्ञानकथांचा आढावा घेताना लक्षात आलं होतं की, त्यातल्या बऱ्याच विज्ञानकथा म्हणून प्रसिद्ध झाल्या असल्या तरी त्या काटेकोर व्याख्येत बसत नाहीत. त्यात प्रस्थापित विज्ञानाच्या पायावरचं विज्ञानाचं भविष्यकालीन किंवा वेगळ्या दिशेने प्रक्षेपण नव्हतं. किंवा विज्ञान मध्यवर्ती अत्यावश्यक भूमिकेत नव्हतं. ज्येष्ठ विज्ञानकथा लेखक सुबोध जावडेकर म्हणतात की, विज्ञानकथा म्हणजे विज्ञानामुळे भविष्यकाळात निर्माण होऊ घातलेल्या समस्यांना माणसं कशी सामोरी जातात हे सांगणारी कथा. या दृष्टीने पाहिलं तर अनेक कथांमध्ये माणसं एकामागोमाग एक कळसूत्री कृती करताना फक्त दिसत होती, त्यामागे समस्येकडे पाहण्याचा विचार दिसत नव्हता. उलट दुसरीकडे विज्ञानकथा म्हणून उल्लेख न झालेल्या काही कथा विज्ञान किंवा तंत्रज्ञानाचा छान वापर करून घेत होत्या. विज्ञान-तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाल्याने कदाचित हा बदल दिसत असेल. म्हणून ‘स्पेक्युलेटिव्ह’च्या व्यापक दृष्टीनं पाहायचं ठरवलं. तेव्हा या वर्षीच्या दिवाळी अंकांमधल्या मराठी स्पेक्युलेटिव्ह फिक्शनवर एक नजर.
वेगळे विषय
या वर्षीच्या अंकांमध्ये स्पेक्युलेटिव्ह कथांमध्ये वेगळे आणि ताजे विषय हाताळले आहेत. ‘मराठी विज्ञान परिषद पत्रिके’तली शुभम देशमुख यांची ‘संघर्ष’ ही विज्ञानकथा निसर्गाबरोबरचा संघर्ष सविस्तरपणे मांडते. लेखन मानवकेंद्रित, सहज, आणि विषयाचा योग्य विस्तार करणारं आहे. त्यामुळे वाचताना समाधान वाटतं. या अंकात ‘स्वॅब’ ही संजय ढोले यांची विज्ञानकथा आहे. कथेत शीर्षकातल्या स्वॅबचा म्हणजे चाचणीसाठी नमुना घेण्याचा चांगला वापर करत रहस्याची छान उकल केली आहे. लॉकडाऊन काळाचे आणि पुण्याचे संदर्भ आल्याने कथा वास्तववादी वाटते, नैतिक प्रश्नाचा ॲन्गल वाचकाला विचार करायला लावणारा आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
झंपूराव तंबुवाले यांची ‘ऐसी अक्षरे’ या ऑनलाइन अंकातली विज्ञानकथा ‘मुंगी उडाली आकाशी’ एका झकास वातावरणात एक जबरदस्त विषय घेऊन सुरू होते. मात्र पुढे कथा तितकीशी पकड घेऊ शकत नाही. ‘ऐसी अक्षरे’मध्ये ‘क्रॉसओव्हर आणि परत माघारी’ अशा शीर्षकाची प्रभुदेसाई यांची स्पेक्युलेटीव्ह कथा आहे. कथेची भन्नाट सुरुवात पाहता अपेक्षा वाढतात. पण मग कथा विस्कळीत होत जाते. ती अधिक बांधीव झाली असती, तर नक्कीच जास्त परिणामकारक झाली असती.
‘दीपावली’ या अंकातली असीम चाफळकर यांची ‘स्वप्नात माझिया’ ही विज्ञानकथा बरेच वेगवेगळे धागे चांगल्या प्रकारे गुंफते. त्यातली पात्रं उठावदार झाली आहेत. ‘समतोल’ या दिवाळी अंकात ‘शस्त्राघाता शस्त्रचि उत्तर’ ही संजीव कुलकर्णी यांची कथा एक नवा विषय मांडते. लेखन ओघवतं आहे आणि कथा वाचनीय झाली आहे. शेवट मात्र अधुरा वाटतो. विज्ञानकथेने एखादी समस्या मांडावी. तिचं उत्तर कथेत येणं आवश्यक नाही, पण वाचकाला त्या दिशेने विचार करायला प्रवृत्त करावं असं म्हणतात. त्या दृष्टीनं पाहिलं तरी शीर्षकात म्हटल्याप्रमाणे निदान एखादं शस्त्रच उत्तर म्हणून दिसायला किंवा जाणवायला हवं होतं.
याच लेखकाच्या ‘महाराष्ट्र टाईम्स - पुणे विशेष’मधल्या ‘खोल खोल’ या कथेत समकालीन विषय आणि वैज्ञानिक प्रयोग यांची समतोल सांगड आहे. पालकांचं चित्रीकरण थोडं एकांगी वाटू शकतं, तरीही ही कथा एका चांगल्या कथेची अपेक्षा पूर्ण करते. मेघश्री दळवी यांच्या ‘महाअनुभव’मधील तीन भविष्यवेधी कथा दर्या, मुंबई, आणि श्वास या पर्यावरण कथा भविष्याचा पडदा उघडून संपूर्ण चित्र दाखवतात. आपल्या वागण्यावर आताच विचार करायला हवा. अन्यथा हा परिणाम नक्कीच, हे दाखवणाऱ्या कथा.
‘धनंजय’ हा दिवाळी अंक म्हणजे विज्ञानकथांची मेजवानी असते. या अंकातही आगळे-वेगळे विषय दिसतात. डॉ. बाळ फोंडके या ज्येष्ठ लेखकांची ‘दा विन्चीचं कोडं’ ही कथा शीर्षकातूनच लक्ष वेधून घेते. आणि त्या दा विन्चीची उकल देखील मस्त प्रकारे पेश होते. स्मिता पोतनीस यांची ‘धनंजय’मधली कथा ‘एक माळ आणि त्याचे मणी’ ही कथा शीर्षकातल्या आगळेपणाने लक्ष वेधून घेते. तिचा विषयदेखील एका वेगळ्या तंत्रज्ञानाचा आहे. एखाद्या थ्रिलरसारखी वळणं घेणारी ही कथा वाचनीय आहे आणि काही वेगळं भाष्य न करता मानवी स्वभावातल्या गुंतागुंती दाखवून देते.
पृथ्वीवर एक अशनी येऊन आदळणार आहे ही मध्यवर्ती कल्पना असलेली गिरीश पळशीकर यांची ‘धनंजय’मधली विज्ञानकथा ‘सर्वनाशी’. मध्यंतरी येऊन गेलेल्या ‘डोन्ट लुक अप’ या हॉलिवुडपटाची आठवण करून देणारा विषय असला तरी अशा संकटासमोर जगातले नेते कसे वागतात याची चांगली झलक त्यात मिळते. शेवटचा ढोबळ संदेश मात्र रसहानी करतो. कथेतून जे काही निष्कर्ष काढायचे ते वाचकाच्या मनात आपोआप उमटले पाहिजेत.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
या अंकातली आशिष महाबळ यांची खुसखुशीत विज्ञानकथा ‘दुवे आडवे तिडवे’ ही तंत्रज्ञान, विज्ञानाचं प्रक्षेपण, आणि मानवी स्वभाव यांचा सुरेख मिलाफ करते. या लेखकाकडून आता अशा चांगल्या कथांची अपेक्षा आहे. याच अंकातल्या स्वरा मोकाशी यांच्या ‘विषाणू’ या विज्ञानकथेला करोना महासाथीचा संदर्भ आहे. भविष्यातली एक भयावह परिस्थिती दाखवण्यात कथा यशस्वी झाली आहे. या कथेत जसे जागतिक राजकारणाचे पडसाद आहेत, तसेच काहीसे भारतीय पातळीवरचे पडसाद मुकुंद नवरे यांच्या ‘जीनोमी जुमला’ कथेत आहेत. सरकारी मामला त्यात चांगल्या प्रकारे रंगवला आहे.
दीपा मंडलिक यांनी या अंकात ‘झीरो टू नेचर’ या स्पेक्युलेटिव्ह कथेत आभासी जगाच्या मोठ्या विषयाला हात घातला आहे. त्या जगातलं जगणं आणि वास्तव जगाचे नियम यात मात्र गफलत झालेली आहे. त्यामुळे कथा वाचताना नक्की काय म्हणायचं आहे, याचा संदेह वाटत राहतो.
वेगळे प्रयोग
कधी कधी नेहमीच्या विषयांना वेगळे वळण दिल्यानेही कथा रंगतात. द. व्यं. जहागीरदार यांची ‘मराठी विज्ञान परिषद पत्रिके’तली कथा ‘कमिशनर मॅडम’ रोबॉट्सकडे वेगळ्या अंगाने पाहणारी आहे. कथेतलं नाट्य चांगलं खुलवलं आहे, मात्र शीर्षक अधिक समर्पक हवं होतं. याच अंकात अंजलि पुरात यांची ‘कालातीत’ ही कथा कालप्रवास या कालातीत विषयावर आहे, पण तिच्यातला ट्विस्ट छान नाट्यमय झाल्याने ही ट्रीटमेंट रंजक झाली आहे.
गिरीश पळशीकर यांची ‘कत्तल’ ही ‘हसवंती नवलकथा’ या अंकातली विज्ञानकथाही अखेरीस एक ट्विस्ट देते. त्यामुळे एलियन्स हा टिपिकल विषय असूनही कथा वेगळी वाटते. त्यांचीच नवलमधली ‘हस्तक्षेप’ कथादेखील एलियन्सवर आहे. एलियन्सना पृथ्वीवासीयांच्या परस्पर द्वेषाविषयी खेद वाटून ते हस्तक्षेप करायचा प्रयत्न करतात. पण ते घडणारं टाळू शकत नाहीत. हे कथाबीज बरेचदा वापरलं गेलेलं असलं तरी कथा चांगली फुलवलेली आहे.
एलियन्स याच विषयावरची असीम चाफळकर यांची ‘द एलियन्स मस्ट बी क्रेझी!’ अशा रंगतदार शीर्षकाची कथा ‘मैत्र’ दिवाळी अंकात आहे. मजेदार पद्धतीने कथा खुलत जाते. काही तांत्रिक तपशील मात्र पदोपदी ‘ही विज्ञानकथा आहे’, अशी द्वाही देत राहतात. एलियन्स हा विषय या वर्षी जरा जास्त आलेला वाटला. कदाचित लवकरच एलियन्स आपल्याला भेट देणार अशा बातम्यांमुळे हा विषय पुन्हा आघाडीला आलेला असेल. कारण ‘धनंजय’मधली ‘देव’ ही शैलेन्द्र शिर्के यांची कथाही पुन्हा याच ‘ऑल टाइम फेवरीट’ विषयावर आहे. तिथे सुरस लेखन आणि समर्पक भाषा यांचा चांगला संगम आहे. तर ‘नवल’मधील कल्पिता राजोपाध्ये यांची रूम ही एलियन प्राण्याची अॅक्शन-पॅक्ड स्पेक्युलेटीव्ह कथा मनोरंजन करते आणि शेवटी एक मस्त ट्विस्ट देते.
‘सृजनसंवाद’मध्ये मेघश्री दळवी यांची ‘वेलकम बॅक’ ही कथा मानवी मनाचा आढावा दाखवते. अंतराळात काही वर्ष जाऊन आलेलं जोडपं परत घरी येतं, तेव्हा त्यांचं वय आणि मुलींचं सारखंच असतं. तरीही आई-वडील हे आई-वडील असल्याचं विसरू शकतात का, अशी कल्पना ही कथा मांडते.
स्मिता पोतनीस यांची ‘जेरीची जीत’ ही ‘नवल’मधली विज्ञानकथादेखील एका ओळखीच्या विषयाला निराळ्या प्रकारे मांडते. जेरी या परिचित पात्राला एका अनोख्या संकल्पनेच्या पातळीवर नेल्याने कथेला मिळणारा पैलू लक्षणीय आहे. त्यांचीच ‘पप्याशेट’ ही आणखी एक कथा ‘स्वान्तसुखाय’ या दिवाळी अंकात आहे. तिच्यातही परिचित विषय पण वेगळ्या पार्श्वभूमीवर घडणारी कथा चांगली जमली आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
‘धनंजय’मधल्या ‘डिसोप्लेच’ या डॉ सुनील विभुते यांच्या विज्ञानकथेत नेहमीच्या विषयाला एका कॉन्फरन्सच्या पार्श्वभूमीची डूब आहे. तर डॉ. श्रीकांत कुमावत यांच्या ‘पुनरुज्जीवन’ या विज्ञानकथेत एका येऊ घातलेल्या तंत्रज्ञानाचा सफाईदार वापर आहे.
याच अंकात मकरंद जोशी यांची परिचित विषयावरची विज्ञानकथा ‘तळ्यात-मळ्यात’ छान रंगते. ठाण्याचे आणि जुन्या काळचे उल्लेख यांनी कथेला एक उत्तम पैलू मिळालेला आहे. मेघश्री दळवी यांच्या ‘सातवा दिवस’ या कथेचा विषय एआय हा वेगळा वाटला नाही, तरी शेवटी त्याला वेगळेपणा दिलेला आहे.
‘नवल’मधली गजानन परब यांची ‘अॅस्ट्रोनॉटी लव्ह’ ही अवकाशाच्या पार्श्वभूमीवरची प्रेमकथा प्रेम आणि मत्सर या खेळात गुंगवून ठेवते. याच अंकातली उज्ज्वला केळकर यांची ‘अज्ञात ग्रहाचे रहस्य’ ही कथा अंतराळयात्रींना दुसऱ्या आकाशगंगेत पृथ्वीसमान ग्रह सापडल्यावर नेमकं काय घडतं यावर आहे. कथा छोटी पण चांगली जमलेली आहे.
संजय भास्कर जोशी यांची ‘टाईममशीनमधून आलेले संकट’ ही विज्ञानकथा ‘पद्मगंधा’ या दिवाळी अंकात आहे. टाइम मशीनचा वापर करून आपल्या आजच्या वागण्यावर भाष्य करण्याची संधी लेखकाने चांगल्या प्रकारे वापरली आहे. विज्ञानकथा कधी कधी असं लख्ख आरशासारखं काम करून जाते, ही जाणीव करून देणारी कथा.
विज्ञान-तंत्रज्ञान कथा बऱ्याचदा शहरी वातावरणात घडताना दिसतात. तुलनेने ग्रामीण किंवा निमशहरी पार्श्वभूमीवर घडणाऱ्या विज्ञानकथा कमीच आढळतात. त्यामुळे जीएम पिकांवर आधारित ‘नॉट विदाऊट अ फाईट’ ही संजीव कुलकर्णी यांची ‘लोकप्रभा’मधली कथा त्यातल्या पार्श्वभूमीने उठून दिसते. कथेत अपेक्षित संघर्ष तिथे चांगला आला असला तरी तो चर्चात्मक पातळीवरच थांबतो. त्याला घटना आणि पात्रांच्या आयुष्यातल्या चढउतारांची जोड मिळायला हवी होती असं वाटलं. विज्ञानाच्या बाबतीतही आवश्यक ते प्रक्षेपण आलं असतं तर ही कथा अधिक प्रभावी झाली असती.
विज्ञान साहित्य विशेषांक
‘ज्ञानभाषा’ हा दिवाळी अंक ‘विज्ञान साहित्य विशेषांक’ आहे. त्यात १२ विज्ञानकथा आहेत. ‘डेथ होल्स’ ही त्यातली पहिली कथा अत्यंत वेगळी कल्पना घेऊन अवतरली आहे. अमेय जाधव यांनी लिहिलेल्या या डिस्टोपियन स्वरूपाच्या कथेत माणसाची अगतिकता ठळकपणे जाणवते. आकर्षक शीर्षक आणि वास्तववादी शेवट असला, तरी मध्ये काही ठिकाणी ‘माहिती’ जास्त झाली आहे. विज्ञानकथांमध्ये हा दोष अनेक वेळा दिसतो. विज्ञानकथा ही माहिती देण्यासाठी असते, हा गैरसमज आता निदान माहिती युगात तरी टाळायला हवा. आवश्यक तेवढीच माहिती कथेच्या ओघात ठेवून कथेचा लेख होणार नाही, अशी दक्षता घ्यायला हवी.
याच अंकात इतर कथाही वेगळे विषय हाताळतात. ‘शुक्राणू’ ही प्रगती वाघमारे यांची कथा विज्ञानाच्या प्रगतीसोबत येणारे नैतिक प्रश्न चांगले उभे करते. त्यावर चर्चेला व्यवस्थित सुरुवात होते, पण अचानक कथा संपूनच जाते. सुरूची नाईक यांची ‘संपर्काचे कारण की’ ही कथादेखील एक चांगली कल्पना मांडते आणि लगेच ढोबळ संदेश देऊन संपते. सुनील विभूते यांची ‘कार्डिओ 77’ ही कथा माहितीच्या जालात गुरफटलेली आहे आणि बाकी काहीच घडताना दाखवत नाही. तर श्रीपाद टेंबे यांची ‘एक स्वप्न असेही’ ही कथा कन्सेप्ट पातळीवरच थांबली आहे.
शरद पुराणिक यांची ‘दगाबाज?’ ही कथा वाचनीय आहे, परंतु त्यातले शास्त्रज्ञ पुरेसा अभ्यास न करता महत्त्वाचे निर्णय घेतात याचं आश्चर्य वाटलं. वास्तवाशी इतकी फारकत घेऊन कसं चालेल? ही कथाही घाईत संपते. नीलिमा पगारे यांची ‘पृथ्वी ते मंगळ व्हाया’ ही कथा बरंच स्वातंत्र्य घेते, पण त्याचा उपयोग करून रंजक अनुभव मात्र देऊ शकत नाही. ‘परिचय’ ही क्षमा शेलार यांची आणि ‘मी मज व्याले’ ही सुनीता बागवडे यांची, दोन्ही कथा अतिशय प्राथमिक पातळीवर आहेत. कदाचित हा त्यांच्या लेखनाचा सुरुवातीचा काळ असेल.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
मंगल कातकर यांची ‘कंपॅनियन’ ही कथा रोबॉटच्या भावनेविषयी आहे, तर ‘बोन्साय’ ही निशा वर्तक यांची कथा जेनेटिक्सवर आहे. प्रकाश क्षीरसागर यांची ‘मोहीम अंतार्किक’ ही या अंकातली कथा म्हणजे नुसता कल्पनाविलास आहे. अंटार्क्टिका, तिथल्या मोहीमा, आइसबर्ग यांची संपूर्ण माहिती ऑनलाइन उपलब्ध असताना वाचक ही कथा कशी स्वीकारतील, याचा तरी विचार व्हायला हवा होता!
या अंकात डॉ फुला बागुल यांनी डॉ. जयंत नारळीकर यांच्या कादंबऱ्यांचं समीक्षण करताना त्यातल्या शक्तीस्थळांचा आणि त्रुटींचा चांगला आढावा घेतला आहे. याच अंकात अभिषेक खुळे यांनी विज्ञानाधारित मराठी चित्रपटांविषयीच्या अपेक्षा मांडल्या आहेत. येत्या काळात त्या सफल होण्याची आशा बाळगता येईल का? विज्ञान साहित्याविषयी या अंकातले इतर लेखही अभ्यासपूर्ण आहेत.
कुमारवयीन वाचकांसाठी
गेली काही वर्षं कुमारवयीन वाचकांसाठी असलेल्या मराठी अंकांची संख्या वाढली आहे. त्यात व्हिज्युअल्सचा चांगला वापर असतो आणि लेखनही मुलांना अपील होईल, असं सहजसुंदर आणि गंमतीदार असतं. यावर्षी विज्ञानकथा म्हणावी अशा कथा कमी होत्या. तुलनेत स्पेक्युलेटिव्ह म्हणजे आज अस्तित्वात नसलेल्या कल्पना वा पार्श्वभूमी मांडलेल्या कथा मात्र चांगल्या संख्येत होत्या.
‘पासवर्ड’मधली मृणालिनी वनारसे यांची ‘परीक्षा २०३२’ कथा भविष्यातल्या परीक्षेचं एक खूप छान आश्वासक रूप दाखवते. त्याच वेळी या कथेत सॉफ्ट स्किल्सवर चांगलं भाष्य आलं आहे. ही कथा भविष्यातली आहे, तर ज्येष्ठ लेखक निरंजन घाटे यांची याच अंकातली ‘देवाचा जन्म’ ही स्पेक्युलेटीव्ह कथा आपल्याला पार मागच्या काळात घेऊन जाते. आदिमानवाच्या काळचं जिवंत चित्र समोर उभं करते. देव या संकल्पनेवर मुलांसाठी लिहिणं सोपं नाही, पण या कथेने अत्यंत आगळ्या प्रकारे हा कल्पित इतिहास रेखाटला आहे. मुलांसाठी आणि स्पेक्युलेटीव्ह कथांना साजेशी रेखाटनं नक्कीच आव्हानात्मक असतील. दीपक संकपाळ यांनी या कथेसाठी हे आव्हान समर्थपणे पेललेलं आहे.
‘कुल्फी’ या दिवाळी अंकाचं हे पहिलंच वर्ष. त्यातली ‘द्वार साम्राज्य’ ही फॅंटसी कथा लेखक प्रांजल कोरान्ने यांनी मस्त रंजकपणे पेश केली आहे. आता तिच्या पुढच्या भागाची उत्सुकता आहे. त्यात टेक्नॉलॉजी असल्याने कदाचित तिला टेक्नोफॅंटसी म्हणावं लागेल. अशा तंत्रज्ञानावर फॅंटसीचा साज चढवलेल्या कथा आजच्या मुलांना भारी आवडतील.
मेघश्री दळवी यांची ‘पासवर्ड’ या अंकातली ‘आजीच्या घरी’ ही कथा एक वैज्ञानिक शक्यता मांडते. आजीचं घर चंद्रावर आणि नात पृथ्वीवर राहणारी. तिथला वेगळेपणा यातून चंद्रावरची माहिती मुलांना सहजी मिळते, आणि भविष्यात लोकं चंद्रावर कशी राहतील याचं चित्रही प्रत्यक्ष उभं राहतं.
‘मराठी विज्ञान परिषद पत्रिके’च्या दिवाळी अंकात अनेक वर्षं विज्ञानकथा प्रसिद्ध होत आहेत. अलीकडे त्यात मुलांसाठी सरस कथा वाचायला मिळतात. या वर्षीही ‘द पेलिकन डायरीज’ ही सुनील सुळे यांची छोटीशी विज्ञानकथा मुलांना नक्कीच आवडेल. साहस आणि वेगळ्या वातावरणामुळे ती छान वाचनीय झाली आहे.
रेखाटनं
स्पेक्युलेटीव्ह कथांमध्ये लेखक एका आगळ्या जगाची शब्दांतून मांडणी करत असतो. त्याला रेखाटनांची जोड मिळाली तर वाचकांना दुहेरी मेजवानी मिळते. रेखाटनाचा उद्देश कथेविषयी वाचकाला उत्कंठा वाटावं, कथा वाचताना कथेचं नेपथ्य, किंवा कधी पात्रं डोळ्यासमोर यावीत हा असतो. पण ते करताना कथेतील रहस्य अभंग ठेवणारी कथेची रेखाटनं योग्य मानली जातात. या दृष्टीने रेखाटनांचं एक खास महत्त्व आहे. अलीकडे त्यात नवीन नावं आणि नवीन पद्धती दिसतात.
‘धनंजय’मध्ये सतीश खानविलकर, सतीश भावसार, अनीश दाते, शेखर शिंपी यांनी विज्ञानकथांसाठी अनोखी रेखाटनं केलेली आहेत. ‘धनंजय’ आणि ‘नवल’मधली सतीश भावसार यांची रेखाटनं कथांना पुरेपूर न्याय देतात. विशेषत: ‘दिवस सातवा’, ‘रूम’, आणि ‘विषाणू’ या कथांना भावसार यांच्या चित्रांनी अधिक उठाव आला आहे. कथेत येणाऱ्या घटनांची किंवा पार्श्वभूमीची हिंट आहे, पण कथा वाचल्याशिवाय ती कळणार नाही, अशी ही रेखाटनं कथेच्या आस्वादात भर घालतात.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
‘नवल’चे तरुण संपादक अभिराम अंतरकर म्हणाले की, विज्ञानकथांची चित्रं आशयाला धरून असणे आवश्यक आहे. चित्रकार नेमक्या कोणत्या प्रसंगाचं चित्रण करतो ते मला महत्त्वाचं वाटतं. ते पुढे म्हणतात की, जितकं महत्त्व चित्राला तितकंच महत्त्व लेटरिंगलाही आहे. चंद्रमोहन कुलकर्णी, सतीश भावसार, किंवा रमाकांत धनोकर यांच्यासारखे प्रतिभासंपन्न चित्रकार केवळ शीर्षकाच्या माध्यमातून कथेचं अंतरंग नेमकं पकडू शकतात, चित्रं अधिक अर्थवाही करू शकतात.
रेखाटनांमधून कथेविषयी कुतूहल निर्माण व्हावं, मध्यवर्ती कल्पनेचा थोडासा अंदाज यावा, अशी अपेक्षा असते. बहुतेक रेखाटनांमधून ती पूर्ण होते. मात्र कथेचा शेवट त्यातून समजू नये, अशी खबरदारी एक-दोन ठिकाणी घेतलेली नव्हती. असा रसभंग होऊ नये म्हणून आवर्जून इथे नोंद करतो आहोत.
अखेरीस
या वर्षीच्या दिवाळी अंकांमध्ये ५२ स्पेक्युलेटिव्ह कथा वाचायला मिळाल्या. काही कथा वाचायच्या राहून जातील म्हणून आधी आवाहन करून लेखकांकडून कथा मागवल्या होत्या. आवर्जून कथा पाठवून दिल्याबद्दल त्यांचे आभार. बऱ्याच कथा चांगल्या वाचनीय होत्या, पण काही मात्र अगदीच बाळबोध पातळीवर होत्या. अर्थात इतर साहित्यप्रकारांमध्येही हे प्रमाण दिसत असणार. तरीही विज्ञानकथा किंवा स्पेक्युलेटीव्ह कथा लिहून पाहाविशी का वाटत असेल, यावर अभ्यास व्हायला हवा असं वाटतं आहे.
गेली चार वर्षं असा आढावा घेताना दर वर्षी नवे विषय आढळले, ही फारच आनंदाची गोष्ट आहे. अवकाश सफरी आणि रोबॉट्स यापेक्षा या पृथ्वीतलावरील माणसांचा विचार जास्त होताना दिसतो. आपलं आजचं जगणं कित्येक प्रश्न घेऊन उभं आहे, आणि येणाऱ्या काळात काही समस्या गंभीर रूप धारण करणाऱ्या असतील, म्हणून का?
वेगळी पार्श्वभूमी आणि आगळे विषय हे स्पेक्युलेटिव्ह कथांचं वैशिष्ट्य आहेच. त्या तुलनेत वेगळ्या शैलीतलं लेखन मात्र दिसलं नाही. जवळपास सगळ्या कथा निवेदनात्मकच होत्या. पात्रांचा विकास दाखवायला बऱ्याच कथा कमी पडल्या. मध्यवर्ती कल्पना फुलवताना घटना आणि स्पष्टीकरणावर भर येतो आणि पात्रं त्यासाठी एक साधन म्हणून उरतात असं जाणवलं. विज्ञानकथांचा केवळ विचार केला तर कधी अतिशय त्रोटक विज्ञान दिलं गेलेलं होतं, तर कधी वापरलेल्या विज्ञान संकल्पनेवर एखादा लेख टाकावा अशा रितीनं विज्ञान आलेलं होतं. कथेत विज्ञान किती आणि कसं यावं याचं भान कथेनुरूप ठेवायला काही कथा कमी पडल्या.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
बऱ्याच कथांमध्ये फिक्शन किंवा कथा म्हणून मूलभूत गोष्टी पूर्ण होताना दिसल्या नाहीत. कथावस्तू पुरेशी विकसित केलेली नाही की, कथा कोणत्याही रसाचा अनुभव देत नाही, यासारख्या. निर्जीव पात्ररेखाटन, एक पात्र दुसऱ्या पात्राला माहिती देतो अशी रचना, आणि एक शास्त्रज्ञ / डॉक्टर असणे, या साच्यात त्या अडकलेल्या वाटल्या. विज्ञानकथेची काही खास बलस्थानं आहेत. भविष्यातल्या नातेसंबंधांवर आणि जीवनशैलीवर भाष्य करणे, एका अगदी वेगळ्याच कोनातून आपल्या जगाचं रूप दाखवणे, भविष्यकाळातलं आयुष्य रेखाटण्याच्या निमित्ताने आजच्या चालीरीतींवर उपरोधात्मक टीकाटिपणी करणे, एका भव्य पटावर कथा उलगडणे, अशासारखी. त्यातली काही मोजक्या कथांमध्ये दिसली, पण कथावस्तूच्या पलीकडे जाऊन या पैलूंकडे अधिक लक्ष देता येईल.
.................................................................................................................................................................
हेहीपाहावाचाअनुभवा
दिवाळी २०१९ : ‘विज्ञानकथा’ या लेबलखाली येणाऱ्या कथा खरोखरच ‘विज्ञानकथा’ म्हणाव्यात का?
दिवाळी अंक २०२० : मराठी विज्ञानकथा अजून ठराविक साच्यातून बाहेर का पडत नाही?
दिवाळी अंक २०२१ : आपण ‘स्पेक्युलेटिव्ह फिक्शन’कडे वाटचाल करतो आहोत का?
.................................................................................................................................................................
काही कथांमध्ये भाषा अत्यंत कृत्रिम होती. ती म्हणाली, तो म्हणाला, याचा अतिरेक होता. संवाद आणि पुढे नुसतं पात्राचं नाव, अशी विचित्र रचनादेखील काही कथांमध्ये पाहायला मिळाली. काही ठिकाणी तर भाषा इंग्लिशमधून शब्दश: भाषांतर केल्यासारखी वाईट होती. इलेक्ट्रोंनिक अवजारं (इलेक्ट्रोंनिक टूल्स? तिथं इलेक्ट्रोंनिक साधनं म्हणणं जास्त योग्य झालं असतं), समिती गठित केली (कमिटी कॉन्स्टिट्यूटेड? तिथे समिती स्थापन केली असं नैसर्गिक लिहिता येतं), ही काही उदाहरणं.
विज्ञानकथा किंवा स्पेक्युलेटीव्ह कथा मुळात कथा असली पाहिजे. याकडे दुर्लक्ष झालं तर पर्यायानं कथेकडे वाचकाचं दुर्लक्ष नाही का होणार?
.................................................................................................................................................................
मेघश्री दळवी विज्ञानकथालेखक व समीक्षक असून आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत.
meghashri@gmail.com
स्मिता पोतनीस विज्ञानकथालेखक व समीक्षक आहेत.
potnissmita7@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment