अजूनकाही
सलग पाच वर्षं फिनलंड हा ‘आनंदी देश’ म्हणून जागतिक पातळीवर सर्वोच्च स्थानावर आहे. तेथील शिक्षणपद्धती सद्यस्थितीत सर्वोत्तम आहे. अनेक वर्षं फिनलंडमध्ये राहून तेथील शिक्षणव्यवस्थेचा अभ्यास करून या देशानं शिक्षणाच्या बाबतीत नेमकं कसं यश मिळवलं, यासंदर्भात शिक्षकांना प्रशिक्षण देताना आणि त्यांचं शंकासमाधान करताना हेरंब व शिरीन कुलकर्णी यांनी फिनलंडचा इतिहास, शिक्षणपद्धतीचं सरकारशी नातं, रंजक परीक्षापद्धती, व्यावसायिक शिक्षण, रंजक अध्ययन-अध्यापनाच्या पद्धतीचं निरीक्षण करून या देशात असं काय आहे, ज्याच्यामुळे तेथील शिक्षणपद्धती यशस्वी मानली जाते, याचा अभ्यास केला.
त्याचबरोबर फिनलंड शिक्षणपद्धतीची माहिती भारतीय शिक्षकांना देत असतानाच, फक्त व्याख्यानं न देता शिक्षकांनाही सहभागी करून घेतलं. शिक्षकांना फिनलंडमधील शाळेचा अनुभव देण्याचाही प्रयत्न केला. फिनलंडमध्ये जसा रंजक गृहपाठ देतात, तसा शिक्षकांना दिला. शिक्षकांच्या २० बॅच घेण्यात आल्या. त्यातून हजारो शिक्षक प्रशिक्षित झाले. यामध्ये जे अनुभव व माहिती मिळाली, त्याचा उपयोग करून भारतातही आपण अशा प्रकारे शिक्षणपद्धती राबवू शकतो, याची माहिती सर्वांपर्यंत, शिक्षकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशानं त्यांनी ‘शिक्षणगंगा : फिनलंडमधून आपल्या दारी’ हे पुस्तक लिहिलं आहे.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर भारतातील, प्रामुख्यानं महाराष्ट्रातील शिक्षणपद्धतीत फिनलंडच्या ‘शिक्षण-मॉडेल’चा कसा सकारात्मक वापर करता येईल, याचं अनुभवाधारित विवेचन उदाहरणांसहित दिलं आहे. केवळ आदर्शवादी उदाहरण देण्याचा प्रयत्न केलेला नाही, तर भारतात दोन प्रकारच्या शाळाही प्रायोगिक तत्त्वावर सुरू केल्या आहेत, आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पुणे येथे ‘द अकॅडमी स्कूल’ आणि एक शाळा बेंगलोरमध्ये. त्या पालकांसाठी कुतूहलाचा विषय बनल्या आहेत.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
हेरंब व शिरीन कुलकर्णी हे गेल्या १७ वर्षांपासून फिनलंडमध्ये राहतात. या काळात त्यांनी तेथील शिक्षणपद्धतीचा अभ्यास केला, तिकडचे प्रयोग भारतासाठी कसे अनुकूल ठरतील, याचा विचार केला. आणि त्यानुसार ते गेल्या काही वर्षांपासून भारतातील शिक्षकांना प्रशिक्षण देत आहेत. तो सगळा अनुभव त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून सर्वांसाठी उपलब्ध करून दिला आहे.
हे पुस्तक वेगवेगळ्या शैक्षणिक मुद्द्यांना स्पर्श करते. त्यामुळे अनेक शैक्षणिक प्रश्नांची उकल व्हायला मदत होते. याची भाषा संवादात्मक असल्यामुळे आणि रंगीत चित्रांमुळे ते माहितीपर व मनोरंजकही झालं आहे. विशेषत म्हणजे या पुस्तकात क्यू.आर. कोड दिले आहेत. त्यांच्या साहाय्यानं आपण चलच्चित्र स्वरूपात रंगीत चित्रं आणि एखाद्या विषयाशी संबंधित अधिक माहितीदेखील पाहू शकतो, हे या पुस्तकाचं एक आगळंवेगळं वैशिष्ट्य आहे.
या पुस्तकातून फिनलंडमधील शिक्षकाला असलेली स्वायत्तता, प्रत्येक विद्यार्थ्यांची बलस्थानं ओळखून त्याला नोकरी-व्यवसायाच्या योग्य संधी मिळवतील अशा पद्धतीनं दिलं जाणारं शिक्षण, शिकण्यातील अडचणीवर केली जाणारी उपाययोजना आणि स्पर्धेचं रूप घेतलेल्या परीक्षांना बगल देऊन विषयाच्या आकलनावर दिलेला भर, ही वैशिष्ट्यं आपल्यासमोर येतात.
नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना या पुस्तकाचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. फिनलंडचं ‘शिक्षण-मॉडेल’ आपण आपल्या शिक्षणव्यवस्थेत कसं वापरू शकतो, याची महती सांगणारं हे पुस्तक निश्चितच उपयोगी आहे. प्रादेशिक भाषा आणि मातृभाषेमध्ये शिक्षण, याचा हे पुस्तक पुरस्कार करतं... फिनलंडसुद्धा याच मार्गावर चालत आहे.
हेरंब व शिरीन कुलकर्णी यांनी ‘कौन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन’ Council for creative education ही संस्था फिनलंडमध्ये स्थापन करून, तसंच देश-विदेशातल्या विविध प्रकारच्या परिसंवादांत भाग घेऊन, शिक्षण-प्रशिक्षणात सहभागी होऊन तेथील आणि फिनलंडमधील या पुस्तकात मांडलेले अनुभव निश्चितच शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहेत. सीसीईच्या साहाय्यानं महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांनी फिनलंडमधील शाळांना प्रत्यक्ष भेटीही दिल्या आहेत. सीसीईच्या अनेक ध्येयांपैकी एक ध्येय आहे - भारतातील शाळांचं विकसन. त्यानुसार छत्तीसगड, गोवा, दिल्ली, महाराष्ट्र या राज्यांमध्ये शैक्षणिक काम केलं जातंय. शिक्षकांसाठी त्यांनी अनेक अभ्यासक्रम विकसित करून ते राबवले आहेत.
हे पुस्तक केवळ माहिती देत नाही, तर अनेक शंकांचं समाधानही करतं. भारताच्या केंद्र सरकारने जाहीर केलेलं नवं शैक्षणिक धोरण समोर ठेवून हे पुस्तक लिहिलेलं आहे. ते याचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणावं लागेल. फिनलंड शिक्षणपद्धती आणि भारतीय शिक्षणपद्धती यांच्याविषयी तुलनात्मक विचार मांडणारं मराठी भाषेतील हे पहिलंच पुस्तक असावं.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या अंमलबजावणीत विशेषत: अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, मूल्यमापन, मूल्यांकन आणि शिक्षक-प्रशिक्षण या क्षेत्रात फिनलंडकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. महाराष्ट्रातील ज्या ज्या शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांसाठी काही नावीन्यपूर्ण करावंसं वाटतं, त्यांच्यासाठी हे पुस्तक एक मोठी संधी हे घेऊन आलं आहे. फिनलंडमध्ये असलेली एसआयएसयू वृत्ती म्हणजेच परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, माझ्यापुढे असलेलं उद्दिष्ट मी साध्य करायलाच हवं, ही आपल्याकडच्या शिक्षकांमध्येही ठासून भरलेली दिसते.
या पुस्तकात फिनलंडच्या शिक्षणपद्धतीची तोंडओळख व इतिहास आणि तेथील बालशिक्षण, पूर्व प्राथमिक शिक्षण, लहान मुलं व शिक्षणाची भाषा आणि शिक्षकपात्रता, शालेय शिक्षण, तेथील शाळांमधील काही रंजक गोष्टी, प्राथमिक शिक्षणात उच्चशिक्षणाची तयारी, परीक्षापद्धती यावर भर दिला आहे.
शिक्षकांचं कितीही प्रशिक्षण झालं आणि त्यांना कितीही मार्गदर्शन मिळालं, तरी संदर्भसाहित्याची गरज असतेच, काही यशोगाथा समोर असणं गरजेचं असतं, ती उणीव हे पुस्तक भरून काढतं.
डॉ. अविनाश धर्माधिकारी यांची प्रस्तावना आणि डॉ. वसंत काळपांडे यांचं आशीर्वादपर मनोगत या पुस्तकाचं महत्त्व विशद करतात. प्रमोद जोशी यांचं मुखपृष्ठ समर्पक आहे.
‘शिक्षणगंगा : फिनलंडमधून आपल्या दारी’ – शिरीन कुलकर्णी, हेरंब कुलकर्णी
प्रकाशक - सीसीई, फिनलंड, पाने - १२८, मूल्य – ३०० रुपये.
अधिक माहितीसाठी आणि या पुस्तकातील काही प्रकरणं वाचण्यासाठी पहा -
https://www.ccefinland.org/shikshanganga
.................................................................................................................................................................
अनिल कुलकर्णी
anilkulkarni666@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment