अजूनकाही
१. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कामाच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनुकरण करणार असे दिसते. पदभार स्वीकारताच आदित्यनाथ यांनी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना १५ दिवसात संपत्तीचा तपशील जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यावर भर दिला जाईल असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे. वार्षिक उत्पन्न, जंगम आणि स्थावर मालमत्तेचा तपशील आता मंत्र्यांना द्यावा लागणार आहे. मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यावर योगी आदित्यनाथ यांनी जारी केलेला हा पहिला आदेश आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी विराजमान होताच सर्व मंत्र्यांचा संपत्ती जाहीर करण्याचे आदेश दिले होते.
बातमी लिहिणाऱ्याने बातमीदाराची तटस्थता सोडून मोठ्या कौतुकाने हे लिहिलं आहे... हल्लीच्या वातावरणात ते स्वाभाविकही आहे. पण, दुर्दैवाने त्यातून निर्माण झालेला विनोद त्याच्या लक्षात आलेला नाही. मुळात निवडणूक लढवताना निवडणूक आयोगाकडेच आपल्या संपत्तीचा तपशील द्यावा लागतो. त्यात निवडणुकीनंतर काही फार मोठा फरक पडलेला असण्याची शक्यता नसते (तो खुर्ची काही वर्षं उबवल्यानंतर पडतो!). त्यामुळे असे तपशील मागणं हे अकारण, अनावश्यक आणि निव्वळ चमको कृत्य ठरतं. त्याचंच अनुकरण आदित्यनाथ करतायत? मग कठीण आहे.
....................................................................................
२. हिऱ्याला पैलू पाडणे आणि प्रक्रिया करण्याबरोबरच भारतामध्ये जगातील सर्वांत मोठी हिऱ्याची बाजारपेठ निर्माण व्हावी, असे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. २०२२ मध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जाईल. तोपर्यंत भारताने हिऱ्याच्या पारंपारिक प्रक्रिया उद्योगाबरोबरच सर्वाधिक विक्रीचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी हिरे व्यापाऱ्यांना केले.
काही कमीजास्त झालं तर कर्जमाफी किंवा घसघशीत करमाफी द्यायला सरकार आहेच. शेवटी हिराउद्योग भारतातला जीवनावश्यक उद्योग आहे; शेतीसारखा अनावश्यक धंदा थोडाच आहे? खायला अन्न नसलं तरी चालेल, प्रत्येक भारतीयाच्या गळ्यात, बोटांवर, डोक्यावर एक तरी हिरा विराजमान व्हायला हवा. हिरेनिर्यातीलाही लगेहाथ चालना द्यायला हवी. इथले काही हिरे निर्यात झाले, तर देशाचे चकचकाटाने दिपलेले डोळे उघडतील.
....................................................................................
३. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पाहिल्यानंतर दूरचित्रवाणीवरून पाहिल्यानंतर त्यांचे वडील आनंद सिंह बिश्त एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, आपला मुलगा सर्व धर्मांचा आदर राखेल अशी आशा मी व्यक्त करतो. हिंदू, मुसलमान, शीख, ख्रिश्चन त्याचबरोबर गरीब आणि श्रीमंत या सगळ्यांचा विकासाचा मूलमंत्र असलेले ‘सबका साथ, सबका विकास’ या भाजपच्या घोषवाक्याला अनुसरून त्याने राज्याच्या कामाचा गाडा हाकावा. त्याच्यावर आता फार मोठी जबाबदारी आहे. त्याच्यातील विकासपुरुषाला मी जाणतो. आपल्या लक्ष्यापासून विचलित न होणे हा त्याच्यातील अत्यंत चांगला गुण आहे, असं ते कौतुकाने म्हणाले.
आपला मुलगा सर्व धर्मांचा आदर करेल, अशी ‘आशा’ आहे, हे त्यांचं वाक्य पुरेसं बोलकं आहे आणि ‘लक्ष्यापासून विचलित न होणारा विकासपुरुष’ हे वर्णन ऐकल्यावर निर्माण झालेली धडधड अधिक वाढवणारं आहे.
....................................................................................
४. फ्रेंच भविष्यवेत्ता नॉस्ट्राडॅमसने भारताला नव्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या ज्या व्यक्तीबद्दल नोंद केली होती, ती व्यक्ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचे वक्तव्य भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी संसदेत केले. लोकसभेत पूरक मागण्यांवर बोलताना त्यांनी नॉस्ट्राडॅमसने वर्तवलेल्या भविष्यवाणीचा उल्लेख केला. पूर्व भागात असा एक नेता होईल जो भारताला एका नव्या उंचीवर नेईल. तो नेता म्हणजे पंतप्रधान मोदी, असे सोमय्या यांनी म्हटले.
सोमय्या यांना कोण-कुठल्या नॉस्त्रादेमसची साक्ष का काढावीशी वाटली? कोण हा इसम? आपल्या वेद-पुराणं-महाकाव्यं-भागवतांमध्ये साठवलेल्या महान ज्ञानापुढे त्याच्या भविष्यकथनाची काय मातब्बरी? भगवान श्रीकृष्णांनी जे म्हणून ठेवलंय, ‘यदा यदा हि धर्मस्य...’ ते वाचलं तरी मोदींच्या अवताराची भविष्यवाणी खूपच आधी आपल्याच धर्मग्रंथांनी केली होती, हे त्यांच्या लक्षात येईल. नीट वाचलं तर त्यात किरीट सोमय्यांच्याही अवताराचा उल्लेख सापडेलच.
....................................................................................
५. गोव्यातील सरकार हे भ्रष्ट आघाडीचं सरकार असून ते अल्पजीवी ठरेल, असं टीकास्त्र शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर सोडलं आहे. गोव्यातील जनतेनं भाजपला स्पष्टपणे नाकारलं होतं. त्यानंतर भ्रष्ट आघाडी करून त्यांनी सरकार स्थापन केलं आहे. हे सरकार हंगामीच ठरेल, असं मत त्यांनी माडलं.
बायदवे राऊतसाहेब, गोव्यात शिवसेनेनेही भाजपला फार मोठी टक्कर दिली, जेरीला आणलं, नाकात नऊ आणले, असं ऐकिवात आहे. पण, नतद्रष्ट, पोटावळ्या पत्रकारांनी त्या अद्भुत झुंजीच्या बातम्या दडवून ठेवल्या होत्या. त्याविषयीही काही बोलला असतात तर गोव्यातल्या अन्यायग्रस्त जनतेच्या मनगटांत नवं बळ संचारलं असतं. बाकी मुंबई महापालिकेत कसं चाललंय? छान ना?
....................................................................................
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment