मराठीतील ज्येष्ठ कादंबरीकार आणि शेतकरी प्रश्नांचे भाष्यकार म्हणून परिचित असलेल्या शेषराव मोहिते यांची ‘४२व्या मराठवाडा साहित्य संमेलना’चे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. १०-११ डिसेंबर २०२२ दरम्यान घनसावंगी (जिल्हा जालना) येथे हे संमेलन पार पडत आहे. त्या निमित्ताने मोहिते यांच्या एकूण लेखन कार्यावर टाकलेला हा कटाक्ष...
.................................................................................................................................................................
१९८०च्या दशकात नाशिक, निफाड, चाकण या भागात शेतकरी आंदोलन पेटले होते. ऊस, कांदा या पिकांसाठी शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होतं. या आंदोलनाचा वणवा निपाणीपर्यंत जाऊन पोहोचला. या भागातल्या तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांनी पुणे-बेंगलोर हा मार्ग रोखून धरला. पोलिसांनी शरद जोशी यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांना बेल्लारीच्या तुरुंगात टाकले. याच आंदोलनात पोलिसांनी गोळीबार केल्यानंतर १३ जणांचा त्यात बळी गेला. साप्ताहिक ‘माणूस’मधून विजय परुळकर यांची ‘रक्तसूट’ ही लेखमाला त्या वेळी सुरू होती. ती वाचून परभणीच्या तत्कालीन मराठवाडा कृषि विद्यापीठात शिकत असलेले विद्यार्थी पेटून उठायचे. कृषी विद्यापीठात मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागांतून आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता प्रचंड होती, पण या अस्वस्थतेला मोकळी वाट मिळत नव्हती. महाविद्यालयातल्या रंगीबेरंगी आयुष्यातही पायाखाली काहीतरी धुमसत असल्याच्या भावनेने त्या वेळी हे कृषी विद्यापीठातले विद्यार्थी प्रक्षुब्ध होते.
सरकार, प्रशासकीय यंत्रणा अशा सर्वांवर दात ओठ खात, मुठी आवळत हा असंतोष बाहेर पडायला सुरुवात झाली होती. त्या वेळी शेषराव मोहिते यांनी कृषी विद्यापीठात शिकत असतानाच ‘आमचा पंधरा ऑगस्ट कवा हाय’ ही कविता लिहिली-
“जवा उद्या पंधरा ऑगस्ट असायचा,
तवा माय माझी फाटकी आंगी टाचायची,
नवी कापडं नाहीत म्हणून बापावर राग काढायची,
कर्मावर बोटं मोडायची,
तवा बाप माझा कोपऱ्यातल्या दिव्याजवळ बसून पायातले काटे काढायचा,
तिथं मेण लावून जाळायचा आणि व्हटावर व्हट गच्च दाबून डोळ्यातून टिपं गाळायचा,
जवा उद्या पंधरा ऑगस्ट असायचा पण अलीकडं,
अलीकडं पंधरा ऑगस्ट आला की बाप माझा बिथरल्यावाणी करतोय,
कुळवाचं रूमणं हातात घेतोय;
नाशकात, निपाणीत सांडलेल्या रक्ताच्यान् आमचा पंधरा ऑगस्ट कवा हाय म्हणतोय.”
अशी ती कविता होती.
थोडक्यात घामाची किंमत मागणाऱ्या माणसापर्यंत हे स्वातंत्र्य आलंच नाही, अशी भावना या कवितेतून धारदारपणे उमटली होती. एकीकडे शेतकरी आंदोलनांनी शब्दांना आलेली ही धार आणि १९८०च्या दशकातलं दलित साहित्याचं वाचन यातून मोहिते यांच्या लेखनाला खरी प्रेरणा मिळाली. बाबुराव बागुल, नामदेव ढसाळ, दया पवार, यशवंत मनोहर, वामन निंबाळकर यांच्या साहित्याने एक भान दिलं याबद्दलची कृतज्ञताही मोहिते यांनी नोंदवून ठेवली आहे.
नेमकं १९८०च्याच दशकाच्या पार्श्वभूमीवर आणि त्याआधीही ग्रामीण जीवनाचे विपर्यस्त चित्रण करणाऱ्या साहित्याने बराच कचरा निर्माण झाला होता. खराखुरा हाडामांसाचा शेतकरी साहित्यातून का दिसत नाही, हा मोहिते यांचा सवाल होता. सभा-संमेलनांतून, परिसंवादांतून, चर्चासत्रांतून ज्यांनी मोहिते यांना ऐकलं आहे, त्यांच्यासाठी ही मांडणी परिचित आहे. शेतकरी हा साहित्यातून एक तर खलनायक किंवा बावळट आणि मूर्खच का दाखवला जातो, असा त्यांचा बिनतोड सवाल विविध मंचावरून व्यक्त झाला आहे. मोहिते यांचे आजवरचे सर्जनशील व वैचारिक लेखन मूलतः या प्रश्नाचा स्वतःच्या पातळीवर घेतलेला व्यापक शोध आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातल्या व्हताळ या गावी १९५६ साली जन्म, उच्चशिक्षणासाठी परभणीच्या कृषी विद्यापीठात प्रवेश, कृषी क्षेत्रात एम.एस्सी या पदव्युत्तर शिक्षणानंतर पीएच.डी. असा त्यांचा शैक्षणिक प्रवास आहे. युवा अवस्थेत १९८० साली ‘महाराष्ट्र छात्र युवा संघर्षवाहिनी’तून कामाला सुरुवात केल्यानंतर ‘शेतकरी संघटने’च्या चळवळीत प्रत्यक्ष सहभाग त्यांनी घेतला. लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात पीकशास्त्र या विषयाचे अध्यापन करून ते सेवानिवृत्त झाले. असा काही ओळींमध्ये त्यांचा लौकिक परिचय सांगता येईल.
शेषराव मोहिते यांची ‘असं जगणं तोलाचं’ ही कादंबरी १९९४ साली प्रसिद्ध झाली. तोवर त्यांच्या काही कविता आणि ‘बरा हाय घरचा गोठा’ हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला होता. महाविद्यालयीन शिक्षण घेताना विद्यार्थी आंदोलनातील सहभाग, आणि त्यानंतर थेट शेतकरी संघटनेतील प्रत्यक्ष काम, यामुळे शेतकर्यांच्या दारिद्रयाची नेमकी कारणमीमांसा करत असताना नवे आकलन होत होते. त्याआधी जे शेती-मातीचे साहित्य वाचले त्यातल्या कमतरता जाणवत होत्या. आपण जे अनुभवतोय त्या जगण्याचा, खेड्यापाड्यातील माणसे जे जगत आहेत त्याचा आणि साहित्याचा कुठेच सांधा जुळताना दिसत नाही. वेगवेगळ्या पातळ्यांवर त्यांच्याकडून हे असमाधान व्यक्त होत होते. ग्रामीण जीवनाचे नेमके चित्रण साहित्यातून येत नाही किंवा जे येते ते फसवे आहे अशी मांडणी ते करत होते. ‘तुम्हाला जे शेतकरी जीवन साहित्यातून यावे असे वाटते ते तुम्हीच का लिहीत नाही’, अशी विचारणाच मोहिते यांच्या पहिल्या कादंबरी लेखनामागचे एक प्रमुख कारण ठरले.
वस्तुतः मराठी साहित्य हा काही मोहिते यांच्या अध्यापनाचा विषय नव्हता. उलट शालेय जीवनात मराठी विषयाला त्यांना कमी गुण मिळत. या ठिकाणी हिंदीतले प्रसिद्ध कादंबरीकार विनोदकुमार शुक्ल यांच्या बाबतीतला एक तपशील आठवला. त्यांनी नमूद केलंय, “मी साहित्याचा विद्यार्थी कधीच नव्हतो. हिंदीत तर नेहमी नापास व्हायचो, कधीच चांगल्या मार्काने पास झालो नाही. गुरुजी तर नेहमीच रागावत. तू चांगल्या पद्धतीने हिंदीसुद्धा लिहू शकत नाहीस. पुढे कृषीशास्त्रात अभ्यास करताना तिथे काही हिंदी नव्हती. तेव्हा मात्र चांगल्या मार्काने पास होत राहिलो.’’ यातला योगायोगाचा भाग असा की, शेषराव मोहिते यांनीसुद्धा कृषीशास्त्रातच अध्ययन आणि अध्यापन केले आहे. केवळ तपशिलातील साम्य म्हणून हा उल्लेख केला आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
‘असं जगणं तोलाचं’ या कादंबरीच्या सुरुवातीला बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेच्या ओळी आहेत-
“हास हास माझ्या जीवा
असा संसारात हास
इडा पिडा संकटाच्या
तोंडावर्हे कायं फास
जग जग माझ्या जीवा
असं जगणं तोलाचं,
उच्च गगनासारखं
धरतीच्या रे मोलाचं.”
या ओळींचा जो आशय आहे तो जणू या कादंबरीचा गाभा आहे. कासा आणि हरिबा या राबणार्या कुटुंबाची ही कहाणी आहे. ती घडते एका छोट्या गावात. गुढीपाडवा झालेला आहे, खळे-दळे उरकलेले आहेत आणि दारात एक देणेकरी येऊन धडकला आहे. कारभार्याने वसुलीसाठी एक माणूस पाठवलेला आहे. वेळेत वायदा पूर्ण झाला नाही, तर काय करायचं, या विवंचनेने हारिबाला ग्रासले आहे. एका ओढग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या जगण्याची कहाणी इथून सुरू होते.
जगण्यातल्या दुःसह वर्तमानाला भिडण्याची हारिबाची छाती नाही. पुढ्यातल्या कठोर वास्तवाचा विसर पाडणारी पंढरीची वाट त्याला दिलासा देणारी वाटते. भजन-किर्तनाच्या आणि देवाधर्माच्या नादी लागून तो कठोर वास्तवापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. त्याच वेळी त्याची बायको कासा हा संसाराचा गाडा ओढत असते. नवर्याने जरी कठोर वास्तवापासून दूर नेणारी पंढरीची वाट धरलेली असली, तरी ती मात्र संकटावर पाय देवून उभी राहते. कासाबाईला गोपाळ, नामु, हिरकणी, कस्तुरी ही चार लेकरं आहेत आणि हणमु या नावाचा सावत्र मुलगा आहे. विष्णू कारभार्याला दिलेला शब्द खरा ठरवता येत नाही. कर्जाचा डोंगर वाढतच जातो. हारिबाला चावडीवर बोलावून त्याची मानहाणी केली जाते. ही गोष्ट हनमुच्या मनाला लागते. तो आपली जीवनयात्रा संपवतो.
हनमुच्या आत्महत्येचे खापर कासाबाईवर फोडले जाते, कारण तो तिचा सावत्र मुलगा असतो. सावत्रपणामुळेच असे घडले असावे, अशी गावात चर्चा सुरू झालेली असते. त्यातून नसत्या चौकशा मागे लागतात आणि हे प्रकरण मिटवण्यासाठी पुन्हा व्याजाने पैसे काढावे लागतात. पुन्हा हे कुटुंब कर्जाच्या दुष्टचक्रात अडकतं. हरिबा भजनाच्या नादी लागून वैयक्तीकरित्या मानसिक निवारा मिळवतो, पण कासाला मात्र अक्षरशः घाण्याला जुंपून घ्यावे लागते. खातेर्यात रुतलेल्या घराला वर आणण्यासाठी तिचा प्राणांतिक संघर्ष सुरू होतो. तिची जिद्द विलक्षण आहे. घरातल्या प्रत्येकाला नीट कामाधद्यांला लावून ती संसाराचा गाडा ओढते. नवर्याचा नाकर्तेपणा, बेफिकिरी यामुळे हतबल न होता, स्वतः पुढे होऊन ती जणू संपूर्ण कुटुंबाच्या दोर्या आपल्या हाती घेते.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
साधारणपणे या कादंबरीतला काळ १९४० ते ५० या दशकातला आहे. निजामी राजवट, रझाकार हा कालखंड पार्श्वभूमी म्हणून येतो. दरम्यानच्या काळात या कुटुंबात पडझडीचे अनेक प्रसंग येतात. कसोटीचे क्षण येतात. कासाला आधार शोधत भावाकडे जावे लागते. वर्षभर आपले बिर्हाड घेऊन भावाकडे राहिलेली कासा पुन्हा गावी येते. भावाने काही काळासाठी बैलजोडी दिलेली असते. कुटुंबाचा नव्याने संघर्ष सुरु होतो. घरातली सगळी माणसे आपापला तोल सावरत आणि एकमेकांना धरून ठेवत वाताहतीला तोंड देण्याचा प्रयत्न करतात.
घरातला गोपाळा खडतर परिस्थितीला तोंड देत मॅट्रिकपर्यंत शिकतो. त्याला प्राथमिक शिक्षकाची नोकरी लागते. तो आपल्या कुटुंबाला सावरण्यासाठी मदतीचा हात देतो. त्याचा हातभार आणि घरातल्यांचे कष्ट यातून शेतात विहीर पाडली जाते. घरादाराच्या कष्टातून दोन-तीन एकर ऊस लावला जातो. गुर्हाळ लाऊन गूळ काढला जातो. हा गूळ जेव्हा बाजारात येतो, तेव्हा झालेला खर्च आणि हाती आलेला पैसा याचे गणित कुटुंबाला पुन्हा दुष्टचक्रात ढकलणारे असते. नामदेव-धुरपा यांनी केलेले जीवतोड परिश्रम गोपाळा निकाली काढतो, पण पुढे त्याला याचा पश्चाताप होतो. त्यातून तो एका पत्राद्वारे आपली भावना उघड करतो-
‘‘आबा, त्या दिवशी मी रागाच्या भरात जी कायी बोललो त्येचं तुला, वैनीला लई वाईट वाटलं आसंल. पण किती केलं तरी मी धाकटा. माझा राग तुम्ही दोघंही मनावर घेऊ नका. आपुन सार्यांनी मिळून केल्याली धडपड अशी वाया गेली. त्येला ना तुजा इलाज ना माजा इलाज. पण हेच्यापुढं एक गोष्ट ध्यानात ठेव. बापाचे दिवस पोराला येऊ नयेत आसं वाटत आसलं तर शिरूला ह्या गाळात रुतू देऊ नको. पोरगं तुझं काय, माझं काय! डोक्यानं मोप चांगलं हाय. पण शेताच्या नादानं वाया चाललंय. त्येला बाहेर काढायचं बगू...’’ श्रीराम हा कागद वाचतो. धुरपाच्या डोळ्याचा कडा ओलावतात. इथेही कादंबरी संपते.
वरवर ही कुटुंबकथा वाटत असली तरी त्यात अनेक बाबी आहेत. ही एका शेतकरी कुटुंबाची कहाणी, तर आहेच, पण परस्परांमध्ये असलेली नात्याची वीण, कधी ती उसवणारी परिस्थिती तर या परिस्थितीशी दोन हात करणारी माणसे, असा एक विलक्षण तोल या कादंबरीने साधला आहे. सीमावर्ती भागात या कादंबरीचे कथानक घडले आहे. कानडी हेल असलेल्या बोलीत ही कादंबरी आली आहे. बोलीचे अस्सल आणि जीवंत रूप हे या कादंबरीचे मोठे बलस्थान आहे. महालिंगरायाचा माळ, लामजन्याचा शिवार, येणगुरचा बाजार, खोकलाईचा माळ, बेडग्याची नदी, शेख फरहदाचा माळ, आलुरचा मठ, लमाणतांडा अशी असंख्य स्थान वैशिष्ट्यं असलेला परिसर या कादंबरीत रसरशीतपणे उतरलेला आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
त्याअर्थाने परिसरनिष्ठा हाही या कादंबरीचा महत्त्वाचा विशेष आहे. ‘असं जगणं तोलाचं’मधील शाळा मास्तराची नोकरी लागलेला गोपाळा हा आपल्या पुतण्याने शेतीच्या धंद्यात अडकू नये असे आपल्या भावाला बजाऊन सांगणारा आहे. ‘पोरगं डोक्यानं मोप चांगलं हाय पण शेताच्या नादानं वाया चाललंय’. कादंबरीच्या शेवटी आलेले हे सूचन मोहिते यांच्या ‘धूळपेरणी’ या पुढच्या कादंबरीचे सूत्र आहे. 'असं जगणं तोलाचं’ या कादंबरीत अगदीच शाळकरी मुलगा असलेला श्रीराम हा पुढे ‘धूळपेरणी’ या कादंबरीचा नायक आहे.
होस्टेलवरच्या खोलीत रात्रभर बेचैन असलेला श्रीराम आपल्याला पुढे काय करायचे, या प्रश्नावर जेव्हा आतल्या आत काथ्याकुट करतो, तेव्हा त्याच्या मनात विचारांचे वादळ घोंगावत असते. शेती करावी की नोकरी, चार वर्षातल्या कृषी शिक्षणाची शिदोरी घेऊन गावाकडे जावे का, गावाकडे गेल्यानंतर पुन्हा शेतीत आपला निभाव लागेल का? अशा अनेक प्रश्नांचा गुंता त्याच्या डोक्यात झालेला असतो.
“...मग एकदम डोळ्यापुढे ते ७२च्या दुष्काळाचे थैमान. शेख फरदाच्या माळावरल्या खडी केंद्रावरला व्हटांग व्हटांग आवाज रात्रभर कानात... होस्टेलवरच्या खोलीत झोपेतही डोक्यात घन घातल्यासारखा. गावाकडं आईबाप या खातेऱ्यातून अट्टाहासानं काढून लावण्याच्या खटाटोपात. मृगाचा पाऊस वेळेवर पडेल या आशेवर ‘धूळपेरणी’ केल्यासारखं. कोरड्या मातीत बी पेरून ढगाकडं डोळे लावून बसलेले, त्यांच्या आशाळभूत नजरा आपल्यावर खिळलेल्या...”
या शब्दांत श्रीरामची ही अस्वस्थता उमटते. घरातून, गावातून तुटत चाललेला आणि शिक्षणामुळे स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवत केलेला श्रीराम इथे दिसतो. त्याची धडपड, त्याच्या आशा-आकांक्षा, त्याची स्वप्नं असे सारे काही ‘धूळपेरणी’ या कादंबरीत आहे. श्रीराम अभावग्रस्त परिस्थितीतून आलेला असला तरीही मनस्वी आहे. तो शेता-शिवारात गुराढोरात रमतो. गणित आवडत नाही, पण चित्रे काढायला आवडतात. शाळेत शिकत असतानापर्यंत तो चारचौघांसारखाच असतो. पुढे मात्र कृषी महाविद्यालयात शिकायला आल्यानंतर मात्र तो स्वतंत्र ओळख निर्माण करतो. आपले सगळे मित्र नोकरी, करिअरच्या मागे लागलेले आहेत, असे चाकोरीबद्ध जगणेही श्रीरामला नकोसे वाटते. तो प्रचंड वाचतो. सिनेमे पाहतो. वेगवेगळ्या शिबिरांमध्ये सहभाग नोंदवतो. आपल्या पिढ्यानपिढ्याच्या ढोरकष्टाचा इतिहास आणि या इतिहासाचे ओझे त्याच्या मानगुटीवर कायम असते. गावाकडचा धागा त्याला तोडून टाकता येत नाही.
सहलीला जाण्यासाठी जेव्हा पैसे मागायला तो गावी येतो, तेव्हा कुटुंबातले रापलेले चेहरे त्याला अस्वस्थ करू लागतात. आजूबाजूला वातावरण कितीही भ्रष्ट, गढूळलेले असले तरी श्रीराम मात्र स्वतःतला मूल्यविवेक ढळू देत नाही. अवतीभवतीच्या वातावरणापासून तो कसोशीने स्वतःला प्रामाणिक ठेवण्याचा प्रयत्न करतो.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
कृषी विद्यापीठात जिल्हावादाच्या संघर्षातून जो राडा होतो. त्यामुळे होस्टेल रिकामे करून सगळी मुलं गावी परततात. श्रीरामही आपल्या गावी येतो. शेतात जातो तेव्हा त्याला बाई, काकी उसाचे पाचट साळताना दिसतात. त्यांच्या रक्ताळलेल्या हातावरील रेघा दिसतात. आग होऊ नये म्हणून बांधलेल्या चिंध्या दिसतात. त्यांच्याकडे तो पाहतो आणि आतल्या आत दुभंगत जातो. आपल्या शिक्षणासाठी सारं घर खस्ता खातं आणि आपल्या पायाला तिथे शहरात तर धूळही लागत नाही, ही जाणीव त्याला अस्वस्थ करते.
शेतीचे उदात्तीकरण आणि गौरवीकरण करण्याचे प्रकार विद्यापीठात भाषणांमधून होतात. ‘कृषीमूलंही जीवनम्’ हे कृषी विद्यापीठाचे ब्रीद सुद्धा त्याला एक प्रकारची थट्टा वाटू लागते. “असे शेतीचे गोडवे गाण्यासाठी अजून काय काय वाक्यं वापरली आहेत ती शोधून तरी काढावीत म्हणजे आता शेतीवर ओढवलेल्या अनर्थाच्या छायेत ती किती विसंगत वाटतात हे तरी पाहता येईल,” असे तो म्हणतो. ही शिक्षणव्यवस्था आपल्याला पांगळे तर करत नाही ना, नोकरीसाठी लाचार तर करत नाही ना, असं त्याला वाटतं. श्रीराम स्वप्नाळू नाही, तो कृतिशीलतेकडे झेपावणारा आहे.
कादंबरीच्या शेवटी सोमनाथच्या शिबिराचे वर्णन येते. त्या शिबिरादरम्यानही तो अस्वस्थच असतो. या शिबिरात ज्या चर्चा आणि गप्पा चाललेल्या आहेत, त्यात आपले, आपल्या गावाकडच्या माणसांचे प्रश्न कुठेच नाहीत, असे त्याला वाटते. गावाकडे प्रचंड श्रम करणारी माणसे आहेत. त्यामुळे या शिबिरातल्या श्रमदानाविषयी त्याला कोणतेही अप्रूप वाटत नाही. उलट इथल्या श्रमाच्या कैकपट श्रम गावाकडची माणसे करतात, पण त्यांच्याबद्दल कोणीच का बोलत नाही, असा भावनांचा गोंधळ त्याच्या डोक्यात उडालेला असतो.
श्रीराम साधा-सरळ आणि चौकटीत जीवन व्यतीत करणारा नायक नाही. तो प्रत्येक वेळी जोखीम उचलतो. अगदी घराच्या कुटुंबप्रमुखाविरुद्ध, स्वतःच्या चुलत्याच्या मनाविरुद्ध तो कृषीशास्त्राकडे वळतो. कृषीशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेऊनही त्याला पुन्हा शेतीकडेच वळावे वाटते. कादंबरीच्या सुरुवातीला त्याचे सरळ रेषेत चालणारे आणि संथ गतीचे निवेदन पुढे पुढे बदलत जाते. त्याला जसजसे राजकीय सामाजिक भान येते, तसा तसा तो उन्नत होत जातो. व्यवस्थेविषयी, शेतीविषयी, समाजाविषयी आपल्या भाषेत चिंतन तो मांडू लागतो. त्यात क्वचित विसंगतीही दिसून येतात. पण एका अस्वस्थ तरुणाची घालमेल म्हणून त्याकडे पाहिले, तर या विसंगतीमागेही अस्वस्थताच आहे, हे लक्षात येते. साधारणपणे ओल्या मातीत केलेली पेरणी ही आश्वासक मानली जाते, पण कधीतरी पाऊस पडेल, या आशेवर कोरड्या मातीत जी पेरणी केली जाते, तिला ‘धूळपेरणी’ असे म्हणतात. यात एक प्रकारची जोखीम आहे. खरे तर कोणताही जबाबदार सर्जनशील लेखक एक प्रकारे आपल्या लेखनातून अशी जोखमीची ‘धूळपेरणी’ करत असतो.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
दोन कादंबर्यांशिवाय मोहिते यांची आणखी तीन पुस्तके आहेत. ‘शेती व्यवसायावरील अरिष्ट’ ही पुस्तिका शेतीक्षेत्रातील सद्यकालीन समस्यांची चर्चा करतानाच काही उपायांचीही मांडणी करते. ‘बोलिलो जे काही’ आणि ‘अधले मधले दिवस’ ही त्यांची ललितगद्याची पुस्तके आहेत. यामधूनही त्यांचे चिंतन प्रकटते. विशेषतः अलिकडे प्रसिद्ध झालेल्या ‘अधले मधले दिवस’ या पुस्तकातून त्यांच्या बहुश्रुत, संवेदनक्षम, नव्या युगातल्या क्रांतीकारी बदलांसाठी उत्सुक अशा व्यक्तीमनाचा परिचय घडतो.
मोहिते यांनी प्रत्यक्ष शेतकरी चळवळीत काम केलेले असल्याने शेतीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन भाबडा नाही, शिवाय जी परिस्थिती निर्माण होते, तिला केवळ भागधेय म्हणून स्वीकारण्यापेक्षा किंवा ते शेतकर्यांचे प्रारब्ध आहे, असे मानण्यापेक्षा या परिस्थितीला जन्माला घालणारी धोरणे ही मोहिते यांच्या चिकित्सेचा विषय होतात. शेतीविषयक प्रश्नांची चिकित्सा करताना ते कुठेच भावविवश होत नाहीत. एखादा सर्जन ज्याप्रमाणे शांतपणे आपल्या पुढ्यातली शस्त्रक्रिया पार पाडतो, त्याप्रमाणे त्यांचे हे विश्लेषण असते. त्यात आक्रस्ताळेपणा नसतो, अभिनिवेश नसतो, प्रश्नांचे रडगाणे नसते. शेतीप्रश्नांची पृष्ठस्तरीय दुःस्थिती मांडून ते थांबत नाहीत. त्यापाठीमागच्या अनेक अदृश्य कारणांचा ते मागोवा घेतात.
मोहिते यांचे ललितगद्य निसर्ग आणि माणूस यातल्या नात्याचा शोध घेते, गावपातळीवर जे नवे बदल घडत आहेत त्याची स्वागतशील वृत्तीने नोंद घेते. तरूणाईमध्ये व्यापार-उदीमाच्या निमित्ताने निपजलेली जिगर आणि जिद्द रेखाटते. शिक्षित पिढीत आत्मभानातून आलेल्या नवसंक्रमणामुळे बदलेले जनजीवन टीपते. ‘अधले मधले दिवस’ या लेखसंग्रहात गाव हे केंद्र असणारे काही लेख आहेत. काही लेख शेत- शिवाराचा पंचनामा मांडतात आणि यातल्या बर्याच लेखांमधून उद्याच्या उज्ज्वल भवितव्याची आस मनाशी बाळगलेले दिसून येते.
या पुस्तकातील लेखांची ही शीर्षके पहा, ‘स्वप्नं सुंदर असतात’, ‘खुणावणारं आभाळ’, ‘गाव बदलण्याचे स्वप्न’, ‘नव्या युगाची चाहुल’, ‘हे स्वप्न पहायला काय हरकत आहे’, ‘वेगळ्या वाटेचे आकर्षण’, ‘अंधारातले दिवे’, ‘खुणावणारे जग’, ‘हळूहळू आत्मभान’, ‘बर्या भविष्याचा सुगावा’, ‘हास हास माझ्या जिवा’ या शीर्षकांमधून लेखांचा आशय ध्यानी यावा. अर्थात शब्दांचे कृत्रिम फुलोरे फुलवत भाबडा आशावाद व्यक्त करणारे हे लेखन नाही. मात्र यातल्या लेखांची शैली मोहक आहे. वरवर सामान्य वाटणार्या, पण उद्यमशीलतेच्या, परिश्रमाच्या जोरावर यशाला गवसणी घालणार्या अनेक कहाण्या ते या निमित्ताने सांगतात. शेतीची बेडी तोडून ज्यांनी नवनवी क्षेत्रे पादाक्रांत केली अशा व्यक्तिरेखांचे आकर्षण मोहिते यांना आहे. शेतीविषयीचा कोरडा पुळका असणारांविषयी ते आपला रोष प्रकट करतात.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
जगभरातल्या उत्तम इंग्रजी साहित्यातून, भारतीय पातळीवरच्या अनेक लेखकांच्या कथा-कादंबर्यांमधून मोहिते यांना जे जे गवसले, अशा सर्व लेखनाची महत्ता ते नोंदवतात. अनेक लेखांमधून त्यांच्या वाचनाची कक्षा लक्षात येते, ती मर्यादीत नाही. सर्वसमावेशक आहे. सत्यजित रे यांचे सिनेमे, कुमार गंधर्वांचे गाणे, प्रेमचंद, फणीश्वरनाथ रेणू यांचे साहित्य असे असंख्य तपशील या लेखनातून येतात. याशिवाय अनेक समकालीन प्रश्नांचे नवे आकलन ‘अधले मधले दिवस’मधून वाचायला मिळते.
शेषराव मोहिते यांच्या दोन कादंबर्यांमधून एक कथानक विकसित झाले आहे. पहिल्या कादंबरीतील कुटुंबकथा शेतकरी जिवनाच्या बारकाव्यानिशी व्यक्त झाली आहे. त्याचबरोबर ती परस्परांना समजून घेणार्या नात्याचीही गोष्ट आहे. घरासाठी खस्ता खाणार्या, विनातक्रार सोसणार्या माणसांच्या कष्टप्रद संघर्षाची वाट या कादंबरीत एका निर्णायक वळणावर आली आहे. भास्कर चंदनशिव यांनी ‘एक करुणाष्टक’ असे या कादंबरीचे वर्णन केलेले आहे.
‘धूळपेरणी’चा आशय आणखी वेगळा आहे. आधीच्या कादंबरीचा हा विकसीत टप्पा आहे. शेतीविषयक शिक्षणात जाणवणारी निरर्थकता, गाव-परिसर सोडून महाविद्यालयीन शिक्षणासाठी विविध चळवळींमधील नायकाचा सहभाग, त्यातून विकसीत होत गेलेले व्यक्तिमत्त्व, पुढे आजुबाजूच्या सामाजिक पर्यावरणाची, शिक्षण व्यवस्थेची उलटतपासणी करू लागते. ‘धूळपेरणी’तून रेखाटलेले जीवनचित्रण म्हणजे ‘शेतकरी जीवनाचा आजचा अधिकृत आलेख’ असे मत ज्येष्ठ विचारवंत भा.ल. भोळे यांनी नोंदवले आहे. त्याचबरोबर कृषि शिक्षणातली यथार्थता आणि काळाच्या कसोटीवर उतरणारी त्यातली मूल्ये यांचा परामर्श घेताना ही कादंबरी म्हणजे ‘शेतकी शिक्षणातील रानभुलीचा पंचनामा’ असल्याचे भोळे यांचे मत महत्त्वाचे वाटते. ‘धूळपेरणी’ ही कादंबरी येऊनही आता दोन दशकांचा कालावधी लोटला आहे.
गेल्या दोन दशकात झपाट्याने बदल झालेले आहेत. युवक चळवळी, शेतकरी आंदोलने यातून तावून-सुलाखून स्वतःची धारदार मते तयार झालेला ‘धूळपेरणी’तला श्रीराम काळाच्या या टप्प्यावर कुठे असेल. सद्यस्थितीत चळवळींची झालेली पडझड, सुरुवातीचा शेतकरी चळवळींचा धुमसता कालखंड, विविध शेतकरी आंदोलनांनी भारावलेला काळ, चळवळीतील कार्यकर्त्यांचे मतभेद, त्यातून वेगवेगळे झालेले प्रत्येकांचे रस्ते, काही धोरणी, महत्त्वाकांक्षी लोकांनी स्वतःसाठी चळवळीचा केलेला गैरवापर, शेतकरी आंदोलनात स्वतःचा अजेंडा पूर्ण करून घेण्यासाठी झालेला काहींचा शिरकाव, प्रामाणिक आणि निष्ठेने झगडणार्या कार्यकर्त्यांची मानसिक घालमेल, प्रस्थापित राजकारणाने आंदोलनांशी केलेला वर्तन व्यवहार, आंदोलनांच्या, संघर्षाच्या आणि प्रश्नांवर आधारित चळवळींच्या मुद्द्यांवर त्या-त्या काळातल्या प्रस्थापित सत्ताधीशांनी केलेली मात अशा असंख्य पैलूंनी या काळाकडे पाहता येईल. ज्या मूल्यांसाठी असंख्य कार्यकर्त्यांनी आपल्या आयुष्याची होळी केली, ज्या स्वप्नांसाठी ते धावत राहिले त्या स्वप्नांचे पुढे काय झाले.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
‘धूळपेरणी’तला श्रीराम या दोन दशकातल्या कालखंडाकडे कोणत्या दृश्यबिंदूतून पाहिल? या काळाचे कलात्म चित्रण करताना त्याची भावना कशी असेल? ...हा खरे तर एका मोठा पट असलेल्या महाकादंबरीचा विषय आहे. मोहिते यांच्यासारख्या राजकीय, सामाजिक भान असणार्या लेखकाजवळ अनुभवांकडे पाहण्याची अंतर्भेदी दृष्टी आहे. त्यांनी शेतकरी चळवळ किनार्यावर राहून पाहिली नाही तर त्यात ते सक्रीय राहिलेले आहेत. या चळवळीतले अनेक अंतःप्रवाह त्यांनी निरखले आहेत. शेतकरी आंदोलनांचे दृश्यचित्रण माध्यमे दाखवतातच, पण या आंदोलनांचे अंतरंग त्यांना ठाऊक आहे. ही कादंबरी केवळ एक दस्तऐवज म्हणून नव्हे, तर गेल्या दोन दशकातील शेतकरी चळवळी, प्रस्थापित राजकारण, समाजकारण यांच्यातले आंतरसंबंध, अंतर्गत संघर्ष उलगडून दाखवणारे कलात्म विच्छेदन म्हणून नक्कीच महत्त्वाची ठरेल. माझ्यासारखे अनेक वाचक त्यांच्या या तिसर्या कादंबरीची वाट पाहत आहेत.
‘साधना’ साप्ताहिकाच्या डिसेंबर २०२२च्या अंकातून साभार
..................................................................................................................................................................
लेखक आसाराम लोमटे पत्रकार व कथाकार आहेत. त्यांची ‘इडा पिडा टळो’ (कथासंग्रह), ‘आलोक’ (कथासंग्रह), धूळपेर (लेखसंग्रह) ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘आलोक’ या कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार (२०१६) मिळाला आहे. ‘तसनस’ ही त्यांची पहिलीवहिली कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे.
aasaramlomte@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment