नोम चॉम्स्की : भाषेकडे बघण्याचा दृष्टीकोन पूर्ण बदलून टाकणारा ‘बोधात्मक क्रांती’चा प्रणेता
पडघम - सांस्कृतिक
दीपक बोरगावे
  • नोम चॉम्स्की आणि त्यांची निवडक ग्रंथसंपदा
  • Thu , 08 December 2022
  • पडघम सांस्कृतिक नोम चॉम्स्की Noam Chomsky भाषा Language राजकारण Politics भाषाशास्त्रज्ञ Linguist तत्त्वज्ञ Philosopher

जगविख्यात भाषाशास्त्रज्ञ आणि राजकीय विचारवंत नोम चॉम्स्की यांनी काल, ७  डिसेंबर २०२२ रोजी आपल्या वयाची ९४ वर्षे पूर्ण करून ९५व्या वर्षांत पर्दापण केलं. भाषा आणि मन यांचे नातेसंबंध काय आहेत? जाणिवेच्या तळाशी भाषेचे नेमके काय चाललेले असते? मौनातही भाषा असते का? फॅसिस्ट संस्कृतीत भाषा कोणती भूमिका बजावते? भाषा आणि साम्राज्यवाद यांचे काही नाते आहे का? लहान मूल भाषा शिकत असताना कुटुंब, समाज, भवतालचे राजकारण, सांस्कृतिक व्यवस्था कशी वापरात आणली जाते... अशा विविध भाषिक पैलूंबद्दल नोम चॉम्स्की यांना काहीतरी सांगायचे असते. त्यांचा भाषेबद्दलचा अपारंपरिक दृष्टीकोन नवी अंतर्दृष्टी देणारा असतो. या भाषाशास्त्रज्ञाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या भाषाचिंतनाबद्दल…

..................................................................................................................................................................

नोम चॉम्स्की यांची ओळख ‘आधुनिक भाषाशास्त्राचे जनक’ अशी आहे. ते एकाच वेळी भाषाशास्त्रज्ञ आणि तत्त्वचिंतक अशा दोन्ही भूमिका वठवताना दिसतात. ह्यूम, कांट, देकार्त, लायबनीझ, स्पिनोझा, यांनी घालून दिलेल्या वैचारिक आणि भाषावैज्ञानिक परंपरा त्यांच्याबरोबर आहेत. चॉम्स्की यांच्या विवेचनातून आणि विश्लेषणातून कोणताही विषय सुटलेला नाही, मग तो भाषाशास्त्र, मानवी संबंध, मानसशास्त्र, राजकारण, युद्धबंदी कुठलाही असो... प्रत्येक विषयाची चिकित्सक चर्चा त्यांनी केलेली आहे.

चॉम्स्की त्यांच्या राजकीय भूमिकांमुळे अधिक चर्चेत राहिले आहेत. त्यांनी वेळोवेळी अमेरिका, इस्राइल, युरोप आणि इतर भांडवलशाही देशांच्या वर्चस्ववादी आणि साम्राज्यवादी धोरणाविरुद्ध कठोर टीका केली आहे. म्हणूनच त्यांची ‘अमेरिकेतील अग्रणी सार्वजनिक विचारवंत’ (Public Intellectual) अशी ओळख आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

त्यांचा ‘द रेस्पोंसिबिलिटी ऑफ इंटलेक्च्युअल्स’ हा लेख खूप गाजला. २६ फेब्रुवारी १९६७ या दिवशी ‘द न्यूयॉर्क बुक’मध्ये तो प्रकाशित झाला होता. या निबंधात त्यांनी व्हिएतनाम युद्धाच्या संदर्भात अमेरिकेच्या साम्राज्यवादी धोरणावर सडकून टीका केली होती. केवळ पठाडीबंद विचारवंत किंवा भाषाशास्त्रज्ञ अशा साच्यात त्यांना अडकून राहणे मान्य नव्हते. वेळोवेळी निर्माण झालेल्या समाजातल्या समस्यांशी आणि त्याच्यांशी जोडून घेऊन नेहमी ठाम भूमिका घेत त्यांनी भाषेच्या ज्ञानाचा उपयोग केला.

हा गाजलेला लेख त्यांनी खरं तर तत्कालीन बुद्धिजीवी वर्गाविरुद्ध लिहिला होता. व्हिएतनाम युद्धात झालेला नरसंहार मूग गळून निवांत पाहणारे बुद्धिजीवी आणि त्यांनी केलेले लांगुलचालन याबद्दलचा त्यांचा तो संताप होता.

चॉम्स्की यांचे लेखन आणि संशोधन हे प्रामुख्याने भाषा आणि भाषेचे विज्ञान यासंदर्भात आहे. १९६० ते ९० या कालखंडात त्यांनी या विषयावर तांत्रिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून पुष्कळ लेखन केले आहे. ‘सिन्टॅक्टिक स्ट्रक्चर्स’ (१९५७) हे त्यांचे सर्वांत प्रभावशाली पुस्तक मानले जाते. त्याचबरोबर ‘आसस्पेटस ऑफ द थेअरी ऑफ सिन्टॅक्स’ (१९६५) हे पुस्तकही खूप महत्त्वाचे आहे. ‘रिफ्लेक्शन्स ऑन लँग्वेज’ (१९७५) आणि ‘नॉलेज ऑफ लँग्वेज’ (१९८६) या त्यांच्या पुस्तकांत भाषाशास्त्रीय संशोधनाची मीमांसा आहे. 

चॉम्स्की यांचे आजपर्यंतचे लेखन आणि संशोधन पाहिले, तर त्यांचा आवाका हा फार मोठा आहे, हे सहज लक्षात येते. भाषेकडे बघण्याचा दृष्टीकोन त्यांनी संपूर्ण बदलून टाकला आहे. म्हणूनच त्यांना ‘बोधात्मक क्रांतीचा प्रणेता’ असेही म्हटले आहे.

भाषेची व्याख्या करताना त्यांनी भाषेची पारंपरिक व्याख्या नाकारली आहे. उदाहरणार्थ, भाषा म्हणजे माहिती, भावना, कल्पना यांची देवाणघेवाण किंवा संज्ञापन, संचारण, संदेशवहन, संसूचना, संप्रेषण करण्याचे महत्त्वाचे मानवी साधन वगैरे. ते म्हणतात की, भाषा ही माहिती, भावना आणि कल्पना दडवण्याचे जबरदस्त साधन आहे. संदेशवहन व संप्रेषण करत असताना तुम्हाला जो संदेश द्यायचा आहे, तोच तुम्ही ‘संदेश देण्याच्या निमित्ताने’ दडवत असता.

भाषा ही केवळ संप्रेक्षण किंवा संदेशवहन म्हणून वापरली जात नाही, तर ती आपल्या अनेक समस्या सोडवण्यासाठी वापरली जाते. आपणास काही सांगायचे नाही, ही गोष्टही भाषा नावाच्या सांस्कृतिक परिप्रेक्ष्यात खूप महत्त्वाची असते. भाषा ही प्रामुख्याने संस्कृती वहनाचे रूप असते. जीवनातल्या समस्या सोडवण्यासाठी आपण भाषेचा वापर कसा करतो हे पाहणे, या दृष्टीने महत्त्वाचे आणि उद्बोधक ठरते. भाषा ही नेहमी संप्रेक्षणासाठी वापरली जातेच असे नाही, तर तिचा उपयोग बऱ्याचदा संप्रेक्षण पुढे ढकलण्यासाठी किंवा वेगळाच मेसेज देण्यासाठीही केला जाते.

भाषेच्या वाच्य रूपाचा विचार केल्यास, निरर्थक बोलत राहणे, थापा मारणे, भाषिक रॅगिंग करणे, शिवीगाळ करणे, अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर येतात. भाषेच्या लिखित रूपाचा विचार केल्यास, अर्थ दडवण्याचा प्रयत्न करणे (हे बहुतेकदा कलेच्या क्षेत्रामध्ये अधिक प्रकर्षाने प्रतिबिंबीत होते), सैद्धांतिक लेखन, गूढरम्य लेखन, ललितलेखन, कायद्यात वापरली जाणारी भाषा, वगैरे अशी अनेक उदाहरणे देता येतील. चॉम्स्की यांनी भाषेच्या संदर्भात दिलेली ही अंतर्दृष्टी खूप महत्त्वाची आहे.

भाषेची अगम्य गुंतागुंत आणि क्लिष्टता नेहमी आवाक्याबाहेरची असते, पण चॉम्स्की यांनी हे प्रश्न सतत सोडवण्याचा प्रयत्न केला. मग तो प्रश्न सृष्टी, वातावरणातील घटक, रोजच्या आयुष्यातील इच्छा, स्वातंत्र्य टिकवायचे आव्हान किंवा एका विशिष्ट प्रसंगी आपण ठराविक पद्धतीची भाषा का वापरतो? थोडक्यात, भाषेसंबंधीचे कोणतेही प्रश्न असो... ते नेहमी आपल्याला उत्तरांच्या शोधात जाताना दिसतात.

चॉम्स्की यांनी आधुनिक भाषाशास्त्राला जन्माला घालून भाषेच्या गुंतागुंतीचा उकल करण्याची भूमिका घेतली. भाषेचा अभ्यास करताना तत्त्वज्ञानाच्या आणि मानसशास्त्राच्या दृष्टीकोनातून भोवतालचे राजकारण-समाजकारण, निसर्ग अशा अनेक गोष्टींची उकल करण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचे दिसते. हे सारे करताना त्यांनी भाषेच्या पारंपरिक चौकटीला छेद दिला आहे. उजवा किंवा डावा कोणताही विचार असो- लोकांच्या जनचळवळींचा नेमक्या सामाजिक व राजकीय आशयावर आणि वर्मावर बोट ठेवून, ठाम भूमिका घेऊन त्यांनी भाषेचा अभ्यास मांडला आहे.

चॉम्स्की यांनी दिलेल्या भाषाविषयक अंतर्दृष्टीच्या आधारावर रोजच्या जीवनातली भाषा, स्त्री-पुरुष नात्यासंबंधीची भाषा, प्रौढ माणसे लहान मुलांशी बोलत असताना वापरली जाणारी भाषा, साहित्य, संगीत, चित्रपट, सामाजिक माध्यमे, शाळा, महाविद्यालये, पाठ्यपुस्तके, प्रबोधन साहित्य, इस्पितळे, रस्त्यावरील भाषा, रॅगिंगची भाषा, राजकारणी मंडळींची भाषा, कायद्याची भाषा, संसद आणि विधिमंडळ अशा संविधानात्मक संस्थांमधून वापरली जाणारी भाषा... अशा अनेक भाषा-उपयोगावर भाष्य करता येऊ शकते, याचे आपल्याला सजग भान येते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

भाषा मानवी संस्कृतीच्या केंद्रस्थानी असल्यामुळे आपल्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीकोनातून चॉम्स्की यांचा भाषाविषयक विचार किंवा त्यांच्या अंतर्दृष्टीचा अन्वय अनन्यसाधारण आहे, असेच म्हणावे लागेल. म्हणूनच, त्यांच्या भाषाविषयक मांडणीचा पुनरुच्चार परत परत करायला हवा.

भाषेविषयीचे राजकारण, सांस्कृतिक प्रश्न, आपल्या दैनंदिन जीवनाच्या सर्व क्षेत्रांत घडणार्‍या असंख्य गोष्टी समजावून घेण्याच्या संदर्भात चॉम्स्की यांनी दिलेली अंतर्दृष्टी महत्त्वाची ठरते. त्यामुळे ज्यांना चॉम्स्की थोडेफार माहीत आहेत किंवा जे पूर्णतः या नावाशी किंवा त्यांच्या योगदानाशी अनभिज्ञ आहेत, त्या सर्वांनी चॉम्स्की यांची पुस्तकं, मुलाखती, लेख आणि भाषणं वाचायला पाहिजेत.

.................................................................................................................................................................

लेखक दीपक बोरगावे भाषाशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक आहेत.

deepak.borgave7@gmail.com 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......