अजूनकाही
आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत सक्रिय राहण्याचा प्रयत्न करणारे समाजवादी कार्यकर्ते संजीव साने यांच्या निधनाची बातमी २८ ऑक्टोबर २०२२ रोजी मिळाली आणि मला १९८७च्या एका राजकीय प्रयोगाची आठवण आली. हा प्रयोग फार पुढे गेला नाही, पण त्यामुळे मला मुंबईत एक मोठं कुटुंब मिळालं. हे कुटुंब विचारांच्या पायावर उभं राहिलेलं होतं. त्याचं पालकत्व महंमद खडस यांच्याकडे होतं. संजीव त्याचे महत्त्वाचे सदस्य होते. या कुटुंबाची खासीयत म्हणजे पुढे यातले लोक वेगवेगळ्या राजकीय संघटनांत गेले आणि त्यांचं राजकारण एकमेकांच्या विरोधातही गेलं, मात्र त्यांचे आपसातले संबंध कधीही बिघडले नाहीत. कदाचित हा त्यांच्या लोकशाहीकेंद्री विचारांचा परिणाम असावा.
‘समाजवादी समन्वय केंद्रा’च्या निर्मितीदरम्यान झालेली आमची दोस्ती आत्ताआत्तापर्यंत टिकून राहिली आणि याचं सगळं श्रेय संजीव सानेंना जातं. त्यांची संवेदनशीलता व मृदुतेमुळे माणसं त्यांच्याकडे अगदी आपसूकपणे ओढले जात. ज्यांना कोणीही आपली व्यक्तिगत सुखदुःख सांगू शकत असे, अशा मित्रांपैकी ते एक होते. अडीअडचणीत ते खांद्याला खांदा लावून सोबत उभे राहत. जे आपल्या साथीदारांशी फक्त राजकारणापुरता संबंध न ठेवता, त्यांच्या आयुष्याचाही भाग होतात, अशा विरळा लोकांपैकी ते एक होते. राजकारण आणि जीवन यांत असा मेळ घालणं फारच कमी लोकांना जमतं.
बारकाईनं पाहिलं तर लक्षात येतं की, या व्यक्तिगत संबंधांचा त्यांच्या राजकारणावर कधीही परिणाम झाला नाही. त्यांचे काही साथीदार काँग्रेससारख्या पक्षातही होते. हा पक्ष निदान २०१४ पूर्वी तरी आपलासा करण्यासारखा मानला जात नव्हता. मात्र यामुळे त्यांच्या स्वतःच्या राजकीय ओळखीवर कोणताही परिणाम झाला नाही.
लोहिया एका विशिष्ट अर्थाने ‘कुजात’ हा शब्द (विचारांशी बांधीलकी असलेल्या मात्र सत्तास्थानांपासून दूर असलेल्या कार्यकर्त्यांबाबत) वापरत असत. त्या अर्थानं जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर एका त्याग व तपश्चर्यापूर्ण अशा साध्या, पण कठोर जीवनाची छबी उभी राहते. ते जगणं बऱ्यापैकी नीरस आणि बंदिस्त असतं. संजीव साने तसे नव्हते.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
त्यांचं व्यक्तिमत्त्व अतिशय रसरशीत आणि नदीसारखं खळाळतं होतं. त्यात तीळमात्र कोरडेपणा नव्हता. ते अशा राजकीय कार्यकर्त्यांपैकी होते, ज्यांची उपस्थितीही आपल्या आसपास स्नेहाचा वर्षाव करत असे. त्यांच्या असण्याने कोणत्याही कार्यक्रमात ‘जान’ येत असे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या या पैलूविषयी अनेकांनी आपल्या शोकसंदेशांत सविस्तर लिहिलंही आहे. ते एक सुंदर गायक होते आणि मैफिलींत ‘चैतन्य’ आणत असत. एखादी सभा, धरणं यशस्वी करण्याकरता ते जसे स्वतःला झोकून देत असत, तसेच एखाद्या मैफलीत गातानाही त्यात पार बुडून जात. अलिप्त आणि कोरड्या राजकारणाहून हे निराळं होतं. लोकांना मदत करणाऱ्यांची आणि एखाद्या लढ्यात हिरिरीनं भाग घेणाऱ्यांची उदाहरणं अनेक आहेत, मात्र संजीवमध्ये एका निराळ्या प्रकारची संवेदनशीलता आणि गतीशीलता दिसून येई. साहजिकच त्यांच्या निधनानं एक मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना अनेकांमध्ये आहे.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीतली समाजवादी विचार व चळवळींची भूमिका समजून घेणं गरजेचं आहे. या विचारधारेच्या शक्यतांबद्दल येणाऱ्या पिढ्यांना माहिती देताना, त्यांना हे सांगणं आवश्यक आहे की, या चळवळीत सामील होणं म्हणजे आपण एक नीरस राजकीय कार्यकर्ता होणं नव्हे. अन्यथा संजीवसारखी व्यक्तिमत्त्वं घडवणाऱ्या वारशांबद्दल समजावून सांगतानाही आपल्याला कठीण होऊन बसेल. यातून संजीवची कहाणी सपाट व एकरेषीय होण्यापासूनही आपण वाचवू शकू. राजकारणात कमावलेल्या गोष्टींना पद, संपत्ती आणि प्रतिष्ठा या परिमाणांतच पाहता कामा नये, हे त्या कहाणीत आहे.
या कहाणीद्वारे मुंबई व महाराष्ट्राच्या समाजवादी चळवळीच्या त्या वैशिष्ट्यांचीही आपल्याला लोकांना ओळख करून देता येईल, ज्यांच्यामुळे मुख्यधारेच्या राजकारणात मधू लिमये, एस.एम. जोशी, जॉर्ज फर्नांडिस, यूसुफ मेहरअली आणि मृणाल गोरे यांसारखी व्यक्तिमत्त्वं आणि त्या मुख्यधारेच्या बाहेरही अनेक लक्ष्यवेधक व्यक्ती यशस्वीरित्या निर्माण झाल्या. तसेच, महाराष्ट्राच्या समाजवादी चळवळीचं हे स्वरूप मार्क्सवाद, गांधीवादापासून आंबेडकरवादामार्गे जाणाऱ्या तिच्या व्यापक विचार-यात्रेमुळे आहे, हेही आपल्याला सोपेपणानं सांगता येईल. यात ‘राष्ट्र सेवा दला’सारख्या प्रयोगांचंही योगदान आहे.
संजीवच्या राजकीय प्रवासात १९४२ सालच्या ‘भारत छोडो’ आंदोलनापासून सुरू झालेल्या महाराष्ट्राच्या समाजवादी चळवळीचं समग्र इंद्रधनुष्य दिसून येतं. या आंदोलनात त्यांचे आई-वडील - यमुताई आणि अण्णा साने - तुरुंगात गेले होते. समाजवादी चळवळीला मिळालेल्या स्वातंत्र्यलढ्याच्या गौरवपूर्ण वारशाने हे इंद्रधनुष्य तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. समाजवादी चळवळीकडे पाहताना तिला स्वातंत्र्यलढ्यापासून वेगळं करता येत नाही.
वरवर पाहता असं वाटतं की, १९७७ साली ‘सोशलिस्ट पार्टी’ विसर्जित झाल्यावर हा प्रवाह कोरडा पडत गेला आणि एका वाहत्या नदीची छोटीछोटी तळी झाली. हे खरंच की, जेव्हा एखादी नदी कोरडी पडते, तेव्हा अनेक साचलेली डबकी वा लहान ओहोळ दिसू लागतात किंवा एखाद्या मोठ्या नदीत सामावून आपलं अस्तित्व हरवून बसतात. मात्र या वरपांगी वेगवेगळ्या दिसणाऱ्या चळवळींकडे आपण जर एकत्रितपणे पाहिलं, तर आपल्याला एखाद्या नदीचंच रूप दिसेल. जमिनीवरून वाहणारे असे वेगवेगळे प्रवाह एकमेकांना मिळून ही नदी तयार झाली आहे आणि अदृश्य असूनही ती आपलं अस्तित्व नोंदवत असते.
कामगार नेता असलेले वडील आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेली आई, यांच्यामुळे समाजवादी विचारसरणीशी संजीव साने यांची लहानपणापासूनच ओळख होती. मात्र त्यांच्या विचारप्रवासाकडे फक्त एक वारशाने मिळालेला विचार म्हणून पाहिलं, तर आपल्याला समाजवादी चळवळीच्या एक महत्त्वाचा प्रवाह नीट ओळखता येणार नाही. या प्रवाहाच्या निर्मितीत संजीवसारख्या लोकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राष्ट्र सेवा दलात त्यांचं प्रशिक्षण झालं होतं. आणीबाणीविरोधी सत्याग्रह केल्यामुळे त्यांना अल्पकाळ तुरुंगवासही घडला होता.
लोकशाही पुनर्स्थापित व्हावी म्हणून जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाला समाजवादी चळवळीचा एक पुढचा टप्पा म्हणता येईल. या आंदोलनाने मुख्यधारेतलीच नव्हे, तर विचारधारेवर आधारित राजकारणालाही नवी दिशा दिली. संजीव समाजवादाच्या या राजकीय प्रवाहाचे सैनिक म्हणून पुढे जात राहिले. त्यांची बहीण साधना, पत्नी नीता आणि मुलगा निमिष हेही समाजपरिवर्तनाच्या मोहिमेत आपलं योगदान देत राहिले आहेत.
संजीव साने यांच्या या विचारांच्या प्रवासात एक सातत्य आणि राजकीय शिस्त होती. ते रचनात्मक कामांत सामील होत असत आणि सामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यात मदत करणाऱ्या कार्यक्रमांत सहभागी होत. मात्र ते स्वयंसेवी संस्थांच्या कामाला बिगरराजकीय मानत असत. म्हणून त्यांनी स्वतःकरता सक्रिय राजकीय कार्याची निवड केली.
राष्ट्र सेवा दलाच्या नेतृत्वापासून वेगळे होत महंमद खडस, गजानन खातू यांच्यासारख्या काहींनी तरुणांची एक फौज उभारली. यात शिवाजी गायकवाड, निशा शिवूरकर, संजय मं. गो., अरुण ठाकूर, शंकर शिंदे, जवाहर नागोरी, जगदीश खैरालिया, सुनील तांबे, विजय तांबे इ. अनेक लोक होते. संजीवदेखील या टोळक्याचा भाग होते आणि त्या कामाकरता आपला पूर्ण वेळ देत असत.
१९८३ साली सुरू झालेल्या ‘समता आंदोलन’ या संघटनेने सामाजिक परिवर्तनाच्या तीन मोठ्या प्रश्नांवर आवाज उठवला - मैला वाहून नेणाऱ्यांची मुक्ती, परित्यक्तांचे अधिकार आणि सर्वांना समान शिक्षण. या संघटनेनं ‘मराठवाडा विद्यापीठा’चं नाव बदलून त्याला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांचं नाव देण्यासाठी झालेल्या नामांतर आंदोलनात आणि मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्याकरता केलेल्या आंदोलनात हिरिरीने सहभाग घेतला.
‘समता आंदोलन’, ‘युवक क्रांती दल’, ‘समता आंदोलन’, ‘छात्र युवा संघर्ष वाहिनी’, यांच्यासह इतर अनेक आंदोलनांशी जोडलेल्या, देशातल्या निरनिराळ्या भागांत काम करणाऱ्या लोकांनी १९८७ साली समाजवाद्यांचं एक राजकीय संघटन तयार करण्याकरता पुढाकार घेऊन ‘समाजवादी समन्वय केंद्रा’ची स्थापना केली. याद्वारे समाजवाद्यांना एकत्र आणण्याकरता काम करण्याचा हेतू होता. यात समता आंदोलनासह ‘युवक क्रांती दला’चे डॉ. भालचंद मुणगेकर, हुसैन दलवाई, शमा दलवाई, अजित सरदार, सुभाष लोमटे, तसेच ‘संपूर्ण क्रांती मंचा’चे विजय प्रताप व रघुपती अशांची भूमिका महत्त्वाची होती. या केंद्रातून फार काही झालं नाही. मात्र यानंतर झालेले प्रयोग आणि एकंदर घुसळणीतून किशन पटनायक, केशवराव जाधव, भाई वैद्य, विनोद प्रसाद सिंह, महंमद खडस, पन्नालाल सुराणा, सुनील, युगलकिशोर रायबीर यांच्या नेतृत्वाखाली ‘समाजवादी जन परिषद’ नामक संघटना स्थापन केली गेली.
या दोन्ही संघटनांत संजीव साने यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ‘समाजवादी जन परिषदे’मध्ये योगेंद्र यादव, अजीत झा, सुभाष लोमटे, शिवाजी गायकवाड, निशा शिवूरकर, संजय मं. गो., अफलातून, डॉ. प्रेम सिंह यांच्यासह संजीव बरेच सक्रिय होते. ज्या वेळी मुख्यधारेच्या राजकारणात समाजवाद्यांचे वेगवेगळे गट झाले होते आणि वैचारिक तडजोडी या थराला गेल्या होत्या की, अनेक लोक जातीयवादी संघटनांबरोबर काम करू लागले होते. त्या वेळी समाजवादी जन परिषदेने समाजवादी चळवळीला एक वैचारिक नेतृत्व दिलं. परिषदेने जागतिकीकरण आणि जातीयवाद यांच्या विरोधात एक स्पष्ट धोरण अवलंबलं, तसेच शेतकरी आंदोलनपासून पर्यावरण व नैसर्गिक साधनसंपत्ती नष्ट करण्याविरुद्ध झालेल्या संघर्षांपर्यंत अनेक आंदोलनांत हिरिरीनं सहभाग घेतला.
संजीवने एन्रॉन, जागतिकीकरण तसेच ‘स्पेशल इकॉनॉमिक झोन’ (सेझ) विरोधी आंदोलनांच्या समन्वयाचं काम केलं आणि एक जोरदार आंदोलन उभं करण्यास मदत केली. यात प्रा. एन. डी. पाटील, उल्का महाजन आणि सुरेखा दळवी इ. सामील झाले होते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
संजीवच्या राजकीय प्रवासाने अण्णा आंदोलनावेळी एक नवीन वळण घेतलं. त्यांनी मेधा पाटकर, योगेंद्र यादव, अजीत झा, गजानन खातू, सुभाष लोमटे, सुभाष वारे, प्रतिभा शिंदे यांच्यासह इतर लोकांप्रमाणे या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात सामील व्हायचा निर्णय घेतला. या आंदोलनाचं रूपांतर जेव्हा ‘आम आदमी पार्टी’मध्ये झालं, तेव्हा त्यांनी ठाण्यातून लोकसभेची निवडणूक लढवली. जेव्हा प्रा. आनंद कुमार, योंगेंद्र यादव, अजीत झा यांच्यासह इतर लोकांनी आम आदमी पार्टीतून बाहेर पडून ‘स्वराज इंडिया’ची स्थापना केली, तेव्हा ते त्यातही सामील झाले.
आपली तब्येत बिघडू लागल्यावरही त्यांनी लोकांना वैचारिक पातळीवर समृद्ध करण्याचा विडा उचलला आणि चर्चासत्रांद्वारे ऑनलाईन काम सुरू केलं.
मृत्युशय्येवर असतानाही ते मानसिकरित्या मजबूत होते. उपलब्ध उपचार घेऊनही त्यांचं शरीर कर्करोगावर मात करू शकलं नाही. त्यांनी उपचार थांबवण्याचा आणि स्वतःला विराम देण्याचा निश्चय केला आणि स्वतःच्या हातानं लिहून तो जाहीर केला. त्यांचे शेवटचे शब्द होते – ‘मी मुक्त आहे!’
एखाद्या नदीसारखी वाहती त्यांची जीवनयात्रा स्मरणात ठेवण्यासारखी आणि प्रेरणादायी आहे.
.................................................................................................................................................................
मराठी अनुवाद - निमिष साने. हा मूळ हिंदी लेख लेख https://samtamarg.in या पोर्टलवर ५ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -
https://samtamarg.in/2022/11/05/sanjeev-sane-a-lifes-journey-full-of-thought-and-sensibility/
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment